Saturday, June 11, 2011

सख्ख्या मैत्रीणीचं पत्र

प्रिय दीपक.,
तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! -:)
आज पहिल्यांदाच तुला पत्र लिहितेय. तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडुन ही एक भेटच समज ना. तसं पण माझ्याकडे आहे काय द्यायला तुला?
वाटलं तुझा वाढदिवस आहे तर जरा वेगळ्या पद्धतिने तुला विश करुया, सही ना?

बरेच दिवस मनात ठरवलं होतं की तुझ्यशी बोलायचं पण तू आजकाल इतका व्यस्त असतोस की..मग म्हटलं जाउ दे तुला पत्रच लिहुया..
त्यात आपण गेले कित्येक दिवस मनमोकळेपणाने बोललोच नाही..म्हणजे फक्त तू बोलत असतोस, माझं काम फक्त ऐकणं...
आज तुझा वाढदिवस ! मग व्हेअर इज द पार्टी मॅन! आज काय प्लॅन आहे? काही असो तू नंतर सांगशीलच म्हणा..

आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, म्हणजे तुझ्याबद्दलच बोलायचं आहे. किती वर्षे झाली रे आपण एकमेकांना ओळखतोय? लक्ष्यात नाहीए आता.
आठवतं ज्यादिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो किती भराभरा बोलत होतास तू! सगळं काही एका दमात सांगून संपवायची तुझी घाई.
लहानपणाच्या तुझ्या खोडी, घरातल्यांचा मार, शाळेतल्या गमतिजमति. शाळेतली ती तुझी मैत्रीण जिला सायकलवरुन तिच्या घरी सोडलं होतं. किशोरवयातलं पहिलं - वहिलं प्रेम!
मग ती दिवसातुन एकदा तरी दिसावी म्हणून तिच्या घरासमोरुन दिवसभर सायकलवरुन मारलेल्या चकरा.सहलीच्यावेळी तिला दिलेलं गुलाब... सारं काही भराभरा सांगत होतास आणि
मी शांतपणे ऐकत होते.
एक गोष्ट नोट केलिय का? बोलताना तुझे डोळे विलक्षण चमकतात. श्वास नेहमी फुलतात. प्रचंड अधिरता असते तुला एखादी गोष्ट सांगून संपवेपर्यंत.
कधी गमति जमति सांगताना तुझं ते खळाळून हसणं तर कधी आयुष्यातले कटु आठवणी सांगताना खोल गेलेला तुझा आवाज आणि निस्तेज डोळे!  सारं काही मी साठवून ठेवलयं, बंद करुन ठेवलयं कुठेतरी!

कॉलेजमध्ये असताना, तिने तुझ्या वाढदिवसादिवशी तुझ्यासाठी माँजिनीजमधून एक केक आणला होता, गिफ्ट म्हणून एक सुंदर  ग्रीटींग कार्ड आणि एक छोट्या बाहुलिचा स्टॅच्यु, तिचं रूप म्हणून ! किती खूश झाला होतास ना तू त्यादिवशी. तू सांगितलंस मला, "It was a first time in my life I cut a cake and got a gift on my birthday! Seems it is my first birthday ! Rather than a card she is the most beautiful gift i ever had!"
त्यावेळचे तुझ्या डोळ्यातले ते थेंब मला अजुनही आठवतात.. तुझ्या आयुष्यातले ते सगळ्यात हॅपनिंग डेज! जेव्हा तिच्याबरोबर तू आकाशाला गवसणी घालू पाहत होतास. तिच्या प्रत्येक भेटीनंतर मला सगळं काही सांगणं. या ना त्या
कारणाने ह्जारदा तिचं नावं कोरुन कोरुन सांगणं. मला ते सगळं आवडायचं. एखाद्या गोष्टीत  मनापासुन  गुंतुन जाणं मी खुपदा अनुभवलयं तुझ्याकडून आणि तुझं गुंतणं ही तसचं सहजा सहजी न सुटणारं! आजही तू तसाच आहेस! 
असो!

बरेच दिवस झाले आपण समुद्रावर गेलो नाही. वाळूत लोळलो नाही, किनार्‍यावर निजून मावळणारा सुर्य पाहिला नाही, संधीप्रकाशातली तुझी गाणी ऐकली नाहीत, अंधार पडल्यावर गार वारा अंगावर झेलत आकाशातले तारे मोजले नाहीत. बरंच काही मिस्ड करतोय ना आपण. 
परत जाउया एकदा. पुन्हा ते हरवलेलं विश्व शोधायला. मावळणारा सुर्य समुद्रात बुडेपर्यंत डोळे भरुन पाहताना मला तुला पाहायचयं आणि त्या खार्‍या वार्‍यासोबतची तुझी गाणी ऐकायची आहेत.

गेले काही दिवस तू शांत होतास. तू शांत असलास की मला फार भीती वाटते. तुझ्या आयुष्यातली बरीच वादळं अशीच शांतपणे तुला उध्वस्त करून गेल्याचं मी पाहिलयं, म्हणून रे! आणखि काही नाही. त्यात माझ्याशिवाय तू दुसर्‍या कुणाला काही सांगत नाहीस. नेहमी सगळं स्वःतामध्ये गाडून ठेवण्याची तुझी वृत्ती! गेली काही वर्षे तर तू चक्क माझ्याशीही अबोला धरुन होतास. तू फक्त मला समोर ठेवून बघत राहायचास. काही बोलायचा नाहीस. तुझ्या डोळ्यांतून ते सारं दिसायचं . तुझं गप्प राहणं मला नेहमी टोचायचं. तुला असं शांत पाहिलं ना की मला कसं तरीच व्हायचं. समुद्र नेहमी उधाणलेलाच छान दिसतो. तुझी अस्वस्थता मला ठावुक आहे. तुझ्या कविता, तुझे शब्दच बोलतात सारं काही. 

तुझ्या मनाचा ठावं घेणं कधी
जमणार नाही मला. नेहमीच चंचल! हसवता हसवता कधी रडवून जाशील ते नाही सांगता येणार. तसं पण हसवण्यापेक्षा रडवणं चांगलचं जमतं तुला. कितीही वादळातून उध्वस्त झालास तरी पुन्हा पुन्हा नव्या वादळात एकट्याने जाण्याची तुझी नशा! किनारे तुटले तरी पुन्हा ते बांधून काढण्याचा तुझा हव्यास!  हे सगळं कुणाच्या प्राक्तनातून सुटलं नाही रे! तू एकटाच याला अपवाद नाहीस; प्रत्येकाला अशा  प्रसंगातून जावंच लागतं. जे तुला स्विकारतिल जे तुला नाकारतिल ते ही सगळे  एकाच नावेतिल प्रवासी. मग त्यांच्याबाबत तू इतका कठोर का होतोस? तुझी कठोरता मला ठाउक आहे. एकवेळ  पाषाणाला पाझर फुटेल पण तुझ्या कठोरतेला नाही. पण ही कठोरता तुझ्या आयुष्यात कुठुन आणि कशी आली? तू नव्हतास असा, अ‍ॅक्च्युअली तू नाहीस असा. या कठोरतेचं कारण मला ठाउक आहे. ते घाव तूच सोसले होतेस आणि ज्यांनी ते दिले ते दुसरे कोणी नव्हते तुझे जवळचेच, तुला आपलं म्हणणारे, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारे, तुझे मित्र, तुझे नातेवाईक या सगळ्यांनिच तुला इतकं कठोर केलयं.
पण मला वाटतं जे झालं ते झालं, हे सगळं विसरुन जा. या कठोरतेचा नाश कर आणि पुढे चालू लाग. मला
माहित आहे तुझ्याबाबत ते इतक्यात शक्य नाही. पण प्रयत्न कर मी आहे तुझ्यासोबत.

तुझ्या आयुष्यात आजवर अनेक माणसं आली आणि गेली. काहींना तू तोडून गेलास तर काहींना तुला तोडलं. हे सुरुच राहणार. हे होतचं असतं त्याशिवाय माणसं कळत नाही आणि आपल्याला ही जीवन जगण्याचा अनुभव येतो, आपणही स्वःताला ओळखू लागतो. आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. माणसं येत राहतिल आणि जात राहतिल. प्रत्येकवेळी जगण्याचा तुला ते एक वेगळा अनुभव देत राहतिल. अपण कुठे चुकलो हे शोधणं फार गरजेचं आहे, नाही का? तू सुद्धा चूकलास! अनेकदा. ठीक आहे! आयुष्य आहे हे  आणि माणसं चूकणारचं! पण काही मित्र खूप स्पेशल असतात रे ! त्यांना जपून ठेव. काही माणसं पुन्हा मिळत नाहीत. ते तुला हर्ट करतिल, तुला काही बोलतिल पण ते सगळे आपले मित्र आहेत आणि ते नाही बोलणार तर अजुन कोण?
उगाच मनाला लावून घेउ नको. माणसं
जोडणं सोप्पं आहे, त्यांना तोडणं तर त्याहुन ही सोप्पं आहे पण सगळ्यात कठीण आहे ते त्यांना जपून ठेवणं.जे तुला अजुन शिकायचं आहे. तुला माणसं टीकवता येत नाहीत. तुझा ईगो तुला थोडा जपायला हवा. असो. हे तुला मी संगणार नव्हते पण आज नाही राहवलं.

आठवतं त्या दिवशी नीशा काय बोलली, " D, you are just like a Teddy Bear ! Everyone around you likes you but nobody loves you! "
तिचं ते वाक्य तू किती दिवस तरी मनात ठेवून होतास. का माहित का मलाही  तिचं ते वाक्य काहिसं पटलं. नंतर तू बरचं काही बोललास माझ्याशी स्वःतबद्दल आणि तिच्या त्या वाक्याचे निकष तुझ्या आयुष्यातल्या प्रसंगावर कसे खरे उतरत होते हे मला पटवून देउ लागलास.पण तुझं तिला ते प्रत्युत्तर मला आवडलं, " So what Neesha, At least everyone likes me !"  
जाउ दे ! इतकं काही मनाला लावून घेण्यासारखं नाही बोलली ती. सोड ना यार काय फरक पडतो! It's damn life dude !

चल! मला वाटतं पत्र फारचं लांबलयं.  मी का तुला  उगाच लेक्चर देतेय! आज तुझा वाढदिवस ( मी का पुन्हा पुन्हा तुला हे सांगतेय!) जस्ट  एंजॉय इट ! बरेच दिवस तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून
हा पत्रप्रपंच आणि काही नाही!

तसं पण पुन्हा तुला वेळ नाही मिळणार तू तुझ्या नेहमीच्या आयुष्यात बिझी होणार. तुला आज काल वेळच नसतो माझ्यासाठी. तू तुझा तो पकाव लॅपटॉप आणि तुझा आय पॉड ! असो. पण मला माहित आहे की तू मला तुझ्यापासून कधी दुर नाही करणार. 

चल आता आवरतं घेते. तुझ्याबद्दल बोलायचं तर हा कागद कमी पडतोय( अ‍ॅक्चुअली माझे हात दुखले रे लिहून ;) ) पुन्हा बोलु कधीतरी निवांतपणे समुद्राच्या किनार्‍यावर, वाळूत निजून,
गाणी
गात आकाशातल्या चांदण्या मोजत.

तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा! आणखि काय बोलू? आणि हो आता लग्नाचा विषय जरा सिरिअसली घे !

You know something, love sucks mate ! And 28 years are enough to understand that love sucks badly !
Get a nice girl, get married and have a best life !!


तुझी सख्खी मैत्रीण,
तुझी डायरी. :)