Wednesday, April 16, 2014

द हंट - विक्षिप्त शिकार.


              
 
 
                  यावर्षीच्या ऑस्कर्सच्या बेस्ट फिल्मच्या मानांकनातले बहुतेक सर्व सिनेमे पाहुन झाले होते. फक्त नेब्रास्का आणि फिलोमिना राहिला. सहज चाळाचाळ करता लक्ष "Best Foreign Language's लिस्टवर गेले. पाच सिनेमांपैकी 'द हन्ट' (The Hunt) ह्या डॅनिश सिनेमाच्या नावाने थोडंस आपल्याकडे खेचल्यासारखे केलं. या वर्षीचा बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मचा बहुमान 'द ग्रेट ब्युटी' या इटालियन सिनेमाने पटकावयला. तो ही पाहण्याच्या लिस्टमध्ये असतानाच मी पहिल्यांदा 'द हन्ट' पाहायचं ठरवलं.

       लुकास ( Mads Mikkelsen ) हा तिथला स्थानिक डॅनिश कम्युनिटीधला इतर स्थानिकांसारखाच सदस्य आहे. चरितार्थासाठी तो तिथल्या एका किंडरगार्टेन मध्ये शिक्षकाचं काम करतोय. त्याची पत्नी घटस्फोट घेउन त्याच्या मुलाला घेउन सोडुन गेलीय आणि आपल्या मुलाशी एक चांगलं नातं जपण्याच्या प्रयत्नात तो आहे. आधीच मोडलेला संसार आणि त्यामुळे आपल्या एकुलत्या एका मुलाच्या कस्टडीसाठी प्रयत्नशील आहे. हे सगळं असताना देखिल तो त्याचं नेहमीचं काम खूप चांगल्याप्रकारे एंजॉय करतोय. छोटी छोटी मुलंही त्याच्या गोष्टींमध्ये, खेळांमध्ये रमतायत. त्या किंडरगार्टेनमधली ती सगळी छोटी मुलं म्हणजे त्याच्या मित्र-मैत्रीणीचीच मुलं आहेत. त्याचं केजीमधल्या को वर्कर नाजा शी ( Alexandra Rapaport )  अफेअर पण आहे आणि त्यामुळे ती हल्ली त्याच्याच घरी राहतेय. 
 
 

             सगळं काही सुरळीत सुरु असतं. मित्रांबरोबर शिकारीला जाणं, मजा करणं, मित्र-मैत्रीणीच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेट करणं आणि त्यातल्या त्यात त्याला अजुन एक गुड न्युज मिळते की त्याचा ९-१० वर्षांचा मुलगा मार्कस ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये त्याच्याकडे येणार असतो. हे सगळं असं सुरळीत सुरु असताना एक घटना घडते आणि त्याच्या आयुष्याची विल्हेवाट लागायला सुरुवात होते. किंडरगार्टेन मधली एक छोटी चार - साडेचार वर्षांची मुलगी क्लारा केजीच्या हेडबाईंना सांगते की लुकासने काही वेळा तिला त्याचे गुप्तांग दाखवले आणि तो घाणेरड्या गोष्टी करत राहतो. ही क्लारा लुकासच्या अतिशय जिवलग मित्राची, थिओची मुलगी असते. लुकासचं नेहमी थिओच्या घरी येणं जाणं असतं. त्यामुळे कधी कधी क्लाराला लुकास शाळेत सोडायचा किंवा घरी घेउन यायचा. त्यात आई वडीलांच्या नेहमीच्या भांडणामुळेही क्लारा नेहमी लुकास बरोबर मजेत असायची. खरं तर असं काहीच नसतं. ती लुकासने आपल्याशी असं वर्तन केल्याचं खोटंच सांगते. ती असं का करते हे दिग्दर्शकाने एक - दोन छोट्याश्या प्रसंगातुन दाखवून दिलेय आणि ते प्रसंग तितकेसे परिणामकारकही आहेत. पण तिच्या या सांगण्यावर मात्र सगळेजण लगेच विश्वास ठेवतात आणि लुकासचं जिवन विस्कळीत होउन जातं.त्याला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात येतं. कम्युनिटीमधले सगळेजण त्याला लिंगपिसाट ठरवून त्याच्यावर बहिष्कारच टाकतात. त्याची बायको मुलाला त्याच्याकडे पाठवण्यास मनाई करते आणि या सगळ्याच्या प्रेशरमुळे नाजाशी ही त्याचं ब्रेक अप होतं. एकंदरीत त्याचं आयुष्यच धुळीला मिळाल्यासारखं होतं. तरीही तो आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यसाठी झगडत असतो. त्याचा मुलगा त्याच्याकडे येतो. मुलाला आपल्या वडीलांवर विश्वास असतो. खरं काय ते कळल्यावर त्याला क्लारा आणि थिओ कुटुंबियांचा अतिशय राग येतो. उद्विगन होउन तो थिओच्या घरी जातो आणि आपले वडील निर्दोष असल्याचे आनि क्लारा खोटं बोलत असल्याचे सांगतो पण त्याचा कुणावरही परिणाम होत नाही उलट काही लोक त्यालाच रक्त सांडेपर्यंत मारतात. त्याला लोकल मॉलमध्येही काही विकत मिळत नाही. तिथुन त्याला हाकललं जातं. तिकडे केजेमधली अजुन काही छोटी मुले लुकासने आपल्याशी असचं वर्तन केल्याचं सांगून क्लाराच्या बोलण्याची री ओढतात त्यामुळे प्रकरण अजुनच चिघळतं. लुकासचं नेहमीचं जगणं मुशिकल झालेलं असतं. कम्युनिटीने त्याला बहिष्कृत केलेलंच असतं. एकेदिवशी मॉलमध्ये खाण्याचे जिन्नस घ्यायला गेलेल्या लुकासला तिथला कामगार मरेपर्यंत मारतो. म्हणजे हे सगळं बघुन अंगावर काटाच उभा राहतो. रक्तबंबाळ अवस्थेत लुकास मॉलमधुन बाहेर पडतो तेव्हा थिओ आणि त्याची बायको त्याला पाहते. थिओला वाईट वाटतं. कम्युनिटीतले लोकं दोघा बापलेकांचं जगणं हराम करुन टाकतात. रात्रीच्या वेळी दगड मारुन त्याच्या घराच्या काचा फोडुन टाकल्या जातात. त्याची लाडकी कुत्री, फॅनीला कुणीतरी मारुन टाकतं आणि पिशवीत बांधून त्याच्या घराच्या आवारात फेकलं जातं. लोकांच्या या अशा वागण्याने लुकास अतिशय अस्वस्थ होतो. सगळ्या कम्युनिटीच्या लोकांना तो नको झालेला असतो. या सगळ्याने त्रस्त झालेला लुकास ख्रिसमसच्या संध्याकाळी चर्चमध्ये जातो जिथे सगळेजण प्रार्थनेसाठी जमलेले असतात. तिथे जाउन सगळ्यांसमोर तो थिओची कानउघड्णी करतो.

           शेवट काय होतो हे इथे सांगत नाही. Mads Mikkelsen ने लुकासची भुमिका अतिशय प्रभावीपणे पार पाडलिय. मॅड्स ला तुम्ही जेम्स बॉन्डच्या कसिनो रॉयलमध्ये व्हिलनच्या भुमिकेत पाहिलं असेलच. एकंदरीत सिनेमा लुकास आणि क्लारा भोवतीच फिरत राहतो. त्या छोट्या मुलीने देखिल क्लाराचा रोल सुंदररित्या आणि अगदी नॅचरली पार पाडलाय. प्रत्येकवेळंचं तिचं लुकासबरोबरचं वागणं, नंतर तिच्या आरोपांमुळे लुकासला होणारी मारहाण आणि अगदी शेवटच्या प्रसंगात लुकासच आणि तिचं संभाषण हे सगळं त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदरपणे सादर केलयं. अन्न किंवा अन्य उपयोगी वस्तू विकत घेणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही डवलू शकत नाही असं मार खात खात सांगणारा लुकास जेव्हा त्याला दुकानातून बाहेर फेकलं जातं तेव्हा तो पुन्हा दुकानात शिरतो आणि त्या कामगाराला मारतो. आपल्याला हव्या असलेल्या वस्तु घेतो, पैसे फेकतो आणि तसाच रक्तबंबाळ होउन घराच्या दिशेने चालत जातो. हा प्रसंग मॅड्सने अतिशय परिणामकारक उभा केलाय. दिग्दर्शक Thomas Vinterberg ने काही प्रसंग अतिशय परिणामकारकरित्या उभे केलेत. शिकारीच्या वेळच्या डेन्मार्कच्या त्या गावातल्या जंगलातल्या काही फ्रेम्स तर क्लासच आहेत.



                लहान मुलांचे लैंगिक शोषण ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि हल्ली तर असे प्रसंग आपल्या आजुबाजुला देखिल सर्रास घडतात. त्यावर एक समाज म्हणुन आपली प्रतिक्रिया काय असते? म्हणजे निदान भारतात तरी अशी विशेष काही शिक्षा होत नाही. हा सिनेमा काही मुद्दे ठळकपणे मांडतो. एक तर जेव्हा क्लारा लुकासवर आरोप करते तेव्हापासुनच सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात कारण ती लहान असते, आणि त्यात ती मुलगी असते. 'लहान मुलं कधीही खोटं बोलत नाहीत' असं केजीच्या हेडबाई लुकासला ठणकाउन सांगतात आणि त्याला नोकरीवरुन काढलं जातं. इथे आपल्याला कळतं की समाज सत्य जाणुन न घेता एखाद्याच्या विरोधात आंधळेपणाने कसा वागू शकतो. पण लुकास निर्दोष आहे हे तो त्यावेळी सिद्ध करु शकत नाही किंबहुना त्याला तसा चान्सच दिला जात नाही. कुणीही त्याचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं. थिओचा लुकासवर फार विश्वास असतो आणि  तो आपल्याला प्रत्येक प्रसंगात जाणवत राहतो अगदी शेवटच्या प्रसंगातसुद्धा जेव्हा थिओला सत्य कळतं तेव्हा तो तडक ड्रींक्स आणि खायला घेउन लुकासच्या घरी जातो. एका प्रसंगाने आपली कित्येक वर्षांची मैत्री कशी लयास जाउ शकते आणि आपण कधी कधी अशा प्रसंगी काहीच करु शकत नाही हा हताशपणा थिओच्या भुमिकेतुन जाणवू लागतो. क्लारा प्रत्येकवेळी कन्फ्युझिव्ह स्टेट्समेंट देत राहते. पण ती कदाचित त्या धक्क्यात असेल असे समजुन सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात. तसं बघायला गेलं तर अशी घटना क्वचितच घडत असेल. पण लहान मुलांच्या कल्पनाविस्ताराला आणि त्यांच्या स्वतःच्या जगाला थारा नसतो. त्यांच्या आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा नकळत त्यांच्या बालमनावर परिणाम होत असतो. काही प्रश्नांचं मोठ्यांकडून समाधान न झाल्यास कदाचित मुलं त्यांच्या समजेनुसार एखादी घटना किंवा प्रसंग जन्माला घालत असावेत. क्लाराचं अगदी तसंच काहीसं होतं पण शिकार होते बिचार्‍या निर्दोष लुकासची. 
 
- दीपक परुळेकर

1 comment:

  1. मला 'साथिया' पोस्ट वाचायची आहे...

    ReplyDelete