Friday, June 26, 2015

‘ती’ मैत्रीण...

      त्यादिवशी तिला भेटलो. भेट काही ठरवून नव्हती घेतली. काही योगायोग असतात आणि जुन्या, कित्येक वर्षं अधुऱ्या राहिलेल्या भेटी पूर्ण होतात, तसंच काहीसं. तसा तिला मी अगदी लहानापानापासुंच ओळखतो. दर दिवशी शाळेत जाताना, किंवा त्याबाजूने गेलो की ती दिसायची. इतर मित्र - मैत्रीणीसारखीच ती सुद्धा. पण मला आठवतयं, तिच्याशी कधी मी जास्त बोललोच नाही. जितका इतर मित्रांसोबत वागायचो, बोलायचो, खेळायचो तसा मी तिच्याशी कधी वागलोच नाही. पण एक मात्र खरं की तिचं एक सुप्त असं आकर्षण मला अगदी लहानपणापासुनच होतं आणि आजही आहे. पण मी ते कधी कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का? अगदी स्वत:ला ही मी ते जाणवू दिलं नव्हतं, का कुणास ठाऊक? 

        त्यादिवशी तिला भेटलो तो एक योगायोगच असावा. नेहमीच्याच रस्त्याने जात होतो आणि सहज बाजूला लक्ष्य गेलं. ती दिसली. तशीच, अगदी लहानपणी दिसायची तशीच. तिच्यात जास्त बदल झालाच नव्हता. काहीसं मनात ठरवून मी चालत तिच्यापाशी गेलो. माझ्यासमोरच होती ती. तिला पाहून एक उसनं स्मित द्यायचा प्रयत्न केला, ते बघून ती खुदकन हसली. काय बोलावे ते सुचेनाच. मला तसा बावचळलेला पाहून ती अजूनच हसायला लागली. खूप सारे स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागले. कुठूनशी वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या स्मिताबरोबर माझ्या अंगावरून गेली. मी थोडासा शहारलो. काहीच न सुचल्याने मी तिथेच तिच्यासमोर  माडाच्या झाडाला टेकून बसलो. ती समोरच. दोघेही शांत. तिला इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. ती खरंच अतिशय सुंदर दिसत होती. बाहेर चैत्राचं उन भाजून काढत होतं, पण ती बहरून गेल्यासारखी भासत होती. किती तरी वेळ मी फक्त तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहताच राहिलो, ते ही अगदी पहील्यांदाच. ती ही पाहत राहिली; बऱ्याच वेळाने मी बोलायला सुरुवात केली,
“कशी आहेस?”
“ठीक आहे. तू कसा आहेस? आणि आज इतक्या दिवसांनी इकडे कुठे वाट चुकलास?” तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं.
“काही नाही, सहजच. सुट्टी होती म्हणून गावी आलोय काही दिवसांसाठी.” मी उत्तरलो.
“बरं. बाकी काय? सगळं ठीक ना?”
“हो. सुरु आहे. ठीक चाललयं.”
पुन्हा दोघांत एक शांतता पसरली. एक रानपक्षी हेल देऊन गाऊ लागला. तिथून, तिच्यासामोरून मला उठावसं वाटत नव्हतं. पण अजून काय बोलू ते कळतच नव्हतं.
“इतक्या वर्षात आपण पहिल्यांदाच असं भेटतोय ना?” मी त्या शांततेत एक खडा टाकला; पुन्हा अनेक स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन वाहू लागले.
“हो. म्हणूनच मी विचारलं तुला की आज इकडे कुठे वाट चुकलास म्हणून.” तिच्या चेहऱ्यावर ते स्मित अजूनही विरत होतं. 
“नाही. तसं काही नाही. म्हणजे तुलाही आठवत असेल शाळेत जाताना नेहमी भेटायचो की आपण.” मी चाचरत काही तरी बोललो.
“भेटायचो नाही रे. फक्त एकमेकांना बघायचो. हां, एक दोन वेळा तू इथे मित्रांसोबत अभ्यासाला यायचास ते आठवतयं, पण तेव्हाही तू इथे मित्रांसोबतच असायचास. आपण तसे कधी भेटलो किंवा बोललोच नाही. मग शाळा संपल्यावर तू निघून गेलास.” ती.
“हो. तसंच काहीसं. तेव्हा वाटायचं तुझ्याशी खूप बोलावंस, पण का कुणास ठाऊक हिम्मत नाही व्हायची.” मी.
“आता तरी आहे का हिम्मत बोलायची? की...?” ती पुन्हा हसली.
“अगं, काहीही काय. बोलतोय ना तुझ्याशी आता.” मी हसत म्हणालो.
“काय रे, आपल्या मैत्रीणीशी बोलायला काय घाबरायचं? बोलायचं बिनधास्त.”
“घाबरत नाही गं. तुझ्याकडे येऊन बसून बोलावसं खूपदा वाटायचं पण माहीत नाही का? नाही जमलं कधी. तुझ्याबद्दल लहानपणापासूनच एक आकर्षण होतं मला. पण कधी जमलंच नाही तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी बोलायला. जेव्हा जेव्हा तू दिसायचीस तेव्हा तेव्हा मनात अगदी समुद्र भरून यायचा. फार सुंदर दिसायचीस तू; म्हणजे आताही, आय मीन, आताही तू तशीच सुंदर दिसतेस. दर पावसाळ्यात मी तुला पाहायचो. चिंब होऊन जायचीस तू. बेभान होऊन नाचायलाच लागायाचीस. सगळे बंध तोडून तू सगळीकडे पसरलेली असायचीस. तेव्हा तुझ्याकडे नुसतं बघत राहावं असं वाटत राही. हिवाळ्यात अगदी उलट. पहाटे जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा तू धुक्याची चादर पांघरून असायचीस, तुझ्या श्वासांतून उमटणारी बाष्पाची वलयं तुझ्या चेहऱ्याभोवती दाटून यायची, आठवतयं मला.” 
“बापरे! माय, माय! किती ते वर्णन. आई शप्पथ! इतकं कधी कुणी मला माझ्याबद्दल बोललंय असं आठवत नाही!” ती हसत हसत म्हणाली.
“बघितलंस, माहिती होतं की तू हसणार म्हणून मी कधी तुझ्याशी असं काही बोलायचो नाही.” मी थोडा रागवत म्हणालो.
“काय यार, मस्करी पण नाही का करायची? लगेच कसला रे फुगतोस? खरं सांगू मलाही नेहमी वाटायचं की तू माझ्यापाशी यावसं. आपण खूप साऱ्या गप्पा माराव्यात, या इथे बागडावं, गाणी गावीत. पण ते कधी तुला सांगू नाही शकले. तू इथेच या गावात राहिला असतास तर ते शक्यही झाले असते, कदाचित. पण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच नाही का? मला बापडीला काय, मी आहे अशीच. मी ही हे सगळं सोडून कुठे जाणार ना? मग आहे. पण कधी कधी वाटत की तुझ्यासारखा कुणी तरी मित्र असावा. घटकाभर येऊन त्याने भेटावं, बोलावं, सुख - दु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात. वाऱ्यावर ताल धरून एक सुंदरसं गाणं गावं. बस्स, अजून काही नाही. आपल्या मैत्रीसाठी एखाद्याने एवढं तरी करावं ना रे? नाहीतरी इथे कोण असतं कुणाचं? ” ती स्तब्ध झाली.

“खरं सांगतो, मलाही कित्येकदा असं वाटलंय. अगदी अस्सच वाटलंय की पुन्हा तुला पावसात बेभान होऊन नाचताना बघावं आणि तुझ्यासोबत आपणही पावसात नाचावं, चिंब होऊन बागडावं. तुझ्या अंगणात पुन्हा येवून खेळावं, तुझ्यासोबत गाणी गावी. कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटेचं तुझं धुक्याने आच्छादून गेलेलं रूपं पाहत बसावं. खूप वाटतं असं. पण तुझ्याबद्दल मला नेहमीच एक आदर आहे. मी इतर मित्रांशी कसाही वागू शकतो, बोलू शकतो. पण तुझ्याशी तसं नाही करू शकत. असं वाटतं की अगदी लहानपणापासूनची आपली ही मैत्री अखेर पर्यंत तशीच राहावी; अभंग. त्या मैत्रीला कुठेही, कसलाही बांध नसावा. हा प्रवाह असाच निरंतर रहावा.” मी. 

“मैत्रीचं काय आहे? ती राहिली तर राहते. टीकवली तर टिकते, नाही तर जाते वाहून. पण कधी कधी उगाच ओढूनताणून टीकवण्यापेक्षा ती वाहीलेलीच बरी असते. मैत्री हे काही नातं नाहीय. त्यात कुणी कुणाला बांधील नसतं आणि नसावंच मुळी. मलाही असंच वाटतं आपल्याबद्दल. कधी कुठे भेटलो तर निदान एकमेकांची ओळख तरी विसरत नाही आपण. ओळखीचं, मैत्रीचं, जाणीवेचं एखादं स्मित पुरेसं आहे आपल्यात, आणि हे असंच असावं नाही का रे?” ती.

 मी पुढे काही बोललो नाही. ती ही शांतच राहिली. थोड्यावेळाने उठून मी तिचा निरोप घेतला.

“येत जा असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी ओळखीचं भेटलं की.” 
ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली.
“हो. नक्की.” असं म्हणून मी जायला वळलो. तिच्या चेहऱ्यावरले तरंग पुन्हा विरत गेले. खूप दिवसांनी त्या दूरच्या मैत्रीणीला भेटून, तिच्याशी बोलून फार बरं वाटलं. 'नदी’ माझी दूरची मैत्रीण.  

        नदीचं एक सुप्त आकर्षण मला कधीपासून तरी आहे. मी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का अगदी स्वत:लाही मी हे जाणवू दिलं नव्हतं. माझ्या गावात एक नदी आहे. कुठून रानावनातून, दऱ्या-खोऱ्यातून वाहत येते आणि समुद्रात विलीन होते. का कुणास ठाऊक कधी प्रवासात मला एखादी नदी दिसली की मन अगदी भरून जातं. समुद्र जीवाभावाचा मित्र असेल तर नदी ही मैत्रीण. इतके दिवस नव्हतं जाणवलं. ती सुद्धा माझ्याशी तशीच वागते, दूरच्या मैत्रीणीसारखी. काही दूरचे नातेवाईक असतात तशीच ही माझी दूरची मैत्रीण. पण दूरची असूनही अगदी जीवाभावाची. कधी भेटली तर ती जास्त बोलत नाहीत. कधी तरी, क्वचितच एखादं संयत, संथ आणि नितांत सुंदरसं स्मित झळकेल तिच्या चेहऱ्यावर. कधी चालताना, तर कधी प्रवासात बस-ट्रेन मधून ती जोवर दिसेल तोवर आमची सोबत. एखादं स्मित दोघांच्यात. बस्स! नंतर ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला. निरोप असा घेत नाही आम्ही. माहीत असतं पुन्हा भेट होईलच. पण तोवर हुरहूर ही लागलेलीच असते जीवाला.

लहानपणापासून समुद्र माझा मित्र, सखा, सोबती, यार सगळं काही. आमच्या गावात समुद्रही अगदी तसा जवळच. पण समुद्रावर कधी जायला मिळायचं नाही, त्यामुळे कधी प्रवास करताना गाडीतून १-२ मिनिटासाठी दिसणारा समुद्र मी अधाशीपणे प्राशून घ्यायचो. लहानपणापासून समुद्र माझ्या सोबतीलाच. एका सच्च्या दोस्तासारखा. आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा तो जणू एक साक्षीदारच. सगळया सुख दु:खांत तो माझ्यासोबत. नंतर किती तरी वेळा मी त्याच्या किनारी जाऊन त्याच्याशी बोलत बसलोय. कितीतरी वेळा त्याच्या लाटांच्या तालावर गाणी गात बसलोय. कितीदा तरी किनाऱ्यावरल्या उष्ण वाळूत अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजल्यात; पण नदीशी मी असा कधी वागलोच नाही. माझ्या गावात नदीही आहे. नदीच्याच बाजूला गाडीरस्ता. येणाऱ्या - जाणाऱ्यांची नेहमीची वाट. आम्ही देखिल शाळेत जाताना याच नदीच्या बाजूच्या रस्त्याने जायचो यायचो. प्रत्येक मोसमात नदीची वेगवेगळी रूपं दिसायची. पावसाळ्यात दुथडीभरून ती वाहायची. नदीचं पाणी काठ फोडून शेतमळ्यात शिरायचं. सगळा शेतमळा एखाद्या प्रचंड मोठया सरोवारासाराखा भासायचा. पावसाळ्यात नदीचं पाणी पुलावरून गेलं की शाळेला हमखास सुट्टी. श्रावणात एखाद्या माहेरवाशीणीसारखी बेभान होऊन नाचणारी, बागडणारी नदी शिशिरात गारठून जायची. आम्ही पहाटे शाळेत कुडकुडत जायचो तेव्हा पुलावरून दिसायचं; नदी धुक्याची चादर पांघरून शांत वाहायची. जणू पुन्हा सासरी जाणाऱ्या मुलीसारखी आतल्या आतच रडायची.                                    

लहानपणापासून मला पाण्याचा प्रवाह, डोह, समुद्र दिसला की त्यात स्वत:ला झोकून द्यावेसे वाटायचे. पोहायची भयंकर इच्छा असूनही घरच्यांच्या ओरडण्याने साध्या दारातल्या ओहोळातही जायला मनाई होती. नदीचा दुसरा काठ सहज दिसायचा. मला लहानपणी नेहमी वाटायचं की उडी मारली तर सहज पोहून नदीच्या दुसऱ्या काठावर जाईन. त्यावेळी त्या शांत, गूढ नदीच्या रुपाची मला कल्पना नव्हती. मला वाटायचं की असा कसा बुडेन नदी मला तरंगवत दुसऱ्या काठावर घेऊन जाईल. पण हां! असा प्रयत्न कधीच केला नाही. तुम्ही नदीची विविध रूपं लक्ष्य देऊन बघा, ती प्रत्येकवेळी वेगळीच भासते. पण मला सर्वात भावतं ते तिचं गूढ, शांत, रूप. पण तेव्हाची पाण्यात जायची ओढ आता नाही राहिली. हां, फक्त त्या प्रवाहाला, डोहाला, अथांग समुद्राला दुरून बघत राहतो. समुद्राची ओढ असली तरी नदीचं वेगळंच असं आकर्षण मनाला लागून आहे.                   

खरंच जितका मुक्तपणे मी समुद्राशी वावरतो, बोलतो तितका नदीशी कधीच नाही. मला आठवत नाही की, मी कधी तासनतास नदीच्या किनारी बसलोय. तिच्याशी भरभरून बोललोय. तिच्या काठावर बसून, वाऱ्याच्या आणि रानपक्ष्यांच्या साथीवर कधी गाणी गायलीत. तिच्यासाठी कधी ३-४ ओळी खरडल्या. नाही, कधीच नाही. ही अशी अबोल मैत्री गेली कित्येक वर्षे आमच्यात आहे. तिच्याविषयी नेहमीच एक आदर वाटत राहतो मला. त्यामुळेच असेल की, मी तिच्याशी तितक्या सलगीने नाही वागत. कधी जाऊन तिला मनातलं नाही सांगत. तिच्या काठावर तासन तास, तिला न्याहळत नाही बसत. पण वाटतं हेच ठीक आहे. 

प्रत्येकासमोर आपल्या आयुष्याचं पुस्तकं उघडून वाचण्यात काय अर्थ आहे? 
बसावं कधी निवांत एकमेकांसमोर, नुसतंच. 
काहीही न बोलता, उलगडावे मनातले बोल आपोआप. 
सुख-दु:खांच्या पलीकडे ही असावं काहीतरी बोलण्यासारखं. 
नसावी कोणतीच भावना हसवणारी, रडवणारी, मोहवणारी. 
असावी फक्त एक निरपेक्ष जाणीव. 
एकमेकांच्या अस्तित्वाची. एकामेकांच्या असण्याची.