Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Monday, November 18, 2019

आभाळ नेसूनि ये..

विझला सूर्य, निजली संध्या
तू चंद्राला जागवीत ये
चांदण्यांची फुले माळूनी
रात्र सारी फुलवित ये

काळोखाचे काजळ अन्
लाली त्या संध्येची घे 
गर्द घनांची शाल ओढुनी 
आभाळ सारे नेसूनि ये

नक्षत्रांचा हार गळा 
बांधून पैंजण लाटांचे
वाऱ्यावरती स्वार होऊनि 
अलगद अवनीवरती ये

गात तराणे मुग्ध नदीचे 
क्षितिजावरती नाचत ये
पाऊलखुणा शोधीत माझ्या
हासत ये, लाजत ये

ये प्राणांची ज्योत होऊनि 
वेड्या मनाची प्रीत होऊनि 
स्वप्न साजिरे तुटण्याआधी 
ये जराशी मिठीत ये.. 


- दीपक परुळेकर 



Monday, October 10, 2016

पद्मनाभपूरम महाल:त्रावणकोर साम्राज्याचा कलात्मक साक्षिदार


गेल्यावर्षी कम्पनीच्या कामानिमित्त ३-४ वेळा तुतिकोरीनला जावं लागलं. तुतिकोरीन हे नाव यापूर्वी कधी ऐकलं होतं का तुम्ही? ऐकलं असेलही! पण बऱ्याचजणांना हे नाव माहिती देखील नाही. गम्मत म्हणजे माझ्या एका मित्राने विचारलं,”अरे तिकडे जायला व्हिजा वैगरे लागतो का?” असो. घाबरू नका. हे ठिकाण भारतातच आहे. तामिळनाडू राज्यात पार खाली, तिकडे कन्याकुमारीच्या बाजूला. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात या शहराचं नाव वाचलं होतं. इथल्या समुद्रात भरपूर प्रमाणात मोती सापडतात. मोती असलेल्या शिंपल्यांच्या शेतीसाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे. पण खरं तर मला या शहराबद्दल इथे लिहायचं नाहीये. ज्या अद्भुत आणि अप्रतिम अश्या वास्तूबद्दल मला लिहायचं आहे तिथे मी कसा पोचलो यासाठी या शहराचा संदर्भ.

तर ३-४ वेळा मला तुतिकोरीनला कामानिमित्त जावे लागले. खरं तर मला हे शहर अजिब्बात आवडले नाही आणि पुन्हा आवडेल असेही नाही. पण काम असल्याने मला तिथे जावे लागत होते. बरं क्लायंट सरकारी असल्याने काम लवकर होत नव्हतं, त्यामुळे सारखा मुक्काम वाढायचा. मला कुठेही एकट्याला फिरायला अजिब्बात आवडत नाही आणि मुंबईसोडून दुसरीकडे ४-५ दिवसांच्या वर मुक्काम अजिबात जमत नाही. पण यावेळी पापी पेट का सवाल असल्याने इथे प्रत्येक भेटीत १५-२० दिवस मुक्काम होत होता. त्यात आठवडाअखेर सरकारी कार्यालयाला सुट्टी असल्याने शनिवार-रविवार हॉटेलवर लोळत, टीव्ही बघत घालवत होतो. अति वैताग आला म्हणून मग एकदा मदुराईला जाऊन मीनाक्षी मंदिर आणि तिथूनच जवळ असलेला प्रसिद्ध थिरूमलाई नायक्कर महाल बघून आलो. एका भेटीत कन्याकुमारीला जाऊन आलो. खरंतर अश्या ठिकाणी एकटं फिरणं ही मोठी शिक्षा असते. कुणीतरी सोबत बोलायला असणं फार गरजेचं असतं. असो. तुतिकोरीनच्या शेवटच्या भेटीतहि मुक्काम १५-२० दिवस झाला होता. यावेळी जाताना सोबत कॅमेरा घेऊनच गेलो होतो. यावेळी तिथून जवळ असलेल्या रामेश्वरम आणि निघताना केरळला श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन मुंबईला परतायचा बेत केला होता. कामासोबत थोडी फोटोग्राफीहि होईल असा विचार केला. मागच्यावेळी कॅमेरा सोबत नसल्याने कन्याकुमारीची भेट अगदी रुखरुख लावून गेली होती; इतक्या अप्रतिम फ्रेम्स तिथे होत्या. तर पद्मनाभस्वामीला जायची माहिती गुगलवर शोधताना अचानक ‘पद्मनाभपूरम पॅलेस’ या जागेने लक्ष्य वेधून घेतलं. मग त्याची माहिती मिळवताना आणि गुगलवर काही संदर्भ वाचताना निर्धार केला की आधी हाच महाल बघून घेऊया.

गुगल नकाशावर तुतिकोरीन ते पद्मनाभपूरम महाल हे अंतर मोजले. कुठून कुठे जायचे याचा बेत आखला. एका दिवसात जाऊन येण्यासारचे अंतर होते. त्यात आधी कन्याकुमारीला मी याच मार्गाने गेलो होतो त्यामुळे काळजी नव्हती. एका शनिवारी पहाटे पाच वाजता उठलो आणि पटपट आवरून हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या तुतिकोरीन सिटी बस स्टँडवरून तिरुनलवेलीला जाणारी बस पकडली. तिरुनलवेली हे नागरकोइल-बेंगळूरु-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरी एक मुख्य शहर आहे. पाउण तासात तिरुनलवेलीला पोचलो, तिथून मग नागरकोइलला जाणारी बस पकडली. तामिळनाडू राज्यातले हे रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत. मी सगळा प्रवास तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधूनच केला. सरकारी बसेसची अवस्था पुण्यातल्या पीएमटीला लाजवेल अशी पण रस्ते सुबक असल्याने काही वाटत नव्हतं. ड्रायव्हरदेखील एफवनच्या ड्रायव्हरला लाजवेल अशी तुफान पण संयमित ड्रायव्हिंग करतात. हायवेवरून सुसाट धावताना उजव्या बाजूला असलेल्या उत्तुंग पर्वतरांगा मन वेधून घेतात. आणि त्या पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या, वाऱ्याने भिरभिरणाऱ्या असंख्य पवनचक्क्या बघून थक्क व्हायला होत होतं. उजव्या बाजूच्या पर्वतरांगा ओलांडल्या की तिकडे केरळ. या पर्वतरांगा म्हणजे पश्चिम-घाटाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच शेवटच्या टोकाच्या पायथ्याशी म्हणजे वेल्ली पर्वताच्या सुंदर अश्या बॅकड्रॉपवर वसलेला आहे पद्मनाभापूरम पॅलेस. पण तिथे पोचायला अजून बराच वेळ होता.


तासा-दीड तासात नागरकोइलला पोचलो. इथे दक्षिणेत दुसऱ्या राज्यातून आलेल्या माणसाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून आलेल्यांना दोन मोठ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागतं; एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे जेवण. जेवणाच्या आणि भाषेच्या बाबतीत माझा चेन्नईमधला अनुभव देखील अतिशय वाईट होता. जेवण एकवेळ आपण वेळ मारून नेऊ पण भाषेचं काय करणार? इथले लोक तमिळ शिवाय काहीच बोलत नाही. येत असेल तरी हिंदी मुद्दाम बोलत नाहीत, नाहीतर आपण महाराष्ट्रातले लोक समोरचा मराठीत असेल तरी हिंदीत सुरु होतो. नागरकोइलला पोचल्यावर इथून पद्मनाभपूरम पॅलेसला जायला १४ किमी वर असलेल्या ‘थकलाई’ (Thuckalay) या गावी पोहचायचे होते. बऱ्याच लोकांना हिंदीत विचारून बघत होतो, पण कुणीच दाद देत नव्हतं. इकडल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं इंग्लीश देखिल भयानक असतं. मला जिथे जायचं होतं त्या गावाचं नाव कुणालाच समजत नव्हतं. शेवटी एक देवमाणूस भेटला त्याने मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तो देखील त्याच मार्गाने थिरूवनंतपुरमला चालला होता. त्याच्यासोबतच मी बस पकडली. ही बस मस्त होती. सुंदर नक्षिकाम केलेल्या लाकडी खिडक्या वैगरे होत्या. मला गम्मतच वाटली. मग त्या माणसाने सांगितलं की ती केरळ ट्रान्सपोर्टची बस होती. नागरकोइल सोडताना एक सुंदर नदी ठिकठिकाणी सोबत करत होती. २० मिनिटात मी ‘थकलाई’ गावात पोचलो तेव्हा साधारण अकरा वाजले होते. ‘थकलाईहून आता पद्म्नाभापूरमला जायला अजून एक बस पकडली आणि ५ मिनिटात महालाच्या ठिकाणी पोचलो.

या महालाचे प्रथम दर्शन अतिशय मुग्ध करणारे होते. पद्मनाभपुरम किल्ल्याच्या आवारात हा अतिशय सुंदर असा महाल गेली ३५०-४०० वर्षे उभा आहे. महालाच्या मागच्या बाजूला असलेला उत्तुंग अश्या वेल्ली पर्वताच्या बॅकड्रॉपवर हा नक्षिदार महाल अतिशय उठून दिसत होता. पर्थम दर्शनी मला राहवले नाही इतकावेळ बॅगमध्ये पडून आराम करणारा कॅमेरा काढला आणि आवारातून काही फ्रेम्स टिपल्या. नंतर बाजूला असलेल्या तिकीटघरातून माझे आणि माझ्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे तिकीट घेतले. बॅग आणि बूट तिथल्या अमानतघरात जमा केले आणि आम्ही दोघे (मी आणि माझा कॅमेरा) महालात शिरलो.


त्रावणकोर साम्राज्याची राजधानी असलेली ही जागा आणि तिथे उभं असलेलं हे नितांत सुंदर वास्तुशिल्प आजही त्या गतवैभवाची साक्ष देत उभं आहे. ई.स. १६०१ मध्ये त्रावणकोर साम्राज्याचा त्यावेळचा अधिपती, राजा इरावी वर्मा कुलसेखरा पेरूमल याने हा महाल बांधल्याचे समजते. त्याने १५९२ – १६०२ पर्यंत त्रावणकोर साम्राज्याची धुरा वाहिली. हा संपूर्ण महाल एकाच राजाच्या कार्यकालात बांधला गेला असे नाही; कारण या महालाच्या आवारात असलेली ‘थाई कोट्टरम’ अर्थात ‘राणीच्या आईचा महाल’ ही इमारत अंदाजे ई.स. १५५० साली बांधण्यात आली. म्हणजे यामितीला ५०० वर्षाहून अधिक काळ लोटला आणि तरीही ही इमारत आणि त्यावरील लाकूडकाम आजही जसेच्या तसे आहे. ई.स. १७५० साली राजा अनिझाम थिरूनल मार्थांड वर्मा याने हा संपूर्ण महाल बांधून काढला आणि ते शहर आपलं कुलदैवत श्री पद्म्नाभाला अर्पण केलं त्यावरून मग या महालाला देखील हेच नाव पडले. पुढे त्रावणकोर साम्राज्याची राजधानी त्रिवेंद्रमला नव्याने स्थापण्यात आली आणि पद्मनाभपूरम महालाची रया गेली. आता जरी ही जागा भौगोलिकरीत्या तामिळनाडू राज्यात असली तरी हा महाल आणि महालाची जागा केरळ सरकारच्या अखत्यारीत आहे. या महालाची देखरेख केरळ पुरात्तव विभागाद्वारेच केली जाते. 
चला तर मग या महालाची अद्भूत सफर करूया:

सहा एकर परिसरावर पसरलेल्या या भव्य महालात लहानमोठ्या अशा १४ वास्तू उभ्या आहेत. महालाच्या मुख्य दरवाजातून म्हणजेच ‘पुड्डीपुरा’मधून आपण प्रवेश करताच ‘पूमुखम’ या स्वागतकक्षात दाखल होतो. इथे समोरच असलेल्या स्वागातदारावरील लाकडावरची नक्षि  आणि कोरीव असे ग्रॅनाईटचे खांब आपलं लक्ष्य वेधून घेतात. इथेच पुरातत्वविभागाद्वारे नेमून दिलेले काही तरुण तुम्हाला माहिती देण्यासाठी उभे असतात. हिंदी, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजीपैकी तुम्हाला जी भाषा हवी ती निवडू शकता आणि त्या भाषेत माहिती पुरवली जाते. या स्वागतकक्षाचे छत देखील अतिशय रेखीव अशा लाकूडकामाने सजविले आहे. वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ९० फुले या स्वागतकक्षाच्या छतावर कोरली आहेत. बघून डोळेच काय कॅमेरा देखील थक्क होतो! अतिशय सुंदर असा हा स्वागतकक्ष बघून झाल्यावर मार्किंगला अनुसरून मी पहिल्या माळ्यावर गेलो. इथे ‘मंत्रासाला’ म्हणजे राजाची आणि मंत्रिमंडळाची बैठकीची खोली आहे. या खोलीत प्रकाश, तापमान आणि हवा यांचा सुरेख मेळ जमवला आहे त्यामुळे या खोलीत नेहमीच एक प्रकारचा गारवा पसरत असतो. मंत्रासाला जोडून खाली ‘उत्तुपुरा’ म्हणजे भोजनगृहात उतरायचे. ७२ बाय ९ मीटरचा हे भोजनगृह म्हणजे त्यावेळचे कँटिन असावे. एकेवेळी २००० लोक जेवायला बसायची क्षमता असलेल्या या भोजनगृहात त्यावेळी सणासुदीला राजाकडून गरीब प्रजेला भोजन दिले जाई. तिथे एका जागी भली मोठी चीनी मातीची भांडी अजूनही आहेत. ही भांडी मुख्यत्वे लोणची आणि मसाले मुरवायला वापरायचे अशी माहिती तिथल्या माहितीगाराने पुरवली.


तिथून पुढे आपण ‘थाई कोट्टारम’ म्हणजेच राणीच्या आईच्या महालात प्रवेश करतो. आधीच सांगितल्याप्रमाणे हा दुमजली महाल सर्वात आधी म्हणजे १५५० साली बांधण्यात आला. आणि तेव्हापासून ही वास्तू आजही सुस्थितीत आहे. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एकांथ मंडपम’ म्हणजेच तिथला व्हरांडा आणि या व्हरांड्यात असलेले अतिशय सुबक, अद्भूत असे नक्षिकाम केलेले कोरीव खांब. इथलं छत देखील अप्रतिम अश्या कोरीव लाकडी फुलांनी सजवले आहे. त्याकाळी या महालाचे बांधकाम करताना जो मुख्य खांब आधारस्तंभ म्हणून रोवला होता तो फणसाच्या झाडाचा खांब आपण आजही तिथे पाहू शकतो. ‘थाई कोट्टारम’ प्रामुख्याने राजघराण्यातील स्त्रिया अंत:पूर म्हणून वापर करत असत. या महालात चार बाजूला चार मोठे शयनकक्ष आहेत.


‘थाई कोट्टारम’ बघून पुढे बाहेर पडून मार्गिकेच्या खुणेनुसार एका चिंचोळ्या गल्लीतून चालत ‘उप्परीकामलिका’ या दुसऱ्या वास्तूत प्रवेश करायचा. परिसरातली ही सर्वात उंच आणि तशी एकदम नवी वास्तू ई.स. १७५० मध्ये राजा मार्थंड वर्मा याने बांधली. ही वास्तू त्याने आपले कुलदैवत श्री पद्मनाभ याला अर्पण केली म्हणून या वास्तूला ‘पेरूमल कोट्टरम’ म्हणजेच देवाचा महाल असेही म्हटले जाते. ‘उप्परीकामलिका’ याचा शब्दश: अर्थ अनेक मजले असलेली वास्तू असा होतो. या महालाला एकूण तीन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर कोषागार आहे तर दुसऱ्या मजल्यावर राजाचे शयनकक्ष आहे. या शयनकक्षात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवायची व्यवस्था आहे. अतिशय सुबक अश्या एकून ६४ प्रकारच्या लाकडी नक्षीकामाच्या जोडणीतून राजाचा झोपायचा पलंग या खोलीत आहे. त्या पलंगावरील नक्षिकाम डोळे दिपविणारे आहे. तिसऱ्या मजला हा प्रार्थनेसाठी वापरण्यात येत असावा. इथे तिसऱ्या मजल्यावर नितांत सुंदर, अप्रतिम आणि खरोखर शब्दात ज्यांचे सौंदर्य मांडता येणे शक्यच नाही अशी १७ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. कितीही पाहिली तरी डोळे आणि मन भारत नाहीत इतकं सौंदर्य त्या भित्तीचितत्रात सामावलेलं आहे. ज्या निष्णात कलाकाराने ही चित्रे काढली, त्यात मनमोहक रंग भरून ती फुलवली त्या अज्ञात निर्मिकाला आपण मनोमन नमन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहि. (सुरक्षेच्या कारणावरून या भित्तीचित्रांचे फोटो घ्यायला बंदी आहे.)


उप्परीकामलिकाला जोडूनच पुढे ‘प्लामूट्टील कोट्टारम’ नावाचा दुसरा महाल आहे. या महालाचे सगळे इंटेरिअर लाकडापासूनच बनविले आहे. छोट्या, छोट्या लाकडी पुलांनी हा महाल उप्परीकामलिकाला जोडला गेला आहे. ‘वेप्पीनमोडू कोट्टारम’ ही वास्तू ‘पुमुखम’ला जोडली गेली आहे. या वास्तूचे व्हरांडे अतिशय कलात्मकतेने उभारले आहेत. स्टेन्ड ग्लास आणि मायकाचा वापर करून एक सौम्य प्रकाश इथे खेळविला आहे. त्या काचेवरील चित्रे देखील अप्रतिम आहेत. खरं तर या महालातून फिरताना आपण एका भूल भूलैय्यातून फिरत असलाच भास होतो. आणि फिरताना एखाद्या खिडकीतून किंवा सज्जातून मागचा वेल्ली पर्वत खूप छान फ्रेम्स देत राहतो. पुढे ‘इंद्रविलास महालाला जोडून एक लांबलचक कोरिडोअर आहे. या कोरिडोअरच्या भिंतीवर काही ऐतिहासिक जुनी चित्रे आहेत. ‘अंबरी मुखपम’ म्हणजे सज्जा किंवा ‘Bay Window’ हे इथले मुख्य आकर्षण आहे. इथल्या खोल्यांना असलेल्या भल्या मोठ्या खिडक्या, दरवाजे हे फोटोग्राफीसाठी खूप आकर्षक फ्रेम्स मिळवून देतात.


या महालात जरा जास्तच रेंगाळल्यावर बाहेर मोकळ्या आवारात येतो. इथे बाजूला एक छोटे गार्डन आहे. तिथून पुढे आवारात असेलेल्या ‘दक्षिण महाल’ या वास्तूला भेट द्यावी. ही वास्तू केरळी स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर असा नजराणा आहे. अतिशय जुन्या वस्तू जसे की, टेबल, खुर्च्या, काही वाद्ये आजही तिथे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या महालाच्या  परिसरात असलेल्या वास्तू आकाराने छोट्या, एकमेकांना जोडलेल्या होत्या. आणि दरवाजे तर उंचीला अतिशय कमीच. एक दोनदा फोटो घ्यायच्या नादात चांगलाच आपटलो. ‘हे दरवाजे इतके कमी उंचीचे का?” अशी विचारणा केल्यावर तिथल्या माहितीगाराने जे उत्तर दिले ते भारावून टाकणारे होते. तो माहितीगार म्हणाला, “आपण जिथे राहतो, जी वास्तू आपल्याला आधार देते तिचा आदर आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करताना नेहमी झुकून, आदराने प्रवेश करावा; यासाठी हे सगळे दरवाजे उंचीला कमीच असतात.” ही वास्तू म्हणजे ‘दक्षिण महाल’ राष्ट्रीय ठेवा म्हून जाहीर करण्यात आली आहे.

‘पुत्थन कोट्टारम’ म्हणजे नवीन महाल ही या समुहातली सर्वात नवीन वास्तू. या वास्तूचा उपयोग मुदपाकखाना म्हणून केला जाई. यालाच लागून एक सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीचे पाणी जेवणासाठी वापरले जाई. त्यावेळची किचन सिस्टम इथे बघावयास मिळते, तसेच मॉडर्न स्टाईल ग्रॅनाईटसने बांधलेल्या टॉयलेट्सच्या रचना देखील बघावयास मिळतात. संपूर्णपणे ग्रॅनाईटच्या दगडाने बांधलेला ‘नवरात्री मंडपम’ म्हणजे तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा. इथे अनेक कलाकार संगीत, नाट्य, नर्तन अश्याप्रकारच्या आपल्या कला सदर करीत. या नवरात्री मंडपमचे छत म्हणजे एक अक्खा ग्रॅनाईट दगड आहे. त्याला आधार देणारे खांब आणि त्यावर कोरलेल्या मुर्त्या देखील अतिशय सुंदर आहेत. हे सर्व पाहून झाल्यावर मनात आणि कॅमेऱ्यात साठवून मार्गिकेच्या खुणेनुसार पुढे जायचे. ‘थाई कोट्टारम’ ला जोडून एका दुसऱ्या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर सैन्याची शस्त्रे ठेवायची जागा म्हणजेच ‘आयुधपुरा’ आहे. त्याची रचना देखील अत्यंत  सोयीस्कर आहे. आता शस्त्रे तिथे नाहीत. हे संपल्यावर आपण तिथून खाली उतरलो की थेट महालाच्या बाहेरच्या आवारात पोचतो. झाला आपला आतील महालाचा प्रवास. पण बाहेर अजून एक वास्तू आपली वाट पाहत उभी असते. केरळ पुरातत्वविभागाचे एक वस्तूसंग्रहालय इथे आहे. इथे त्रावणकोर (केरळ आणि तामिळनाडू चा काही भाग) मध्ये सापडलेली अति प्राचीन शिल्पे ठेवण्यात आली आहेत. वेळ होता तेव्हा तिथे भेट देऊन आलो.


हे सगळं संपेपर्यंत साडे तीन वाजले होते. खरंतर मी खूप घाई घाईत फिरलो, हा महाल व्यवस्थित बघायला किमान एक पूर्ण दिवस तरी हवा आणि फोटोग्राफी करायची असेल तर दोन दिवस पकडून चला इतक्या अप्रतिम फ्रेम्स मिळतात इथे. स्टील फोटोग्राफीसाठी तर ही जागा स्वर्ग आहे. भारतातून अनेक मोठ्या आर्किटेक्ट कॉलेजेसमधून विद्यार्थी या महालाचा आणि स्थापत्यकलेचा आभ्यास करण्यासाठी येतात. केरळ, कन्याकुमारीला जाणारे परदेशी पर्यटक देखील इथे वाट वाकडी करून येतात. आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा लाकडी महाल असून अजून देखील UNESCO च्या ड्राफ्ट यादीत पडून आहे. या महालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या महालाचे लाकडावरील नक्षिकाम. हा संपूर्ण महाल म्हणजे प्राचीन दक्षिणात्य स्थापत्यकलेचं एक अप्रतिम असं जिवंत उदाहरण आहे. कालपरत्वे महालाच्या रचनेत बराच बदल होत गेला. महालाचे स्थापत्य आणि लाकूडकाम हे अति भव्य आणि नेत्रदीपक आहे. एकएक इमारत बघताना डोळे आश्चर्याने थक्क होतात; इतकं प्राचीन आणि नाजूक कलाकुसर जाणणारे आणि करणारे स्थापत्यविशारद आपल्या देशात होते. पारंपारिक स्थापत्यशास्त्र, निपुण शिल्पकारिता आणि भौतिक विज्ञानाचे सखोल ज्ञान म्हणजे पद्म्नाभापुरम महाल. आजही हे वास्तुशिल्प अतिशय काळजीपूर्वक जतन करणाऱ्या केरळ सरकार आणि पुरातत्व विभागाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या वैभवाची म्हणजेच गड-किल्ल्यांची दुरवस्था बघितली की मन विषण्ण होते. १७०० च्या आसपास बांधलेला आपला शनिवारवाडा आज त्याची जी दुरावस्था झालीय त्याच्याकडे कोणाला बघायला देखील वेळ नाहीय. आपले गड-किल्ले, त्यांची अवस्था तर काय विचारूच नका! फक्त फुकाचा अभिमान आणि माज दाखवण्यात आपण आपल्या या वास्तूंची विल्हेवाट लावत आलोय आणि लावतोय. त्याची ना आपल्याला कदर आहे ना आपल्या पुरातत्व विभागाला! पार तिकडे इंग्लड –फ्रांसला जाऊन बघू नका की पुरातन वास्तू, शिल्पे कशी जपायची ती आपल्या भारतात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे ह्या वास्तुंचा आजही आदर केला जातो आणि त्यांना जपलं जातं. कधी दक्षिणेकडे कन्याकुमारी किंवा थिरूवनंतपुरमला भटकायला आलात तर या वास्तूला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. इतकं सुंदर आणि पुरातन वास्तुशिल्प दुसरीकडे कुठे बघावयास मिळेल की नाही माहित नाही. डोळ्याचे पारणे फिटविणारा हा महाल एकदा तरी डोळे भरून पाहावाच.

कसे जाल? 
कन्याकुमारी पासून : ३६ किमी  
थिरूवनंतपुरम पासून: ६३ किमी. 
जवळचा एअरपोर्ट: थिरूवनंतपुरम
जवळचे रेल्वे स्टेशन: नागरकोइल. 
  

Friday, June 26, 2015

‘ती’ मैत्रीण...

      त्यादिवशी तिला भेटलो. भेट काही ठरवून नव्हती घेतली. काही योगायोग असतात आणि जुन्या, कित्येक वर्षं अधुऱ्या राहिलेल्या भेटी पूर्ण होतात, तसंच काहीसं. तसा तिला मी अगदी लहानापानापासुंच ओळखतो. दर दिवशी शाळेत जाताना, किंवा त्याबाजूने गेलो की ती दिसायची. इतर मित्र - मैत्रीणीसारखीच ती सुद्धा. पण मला आठवतयं, तिच्याशी कधी मी जास्त बोललोच नाही. जितका इतर मित्रांसोबत वागायचो, बोलायचो, खेळायचो तसा मी तिच्याशी कधी वागलोच नाही. पण एक मात्र खरं की तिचं एक सुप्त असं आकर्षण मला अगदी लहानपणापासुनच होतं आणि आजही आहे. पण मी ते कधी कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का? अगदी स्वत:ला ही मी ते जाणवू दिलं नव्हतं, का कुणास ठाऊक? 

        त्यादिवशी तिला भेटलो तो एक योगायोगच असावा. नेहमीच्याच रस्त्याने जात होतो आणि सहज बाजूला लक्ष्य गेलं. ती दिसली. तशीच, अगदी लहानपणी दिसायची तशीच. तिच्यात जास्त बदल झालाच नव्हता. काहीसं मनात ठरवून मी चालत तिच्यापाशी गेलो. माझ्यासमोरच होती ती. तिला पाहून एक उसनं स्मित द्यायचा प्रयत्न केला, ते बघून ती खुदकन हसली. काय बोलावे ते सुचेनाच. मला तसा बावचळलेला पाहून ती अजूनच हसायला लागली. खूप सारे स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागले. कुठूनशी वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या स्मिताबरोबर माझ्या अंगावरून गेली. मी थोडासा शहारलो. काहीच न सुचल्याने मी तिथेच तिच्यासमोर  माडाच्या झाडाला टेकून बसलो. ती समोरच. दोघेही शांत. तिला इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. ती खरंच अतिशय सुंदर दिसत होती. बाहेर चैत्राचं उन भाजून काढत होतं, पण ती बहरून गेल्यासारखी भासत होती. किती तरी वेळ मी फक्त तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहताच राहिलो, ते ही अगदी पहील्यांदाच. ती ही पाहत राहिली; बऱ्याच वेळाने मी बोलायला सुरुवात केली,
“कशी आहेस?”
“ठीक आहे. तू कसा आहेस? आणि आज इतक्या दिवसांनी इकडे कुठे वाट चुकलास?” तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं.
“काही नाही, सहजच. सुट्टी होती म्हणून गावी आलोय काही दिवसांसाठी.” मी उत्तरलो.
“बरं. बाकी काय? सगळं ठीक ना?”
“हो. सुरु आहे. ठीक चाललयं.”
पुन्हा दोघांत एक शांतता पसरली. एक रानपक्षी हेल देऊन गाऊ लागला. तिथून, तिच्यासामोरून मला उठावसं वाटत नव्हतं. पण अजून काय बोलू ते कळतच नव्हतं.
“इतक्या वर्षात आपण पहिल्यांदाच असं भेटतोय ना?” मी त्या शांततेत एक खडा टाकला; पुन्हा अनेक स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन वाहू लागले.
“हो. म्हणूनच मी विचारलं तुला की आज इकडे कुठे वाट चुकलास म्हणून.” तिच्या चेहऱ्यावर ते स्मित अजूनही विरत होतं. 
“नाही. तसं काही नाही. म्हणजे तुलाही आठवत असेल शाळेत जाताना नेहमी भेटायचो की आपण.” मी चाचरत काही तरी बोललो.
“भेटायचो नाही रे. फक्त एकमेकांना बघायचो. हां, एक दोन वेळा तू इथे मित्रांसोबत अभ्यासाला यायचास ते आठवतयं, पण तेव्हाही तू इथे मित्रांसोबतच असायचास. आपण तसे कधी भेटलो किंवा बोललोच नाही. मग शाळा संपल्यावर तू निघून गेलास.” ती.
“हो. तसंच काहीसं. तेव्हा वाटायचं तुझ्याशी खूप बोलावंस, पण का कुणास ठाऊक हिम्मत नाही व्हायची.” मी.
“आता तरी आहे का हिम्मत बोलायची? की...?” ती पुन्हा हसली.
“अगं, काहीही काय. बोलतोय ना तुझ्याशी आता.” मी हसत म्हणालो.
“काय रे, आपल्या मैत्रीणीशी बोलायला काय घाबरायचं? बोलायचं बिनधास्त.”
“घाबरत नाही गं. तुझ्याकडे येऊन बसून बोलावसं खूपदा वाटायचं पण माहीत नाही का? नाही जमलं कधी. तुझ्याबद्दल लहानपणापासूनच एक आकर्षण होतं मला. पण कधी जमलंच नाही तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी बोलायला. जेव्हा जेव्हा तू दिसायचीस तेव्हा तेव्हा मनात अगदी समुद्र भरून यायचा. फार सुंदर दिसायचीस तू; म्हणजे आताही, आय मीन, आताही तू तशीच सुंदर दिसतेस. दर पावसाळ्यात मी तुला पाहायचो. चिंब होऊन जायचीस तू. बेभान होऊन नाचायलाच लागायाचीस. सगळे बंध तोडून तू सगळीकडे पसरलेली असायचीस. तेव्हा तुझ्याकडे नुसतं बघत राहावं असं वाटत राही. हिवाळ्यात अगदी उलट. पहाटे जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा तू धुक्याची चादर पांघरून असायचीस, तुझ्या श्वासांतून उमटणारी बाष्पाची वलयं तुझ्या चेहऱ्याभोवती दाटून यायची, आठवतयं मला.” 
“बापरे! माय, माय! किती ते वर्णन. आई शप्पथ! इतकं कधी कुणी मला माझ्याबद्दल बोललंय असं आठवत नाही!” ती हसत हसत म्हणाली.
“बघितलंस, माहिती होतं की तू हसणार म्हणून मी कधी तुझ्याशी असं काही बोलायचो नाही.” मी थोडा रागवत म्हणालो.
“काय यार, मस्करी पण नाही का करायची? लगेच कसला रे फुगतोस? खरं सांगू मलाही नेहमी वाटायचं की तू माझ्यापाशी यावसं. आपण खूप साऱ्या गप्पा माराव्यात, या इथे बागडावं, गाणी गावीत. पण ते कधी तुला सांगू नाही शकले. तू इथेच या गावात राहिला असतास तर ते शक्यही झाले असते, कदाचित. पण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच नाही का? मला बापडीला काय, मी आहे अशीच. मी ही हे सगळं सोडून कुठे जाणार ना? मग आहे. पण कधी कधी वाटत की तुझ्यासारखा कुणी तरी मित्र असावा. घटकाभर येऊन त्याने भेटावं, बोलावं, सुख - दु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात. वाऱ्यावर ताल धरून एक सुंदरसं गाणं गावं. बस्स, अजून काही नाही. आपल्या मैत्रीसाठी एखाद्याने एवढं तरी करावं ना रे? नाहीतरी इथे कोण असतं कुणाचं? ” ती स्तब्ध झाली.

“खरं सांगतो, मलाही कित्येकदा असं वाटलंय. अगदी अस्सच वाटलंय की पुन्हा तुला पावसात बेभान होऊन नाचताना बघावं आणि तुझ्यासोबत आपणही पावसात नाचावं, चिंब होऊन बागडावं. तुझ्या अंगणात पुन्हा येवून खेळावं, तुझ्यासोबत गाणी गावी. कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटेचं तुझं धुक्याने आच्छादून गेलेलं रूपं पाहत बसावं. खूप वाटतं असं. पण तुझ्याबद्दल मला नेहमीच एक आदर आहे. मी इतर मित्रांशी कसाही वागू शकतो, बोलू शकतो. पण तुझ्याशी तसं नाही करू शकत. असं वाटतं की अगदी लहानपणापासूनची आपली ही मैत्री अखेर पर्यंत तशीच राहावी; अभंग. त्या मैत्रीला कुठेही, कसलाही बांध नसावा. हा प्रवाह असाच निरंतर रहावा.” मी. 

“मैत्रीचं काय आहे? ती राहिली तर राहते. टीकवली तर टिकते, नाही तर जाते वाहून. पण कधी कधी उगाच ओढूनताणून टीकवण्यापेक्षा ती वाहीलेलीच बरी असते. मैत्री हे काही नातं नाहीय. त्यात कुणी कुणाला बांधील नसतं आणि नसावंच मुळी. मलाही असंच वाटतं आपल्याबद्दल. कधी कुठे भेटलो तर निदान एकमेकांची ओळख तरी विसरत नाही आपण. ओळखीचं, मैत्रीचं, जाणीवेचं एखादं स्मित पुरेसं आहे आपल्यात, आणि हे असंच असावं नाही का रे?” ती.

 मी पुढे काही बोललो नाही. ती ही शांतच राहिली. थोड्यावेळाने उठून मी तिचा निरोप घेतला.

“येत जा असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी ओळखीचं भेटलं की.” 
ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली.
“हो. नक्की.” असं म्हणून मी जायला वळलो. तिच्या चेहऱ्यावरले तरंग पुन्हा विरत गेले. खूप दिवसांनी त्या दूरच्या मैत्रीणीला भेटून, तिच्याशी बोलून फार बरं वाटलं. 



'नदी’ माझी दूरची मैत्रीण.  





        नदीचं एक सुप्त आकर्षण मला कधीपासून तरी आहे. मी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का अगदी स्वत:लाही मी हे जाणवू दिलं नव्हतं. माझ्या गावात एक नदी आहे. कुठून रानावनातून, दऱ्या-खोऱ्यातून वाहत येते आणि समुद्रात विलीन होते. का कुणास ठाऊक कधी प्रवासात मला एखादी नदी दिसली की मन अगदी भरून जातं. समुद्र जीवाभावाचा मित्र असेल तर नदी ही मैत्रीण. इतके दिवस नव्हतं जाणवलं. ती सुद्धा माझ्याशी तशीच वागते, दूरच्या मैत्रीणीसारखी. काही दूरचे नातेवाईक असतात तशीच ही माझी दूरची मैत्रीण. पण दूरची असूनही अगदी जीवाभावाची. कधी भेटली तर ती जास्त बोलत नाहीत. कधी तरी, क्वचितच एखादं संयत, संथ आणि नितांत सुंदरसं स्मित झळकेल तिच्या चेहऱ्यावर. कधी चालताना, तर कधी प्रवासात बस-ट्रेन मधून ती जोवर दिसेल तोवर आमची सोबत. एखादं स्मित दोघांच्यात. बस्स! नंतर ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला. निरोप असा घेत नाही आम्ही. माहीत असतं पुन्हा भेट होईलच. पण तोवर हुरहूर ही लागलेलीच असते जीवाला.

लहानपणापासून समुद्र माझा मित्र, सखा, सोबती, यार सगळं काही. आमच्या गावात समुद्रही अगदी तसा जवळच. पण समुद्रावर कधी जायला मिळायचं नाही, त्यामुळे कधी प्रवास करताना गाडीतून १-२ मिनिटासाठी दिसणारा समुद्र मी अधाशीपणे प्राशून घ्यायचो. लहानपणापासून समुद्र माझ्या सोबतीलाच. एका सच्च्या दोस्तासारखा. आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा तो जणू एक साक्षीदारच. सगळया सुख दु:खांत तो माझ्यासोबत. नंतर किती तरी वेळा मी त्याच्या किनारी जाऊन त्याच्याशी बोलत बसलोय. कितीतरी वेळा त्याच्या लाटांच्या तालावर गाणी गात बसलोय. कितीदा तरी किनाऱ्यावरल्या उष्ण वाळूत अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजल्यात; पण नदीशी मी असा कधी वागलोच नाही. माझ्या गावात नदीही आहे. नदीच्याच बाजूला गाडीरस्ता. येणाऱ्या - जाणाऱ्यांची नेहमीची वाट. आम्ही देखिल शाळेत जाताना याच नदीच्या बाजूच्या रस्त्याने जायचो यायचो. प्रत्येक मोसमात नदीची वेगवेगळी रूपं दिसायची. पावसाळ्यात दुथडीभरून ती वाहायची. नदीचं पाणी काठ फोडून शेतमळ्यात शिरायचं. सगळा शेतमळा एखाद्या प्रचंड मोठया सरोवारासाराखा भासायचा. पावसाळ्यात नदीचं पाणी पुलावरून गेलं की शाळेला हमखास सुट्टी. श्रावणात एखाद्या माहेरवाशीणीसारखी बेभान होऊन नाचणारी, बागडणारी नदी शिशिरात गारठून जायची. आम्ही पहाटे शाळेत कुडकुडत जायचो तेव्हा पुलावरून दिसायचं; नदी धुक्याची चादर पांघरून शांत वाहायची. जणू पुन्हा सासरी जाणाऱ्या मुलीसारखी आतल्या आतच रडायची.                                    

लहानपणापासून मला पाण्याचा प्रवाह, डोह, समुद्र दिसला की त्यात स्वत:ला झोकून द्यावेसे वाटायचे. पोहायची भयंकर इच्छा असूनही घरच्यांच्या ओरडण्याने साध्या दारातल्या ओहोळातही जायला मनाई होती. नदीचा दुसरा काठ सहज दिसायचा. मला लहानपणी नेहमी वाटायचं की उडी मारली तर सहज पोहून नदीच्या दुसऱ्या काठावर जाईन. त्यावेळी त्या शांत, गूढ नदीच्या रुपाची मला कल्पना नव्हती. मला वाटायचं की असा कसा बुडेन नदी मला तरंगवत दुसऱ्या काठावर घेऊन जाईल. पण हां! असा प्रयत्न कधीच केला नाही. तुम्ही नदीची विविध रूपं लक्ष्य देऊन बघा, ती प्रत्येकवेळी वेगळीच भासते. पण मला सर्वात भावतं ते तिचं गूढ, शांत, रूप. पण तेव्हाची पाण्यात जायची ओढ आता नाही राहिली. हां, फक्त त्या प्रवाहाला, डोहाला, अथांग समुद्राला दुरून बघत राहतो. समुद्राची ओढ असली तरी नदीचं वेगळंच असं आकर्षण मनाला लागून आहे.                   

खरंच जितका मुक्तपणे मी समुद्राशी वावरतो, बोलतो तितका नदीशी कधीच नाही. मला आठवत नाही की, मी कधी तासनतास नदीच्या किनारी बसलोय. तिच्याशी भरभरून बोललोय. तिच्या काठावर बसून, वाऱ्याच्या आणि रानपक्ष्यांच्या साथीवर कधी गाणी गायलीत. तिच्यासाठी कधी ३-४ ओळी खरडल्या. नाही, कधीच नाही. ही अशी अबोल मैत्री गेली कित्येक वर्षे आमच्यात आहे. तिच्याविषयी नेहमीच एक आदर वाटत राहतो मला. त्यामुळेच असेल की, मी तिच्याशी तितक्या सलगीने नाही वागत. कधी जाऊन तिला मनातलं नाही सांगत. तिच्या काठावर तासन तास, तिला न्याहळत नाही बसत. पण वाटतं हेच ठीक आहे. 

प्रत्येकासमोर आपल्या आयुष्याचं पुस्तकं उघडून वाचण्यात काय अर्थ आहे? 
बसावं कधी निवांत एकमेकांसमोर, नुसतंच. 
काहीही न बोलता, उलगडावे मनातले बोल आपोआप. 
सुख-दु:खांच्या पलीकडे ही असावं काहीतरी बोलण्यासारखं. 
नसावी कोणतीच भावना हसवणारी, रडवणारी, मोहवणारी. 
असावी फक्त एक निरपेक्ष जाणीव. 
एकमेकांच्या अस्तित्वाची. एकामेकांच्या असण्याची. 



Saturday, February 1, 2014

तुटलेला तारा .. (३)

          बरोब्बर साडे बारा वाजता ट्रेन कुडाळला थांबली. लगबगीने ती स्टेशनवर उतरली आणि बाहेर आली. स्टेशनबाहेर प्रवाशी आणि रिक्षांची झुंबड उडाली होती.कोकणात पहिल्यांदाच तिने पाउल ठेवं होतं आणि जसं अभी सांगायचा अगदी तसंच वातावरण होतं ते. दुपार असली तरी वार्‍याची एक मंद झुळूक अंगावरुन वाहतच होती.इथुन तिला अभयच्या गावी जाण्यासाठी एसटीने जाणे भाग होते. रिक्षा करुन ती एसटी स्टँडवर जायला निघाली.तिथे पोचल्यावर तिने चौकशी खिडकीपाशी जाउन गाडीची चौकशी केली तेव्हा गाडीसाठी अजुन १५-२० मि. बाकी होती.तोवर ती गाडीची वाट बघत तिथेच बसली आणि आजुबाजुला न्याहळू लागली. स्टँडवर थोडी गर्दी होती. गाडीची वाट बघत कुणी गप्पा मारत होते.शाळा कॉलेजच्या मुलांचा गोंधळ सुरु होता.क्वचित एखादे रडणारं लहान मुल आणि त्याला धपाटा घालणारी आई.बाजार करुन आता घरी जायची वाट बघत असलेल्या बायका. या सगळ्यात कोणतीही गाडी आली की त्याच्यामागे धावणारे हे सगळे लोक आणि एका विशिष्ट आवाजात त्या गाडीची होणारी अनाउंसमेंट. हे सगळं ती बघून हसत होती. मग ५-१० मि. तिला समजलं की इथे बसुन गाडी मिळणार नाही. कारण मोस्ट ऑफ गाड्यांचे फलक धड वाचताच येत नव्हते. मग ती सुद्धा एखादी गाडी आली की त्या लोकांमध्ये मिसळून जायची. अभी पण त्या एसटी स्टँडवरची ही गम्मत नेहमी सांगायचा.तिला ते आठवलं आणि उगाचच स्वतःवर हसू आलं. १५ मि. तिची गाडी आली आणि पुन्हा ती त्या सगळ्या लोकांमध्ये मिसळून गेली.लोकांची घाई फक्त बसण्यासाठी जागा हवी म्हणून होती हे तिला महत्प्रयासानी एसटीत चढल्यावर कळलं.कशी बशी तिला एक विंडो सीट मिळाली आणि ती स्वतःवरच खुश झाली.बसमध्ये नुसता गोंधळ सुरु होता आणि तो सुद्धा मालवणीत.ती ते एक एक संभाषण ऐकायचा आणि समजायच प्रयत्न करत होती. मालवणी भाषा समजायला कठीण नव्हती पण तिला ती बोलता नसती आली.कधी कधी ती अभयला संगायची,"मला पण शिकव ना रे मालवणी." मग तो सांगायचा एखाद्या मालवणी मुलाशी लग्न कर महिन्या-दोन महिन्यात मस्त बोलायला लागशील. त्यावर ती नाक मुरडायची. गाडी बरीच भरली होती आणि त्या सगळ्या गर्दीतुन वाट काढत,लोकांच्या सामानावर पाय ठेवत, शिव्या घालत आणि लोकांच्या शिव्या घेत कंडक्टर तिकिटं फाडत होता. काही वेळाने गोंगाट कमी झाला. बरीच लोकं उतरली होती. तिला लास्ट स्टॉपवर उतरायचं असल्याने काळजी नव्हती.पाउण एक तासाने गाडी एका मो़कळ्या पठारावर आली. दोन्ही बाजुला लांबवर पसरलेलं पठार आणि मधून ती एसटी सूसाट धावत होती. वार्‍याने उडणारे केस सावरत ती दूरवर त्या पठारकडे बघत होती. कातळावर मध्येच कुठेतरी सोन्यासारख्या पिवळ्या गवताचा पट्टा तिच्याबरोबर धावत होता. त्यावर चरणारी गुरं, एखादं दुसरं झाड, एखादी टपरी, मध्येच कुठल्यातरी गावाला गेलेली वाट, असं सारं तिच्याबरोबर मागे पडत होतं. एसटी शिडांत हवा भरलेल्या जहाजासारखी ते पठार कापत सूसाट निघाली होती.थोड्यावेळाने पठार संपलं आणि एक दोन स्टॉप घेउन एसटी एका घाटातून उतरु लागली तोच तिची नजर समुद्रवर गेली आणि समुद्राचे दर्शन होताच ती हरखून गेली. दूरवर तो समुद्र पसरलेल होता.मध्येच एक डोंगर समुद्रात घुसला होता. दुपारच्या वेळी शांतपणे लाटा किनार्‍याला थोपटत होत्या. गाडी घाटवळनातून जात असल्याने समुद्र मधे मध्येच दिसायचा पण त्या घाटवळणातूनच तो फार छान दिसत होता. अभी नेहमी सांगायचा ती हीच जागा तर नसेल ना. तिला आठवलं अभय नेहमी त्या जागेचा उल्लेख करायचा. गाडी घाट उतरुन आता त्या छोट्याश्या शहरात शिरली आणि पाच एक मिनिटात एसटी स्टँडवर पोचली.

          "चला, लास्ट स्टॉप." म्हणत कंडक्टरने आरोळी दिली आणि बाकीच्या प्रवाशांसोबत ती खाली उतरली तेव्हा दुपारचे पावणे तीन वाजले होते.तिने वळून पाहिलं हे एसटी स्टँड फार प्रशस्त होते. पशिमेकडुन समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येत होती.गाड्यांसाठी फलाट होते आणि कसलाही गजबजाट नव्हता. ती अभयच्याच गावी पोचली होती. फक्त त्याने कधी तरी उल्लेख केल्याप्रमाणे स्टँडवरुन रिक्षाने त्याच्या घरी जायचं होतं.पण काही केल्या तिला त्या जागेचं नाव आठवेना. आता काय करायचं या विचारात ती पडली.बराचवेळ डोक्याला ताण देउन झाला तरी तिला ते नाव आठवेना.पण तिथे उभं राहुन काही होणार नव्हतं म्हणुन तिने रिक्षावाल्यांना विचारायचं ठरवलं. अनोळख्या ठीकाणी ते थोडं रिस्कीच होतं म्हणा पण नाईलाज होता.
रिक्षा स्टँडवर जाउन तिने अभयच्या नावावरुन त्याच्या घराची चौकशी करायचा प्रयत्न केला पण ते नाव धड कुणाला माहित नव्हतं. मोठी पंचाईतच होउन बसली होती.काय करावं या विचारातच असताना एक रिक्षावाला तिच्याकडे आला आणि त्याने विचारलं,
"म्यॅडम,ते अभय पाटकर म्हणजे मुंबैवाले काय?"
"हो! हो ! मुंबईलाच असतात ते." तिला थोडा धीर आला.
"तुमच्याकडे त्येन्चा पूर्ण अ‍ॅड्रेस नाही काय किंवा मोबाईल नंबर वैगरे?" त्याने विचारले.
"नाही ना! म्हणजे याच शहरात तो राहतो कुठेतरी पण मला त्या जागेचं नावंच आठवत नाहीय."
"अरे देवा, आता काय? मला वाटता म्यॅडम तेंचा घर समुद्राच्या बाजुस आसा काय?"  काही तरी आठवल्यासारखं करुन तो रिक्षावाला बोलला.
"होय अगदी. त्याचं घर समुद्राच्या बाजुलाच आहे."
"बरा. चला तर मग मला माहिती आहे ते कुठे राहतात ते."
"नक्की ना? प्लिज मला घेउन चला तिथे." ती जायला उठली. एका अनोळख्या ठीकाणी अनोळख्या व्यक्तिबरोबर जायला ती कधीच तयार झाली नसती पण आता तिचा नाईलाज होता. ती रिक्षात जाउन बसली आणि निघाली. ५-६ मिनीटात मुख्य रस्त्या सोडुन रिक्षा एका कच्च्या रस्त्याला लागली. ती थोडी धास्तावली,पण आजुबाजुला घरं होती त्यामुळे तिला थोडा धीर होता. आजुबाजुची घरं अगदी ठेवणीतली होती. प्रत्येक घराला कुंपण होतं आणि ती कुंपणं वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांच्या वेलीनी आणि फुलानी भरुन गेली होती. १-२ मिनिटानी रिक्षा थांबली. तिने रिक्षाचे पैसे दिले आणि रिक्षातुन उतरली.
"इथेच आहे का त्यांचं घर?"  तिने विचारलं.
"होय. इथुन पुढे सरळ चलत जावा, आनि उजवीकडे वळा. तिथे एक न्हानसं देउळ आसा. त्या देवळाच्या पाठीच आहे त्यांचा घर."
"मनापासुन आभार तुमचे. तुम्ही नसता तर आज माझं काही खरं नव्हतं." ती म्हणाली आणि जायला वळली.
"तुम्ही कोण त्यांच्या नातेवाईक का?" रिक्षावाल्याने विचारले. ती थबकली.
"हो. म्हणजे, ते अभय माझे मित्र आहेत." ती उत्तरली.
"बरा.सांभाळून जावा." रिक्षावाला तिच्याकडे न बघता बोलला आणि रिक्षा घेउन निघून गेला.


तिने आजुबाजुला पाहिलं आणि एक मोठा श्वास घेतला.फायनली आपण पोचलो.
ती अभयच्या घराच्या दिशेने चालू लागली. समुद्राची गाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होती.वारा तिच्या अंगावरुन झुले घेत बागडत होता. त्या वार्‍यासोबत आजुबाजुचे माड पण संथ लयीत डोलत होते.पायवाटेवरली रेती तिच्या फ्लोटर्समधुन तळव्यांना टोचत होती. हळूहळू चालत ती त्या देवळापाशी आली आणि देवळामागले अभयचे घर तिला दिसले. मागच्या दोन दिवसाची तिची धावपळ,अस्वस्थता,धडधड सारं काही आता शिगेला पोचलं होतं.तिचे सगळे प्राण तिच्या डोळ्यांत जमा झाले होते.कधी एकदा त्याला पाहतेय असं तिला झालं होतं. देवळाला वळसा घालुन ती देवळाच्या मागे आली. समोर ते घर उभं होतं. आजुबाजुच्या घरांप्रमाणेच या घरालाही कुंपण होतं. तिने हळूच त्या कुंपणाला असलेला छोटा गेट खोलला आणि अंगणात पाउल टाकलं. अंगण प्रशस्त होतं. अंगणाच्या पुर्वेला एक तुळशी वृंदावन होतं आणि कोपर्‍यात पारिजातकाचं झाडही.घरात कसलीच हालचाल जाणवत नव्हती. अंगणातुन चालत ती त्या घराच्या व्हरांड्यात आली.तिथेही कुणी नव्हतं.व्हरांड्यातला झोपाळा स्थिर होता. मुख्य दरवाज्याच्यावर बरेच जुने फोटो होते. ती थोडीशी घाबरली आणि इकडे तिकडे पाहू लागली. आपण बरोबर अभयच्याय घरी आलोय ना?तिच्या मनात उगाच शंकेची पाल चुकचुकली आणि तिचा चेहरा पडला. कुणाला हाक मारावी का असा विचार करुन ती मुख्य दरवाजाच्या दिशेने चालू लागली तोच अभय बाजुच्या खोलीतून बाहेर आला.
" ओह्ह माय गॉड! लूक व्हू इज हीयर!" तो तिला बघून ओरडलाच.
तिला बघून ती दचकली पण लगेच सावरली. हो. तिच्यासमोर तोच उभा होता. नेहमीसारखा हसत. ती त्याच्याकडे पाहत राहिली. "अभय" म्हणुन त्याला जाउन मिठीच मारावी असं तिला प्रकर्षाने वाटलं.
"अभय!!" ती उच्चारली. चटकन तिच्या डोळ्यांतून दोन थेंब
घरंगळत गेले
"काय गं?" बरी आहेस ना? आणि कशी पोचलीस तू? तुला कसं सापडलं घर? ठीक आहेस ना? घरी सगळे ठीक आहेत ना?" तो तिला विचारत होता आणि तिचं कशावरही लक्ष्य नव्हतं.आत्ता याक्षणी त्याला फक्त बघत राहावं किंवा त्याच्या मिठीत झोकून देउन रडून द्यावं असं तिला प्रकर्षाने वाट होतं. ती स्तब्ध होती.पण एक अनावर हुंदका तिला आवरता आला नाही.
तो तिच्याजवळ गेला. तिच्या गालावरल्या आसवांना पुसत म्हणाला,"चित्रा, इट्स ओके. काय झालयं? इज एव्हरीथिंग ऑलराईट?"
त्याचा तो शीतल स्पर्श होताच ती कोसळली आणि तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकुन दिलं आणि इतकावेळ कोंडून ठेवलेल्या आसवांना त्याच्या छातीवर रितं करु लागली.
 "आय मिस्ड यू अभी. आय मिस्ड यू सो मच. का असं केलंस रे माझ्याशी? तुला कितीदा फोन ट्राय केला. तुझ्या ऑफीस, तुझ्या घरी जाउन आले. तुला एकदाही नाही वाटलं का मला कॉल करावासा. काहीही न सांगता तू मला सोडुन आलास." त्याला बिलगून रडता रडता ती बोलतं होती. त्याने दोन्ही हात तिच्याभोवती वेढेले त्यासरशी ती अजुनच त्याला बिलगली.
"ए वेडी! आहे ना मी इथे आणि आज इतक्या दिवसांनी भेटलीस तर भांडणारच आहेस का? बघ माझ्याकडे , चित्रा!" त्याच्या मिठीतून हळूहळू बाहेर पडली. तिचे डोळे आसवांनी डबडबून गेले होते. त्याने ओंजळीत चेहरा घेउन तिचे अश्रू पुसले.
"ये बैस इथे.थांब मी पाणी आणतो." तिला बाजुलाच असलेल्या खूर्चीवर बसवून तो आतमध्ये गेला आणि पाणी घेउन आला. तोवर ती सावरली होती.
ती पाणी पिउ लागली आणि तो तिच्याकडे बघू लागला. 

"घरी कुणी नाही का? आई - बाबा कुठेत?" पाणी पिता पिता तिने विचारलं. 
"नाही. अगं माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे आज त्यामुळे घरातले सगळेजण कालच देवगडला गेलेत. येतिल संध्याकाळपर्यंत."
"ओके."
काही वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले.
"असा काय बघतोय? असं बघू नको माझ्याकडे." ती लाजण्याचा निरर्थक प्रयत्न करु लागली.
तो हसला. "बरं मग बोल."
"काय बोलु? मला काहि नाही बोलायचयं. तूच बोल. सांग पुन्हा एखादी स्टोरी. का सोडुन आलास मला ते." ती लटक्या रागाने बोलली.
तो पुन्हा हसला."बरं सांगतो. तू एक काम कर. बाहेर वॉशरुम आहे. फ्रेश हो. मी तोवर आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो. मग बोलुया आपण."
"ठीक आहे." ती उठली आणि बॅगपॅकमधून टॉवेल आणि काही कपडे घेउन वॉशरुमच्या दिशेने गेली. वॉशरुम प्रशस्त होता.काल रात्रीपासुन ते दिवसभराच्या प्रवासात अंगाला चिकटलेले कपडे तिने उतरवले तेव्हा तिला अगदी हलकं हलकं वाटु लागलं. तिने हलकेच शॉवर ऑन केला.
काही शीतल थेंब तिच्या चेहर्‍यावर पाझरले आणि मग तिला राहवलं नाही. त्या पाण्याचा तो गारवा ती शरीरभर झेलू लागली.प्रवासाचा शीण त्या थेंबांबरोबर तिच्या शरीरावरुन वाहून जात होता आणि एक विलक्षण प्रसन्नता तिला जाणवत होती. कितीतरी वेळ ती शॉवरखाली नुसतीच उभी होती.तिच्या मनातली सारी काही कालवाकालव,भीती, धडधड ती त्या गार पाण्याच्या प्रवाहावर वाहवू देत होती. काही वेळाने तिने शॉवर बंद केला आणि कपडे बदलून जेव्हा ती केस पुसत वॉशरुमच्या बाहेर पडली तेव्हा तिला जाणवलं की वातावरण खूप आल्हाददायक झालं होतं. खट्याळ वारा तिला हलकेच स्पर्शुन जात होता, एक दोन चाफ्याची फुलं अलगद तिच्यावर निसटुन पडली होती. कुठला तरी रानपक्षी त्याच्या मंजुळ आवाजात ताना देत होता. या सगळ्याने ती क्षणभर हरखून गेली. तितक्यात अभय एका ट्रेमध्ये दोन कप कॉफी, एक ग्लास पाणी आणि काही बिस्किटे घेउन अंगणातच आला आणि ते दोघं तुळशी वृंदावनाच्या मागे पारिजातकाच्या झाडाखाली अंगणाच्या कठड्यावर जाउन बसले.
"पाणी कसलं गार होतं रे." केस पुसत ती म्हणाली.
"अगं पण गीझर ऑन करायचा ना, आणि तू केस पण भिजवलेस का? वेडे सर्दी होईल ना पाणी बदललं तर." तो एक कप तिला देत बोलला.
"काही होत नाही सर्दी." ती कप घेत बोलली. तो वाफाळलेला कप तिने नेहमीप्रमाणे नाकाकडे नेला आणि त्या कॉफीचा तो सुगंध भरुन घेतला.
"अम्म्म्म!! धीस इज व्हॉट आय वॉझ मिसिंग बॅडली! " कॉफीचा एक सीप घेवून ती बोलली.
"ओह्ह! म्हणजे फक्त माझ्या हातच्या कॉफीसाठी इतक्या लांबवर आलीस तर." तो मिश्किलपणे म्हणाला.
"ह्हो! कॉफीसाठीच आलीय. बस्स? तसं पण मला तुझ्यात काहीच इन्ट्रेस्ट नाही. तू फक्त सकाळ संध्याकाळ अशी मस्त कॉफी बनवून देत जा मला.खुश्श??" ती पुन्हा लटक्या रागाने बोलली.
खरं तर या इतक्या संवांदात दोघांत भांडणं व्हायला हवी होती आणि "गुडबाय" पर्यंत पोचायला हवी होती. पण यावेळी तसं झालं नाही. दोघेही गालातल्या गालात हसत होते. ती शांतपणे कॉफीचा एक एक सीप घेत होती मध्येच ओठांच्या कोपर्‍यावर ओघळणारा थेंब हलकेच जीभेने टीपत होती. तो फक्त तिला बघत होता. ती आज फार वेगळीच दिसत होती.म्हणजे नेहमीसारखी नाही. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच प्रसन्नता खेळत होती.पश्चिमेकडे झुकलेल्या सुर्याची सोनेरी किरणे माडांच्या झावळ्यातून तिच्या चेहर्‍यावर झिरपत होती. तिच्या शरीरालाही एक उन्मत्त उभार आला होता.
"फक्त बघतच राहणार आहेस की काही बोलणार पण आहेस." ती त्याच्याकडे न बघता बोलली.
तो पुन्हा हसला.
"हसतोस काय माकडा. बोल ना. काय झालं होतं तुला? सगळं काही सोडुन येण्याआधी तुला एकदाही मला कॉल करावासा नाही वाटला का रे? मला माहीत आहे की त्यादिवशी जे घडलं ते घडायला नको हवं होतं. मलाही नाही कळलं की मी असं का वागले ते. तुझी माफीही मागायची होती.पण धीर होत नव्हता. राग आला होता. पण खरं सांगते अभी, तो राग फार क्षणिकच होता रे! म्हणजे मी तिथुन निघुन गेले, ट्रेन मध्ये बसले आणि अचानक वाटलं की मी हे काय करुन बसले? आय मीन, मला असं करायचंच नव्हतं.पण सगळं अनपेक्षित! विचित्रच!
पण नंतर तुझ्याशी बोलायचा धीरच होईना. उगाच मनात अपराधी वाटायला लागलं. स्वतःला समजावलं की कदाचित मी तुझ्या लायकच नसेन म्ह्णुन अशी वागले तुझ्याशी.मनाशी खेळत, स्वत:ला समजावत मी राहु लागले. तुझी फार आठवण यायची. वाटायचं तू कॉल करशील. पण नंतर वाटू लागलं की तुला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, तू माझ्या या अशा वागण्याने हर्ट झाला असशील, मी कॉल केला तर बोलशील की नाही? सगळे मनाचे खेळ मी खेळत राहिले. पण काल परवा जेव्हा तुझा कुठेच ठावठीकाणा लागेना तेव्हा मात्र मी घाबरले. खूप घाबरले रे. तू कुठेच नव्हतास अभी. अचानक मला एक भयंकर रितेपणा जाणवू लागला. कधी आली नव्हती इतक्या प्रकर्षाने तुझी आठवण येवू लागली. बस्स कसंही करुन तू एकदाचा मला माझ्या डोळ्यांसमोर हवा होतास. सगळीकडे फिरले. तुझ्या ऑफिसला कॉल केला तू तिथे नाही. तुझ्या फोन नंबर बंद, एफबी, ट्विटर बंद. मग शेवटी तुझ्या घरी गेले. तिथेही वॉचमन जेव्हा म्हणाला की तुम्ही इथे नाही राहत म्हणुन तेव्हा अभी, तेव्हा मी कोसळले रे! काय करावं ते सुचेनाच! तेव्हा बाजुच्या गोरे काकूनी सांगितल की तुम्ही गावी आलात तेव्हा मला थोडं हायसं वाटलं आणि मग मी इथवर आले." बोलता बोलता पुन्हा तिचे डोळे डबडबले.
अभयने तिच्या हातावर हात ठेवला. ती थोडीशी शहारली. "आय अ‍ॅम सॉरी अभी. आय हर्ट यु."
"ईट्स ओके. चिउ." खूप दिवसांनी तिने त्याच्या तोंडातुन "चिउ" ऐकलं आणि पुन्हा तिला भरुन आलं.
"चल. आपण समुद्राव्रर जाउया. मी ही बरेच दिवस बाहेर नाही पडलोय. तू थकली नाहीस ना? आय मीन तसं असेल तर घरीच थांबुया." त्याने तिला हात धरुन उठवलं.
"नाही नाही, सगळा थकवा, शीण केव्हाच निघुन गेलाय.चल जाउया.पण अरे हे ट्रे!" ती उठत बोलली.
"असू दे इथेच आल्यावर घेउन जाईन आतमध्ये चल." ती दोघं घराबाहेर पडली.
समुद्र अगदी हाकेचा अंतरावर होता. माडांच्या आणि सुरुच्या झाडांतुन पायवाटेवरुन ते दोघे चालत होते. सुर्य उगाचच समुद्रावर रेंगाळत होता. चालत चालत ते दोघे किनार्‍यावर आले आणि तिने पायातले फ्लोटर्स काढुन एका हातात घेतले आणि अनवाणी चालू लागली.
"अगं पायाला काही तरी टोचेल ना. चप्पल घालून चाल." तो काळजीने बोलला.
"काही नाही टोचत-बिचत. आणि टोचलं तर टोचलं तू आहेस ना काढायला." ती हसून बोलली.
"कोणता फालतू बॉलीवूड सिनेमा बघितलाय रिसेन्टली असे डायलॉग मारायला?" तो तिला चिडवत बोलला.
त्या मउशार वाळूत तिचे पाय हलकेच रुतत होते. वाळूचा स्पर्श तिला गुदगुल्या करत होता. एका हात तिने अभयच्या हातात गुंफला होता. चालत चालत ते एका ठीकाणी आले. तिथे किनार्‍यावर एक नाव होती. त्या नावेला टेकून दोघेही बसले.
"ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे. इथुन समुद्र काय सुन्दर दिसतो ना?" तो म्हणाला.
ती समोर पाहु लागली. तो विशाल समुद्र दूरवर पसरला होता. त्या अवखळ लाटा गर्जना करत किनार्‍यावर आदळून पुढे जोरात किनार्‍याला स्पर्श करायला धावत होत्या. जणु त्यांच्यात स्पर्धाच होती कि कोण कितपत पुढे जाते त्याची. सुर्य समुद्रात अर्धामुरदा उरला होता. समुद्रावर उडणारे समुद्रपक्षी आपापल्या घराच्या दिशेने जात होते. दूरवर समुद्रात काही नावा समुद्राशी झगडत पुढे जात होत्या. उजव्याबाजुला दूरवर एक डोंगर समुद्रात घुसला होता. त्यावर एक लाईटहाउस होते. हे सगळं डोळ्यांत भरुन घेत तिने अभयच्या खांद्यावर हलकेच डो़कं ठेवलं आणि तितक्यात एका घंटेचा टोला संधीप्रकाश चिरत तिच्यावरुन सरसरत गेला, आणि एकामागुन एक असे सहा टोले त्या आसमंतात घुमले होते आणि त्यासरशी तीने त्याच्या हात घट्ट धरुन ठेवला होता.
"अगं, इथे पुढेच थोड्या अंतरावर गावतलं चर्च आहे. घाबरलीस?" त्याने विचारलं.
"अं?? नाही." ती.
आता सुर्याला समुद्राने गिळून टाकलं आणि काळोखाने आपले बाहुपाश पसरवायला सुरुवात केली. वारा हळूहळू घोंगावू लागला आणि लाटांची गर्जना अधिकच वाढली. डोंगरावरले लाईटहाउस तांबड्या प्रकाशाने उजळले आणि एका ठराविक अंतराने तांबड्याप्रकाशाचा झोत सभोवार फेकू लागले. समुद्रात एखाद दुसरा कंदील हेलकाउ लागला आणि ह्ळूहळू आकाशात चांदण्या जमा होउ लागल्या. आता ती दोघं त्या किनार्‍यावर विसावली होती. त्याच्या उजव्या बाहुची उशी करुन ती आभाळाकडे एकट़ बघत पडली होती. 


"चिउ......" काही वेळाने त्याने तिला हाक मारली.
"हम्म्म." ती उच्चारली.
"काही नाही." तो.
"बोल ना." ती.
"काही नाही. तुला आठवत मी तुला नेहमी सांगायचो की माझ्या गावी समुद्र किनार्‍यावर पडुन आकाशातल्या चांदण्या मोजायला फार मज्जा येते." तो बोलला.
ती हळूच हसली."हो. आणि जेव्हा जेव्हा तू असं सांगायचास तेव्हा तेव्हा मला वाटायचं की काय मज्जा येईल ना, आपण दोघं असे किनार्‍यावर पडुन असे आभाळ बघत पडून राहु."
"शाहणी कुठली. मग तेव्हा का नाही बोलायची?"
"असंच. नाही बोलायचे. पण आज जेव्हा ते सगळं पाहतेय तेव्हा बोलावसं वाटलं." ती आभाळाकडे बघत बोलली.
"वेडी कुठली."
"असुन दे. वेडी तर वेडी. वेडीबरोबर असतो तो वेडा." ती खुदकन हसली.
"तू वेडी."
"हां बाबा. मी वेडी. बस्स! तू हुशार, शहाणा." ती कुशीवर वळत त्याच्याकडे पाहत हसत हसत बोलली. तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहर्‍याजवळ आलेला.
"श्या! काय हे? भांड ना जरा. मला तू अशी शरण आलेली. नाही आवडत." तो तिचे उष्ण श्वास चेहर्‍यावर झेलत, अडखळत बोलला.
"पण तू मला असाच आवडतोस आणि प्लिज आता मला नाही भांडायचयं तुझ्याशी. अगदी मस्करीतही नाही. तू भांडलास तरी चालेल. तू माझ्यावर रागावलास तरी चालेल,पण मला नाही भांडायचं तुझ्याशी.आता या क्षणापासुन मला तुला हरवायचं नाहीय. दोन दिवस माझी काय अवस्था झाली होती हे तुला नाही समजणार अभी." खोल गेलेल्या आवाजात त्याच्या चेहर्‍यावर बोटं फिरवत ती बोलली.
तो शहारला. अलगद दुसर्‍या हाताने त्याने तिला वेढुन घेतलं. चांदण्यांच्या सौम्य प्रकाशात तिचा चेहरा खुलला होता. तिच्या श्वासांचा जोर वाढला होता. तिने डोळे मिटुन घेतले होते. मिटलेल्या डोळ्यांनी ती सर्व काही पाहत होती. तो थोडासा बावरला होता. दोघंही एकमेकांच्या मिठीत होते. त्याचे श्वास तिला जाणवत नव्हते पण अगदी भरलेल्या ढगाप्रमाणे तो तिला भासत होता. तिचं धडधडणारं काळीज आणि विलंबित श्वासोच्छवासांनी तिच्या छातीची होणारी दोलने त्याच्या छातीवर अडखळत होती. हळूहळू त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. जणु तो भरलेला ढगच तिच्या ओठांवर अलगद बरसला होता आणि कैक वर्षापासुन तहानलेला चातकाप्रमाणे ती ही त्याच्या ओठांच्या ढगातुन बरसणारे थेंब हळूहळू प्राशुन घेउ लागली. ही अनुभूती विलक्षण होती. किती तरी वेळ ते दोघे एकमेकांच्या ओठांत मिसळत होते. एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. काळोखाने दोघांना वेढुन घेतले होते पण आभाळातून लुकलुकणार्‍या तार्‍यांनी त्या काळोखाला भेदुन एक जाळीदार सौम्य प्रकाशाची चादर दोघांवर पांघरली होती. 


हळूहळू ते दोघं विलग होउ लागले.लाजुन चिंब झालेलं ती आभाळाकडे एकटक पाहु लागली.तो ही तिच्या डोळ्यांतली नक्षत्रं छेडू लागला.लुकलुकणार्‍या तार्‍यांनी गच्च भरलेलं ते आभाळ तिला अभयच्या मिठीपुढे क्षुद्र वाटु लागलं. किती बरं वाटलं होतं त्याच्या मिठीत. ती विचार करु लागली.कसे स्वतःला आपण हरावून बसलो होतो. त्याच्या मिठीत एक वेगळाच आधार जाणवला होता.
"काय बघतेस आभाळाकडे?" त्याने हसुन विचारलं.
"काही नाही." ती ही हसली.
इतक्यात त्या गच्च भरलेल्या आभाळातून एक तारा निखळला आणि वेगाने नाहीसा झाला. तिने पाहिलं.
"अभी, तुटलेला तारा!" ती हरखून ओरडली आणि क्षणात डोळे मिटुन काही तरी पुटपुटली.
" काय हसतोस रे?"
"काही नाही! असंच"
"सांग ना, का ह्सलास?"
"तू काय मागितलसं त्या तार्‍याकडे"?
यावर ती लाजली त्याच्या कुशीत चेहरा लपवत बोलली, "काही नाही. जे मागितलं ते असं सांगायचं नसतं मग इच्छा पूर्ण होत नाही."
"ओह्ह्ह! असं आहे का?"
"होहह्ह्ह! असंच आहे."
"पण जे मागितलं ते कधी मिळालं का?"
"यापूर्वी मी कधीच काही मागितलं नव्हतं....."
"मग आता काय मागितलं? "
"काही नाही मागितलं, आणि तुला ते नाही समजणार." त्याच्याकडे डोळे भरुन बघत ती उच्चारली आणि तिच्या त्या टपोर्‍या डोळ्यांतुन दोन थेंब गालांवर ओघळले. त्या थेंबांचं सौंदर्य आकाशातल्या कोणत्याही तार्‍यापेक्षा नितांत सुंदर होतं.
तो तिच्याकडे बघत राहिला.ती दूर कुठेतरी पुन्हा त्या आकाशात हरवून गेली. तिला तसं पाहून तो बोलला..

"आता सोड ते आकाश,
आणि ये माझ्या जगात.
तारे ही असेच तुटतात,
तुला पाहून वेगात."

ती गोड हसली," कश्या सुचतात रे तुला अशा ओळी? अगदी प्रसंगानुरुप!"
"पण खरं सांग, असा तुटलेला तारा दिसल्यावर काही मागितलं की मिळतं का गं? " त्याने तिला टाळत विचारलं.
"माहित नाही. पण काही इच्छा, स्वप्ने ही अशीच त्या तुटलेल्या तार्‍यासारखी कुठेतरी आयुष्याच्या या अंतराळात लुप्त होउन जातात ना रे?आकाशातून अचानकपणे ज्या वेगाने एखादा तारा निखळतो त्यावेळी त्याचे  ते क्षणिक सौंदर्य पार वेडावून टाकते. क्षण दोन क्षण दिसणारे ते सौंदर्य डोळ्यात आणि मनात भरता भरत नाही तर मग त्यावेळी मनातल्या अनेक अपूर्ण इच्छेंपैकी अशी कोणती इच्छा व्यक्त करावी हे मला कळतच नाही.पहिल्यांदा असं नव्हतं पण जेव्हापासुन तू आयुष्यात आलायसं माझी प्रत्येक अंधश्रद्धेवर श्रध्दा जडू लागलीय."
"वेडूबाई. असं काही नसतं."
"माहितीय मला. पण अभ्या, पुन्हा नाही ना रे सोडुन जाणार तू मला असा?" तीने काळजीने विचारलं.
"नाही गं वेडे, आता कुठे जाउ मी? आणि गेलो तरी तू काय सह्जा सहजी मला थोडी जाउ देणारेस? शोधुन काढशीलच ना? आणि तसंपण आत्ताच त्या तुटलेल्या तार्‍याकडे मला मागुन घेतलयंसच ना?
ती क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली,"तुला कसं कळलं रे? मी हे मागितलं ते?"
"बस्स कळलं. न कळायला काय झालं?" तो गालात हसत म्हणाला.
"चोर आहेस एक नंबरचा, लबाड.सगळं कळतं होतं ना तुला मग का मला सोडुन आलास असा?"
"माहित नाही चिउ.पण खरं सांगतो त्यादिवशीच्या प्रकारामुळे मी हर्ट वैगरे झालो नव्हतो. तुझी रिअ‍ॅक्शन साहजिक होती.पण माहित नाही का मला त्यावेळी सगळंच तुटल्यासारखं वाटलं.तू निघुन गेलीस आणि मग उगाच गिल्टी वाटु लागलं.ठरवलंही होतं तुला कॉल करायचा, तुझी माफी मागायची पण नाही त्यादिवसापासुन माझ्यातला मी हरवून बसलो.पण चिउ खरं सांगतो एक-दोन दिवसानी मी जसं तू म्हणालीस तसंच नॉर्मल झालो गं. ठाउक होतं की एवढं काही झालेलं नाही.काही दिवस गेले आणि एकदा मला सडकून ताप आला.डॉक्टर वैगरे सगळं झालं. १० दिवस हॉस्पिटलमध्येच होतो.आई उश्याशी बसुन असायची. म्हणायची चित्राला बोलावून घेते म्हणुन. पण मीच नको म्हणालो. मला तुझी खूप आठवण यायची गं. खूप वाटायचं तुला बघावं, तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी भांडावं पण माहित नाही आजार बळावत होता आणि सगळेच काळजीत होते. काही दिवसानी बरं वाटलं पण नंतर एक प्रकारची विरक्ती येउ लागली मनाला.कशातच लक्ष्य लागेना. वैतागुन जॉब पण सोडुन दिला.पण हे सगळं आपल्या त्या प्रकारामुळे नाही हे मी नक्की सांगतो."
बोलता बोलता त्याने तिला छातिशी कवटाळलं.
"मग तिकडे करमेना म्हणुन इकडे आलो.थोडे दिवस बरं वाटलं पण आजाराने पुन्हा डोकं वर काढलं.मग आजाराचा आणि माझा तो लपंडाव सुरुच राहिला.ठाउक होतं तू एके दिवशी नक्की येशील.असं नव्हतं की तुला मी भेटणारच नव्हतो, तुला कॉल करणार नव्हतो; पण मी पुरता हरलो होतो या आजाराशी.कधी कधी वाटायचं की हा आजार आता मला घेउनच जाणार.त्याआधी तुला एकदा भेटायचं होतं, पण त्याआधीच........." त्याचा आवाज क्षीण झाला.
"त्याआधीच??? त्याआधीच काय अभी?" तिने विचारले
"काही नाही. चल घरी नको जाउया का?उशीर झालाय," तो तिचे गाल ओढत बोलला.
"नको. इथेच थांबुया, असेच रात्रभर एकमेकांच्या कुशीत. मला नाही जायचं कूठे तुला सोडुन." ती.
"वाह! आई आपल्या दोघांची वरात काढेल." तो.
"जाउया रे थोड्यावेळाने.मला तुला असा भरुन घेउ दे." ती त्याच्या गालावर गाल घासत म्हणाली.
"बरं." तो.
"ए अभी, ती अंगाई गा ना रे."
"काही काय? अंगाई आणि आता? रात्री झोपताना गाईन हं."
"नाही आत्ता गा ना प्लिज,प्लिज्,प्लिज.." ती लाडात आली.
"चिउ काय गं?"
"गा ना रे, असं काय करतो."  

एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती त्याच्या कुशीत शिरली. एका हाताने तिला थोपटवत तो गाउ लागला. त्याचे आर्त स्वर तिच्या अंगावरुन वाहुन लाटांमध्ये मिसळून समुद्रात विलीन होउ लागले. ती त्या स्वरांनी भारावुन गेली आणि एक संदिग्ध ग्लानी हलकेच तिच्या डोळ्यांवर पसरु लागली. 


एका लाटेच्या प्रचंड आवाजाने तिला जाग आली. हळूहळू तिने डोळे उघडले तेव्हा टॉर्चचे एक दोन प्रखर झोत तिच्या डोळ्यांवर पडले. समोर काही दिसेना. पण काही लोक आहेत हे तिला जाणवलं. ती ताडकन उठून बसली आणि बावरुन इकडे तिकडे पाहु लागली.
"अभी, उठ रे. अभी बघ ना कुणीतरी आहे इथे, अभ्या." ती बाजुला चाचपडुन अभयला शोधु लागली. पण तो तिथे नव्हता. ती घाबरली. इकडे तिकडे बघु लागली. त्यांच्या वेशावरुन तिने ताडलं की ते कोळी होते.घाबरुन त्याला हाका मारु लागली. काही वेळासाठी तिला कळेना की हा असा सोडुन कुठे गेला ते.
"कुणागेरच्या पावण्या तुमी?" समोर उभ्या असलेल्यांपैकी एकाने विचारले.
"अं? काय? मी? मी त्या अभय पाटकरांच्या घरी.. तो इथेच होता माझ्यासोबत, आजुबाजुला गेला असेल. आम्ही गेले एक दोन तास इथेच होतो... अभीssssss, अभ्या.." ती घाबरुन हाका मारु लागली.
त्या लोकांमध्ये पुन्हा कुजबुज सुरु झाली. तिचं अभयला हाका मारणं सुरुच होतं.
"आमचं ऐकाल का जरा?" एकजण म्हणाला.
"काय? मी काही नाही ऐकणार, अभयला येउ दे. तो आत्ता इथेच होता माझ्यासोबत." तिला दरदरुन घाम फुटला होता.
"म्यॅड्म, कदाचित तो घरी गेला असेल. आमचं ऐका रात लय चढली आसा. अशावेळी इथे थांबणा बरोबर नाय.तुमी आमच्याबरोबर चला त्याच्या घरी सोडतो तुम्हाला." विनवणीच्या सुरात एकजण म्हणाला.
ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पण तिला भयंकर भीती वाटत होती. कुठे गेला असेल हा आपल्याला सोडुन? त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना. एकदम त्याला हाका मारत ती किनार्‍यावर धावत सुटली. तिच्या मागोमाग ते लोकही धावू लागले. त्यातल्या दोघांनी एका अन्तरावर तिला गाठलं आणि तिला समजाउ लागले. आता ती फुटली आणि रडु लागली. मग ते सगळे तिला घेउन अभयच्या घरी निघाले. तिला काही सुचत नव्हतं. अतिशय घाबरलेली ती त्यांच्याबरोबर चालत होती. काहीवेळाने ते अभयच्या घराच्या अंगणात पोचले. पैकी एकजण हाक मारु लागला. ती तशीच उभी होती. घरातुन अभयची आई, वडील, भाउ बाहेर आले. अभयच्या आईला बघताच चित्रा धावतच तिच्याकडे गेली आणि तिला बिलगुन रडु लागली. अभयच्या आईला हे सगळं अनपेक्षित होतं.
"चित्रा? तू कधी आलीस? आणि कुठे होतीस? हरवली होती का बाळा? काय गं? काय झालं?" अभयची आईने तिला छातीशी कवटाळलं.
"आई अभय कुठाय? तो मला पुन्हा सोडुन आला! आई, असं का करतो तो नेहमी?" ती आईला बिलगुन अधिकच रडु लागली. सगळेजण या प्रकाराने अचंबित झाले होते. तिला जे लोक किनार्‍यावरुन घेउन आले होते ते अभयच्या बाबांशी आणि भाबाशी बोलत उभे होते. अभयच्या आईने तिला घरात नेले तोवर अभयची वहिनी पाणी घेउन आली. तिचं रडणं थांबतच नव्हतं ती सारखी अभयला हाक मारत होती पण तो कुठेच दिसत नव्हता. त्याच्या आईला सगळी हकीकत ती सांगत होती. ते कधी आणि कशी पोचली. अभय कसा भेटला, कॉफी घेउन आपण समुद्रावर गेलो आणि हा तिथुन कसा गायब झाला. ती भरभर बोलत होती. तिचे श्वास फुलले होते.बोलता तिचं खोलीतल्या भिंतीवर लक्ष्य गेलं आणि ती स्तब्ध झाली. तिच्या तोंडुन शब्दच फुटेना. फक्त ती त्या समोरच्या भिंतीकडे पाहत राहिली. 


अभय त्या भिंतीवरल्या फोटोमध्ये गोंड्याच्या फुलांआडुन हासत तिला पाहत होता..... 



"उध्वस्त मनांच्या विरहाची
गाणी गातो वारा,
कूणाची तरी स्वप्ने घेउन कोसळतो
प्रत्येक तुटलेला तारा...."



 

समाप्त

Wednesday, January 8, 2014

तुटलेला तारा ... (२)

              ट्रेन सुरु झाली आणि त्याबरोबर तिची विचारचक्रही. तिची अस्वस्थता आता शिगेला पोचली होती. एका अनामिक,भयाण भीतीचं सावट तिच्या मनावर पसरलं होतं.अचानक त्याच्याबद्दल तिला खूप सारी काळजी वाटु लागली होती.कोण होता तो तिचा? आतापर्यंत तिने त्याला कधीही आपलं मानलं नव्हतं.त्याच्या प्रेमालाही तिने मान्य केलं नव्हतं.जगाला सांगण्यासाठी तो फक्त तिचा मित्र होता. पण तसं नक्की होतं का? तिचं तिलाच कळत नव्हतं. आता याक्षणी त्याला बघायची ओढ तिला लागली होती. तिच्या धडधडत्या मनाला, अस्वस्थतेला त्याला पाहिल्याशिवाय चैन पडणार नव्हती. त्यावेळी देखिल असंच व्हायचं. त्याच्याशी एक दिवस जरी बोललं नाही तरी कसं तरीच व्हायचं तिला.दिवसभर कसली तरी उणिव तिला भासु लागे. कधी कधी तिलाही बोलायचं नसे मग अशावेळी ती टेक्स्ट्सवर त्याला पिडायची. पण ते मुद्दाम नाही.त्याची काळजी तिला नेहमी वाटायची. 

             असाच एकेदिवशी तिला न सांगता तो सिंगापूरला गेला होता. त्याच्या कंपनीची कसली तरी कॉन्फरन्स होती आणि काही कारणामुळे त्याचा सेल फोन दोन दिवस बंदच होता. इकडे ही हैराण. त्याचा काहीच ठावठीकाणा लागला नव्हता. नेहमेप्रमाणे तिने ग्रुपमध्येही कुणाला विचारलं नाही. तिला उगीच वाटत राहायचं की त्याने काही कारण नसताना ग्रुपमध्ये बबल केलं होतं. त्याबद्द्ल तिला तसं कुणीच विचारलं नव्हतं पण तिला नेहमी ते ऑकवर्ड वाटत राहायचं.मग काही महिने दोघेही ग्रुपच्या ट्रेकला वैगरे जाणं टाळत होते.

         तर त्यावेळी सुद्धा असंच हा तिकडे कूठे सिंगापूरला आणि ही इकडे त्याच्या काळजीने हैराण.तिचं आपलं सारखं त्याला फोन ट्राय करणं, त्याचा एफबी प्रोफाईल चेक करणं सुरुच होतं. दोन दिवस तिला अन्न गोड लागलं नव्हतं.ती धड झोपली नव्हती. तिसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी अपडेट आली. त्याला त्याच्या कलिगने सिंगापूर एअपोर्टवरच्या चेक इन मध्ये टॅग केलं होतं. ते वाचून तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव आला होता.तो मुंबईला त्या संध्याकाळी आला आणि त्याचा सेल सुरु झाल्या झाल्या त्याने तिला कॉल केला. कारण तिच्याच नंबरवरुन ३०-४० मिस्ड कॉल अलर्ट्चे मेसेज आले होते. त्याने कॉल केला तेव्हा तिने त्याला झाप झाप झापला होता.बिचार्‍याला तोंडही उघडु दिले नव्हतं तिने. दुसर्‍या दिवशी तो तिला भेटायला गेला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ते स्टेशनच्या बाहेर भेटले.ती खूप रागावली होती.काही केल्या बोलायला तयार नव्हती.शेवटी कसं बसं ती बोलली.

"प्रॉब्लेम हा आहे ना की, मला तुझ्यावर रागावता येत नाही."
"तेच म्हणतो मी, का रागवायचं पण?"
"अरे पण नालायका तुला सांगुन जायला का धाड भरली होती?"
"अगं पण सगळं इतक्या घाईत झालं की काय सांगु? रात्री ११ ची फ्लाईट होती. ऑफिसमधुन घरी, घराकडुन सगळं आवरुन मरत मरत एअरपोर्ट्ला पोचलो. तिथुन तुला कॉल करणार तर फोनच डेड. म्हटलं तिकडे पोचल्यावर फोन चार्ज करुन तुला कॉल करेन, पण कसलं काय फोनच सुरु झाला नाही."
"स्टोरीज रे! फक्त स्टोरीज! तिथुन कुणा दुसर्‍याच्या फोनवरुन किंवा लँडलाईनवरुन कॉल नाही करता आला तुला?"
"अगं कसं करणार? तुझा नंबरच पाठ नाही मला." आणि त्याने पटकन जीभ चावली. 

त्याच्या या वाक्यावर ती जाम भडकली. नंबर पाठ नाही म्हणजे काय? तिला कसं बसं त्याने आवरलं. त्यावेळी तिच्यासाठी त्याने एक मस्त जॅकेट आणलं होतं. ती घ्यायला तयारच नव्हती पण तिने ते घेतलं. 

"अरे खूप मोठ्ठं होतयं रे हे ! साल्या स्वतःच्या साईजचं आणलंस का?"
"आयला हो का? असु दे. तसं पण युनिसेक्स आहे. मी ही वापरेन कधीतरी."
"एक नंबरचा स्वार्थी साला! सेल्स माइंडेड! घे हे तुझं तुलाच. काही नको मला." 


"पुढील स्टेशन मुलुंड."
"अगला स्टेशन मुलुंड."
"नेक्स्ट स्टेशन.... "
ती डब्यातल्या त्या कर्कश अनाउंसमेन्टने ताळ्यावर आली. डब्बा बायकानी एव्हाना भरला होता. त्यांच्यातुन वाट काढत ती दरवाज्यापर्यंत पोचली.


           ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. ट्रेनमधुन उतरुन ब्रीजवरुन, ती पटकन पूर्वेला जाउन उतरली. समोर असलेल्या ऑटोच्या रांगेत जाउन उभी राहिली. दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती.
 

             कदाचित हा कुठे तरी मागल्यावेळेसारखा बाहेर वैगरे गेला असेल. नोकरीही बदलली असेल आणि कदाचित म्हणुन फोन नंबरही बदलला असेल. पण एफबी आणि ट्वीटर अकाउंट का डीलीट करेल? एक ना अनेक असे तर्क वितर्क ती लढवत होती. तोवर तिच्या समोर रिक्षा आली. कुठे जायचे ते सांगुन ती रिक्षात जाउन बसली. तो राहत असलेली बिल्डींग ही स्टेशनच्या कोलाहलापासुन थोडी दूरच पण शांत जागी होती. कधी कधी घरी जाताना ती दोघं स्टेशनवरुन चालतच जायची. संध्याकाळच्या वेळी मस्त वारा सुटलेला असायचा त्या परिसरात. 

                 दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे, छोट्या बागा, खेळाचं मैदान सगळ्या ओळखिच्या खुणा तिला दिसत होत्या.बर्‍याच दिवसांनी आज ती इकडे आली होती.काही फरक जाणवत नव्हता फक्त त्याची उणिव जाणवत होती; पण आता थोड्याच वेळात ती पण भरुन निघेल. तिचं ते वेडं काळीज पुन्हा धडधडायला लागलं.कुठुन तरी ती जुनीच फुलपाखरं पुन्हा पोटात गुदगुल्या करु लागली. आज त्याचं आवडतं ड्रेस काँबिनेशन तिने केलं होतं. तो घरी असेल की नाही याची शाश्वती नव्हती. काळजाची धडधड तिने कंटिन्यु ठेवली पण फुलपाखरांना उडवून लावलं. थोड्याच वेळात त्याच्या बिल्डींगपाशी रिक्षा थांबली. रिक्षावाल्याला पे करुन ती बिल्डींगच्या गेटमधुन आत शिरणार तोच वॉचमनने त्याच्या खुराड्यातुन तिला आवाज दिला.
"किसके यहाँ जाना हैं म्यॅडम?"
ती थबकली आणि त्या वॉचमनच्या खुराड्यापाशी आली.
"अरे आप? कैसी है आप मॅडम" वॉचमनने तिला ओळखलं.
"ठीक हुँ मिश्राजी. आप कैसे है? मैं, वो वहाँ.... उपर... " ती अडखळली.
"जानता हुँ, पाटकर साहब के इधर ना?"
"हाँ! हाँ!" ती वॉचमनला कटवून जायला वळली....
"पर अब वो लोग यहाँ नही रहते, म्यॅडमजी...."
त्याच्या या वाक्याने ती हादरलीच. तिचे पाय जागच्या जागी जमिनीत रुतले.
"क्या मतलब अब यहाँ नहीं रहते?" कहाँ गये फिर....?" तिच्या घशाला कोरड पडली होती.
"दुई-तीन महिना हो गया म्यॅडम. वो लोग यहाँसे चले गये. अभय बाबा की तबियत ठीक नहीं थी. तो वो लोग गाँव चले गये."
तिच्या काळजाचा ठोका चुकला.
"क्या हुआ था अभयको?" काळजे आणि भीतीने तिचा आजाज फुटत नव्हता.
" पता नही म्यॅडम.पर अब वो यहाँ नहीं रहते."
ती खूप घाबरुन गेली. काय करावे ते तिला सुचेना.
"आप एक काम करीये म्यॅडम उपर उनके बाजुमें जो गोरे साहब रहते हैं ना शायद उनको मालुम होगा. आप उनसे जाकर मिलिये."
भरलेल्या मनाने ती जायला वर जायला वळली.
काय झालं असेल?
कसा असेल तो?
मला एक कॉलही करावासा नाही का वाटला त्याला?
भयंकर अस्वस्थतेत तिने गोर्‍यांच्या दारावरली बेल दाबली. सेफ्टी दरवाजाच्या आडुन गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि नाकावरला चष्मा सावरुन त्या तिला निरखू लागल्या.
"नमस्कार काकु. मी...."
"अगं तू होय! ये ये! कधी आलीस." तिला ओळखल्याने पुढचं काही न बोलता गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि ती आत गेली.
"कशी आहेस? बर्‍याच दिवसानी आलीस."
"मी ठीक आहे काकु. तुम्ही कशा आहात.?"
"माझं काय मेलीचं? आहे आपली निवांत.तू सांग. अभयला भेटायला आली होतीस ना?"
"हो. पण खाली वॉचमन म्हणाला की ते लोक आता.... "
"हो. खरयं ते. दोन महिन्यापूर्वीच गावी गेलेत."
"का पण?"
"अगं काय माहित का ते? अभयची तब्येत बिघडली होती. साधा तापच होता. १०-१२ दिवस अ‍ॅडमिट होता. नंतर बरा झाला. पण मग त्याचं कशात लक्ष्य लागेना. सारखा चिडचिड करायचा. जॉबपण सोडला त्याने. मग काही दिवसानी ते लोक गावी गेले."
"अच्छा. मग त्यानी हा फ्लॅट विकला का?"
"नाही अगं. मला वाटतं डॉक्टरच्या सल्यानुसार अभयच्या हवाबदलासाठी ते गावी गेले असतिल. कोकणातले ना ते."
"हो असेल. कदाचित."
"फ्लॅटची किल्ली आमच्याचकडे आहे ना."
का कुणास ठाउक तिला वाटलं की अभयच्या घरात जावं. तिने गोरे काकुंकडुन फ्लॅटची किल्ली घेतली आणि ती गोरे काकूंकडुन निघाली. 


               अनलॉक करुन तिने दरवाजा लोटला आणि पाउल घरात टाकले. एका उष्ण वार्‍याचा झोत तिच्या अंगावरुन गेला आणि ती शहारली.हॉलमधले सगळे फर्निचर झाकून ठेवलेले होते. सामसुम किचन. हॉलमधुन ती अभयच्या रुममध्ये गेली. त्याच्या खोलीत पाउल ठेवताच एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती तिला जाणवली. एक अनामिक रितेपण त्या खोलीत तिला जाणवू लागले. अनेक जुन्या आठवणीनी ती खोली भरुन गेली. गप्पा, दंगामस्ती, भांडणं, गॅलरीत बसुन संध्याकाळच्या वेळेची कॉफी एक ना अनेक आठवणीनी तिचं मन दाटुन आलं. त्याच्या खोलीतल्या त्याच्या वस्तु तशाच होत्या. त्याचं कपाट, लॅपटॉपचा डेस्क.पुस्तकांचं कपाट, आणि त्याच्या बाजुलाच त्याची क्रिकेट किटची बॅग आणि त्याची ती आवडती 'ग्रे-निकल्स'ची बॅट. भिंतीवरलं त्याचं पोर्ट्रेट तिने काढुन घेतलं. धुळीचा थर रुमालाने पुसुन काढला. थोडावेळ ती त्याच्या त्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहत राहिली. का कुणास ठाउक तिला त्याचा तो हसरा चेहरा छातीशी घट्ट धरावासा वाटला. हे सगळं नवीन होतं. आज तो आपल्यापासुन दूर गेलाय म्हणुन असं वाटतयं का? आणि आज जर आत्ता तो इथं असला असता तर; इतके दिवस का कॉल केला नाहीस म्हणुन आपण त्याच्यावर रागावलो असतो की त्याला बिलगुन रडलो असतो. काही असो, तो आत्ता या क्षणी तिला हवा होता. ते रिकामं घर आणि आणि त्याची ती रिकामी खोली तिला खायला उठले होते. क्षणभर तिने विचार केला आणि तशीच तिथुन निघाली. दरवाजा लॉक करुन तिने गोरे काकूंकडे किल्ली दिली आणि ती तिथुन निघून थेट स्टेशनवर पोचली.  

               मुलुंड पश्चिमेला जाउन बोरीवलीला जाणारी एसी बस पकडुन ती घराच्या दिशेने निघाली. तो दिवस शुक्रवार होता.आता पुढचा मागचा विचार न करता सरळ त्याचा गावी जाउन त्याला गाठायचं असं तिने ठरवलं. ती कधीच त्याच्या गावी गेली नव्हती. पण तिला ते ठाउक होतं. त्याच्या बोलण्यात तो गावाचा उल्लेख करी. कोकणातलं त्याचं गाव तो वर्णन करत असताना तिच्या डोळ्यापुढे अगदी चित्रवत दिसे. 
"एकदा तरी आपण तुझ्या गावी जाउया हां रे." ती त्याला नेहमी सांगायची.
"हो. नक्की जाउया. आणि रात्री समुद्राच्या किनारी आकाशातल्या चांदण्या बघत पडून राहु." त्याच्या या बोलण्यावर तिला गम्मत वाटे.पण तिलाही वाटायचं की एकदा तरी समुद्राच्या किनार्‍यावर पडुन रात्रभर चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघत राहावं.


          तिने त्याच्या गावी जायचं नक्की केलं. एका मित्राला कॉल करुन ट्रेनच्या तिकिटाचा बंदोबस्त केला.ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी साडे पाचला दादरवरुन सुटणार होती.तिकीटाच्या कन्फरमेशनचं मेल आणि एसएमएस तिला तिच्या मित्राने फॉरवर्ड केला.दिड - दोन तासांत ती घरी पोचली. आवरा आवर करुन तिने तिची बॅगपॅक भरुन ठेवली. शनीवारी त्याला भेटुन, एक रात्र तिथे राहुन रवीवारी परत मुंबईला यायचं. गाडी पहाटेची असल्याने तिला रात्र स्टेशनवरल्या वेटींग रुममध्ये घालवणं भाग होतं. रात्री जेवताना तिने आई वडीलांना याबाबत सांगितलं.

"मी तुला त्याच्याबद्दल विचारणारच होतो.इतके दिवस तो कुठे दिसला नाही." वडिलांनी विचारणा केली.
"भांडले असतिल नेहमीप्रमाणे आणखि काय? हिला भांडण्यापलिकडे काहि सुचत असेल तर शप्पथ." आई. 


ती शान्तपणे जेवत होती.


जेवण आटोपुन सगळं आवरुन ती जायला बाहेर पडली.तिचे वडील स्टेशनपर्यंत सोडायला आले. 


"येते मी बाबा. जा आत तुम्ही घरी. ट्रेन पकडली  की कॉल करेन."
"बेटा, सांभाळून जा आणि हे बघ आता पर्यंत आम्ही तुझ्या आयुष्यात कसली आडकाठी आणली नाही.तुझे निर्णय तुच घेत आलीस.ते सगळे नेहमी योग्यच होते असं नाही आणि ते निर्णय सर्वस्वी जरी तुझे असले तरी काही अंशी आम्हीही त्याला जबाबदार होतोच."
"बाबा... पण..."
"ऐक पोरी. आम्ही कदाचित असू जुन्या विचाराचे वैगरे पण तुला कधीच कसल्या बंधनात, रिती रिवाजात जखडुन ठेवलं नाही. तुझं स्वातंत्र्य तुला दिलेलंच आम्ही.तुझं लग्नाचं वय सुद्धा निघुन जातयं हे तुला आम्ही कितीवेळा समजावून सांगतोय. तुला अजुन किती वर्षे तुझं सो कॉल्ड स्वातंत्र्य उपभोगायचं आहे ते तू ठरवं; पण आयुष्याच्या एका वळणावर तो रितेपणा, ते एकाकीपण खायला ऊठणारच आणि नेमकी त्याचवेळी आपल्याला हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती आपल्यापासुन फार दूर गेलेली असणार. इतकी दूर की त्याचं अस्तित्व ही तुला जाणवणार नाही. मग त्यावेळी अचानक हे आयुष्य निरर्थक वाटु लागेल. पश्चाताप ग्रासु लागेल, तेव्हा काय करशील? आज, आत्ता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहेस हे विसरु नकोस.
पण यावेळी एक विनंती करतो.जर तो तुला खरंच आवडत असेल तर आता यावेळी तरी निर्णय घेवून टाक. You know what I mean." 

तिचे वडील बोलता बोलता थांबले. तिचे डोळे दाटुन आले.बाबा असं काहे बोलतील हे तिला अपेक्षित नव्ह्तं. त्यांच्या त्या बोलण्याने तिला थोडा धीर आला होता. इतके दिवस स्वत:च्या मनाशी चाललेला खेळ तिला थांबवायचा होता आणि बाबांच्या बोलण्याने तिला थोडं बळ आलं. 

               वडीलांचा निरोप घेउन ती लोकल पकडुन दादरला पोचली. वेटींग रुममध्ये रजिस्टरवर नाव आणि तिकीट नंबर नोदंवून तिथल्या खुर्चीवर बसली.हळूहळू ती वेटींग रुम भरु लागली. रात्रभर तिला झोप लागलीच नाही. पहाटे साडेचारचा अलार्म वाजला. वॉशरुममध्ये जाउन फ्रेश होउन ती वेटींग रुममधुन बाहेर पडली आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागली.


               गाडीची अनाउंसमेंट झाली होती.ती वेटींग रुममधून निघुन दादर टर्मिनसच्या दिशेने चालू लागली. गाडी नुकतिच प्लॅटफॉर्मवर आली होती.गाडीत चढण्यासाठी माणसांची लगबग सुरु झाली.तिनेही आपला डब्बा शोधला व आपल्या सीटवर जाउन बसली.या ट्रेनचं एक बरं होतं; ट्रेनला मोजकेच स्टॉप्स होते आणि दुपारी साडे बाराच्या दरम्यान ती पोचणार होती.बरोबर साडे पाचला गाडीने हॉर्न दिला आणि हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला. एव्हाना अंधुक प्रकाशात मुंबई जागी होत होती.लोकल्स धडधडत ये-जा करत होत्या. १५-२० मि. ट्रेन ठाण्याला पोचली तेव्हा तिने फेरीवाल्याकडुन न्युज पेपर घेतला, पनवेल येईपर्यंत तो चाळून झाला. पनवेलला ट्रेनमधल्या फेरीवाल्याकडला एक मस्त चहा तिने मारला.आता तिला थोडं फ्रेश वाटु लागलं. लोकांची वर्दळ कमी झाली.आता ट्रेन थेट दोन अडीच तासांनी चिपळूणला थांबणार होती. गाडीने पनवेल सोडलं आणि गार वारा तिच्या अंगाला झोंबू लागला.पाउस ओसरुन एक महिना झाला होता पण कोकणातला परिसर हिरवागार होता.तिने पूर्वेकडे पाहिलं, सह्याद्रीच्या डोंगराआडुन सुर्यदेव हळुहळू वर येत होता.गुलाल उधळावा तशी पुर्व दिशा तांबड्या आणि केशरी रंगानी उजळली होती.कॅनवासवर ब्रशने फटकारा मारावा तसा एखादा पाखरांचा थवा भुर्र्कन उडुन जात होता.एव्हाना गाडीने वेग घेतला आणि खिडकितुन झोंबणार्‍या गार वार्‍यासवे खेळता खेळता तिने डोके खिडकीला टेकले आणि डोळे मिटुन घेतले. डोळे मिटताच ४ महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. आता यावेळी तिला तो प्रसंग आठवायचाही नव्हता.पण नाही त्या भरधाव वेगात तिच्या डोळ्यांसमोरुन तो प्रसंग वेगाने सरकू लागला.

          एके संध्याकाळी त्याने तिला भेटायला बोलावले होते. दोघेही चर्चगेटला भेटुन समुद्राच्या दिशेने निघाले.तो थोडा अस्वस्थच वाटत होता.तिने तसं विचारलंही पण त्याने काही नाही असं सांगुन तिला टाळलं.पण तिला ठाउक होतं की काही तरी बिनसलयं.चालत चालत ते नरीमन पॉईंटला समुद्राच्या टोकावर पोचले. किती तरी वेळ तो नुसता समुद्रकडे टक लावुन बघत होता. तिने बराच वेळ त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला पण तो काहिच बोलत नव्हता. कंठाळून ती जायला उठली त्याने तिचा हात धरला. गेल्या ३-४ वर्षात आज पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता. जरी त्या स्पर्शात अडवणूक होती तरी त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली. हात धरून त्याने तिला खाली बसायला सांगितलं. यावेळी बसताना दोघांमधलं अन्तर बरंच कमी झालं होतं. ती बसली. 

"अभी काय झालयं? सांगशिल का?"
"काय सांगु?" तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोलला. त्याने असं डोळ्यांत पाहिलं की ती नेहमी नजर चुकवायचा प्रयत्न करायची,कारण त्याच्या नजरेत एक प्रकारची नशा होती.तिला ती जाणवायची. त्याच्या मनातलं तिच्याविषयीचं सारं प्रेम त्याच्या डोळ्यांत दाटुन यायचं तेव्हा तिचं काळीज धडधडायला लागे.
"प्लिज बोल रे.काय झालयं सांग ना." नजर चुकवत ती बोलली.
 


"ऐकायचयं तुला? ऐक तर मग...;
हे बघ, मला नाही माहित की तुला माझ्याकडुन काय हवयं ते? आय मीन, मला नाही कळत की का आपण पुन्हा पुन्हा भांडतो आणि पुन्हा पुन्हा एकत्र येतो ते? तू पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंस त्यानंतर मी तुला त्याबाबत कधी विचारलं तरी का? मग का हे सगळं पुन्हा पुन्हा? मला नाही सहन होत यार हे सगळं.त्रास होतो मला या सगळ्याचा. भयंकर त्रास होतो! किती वेळा मी माझ्याच मनाचा, माझ्या भावनांचा खून करायचा आणि किती वेळा एखाद्या प्रेताप्रमाणे पुन्हा तुझ्याबरोबर राहायचं? अजुन कितीवेळा आपण एकमेकांना शेवटचं गुडबाय म्हणणार आहोत? आणि किती वेळा सॉरी म्हणून पुन्हा खोटं खोटं जगणार आहोत? मला या असल्या आयुष्याचा कंठाळा आलाय. वैताग आलाय. कळत नाहीय मला की हे सगळं कधी थांबणार आहे ते.पण कधी तरी या सगळ्यांना पूर्णविराम द्यावाच लागेल ना? कधी तरी आपण कायमचे वेगळे होणारच ना? मग आता का असं कुढत कुढत जगायचं आपण?" तो बोलत होता आणि ती भरल्या डोळ्यांनी उठुन उभी राहिली. 

"त्रास फक्त तुलाच होतो हो ना? मला नाही होत. मी काय मेणाची बाहुली रे.मला कसल्या आल्यात फिलिंग्ज. आय अ‍ॅम जस्ट अ हार्टलेस पर्सन! मला काय कळतयं की तुला काय होतयं ते? तुला कसला त्रास होतोय ते? मी खेळतेय ना रे तुझ्याशी.तुझ्या भोळ्या मनाचा फायदा उचलतेय.माझा वेळ जावा म्हणुन तुझ्याबरोबर फिरतेय.बस्स! हेच करते मी. खुष?" तिचा आवाज ओलसर झाला होता. त्याने उठुन तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले. 

"नाही ना असं करत तू? मग अजुन किती दिवस माझी परीक्षा पाहणार आहेस? मी नाही गं जाळू शकत स्वतःला असं. नाही सहन होत मला माझं हे असं वागणं. नाही सहन होत मला तुझ्याशिवाय जगणं. हरतो यार मी! स्वत:शीच हरतो नेहमी.मला तू हवी आहेस का समजत नाहीय तुला?" 

               त्याच्या डोळ्यात संपूर्ण आवेश होता. त्याच्या या प्रश्नांना ती उत्तर देणारच होती. 
"हो! मी ही नाही राहु शकत तुझ्याशिवाय. तू ही हवा आहेस मला. कायमचा." 

         शब्द तिच्या ओठावर येणारच होते की अगदी अनपेक्षितपणे तिच्या ओठांवरील शब्दांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं. हे सगळं तिला अपेक्षित नव्हतं. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने वीज सळसळत तिच्या शरीरात गेली.एक दोन तीन सेकंद तिला वाटलं पावसाची पहिली वहीली कोवळी सर तिच्या ओठांवर सरसरतेय पण नाही तिला ते अयोग्य वाटलं.तिला ती पावसाची सर वाटलीच नाही तर एक अजस्त्र लाटच आपल्यावर उसळलीय असं वाटलं.दुसर्‍या क्षणी तिने त्याला झिडकारलं आणि साटकन एक कानाखाली ठेवून दिली. तो हादरला.भरला डोळ्यानी आणि रडवेल्या चेहर्‍याने ती निघुन गेली, "आय हेट यु अभय!"  

          गाडीने कर्णकर्कश भोंगा वाजवला आणि एका टनलमध्ये शिरली. तिने खाडकन डोळे उघडले.कान बहिरा करणारा गाडीचा आवाज आणि बाहेर फक्त बोगद्यातला काळोख होता.... 



क्रमश: