Sunday, February 10, 2013

नावात काय आहे???? -----> ठेवलेलं नाव :)


"हाय शोना, काय करतेस?"
" काही नाही रे! काम, काम आणि काम सुरु आहे..."
"ओह्ह! कित्ती काम करते माझी छकुली. जेवलीस का वेळेवर?"
" नाही रे! जेवेन आता. तू जेवलास का?
"माझं जाउ दे ग राणी! मी जेवेन, पण तू ते काम बाजुला ठेव आणि जेउन घे बरं लवकर."
" हो! नक्की. आता जेवायलाच जाते."
"ह्म्म शहाणी माझी बबडी!"
"मग, किती वाजता निघणार ऑफिसमधून? संध्याकाळी भेटशील ना सोनुली!"
"हो! भेटुया. मी निघताना कॉल करते मग तू ये."
"ओके चिक्कू. पण नक्की भेट हां का, अ‍ॅम मिस्सिंग यू सो मच!
"ओके. मिस्सिंग यू टू चिक्कुड्या.. :)  ए, हॅल्लो! तुला एक विचारु का?"
"हो! विचार ना बब्बू, काय विचारायचयं??"
" When was the last time you called me with my real name?"
"What?"
"तू मला नेहमी, शोना, राणी, छकुली, चिक्कू, पेरु, बबडी, छबडी अशा नावाने हाक मारतोस. नाही! मला आवडत नाही असं नाही पण तुला माझं खरं नाव आठवतं तरी का?"
"म्हणजे काय? आणि तुला मी अशा नावानी हाक मारलेली आवडत नाही का?"
"तसं नाही अरे! पण तू मला माझं नाव घेउन हाक मारलीस की अजुन बरं वाटतं.."
'ओके. अगं लग्नानंतर मी तुला तुझ्या खर्‍या नावानेच हाक मारणार ना.घरात तर तुला बबडी, छ्बडी, चिक्कू, पेरु असं नाही ना हाक मारणार. मग लग्नानंतर तूच म्हणशील हल्ली ना तुझं प्रेमच नाही राहीलं माझ्यावर.लग्नाआधी कसा मला नेहमी राणी, शोना, छकुली, बाहुली म्हणायचा..."
" हे हे हे :)"
"हे हे हे ! चला आता जेउन घ्या वेळेवर. संध्याकाळी भेटुया. बाय, बाय शोनुली!
" तू सुधरणार नाहीस ! :) बाय. बाय. शोनुल्या..."

हा संवाद काल्पनिक आहे. नसला तरी काही फरक नाही पडत ;)  पण या संवादावरुन मी आठवू लागलो की खरंच मी नेहमी कुणाला ना कुणाला त्याच्या खर्‍या नावावरुन हाक मारतच नाही. वरील सांवादात नवीन असे काही नाही पण मला पटकन जाणवलं की माझे असे किती मित्र-मैत्रिणी, माझ्या आजुबाजूचे लोक, माझे नातेवाईक, यांची पण अशीच नाव असतिल का??? आणि एकेकाचं दुसरं नाव माझ्या मनःपटलावर उमटत गेलं आणि पुन्हा जुन्या आठवणीत हुंदडायला लागलो...
___________________________________________________________ 

आमच्या कोकणात ना सवयच आहे की कुणाचं नाव म्हणून कोण सरळ घेणारचं नाहीत. त्यात मालवण पट्ट्यात तर ही सवय नाही प्रथाच आहे. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या नावाचं एक दुसरंच नाव असतं. आणि ते नाव एखाद्या व्यक्तिला चिडवण्याकरता किंवा आपल्या उच्चारांच्या सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स बनवले जातात. 


सुरुवात माझ्या घरापासुनच. माझं सगळं बालपण गावीच गेलं. आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या कोकणात तर फक्त चिडवण्यासाठी म्हणूनच एकमेकांच्या नावाची वाट लावली जाते. पण त्या चिडवण्यात सुद्धा एक मायेचा ओलावा असतो. अगदी शहाळ्यातल्या मलईसारखा..
माझ्या आज्जीचं खरं नाव तारामती असलं तरी प्रेमाने सगळी तिला 'आवशी' अशीच हाक मारतात. गावातले जुने लोक तिला तिच्या स्थूलपणामुळे "जाडुली" अशी हाक मारतात. माझ्या आईचं माहेरचं नाव रजनी. पण सगळे तिला 'रज्जू', 'रज्ज्या', आणि भावंडात ती मोठी असल्याने तिला 'बायो' अशी हाक मारली जाते. माझ्या मामाने लहानपणी खेळता खेळता एकदा गोटी गिळली होती. खेळायच्या गोटीला आमच्याकडे 'गुट्टी' म्हणतात. म्हणून मग सगळे त्याला 'गुट्टी' म्हणुन चिडवायचे. मग तो सगळ्यांवर भडकायचा. आता ते आठवून मला सिंघम मधला ''ए गोट्या!" वाला सीन आठवतोय. त्यावेळी, वाड्यातली जी जुनी, जाणकार, आजोबा मंडळी होती त्यांचीही नावं अशीच होती.
तुकारामला हाक मारताना, "ए तुकल्या!"
लाडू नावाच्या व्यक्तिला हाक मारताना."ए लाडक्या!" 
सहदेवला, "ए सादल्या!"
काळूला, "ए काळग्या!"
अर्जुनला,"ए अर्ज्या!"
श्रीधरला, "ए शिरग्या!"
त्याचप्रमाणे साबाजीला "साबल्या", भदूला " भदग्या", फटूला " फडग्या" अशी नावांची प्रेममय वाट लावली जायची... 


आम्ही लहानगे पण यात कमी नव्हतो. मला लहानपणापासुनच सगळे "दिपू" म्हणून हाक मारायचे, पण जर मी कुणाची कळ काढली, कुणाला काही चिडवलं की त्याबदल्यात माझ्या नावाची "दिपड्या-फिपड्या", 'ढिपाळ' (म्हणजे मातीचं ढेकळ.) अशी वाट लावली जायची. अर्थात मी सुद्धा दुसर्‍यांच्या नावाची वाट लावण्यात किंवा त्यांना नवीन नावं देण्यात मागे नव्हतो.
आमच्या पोरांमध्ये असलेल्यांपैकी, ज्ञानेश्वरला "ज्ञानी" आणि जर त्याने कळ काढली तर त्याच्या तिर्थरुपांच्या नावावरुन "डमरु" चिडवण्यात येई. त्याच्या वडीलांचे नाव 'शंकर' होते.
दुसरा सतिश. हा आमच्यात जाडजुड होता.याला नेहमी 'सतल्या' अशी हाक मारली जायची आणि जर का कळीला आला तर त्याच्या वडलांच्या पोटाच्या घेरावरुन त्याला "पोटल्या", "पोटली बाबा की" असं चिडवलं जायचं.
किरणला "किरण्या" आणि त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळे "बटर" किंवा "शंभरचे गुलुप" ( १०० W चा बल्ब.)
प्रविणचा शॉर्टफॉर्म 'पम्या' असा होता पण तो 'पम्या' वरुन 'कोम्या' आणि कोम्यावरुन "कोंब्या" झाला. (कोंबा - कोंबडा )
पांडुरंगला पांडग्या,
रामदासला मात्र डाबू का चिडवाचे हे मला अजुन माहीत नाही पण त्याला डाबू म्हटलं की तो मारायलाच धावायचा.
समीरला "बच्ची" ( हा तोच "माझ्या शाळे"तला समीर ज्याचे दात पडले होते.)
संतोष ला त्याच्या तिरक्या डोळ्यांमुळे "तिरश्या".
सुनिलला सुनल्या. याच्या लहान भावाशी माझं कधीच पटायचं नाही. अतिशय गलिच्छ मुलगा! नेहमी तोंडात शिव्या असायच्या आणि म्हणूनच की याचे गाल, गालगुंडांमूळे नेहमी फुगलेले असायचे.
एकदा माझ्या कळीला आला आणि मी त्याला त्याच्या गालगुंडानी सुजलेल्या गालांकडे बघून "पाववाला" म्हणुन नाव ठेवलं. साल्याने मला घाल घाल शिव्या घातल्या पण त्यानंतर सगळे त्याला "पाववाला" म्हणूनच चिडवायचे. 
प्रशांतचे केस लहानपणापासुनच पांढरे होते. साहजिकच त्याला "ए म्हातार्‍या" असं म्हणायचे. 
तर अशी ही आमची टीम होती. आम्ही सगळे एकत्रच देवळात जमायचो, खेळायचो, मारामार्‍या करायचो, एकमेकांना चिडवायचो पण त्या सगळ्या दुसर्‍या नावांत एक वेगळीच दुनिया होती. लहानपणी एकमेकांची कळ काढल्यामुळे चिडवायचो पण आता असं एकमेकांना हाक मारली की अचानक ते जुने दिवस डोळ्यांसमोरुन तरळून जातात..

शाळेत जायला लागलो आणि मग अजुन नवे मित्र भेटत गेले. त्यांची नावे आणि त्यांना ठेवलेली नावे वाढत गेली.
नयन  - नयन्या, बाबलो
वासुदेव - वासू
अमोल - अमल्या, म्हातार्‍या,
शांताराम - आबा, शंतुल्या, ( हा गावच्या पोलीस पाटलाचा मुलगा. श्रीमंतीत वाढलेला. गोरा गोरापान नुसता. क्रिकेट खेळताना बॉलच्या मागे धावताना हळूहळू धावायचा. रन्स घेतानापणब जिथे सहज दोन मिळतिल तिथे एकच रन घ्यायचा. त्यामुळे वैतागुन् मी त्याला म्हणायचो, " आबा मेल्या तुझी पावलां काय "सितेची पावलां" आसत? मेल्या जोरात धाव मरे! ( सितेची पावलां - सितेची नाजुक पाउले.)
बाबाजी - लांबनाक्या, याचे नाक लांब होते पण आमच्या सामंत बाई नेहमी म्हणायच्या "मेल्या बाबाजी तुझा नाक काय सुंदर चाफेकळी सारखा आसा! जरा शिरा मार त्याच्यावर!"
योगेश - आजो
गुरुनाथ - गुरग्या
प्रशांत - विठोबा. ( काळा रंग )
राकेश - राकस
अशी मित्रांची दुसरी नावं होती. या नावांत एक मज्जा होती. त्यावेळी फक्त चिडवाचिडवीच होती. कुरघोड्या होत्या. पण यामध्ये एक आपुलकी होती जी आता जाणवतेय.
शाळा संपली आणि मुंबईला आलो. इथेही ज्या चाळीत राहायचो तिथे मोस्ट ऑफ कोकणातलेच होते त्यामुळे इथे ही काही नविन नावं ऐकायला मिळाली. ज्यांच्याकडे राहायला होतो ते माझ्या आईचे काका होते. त्यांचा मुलगा माझा मामा लागायचा पण वयात जास्त फरक नसल्याने मी त्याला त्याच्या प्रचलित नावाने "बन्या" म्हणून हाक मारायचो. त्याची आई त्याला लाडाने 'बाबू" आणि रागाने "भाड्या, भडव्या" म्हणायची. मग चाळीतली पोरं त्याला "ए भाड्या बाबू!" अशी हाक मारायचे. इथे मला एक नवीन मित्र मिळाला. याचं नाव अमर. हा गोविंदाच जबरद्स्त फॅन. त्याच्यामुळे मला पण गोविंदाच्या सिनेमाचा नाद लागला.( गोविंदावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार मी हां का. ) त्याला सगळे जण "भाई" म्हणायचे. मी अमरवरुन, अंबर केलं. अंबर वरुन अंबरनाथ केलं. 
मोकळ्या वेळेत तो, मी आणि पप्या म्हणुन एकजण होता. आम्ही तिघे व्हरांड्यात बसुन सगळ्यांची खेचाखेची करायचो. चाळीतल्या एका खोलीत १०-१२ भैय्या राहत होते. त्यातल्या एकाच नाव होतं 'मिठाईलाल.' त्यावेळी 'लगान' चे प्रोमोज टी.व्ही. वर लागायचे त्यात ते गाणं आहे," ओ मितवा, ओ मितवा तुझ को क्या डर हैं रे!" हे गाणं मी आणि भाई नेहमी गुणगुणायचो. एकदा आम्ही बाहेर बसलो होतो आणि काही केल्या ते गाणं आम्हाला आठवेना. अगदी ओठांवर होतं पण शब्दच आठवत नव्हते. आणि का आठवत नाही म्हणून आम्ही दोघे डेस्परेट झालो होतो. ते गाणं आठ्वायचा प्रयत्न करत होतो. 
इतक्यात कुणी तरी ओरडलं, "का हो मिठवा, का करी?"
बस्स्स! मिठवावरुन आम्हाला लगेच आठवलं, "अरे, ते ओ मितवा होतं." आणि आम्ही पोट धरुन हसायला लागलो.
मग नेहमी मिठाईलाल समोर आला की आम्हाला ते गाणं आठ्वायचं आणि आम्ही गायचो," ओ मिठवा, ओ मिठवा तुझ को क्या डर हैं रे !!! "
चाळीतल्या पोरांची नावं बंट्या, पप्या, बबल्या, मामा अशीच होती.  

बालपणी माझी शाळा पहिली, दुसरी आणि चवथी मुंबईत, घाटकोपरला झाली होती. त्यामुळे तिथे असताना काही मित्र जमले होते. दहावी संपवून मुंबईला आलो तेव्हा कधी कधी घाटकोपरला राहायला जायचो. आता घाटकोपरच्या मित्रांची नावं ही बदलली होती.
घाटकोपरला राहायचो तो एरिया 'जागृतिनगर" होता. ही एक झोपडपट्टीच होती पण सगळ्यांची घरं पक्की होती. अगदीच झोपड्या नव्हत्या.
आमच्या घरातल्यामध्ये माझा जो काका लागायचा त्याचं नाव होतं "बाबुराव"; पण हा अतिशय काळा होता म्हणून त्याला सगळे "ए लिक्या" अशी हाक मारयचे. त्यात क्रिकेट तर मस्तच खेळायचा. घाटकोपरच्या त्या एरियात क्रिकेटच्या मॅचेस असल्या की याचा नंबर पहिला असायचा आणि त्याच्या तूफान बॅटींगमुळे आणि काळ्या रंगामुळे काही काळ तो "लारा" म्हणून प्रसिद्ध होता.
माझा लहानपणी शाळेतला मित्र दिनेश आता 'दिन्याभाय' आणि 'च्याय' म्हणून प्रसिद्ध झाला होता.
याच्या छोट्या भावाने डॉक्टर डॉक्टर खेळताना कुणाला तरी खरे खुरे इंजेक्शन टोचले होते तेव्हा पासुन तो 'डॉक्टर' झाला होता.
माझा आतेभाउ सचिनला सगळेजण "बुआ" म्हणायचे. का ते माहीत नाही.
एकाचं नाव "वजडी" होतं. :D 
एक मुलगा, त्याचे मधले दात पडले होते म्हणुन त्याला सगळे "दाता" म्हणायचे.
एका मुलीला सगळेजण "ढेकूण" ही म्हणायचे,
मच्छींद्रला "मच्छ्या"
त्याचबरोबर भुलेस्वर, मदारी, बाप्पल, काळ्या, चिक्या, गोट्या अशी कितीतरी दुसरं नावं असलेले मित्र होते. आणि मला त्यांची खरी नावं ही आठवत नाहीत. त्यांना कधी त्यांच्या ख-या नावाने हाक मारलीच नाही.  

कॉलेजमध्ये असताना, आमच्या क्लासमधला एक मुलगा नेहमी कंप्युटर लॅबमध्ये चिकटलेला असायचा. त्याला सगळे "व्हायरस" / "किडा" म्हणायचे.
भरत पालशेतकर ला सगळे भरत पांडे म्हणायचे मी ही त्याला पांडे म्हणून हाक मारायचो. तो एकदा मला बोलला अरे माझं नाव पांडे नाही रे पालशेतकर आहे. 
एकाचं नाव होतं अजगर! तो वर्गात आला की सगळे जण "फुस्स्स! फुस्स्स! फुस्स!" असा फुत्कार सोडायचे. वर्गात प्रोफेसर असले तरीही.
गिरी ला 'चिरीमीरी' म्हणायचे आणि सगळ्यात वाट माझ्या नावाची लावली होती. मला सगळे दीपक - चिपक म्हणायचे.
आणि वर्गात चिडवण्याचा एक प्रकार होता.एकाने सुरु केलं की एकामागे एक सगळे बोलायचे. जसं चिपक... चिपक... चिपक... चिपक  असं वर्गात घुमायचं. आणि प्रोफेसर शिकवताना चीप वैगरे असा शब्द आला की त्या शब्दाला धरुन चीप्...चीपक ... चपक करायचे. मेल्याहुन मेल्यासारखं व्हायचं. पण नंतर काही वाटायचं नाही. फक्त टीपी आणि मज्जा. 
:D 

जॉबला लागल्यावर अजुन नवीन मित्र आणि त्यांची नवीन नावं. 

तेजसला आम्ही म्हणजे मी, प्रियांका आणि शितल 'बगळ्या' म्हणून हाक मारायचो. शितलच्या घरी पाळलेले कुत्रे होते. आणि स्विटी नावाची जी कुत्री होती तिच्यावर हिचा खूप जीव होता. शितलला कधी कॉल केला आणि जर ती घरी असली तर मागुन कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा. मग तिला आम्ही "भॉ भॉ!" नाव ठेवलं. 

हरप्रीत चंडोक नावाची एक पंजाबन आमची मॅनेजर होती. तिला आम्ही सगळे हरप्रीत बिनडोक म्हणायचो. :D 
बिचारीला काही कळायचं नाही. 

व्हीएसएनएल मध्ये असताना. मी, तेजस, अभिजीत, चंद्राहास, बालाजी, धोंडे, असे सगळे एकाच टीममध्ये होतो. आणि आमच्यात एक ४०-५० तला गृहस्थ होता. त्याची सगळेजण म्हाताऱ्या म्हणून टींगल उडवायचे.
अरे यार ! राम वैद्य हे एक अफलातून कॅरॅक्टर होते. मी जेव्हा Iqiara Telecom मध्ये होतो तेव्हा ओळख झाली. याला सिगरेट्चा खूप नाद होता. दर १५-२० मि. याला सिगरेट लागायची. त्याच्या तब्येतिकडे बघून वाटायचे की हा असाच सिगरेटचा धूर बनून स्वाहा होईल.
मी व्हीएसएनएल मध्ये त्याला घेउन आलो. याला एक वाईट सवय होती आपलं ते पुढे पुढे करायची. एक तर चष्मिस, त्यात एक डोळा थोडा तिरकस होता. डो़क्यावर थोडे बहूत केस होते. शरीर फक्त हाडांचा सापळा आणि हे सगळं असूनही नुसता फूकत राहायचा. एकदा आमच्या एका मॅनेजर ने त्याला सिगरेट फुकताना पाहिलं आणि तो म्हणाला," साले राम! सिगरेट तो ऐसे फूंक रहा हैं जैसे सिगार पी रहा हो!  स्टायल मारना बंद कर ! साले डाकू माणसिंग!" आणि बस्स तेव्हापासुन तो आमच्यासाठी 'डाकू माणसिंग' झाला.

Net4 India मध्ये असताना मी, समीर खान आणि तेजस अशी आमची गट्टी जमली होती. सगळ्यांची मस्करी उडवणे हा आमचा नेहमीचा उद्योग होता. आमच्या ऑफिसमध्ये देवजी नावाचा प्युन होता. तो नेहमी अस्पष्ट आणि अर्धचं बोलायचा. काय बोलायचा ते धड कळायचंच नाही. तेजस सांगायचा "अबे देवजी के अ‍ॅक्सेंटसे तो लगता है की ये अरेबिक बोल रहा हैं." 
त्यात एकदा एक नवीन मुलगी आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली. तिचं आड नाव होतं चांगे. हिचं नुकतंच लग्न झालं होतं. अगदी केबीसी टाईप होती. ( केबीसी - कमळा, बकुळा, चंपा. इती. पियू मॅडम ) तर ही जेव्हा जॉईन झाली तेव्हा नेहमीप्रमाणे एच.आर.कडुन सगळ्या एम्प्लॉइजना मेल गेलं. संध्याकाळी फावल्या वेळात समीर माझ्या डेस्कवर आला आणि मला विचारु लागला, "अबे यार ये चेंज कौन हैं?"  
मला काही कळलं नाही मी म्हटलं, " कौन चेंज?"
"अबे वो ही! कोई नयी जॉईन हु ई हैं ना 
शिला चेंज!"
"चेंज??? मी परत  ते मेल ओपन केलं आणि वाचु लागलो. आणि वाचता वाचता फुटलोच.
"अबे वो चेंज नही हैं वो चांगे हैं!
 
नंतर तिला आम्ही चेंज अशीच हाक मारायचो. चिडवायला तिला नेहमी विचारायचो, " अगं तुझ्याकडे १०० चे चेंज आहे का?" :D
चंगेजखान, चेंगराचेंगरी, चेक रिपब्लिक, चांगभलं अश्या कित्येक नावांनी तिला चिडवायचो.
 

अशी अजुन कित्ती तरी अनेक नावं, खर्‍या नावांपेक्षा वेगळी. कधी चिडवण्यासाठी, कधी सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स तर कधी असंच प्रेम म्हणून..
माझी एक मैत्रीण मला पहिल्यांदा दिपू म्हणून हाक मारायची. तिला नंतर कळलं की मला सगळेच जण दिपू म्हणतात मग तिने 'दीप' म्हणायला सुरुवात केली. परत तिला कळलं की अजुन कुणीतरी मला दीप म्हणतं मग तिने एक वेगळचं नाव शोधून काढलं आणि माझं पुन्हा बारसं करुन त्या नावाने हाक मारते. 
मी विचारलं तू असं का करते?  तर बोलली तुला ज्या नावाने सगळे हाक मारतात त्या नावाने मी हाक मारणार नाही. "यू आर डीफरन्ट फॉर मी!" 
उगाच मला जरा भाव चढला. असो.  :) 
तर या नावांची ना एक वेगळीच गम्मत असते आपल्या आयुष्यात! खर्‍या नावापेक्षा या दुसर्‍या नावांच एक वलय सतत त्या व्यक्तीभोवती असतं. ते दुसरं नाव त्या व्यक्तिचं एकंदर कॅरॅक्टर डीफाईन करतं असं मला वाटतं. आणि मला अजुनही सवय आहे की माझ्या मित्र-मैत्रीणींना मी काही तरी एखादं वेगळं नाव ठेवतोच आणि हक्काने त्यांना तशी हाक मारतो. इंजिनिअरींगला माझ्यासोबत असलेला एक मित्र नंतर पोलीस खात्यात नोकरीला लागला. त्याला मी 'हवालदार' अशी हाक मारतो. फोनच्या डीरेक्टरीमध्ये ही त्याचं; त्याचंच असं नाही बहुतेक टोपण नावंच सेव्ह असतात.
सपा, साबा, योमु, सेनापती,सुझे, स्नेल अशी नावं माझ्या सेल फोनमध्ये दिसतील. :)

शेक्सपीयर ने म्हटलयं, "नावात काय आहे?"
खरंच नावात काही नाही. जे काही आहे ते सगळं या दुसर्‍या ठेवलेल्या नावात आहे. तेव्हा बघा आठवून तुमच्या भोवती, आजुबाजुला अशा वेगळ्या, विचित्र नावांची यादी सापडते का ते ...
आणि ती यादी सापडली की हळुहळू त्या एका एका नावाच्या आठ्वणी कशा मनात फेर धरुन नाचू लागतात त्या.. :) :) :) 


- दीप्स  

Sunday, February 3, 2013

बालक पालक


बालक पालक
शेवटी काल एकदाचा हा सिनेमा पाहिला. प्रदर्शनाच्या अगोदरपासुनच या सिनेमाची उत्सुकता होती. टी.व्ही., फेसबुक, ट्विटरवर येणार्‍या प्रोमोझ यावरुन तर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. त्यात रवी जाधवचं डिरेक्शन होते त्यामुळे काही तरी वेगळंच असणार यात शंकाच नव्हती. सिनेमाचे रिव्ह्युज पण बेस्ट येत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याबद्दल सगळीकडेच बोलु जाउ लागलं. सगळीकडे हाउसफुल्लचे बोर्ड लटकू लागले.घराघरातं, लहान - मोठ्यांच्या तोंडात बीपी, बीपी ऐकू येउ लागलं. भारतमाता या सिनेमागृहात तर तिकिटांवरुन एकाचा नाहक बळी ही गेला. तर  असा हा बीपी शेवटी पाहिलाच. पण जेव्हा सामान्य प्रेक्षकही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की गडबड आहे असं मला वाटु लागतं.

चित्रपटगृह तर हाउसफुल्ल होते. सिनेमा सुरु होतो. एक बाप आपल्या ११-१२ वर्षाच्या मुलाला  तो अभ्यास करत नाही आपल्या रुममध्येच बसुन काही तरी करत असतो म्हणून बडवत असतो. त्याला मारता मारता, ओरडता ओरडता त्याला त्या मुलाकडे असलेल्या पॉर्न डिव्हीडीज सापडतात आणि तो स्तब्धच होतो. त्याला कळतच नाही की काय बोलावं ते. तो वैतागतो आणि मुलाला अजुनच मारायला सुरुवात करतो. हा सीन नोट करुन ठेवा.  
मग तो फ्रस्टट्रेट होउन रुममधून बाहेर येतो. त्याची बायको रुमच्या बाहेरच असते. मुलाला असं मारणं तिला अजिबात आवडलेलं नसतं. ती त्याबद्दल त्याला विचारते तेव्हा तो बायकोला त्या डीव्हीडीज दाखवतो आणि आपल्या मुलाच्या पराक्रमाबद्दल सांगतो. तिला पहिल्यांदा विश्वासच बसत नाही. तो खूप वैतागलेला असतो. हे सगळं इतक्या लहान वयात या मुलांना कुठुन मिळतं? यांच्या शाळेतच चौकशी केली पाहिजे.... 

शाळा! शाळा म्हटल्यावर तिला सगळं आठवू लागतं आणि कॅमेरा हळुहळू तिच्या भूतकाळात घेउन जातो आणि आपल्याला ओळख होते चार मुलांची डॉली, अव्या, भाग्या, आणि चिउ.... 

त्यातली डॉली आपल्याला सगळं सांगू लागते. आणि आपण ते ऐकू लागतो. चार मित्र, एकाच चाळीत राहणारे, एकाच वर्गात शिकणारे, एकत्र खेळणारे, एकत्र अभ्यास करणारे. प्रत्येक समस्येचं आपल्या पद्धतीने उत्तर शोधणारे.. एकदा चाळीत काहीतरी होतं आणि त्यांच्या चाळीत राहणार्‍या त्यांच्या ज्योती ताईने शेण खाल्ल्याची वार्ता त्यांच्या कानावर पडते. आता तिने शेण खाल्लं म्हणजे नक्की काय केलं हे यांना कळत नाही. आणि शेण खाल्ल्यामुळे तिला चाळ का सोडावी लागली ते ही कळत नाही. मग ते सगळे शेण खाणं म्हणजे नक्की काय याचं उत्तर शोधु लागतात. पहिल्यांदा शब्दकोशात सापडत नाही म्हणून मग आई वडीलांना विचारतात,पण आईवडील उत्तरादाखल यांच्या कानाखाली जाळ काढतात. मग त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक नवीन मित्र त्यांना सापडतो. विशू! किंवा विश्या! हा खूप पोचलेला असतो. शेण खाणं म्हणजे नक्की काय हे त्याला चांगलचं माहिती असतं. मग तो या चौघांना शेण खाण्याच्या थेअरीजची पुस्तकं वाचायला देतो. म्हणजे अ‍ॅडल्ट्स कंटेन्ट असलेली पुस्तकं वाचायला देतो. पुस्तकं वाचुन झालयावर प्रॅक्टीकल्स म्हणजे हे पुस्तकातलं नक्की कसं घडतं हे पाहायचं किंवा ते आवाज ऐकायचे म्हणून रात्री चाळीत सगळे झोपल्यावर ते झाकणी मारतात. पण हा प्रयोग सफल होत नाही. शेवटी विश्या त्यांना त्यावेळी असलेल्या व्हीसीआरचा पर्याय सुचवतो आणि मग ते व्हीसीआर आणुन अव्याच्या घरात पॉर्न मुव्ही बघतात. पुस्तकातलं सगळं काही त्यांच्या समोर घडत असतं. तीन मुलगे आणि दोन मुली. पचायला थोडं जड जातं पण ते सिनेमात अ‍ॅक्सेप्ट करुया कारण त्यांची मैत्री तशी असते आणि सेक्स म्हणजे नक्की काय यातलं त्यांना काहीच माहीत नसतं. जिज्ञासेपोटी ते हे सगळं करतात. जिज्ञासा पुर्ण होते. पण आता एक वेगळाच बदल झालेला असतो. त्यांची नजर बदललेली असते. त्यात डॉलीला हे सगळं पटत नसतं. आपण हे सगळं फक्त शेण खाणं म्हणजे नक्की काय हे जाणुन घेण्यासाठी केलं होतं आणि आपल्याला आता हे कळलेलं आहे त्यामुळे पुन्हा हे नको असं तिचं मत असतं. पण अव्या, भाग्या यांना ते सगळं पुन्हा हवं असतं. चिउची सुद्धा हरकत नसते. त्यामुळे डॉली वैतागून निघून जाते. पुढे अव्या, भाग्या आणि विशू यांचे हे उद्योग सुरुच असतात. त्यात अव्याला चिउबद्दल जवळीक वाटु लागते आणि भाग्याला तिच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या नेहा ताईबद्दल ( सई ताम्हणकर ). यात ही जवळीक हे प्रेम नसुन फक्त शारिरीक आकर्षण आहे हे रवी जाधवांनी त्यांच्या कुशल डिरेक्शनमधून दाखवून दिलयं. आता भाग्यासाठी ती नेहा ताई नसते. तसंच येणार्‍या जाणार्‍या मुलींकडे बघण्याची त्यांची नजरही बदललेली असते. चिउला कळतं की अव्या फक्त तिच्यावर चान्स मारायचा प्रयत्न करतोय मग ती ही त्याच्यापासुन दूर होते. भाग्या एकदा सगळं बळ एकटवून नेहा ला जाउन "आय लव्ह यू" म्हणतो. या सगळ्यामुळे एक विचित्र प्रसंग निर्माण होतो. नेहा चाळीत राहणार्‍या काकांना ( किशोर कदम ) हे सगळं सांगते. काका हे सगळं त्या मुलांच्या पालकांकडे बोलायचा प्रयत्न करतात पण पालकांची मनस्थिती हे सगळं अ‍ॅक्सेप्ट करण्याची नसते. ते मुलांना समजाउन सांगणारे नसतात. हे सगळं करण्याचं मुलांचं वयच नाही आणि जर त्यांनी असं काही केलं तर त्यांना फोडुन काढु अशी त्यांची धारणा असते. मग काका आपल्या परीने मुलांना समजावयचा प्रयत्न करतात.यात नेहा ही मदत करते. मुलं काकाना प्रामाणिकपणे सांगतात की आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही हे सगळं केलं. काका त्यांना सांगतात की जर कळत नसेल तर आपल्या आई वडीलांशी बोला. त्यांना विचारा. तेच तुमचे खरे मित्र आहेत. मुलांना आपली चूक कळते आणि ते आईवडीलांशी बोलायचा प्रयत्न करतात. पण जमत नाही. फेस टु फेस बोलायची हिम्म्तच नसते. मग शेवटी ते फोनचा वापर करतात. आणि आई वडीलांना फोन करुन हे सगळं विचारतात असं काहीस दाखवून डॉलीची गोष्ट संपते. कॅमेरा परत त्या घरात येतो. तो ज्याने आपल्या मुलाला मारलेलं असतं तो हा डॉलीच्या गोष्टीतला अव्या असतो आणि ती डॉली असते. हे उलगडलं आणि सिनेमा निदान माझ्यासाठी तरी घसरलाच. इतका वेळ जे काही आपण डॉलीच्या गोष्टीत बघत होतो, ऐकत होतो ते सगळं शेवटी घसरतं. या लेखाच्या सुरुवातीला मी जिथे लिहिलयं की "हा सीन नोट करुन ठेवा." कारण या सीनचा शेवट इथे होतो आणि चित्रपटाचाही. अव्या आपल्या मुलाकडे पॉर्न डीव्हीडीज सापडले म्हणून वैतागलेला असतो, फ्रस्ट्रेट असतो. पण या पॉर्नमुळे त्याच्या ही बालपणात त्याने काय केले होते. त्यांना कसल्या कसल्या प्रसंगाना सामोरे जावे लागले होते हे तो सपशेल विसरतो आणि आपल्या मुलावर जाळ काढतो. इथेच सिनेमा सपशेल आपटतो. आपण लहानपनी शेण खाणं या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी काय काय केलं होतं आणि त्यामुळे आपले प्रश्न कसे सुटत गेले किंवा आपण ते सोडवण्यासाठी काय काय केलं हे सगळं तो कसं काय विसरतो?? मग दिग्दर्शकाला नक्की काय संगायचयं या सिनेमातुन तेच कळत नाही. कसलंही प्रबोधन हा सिनेमा करत नाही. फक्त आपण काही झालं तरी लैंगिक शिक्षण किंवा सेक्स बद्दल आपली मानसिकता बदलू शकत नाही हेच अधिक स्पष्ट करतो. 

डिरेक्शन उत्तमच आहे यात वादच नाही. प्रत्येक प्रसंग अगदी उत्तम प्रकारे चित्रीत केला गेलाय. संवाद पण अफलातुन आहेत. मग या चित्रपटाच्या यशाचं गुपित कळतं. का हा चित्रपट इतका तूफान चालतोय ते कळतं. खरं तर आजपर्यंत बीपी हा शब्द चारचौघात उच्चारायचा म्हणजे पाप होतं. बीपी - ब्ल्यू फिल्म्स किंवा आमच्या भाषेत भक्त प्रल्हाद किंवा निला अशी सांकेतिक नावं प्रचलित होती आणि ती फक्त मुलांमध्येच सर्रास वापरली जायची. पण या सिनेमाने बीपी हे नाव घराघरात पोचवलं.लहानांपसुन मोठ्यांपर्यंत बीपी, बीपी ओरडू लागले. हे जरी योग्य झालं तरी हवं ते प्रबोधन या सिनेमातुन झालं नाही. किंबहुना ते होतच नाही. 

काय असतं ना आपल्याकडे जर सेक्स या विषयावर कुठे काही पब्लिकली बोललं गेलं किंवा लिंग, योनी, स्तन, उरोज,बूब्ज, पुस्सी, डीक  असे शब्द उच्चारात आले की सगळ्यांना त्यात इंटरेस्ट वाटु लागतो. मग जो तो आपलं ज्ञान पाजळू लागतो. या सिनेमातले संवाद हे ही असेच जवळीक साधणारे आहेत. जसं की "आपला हात जगन्नाथ." वैगरे संवाद हे मुलांचे किंवा पुरुषांचे एकमेकांशी अशा विषयांवर बोलतानाचे वाक्प्रचार आहेत. ते पब्लिकली सगळ्यांसमोर आल्यामुळे त्यातली भीती चेपली गेली. तशात या सिनेमांत दाखवल्याप्रमाणे दोन मुलीसुद्धा या मुलांसोबत या ब्ल्यू फिल्म्स बघत असतात. त्यामुळे कदाचित थोडासा वेगळा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. कारण लैंगिक शिक्षण हे फक्त मुलांसाठीच नाही आहे हे त्याला स्पष्ट करायचयं. प्रेक्षक बाहेर पडताना चित्रपटाला दाद देत बाहेर पडतो पण चित्रपटाचा नकी गाभा काय होता हे मला तरी कळलं नाही. प्रत्येक सीनला टाळ्या, शिट्ट्या पडतात, कारण ते प्रसंग तसे खरोखर चित्रीत केले गेले आहेत. त्यांचं पुस्तकं चोरुन वाचणं. ब्ल्यू फिल्मस बघता बघता भाग्या आणि अव्याचं हळूच उशी मांडीवर घेणं. नेहाला सायकल चालवताना बघत असताना भाग्याला तिच्या स्तनांचं अस्पष्ट दर्शन घडतं आणि तो सायकलवरुन पडतो. हा प्रसंग सिनेमा बघणार्‍या प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात घडलेला असतो आणि म्हणून टाळ्या पडतात.. सिनेमा फक्त निखळ मनोरंजन करतो. आणि कदाचित दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला हेच हवं असेल. सिनेमाने समाजात लैंगिक शिक्षणाचं प्रबोधन केलंच पाहिजे हा हट्ट बिलकुल नाहीय. पण जे लोक हा सिनेमा प्रबोधन करतोय म्हणून ओरडत आहेत ते चूक आहे.

रवी जाधवने हाच धागा पकडलाय आणि प्रत्येक पुरुषाच्या आणि मुलीच्या आयुष्यात घडलेल्या या नाजुक प्रसंगांच वर्णन पडद्यावर दाखवलं. पण या सिनेमातुन अपेक्षित असणारं बालक आणि पालक यांचं या विषयाचं नातं, किंवा त्यांनी काय बोध घ्यावा, त्यांनी हे विषय कसे हाताळावे हे सांगत नाही. ते अर्ध्यावरच सोडुन देतो. शेवटी डॉली सांगते की आता या मुलांचं जग फार वेगळं आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी सीडीज, डीव्हीडीज, सेल फोन, इंटरनेट ही अनेक माध्यमं उपलब्ध आहेत पण पालकांनी आपणहुन या विषयात पुढाकार घेतला पाहिजे आणि हे विषय हाताळले पाहिजेत असं ठाम मत कुठेही दिसत नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा अव्या आपल्या मुलाला या विषयामुळे मारतो तेव्हाच माझ्यासाठी तरी हा सिनेमा फ्लॉप ठरतो.

कलाकारांच्या बाबती सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. अव्या, भाग्या, चिउ, डॉली यांनी खरोखरच उत्तम एक्सप्रेशन्स दिलेत. विशूचं कॅरॅक्टर पण जबरदस्त जमवून आणलयं. सई ताम्हणकरला सिनेमा क्षेत्रात नक्की काय करायचयं हे तिचं तिला कळलं म्हणजे झालं. असो. 

याच विषयावर हिंदीत "एक छोटीशी लव्ह स्टोरी" नावाचा सिनेमा आला होता. तो धड चालला नाही. "द रिडर" सारख्या सिनेमात एक कोवळ्या मुलाचे एका ३०-३५ वय असलेल्या बाईशी शारिरीक संबंधाचे चित्रिकरण होते. "मलेन" या सिनेमात हा विषय नाही म्हणणार पण एका वयात येणार्‍या मुलाच्या मनातून शारिरीक आकर्षणाचा ठाव दिग्दर्शकाने घेतला होता. 
बीपी या सिनेमाने काय दिलं? मी तर म्हणेन की सेक्स हा विषय चारचौघात चघळण्याची संधी. आपल्या किशोरवयातल्या त्या नुकत्याच उमलेल्या जाणिवा पडद्यावर कुटुंबासमवेत बघायची मोकळीक. पण या विषयावर आपल्या मुलांशी बोलण्याची हिम्मत, जबाबदारी, बिलकुल नाही. ती जबाबदारी दिग्दर्शक सेल फोन, इंटरनेट या माध्यमांवर सोपवून मोकळा होतो.

मी कुणी एखादा चित्रपट विश्लेषक नाही किंवा सिनेमातलं मला फार अगाध ज्ञान आहे असं ही नाही. पण हॉलीवूडमधले किंवा वर्ल्ड सिनेमामधले काही उत्त्म सिनेमे आणि टी.व्ही. सिरीज बघून माझा हिंदी आणि मराठी चित्रपटांविषयीचा दृष्टीकोन बदलला आहे. आणि म्हणून जेव्हा सामान्य प्रेक्षक ही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की गडबड आहे असं मला वाटु लागतं. 
 
बीपी बघितलाय??? मग पुन्हा बघा ही गडबड ध्यानात येते का ती......- दीपक परुळेकर