Wednesday, February 16, 2011

द लास्ट किस!

अश्वत्थामा, त्या जंगलातून सुसाट पळत सुटला होता. एका हाताने कपाळावरची भळाभळा वाहणारी जखम पुसतं, त्या घनदाट जंगलातून वाट मिळेल तिथे, झाडाझुडुपातून, काट्यातून कसलीही अगदी जीवाचीही पर्वा न करता पळत सुटला होता. कपाळावरची जखम ताजी होती आणि धावण्याच्या वेगाबरोबर ती ठणकत होती. किती तरी वेळ तो असाच धावत होता. घसा तहानेने कोरडा पडला होता.. धावता धावता मध्येच त्याचा पाय घसरला आणि तो घसरत,घरंगळत्,गडगडत खाली गेला.जेव्हा तळ लागला तेव्हा त्याचे तोंड एका छोट्या वाहणार्‍या ओढ्याला लागले. कैक वर्षांपासून तहानेने व्याकूळ असल्यागत त्याने घटाघट ते पाणी पिउन घेतले. पाणी पोटात जाताच त्याचे डोळे जड झाले आणि त्या शीतल प्रवाहाच्या काठावर तो तसाच निद्राधीन झाला. बर्‍याच वेळाने जंगलातल्या किलबिलाटाने त्याला जाग आली. किलकिल्या डोळ्यांनी त्याने समोर पाहिले. ओढा शांतपणे वाहत होता. सुर्य मावळण्याच्या तयारीत लगबगीने जात होता. त्या घनदाट जंगलात त्याचं एखाद दुसरं किरण पडलं होतं.हळूहळू त्याने डोकं वर उचललं आणि आकाशाकडे तोंड करुन तो उताणा पडला. डोक्यावरची जखम तीव्रतेने ठणकली तसा त्याने त्या जखमेवर हात फिरवला. जखम अजुनही संथ वाहत होती आणि रक्त डोक्यावरुन ओघळून मानेपर्यंत गोठले होते. बाजुच्या झुडुपांच्या आधाराने तो कसाबसा उठुन बसला. विषण्ण नजरेने समोर पाह्त असतानाच, कंबरेला काही तरी टोचतय हे जाणवून त्याचा हात आपसूक कंबरेला गेला त्याने चाचपून पाहिले आणि ती वस्तू हातात लागताच तो चक्रावला... ते एक पिस्तुल होते!!!!

ते पिस्तुल त्याने समोर धरले आणि त्याच्या डोकं गरागरा फिरु लागलं... त्या पिस्तुलाकडे पाहत धडाधड त्याला सर्व काही आठवू लागलं.... मी अश्वत्थामा नाही.. मग मी कोण?

त्याने परत जखमेला हात लावला!!
वेदनेची एक भयंकर कळ त्याच्या ह्रदयातून सरसरत गेली.. जखम अजुनही तशीच ताजी होती..
अविरत वाहणार्‍या जखमेवरून कुणाला अश्वत्थामा म्हणता येत नाही पण अविरत वाहणारी जखम फक्त अश्वत्त्थामालाच होत नाही!!
त्याने स्वतःकडे पाहिले त्याचे कपडे रक्ताने आणि चिखलाने माखले होते.. वेगाने फिरणारे विचारांचे चक्र १० तास मागे गेले आणि त्याला काहीतरी आठवलं. तो कडा! भिरभिरणारा पाउस, गार वारा आणि त्यात गारठलेली, शहारलेली प्रीती!!! प्रीती??? कोण प्रीती?? मी कोण?? तो परत आठवू लागला..

त्या कड्यावर तो आणि प्रीती उभे होते.खाली हिरवीगार खोल दरी. तळही न दिसणारी.. भिरभिरणारा पाउस..आणि त्या पावसात चिंब भिजलेले..भिजून गारठून गेलेली प्रिती..तिच्या चेहर्‍यावरुन निथळणारे थेंब थरथरणार्‍या तिच्या ओठांवरुन ठीपकत वाहत होते. तो तिच्या त्या चिंब झालेल्या सर्वांगाला न्याहळात उभा होता.. त्याला आठवलं पहिल्यांदा पावसात भिजलो होतो तेव्हा ही ती तशीच दिसत होती... गारठल्याने ती कुडकूडत उभी होती, झोंबणारा वारा सहन न होताच ती हळूच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला घट्ट बिलगली.. तिचे हात त्याच्या कमरेला वेढलेले असतानाच तिच्या हाताला काहितरी लागले.. तिने चाचपले.. त्याचं लक्ष्य नव्हतं..तो तिच्यात धुंद झाला होता...एव्हाना त्याचं लक्ष्य गेलं."निहार?? हे हे तुझ्या सॅकमध्ये काय??" 

निहार, माझं नाव निहार.. निहार प्रधान...!! त्याला आठवलं.. 
"निहार काय आहे त्या सॅकमध्ये??" 


परत तो आठवू लागला..
युसुफ भाई,डोंगरी,सँडहर्स्ट स्टेशनच्या बाजुचा भिकारी.ती बकाल, घाणेरडी चाळ, आणि त्या चाळीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत बसलेला युसुफ भाई! पानाने रंगलेले तोंड, एखाद्या ड्रॅकुलासारखा दिसत होता. बाजुला तो भिकारी,जो त्याला तिथे घेउन गेला होता..


"साठ हजार??? बहुत ज्यादा है सर!" 
"सर???" त्याच्या सर या शब्दावर तो तोंडातलं पानाचं रक्त ओके पर्यंत हसला.
"सर?? ए,हनिफ चर्सी, किधर से लाया रे इसको?? हा हा हा !! सर !!  सर, आप बहोत शरिफ मालुम होते है, काय कु इस झमेले में पडते हो??" 
"आपको क्या इससे??आप को बेचना है की नहीं बोलो??"त्याचा आवाज जरा चढला,त्यबरोबर युसुफभाईच्या पानाचा रंग त्याच्या डोळ्यात चढला,
"देखो मियाँ, ये बाजार में बिकने वाली भिंडी नहीं है जो किलो के भाव में बेची जाती है, ये पिस्तौल है. एसकी एक गोली की किमत किसी की बेशकिमती जान लेती है!" युसुफ भाईचे शेवटचे शब्द त्याला टोचले.. 
"ठीक है, जैसा आप ठीक समझो! त्याने ब्रीफकेस उघडली आणि ६ गड्ड्या समोर ठेवल्या.. हनिफची त्याच्या ब्रीफकेसवर असलेली अधाशी नजर त्याच्या नजरेतुन सुटली नाही.पाचशेची एक नोट त्याने हनिफ समोर धरली, हनिफचे डोळे तरारले.नोटांची बंडले उचलताच युसुफ ने एका खोक्यातुन एक पिस्तुल काढले आणि त्याच्या हातात दिले.दोन क्षण तो त्या पिस्तुलाकडे बघतच राहिला..
"कभी चलायी भी है मियाँ?" 
"वक्त सब कुछ चलाना सिखाता है!" त्याच्या डोळ्यातली धगधग आता पेटली होती.
"खुदा हाफीस, युसुफ भाई!" तो जायला वळला आणि युसुफने त्याच्या खांद्यावर हात ठेवला," सरजी! जब भी इसे चलाओगे, हजार बार सोचना..क्यों कि, जब गोली चलेगी वापस नहीं आएगी!" 
तो फक्त हसला आणि तिथुन निघाला...

" हॅलो, प्रिटी,! या!! कॅन यु हिअर मी???"
"या?? हे! अ‍ॅम मिस्सिंग यु बॅडली!! कधी तुला पाहतोय असं झालयं!" 
"अरे फ्लाईट ५ तास लेट आहे! मी बहुतेक सकाळी ९/१० वाजता पोहचेन!" 
"शीट ! बघ ना! प्यार की दुशमन एअरलाईन्स!!"  
"काय माहित?? एमरजन्सी लँडींग केलीय..! !" 
"नो नो ! डोन्ट वरी! एव्हरीथिंग विल बी ऑलराईट! घाबरु नको तुला बघितल्याशिवाय मी मरणार नाही!! आय लव्ह यु सो मच!! चल ठेवतो..लव्ह यु अ‍ॅन्ड टेक केअर!!" 

डोंगरीहुन पिस्तुल घेउन निघताना त्याने गाडी ऑन केली आणि फ्लाईट हॉल्टला असताना प्रितीशी  झालेलं संभाषण त्याला आठवलं. संध्याकाळचे ७ वजले होते.क्रॉफर्ड मार्केटमधून सरळ तो मरीनलाईन्सला बाहेर पडला आणि मरीन  ड्राईव्ह वरुन ड्राईव्ह करताना त्या किनार्‍याबरोबर त्याचे मन अलगद मागे जाउ लागले. त्याला ते ठीकाण दिसलं जिथे पहिल्यांदा त्याने प्रितीला भर पावसात, उधाणलेल्या समुद्राच्या समोर किस्स केलं होतं.. त्याला राहवलं नाही. गाडी तिथेच पार्क करुन तो उतरला..आणि त्या कठड्यावर उभा राहिला..खूप वेळ समुद्राकडे बघत.. सेलफोनच्या वाजण्याने तो भानावर आला..प्रितीचा कॉल होता.." या प्रिटी??या, अ‍ॅम ऑन द वे! हो, यु गेट रेडी वी अर गोईंग आउट फॉर अ डीनर!! या विदीन २० आय'ल बी देअर! बाय!!" 


आता रात्र किर्रर्रर्र झाली होती. जंगलातला काळोख चोहीकडून त्याला घेरत होता.सारे अंग ठणकत होते.आणि कपाळावरची जखम तर ठणकायची बंदच होत नव्हती. मध्येच कुठुन तरी कसले तरी चित्र-विचित्र आवाज त्याची गाळण उडवत होते. रात्र तिथेच काढणं त्याला भाग होती. कसलाही आवाज न करता तो शांतपणे पडुन राहिला. जसजसा काळोख गहीरा होत गेला तसतसे आकाश असंख्य  तार्‍यांनी उजळू लागले..किलकिल्या डोळ्यांनी तो आकाशात पाहू लागला.एकाएका तार्‍याला निरखून पाहू लागला..
ते दोघे मनातल्या मनात असेच बोलायचे.तो रात्रभर टेरेसवर पडुन असायचा आकाशातले तारे मोजत.त्या त्यार्‍यांमध्ये तिला सजवत. प्रितीच्या नावाचं नवीन नक्षत्र! आणि रात्रभर त्या नक्षत्राशी मारलेल्या गप्पा.ते आठवून त्या जंगलातल्या भयाण काळोखात त्याचा ह्रदयात हलकीशी वेदना झाली.. 
  

"तुला ठावूक आहे प्रिटी, ही माझी सगळ्यात मोठी ईच्छा होती." तो कुशीवर वळत तिच्याकडे बघत बोलला..
" कसली रे?" तिने विचारले...चांदण्यांच्या प्रकाशात तिचा चेहरा त्या चंद्रालाही लाजवत होता..
"हीच!! तुझ्याबरोबर समुद्राच्या वाळूत पौर्णिमेची रात्र आकाशातले तारे मोजत जागून काढायची...."
ती हसली..
''वेडा आहेस तू! "
"वेडं केलयं तू मला" बोलता बोलता तो तिच्या चेहर्‍यावर झुकला.तिने डोळे मिटुन घेतले.तिच्या ओठांत त्याचे ओठ मिसळून गेले. इतका वेळ शांत असलेला समुद्रही थरारला आणि त्याची एक लाट अलगद दोघांच्या पायाला गुदगुल्या करून गेली. त्याच्या बाहुच्या उशीवर ती तशीच झोपून गेली आणि तिला जाग येईपर्यंत तो तसाच तिला न्याहळत...
 

"मला माहित नाही मी काय करतोय ते, बट आय कॅन्ट जस्ट टॉलरेट इट एनीमोर, आय लव्ह हर,आय लव्ह हर लाईक एनिथिंग अ‍ॅन्ड आय जस्ट कॅन्ट थिंक माय लाईफ विदाउट हर!!" 
"सी निहार, यु हॅव टु थिंक केअरफुली बिफोर टेकिंग एनी डीसीझन!" 
"या अ‍ॅम अवेअर ऑफ इट! लेट्स होप फॉर द बेस्ट! थॅंक्स रॉन!!" 
"जोजो! टु लार्ज मोर!" 

एमरजन्सी लँडींग झालेली फ्लाईट लवकरच क्लिअर झाली. अवघ्या एका तासात फ्लाईट टेक ऑफ्फ झाली आणि त्याच्या जीवात जीव आला.घरी जाउन प्रिटीला सरप्राईजच देतो.तो तिच्या स्वप्नात परत हरवून गेला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर फ्लाईटरात्री ३ वाजता लँड झाली.
४ वाजता तो एअरपोर्टच्या बाहेर पडला. कॅब पकडली आणि घराच्या दिशेने निघाला.
काय करत असेल आता प्रिटी??झोपली असेल की माझी वाट पाहत जागी असेल?

"तू अशी विस्कटलेलीच छान दिसतेस, यूवर धिस मेस्सी लूक किल्स मी!" 
हनीमूनच्या पहिल्या रात्री जेव्हा सकाळी जाग आली होती तेव्हा ती तशीच विस्कटलेली बेडवर पडली होती. किती तरी वेळ तो तिला तसाच पाहत होता.
"यु मेस्ड मी!" असं बोलून ती अलगद त्याच्या कुशीत शिरली.आजही ती तशीच दिसेल.त्याला धीर होत नव्हता.

"निहार,आपण कुठे चाललोय??"
"वी आर ऑन द वे टू हेवन! एक मस्त जागा आठवलीय!" 
"पण कुठे ते सांग ना!" 
"चल पोहचल्यावर बघ! तू मला विसरून जाशील!" 
"मग ती जागा नक्कीच इतकी खास नसेल!" 
"का गं?" 
"तुझा विसर पाडेल अशी फक्त एकच गोष्ट या जगात आहे!!" 
"अच्छा?? कोणती गं?" 
तिने त्याचाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं,"फक्त तूच रे! अजुन काही नको मला!" 
एका तासाभरात मुख्य रस्ता सोडून एका आडवाटेला त्याने कार वळवली आणि अर्ध्या तासाने एका ठीकाणी थांबवली. 
पावसाळ्याचे दिवस होते.आभाळ भरलं होतं. गाडी पार्क करुन दोघेही चालू लागले.सगळीकडे हिरवीगार सृष्टी, दुधाचे पान्हे फुटावे त्याप्रमाणे डोंगरातुन पांढरेशुभ्र झरे, धबधबे कोसळत होते्. गार वार अंगाला झोंबून जात होता. एका दोन तास मस्तपैकी गप्पा मारत्,गाणी गात ते वर चढुन गेले. चालत चालत ते एका कड्यावर आले. आणि समोरचं दृश्य बघुन प्रिती हरखून गेली.सगळीकडे हिरवळ पसरली होती. ते दोघे ज्या कड्यावर उभे होते तिथे खोलवर पसरलेली एक दरी.दूर कुठुन तरी दुथडी भरून वाहणारी नदी,सगळीकडे नुसती हिरवळ्,गानारे पक्षी,कोसळनारे धबधबे! खरोखरच स्वर्ग होता तो!! हलका हलका पडणारा पाउस आता कोसळू लागला आणि इतका कोसळू लागला की समोरचं काहीच दिसेना. दोघेही पावसात धुंद झाले होते. ती एकटक त्या  निसर्गाचच्य चित्राकडे देहभान हरपून बघत उभी होती.
"बोललो होतो ना मी की तू मला विसरून जाशील म्हणून!" 
ती लाजली "नाही रे, तुझ्याइतकं मला कोणीही वेड लावू शकत नाही!" 
बोलताना ती गारठलेली होती आणि थंडीने थरथर कापत होती. तिला त्याने जवळ घेतलं,ह्रदयाशी घट्ट कवटाळलं. त्याच्य डोळ्यांतुन आसवे वाहू लागली पण पावसाच्या पाण्यात तिला ती जाणवली नाहीत.
"प्रिटी??" 
"हं?" ती मिठीतुन दूर न होताच उदगारली!
"आठवतं तुला मरीन ड्राईव्हवरची पहीली किस्स? असाच पाउस कोसळत होता ना!" 
"हो!" त्याने तिचा निथळणारा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीतघेतला आणि थरथरणार्‍या तिच्या ओठांवरील थेंबांना प्राशुन घेवू लागला. कितीतरी वेळ दोघे एकमेकांत विरघळून गेले होते... 

"निहार!!!!! नको प्लीज! निहार ! अ‍ॅम सॉरी! निहार! आय लव्ह यु, आय लव्ह यु सो मच!" 
घाबरलेली प्रिती कड्याच्या टोकावर कशीबशी लोंबकळत, वर येण्यासाठी हात पाय मारत प्रयास करत होती.भीतीने तिचं शरीर गलितगात्र झालं होतं. ती त्याच्याकडे गयावया करत होती.
तो खाली झुकला.कपाळावर हात ठेवून तिच्याकडे बघू लागला. कमरेच्या सॅकमधे असलेले पिस्तुल बाहेर काढले.. 
"अ‍ॅम सॉरी प्रिटी! अ‍ॅम रिअली सॉरी! आय लव्ह यु टु स्विटहार्ट! आय लव्ह यु लाईक एनिथिंग!" तिच्या कापाळाचं चुंबन घ्यायला तो खाली झुकला आणि प्रितीने तिच्या हाताला लागलेला दगड जोरात त्याच्या कपाळावर मारला! तो व्हिव्हळला आणि त्या वेदनेत एक गन शॉट फायर झाला! 
" निहाहाहाहार...!!!!!!" एक आर्त किंकाळी दरीत कोसळली.....

कॅब थांबताच तो पळतच बिल्डींगमध्ये शिरला.लिफ्टची वाट न बघताच पळतच चार फ्लोअर चढून गेला. त्याच्याकडल्या चावीने त्याने हळूच दरवाजा उघडला. सकाळचे ५ वाजले होते.
ती झोपली असेल का? त्याला धीर होत नव्हता. आज २ महिन्यानी तो तिलाबघणार होता. त्याचे सारे प्राण अधिर होउन त्याच्या डोळ्यात साठले होते.बेडरुमचा दरवाजा हळूच लोटला आणि ती त्याला दिसली.
तशीच विस्कटलेली पण यावेळी तिला  विस्कटवणार्‍या कुणा दुसर्‍याच्या मिठीत ती विसावली होती........

 

Sunday, February 13, 2011

फ्रॉम द ओल्ड डायरी...

त्यादिवशी अ‍ॅप्सशी ( अपर्णा ) चॅटवर बोलताना डायरीची आठवण झाली. डायरी कधी काळी लिहायचो, काहीतरी खरडायचो..म्हणजे नेहमी नाही हां. रोजनिशी वैगरे तसला प्रकार नाही. बस्स कधी असाच कंठाळा आला की काहितरी खरडत बसायचं. बरं ती डायरी सर्वसमावेशक असायची. म्हणजे त्यात माझं मनातलं खरडणं, क्लायंटसचे अ‍ॅडरेसेस, फोन नंबर. क्वेरीज, ऑफीसच्य मिटींग्जच्या नोट्स सारं काही. म्हणजे ती डायरी कुणाच्या समोर उघडू पण शकत नसे.. आजकाल मी डायरी वापरत नाही, लॅपटॉप आल्यापासून. आता डायरीची जागा लॅपटॉपने घेतली. यातही बरचं काय काय आहे. पण नशीब वेगवेगळ्या कप्प्यात ठेवता येतं. त्यामूळे लॅपटॉप हवा तिथे कुणाच्याही समोर ओपन करून माझं काम करता येतं. आणि खरं सांगतो लॅपटॉपवर जितक्या पटपट सुचत ना, तितकं डायरीवर नाही सुचायचं..
तर डायरी.. आज संध्याकाळी घरी आल्यावर मम्मीच्या मागे लागून लागून तिला शोधायला लावली. डायरी शोधता शोधता अजुन दोन डायर्‍या सापडल्या. त्या डायरीला बघताच असचं पटकन काळजात थोडसं दुखलं. डायरी हातात घेतली, मम्मीच्या शिव्यांसकट. डायरीवरली धूळ हलकेच पुसली. असचं कुणीतरी खूप वर्षानी आपल्याला भेटावं आणि आपल्याला त्या व्यक्तीने स्पर्श करावा, मायेचा हात केसांवरुन फिरवावा तसं जाणवलं. डायरी उघडली, पहिल्या पानवर माझं नाव, त्याखाली माझा त्यावेळचा सेल नंबर आणि माझा रेडीफमेलाचा  ई मेल आयडी dparulekar@rediffmail.com आईशप्पथ! मी हा आय डी विसरुनच गेलो होतो.. 

हलकेच पानं उलटु लागलो आणि आपोआप मन मागे मागे जाउ लागले. काय काय लिहिलं होतं त्या डायरीत. कुणाकुणाच्या कविता, गाणी.. कुणाकुणांची नावं.. कैच्या कै होतं सगळं. त्यावरुन एक किस्सा आठ्वला. ४ वर्षांपूर्वी मी नेट फोर मध्ये असताना माझ्या टीममधल्या एका मुलाला माझी डायरी दिली आणि बोललो अरे इथे बघ जरा, इन्वेंचर सिक्युरिटीज चा  नंबर आहे त्याला फोन कर आणि पेमेंट स्टेट्स विचार.. थोड्यावेळाने तो आला, " सर राँग नंबर आहे!" 
"काय? राँग नंबर कसा असेल? अरे मी नेहमी याच नंबरवर बोलतो तिथे.. पुन्हा ट्राय कर !" 
तो परत गेला आणि थोड्या वेळाने परत आला, " सर! राँग नंबर आहे, ती बाई ओरडते मला सारखी!" " बाई??? कोण बाई??"  (हा तर अर्जुनचा नंबर आहे मी मनात पुटपुटलो) अरे , तू कुणाल कॉल करतोयस? 
"सर ह्याच नंबरवर पल्लवी मॅडमना" 
"आयचा घोव तुझ्या! साल्या इथे अर्जुन लिहिलय ते दिसत नाही तुला, पल्लवी बरोबर दिसली..!!" 
"तुझाच टीममेट ना तो!" कूणी तरी मध्येच खेकसलं.. 
त्या डायरीमधे मला सवय होती (अजूनही आहे) कंठाळा आला की मुलींची नावं, जी मला आवडतात ती मी वेगवेगळ्या फाँट्समध्ये काढायचो, त्यात जास्त नक्षत्रांची नावं असायची म्हणजे उत्तरा, पूर्वा, जेष्ठा, रोहिणी वैगरे..वैगरे... कधी त्यात मैत्रीणींची नावं जसं या पल्लवीचं होतं.. असो.

टीसीएस मध्यी झालेल्या एका मिटींगची मिनीटस आहेत. वेल, मिनीट्सच्या शेवटी मी त्या टीसीएस च्या मुलीचं नाव लिहीलं होतं,मौसुमी. आणि तिचा सेल नंबर आणि पर्सनल आयडीपण.. हि एक चांगली मैत्रीण होती म्हणजे आता कुठे आहे माहित नाही..
जागोजागी रिहानाचं नाव पण कोरलयं.. वेल माझी फेव्ह सिंगर आहे हां !
ओह! हो!! कधी काळी तबला शिकायला जात होतो.. त्या क्लासमधले नोट्स आहेत.. 
तालः त्रिताल, मात्रा: १६, भागः ४ ( ४*४) , ३ टाळ्या, एक खाली.. २,५,१३ या मात्रांवर टाळी. ९ व्या मात्रेवर खाली.. हे हे हे.. 
( बायदवे त्या क्लासमधे गाणं शिकवणारी एक मुलगी सहीच होती.. अर्पिता की काय नाव तिचं.. मला गाणं शिकायचा मोह आवरला नव्हता.. असो :) नंतर पनवेला राहायला आल्यावर तबला बंद झाला)
 
नंतर दुसरी डायरी उघडली यात पहिली ३-४ पाने खरडली होती. लेखाचं नाव होतं "संध्याकाळची संध्या" वेल, शाळेत असताना एका मुलीवर जरा जास्तच सिरिअस झालो होतो.शाळेतल्या त्या आठवणी खरडल्या होत्या.वाचून अगदी हसायलाच आलं.काय काय लिहिईलं होतं मी तिच्याबद्दल. हे हे हे !! 
नतंर काही पानांवर कवी ग्रेस यांच्या काही कविता उतरवल्या होत्या.
पुढल्या पानावर अजुन एक लेख" Forgiving But Never Forgets!" 
नको ! हा लेख वाचावासा नाही वाटला, फक्त नजर फिरवली आणि पुढे वळलो. 
पुढे खोडलेले, अर्धवट परिच्छेद दिसले. कदाचित पुढे काही सुचलं नसेल किंवा भरकटलो असेन म्हणून अर्ध्यावरच सोडून दिलेले.
प्रत्येक पानावर नावं आहेत कोरलेली (खर्‍या नक्षत्रांची). 
एका पानावर मी माझ्या मित्रांची नावं लिहिली आहेत. तेजस, सिरीष्,समीर खान्,बन्या, गोकूळ्.,अमोल्,योगेश्,विजय... का लिहिली होती ते आठवत होतो, जाउ दे आठवत नाही...
"माझे प्रश्न फारसे वेगळी नाहीत फक्त त्यांचे संदर्भ वेगळे आहेत." या वाक्याने सुरु केलेला आणि अर्ध्यावरच सोडलेला एक उतारा सापडला.तो अर्ध्यावर का सोडला हे कळलं वरच्या वाक्याने सुरु होउन तो ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत पोचला होता म्हणून त्याला आवरला...:) 
बाजुलाच CHELSEA, ACHILLES  आणि TROY असं कोरलंय.
LUFTHANSA,VENOM, OSCAR  हे पण वेगवेगळ्या फाँट्समध्ये.
मी पार्ल्याला राहायला होता तेव्हा टेरेसवरुन नेहमी लँड आणि टेक ऑफ होणारी विमानं पाहायचो.तो कसला तरी छंदच होता अणि मग वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या लोगोज आणि प्लेन्स काढायचो. LUFTHANSA आणि QANTAS कांगारु एकदम फेव्हरिट.त्या पहिल्या डायरीत बरीच प्लेन्स सापडली..  
"कधी कधी हे जगणं नकोसं वाटतं, एकच क्षणात सारं संपवून टाकावसं वाटतं" अम्म्म फ्रस्ट्रेट असेन... :) 
२५ व्या बर्थडेच्या वेळी लिहिलेला "वळणं" नावाचा लेख आहे. यात स्व:ताची जरा जास्तच स्तुती केलीय मी...... 
२६.१२.२००९ला ( पहिल्यांदा मी एखाद्या लेखाला तारिख टाकली होती ) त्या वर्षाचा आढावा घेणारी २-३ पाने दिसली.. वाचून सगळं डोळ्यांसमोरुन झर्र्कन निघून गेलं.पूढे माझ्या काही  चारोळ्या.. वेल या डायरीत फक्त लेख आणि कविताच आहेत म्हणजे ही डायरी फक्त मी खरडण्यासाठी वापरत असे.. 

ट्युलिपमध्ये जॉईन झाल्यापासून मी नेहमीच्या नोट्ससाठीपण डायरी हा प्रकार वापरत नव्हतो, जे काही आहे ते सगळं नोट्पॅडवरच टायपतो.. एकदा बॉस भडकला होता, जब लॅपटॉप खराब हो जाएगा तो क्या करेगा?? 
अरे काळ्या जीभेच्या जरा चांगलं बोलत जा की जरा! पण तो बोलला ते पटलं. मागल्या कंपनीत असताना लक्ष्मीपुजनाच्या वेळी भटजीनी वाट्लेल्या लक्ष्मीमातेचं चित्र असलेलीं चोपडी सापडली. पहिल्याच पानावर कसलं तरी लक्ष्मी यंत्र की काय आहे.असो सध्या हीच ऑफीशिअल डायरी म्हणून वापरत होतो. दोन दिवसांपूर्वी ऑफीसमध्ये माझ्या नावाचं एक जाडजूड पर्सल आलं. DOW CORNING या क्लायंट्सकडून आलं होतं. काय असेल त्यात म्हणुन ओपन केलं ४ डायर्‍या होत्या.. स्वःताला एक ठेवून बाकीच्या टीममधल्या ३ लोकांना दिल्या.
ती डाव कॉर्निंगची डायरी इतकी मस्त आहे की, ऑफीशिअल नोट्स लिहून खराब करावीशी नाही वाटतं.. नक्षत्रांनो मी येतोय... 
अशी डायरीची मज्जा मज्जा!  
आताची डायरी म्हणजे माझा लॅपटॉप आणि त्यात असलेलं डी नावाचं फोल्डर. आणि हो जीमेलचा ड्राफ्टबॉक्स पण!!
चला जपून ठेवतो. परत कधी कंठाळा आला की वाचायला काढेन..