Saturday, December 31, 2011

असंच... काहीसं...

यावर्षातली ही शेवटची पोस्ट माझ्या आवडत्या जागी म्हणजेच सीसीडीमध्ये, माझी आवडती एसप्रेसो घेत  लिहितोय. माहित नाही पुर्ण करेन की नाही. हे लिहिण्याचं व्यसन सुरु ठेवलंच पाहिजे, कॉफीचं कमी केलं पाहिजे -;)

काही तरी लिहावं ही खूप दिवसापासूनची इच्छा.. बरेच दिवस ब्लॉगवर काहीच लिहिलं नाही., काही सुचतच नव्हतं. शब्द जसे दूर मला एकट्याला कुठेतरी सोडून गेल्यासारखे. परके झालेले. अनेकदा लिहायचा प्रयत्न केला,पण कधी अपूर्ण तर कधी खोडून टाकलं. हे नेहमी असंच होत राहीलं. पारिजात, नक्षत्र, कॉफी, पाउस, वारा, ढग, फुलपाखरं, हे माझे नेहमीचे शब्दही मला सोडून गेल्यासारखे, इतके दूर की एक ओळ ही सुचत नाही. माणसं सोडून गेल्याच्या दु:खापेक्षा माणसं तोडल्याचं शल्य नेहमी मनात रुतत गेलं. 
"दर्द का हद से गुजरना है , दवा हो जाना" हे गालिबचे शब्द अगदी माझ्या आत्म्यात भिनलेले. मग कधी कधी हा ही विचार मनात की; "तू ने भी तो तोडे है दिल अपनोंके, दर्द सिर्फ तेरा ही हमराज नहीं"

हे असं झालं ना की मन पिळवटून निघतं. चांगलं -वाईट, चूक - बरोबर, आयुष्यातले हे आलेख कधी व्यवस्थित बसतच नाहीत. हे सगळं एकदा व्यवस्थित केलं पाहिजे. हा सगळा अट्टाहास फक्त अस्तित्त्वाचा नाही तर अस्मितेचा आहे. पण स्व:ताची अस्मिता जपताना दुसर्‍याच्या अस्मितेला आणि अस्तित्त्वाला जराही धक्का लागता कामा नये याची खबरदारी मला घेतलीच पाहिजे.

जहाजे येतात जहाजे जातात
किनारा नेहमी स्तब्ध असतो
प्रत्येक भरकटलेल्या जहाजाला
आशेचा तो एक शब्द असतो...

कधीतरी या चार ओळी लिहिल्या होत्या, आणि आता त्या जाणवू लागल्या. मग मी जहाज की किनारा या संभ्रमात हेलकावे खात. पण मग जाणवू लागलं की हे दोन्ही रोल मला पार पाडायचेत. कधी स्तब्ध, शांत किनारा होउन भरकटलेल्या जहाजाला मला आश्रय द्यायचाय, तर कधी एखाद्या जहाजासारखं महासागरात हरवलेल्या दिशा शोधत भरकटायचयं. किनारा आणि जहाज यांचा निकटचा संबध. दोघेही एकमेकांना आसुसलेले. पण जहाजाच जन्मच मुळी महासागरात विहार करण्यासाठी झालेला, किनारा त्या जहाजाला थांबवू शकत नाही. हे किनार्‍याला समजायला हवं... मग काय ?काही नाही...

व्हावं कधी जहाज आणि धुंडाळाव्या नव्या दिशा.. तसंच
होउन कधी निश्चल किनारा द्यावी  जहाजास आशा....

माझ्या सर्व ब्लॉगवाचकांना आणि ब्लॉगर्स मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या खूप सार्‍या
शुभेच्छा....

आपलाच
दीपक, दीप्स, दिप्या .... :)