Thursday, March 28, 2013

प्रिय मैत्रिणीस...मैत्रिणी, 
संधिप्रकाशाच्या रंगांच कोडं मला अजुन उमगलेलं नाही.
निर्जन किनार्‍यावर बसुन मी त्या रंगांची उधळण बघत राहतो निश्चलपणे..
अगदी त्या रंगांना काळोखाने गिळेपर्यन्त..
तू आज इथे हवी होतीस..
मग आपण शोधले असते त्या संधिप्रकाशाच्या रंगांचे रहस्य..
आणि तुझ्या डोळ्यांतून वाहणार्‍या नदीचा उगम..

मैत्रिणी,
इथे सारं काही बदलून गेलयं.
वैराण वाळवंटासारखा भासू लागलाय आपला किनारा..
परक्याने हाक मारावी तसा स्पर्शुन जातो हा वारा..
तुझ्या पाउलखुणा शोधत माझी नजर फिरत राहते
पण प्रत्येक सापडलेल्या खुणेला ती बेभान लाट पुसून जाते..

मैत्रिणी,
इथे फक्त माजलयं स्वार्थी माणसांचं रान,
माझ्या वहीत मी अजुनही जपून ठेवलयं
तू दिलेलं ते पिंपळाचं पान.
कधी कधी मी ती वही उघडतो,
प्रत्येक पानावर हात फिरवत राह्तो.
तुझ्यासाठी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला डोळ्यांत भरुन घेतो,
प्रत्येक शब्दाला शहारत, स्पर्शत मी त्या पिंपळपानापर्यंत येतो.
तिथून पुढे मी काहीच लिहिलेलं नाही....

मैत्रिणी,  
आता ते पान खूप जुनं झालयं,
कोरडं पडलयं.
त्या पानाच्या जाळीवर विरुन गेलेत माझे सर्व शब्द
बर्फाखालून वाहणार्‍या हिमनदीसारखे शांत, स्तब्ध
आज पुन्हा, माहित नाही कितव्यांदा
मी आवरतोय त्या पानाला स्पर्शण्याचा माझा मोह
कारण, त्या पानावर कुठे तरी साचून राहिलाय
तुझ्या डोळ्यांतील आसवांचा डोह.....

मैत्रिणी...


- दीपक परुळेकर

Sunday, March 24, 2013

"लाईफ ऑफ पाय"चित्रपट संपायला येतो.. ते दोघे अथांग समुद्राशी झगडत, लढत, मृत्युला हुलकावणी देत किती तरी दिवसांनी एका किनार्‍यावर पोचतात.. आतापर्यंत त्या दोघांच्या एका विलक्षण प्रवासात आपण सहभागी झालेले असतो. मनुष्य आणि एका हिंस्त्र श्वापदाच्या एकत्रित प्रवासात आपण ही सोबत असतो. आता काय होणार? आपल्याला उत्कंठा लागलेली असते. जहाज बुडाल्यापासून एका लाईफबोटवर चाललेल्या त्यांच्या त्या प्रवासाचे आपण साक्षीदार असतो.आता या अथांग सागरात  आपल्याला एकमेकांशिवाय कुणाचाच आधार नाही हे त्या दोघांना कळून चुकलेलं असतं. पण हे कुठवर चालणार??? शेवटी तो प्रसंग येतो. हळहळ, उत्कंठा आपला पिच्छा सोडत नाही. 

अथक प्रवासानंतर त्यांची होडी एका किनार्‍याला लागते. 'पाय' कसाबसा ती होडी किनार्‍यावर आणतो आणि त्या मउशार किनार्‍यावर आपलं थकलेलं शरीर झोकून देतो. किनार्‍याला लागलेलं असतं समोर एक घनदाट अरण्य. त्याच्या मागोमाग तो टायगर "रिचर्ड पार्कर" ही होडीतून उतरतो. अशक्त, थकलेला!
किलकिल्या नजरेने 'पाय' त्याच्याकडे बघत असतो. रिचर्ड पार्कर हळूहळू त्या जंगलाच्या दिशेने चालू लागतो. 'पाय'ला जाणवतं की आता हा वळून बघणार नाही तरी पण त्याला वाटत असतं की त्याने एकदा तरी मागे वळून त्याच्याकडे  पहावं.
एकदा तरी! शेवटचं!
त्या जिवघेण्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्यात निर्माण झालेल्या एका विलक्षण नात्यासाठी तरी निदान त्याने वळून पहावं!
पण नाही! रिचर्ड पार्कर न थांबता त्या जंगलात अदृश्य होतो आणि इकडे 'पाय'च्या मनाचा बांध फुटतो.
तेव्हाच आपल्याला जाणवतं की मनुष्य हा एक विलक्षण जीव आहे. कधी, कशात मनुष्याचा जीव अडकेल हे सांगता येत नाही.  आज थोड्या उशिरानेच "लाईफ ऑफ पाय" पाहिला आणि त्या शेवटच्या प्रसंगाने हेलावून गेलो. क्षणभर विसरलो की रिचर्ड पार्कर हा एक वाघ होता. एक हिंस्त्र श्वापद!
मला त्यात एक माणूसच दिसत होता. 'पाय' प्रमाणे मला ही वाटत होतं की त्याने एकदा तरी त्याच्याकडे वळून बघावं! पण तसं नाही होतं आणि वाटलं की..... काय वाटलं ते सांगताच येत नाही. थोडासा इमोशनल झाल्यागत!!
आपण का इतकं कुणाच्या मोहात अडकतो की फक्त एका नजरेसाठी व्याकूळ होतो...?
काही क्षणांपुरतं सोबत असलेल्यांनाही आपण कधी कधी आयुष्यासाठी गृहीत धरायला लागतो.. हा मोह का आवरता येत नाही आपल्याला.. सोप्पं उत्तर आहे की मोह आवरायला आपण संत, महात्मा,बुद्ध किंवा देव नाही... पण तरी ही यार !
या प्रश्नांची उत्तरं मला कधीच सापडली नाहीत. कदाचित असेल की प्रत्येक क्षणिक मोहाला मी आयुष्य मानत गेलो. पण तसं नसतं ना! जोवर आपल्यावर असा प्रसंग येत नाही तोवर..  

माणूस आणि वाघ! एका बोटीवर! त्यातल्या त्यात माणूस त्या वाघापासुन एक अंतर ठेउन वावरणारा कारण त्याला ठाउक आहे की जर त्या वाघाच्या जवळ गेला तर वाघ त्याला सोडणार नाही. एका प्रसंगात भुकेने कासाविस झालेला वाघ माशांच्या लालसेने पाण्यात उडी मारतो आणि 'पाय' रॅफ्ट वरुन होडीत येतो. वाघ पाण्यात धडपडत असतो. पण आता होडीची सत्ता मनुष्याकडे कडे असते आणि एक शस्त्र ही त्याच्या हाती लागतं जे वैतागून तो वाघावर उगारतो पण त्याचक्षणी वाघाचा तो करुण चेहरा! तो बघुन तो शस्त्र आवरतो ! हा सीन आपल्याला खूप काही सांगून जातो. आपण मनुष्य आहोत याची एक जाणिव मनाला देउन जातो. बस्स! ही जाणिव पुरेशी आहे. त्यानंतर सुरु होतो दोघांचा प्रवास त्या अथांग सागरात!  

हळूहळू ते अंतर कमी होत जातं. तहान, भूक मनुष्य आणि श्वापद यातलं अंतर मिटवत असतात. पहिल्या प्रसंगात गलेलठ्ठ दिसणारा तो वाघ आता कृश झालेला दिसतो. भूकेने मरायला टेकलेला असतो. ते बघून मनुष्याचं मन हेलावून जातं आणि त्या मरायला टेकलेल्या श्वापदाला तो मनुष्य मांडीवर घेतो. प्रेमाने त्याच्यावर हात फिरवतो. "वी आर डाईंग रिचर्ड पार्कर!" त्याचे अस्पष्ट शब्द... आज मला असं जाणवलं की "देव" ही मनुष्याने निर्माण केलेली एक उत्कृष्ट कल्पना आहे जिने मनुष्याचं आयुष्य पार बदलून टाकलयं. देव आहे की नाही? आस्तिक की नास्तिक ? या सगळ्यात गुंतुन जाण्याचं काही कारणच नाही. श्रद्धा असावी पण त्याची अंधश्रद्धा कधीच होउ देउ नये. "लाईफ ऑफ पाय" आपल्याला या अशा अनेक वादळातून झगडायला शिकवत किनार्‍यावर आणून सोडतो. नुसतं सोडत नाही तर ती जी मोहाची, प्रेमाची, नात्याची ओढ असते ना त्यातून ही कसं बाहेर पडावं हे शिकवतो आणि हो या सगळ्यांसाठी आपण देवाला धन्यवाद दिलेच पाहिजेत! कारण देव असो वा नसो पण कोणती तरी एक अनामिक शक्ति आपल्यात, या निसर्गात आहे जी आपल्यातल्या देवाला नेहमी जागृत ठेवते. म्हणूच कदाचित 'पाय'चे वडील लहानपणी त्यांना लहानपणापासूनच सांगत असतात, "Religion is obscurity. Religion is Darkness."  

एका प्रसंगात 'पाय' त्या लेखकाशी बोलत असतो; 
Pi Patel: " Faith is a house with many rooms."

Writer: "But no room for doubt?"

Pi Patel: "Oh plenty, on every floor. Doubt is useful, it keeps faith a living thing. After all, you cannot know the strength of your faith until it is tested."
 

हे असे अनेक संवाद आपल्याला आपल्यातला देव जागा करयला उद्युक्त करतात..पण जसं मी सांगितलं की त्या शेवटच्या प्रसंगाने आणि त्या वाक्याने मी अगदी हेलावून गेलो तो म्हणजे रिचर्ड पार्करचं आपल्या वाटेने निघून जाणं आणि त्याने एकदा ही मागे वळून पाहीलं नाही म्ह्णून 'पाय'चं रडणं.. "I suppose in the end, the whole of life becomes an act of letting go, but what always hurts the most is not taking a moment to say goodbye.."
 हे सांगता सांगता 'पाय'च्या डोळ्यां पाणी जमतं आणि आपल्याही...  

का कुणास ठाउक मला ही 'पाय'सरखं जाणवू लागलं की यार! बस्स एकदाच कुणीतरी मागे वळून पाहायला हवं होतं! कुणी तरी एकदाच, फक्त ती एक नजर हवी होती! इतकी वादळं झगडलो अजुनही झगडलो असतो पण फक्त ती एकच नजर हवी होती!
कधी कुठे वाचलेल्या ओळी पटकन मनावर आल्या, 

"वह मायुसी के लम्हों में जरा भी हौसला देते, 
हम कागज की कश्ति पे समंदर में उतर जाते.." 


"लाईफ ऑफ पाय" माणसाच्या मनाचा ठाव घेणारा एक उत्कृष्ट सिनेमा आहे. एक विलक्षण, वेगळी गोष्ट!  

 

- दीपक परुळेकर