लहानपणापासुन म्हणजे पाचवी - सहावीपासुन असेल कदाचित मला एक स्वप्न नेहमी सतावते. त्या स्वप्नाने आजतागायत माझा पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी गेली एक दोन वर्षे मला ते स्वप्न पडले नव्हते. पण हल्ली ते स्वप्न बर्याचदा पडतं. महिन्यातुन एक दोनदा तरी पडतच पडत. मी लहान असताना हे स्वप्न एका रात्री मला पडलं होतं मी अक्षरशः ओरडतच उठलो होतो.
स्वप्नात एक तुडुंब, दुथडी भरुन वाहणारी नदी, आमच्या गावातलीच. कर्ली नदी.
नदीचं पात्र बरचं मोठं. भर पावसात मी त्या नदीच्या काठावर एकटाच उभा आहे. इतका लहान असुन मला मम्मीने सोडलं कसं त्या नदीपर्यंत? किंवा मी तिथे कसा पोचलो हे मला कळत नव्हतं. (या आधी मी या नदीतुन ३-४ वेळा होडीतुन प्रवास केला होता.त्यामुळे या नदीचं आकर्षण मला भारीच होतं) पण मी ते सारं विसरुन त्या दुथडीभरुन वाहणार्या नदीकडे डोळेभरुन पाहत होतो. त्या नदीच्या पैलतीरीही नजर पोचत नव्हती इतकं त्या नदीचं पात्र विशाल होतं नदीला पुर आला होता आणि भयंकर आला होता. नदीचा प्रचंड प्रवाह माझ्याच दिशेने झेपावत येत होता. मी घाबरुन परत जायला वळतो इतक्यात कुणीतरी माझा पाय धरतं आणि मला नदीत ओढतं.मी माझा पाय सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न करतो पण तो कुणीतरी घट्ट पकडुन ठेवलाय आणि मला त्या भरलेल्या नदीत ओढतयं. माझे सारे प्रयत्न फोल ठरतात आणि मी त्या भरलेल्या नदीच्या पात्रात खेचला जातो. गटांगळ्या खातो. नदीचं पाणी माझ्या नाकातोंडात जातं, माझा श्वास कोंडला जातो. मला पोहता येत नाही ( मला अजुनही पोहता येत नाही!:( कोकणात अख्खं बालपण काढुनही मला अजुनही पोहता येत नाही. असो.) पण काहीवेळाने मी शांत होतो. कदाचित मी मेलोय असं वाटतं.
पण थोड्यावेळाने मी पुन्हा वर येतो आणि खुप प्रयासाने काठावर पोचायचा प्रयत्न करतो. कसेबसे हात मारत, पोहण्याचा प्रयत्न करत मी काठावर पोचायचा प्रयत्न करतो. आता काठावर मला कुणाचा तरी हात दिसतो आणि माझा पाय ओढणारा तो पाण्यातला हात मला बाय बाय करतो आणि काठावरचा हात लवकर पोचण्याचा इशारा करतो. पण मी त्या काठावरच्या हातापर्यंत पोचतच नाही आणि पुन्हा मी मरतो की काय या विचाराने माझी झोप उडते. आणि मी खाडकन उठतो.
लहानपणी पडलेलं हे स्वप्न मला आजही सतावत राहतं. अगदी परवाच्या रात्रीच पडलं होतं.
वेल, त्या स्वप्नाचा अर्थ आता कुठे माझ्या लक्षात येतोय.
ते पाणी, ती दुथडी भरुन वाहणारी नदी म्हणजे माझं जीवन, आयुष्य असावं आणि माझा पाय ओढणारा तो हात म्हणजे काही प्रलोभने, भावना, मोह असावा. पण मी स्वत:हुन त्यात जात नाही कुणीतरी मला ओढतं. किंवा मी त्या नदीच्या रुपाने भारावुन जावून स्वःताच जातो की काय? ते कळत नाही. एकावेळी मी नदीत बुडल्यावर मरुन जातो असं वाटतं आणि काही क्षणात परत वर येतो. आता कळत की मी त्या नदीत अडकुन पडलोय आणि वेळीच बाहेर नाही पडलो तर बुडुन मरुन जाईन जीव वाचवायच्या प्रयत्नात मी हातपाय मारत वर येतो. काठावरचा हात मला त्याच्याकडे बोलावतोय आणि पाण्यातला हात मला बाय बाय करतो. त्या काठावरचा हात कुणाचा ते मला आता कळुन चुकलयं.
तो हात तिचाच. तिने अनेकवेळा मला असं वाचवलयं.जेव्हा जेव्हा मी असाच वाहत गेलोय, भावनांच्या पुरात भरकटत गेलो, आयुष्यातल्या काही बिकट परिस्थितीत तिने कसलिही पर्वा न करत मला वेळोवेळी मदत केलीय.प्रत्येकवेळी माझ्या भावनांना, माझ्या विचारांना तिने योग्य दिशा दिली. पण मी त्या स्वप्नात त्या काठावरच्या हातापर्यंत कधी पोचलोच नाही, तरीही त्या काठावरल्या हाताच्या अस्तित्त्वाने मला जगायची नेहमी उमेद मिळते आणि मी पुन्हा हातपाय मारत त्या काठावरल्या हातापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो!
लहानपणी स्वप्नात दिसणारा तो हात आज कुठे मला कळला आणि स्पष्ट दिसला आणि त्या स्वप्नाची भीती कायमची माझ्या मनातुन निघुन गेली !
मस्त लिहिलं आहेस..च्या मारी. ही चित्रं तुला कुठे सापडतात रे..?
ReplyDeleteप्रार्थना करते कि, तिचा हात तुझ्या हाती लवकर यावा.. नांदा सौख्यभरे..
ओय, नांदा सौख्यभरे !!???
ReplyDeleteतु तर डायरेक्ट लग्न लावायला निघालिस माझं! हे हे हे! तसं काही नाहीए!
मित्रा खूप छान मांडला आहेस ते स्वप्न आणि त्याचा अर्थ...
ReplyDeleteलवकरच तुझा हात त्या हाती जाईल.काळजी नसावी
शुभेच्छा !!!
धन्यवाद सुझे! पण असं काही नाही! ती माझी एक छानशी मैत्रीण आहे !!
ReplyDeleteअरे मी कुठे काय म्हणालो...मी आपल्या शुभेच्छा दिल्या तू पाण्यातून बाहेर यावस म्हणून बस :)
ReplyDeleteमी तुझ लग्न लावत नाही आहे कोणाशी...हा हा हा
अरे तुझ्या शुभेच्छा समजल्या रे ! मी त्या सारिकेला बोललो ती माझं लग्न लावतेय !! हे हे हे!
ReplyDeleteतुझ्याबरोबर मी पण पाहिलं तुझं स्वप्न! :) अर्थ छान काढलायस. पण तो किनाऱ्यावरचा हात असा कायम किनाऱ्यावरच रहावा असं वाटतंय...कारण तोच उमेद देत असतो ना? तुझ्या हातात येऊन गेला तर मग त्याचं महत्व कमी होईल कदाचित. :)
ReplyDeleteअनघा! खरं आहे तुझं!
ReplyDeleteप्रतिक्रियेसाठी धन्यवाद !
लकी रे तुम्ही अशी स्वप्न पडून ती लक्षात ठेऊन मग त्यातून अर्थापर्यंत पोहोचणारे....मला रोज स्वप्न पडतात आणि एखादा अपवाद वगळता त्यातली लक्षात पण राहत नाहीत....आणि कहर म्हणजे ट्रेनचा प्रवास सोडून आता सातेक वर्षे झाली तरी अजून अंधेरीचा मोठा ब्रिज उतरतानाचे धक्के स्वप्नातही तसेच...ही ही...
ReplyDeleteबाकी अनघाशी सहमत...
आणि कहर म्हणजे ट्रेनचा प्रवास सोडून आता सातेक वर्षे झाली तरी अजून अंधेरीचा मोठा ब्रिज उतरतानाचे धक्के स्वप्नातही तसेच..
ReplyDeleteअॅप्स ! खी खी खी :)
अंधेरीच्या ब्रीजवरचे धक्के मी रोज खातो रे ! माझं हापीस अंधेरीलाच आहे ! पण नशीब ते स्व्प्नात खात नाही!!!