Monday, December 20, 2010

स्पर्शांचे आलेख !


स्पर्श! 
खुप काही सांगतो ना? जेव्हा बोलुन बोलुन थकतो. शब्द संपतात. डोळेही  सांगुन सांगुन थकतात तेव्हा एक स्पर्शच सगळं काम करुन जातो ना? 
म्हणजे बघ ना! आपण एखाद्यावर प्रेम करतो. बर्‍याचदा बोलण्यातुन, लिहिण्यातुन, नेहमीच्या वागण्यातुन आपण ते जाणिव करुन देण्याचा प्रयत्न करतो. काहींना ते कळतही, काहींना कळत नाही आणि काहींना कळत असुनही वळत नाही आणि काहींना कळुन घ्यायचचं नसतं. मग अशावेळी एक नाजुकसा स्पर्श सारं काही सांगुन जातो. अनुभवलेयत कधी हे स्पर्शशब्द? फार वेगळं, काहीसं, कुठेतरी नेउन सोडणारं! एका क्षणात भावनांची जाणिव करुन देणारे स्पर्श! 

स्पर्श तरसणारे, बरसणारे, शहारणारे, मोहवणारे...  स्पर्शांची जादुच काही वेगळी असते. लहानपणी आईचा मांडीवर किंवा कुशीत शिरल्यावर, तिचा पाठीवरुन थोपटणारा हात कधी झोपेत घेउन जायचा कळायचे देखिल नाही. मग कधी रागाने मारलेला धपाटाही, जोरात बसला तरी तितकाच प्रिय! कौतुकाने घेतलेला एक पापा, गालगुच्चा, दृष्ट काढताना कडाकडा मोडलेली बोटे, राग ओसरल्यावर छातीशी घट्ट धरलेली तिची मिठी हे सगळं तिच्या शब्दातुन इतक्या सहज समजलं नसतं ना? म्हणुन मग स्पर्श! 

आईसारखा बाबाचाही हात. खरखरीत, ट्णक असला तरी जेव्हा तो मायेने फिरायचा तेव्हा त्यातल खरखरीतपणा कुठ्ल्या कुठे गायब व्हायचा. काटेरीपणा निघुन जायचा आणि मग रसाळ फणसातल्या गर्‍यांसारखा गोड वाटायचा!
वयाबरोबर मन आणि शरीरही बदलु लागतं आणि स्पर्शही बदलु लागतात. पण खरं सांगतो आई-बाबांचा स्पर्श तसाच राहतो.

आपल्या आयुष्यात कुणीतरी मन चोरुन नेणारं येतं. आपण तिच्याबरोबर नेहमी बोलतो, ती सुद्धा नेहमी बोलत राहते. बडबड, गप्पा, गाणी, नेहमीच्याच.पण कधी कधी हे सगळं पुरेसं नाही होतं. शब्द समजतात, पण त्या शब्दांमागच्या  भावना स्पर्शांशिवाय नाही समजत! 
बोलता बोलता एकदा तिचा हात हातात घ्यावा. बोटांत बोटे घट्ट गुंतवावी! त्या स्पर्शाबरोबर तिला आपल्या विश्वात घेउन जावं. तसाच तिचा हात घट्ट धरुन. ती ही मग सारं काही विसरुन त्या स्पर्शावर स्वार होउन मुक्त विहार करु लागते.

कधी कधी ती गोड दिसते. तशी ती नेहमीच गोड दिसते! ती समोर बसलेली असते. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच लहर असते. ती बोलत राहते, हसत राहते, आपण सारं जग विसरुन तिच्या त्या बोलण्यात, हसण्यात स्वत:ला हरवून टाकतो. मग तिला वाटतं की तुमचं लक्ष्य नाहीए तिच्या बोलण्याकडे मग ती सारखी हात लावुन, कधी एक टपली देउन तुम्हाला तिच्याकडे बघायला सांगते. कधी अनुभवलाय तो जाणिवेचा स्पर्श?

कधी कधी ती नाराज असते. उदास होते. दु:खी होते. अश्रुंनी तिचे डोळे भिजतात. मग आपसुकच आपले हात तिच्या गालांवर जातात. आणि ते ओघळणारे अश्रु  जमिनीवर पडायच्या आधीच आपल्या  बोटात मुरुन जातात. कधी कधी हे अश्रु आपण  नुसत्या बोलण्यानेही पुसु शकतो पण ते स्पर्शांनी पुसण्याची गोष्टच काही न्यारी असते. त्या स्पर्शात तिच्या मनात एक जाणिव निर्माण होते की आहे कुणी तरी आपलं, आपले अश्रु पुसणारं!

कधी कधी ती धुंद होते. बरसणार्‍या पावसाच्या सरींचा स्पर्श अंगावर झेलते. झोंबणार्‍या वार्‍याने ती शहारते. धुंद होउन, स्वैर होउन त्या पावसाशी आणि वार्‍याशी खेळू लागते. तिच्या शरीराची होणारी लाही लाही पावसाच्या सरी शीतल करतात. गार वारा त्यावर अलगद फुंकरही घालतो. पण तिच्या तप्त मनाला गारवा फक्त तो एक स्पर्शच देतो. तिच्यासोबत आपणही भिजावं, धुंद व्हावं, आणि मग ती थंडीने कुड्कुडायला लागल्यावर तिला आपल्या बाहुत बंधिस्त करावं. ती थरथरुन आपल्या मिठीत शिरते. तिच्या सर्वांगावर ओघळणार्‍या पावसाच्या सरींनी ती चिंब होते. त्यावेळी तिच्या डोळ्यात बघावं. लाजेने आरक्त झालेल्या तिच्या गालांवरील पावसाचे थेंब टीपून घ्यावेत्.लाजुन ती मिठीत अजुनच घट्ट शिरते. तिच्या मानेवरुन ओघळणार्‍या थेंबाना टीपून घ्यावे. आता तिचं तप्त मन कुठेतरी गार होत असतं. ती हळूच तिचे उष्ण श्वास कानाजवळून नेते आणि छातीवर विसावते. गरम पाण्याचा झरा फुटावा तसे तिच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी आपल्या छातीवरुन वाहु लागते. ते सुखाश्रु असतात! पाउस अजुन कोसळायला लागतो. विजा तळपायला लागतात,ढग गडगडायला लागतात. उधाणलेल्या समुद्राच्या किनारी, भर पावसात, उधाणलेली मने घेउन आपण उभे असतो. ढगांच्या गडगटाने ती घाबरुन आपल्याला घट्ट धरते. त्याचबरोबर तिला वेढलेले आपले हातही अजुनच घट्ट होतात. घाबरलेल्या सश्याच्या पिल्लासारखी ती धापा टाकु लागते. तिच्या श्वासांचा वेग वाढतो. अशावेळी तिच्या हनुवटीला स्पर्श करुन तिचा चेहरा आपण समोर धरतो. तिची नजर कावरीबावरी असते. तिच्या चेहर्‍यावरुन पावसाचे थेंब ओघळत असतात. दोन्ही हातांच्या ओंजळीत तो चेहरा भरुन, डोळे बंद करुन तिच्या ओठांवर विसावलेले थेंब प्राशुन घ्यावेत. त्याचवेळी पावसाला अजुन जोर येतो, वारा भरकटल्यासारखा वाहु लागतो. समुद्र जोरदार गर्जना करत लाटांचा मारा करतो! अनुभवलाय कधी हा भिजलेला स्पर्श?

कधी कधी एक दुरावा निर्माण होतो. गैरसमजाची अनामिक दरी तयार होते. ती दरी दोघांना पार करायची असते, कारण दोघांना माहित असतं की आपण एकमेकांशिवाय नाही जगु शकत. पण कधी कधी दरी इतकी खोल होते की एकमेकांचे घट्ट धरलेले हात सुटतात. न बोलताच, न बघताच, न जाणताच आपण एकमेकांपासुन दुर होतो. पण जास्त वेळ  दुर नाही राहु शकत. ही समज - गैरसमजाची दरी बुझवून टाकायलाच हवी. खुप दिवसांच्या विरहानंतर आपण एकमेकांना भेटतो. एकमेकांच्या नजरते आरपार बघतो. पटकन जाणवतं की एकमेकांना खुप मिस्ड केलयं आपण, कारण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये आपलीच प्रतिबिंब दिसतात. अशावेळी काही बोलायचं नसतं. सगळे गैरसमज मिटलेले असतात. न बोलताच, कोणतंही एक्स्प्लेनेशन न देता. ते सारं काही नजरेतुन सेटल्ड होतं. खुपवेळ आपण एकमेकांना बघत उभे असतो. एकमेकांच्या स्पर्शाला तरसलेले असतो. तिच्या गालावरुन अलगद, हिमनदीसारखे संथ वाहणारे गोठलेले पाणी न राहवुन आपण पुसायला जातो आणि तिच्या गालांवरुन हात फिरवतो. आपल्या पापण्यांच्या कडाही ओल्या होतात पण शक्यतो पाणी कोसळत नाही. ती पटकन आपल्या हातावर हात ठेवते आणि विवश होउन तिला मिठीत घेतो. आता तिच्या अश्रुंचा बांध फुटतो आणि एका मोठ्या आत्मविश्वासाने ती रडु लागते.
"अ‍ॅम सॉरी, मी नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय, प्लीझ मला पुन्हा सोडुन नको जाउस!" तिच्या या शब्दानी आपण अधिकच व्याकुळ होतो आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतो.
" अ‍ॅम सॉरी टू! नाही जाणार पुन्हा तुला सोडुन कूठे! मी ही नाही जगु शकत गं तुझ्याशिवाय!" 
तो चंद्र विझेपर्यंत आणि ती शांत निजेपर्यंत आपण असेच एकमेकांच्या मिठीत पडुन राहतो! अनुभवलायं कधी हा विरहानंतरच्या मिलनाचा स्पर्श?

8 comments:

  1. भावस्पर्शी आहे पोस्ट. :)

    ReplyDelete
  2. आभार अनघा! भाव स्पर्शुन गेले !

    ReplyDelete
  3. स्पर्शातून फुलते भाषा प्रेमाची, स्पर्शातून मिटते दरी विरहाची, स्पर्श एक ममतेचा, स्पर्श एक प्रेमाचा, स्पर्श एक मैत्रीचा, ज्यांना भेटतो त्यांचे आयुष्याच रसपाणी, एकाकी जे आयुष्यात त्यांच्यासाठी हि एक कडवी विसंगती जन्मभराची खूप छान लिहिले आहेस, डोळ्यात पाणी आणलेस गाढवा :)
    साधना

    ReplyDelete
  4. धन्यवाद साधना!
    प्लीज डोळ्यात पाणी आणु नको रे, मी आधीच बदनाम आहे लोकांना रडवण्याच्या बाबतित!

    ReplyDelete
  5. हळवी आणि सुंदर पोस्ट आहे मित्रा.....

    ReplyDelete
  6. मस्तच..तुझे शब्द मला पार वेड लावून गेलेत...अप्रतिम निव्वळ अप्रतिम

    ReplyDelete
  7. वेडा झालोय यार! मी पार वेडा झालोय!
    धन्यवाद !

    ReplyDelete