(हा लेख मोगरा फुलला दीपावली अन्क २०१० मध्ये प्रकाशित केलेला आहे.)
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी;
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी...
तुझ्यातच संपलेला मी;
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी...
जेव्हापासुन तू आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.कूठुन आलोय? कुठे जायचयं? दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो.तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.माणसाला एकदा स्वःताची सुरुवात आणि अंत कळल्यावर कदाचित मधाला सारा प्रवास व्यवस्थित पार पडत असेल नाही?माहित नाही अजुन प्रवास करायचायं पण तो तुझ्याबरोबर असेल या जाणिवेने मला अजुन काही सुचत नाही!
तुला माझं असं बोलणं निव्वळ वेडेपणा वाटत असेल ना?मला माहित आहे हा वेडेपणाच आहे.पण ठिक आहे यार, तू इथल्या शहाण्यांच नेहमीचं जीवन बघितलंयस ना? मग कशाला मी शहाणा बनु?राहु दे मला असाच, तुझ्या प्रेमात वेडा होउन!पण हे भासचक्राचे संभव जास्त काळ टिकत नाहीत कधीतरी शहाण्यासारखं जगावंच लागतं.
तुझं हसणं, तुझं बोलणं आणि तुझं माझ्या आयुष्यात असणं या सर्वातच मी हरवून गेलोय आणि हे हरवणं ही इतकं सुंदर आहे की मी पुन्हा कुणालाच सापडु नए, अगदी स्व:तालाही!
तुझ्या एका हास्याने मी वेडा होतो.तुझ्या बोलण्याने माझ्या ह्रदयाच्या तारा आपोआप छेडल्या जातात.मुग्ध होउन मी तुझ्यात पुन्हा हरवून जातो आणि सगळ्यांत जास्त जर कुणी वेड लावलं असेल तर ते तुझ्या त्या जुलुमी डोळ्यांनी! अक्षरशः छळ मांडलाय त्यांनी माझा.बर्याचदा असं होतं की मी तुझ्याशी काही तरी बोलायला जातो पण शब्द्च निघत नाहीत आणि मी काही बोलत नाहे म्हणुन तू रुसुन बसतेस.अशावेळी मी या चार ओळी तुझ्या पदरात टाकतो.आशा आहे तू समजुन घेशील...
माझा प्रत्येक शब्द
मी तुझ्या ओंजळीत टाकतोय.
भरुन जाउ दे ओंजळ तुझी,
तुझ्यासाठी नविन शब्द शोधतोय...
मी तुझ्या ओंजळीत टाकतोय.
भरुन जाउ दे ओंजळ तुझी,
तुझ्यासाठी नविन शब्द शोधतोय...
खरंच काय लिहु तुझ्यासाठी मला कळत नाही.तुला पाहिल्यावर मला काही सुचतच नाही.फक्त तुला बघत राहावं.काय बोलु? ते ही कळत नाही. तुच बोल ना काही तरी, तोवर मी तुझ्यासाठी काही नविन शब्द सापडतात का ते पाहतो.
तू बोलताना मला फार गम्मत वाटते.कधी कोसळणार्या पावसा सारखं, तर कधी रिमझिम सरींसारखं, कधी अळवाच्या पानावर असलेल्या मोत्याच्या टपोर्या थेंबासारखं तुझं बोलणं मी ऐकत राहतो.तू बोलत राहिलीस की मला सार्या जगाचा विसर पडतो.सारं काही विसरुन मी तुझ्याकडे पाहत राहतो.
" बोल ना रे काही तरी, मीच किती वेळ बोलायचे रे?' तुझ्या या वाक्याने मी भानावर येतो.
आता काय बोलु?? तू समोर असलिस की शब्द्च जणु मु़के होतात आणि माझे डोळे बोलु लागतात. तला डोळ्यांची भाषा कळते का? चल आपण डोळ्यांनी बोलुयात.
मला तुझे डोळे फार आवडतात, तुला कधी बोललो नाही पण आज सांगतो एखाद्या मासोळीचे असतात ना अगदी तसेच वाटतात मला तुझे डोळे. हसतेस काय?खरं सांगतोय.या,या तुझ्या डोळ्यांनीच मला वेड लावलंय. इतकं की कधी कधी माझे डोळे सुद्धा माझ्याकडे अनोळख्यासारखे बघत राहतात.कधी कधी तर हे वेड इतकं शिगेला पोहचतं की मला सगळीकडे तुझेच डोळे दिसु लागतात.मग कावरा बावरा होउन तुला सांगावंस वाटतं;
तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा आहेच मी थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात.
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा आहेच मी थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात.
एकदा ना मला तुझ्या डोळ्यांत मिसळून जायचंय.पण मला माहितीए कि तू माझ्या डोळ्यांत कधी पाहत नाहीस.फक्त त्यादिवशी आपण कॉफी शॉपमध्ये बसलो होतो, तेव्हा तू किती तरी वेळ माझ्याकडे पाहत होतीस्.पण संदिग्ध नजरेने! तुझं तसं ते मुकपणे पाहत राहणं मला सहन होत नव्हतं. मला डोळ्यांच्या भाषा फार लवकर कळतात. साध्या सरळ आणि प्रॅक्टीकल गोष्टींच्या मी सहसा वाटेला जात नाही. त्यात काही मजा नाही गं ! बरंच काही चाललं होतं तुझ्या मनात.तुझ्या डोळ्यांत ते स्पष्टपणे दिसत होतं. त्यादिवशी मी पहिल्यांदा तुला स्पर्श केला होता.थरथरत्या हाताने तुझा हात हातात घेतला होता.
काही तरी वेगळंच जाणवत होतं.तुझी नजर माझ्यावरुन हालत नव्हती.थोडंसं पाणी दिसतयं त्यांत पण मोठ्या शिताफीने तू ते परतवून लावतेस.ते पाणी कुणासाठी का असेना पण तुझ्या डोळ्यांचं सौंदर्य घालवतात.तुझे डोळे असेच छान दिसतात. हसरे, बोलके, खट्याळ अगदी माश्यांचे असतात ना तसेच! तू कधी माशांच्या डोळ्यात पाणी पाहिलंय?? नाही ना??
मग मला तुझ्याही डोळ्यांत पाणी नाही बघवतं.मग ते माझ्यासाठीही का असेना.मग अशावेळी या चार ओळी मी तुझ्या गालावरुन अलगद पुसतो.
माहीत आहे मला
तू रडतानाही हसण्यचा प्रयत्न करतेस,
माझे अश्रु तुझ्या डोळ्यांतुन
अलगद पुसण्याचा प्रयत्न करतेस.
तू रडतानाही हसण्यचा प्रयत्न करतेस,
माझे अश्रु तुझ्या डोळ्यांतुन
अलगद पुसण्याचा प्रयत्न करतेस.
त्यांतर मला नाही आठवत की आपण एकमेकांना कधी डोळे भरुन पाहीलं.पण खरं सांगु, तोंडाने बोलण्यापेक्षा डोळ्यांनी बोलायची गम्म्त फार वेगळी असते. असंच वेड्यासारखं एकमेकांच्या डोळ्यांत मिसळून जाउन डोळ्यांनीच बोलायचे आणि बोलता बोलता एकमेकांच्या ह्रदयात उतरायचे आणि मग एकमेकांच्या ह्रदयाची धडधड ऐकायची; एकमेकांच्या नावाचे ध्वनी - प्रतिध्वनी ऐकायचे! काही तरी वेगळं, कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात नेउन सोडणारं. जिथे फक्त तू आणि मी!
चल असंच कधीतरी एखाद्या समुद्राच्या किनारी जाउ. तासनतास एकमेकांच्या डोळ्यांत पाहत राहु. एकमेकांमध्ये इतके हरवून जाउ की त्या समुद्रालाही आपल्या अस्तित्त्वाची भूल पडावी आणि तो त्याचं ते विशाल रुप विसरुन,स्तंभित होउन आपल्या दोघांना बघत बसावा. चल कधी एखादया उंच पर्वतावर जाउ, खोल दरीच्या काठावर, त्या निराकार आभाळाच्या छायेत विसावू.एकमेकांमधे इतके विरुन जाउ कि त्या पर्वतालाही स्व:ताच्या उंचीचा हेवा वाटावा. दरीला आपला तळही न सापडावा, आणि आभाळाला त्याची निराकारता सोडुन आपल्यासाठी एक आकार घ्यावा लागावा. पण मनाच्या या सार्या गोष्टी, मनाचे हे सारे खेळ फक्त एकमेकांच्या मनालाच ठावूक. त्यावर कसलाही जोर आजमावून चालत नाही आणि म्हणून अगदी निर्भयतेने मी तुला विचारतो,
तुझं मन माझं मन माझं मन डोंगर दर्यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग??
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने;
एकच असेल तर विरुन जाउ एकमेकांच्या मिठीमध्ये.
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग??
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने;
एकच असेल तर विरुन जाउ एकमेकांच्या मिठीमध्ये.
मी असं बोलतोयं खरं पण तुझ्यापसुन दुर होणं मला कधीही शक्य नाही होणार. हे तुलाही माहित आहे.. पण अशी शंका तरी का यावी माझ्या मनात???
"तू वेडा आहेस अगदी वेडा, ठोंब्या कुठचा!! तुला का रे असं वाटतं की आपण वेगळे होउ??"
तुझ्या या भाबड्या प्रश्नावर मी फक्त एक मंद स्मित करतो.
काय सांगु तुला??? माझ्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नाही, पण एक विचारु??
माझा वेडेपणा इतरांना कळतो
तुला का नाही कळत
जुन्या वाटा सोडुन तुझं पाउल
माझ्याकडे का नाही वळत??
तुला का नाही कळत
जुन्या वाटा सोडुन तुझं पाउल
माझ्याकडे का नाही वळत??
यावर तू स्तब्ध होतेस. काहीच बोलत नाहीस्. मला तुझी स्तब्धता कळते, ती पटकन तुझ्या डोळ्यांत उतरते.
पण डोंगर दर्या,नदया नाले, समुद्र,पर्वत,वाळवंटे, आडवाटा तुडवून आलेल्या आपल्या दोघांच्या मनाला एकमेकांशिवाय कोणाचाच आधार नाही.मग अशावेळी त्यांना एकमेकांच्या मिठीत विरुन जाउ दे!! आपण त्यांना पाहत बसु!! अशावेळी आपण थोडा संमजसपणा दाखवू.म्हणजे मीच गं !! मला ठावूक आहे की आपल्यांत मीच जास्त चुका करतो. पण तरीही..
चल, काही क्षण वाटुन घेउया,
तुझं - माझं,
माझं - तुझं करण्यापेक्षा,
आपलं म्हणुन जगुन घेवुया.
तुझं - माझं,
माझं - तुझं करण्यापेक्षा,
आपलं म्हणुन जगुन घेवुया.
अशाच एका वर्षासंध्येला मी बाहेर पडलोय. घरात मन लागत नाही.. पाउस नुकताच पडुन गेलाय. तुझ्या आठवणी मनात घेउन मी चाललोय.चालत चालत एका माळरानावर येतो.सुसाट वाहणारा वारा त्याच्याबरोबर वाहत आणलेल्या पावसाच्या थेंबानी मला भिजवून जातोय.जशी तू माझ्या छातीवर डोकं ठेवून तुझ्या अश्रुनी माझ्या ह्रदयाला न्हाउ घालतेस ना अगदी तसाच.त्या मो़कळ्या, निर्जन माळावर मी तुला खूप मिस्ड करतोय.त्यात हा वारा, त्याच्याबरोबरचे थेंब, वाटेवरची फुले, गाणारे पक्षी, खळाळून वाहणारे झरे, दुर कुठेतरी वाहत जाणारी नदी हे आज सारेजण माझ्याविरुद्ध कट रचुन तुझ्या आठवणीत अजुन भर घालत आहेत.
आजं अचानक आभाळ सोनेरी झालंय. सुर्य पश्चिमेकडे कलंडतोय आणि जाता जात सारं सोनं आभाळात फेकुन जातोय.सारं आभाळ सोन्याने भरुन गेलंय. ते लुटायला इथे कूणीही नाही.
आजं अचानक आभाळ सोनेरी झालंय. सुर्य पश्चिमेकडे कलंडतोय आणि जाता जात सारं सोनं आभाळात फेकुन जातोय.सारं आभाळ सोन्याने भरुन गेलंय. ते लुटायला इथे कूणीही नाही.
हा सोनेरी पिवळा रंग मला तुझी पिवळ्या साडीतल्या छबीची आठवण करुन देतोय.आज का सारं विश्व मला तुझी आठवणं करुन देतयं?? आणि जसं ते मला तुझी आठवण करुन देतयं तसंच तुलाही तुझं विश्व माझी आठवण करुन देतं का?? नसेल देत तर असु दे!!
आता थोड्यावेळाने सुर्य मावळेल..?? कूठे जाईल तो?? कदाचित त्याच्या घरी..
थांब !! आकाशात पसरलेल्या या सोन्याची एक माळ करतो आणि माझी आठवण म्हणून या सुर्याकरवी तुला पाठवून देतो...
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ,
सये माझ्या गळ्यातली
तू सोनियाची माळ!
माझी सोनेरी संध्याकाळ,
सये माझ्या गळ्यातली
तू सोनियाची माळ!
आवडली का तुला??? धड गुंफायला ही वेळ नाही मिळाला.पण मला माहित आहे तुला नक्की आवडेल. आता थोड्यावेळाने काळोख होईल, हे सोनेरी आभाळ कभिन्न काळोखाने भरुन जाईल.रात्र जीवघेणी असते.सार्या आठवणींना एकत्र करते. रात्र नकोशी वाटते.दिवसाचं एकटेपण मी गर्दीत काढु शकतो पण रात्री आठवणींच्या गर्दीत एकटा नाही राहु शकत. पण, कदाचित तू ही माझ्यासारखीच एकटीच असशिल ना?? हा गर्दीतला एकटेपणा फार सतावणारा असतो.
चल आता ये परत मी तुझी वाट पाहतोय त्याच वळणावर जिथे आपण एकमेकांच्या मनांना एकत्र करुन स्वःता वेगळे झालो होतो.
जाता जाता पुन्हा चार ओळींचं अर्ध्य मी तुझ्या ओंजळीत वाहतोय...
डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना!
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना!
वाह वाह..आधी पण आवडली होती आणि आता पण...
ReplyDelete>> डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना!
मस्तच भावा..मस्तच
धन्स सुहास!
ReplyDelete:) छान छान..
ReplyDelete'तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा आहेच मी थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात.'
:)
सही ना अनघा! :)
ReplyDelete