Sunday, September 26, 2010

रात्रीचा पाउस आणि अस्वस्थता !!

अस्वस्थता !!
.
.
. 
मनात पसरत जाते मुसळधार पावसासारखी...
हिवाळ्यातल्या बोचर्‍या गारठयासारखी..
हजारो मैलांचा प्रवास करुनही जमीन न सापडलेल्या गलबतासारखी...
निर्जन, रखरखत्या वाळवंटात फसवणार्‍या मृगजळासारखी.....


अस्वस्थ मनाची अस्वस्थ स्थिती!!


फार अस्वस्थ आहे मी.. आणि माझं मन तर माझ्यापेक्षा... 

माझ्या मनाला  माझी अस्वस्थता कळत नाही त्यामुळे असेल कदाचित.. 
खरं तर माझं मनही आजकाल माझं राहीलेलं नाही..कुठेतरी दुर निघुन गेलयं.. मला एकट्याला सोडुन.. माझ्या अस्वस्थतेला कंटाळून!! माणसं एकमेकांना सोडुन जातात ना त्याप्रमाणे...


रात्री अचानक माझे डोळे उघडतात.. बाहेर पाउस माजलाय नुसता...रात्रीचे ३ वाजलेत... 

वारा आणि पाउस माझ्या खोलीची खिडकी जोरात वाजवतायत्.कूणी पांथस्थ रात्रीच्या वेळी आसरा शोधत दार ठोठावतो अगदी तसेच... 
माझं कर्तव्य आहे अशावेळी एखाद्या निराधाराला मदत करणं, त्याला आसरा देणं.. पण आजकाल कुणाचा भरवसा करता येत नाही.. 
दार ठोठावणारा तो एखादा चोर किंवा डाकु तर नसेल??? 
माझ्या घरात आसरा मागण्याच्या कपटी हेतुने माझाच काटा काढण्याचा त्याचा बेत तर नसेल??? 
पण असु दे!! मारला तर मारु दे!!  मला त्याला मदत करायला हवी... 


मी हळूहळू खिडकीपाशी जातो..
कोण आहे ??? विचारायच्या आधीच मी खिडकी उघडतो.. 

प्रचंड वेगाने, डोळ्यांची पापणी लवण्याअगोदरही वार्‍याच्या साथीने पाउस माझ्यावर जोरदार हल्ला चढवतो...
माझ्या शरीरावर सपासप वार करतोय...
मी व्हिवळतोय.. सहन न होणार्‍या वेदनांनी...स्वतःला दोष द्यायलाही सुचत नाही... 
का उघडलं मी दार ????  


नाही!! नाही!! थांब!!!
काही तरी वेगळंच घडतयं...
मी चुकतोय....
नाही!! नाही!!  हा पाउस चोर किंवा डाकु नाही.. 
मी साफ चुकलोय !!
हा माझा मित्र, सखा, सोबती आहे..जन्मजन्मांतराचं त्याचं आणि माझं नातं आहे... 
तुला आठवत नाही का?? बर्‍याच वेळा हा आपल्याला भेटलाय.. आपल्या सुख दुखाच्या क्षणांचा भागीदार..
नाही मित्रा, मला माफ कर!! मी तुला ओळखायला चुकलो.

अरे, शेवटी माणुसच ना मी??? 
मला कळलं नाही की इतक्या दिवसांनी तू मला भेटायला आलास, मग कसलाही विचार न करता तू  मला बिलगणारचं !!! आमचं माणसांचं असचं आहे रे!! आजकाल इथे ह्रदयाचे मारेकरी फिरतात बगलेत सुरे घेउन. म्ह्णून थोडं सांभाळावं लागतं. त्यात माझ्याकडे असलेलं ह्रदय माझं नाहीए त्यामुळे फार सांभाळावं लागतं रे! अजुन काही नाही!! 

काय म्हणतो? ह्रदय तुझं नाही ! 

हो! अगदी खरं, हे ह्रदय माझं नाहीच्.

मी फक्त सांभाळतोय ते...माझ्या जीवापलिकडे..बाहेर फिरणार्‍या मारेकर्‍यांपासुन जपतोय...
पण माझ्या अस्वस्थतेपासुन नाही सांभाळू शकत त्याला.. 

काय?? माझं ह्रदय कुठे आहे??? 

माहीत नाही!! ते केव्हाच मला सोडुन गेलयं..

कुठे??? 


कुठे??ते मलाही नाही माहीत.बरंच शोधलं त्याला.डोंगर दर्‍यात, नदी नाल्यात, गर्द रानात, समुद्रकिनारी.जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे शोधलं.पण नाही सापडलं ते.असु दे जिथे आहे तिथे...

काय??? मी खोटं बोलतोय??? 

खरं सांगतोय...मी का खोटं बोलु तुझ्याशी???

ही छातीवरची जखम कसली म्हणुन विचारतोयस?? 

 
भळाभळा वाहणारं रक्त तुझ्याशी अंगाला लागलंय !! अरे रे!! सॉरी हं!!!   
काही नाही रे,असंच, कधीची जुनी जखम ओली झालीय..


घाव ताजे आहेत???.....
.
.
.
.
हो !! मला खोटं बोलताच येत नाही!!! नको नको!! त्यावर फुंकर घालु नकोस !!! 

आत्ताच आत्ताच काही तासांपूर्वी माझ्या ह्रदयाचा खून झालायं.अगदी अमानुषपणे ते माझ्यापासुन कूणीतरी हिरावून नेलय.माझी स्वखुषीने दयायची तयारी होती पण,माझ्या छातीवर वार करुन, ती फाडुन कुणीतरी ते घेउन गेलं.या दाट काळोखात मी चेहराही नाही पाहु शकलो.
बाहेर पडलेले ते तुकडे दिसले तुला?? माझ्याच ह्रदयाचे आहेत ते!! त्याचा खून होताना, त्याला हिरावून नेताना विखुरलेत ते!! गोळा करायला पण जावंस नाही वाटतं!!
असू  दे... तू व्यथित नको होउस, 
माझ्यासाठी तुझे अश्रु नको ढाळूस !!!! 
आधिच माझं घर रक्ताने भरलयं...


तू आलास, फार बरं वाटलं,कुणाच्या तरी आधाराची गरज होतीच मला.

पण पुन्हा त्या अस्वस्थतेमुळी नाही सांगु शकलो कुणाला...
तुझ्या येण्याने धीर आलाय.जखमा धुवून निघाल्यात.आता थोडा वेळ विसावतो.पहाटे जाईन ते तुकडे गोळा करायला..
उरलेले,कुरतडलेले,ओरबाडलेले,रक्ताळलेले....
परत आणुन जोडेन, शिवायचा प्रयत्न करेन.काही झालं तरी माझ्या ह्रदयाचे काही भाग आहेत ते !!  

बरं! आला आहेस तर माझं एक काम करशील?? जाताना हे माझ्याकडे असलेलं ह्रदय घेउन जा.

ज्याचे त्याला परत कर.तसं पण ते माझ्याकडे नाखुष होउन राहीलयं.
सांभाळून जा.बाहेर ह्रदयाचे मारेकरी बगलेत सुरे घेउन फिरत आहेत... 
 

पत्ता??? 
 
अरे हो विसरलोच!! एक काम कर.बाहेर जे रक्ताचे डाग पडलेत ना, रस्त्यावर त्यांच्या मागावर जा.ते जिथे संपतिल ना तिथेच तुला हे ह्र्दय परत कारायचयं आणि हो तिथेच तुला  माझं ह्रदय दिसेल.
एका कोपर्‍यात निपचित पडलेलं,दु:खात बुडालेलं, रक्तात माखलेलं.त्याला प्लीज परत घेउन ये!! 
त्याने बरीच साथ दिलीय मला आतापर्यंत.

माझ्या सुखात ते वेडं होउन,बेभान होउन नाचलयं तर माझ्या दु:खातही तितक्याच आवेगाने रडलयं.ह्रदयाचंही ह्रदय पिळवटुन निघेल इतक्या वेदना त्याने सहन केल्यात.
त्याला मी असं कसं वार्‍यावर सोडु???? घेउन येशील ना??? 
माझी हिम्मत नाही होत तिथे जायला आता....


माझ्या प्रिय ह्रदया, 
मला माफ कर!! 
मी पुन्हा असा गाफिल नाही राहणार, माझ्या अस्वस्थतेमुळे तुझी शिकार नाही होउ देणार यापुढे!! ये तू माझ्याकडे परत!! आपण राहु आपले म्ह्णुन, तुझ्या माझ्या जगात!! 


अस्वस्थता! मेंदुच्या ठिकर्‍या उडविणारी, 
अस्वस्थता! एकमेकांना एकमेकांपासुन तोडणारी..

तुला माझ्यापासुन हिरावून नेणारी....

चल आपण स्वार होवुया; भग्न स्वप्नांची विल्हेवाट लावून नव्या स्वप्नांच्या लाटेवर कधीतरी या अस्वस्थतेचा नायनाट करु या विश्वासावर !!!!!


Thursday, September 9, 2010

तांदुळवाडी ट्रेक


मागच्या रवीवारी २२ ऑगस्ट २०१० ला तांदुळ्वाडी ट्रेक झाला.. नेहमीप्रमाणेच भन्नाट, उसाटलेला, खादाडीने युक्त आणि गोलमय... हा ट्रेक अनुजाने प्लॅन केला होता..अनुजा, मी, सुहास आणि देवेंद्र ( अरे सुरेश! ) असे आणि अनुजाकडुन येणारे तेजस्वी,हिताक्षी आणि तिचा भाउ प्रथमेश अशी टीम ठरली होती.. ऐनवळी सुहासला ताप चढला, तो येण्याच्या प्रयत्नात होता पण ताप त्याला जाउ देइना. तरीही बरं वाटलं तर सकाळी जॉईन करेन म्हणुन त्याने सांगितले. माझाही मुड थोडासा ऑफ होता... त्यामुळे शनीवारी सकाळी मी ही नाही येत म्हणुन अनुजाला कळवले..त्यामुळे एकंदरीत ट्रेक रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती.. मी शनीवारी हाफ डे असल्याने जरा लेटच निघालो. ४ वाजता अनुजाचा फोन आला त्यावेळी मी माझ्या मित्राच्या गाडीतुन चाललो होतो..तो मला कांजुरमार्गला सोडणार होता... आणि त्यानंतर कांजुरमार्ग ते ठाणे, ठाणे ते पनवेल ( माझ्या घरी जाउन ) पनवेलहुन साडे सहाची पनवेल - डहाणु ट्रेन मी कशी पकडली ते माझं मलाच माहित.


त्यारात्री मी अनुजाच्या घरी थांबलो होतो. रात्री मस्तपैकी खादाडी झाली.  मच्छी, ऑम्लेट, सुहासच्या वाट्याची भाजी, वरण, भात ,चपाती, आणि सुक्या मच्छीचं लोणचं.. वॉव ! इट वॉज जस्ट ग्रेट... रात्री सुहाने समस केला कि त्याला यायला नाही जमणार..
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही साडे सहाला अनुजाच्या घरुन निघालो. देवेंद्र बोईसरहुन येणार होता.. तेजस्वी आणि हिताक्षी सफाळ्यालाच भेटणार होते... सकाळी उपमा आणि इडलीच्या पिठाच्या डब्याच्या गोंधळामुळे अनुजाने बनवलेला उपमा जरा जास्तच चिकट झाला होता त्यामुळे सकाळचा अनुजाच्या हातचा नाश्ता मिळाला नाही, मग आम्ही बाहेरच खायचे ठरवलं. पालघर स्टेशनला काही टोस्ट सँड्विचेस घेतले आणि सफाळ्याला उतरलो. देवेंद्र सेम ट्रेनमध्येच होता. तेजस्वी आणि हिताक्षी येईपर्यंत आम्ही आमचा नाश्ता उरकला. काही वेळाने तेजस्वी आली आणि मग हिताक्षीही आली...


तांदुळवाडी किल्ल्यावर जाताना सफाळ्याहुन बस पकडुन तांदुळ्वाडीला उतरुन मग चालत जायचे.. यावेळी हिताक्षी आणि प्रथमेश यांनी दुसर्‍या मार्गाने जायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही चालत चालत गप्पा मारत निघालो.. किती तरी वर्षानी मी शेतातुन चिखल तुडवत चाललो होतो.मध्येच दिसणार्‍या ओढ्यामध्ये पाणी उडवत, चिखल तुडवत आम्ही वाट काढत होतो.. मध्येच एक तळे लागले.. तिथे फोटोसेशन झाले.. आता पुढची वाट जंगलातली होती... वाट सरळ असल्याने थकवा जाणवत नव्हता.. पण पावसामुळे डास माजले होते आणि वाढलेल्या जंगलामुळे अंगाला खाजही सुटली होती.. वाटेत चिखलही बराच होता.. त्यातुन कशीबशी वाट काढत गोल होणार नाही याची काळजी घेत चाललो होतो... पण एका ठिकाणी अशाच चिखलात माझा पाय सटकला आणि धाडकन कोसळलो... आजुबाजुच्या परिसरातील लोकांना आणि जनावरांना भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले असतिल... हे हे हे!!


चालता चालता एका छोट्या धबधब्याजवळ ब्रेक घ्यायला थांबलो.. मी मोसंबी आणली होती..आणि देवेंद्र ने फाईव्ह स्टार चॉकलेट्स सगळ्यांना वाटले.. चॉकलेट खाता खाता अचानक मला ती टीव्ही वरील रमेश आणि सुरेश यांची फाईव्ह स्टारची अ‍ॅड आठवली.. आणि मी चॉकलेट खाता खाता देवेंद्रला बोललो, " अरे सुरेश???? कैसा है तु?? " आणि अशा प्रकारे देवेंद्रचं सुरेशच्या नावाने बारसं झालं ...त्यानंतर त्याला  फार पीडला... प्रथमेश झाडा - फुलांचे, फुलपाखरांचे आणि किड्या - मुंग्या आणि भुंग्यांचे फोटो काढण्यात दंग होता.... त्याला आम्ही ही आहोत फोटो काढायला याची आठवण करुन द्यावी लागली तेव्हा त्याने कूठे आमचा एक फोटो काढला... काही वेळाने आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या पठारावर आलो...तिथे पुन्हा चकली आणिस भाकरवडीचा ब्रेक झाला.. त्या पठारावरुन समोरचं विहंगम दृश्य डोळ्यांत साठवून आम्ही तिथेच टेकलो...

ब्रेक झाल्यावर गड चढायला सुरुवात केली... चढाई तितकीशी कठीण नाही पण काही पावसामुळे दगडांवरुन चढताना सांभाळून चढत होतो... तेजस्वी आणि हिताक्षी भराभर चढत होते.. अर्धी चढण झाल्यावर पुन्हा एकदा टेकलो.. कड्याच्या खाली दरीत उतरणारे ढग अलगद मनातही उतरत होते.. हलका हलका पाउस बरसत होता आणि भिजलेल्या मनावर चिंब शहारे आणत होता.. काय रोमँटिक लोकेशन होते यार !!!!!

पुढची चढणही तशीच होती..पावसामुळे खडक स्लीपी झाले होते.. चढताना अनुजा एका दगडावर घसरली... पण परत वर आली... पुढे पायवाटेने वर चढताना सांभाळून चालावे लागत होते कारण पायवाट अगदी चिंचोळी होती आणि उजव्या बाजुला खोल दरी.... शेवटी सारे जण गडावर पोचलो.. वातावरण ढ्गाळ होते.. पण पावसाची काही चिन्हे दिसत नव्हती..गडावर असलेल्या पाण्याच्या टाकांजवळ पोचतो तोपर्यंत पोटातले कावळे खाव्.खाव खाव म्हणुन ओरडायला लागले होते.. तिथेच एक मोक्याची जागा बघुन आम्ही आमच्या शिदोर्‍या सोडल्या... आणि सर्व खादाडीप्रिय लोकांना जळवण्यासाठी काही स्नॅप घेतले... सुरेशने आम्रखंड पुरी, आणली होती. तेजस्वीने भुर्जी, अनुजाने मुगाची भाजी आणि या स्नॅप्समधे दिसतय ना ते बरेच काही आम्ही सर्वांनी स्वाहा केले...

डेझर्ट म्हणुन मी माँजिनिजचे केक आणले होते आणि देवेंद्रनेही केक आणला होता... वा वा वा काय जेवण झाले!! मजा आला!! चाबुक !! जेवण झाल्यावर गार हवा आता डोळ्यांवर झापड आणत होती.. अनुजा आणि हिताक्षी तिथेच खडकावर पहुडल्या.. मी थोडा पुढे आडवा झालो... प्रथमेश, तेजस्वी आणि देवेंद्र फिरत होते...

अगदी गाढ झोप लागली... सर्व काही विसरुन मी त्या मोकळ्या आभाळाच्या छायेत पसरलो होतो... आजुबाजुची शांतता फक्त ऐकण्याच्या प्रयत्न करत होतो..बर्‍याच दिवसांनी इतकी छान झोप लागली होती.... काही वेळाने जाग आली तेव्हा बाजुला प्रथमेश, देवेंद्र आणि तेजस्वी बसले होते.. मी उठुन बसलो..


समोरची खोल दरी.... कुठच्या तरी गावाच्या तळाशी जाउन संपणारी, जंगलाने वेढलेली, झर्‍यांनी भिजलेली, वेली-फुलांनी नटलेली....दरीत डोकावताना माझ्या मनातही डोकावुन बघत होतो... मनही असंच खोल.... दरी सारखं..पण अथांग .. कुठल्याही गावाचा तळ नाही...,  सुख - दु:खानी वेढलेलं, आठवणींनी भिजलेलं... एकवेळ दरीचा तळ सापडेल पण मनाचा तळ सापडणं थोडसं मुश्किलच नाही का??? अशा नीरव जागी गोंगाटलेल्या  मनाची चलबिचल अधिकच तीव्र होते..सारे बंध तुटल्याचा भास होतो, किती तरी वेळ दाबुन ठेवलेली सारी दु:खं उफाळून वर येतात  आणि मग त्या सार्‍या सुख - दु:खासोबत आणि आठवणींसोबत मनाला समोरच्या खोल दरीत झोकुन द्यावसं वाटतं.......मी त्या सुटलेल्या मनाला खाली झोकुन देतो ही...... पण हे तितकसं सोप्पं नाही... मी झोकुन दिलेल्या मनाला एक गिरकी घ्यायला लावतो..पंख पसरलेलं माझं मन त्या आठवणींच्या दरीत विहार करु लागतं...  इतका विहार करुनही मन भरत नाही, अजुन उडावंस वाटतं...पण मनाच्या मनाविरुद्द जाउन मी त्याला परत वर बोलावतो.. काळोख पडल्यावरही खेळात दंग असलेल्या आपल्या मुलाला आई जशी बोलावत राहते तसं ....हिरमुसलेलं होउन मन परत येतं...मी त्याला समजावतो..."ट्रेक अभी बाकी है दोस्त!!!!"


तिथे आम्ही असंच गप्पा मारत बसलो होत. काही वेळाने हिताक्षीही आली.. अनुजा मात्र झोपुनच होती.. काही वेळाने तिला उठवलं पण तिच्या चेहर्‍यावरची झोप काही उडत नव्हती...आणि आम्ही पुढे चालु लागलो.... गडाच्या दुसर्‍या टोकावर असलेल्या पठारावर आलो... तिथे पुन्हा एकदा सारेजण टेकले.. झोप काही डोळ्यावरुन जात नव्हती.. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे पडत होता.. उन सावलीच्या खेळामुळे झोपेची वाट लागली होती..

त्यात प्रथमेष कुठे तरी गायब झाला.. आम्हाला वाटलं की तो परत किड्या - मुंग्यांचे फोटो मारायला गेला असेल.. आता गड उतरायचं  होतं.. पण प्रथमेषचा कुठे पत्ता नव्हता.. मग तेजस्वीने त्याला शोधुन आणला.. पठठा दुसरीकडे एका कुंडाच्या बाजुला जाउन झोपला होता.....


मग आम्ही तिथुन गडाचा निरोप घेतला आणि उतरायला सुरुवत केली.. उतरताना अनुजाने एक गोल केला त्यामुळे आमची मॅच ड्रॉ झाली.... गड उतरताना आलेल्या रस्त्याने खूपच चिखल होता म्हणुन तांदुळवाडीच्या दिशेने उतरलो...तांदुळवाडीत उतरल्यावर अनुजाच्या एका मित्राच्या घरी आम्ही थांबलो... त्यांच्या विहीरीवर हात पाय धूवुन फ्रेश झालो... अनुजाच्या त्या मित्राची बायको ही अनुजाचे वर्गमैत्रीण होती.. तिच्या आग्रहास्तव आम्ही नही - हो करत चहाला थांबलो.. ( खरं तर चहाची जबरदस्त हुक्की आली होती ) पण पोपट झाला तिने आम्हाला सरबतावर भागवलं, पहिल्यांदा वाटलं कि नंतर चहा येईल पण नाही आला.. शेवटी चालत चालत आम्ही एस.टी.स्टॉपवर पोचलो आणि तिथे एका दुकानावर मस्तपैकी चहा मारला सॉरी घेतला किंवा प्यायलो... तेजस्वीने उरलेले ब्रेड आणि केक काढले आणि चहात बुडवून खायला सुरुवात केली.... एस्.टी.ची वाट बघण्यापेक्षा आम्ही टमटममधे बसुन सफाळ्याला पोचलो... एकमेकांचे निरोप घेतले पुढच्या ट्रेकपर्यंत.......