Showing posts with label Vengurla. Show all posts
Showing posts with label Vengurla. Show all posts

Monday, December 30, 2013

कोकणातलो धयकालो (जत्रा)

                   धयकालो म्हंजे सिंधुदुर्गातल्या लोकांचो जीव की परान. दिवाळी सोपली काय एका महिन्यात सिंधुदुर्गातल्या बर्‍याच गावांत ग्रामदेवतेची सालाबाद जत्रा असता आणि ह्या जत्रेची जी काय मजा असता ना गाववाल्यानु ती अशी सांगान नाय समजाची तुमका, काय कळला? त्यासाठी एकदा तरी सिंधुदुर्गातल्या गावात जावन ही जत्रा बघुक व्हयी. जत्रेत काय तर, मालवणी खाज्याच्या दुकानापासुन, भज्याची दुकाना, न्हान पोरां-टोरांसाठी खेळण्याची दुकाना, फुगेवाले, पेपारेवाले, सोरट्वाले, लोकांची गजबज, नटान थटान इलेली बालमानसा (स्त्रीया),आरड हुएल घालणारी पोरा, भज्यांचो सुटलेलो वास आणि कुडकुडणार्‍या थंडीत चादर घेउन रात्रभर बघूचो दशवताराचो खेळ! एक दोन दिस चलणारी ही जत्रा म्हंजे कोकणातल्या लोकांचो वार्षिक सण! बाकी कोकणात जितकी मजा चतुर्थीच्या सणाक तितकीच ह्या धयकाल्याक! 

काय? येतास जत्रेक? चला तर मग देखवतय तुमका आमच्या गावची जत्रा... 

              खरा सांगाचा तर आता जत्रेक पयल्यासारखी मजा नाय रवली.आता गावाक सगळ्यांकडे टीव्ही, मोबायल झाले. तेवा आताच्या पोरांकासुध्दा या जत्रेविषयी इतको इंट्रेस्ट नसता.जुने जाणते देवाचा काम समजान अजुन पर्यत आपले करतत. तर असो. जत्रेच्या दिवशी दुपारपासुनच देवळाच्या आजुबाजुक दुकाना लागाक सुरवात होतत.लाउडस्पिकरावर सकाळपासुन देवाची गाणी लागलेली असतत. देवळाक मस्त लायटींग केलेली असता. संध्याकाळ झाली की हळूहळू देवळाकडे लोका जमाक सुरु होतत.तर आम्ही सुद्धा जेवन खावन देवळाकडे जावच्या तयारीक लागलो. या दिवसात गावाकडे मरनाची थंडी असता तेव्हा अपली स्वेटर आणि शाल घेउन आम्ही देवळाकडे जावक भायर पडलो. आमच्या गावात दोन देवळा आसत. त्यामुळे लागोपाठ दोन दिवस जत्रा असता. पयली जत्रा श्री खाजणादेवीची आणि दुसरे दिस श्री भुमिकादेवीची. आम्ही देवळाकडे पोचलो. आधी सांगलय तशी देवळाकडे दुकाना लागली होती. पेट्रोमॅक्सच्या दिव्यात दुकाना झगमगान गेली होती. रात्रीच्या येळाक लायटींग केलेला देउळ मस्तच वाटत होता. 




                 पन पयल्यासारखी गर्दीच नाय. लोका आपली येत आणि देवीची ओटी भरुन, वायच हडे-थडे फिरान, चाय भजी खावन आणि खाजा, लाडु असा इकत घेवन घराकडे जात होती. आम्ही सुद्धा देवळात जावन देवीची ओटी भरली आणि जत्रेत फिराक सुरवात केली. फिरता फिरता माका माझ्या न्हानपणीची जत्रा आठवत होती. माझा न्हानपण गावात गेल्यामुळे माका या जत्रेचा लय याड. न्हान असताना जत्रेच्या दिवशी आम्ही सगळी पोरा खूप मजा करुचो. त्यादिवशी नवीन कपडे घालुन आम्ही जत्रेक जावन वायच आकडाक गावता म्हणुन मिरवायचो. वगीच खेळण्याच्या दुकानावर गर्दी करुचो. घरातल्यानी दिलेल्या पैशांचो एखादो फुगो, ट्रक, गाडी, पिरलुक (शिट्टी),पेपारी (पिपाणी) घेवन वाजवत फिरायचो. पन सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही सगळेजण जमून असलेल्या पैशांतून खेळण्याच्या दुकानातुन ३-४ रबरी लाल बॉल घ्यायचो. आमका क्रिकेट खेळाक कधी धड बॉल नसायचे आणि वेंगुर्ल्याक जावन आमका बॉल आणुन देणारे कोन नाय होते. मग जत्रेक आम्ही पैशे जमवुन बॉल घ्यायचो आणि मग १-२ महिने आमका खेळाक गावायचा.

     मगे कोणीतरी येवन आमका चाय भजी खावक घेवन जायत. जत्रेत गावणार्‍या भज्यांचो स्वाद कधीच खयच्या भज्यांका येवचो नाय. आजुन ती चव जिभेर रेन्गाळली काय तोंडाक पानी सुटता. तर मग आम्ही हडे-थडे फिरान, शाळेतल्या मुलींसमोर ( ती सुद्धा नवीन कपडे घालुन आकडान दाखयत ) व्हायच शायनींग मारुन आम्ही दशावताराचो खेळ बघुनक देवळात जावन बसायचो, तेवा खुप दमाक झालेला असायचा आणि दशावतारी देवीची पालखी निघाल्यावर म्हण्जे बारा - एक वाजता खेळ करुन उभे रवत, तवसर आमची मध्यान रात झालेली असायची. त्यामुळे माका ह्या दशावतारी नाटक कधी पूर्णपणे बघुकच गावला नाय. पण या वेळी बर्‍याच वर्सानी माका जत्रेक येवक गावला होता आणि माका दशावताराचो खेळ बघुचोच होतो. तर जत्रेत फिरान झाल्यावर घरातल्यानी खाजा-बिजा घेतल्यानी आणि चाय भजी खावन झाली तवसर ११ वाजले. मगे मामा-मामी, माझी आई आणि बहिण घराकडे गेली मी आणि सचिन देवळाकडे रव्हलो. सचिन खास जत्रा बघुक माझ्याबरोबर माझ्या गावाक इलो होतो.

               दशावतारी उभे रवाक अजुन खूप येळ बाकी होतो. अजुन देवीची पालखी सुद्धा निघाक नाय होती. तवसर मी कोन जुने मित्र दिसतत काय म्हणुन बघत फिरत होतयं. काही वेळान देवीची पालखी निघाली. पालखी देवळाभोवती फिरवन झाली, देवीची आरती आणि गार्‍हाणी घालून झाली हुनासर बारा वाजत इले. आता लोका देवळात जमाक सुरुवात झाली कारण दशावतार सुरु होनार होतो. ह्या नाटक करुक दशावतारांची पार्टी बोलवली जाता. आमच्या देवळात सालाबादप्रमाणे चेन्दवणकरांची पार्टी येता. तशी सिंधुदुर्गात नउ दशावतार पार्टी आसत. पार्सेकर, वालावलकर, चेन्दवणकर, नाईक-मोचेमाडकर वैगरे.दशावताराचा नाटक ह्या देवळातच केला जाता. थोड्याशा जागेत एक बाकडो टाकतत. ह्योच तेंच स्टेज आणि ह्याच त्यांचा सिंवासन. दशावतार्‍यांका रंगाच्यासाठी ( मेक अप) एक खोली असता. तिथुनच ते रंगांन येतत आणि आपलो प्रवेश सादर करतत. ह्येंका स्वतःचो मेकअप स्वत:च करुचो लागता. 



            



          
             नाटकाक संगित म्हणजे एक पेटीवालो, पखवाजवालो, आणि एक झांजवालो इतकेच. ह्या संगित आणि ही कला वर्षानुवर्षे कोकणातल्या लोकांची आवडती कला आसा. तर पयलो प्रवेश असता गणपती आणि रिद्धी सिद्धीचो. पखवाजलो गायन सुरु करता आणि गणपती रिद्धी सिद्धीवांगडा प्रवेश घेवन येता आणि तेंचो नाच सुरु होता.

पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
गणपतीया तुझे नाम हे जित्मां ता थया था..... 


           नाच सोपल्यावर मग एक भटजी येता आणि गणपतीची पुजा करुक सुरुवात करता. खरा तर ह्यो भटजी पुजा करताना मालवणी भाषेत लय कॉमेडी करता पन लोकांच्या गोंगाटात काय धड आयकाक येना नाय. यावेळी भटजी आणि नाईक ( सुत्रधार पखवाजवाला) हेंचो संवाद रंगता. कित्येक वर्सा झाली हे संवाद आजुन बदलाक नाय पण त्यावेळी ते मजेशीर वाटतत. भटजी सांगता, नाईक, गणपतीची पुजा करायची आहे पण साहित्य नाही. साहित्य नाही तर मग चालीवर घ्या. मगे भटजी गणपतीक न्हावक घालताना बुडुबुडू चुळूचुळू असो आवाज काढुन न्हावक घालता. पूजाअर्चा झाली आता नैवेद्य?? तो पन समजून घेवा असा सांगान येळ मारुन न्हेता. मगे भटजी गनपतीची आरती गावक सुरुवात करता. मालवणीतील हे आरती लय कॉमेडी वाटता, बघा तुमका समाजता काय ती..

हेची आवस खिलोरी,बापूस खट्याळो I
काय नाय हेका, भाव शेंड्याळो II
फडफड्या कानाचो, एक दिसता सुळो I
खाजीच्या कामास भारी हुळहुळो II
थयथय थयथय नाचता,
पोरगो शिवल्याचो I
बसाक दिलो ह्येका राजा उंदराचो II
जयदेवा जयदेवा जय कानसुर देवा I
भक्तिभावान करतय मी तुझी सेवा II
चार हात एक स्वांड, आठ तुझे बायलो I
तुया दिसतयं बरो,
पण वायट तुझो खायलो II

                त्यांनर, देवासमोर फुगडी घालतत, उन्दराची आरती होता आणि मगे पुन्हा नाचान गणपती, रिद्धी सिद्धी आणि भट्जी एझ्जिट मारतत. त्यांनतर पखवाजवालो पुन्हा गळो फाडुन सरस्वतीचा स्मरण करता आणि मोरावर बसुन सरस्वती येता. ती मोरावर बसान कशी येता ह्या तुमका ह्या फोटुत दिसता ना? तर सरस्वती येता आणि नाचान परत जाता. 



   दशावतारात अजुनसुध्दा स्त्रीपात्र पुरुषच करतत. रिद्धी सिद्धी आणि सरस्वतीचा काम करणारो नट एकच असता. त्यांचा काम संपला काय मग ते एक थाळी (आरती) घेउन जत्रेत लोकांकडुन पैसे जमा करुक फिरतत. त्येंका "बिलीमारो" म्हणतत. या बिलिमारो या शब्दाचो अर्थ नेमको काय तो मात्र माका ठावक नाय. पण गावांत एखाद्या चेडमानूस किंवा एखादो पोर उगाच तोंडाक पावडर फासुन आणि मेक अप करुन शयनिंग मारत फिराक लागले काय लोक त्यांका बिलिमारो म्हणून चिडवतत. 


         त्याच्यानंतर शंखासुराचो प्रवेश असता. गणपती, भटजी, सरस्वति आणि शंखासूर हे प्रवेश ठरलेले असतत. आणि प्रत्येक नाटकात सगळा सेमच असता. शंखासुराचो प्रवेश मजेशीर असता. दैत्याचो गेटअप करुन शंखासुर आरडत येता. संकासुराचे कपडे काळे असतत. तोंडावर काळी टोपी कशी असता. डोळ्यांच्या जागी दोन भोका पाडलेली असतत तेका दिसाक व्हया म्हणुन नायतर खयतरी आपटान पडात. लाल रंगाची जीभ भायर लोंबत असता. असो तो दैत्य आरडत प्रवेश घेता. आता संकासुर आणि नाईक यांच्यात संवाद रंगता. बाकड्यावर ब्रम्हदेव समाधी लावन बसलेलो असता. संकासुर शंकराचो भक्त असल्याने पहिल्यांदा न्हावन घेता आणि शंकराची पुजा करता. संकासुर बाकड्यार बसलेल्या ब्रम्हदेवाची मालवणी भाषेत टिंगल करता आणि त्याचे वेद चोरुन घेवन जाता. मगे विष्णू येता. ब्रम्हदेव तेका सन्कासुरान वेद चोरुन नेल्याचा सांगता. विष्णु ब्रम्हदेवाक सांगता काळजी करु नको, नी ते वेद घेवन येतो आणि सगळ्यांची एग्झिट होता. पुन्हा पखवाजवालो आराडता आणि संकासुर तलवार घेवन येता. तेव्हाच विष्णू पण थयसर येता. त्यांच्यात लडाई होता आणि विष्णू संकासुराचो वध करता आणि शंखाशिवाय विष्णुची पुजा अपूर्ण राहिल असो वर तेका देवन जाता. खरा तर संकासुर आणि विष्णुची लडाई लय मजेशीर असता पण अशी सांगान नाय समजाची ती. असो.










            आता खर्‍या दशावतारी नाटकाक सुरुवात व्होवची असता. संकासुराच्या प्रवेशानंतर पेटीवालो येता. पेटईवर सुर धरता आणि पखवाजवाल्याच्या तालावर झांजवालो वाजवक सुरुवात करता. पेटीवालो गायन सुरु करता आणि त्याच्या गायनावर पयलो राजा प्रवेश करता. द्शावतारी नाटक ह्या सगळा लिहीलेला नसता. पुराणातली एखादी कथा घेवुन त्याच्यावर ह्या नाटक सादर केला जाता. सगळे संवाद आपसुक, सीनप्रमाणे असतत. तर पयलो राजा येता आणि त्याच्या भाषणातुन त्याच्या राज्याची, दरबाराची दृश्या लोकांसमोर सादर करता. तेंचे हे स्वगत असलेले संवाद खूप भारी असतत. 



              प्रत्येक नाटकात नारदमुनीची भुमिका ही असताच. नारायण SSS नारायण SSSअसो आरडत नारद येता आणि कळी लावन जाता. राजा, राणी, त्यांची कन्या, नारद, दरोडेखोर, क्रिष्णा, शंकर वैगरे असली पात्रा कॉमन असतत. दरोडेखोराच्या तावडीतुन दुसर्‍या देशाचो राजा जो शिकारीसाठी इलेलो असता तो राजकन्येक सोडवता आणि मग त्यांच्यात प्रेम वैगरे होता. खरा सांगायचा तर माका सगळ्यात आवडता ती या नाटकातली लडाई. ही लडाई साधी सुधी नसता. लडाईच्या आधी राजा किंवा दैत्य ज्यांच्यात लडाई व्होवची असता त्यांच्यातलो एकजण गायन करता. गायन करता करता जो नाच असता तो बघुक माका भारी मज्जा येता. पखवाजच्या ठेक्यावर दोघेजण मस्त तालात नाचतात आणि मग लडाई सुरु होता. ( खाली दिलेला लढाईपूर्वीचा नाचाचा व्हिडीयो बघा ) 



 या लढाईत दैत्य मारलो जाता. रात्री एक दिड वाजता सुरु झालेला ह्या नाटक सकाळन्याक पाच-सहाच्या दरम्यान संपता आणि लोका आपआपल्या घराकडे जावक निघतत. 




















          आम्ही जे नाटक पाहिलं त्याचं कथानक थोडक्यात सांगतो. असुर राजा सुरेंद्र हा पहिला राजा म्हणुन प्रवेश करतो आणि स्वगतामध्ये राज्याविषयी, प्रजेविषयी आणि देवानी पुन्हा कसं फसवलं याचे वर्णन करुन काळजी व्यक्त करतो. हे सगळे स्वगत पाठांतर नसतं. जे सुचेल ते तो कथन करतो. राजा सुरेंद्रला देवांचा राग असतो.इतक्यात त्याची एकुलती एक राजकन्या येते. हे स्त्रीपात्र पुरुषच सादर करतो. ती राजकन्या एक स्तुतिस्तवन गाउन राजाला खुश करते आणि वनविहारासाठी जायची परवानगी मागते. राजा ती नाकारतो कारण त्याल तिची कळजी असते. तरीही राजकन्या आपल्या चंदा, मंदा, कुंदा या मैत्रीणींसोबत जात असल्याचे सांगुन कशीबशी परवानगी मिळवते. त्यानंतर पृथ्वीवरल्या उज्जेन नरेश श्रीकांतचा प्रवेश होतो. तो ही स्वगतामध्ये बरंच काही सांगतो. एखादं गायन करतो. इतक्यात त्याच्या दरबारात एक ब्राम्हण येतो आणि राजा श्रीकांतला सांगतो की जंगलात एका दरोडेखोराचा उत्पात माजला आहे. त्याने मला लुटलं, आणि मरेपर्यंत मारलं. तु त्याच्या बंदोबस्त कर. राजा श्रीकांत ताबडतोब निघतो. इकडे राजकन्या वनविहारासाठीए आलेली असताना कूठेतरी चुकते आणि त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडते, तितक्यात राजा श्रीकान्त तेथे येतो आणि दरोडेखोराला युद्धासाठी आवाहन करतो. त्यांच्यात लढाई होते. दरोडेखोर मरतो आणि राजकन्या राजा श्रीकांतच्या प्रेमात पडते. पण राजा श्रीकांत उगाच भाव खातो आणि राजकन्येला लटकवत राहतो. तो तिला सांगतो, एकवेळ मी पाण्याने बहरलेल्या तलावात पडेन पण प्रेमात पडणार नाही; कारण पाण्यात पडल्यावर पोहुन बाहेर पडता येईल पण प्रेमात पडल्यावर बुडायलाच होणार. ( मला हा डायलॉग जाम अवडला ) पण नन्तर राजकन्या त्याला गाणे गाउन प्रपोझ करते आणि तो मान्य करतो. मग राजकन्या त्याला घेउन तिच्या राज्यात राजा सुरेंद्राला भेटवण्यास घेउन येते. ती राजाला सगळा प्रकार सांगते आणि राजा श्रीकांतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते. राजा सुरेंद्रपण तयार होतो पण त्याची एक अट असते की राजा श्रीकांतने ल्क्ष्मीमातेची भक्ति करणे सोडुन द्यावे. पण रजा श्रीकांत ही अट मानायला तयार होत नाही. राजा सुरेंद्र दोघांना खूप मारतो अणि तीन दिवसांची मुदत देउन तुरुंगात बंद करतो. तिकडे नारद जाउन लक्ष्मी मातेला सांगतो की तिचा भक्त राजा श्रीकांतवर कसं संकट आलयं ते. मग लक्ष्मी माता त्याच्या रक्षणार्थ धाउन येते. राजा सुरेंद्रचा वध करुन श्रीकांत आणि राजकन्येला मंगल आशिर्वाद देते आणि नाटक संपतं...








Wednesday, December 18, 2013

कोंकणसफारी - सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट आणि किल्ले निवती

दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार ६ डिसें. आजचा पल्ला जास्त लांब नव्हता, जाउन येउन शे-दिडशे किमी. वेंगुर्ला - मालवण- किल्लेनिवती-वेंगुर्ला. आज जरा जास्त टप्पे गाठायचे असल्याने ५ रु./किमी या रेटने आम्ही बाईक घेतली. बाईक जरा महागच पडणार होती. पण त्यामुळे आमचा बराच वेळ वाचणार होता. सकाळी नउ - साडेनउच्या दरम्यान आम्ही गावातुन निघालो. वेंगुर्ल्याहुन मालवण नविन झालेल्या सागरी महामार्गाने ४५ किमी. आहे. वाटेत माझं गाव परुळे लागणार होतं. वेंगुर्ल्याहुन दाभोली-केळूस-म्हापण-पाट-परुळे-चिपी-मालवण असा रुट आहे. वेंगुर्ल्याहुन निघुन दाभोलीच्या सड्यावर पोचलो तेव्हा दहा वाजले होते. कोकणातला हा सडा मला जाम आवडतो. नजर जाईल तिथवर पठार आणि भिरभिरणारा वारा. या दिवसांत कापावर सोनेरी गवत उगवलं होतं. दूरवर पसरलेलं ते सोनेरी पठार आणि मधुनच डोकं वर काढणारा एखादा 'मांगर'. पावसाळ्यात या सड्याचे रुप काय ते वर्णावे. पावसाळ्यात संपूर्ण गवत  नाहीसं झालेलं असतं आणि सड्यांच पूर्वीचं रुप म्हणजे तो काळा कातळ. पावसाळ्यात भिरभिरणार्‍या वार्‍यासोबत अंगावर पावसाच्या सरी झेलत या सड्यावरुन फिरण्याची मजा काही औरच! एका ठिकाणी थांबून या सड्यावर काही फोटो घेतले. वाहन असलं की एक बरं असतं एखादी फ्रेम लोकेट झाली की गाडी थांबवून लगेच ती शूट करायची. 








सडा संपला आणि खाली वळणावळणाच्या घाटउतारातुन आम्ही केळुसला पोचलो. केळुसच्या पुढे अजुन एक घाट. तो संपवून आम्ही म्हापण मार्गे पाट या गावी आलो. पाटावरुन डावीकडला रस्ता परुळे - निवती - भोगवे - मालवण आणि पुढे आचारा, देवगड असा जातो. हाच नवीन सागरी महामार्ग. पाटला सस्त्याच्या डावीकडे माउलीचं सुंदर मन्दीर आही आणि उजव्या बाजुला एक तळं आहे. हे तळं सदानकदा लाल आणि सफेद कमळांनी फुललेलं असतं. सगळीकडे नुसती कमळंच. फारच सुंदर !

त्यानंतर वाटेत माझ्या गावच्या प्रसिद्ध वेतोबाच्या मंदीरापाशी थांबलो. आईने तिथे देवाला नारळ वाहायला सांगितला होता. देवदर्शन झाले आणि पुढे काही वेळातच आम्ही माझ्या गावी परुळे इथे पोचलो. शुक्रवार असल्याने आज गावचा बाजार होता. पण पहिल्यासारखा बाजार भरलेला अजिबात वाटत नव्हता. मला आठवतं लहानपणी मी आजीबरोबर बाजाराला यायचो. धम्माल असायची. आज्जी आईस्फ्रुट, भजी, फरसाणं, अजुन काय काय असं बरंच काही खायला घेउन देत असे. बाजार भरगच्च भरलेला असायचा. आता फक्त नावालाच उरला होता. 


श्री देव वेतोबा :- परुळे



  मंदिराच्या आवारात एक छान मुर्ती होती.:-


    परुळे बाजार :-

परुळ्यात जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे निघालो कारण परुळ्यात पोहचेपर्यन्त सव्वा अकरा वाजले होते. तिथुन एका छोटा घाट चढलो आणि पुन्हा एका सड्यावर आलो. इथे सध्या चिपी एअर पोर्टचं काम सुरु असल्याने मालवणकडे जाणारा मार्ग डायव्हर्ट केला होता. त्यामुळे आम्हाला सहा किमीचा अतिरिक्त फेरा पडला. एअरपोर्टचं काम अतिशय जोरात सुरु आहे. आम्ही गेलो तेव्हा रनवेचं काम सुरु होतं.

चिपीहुन मग आम्ही मालवणच्या दिशेने निघालो आणि इथे एका अतिशय सुंदर जागी येउन पोचलो.  मालवण आणि चिपी ( परुळे ) या दोन गावांच्या मधुन कर्ली नदी वाहते. हल्ली काही वर्षांपूर्वीच या नदीवर एक ब्रीज बांधलाय. तत्पूर्वी मला आठवतं, मालवणला जायला आम्हाला परुळ्याहून चिपीच्या पुढे कोरजाई गावी जावं लागे. इथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. कोरजाईहुन होडीने आम्ही मालवणला जायचो. पण आता या ब्रीजमुळे मलावणला लवकर पोचता येतं. त्या ब्रीजवर जेव्हा पोचलो तेव्हा समोरचं दृश्य वेडावून टाकणारं होतं. प्रचंड मोठी अशी ती कर्ली नदी संथ वाहत होती. त्या विशाल पात्राच्या दोन्ही बाजुच्या किनार्‍यावर माड डोलत उभे होते. दूरवर पसरलेलं ते नीळेशार पाणी अगदी डोळ्यात साठवून घेतले होते. या नदीवरला हा ब्रीज माझी अत्यंत आवडती जागा आहे. काही वर्षांपूर्वी मी या ब्रीजवरुन गेलो होता तेव्हाच अगदी हा ब्रीज आणि ते लोकेशन माझ्या मनात भरलं होतं पण त्यावेळी माझ्याकडे कॅम नव्हता. अशाचप्रकारचं पालघरला असलेल्या केळव्यातल्या दांडा खाडीवरलं ब्रीज मला भयंकर आवडतं. म्हणजे ते लोकेशन इतकं रोमँटीक आहे ना ! तसंच कर्ली नदीवरलं हे लोकेशन तर कळसच होतं. तिथुन पाय उचलवत नव्हता पण जमेल तितके फोटो घेउन आम्ही आता नॉनस्टॉप मालवणकडे निघालो. 


माडांतुन वाहणारी कर्ली नदी :- 








मालवण बाजारपेठेतुन वाट काढीत आम्ही जेट्टीवर पोचलो तेव्हा बारा वाजले होते. दुपारच्या उन्हात सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभा होता. आम्ही पटकन किल्ल्याची तिकीटे घेतली आणि होडीतुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. जस जसा किल्ला जवळ येत होता तसं तसं अभिमानाने छाती भरुन येत होती. आज पहिल्यांदाच मी या किल्ल्यावर जात होतो. होडीतुन मुख्य दरवाज्यापाशी उतरल्यावर होडीवाल्याने एका तासांत किल्ला बघुन यायला सांगितलं. महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे मुख्य द्वारही 'गोमुखी' आहे. 

                 
मालवणचा किनारा :)






किल्ल्यावर बरीच वर्दळ होती. मुख्य दरवाज्यातुन शिरताना दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेतलं. नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिजच्या कृपेने नकाशा सोबत होता. नकाशा सोबत असल्याने किल्ला फिरताना आणि बघताना चुकायला होत नाही आणि किल्लाही लवकर बघून होतो. किल्ल्यात दर्शवल्याप्रमाणे सर्व प्रथम आम्ही महाराजांच्या हाताचे ठसे असणारी जागा शोधायला लागलो. नकाशात दाखवल्याप्रमाणे नगारखान्याच्या वरच ती जागा सापडली. महाराजांच्या हाताचे ठसा असलेली त्या जागेला एक छोटा दरवाजा केलाय आणि त्याला कुलूप लावले आहे. पण दरवाजा जाळीदार असल्याने ठसा दिसतो. मला वाटतं त्या ठश्याला चुन्याचा हात मारला आहे. तिथे नतमस्तक होउन आम्ही नकाशात दाखवल्यापप्रमाणे तटबंदीवरुन चालायला सुरुवात केली. इथुन समुद्र मस्तच दिसत होता. किल्ल्याच्या बुरुजावर लाटा अलगद आदळत होत्या. पाणी अगदी हिरवंगार होतं. उन मी म्हणत होतं पण वार्‍यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. आम्ही ज्या बाजुने फिरत होतो त्याबाजुला काहीच नव्हतं. त्या भागात दलदल माजली होती. 










मग बरंच चालल्यावर एका बाजुने शिवराजेश्वर मंदीराच्या मागच्या बाजुला खाली उतरलो. मंदीरात जाणार इतक्यात दुसर्‍या होडीतुन आलेली माणसं आत शिरली. गर्दीत नको म्हणुन मग आम्ही पुढे गेलो. तिथुन मग महादेव मन्दीरापाशी गेलो. महादेवाचे दर्शन घेतले. मंदिरात एक अतिशय लहान म्हणजे ३ बाय २ फुट आकाराची आयताकृती विहीर कशी होती. स्थानिकांच्या मते ते एक भुयार आहे. जे थेट मलवण शहराच्या उत्तरेकडे असलेल्या ओझर या गावी एक मठ आहे तिथे उघडते. 
महादेवाच्या मंदीरापासुन थोड्याच अंतरावर दूध बांव, दही बांव आणि साखर बांव अशा गोड पाण्याच्या विहीरी आहेत. ( बांव = विहीर ). हा किल्ला समुद्रात उभा असुनही आतमध्ये असलेल्या या गोड पाण्याच्या विहीरी महणजे आश्चर्यच मानले जाते. किल्ल्यावर असलेल्या रहिवाशी हेच पाणी वापरतात. पुढे काही अंतरावर भगवती देवीचं मंदीर आहे. तिथुन मग पुढे पायर्‍या.ववरुन चढुन आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. किल्ला बघुन संपला होता पण मघाशी राहिलेल्या शिवराजेश्वर मंदिरात जायचं राहुन गेलं होतं. मुख्य दरवाज्याच्या तटबंदीवरुन उतरुन मंदीरात गेलो. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली. 

भगवती मंदिर 


 श्री शिवराजेश्वर मंदिर




आता किल्ल्याविषयी थोडी ऐतिहासिक माहिती: ( साभार विकी आणि ट्रेक क्षितिज )

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।

मालवणच्या समुद्रात असलेल्या ''कुरटे'' बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना आज्ञा केली; " या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्यांंशी बंदरी ऐशी जागा नाही"! दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्या वरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.


 गडफेरी आटपून आम्ही आमच्या ३३ नंबरच्या बोटीत येउन बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. एव्हाना २ वाजले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. थोडावेळ फिरल्यावर बाजारात 'चैतन्य' हे ओळखीचे नाव दिसले आणि तिथेच जेवायला बसलो. जेवण तर अप्रतिम होते. पण या चैतन्यवाल्यांचे एक रेस्टॉरंट प्रभादेवीला सिद्धिविनायकाशेजारी आहे. पहिल्यांदा तिथे सुद्धा फार चांगलं जेवण मिळायचं पण आता त्या जेवणला चवच नसते. असो. इथे मालवणात आम्हे भरपेट मासे खाउन पुढे राजेकोट आणि सर्जेकोटसाठी निघालो. 

जेवणाची वाट बघतोय. :) 




मलवण जेट्टीवरुन उत्तरेकडे राजकोट आहे. सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी महाराजांनी पद्मगड, राजेकोट आणि सर्जेकोट हे किल्ले देखिल बांधले. आता या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास काहीच नाहीए. स्थानिक मोकळ्या जागेचा उपयोग मच्छी सुकवण्यासाठी करतात. पण इथुन सिंधुदुर्ग किल्ला फार छान दिसतो. बाजुलाच खडकांमध्ये एक छोटे चर्च अगदी उठुन दिसते. 

राजेकोटवरून मालवण बंदर :) 

     राजेकोट




 राजेकोटवरुन सिंधुदुर्ग किल्ला 









राजकोटावरुन मग आम्ही बाईक सर्जेकोटाकडे वळवली. मालवण - आचरा - देवगड सागरी महामार्गावर मालवणपासुन ४-५ किमी वर कोळंब खाडीवरलं ब्रीज पार केल्यावर डावीकडे एक वाट जाते त्या वाटेने सरळ जावे. सर्जेकोटावर काही नाही. प्रवेशद्वार छोटेसे पण कमानदार आहे. आत मध्ये बरीच झाडी माजली होती. तटबंदीचे अवशेष अधुन मधुन डोके वर काढत होते. बाहेर असलेल्या मंदीरच्या बाजुने गेल्यास खाडीच्या बाजुची तटबंदी आणि बुरुज अजुनही शाबूत आहेत. बाकी फक्त जंगल आणि झाडी. 

 सर्जेकोट प्रवेशद्वार आणि तटबंदि :- 



सर्जेकोट संपवून मग आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने निघालो. किल्ले निवतीला जाण्यासाठी आम्हाला परुळ्यातुन जायचे होते. नुसार आम्ही पुन्हा मालवण - चिपी - परुळे अशा प्रवासाला लागलो.  या वाटेवर कुठेतरी माझ्या निकॉन कॅमची लेन्स कॅप पडली ती माझ्या चिपीला आल्यावर लक्ष्यात आलं. असो. इथे कापावर एक सुंदर फ्रेम मिळाली. पण त्य टेंपो ट्रॅव्हलरच्या जागी एसटी असली असती तर ती फ्रेम अजुन खुलली असती. 


आम्ही परुळ्याला पोचलो तेव्हा साडेचार वाजले असतिल. तिथल्याच एका हाटेलात मस्त चहा मारला. इतक्यात समोरुन कुडाळ - किल्लेनिवती बस निवतीच्या दिशेने गेली. चहा संपल्यावर आम्ही पण निघालो. परुळे हा माझा गाव. पण शाळेसाठी मी माझ्या मामाच्या गावी असायचो आणि सुट्टी पडली की इथे यायचो. पण माझं मन इथे कधी लागायचं नाही. परुळे हा अतिशय निसर्ग संपन्न गाव. कर्ली नदी, भोगवे बीच, देवबाग, तारकर्ली यामुळे अजुनच खुलून दिसणारा. पण लहानपणी म्हणजे दहावी होईपर्यंत मल ह्या जागा फक्त ऐकून माहीत होत्या. आणि आज मी तिथे मनसोक्त उंद्डत होतो. परुळ्यातुन एक छोटा घाट चढुन आम्ही सड्यावर आलो. काहीवेळाने दोन रस्ते दिसतात. किल्लेनिवतीसाठी डावी मारायची आणि भोगवेसाठी उजवीकडे. आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने वळलो. काही वेळाने मघाशी बाजारातुन किल्ले निवतीला जाणारी बस इथे आम्हाला दिसली. तिच्यामागोमाग आम्ही किल्लेनिवतीला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. तिथुनच किल्ल्याकडे जाणारा कच्चा गाडी रस्ता आहे. बाईक रेमटावत आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि डाव्याबाजुला असलेल्या विहंगम निवती किनार्‍याचे दर्शन होताच हरखुन गेलो. अतिशय सुंदर असा हा किनारा इथुन किती सुंदर दिसत होता म्हणुन सांगू. 


यावेळी नकाशा नव्हता मग थोडं चढुन गेल्यावर झाडीतुन डोकावणारी तटबंदी दिसली. तितून आत शिरलो तर फक्त झाडीच झाडी पुढे काही दिसेना. त्या झाडीतुन वाट काढत उजवीकडे गेलो आणि एका मोकळ्या पठारावर आलो. बाजुला एक जंग्या बुरुज दिसला. तिथुन पुढे चालत आलो आणि समोरचं दृश्य पाहुन थबकूनच गेलो. समोर भोगवेचा किनारा शांतपणे पसरला होता. आम्ही बसलो ती जागा किती तरी शान्त होती. आवाज फक्त वार्‍याचा होता. कितीतरी वेळ आम्ही तिथे बसलो होतो. समोरच्या किनार्‍यावरुन नजर हटतच नव्हती. दुरवर अस्पष्टसा सिंधुदुर्ग दिसत होता. 







तिथुन उठावसं वाटत नव्हतं पण पुढे ४० किमी परतीचा प्रवास बाईकवरुन काळोखात होता. म्हणुन जरा घाई करुन निघालो. सुर्य एव्हाना पश्चिमेकडे कलला होता. सुर्यास्त टीपायचा होता पण घाई करुन घरी पोचणं गरजेचं होतं. तिथुन उठलो आणि पुन्हा त्या मोकळ्या पठारावर आलो आणि तिथे अजुन एक बुरुज दिसला. नकाशा नसल्याने किल्ला समजत नव्हता. मग त्या बुरुजाच्या मार्गाने गेलो. तिथे एक छोटंसं टाकं दिसलं जे झाडीने व्यापले होते. तिथुन एका आतमध्ये शिरलो आणि कळलं की खरं किल्ल्याचं वैभव इथे होतं. आम्ही त्या डावीकडल्याच बुरुजावरुन निघणार होतो. इथे किल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत. हा बालेकिल्ला असावा. इथुन पुढे टोकावर गेल्यावर फक्त समुद्रच समुद्र दिसतो.  बालेकिल्यावर अजुनही तटबंदी, प्रवेशद्वार, देवड्या आहेत. इथुन खाली समुद्रकिनार्‍यावर काही नारिंगी रंगांचे खडक दिसतात. समोर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे समुद्रात असलेले दीपगृहही दिसते. इथे सुर्यास्त टीपून आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. 

बालेकिल्ला 

सुर्यास्त :) 



काळोख पडलाच होता. पुन्हा त्या मार्गाने सड्यावरुन जाताना आता थंडी जाणवत होती. परुळ्यात उतरुन पुढे कुठेही जास्त वेळ न थांबता वेंगुर्ला बंदरावर जाउन बसलो तेव्हा साडे आठ वाजले होते. बंदरावर ताजे मासे घेउन कोळणी विकायला बसल्या होत्या. तिथे थोडावेळ बसुन मग घरी पोचलो. जाउन -येवुन १५० किमीचा प्रवास झाला होता. ५ रु./किमी या रेटने ७५०/-  रु. झाले होते. मध्येच आम्ही २००/- रु. पेट्रोल भरलं होतं त्याचे वजा करुन पाचशे रु. आम्ही बाईकवाल्याला दिले. आणि घरी परतलो. आजचा दिवस मस्तच झाला होता. एकुण चार किल्ले बघुन झाले होते खर्चही आटोपशीर होता. दुसर्‍या दिवशी गावच्या एका देवीची श्री खाजणादेवीची जत्रा होती. पण आमच्या प्लॅनप्रमाणे रेडीचा गणपती, यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला, सावंतवाडी असा प्लॅन होता....