Thursday, October 6, 2011

स्वप्नफुले !
अशी त्या पठारावर रंगीत चादर पसरलेली असते. मैलो न मैल, इवल्याश्या,अगणित फुलांची चादर! पिवळी, पांढरी, जांभळी, गुलाबी आणि ना ना तर्‍हेची फुलं.कधी स्वप्नातही अशी फुले पाहिली नसतिल. जेमतेम फुट्भर गवताच्या काडीच्या शेंड्यावर अगदी तोर्‍यात, वार्‍यावर डोलणारी ती फुले! अगदी स्वप्नवत! म्हणून स्वप्नफुले ! वर निळेगार आकाश आणि जिथे क्षितिजापर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार कॅनव्हासवर वेगवेगळ्या रंगाचे शिंतोडे उडवावेत तशी ती फुलं. सुर्य जरी तळपत असला, तरी त्याच्या उन्हाचे चटके भासत नाहीत. वार्‍याची गार झुळूक कुठून तरी अलगद शरीरावरुन वाहत जाते. देहभान, भूक तहान सारं काही विसरायला लावतात ती फुलं. विसरू देत नाहीत फक्त तुझा चेहरा! त्या माळरानावर त्या फुलांच्या प्रदेशात तू सोबत असाविस असं वाटत राहतं.पठारावरल्या मळक्या पायवाटेवर पावलं पडू लागतात.  हळूहळू फुलांना जपत पावलं एका अनामिक ओढीने खेचली जातात. कुठुन बरं हे सौंदर्य इथे फुललं असेल हा प्रश्न पावलो पावली पडत राहतो. मग राहवत नाही. एका ठिकाणी काही फुलं अशी दाटीवाटीने उभी असलेली दिसतात. पावलं थबकतात. मन अलगद झुकतं.पहिल्यांदा त्या फुलांना डोळ्यात भरुन घेतो. डोळे आणि मन दोन्ही भरत नाहीत.


मग कॅमेरा आपोआप समोर येतो. फ्रेम मध्ये त्या फुलांचं सौंदर्य मावत नाही. फुलं ही कशी एखाद्या सुंदर मॉडेलसारखी पोझमध्ये असतात. हासरी-लाजरी फुलं. वारा ही त्यांच्यावरुन अलगद वाहून त्यांना शहारुन   सोडतो.फ्रेम सेट असते. सारे प्राण डोळ्यात आणून ते सौंदर्य टीपून घेण्याचा प्रयत्न!
आता फक्त क्लिक करायचं असतं. हात थरथरु लागतो. पण अचानक ती फ्रेम अपूर्ण वाटते. काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागतं. मी कॅम चेक करतो आणि पुन्हा डोळ्यासमोर धरतो. छे ! नाही ! खरंच ही फ्रेम अपूर्ण आहे. त्या फुलांचं सौंदर्य किती ही मोहक असेल पण माझ्या उत्फुल्ल पारिजातकाची सर त्यांना येत नाहीच ! मनात चटकन तुझा विचार येतो. वाटतं आता या क्षणी तू समोर असतिस तर! 

आता तर फ्रेम मधली ती फुलं मला डिवचाताहेत असं वाटू लागतं. माझ्या मनात काय चाललंय हे त्यांना कळलं बहूतेक. माझं ना नेहमी असंच होतं. किती ठरवलं की काही बोलायचं नाही तरी डोळे मनातलं सगळं काही बोलुन जातात. 


असो. मी पुन्हा कॅमेरा समोर धरतो. पण आता ती फ्रेममधली फुलं थोडी अल्लड झालीत. देवयानीसमोर शर्मिष्ठेच्या सौंदर्याची तारीफ केल्यावर जे भाव देवयानीच्या चेहर्‍यावर आले असतिल तेच भाव मला त्या फुलांच्या नाजूक पाकळ्यांवर उमटलेले दिसताहेत. आता मला त्या फुलांची समजूत काढायची आहे. मी कॅम पुन्हा सरसावून त्या सगळ्यां रंगीत फुलांना टीपून घेउ लागतो. पटापट! वेगवेगळ्या कोनातून. अगदी त्या फुलांच्या पाकळ्यांना स्पर्शून मी त्या फुलांना टीपत राहतो आणि दूर कुठे तरी माझी साधीभोळी शर्मिष्ठा मनात पारिजात भरुन  गालातल्या गालत हासत,  माझ्या मनाची होणारी तारांबळ पाहत माझ्या मनाच्या क्षितिजावर पहुडलेली असते.......