Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Monday, November 18, 2019

आभाळ नेसूनि ये..

विझला सूर्य, निजली संध्या
तू चंद्राला जागवीत ये
चांदण्यांची फुले माळूनी
रात्र सारी फुलवित ये

काळोखाचे काजळ अन्
लाली त्या संध्येची घे 
गर्द घनांची शाल ओढुनी 
आभाळ सारे नेसूनि ये

नक्षत्रांचा हार गळा 
बांधून पैंजण लाटांचे
वाऱ्यावरती स्वार होऊनि 
अलगद अवनीवरती ये

गात तराणे मुग्ध नदीचे 
क्षितिजावरती नाचत ये
पाऊलखुणा शोधीत माझ्या
हासत ये, लाजत ये

ये प्राणांची ज्योत होऊनि 
वेड्या मनाची प्रीत होऊनि 
स्वप्न साजिरे तुटण्याआधी 
ये जराशी मिठीत ये.. 


- दीपक परुळेकर 



Wednesday, December 18, 2013

कोंकणसफारी - सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट आणि किल्ले निवती

दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार ६ डिसें. आजचा पल्ला जास्त लांब नव्हता, जाउन येउन शे-दिडशे किमी. वेंगुर्ला - मालवण- किल्लेनिवती-वेंगुर्ला. आज जरा जास्त टप्पे गाठायचे असल्याने ५ रु./किमी या रेटने आम्ही बाईक घेतली. बाईक जरा महागच पडणार होती. पण त्यामुळे आमचा बराच वेळ वाचणार होता. सकाळी नउ - साडेनउच्या दरम्यान आम्ही गावातुन निघालो. वेंगुर्ल्याहुन मालवण नविन झालेल्या सागरी महामार्गाने ४५ किमी. आहे. वाटेत माझं गाव परुळे लागणार होतं. वेंगुर्ल्याहुन दाभोली-केळूस-म्हापण-पाट-परुळे-चिपी-मालवण असा रुट आहे. वेंगुर्ल्याहुन निघुन दाभोलीच्या सड्यावर पोचलो तेव्हा दहा वाजले होते. कोकणातला हा सडा मला जाम आवडतो. नजर जाईल तिथवर पठार आणि भिरभिरणारा वारा. या दिवसांत कापावर सोनेरी गवत उगवलं होतं. दूरवर पसरलेलं ते सोनेरी पठार आणि मधुनच डोकं वर काढणारा एखादा 'मांगर'. पावसाळ्यात या सड्याचे रुप काय ते वर्णावे. पावसाळ्यात संपूर्ण गवत  नाहीसं झालेलं असतं आणि सड्यांच पूर्वीचं रुप म्हणजे तो काळा कातळ. पावसाळ्यात भिरभिरणार्‍या वार्‍यासोबत अंगावर पावसाच्या सरी झेलत या सड्यावरुन फिरण्याची मजा काही औरच! एका ठिकाणी थांबून या सड्यावर काही फोटो घेतले. वाहन असलं की एक बरं असतं एखादी फ्रेम लोकेट झाली की गाडी थांबवून लगेच ती शूट करायची. 








सडा संपला आणि खाली वळणावळणाच्या घाटउतारातुन आम्ही केळुसला पोचलो. केळुसच्या पुढे अजुन एक घाट. तो संपवून आम्ही म्हापण मार्गे पाट या गावी आलो. पाटावरुन डावीकडला रस्ता परुळे - निवती - भोगवे - मालवण आणि पुढे आचारा, देवगड असा जातो. हाच नवीन सागरी महामार्ग. पाटला सस्त्याच्या डावीकडे माउलीचं सुंदर मन्दीर आही आणि उजव्या बाजुला एक तळं आहे. हे तळं सदानकदा लाल आणि सफेद कमळांनी फुललेलं असतं. सगळीकडे नुसती कमळंच. फारच सुंदर !

त्यानंतर वाटेत माझ्या गावच्या प्रसिद्ध वेतोबाच्या मंदीरापाशी थांबलो. आईने तिथे देवाला नारळ वाहायला सांगितला होता. देवदर्शन झाले आणि पुढे काही वेळातच आम्ही माझ्या गावी परुळे इथे पोचलो. शुक्रवार असल्याने आज गावचा बाजार होता. पण पहिल्यासारखा बाजार भरलेला अजिबात वाटत नव्हता. मला आठवतं लहानपणी मी आजीबरोबर बाजाराला यायचो. धम्माल असायची. आज्जी आईस्फ्रुट, भजी, फरसाणं, अजुन काय काय असं बरंच काही खायला घेउन देत असे. बाजार भरगच्च भरलेला असायचा. आता फक्त नावालाच उरला होता. 


श्री देव वेतोबा :- परुळे



  मंदिराच्या आवारात एक छान मुर्ती होती.:-


    परुळे बाजार :-

परुळ्यात जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे निघालो कारण परुळ्यात पोहचेपर्यन्त सव्वा अकरा वाजले होते. तिथुन एका छोटा घाट चढलो आणि पुन्हा एका सड्यावर आलो. इथे सध्या चिपी एअर पोर्टचं काम सुरु असल्याने मालवणकडे जाणारा मार्ग डायव्हर्ट केला होता. त्यामुळे आम्हाला सहा किमीचा अतिरिक्त फेरा पडला. एअरपोर्टचं काम अतिशय जोरात सुरु आहे. आम्ही गेलो तेव्हा रनवेचं काम सुरु होतं.

चिपीहुन मग आम्ही मालवणच्या दिशेने निघालो आणि इथे एका अतिशय सुंदर जागी येउन पोचलो.  मालवण आणि चिपी ( परुळे ) या दोन गावांच्या मधुन कर्ली नदी वाहते. हल्ली काही वर्षांपूर्वीच या नदीवर एक ब्रीज बांधलाय. तत्पूर्वी मला आठवतं, मालवणला जायला आम्हाला परुळ्याहून चिपीच्या पुढे कोरजाई गावी जावं लागे. इथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. कोरजाईहुन होडीने आम्ही मालवणला जायचो. पण आता या ब्रीजमुळे मलावणला लवकर पोचता येतं. त्या ब्रीजवर जेव्हा पोचलो तेव्हा समोरचं दृश्य वेडावून टाकणारं होतं. प्रचंड मोठी अशी ती कर्ली नदी संथ वाहत होती. त्या विशाल पात्राच्या दोन्ही बाजुच्या किनार्‍यावर माड डोलत उभे होते. दूरवर पसरलेलं ते नीळेशार पाणी अगदी डोळ्यात साठवून घेतले होते. या नदीवरला हा ब्रीज माझी अत्यंत आवडती जागा आहे. काही वर्षांपूर्वी मी या ब्रीजवरुन गेलो होता तेव्हाच अगदी हा ब्रीज आणि ते लोकेशन माझ्या मनात भरलं होतं पण त्यावेळी माझ्याकडे कॅम नव्हता. अशाचप्रकारचं पालघरला असलेल्या केळव्यातल्या दांडा खाडीवरलं ब्रीज मला भयंकर आवडतं. म्हणजे ते लोकेशन इतकं रोमँटीक आहे ना ! तसंच कर्ली नदीवरलं हे लोकेशन तर कळसच होतं. तिथुन पाय उचलवत नव्हता पण जमेल तितके फोटो घेउन आम्ही आता नॉनस्टॉप मालवणकडे निघालो. 


माडांतुन वाहणारी कर्ली नदी :- 








मालवण बाजारपेठेतुन वाट काढीत आम्ही जेट्टीवर पोचलो तेव्हा बारा वाजले होते. दुपारच्या उन्हात सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभा होता. आम्ही पटकन किल्ल्याची तिकीटे घेतली आणि होडीतुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. जस जसा किल्ला जवळ येत होता तसं तसं अभिमानाने छाती भरुन येत होती. आज पहिल्यांदाच मी या किल्ल्यावर जात होतो. होडीतुन मुख्य दरवाज्यापाशी उतरल्यावर होडीवाल्याने एका तासांत किल्ला बघुन यायला सांगितलं. महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे मुख्य द्वारही 'गोमुखी' आहे. 

                 
मालवणचा किनारा :)






किल्ल्यावर बरीच वर्दळ होती. मुख्य दरवाज्यातुन शिरताना दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेतलं. नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिजच्या कृपेने नकाशा सोबत होता. नकाशा सोबत असल्याने किल्ला फिरताना आणि बघताना चुकायला होत नाही आणि किल्लाही लवकर बघून होतो. किल्ल्यात दर्शवल्याप्रमाणे सर्व प्रथम आम्ही महाराजांच्या हाताचे ठसे असणारी जागा शोधायला लागलो. नकाशात दाखवल्याप्रमाणे नगारखान्याच्या वरच ती जागा सापडली. महाराजांच्या हाताचे ठसा असलेली त्या जागेला एक छोटा दरवाजा केलाय आणि त्याला कुलूप लावले आहे. पण दरवाजा जाळीदार असल्याने ठसा दिसतो. मला वाटतं त्या ठश्याला चुन्याचा हात मारला आहे. तिथे नतमस्तक होउन आम्ही नकाशात दाखवल्यापप्रमाणे तटबंदीवरुन चालायला सुरुवात केली. इथुन समुद्र मस्तच दिसत होता. किल्ल्याच्या बुरुजावर लाटा अलगद आदळत होत्या. पाणी अगदी हिरवंगार होतं. उन मी म्हणत होतं पण वार्‍यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. आम्ही ज्या बाजुने फिरत होतो त्याबाजुला काहीच नव्हतं. त्या भागात दलदल माजली होती. 










मग बरंच चालल्यावर एका बाजुने शिवराजेश्वर मंदीराच्या मागच्या बाजुला खाली उतरलो. मंदीरात जाणार इतक्यात दुसर्‍या होडीतुन आलेली माणसं आत शिरली. गर्दीत नको म्हणुन मग आम्ही पुढे गेलो. तिथुन मग महादेव मन्दीरापाशी गेलो. महादेवाचे दर्शन घेतले. मंदिरात एक अतिशय लहान म्हणजे ३ बाय २ फुट आकाराची आयताकृती विहीर कशी होती. स्थानिकांच्या मते ते एक भुयार आहे. जे थेट मलवण शहराच्या उत्तरेकडे असलेल्या ओझर या गावी एक मठ आहे तिथे उघडते. 
महादेवाच्या मंदीरापासुन थोड्याच अंतरावर दूध बांव, दही बांव आणि साखर बांव अशा गोड पाण्याच्या विहीरी आहेत. ( बांव = विहीर ). हा किल्ला समुद्रात उभा असुनही आतमध्ये असलेल्या या गोड पाण्याच्या विहीरी महणजे आश्चर्यच मानले जाते. किल्ल्यावर असलेल्या रहिवाशी हेच पाणी वापरतात. पुढे काही अंतरावर भगवती देवीचं मंदीर आहे. तिथुन मग पुढे पायर्‍या.ववरुन चढुन आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. किल्ला बघुन संपला होता पण मघाशी राहिलेल्या शिवराजेश्वर मंदिरात जायचं राहुन गेलं होतं. मुख्य दरवाज्याच्या तटबंदीवरुन उतरुन मंदीरात गेलो. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली. 

भगवती मंदिर 


 श्री शिवराजेश्वर मंदिर




आता किल्ल्याविषयी थोडी ऐतिहासिक माहिती: ( साभार विकी आणि ट्रेक क्षितिज )

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।

मालवणच्या समुद्रात असलेल्या ''कुरटे'' बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना आज्ञा केली; " या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्यांंशी बंदरी ऐशी जागा नाही"! दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्या वरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.


 गडफेरी आटपून आम्ही आमच्या ३३ नंबरच्या बोटीत येउन बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. एव्हाना २ वाजले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. थोडावेळ फिरल्यावर बाजारात 'चैतन्य' हे ओळखीचे नाव दिसले आणि तिथेच जेवायला बसलो. जेवण तर अप्रतिम होते. पण या चैतन्यवाल्यांचे एक रेस्टॉरंट प्रभादेवीला सिद्धिविनायकाशेजारी आहे. पहिल्यांदा तिथे सुद्धा फार चांगलं जेवण मिळायचं पण आता त्या जेवणला चवच नसते. असो. इथे मालवणात आम्हे भरपेट मासे खाउन पुढे राजेकोट आणि सर्जेकोटसाठी निघालो. 

जेवणाची वाट बघतोय. :) 




मलवण जेट्टीवरुन उत्तरेकडे राजकोट आहे. सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी महाराजांनी पद्मगड, राजेकोट आणि सर्जेकोट हे किल्ले देखिल बांधले. आता या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास काहीच नाहीए. स्थानिक मोकळ्या जागेचा उपयोग मच्छी सुकवण्यासाठी करतात. पण इथुन सिंधुदुर्ग किल्ला फार छान दिसतो. बाजुलाच खडकांमध्ये एक छोटे चर्च अगदी उठुन दिसते. 

राजेकोटवरून मालवण बंदर :) 

     राजेकोट




 राजेकोटवरुन सिंधुदुर्ग किल्ला 









राजकोटावरुन मग आम्ही बाईक सर्जेकोटाकडे वळवली. मालवण - आचरा - देवगड सागरी महामार्गावर मालवणपासुन ४-५ किमी वर कोळंब खाडीवरलं ब्रीज पार केल्यावर डावीकडे एक वाट जाते त्या वाटेने सरळ जावे. सर्जेकोटावर काही नाही. प्रवेशद्वार छोटेसे पण कमानदार आहे. आत मध्ये बरीच झाडी माजली होती. तटबंदीचे अवशेष अधुन मधुन डोके वर काढत होते. बाहेर असलेल्या मंदीरच्या बाजुने गेल्यास खाडीच्या बाजुची तटबंदी आणि बुरुज अजुनही शाबूत आहेत. बाकी फक्त जंगल आणि झाडी. 

 सर्जेकोट प्रवेशद्वार आणि तटबंदि :- 



सर्जेकोट संपवून मग आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने निघालो. किल्ले निवतीला जाण्यासाठी आम्हाला परुळ्यातुन जायचे होते. नुसार आम्ही पुन्हा मालवण - चिपी - परुळे अशा प्रवासाला लागलो.  या वाटेवर कुठेतरी माझ्या निकॉन कॅमची लेन्स कॅप पडली ती माझ्या चिपीला आल्यावर लक्ष्यात आलं. असो. इथे कापावर एक सुंदर फ्रेम मिळाली. पण त्य टेंपो ट्रॅव्हलरच्या जागी एसटी असली असती तर ती फ्रेम अजुन खुलली असती. 


आम्ही परुळ्याला पोचलो तेव्हा साडेचार वाजले असतिल. तिथल्याच एका हाटेलात मस्त चहा मारला. इतक्यात समोरुन कुडाळ - किल्लेनिवती बस निवतीच्या दिशेने गेली. चहा संपल्यावर आम्ही पण निघालो. परुळे हा माझा गाव. पण शाळेसाठी मी माझ्या मामाच्या गावी असायचो आणि सुट्टी पडली की इथे यायचो. पण माझं मन इथे कधी लागायचं नाही. परुळे हा अतिशय निसर्ग संपन्न गाव. कर्ली नदी, भोगवे बीच, देवबाग, तारकर्ली यामुळे अजुनच खुलून दिसणारा. पण लहानपणी म्हणजे दहावी होईपर्यंत मल ह्या जागा फक्त ऐकून माहीत होत्या. आणि आज मी तिथे मनसोक्त उंद्डत होतो. परुळ्यातुन एक छोटा घाट चढुन आम्ही सड्यावर आलो. काहीवेळाने दोन रस्ते दिसतात. किल्लेनिवतीसाठी डावी मारायची आणि भोगवेसाठी उजवीकडे. आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने वळलो. काही वेळाने मघाशी बाजारातुन किल्ले निवतीला जाणारी बस इथे आम्हाला दिसली. तिच्यामागोमाग आम्ही किल्लेनिवतीला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. तिथुनच किल्ल्याकडे जाणारा कच्चा गाडी रस्ता आहे. बाईक रेमटावत आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि डाव्याबाजुला असलेल्या विहंगम निवती किनार्‍याचे दर्शन होताच हरखुन गेलो. अतिशय सुंदर असा हा किनारा इथुन किती सुंदर दिसत होता म्हणुन सांगू. 


यावेळी नकाशा नव्हता मग थोडं चढुन गेल्यावर झाडीतुन डोकावणारी तटबंदी दिसली. तितून आत शिरलो तर फक्त झाडीच झाडी पुढे काही दिसेना. त्या झाडीतुन वाट काढत उजवीकडे गेलो आणि एका मोकळ्या पठारावर आलो. बाजुला एक जंग्या बुरुज दिसला. तिथुन पुढे चालत आलो आणि समोरचं दृश्य पाहुन थबकूनच गेलो. समोर भोगवेचा किनारा शांतपणे पसरला होता. आम्ही बसलो ती जागा किती तरी शान्त होती. आवाज फक्त वार्‍याचा होता. कितीतरी वेळ आम्ही तिथे बसलो होतो. समोरच्या किनार्‍यावरुन नजर हटतच नव्हती. दुरवर अस्पष्टसा सिंधुदुर्ग दिसत होता. 







तिथुन उठावसं वाटत नव्हतं पण पुढे ४० किमी परतीचा प्रवास बाईकवरुन काळोखात होता. म्हणुन जरा घाई करुन निघालो. सुर्य एव्हाना पश्चिमेकडे कलला होता. सुर्यास्त टीपायचा होता पण घाई करुन घरी पोचणं गरजेचं होतं. तिथुन उठलो आणि पुन्हा त्या मोकळ्या पठारावर आलो आणि तिथे अजुन एक बुरुज दिसला. नकाशा नसल्याने किल्ला समजत नव्हता. मग त्या बुरुजाच्या मार्गाने गेलो. तिथे एक छोटंसं टाकं दिसलं जे झाडीने व्यापले होते. तिथुन एका आतमध्ये शिरलो आणि कळलं की खरं किल्ल्याचं वैभव इथे होतं. आम्ही त्या डावीकडल्याच बुरुजावरुन निघणार होतो. इथे किल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत. हा बालेकिल्ला असावा. इथुन पुढे टोकावर गेल्यावर फक्त समुद्रच समुद्र दिसतो.  बालेकिल्यावर अजुनही तटबंदी, प्रवेशद्वार, देवड्या आहेत. इथुन खाली समुद्रकिनार्‍यावर काही नारिंगी रंगांचे खडक दिसतात. समोर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे समुद्रात असलेले दीपगृहही दिसते. इथे सुर्यास्त टीपून आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. 

बालेकिल्ला 

सुर्यास्त :) 



काळोख पडलाच होता. पुन्हा त्या मार्गाने सड्यावरुन जाताना आता थंडी जाणवत होती. परुळ्यात उतरुन पुढे कुठेही जास्त वेळ न थांबता वेंगुर्ला बंदरावर जाउन बसलो तेव्हा साडे आठ वाजले होते. बंदरावर ताजे मासे घेउन कोळणी विकायला बसल्या होत्या. तिथे थोडावेळ बसुन मग घरी पोचलो. जाउन -येवुन १५० किमीचा प्रवास झाला होता. ५ रु./किमी या रेटने ७५०/-  रु. झाले होते. मध्येच आम्ही २००/- रु. पेट्रोल भरलं होतं त्याचे वजा करुन पाचशे रु. आम्ही बाईकवाल्याला दिले. आणि घरी परतलो. आजचा दिवस मस्तच झाला होता. एकुण चार किल्ले बघुन झाले होते खर्चही आटोपशीर होता. दुसर्‍या दिवशी गावच्या एका देवीची श्री खाजणादेवीची जत्रा होती. पण आमच्या प्लॅनप्रमाणे रेडीचा गणपती, यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला, सावंतवाडी असा प्लॅन होता....


Tuesday, December 17, 2013

कोंकणसफारी - किल्ले विजयदुर्ग


गावच्या जत्रेला जायचा योग यावर्षी तब्बल १७ वर्षांनी जुळून आला होता. मी आणि आई दोघेही; मी नववीत असताना जत्रेला गेलो होतो त्यानंतर कधी जमलंच नाही. मुंबईला आल्यावर जत्रेला जायची खूप इच्छा असायची पण कधी अभ्यासामुळे तर नंतर कधी कामामुळे जमत नव्हतं. यावेळी जमलं. जत्रा विकांताला होती. मग विचार केला की गावी जातोयच तर जरा व्यवस्थित फिरुन पण घेउ. गावी दहा वर्षे होतो पण त्यावेळी शाळेमुळे कुठे धड फिरायला मिळाले नव्हते. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वेंगुर्ला बंदरावर कधी गेलो नव्हतो. नेहमी एस.टी.तुन प्रवास करताना बस वेंगुर्ल्याच्या डोंगरावर आली की बसमधुन वेंगुर्ला बंदराचे विहंगम दृश्य दिसायचं फक्त १०-१२ सेकंदासाठीच. पण ते बघयालाही मी तेव्हा जाम धडपडायचो. यावेळी विचार केला की कोकणातलं जे काही फिरायचं, बघायचं राहुन गेलयं ते यावेळी बघून घ्यायचं. को़कणात फिरण्यासारख्या जागा म्हणजे नितांत सुंदर समुद्र किनारे. लखलखत्या वाळूचे, चमचत्या हिरव्यागार पाण्याचे, खार्‍या वार्‍यावर डोलणार्‍या माडांचे. समुद्र म्हणजे जीवसखा. पण यावेळी ओढ होती ती समुद्रावर आसणार्‍या ऐतिहासिक किल्ल्यांची. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. किल्ले निवती, यशवंतगड वैगरे लिस्टवर होते. मग ठरवलं आणि निघालो. सोबतिला सचिन पाटील हा माझा मित्र होता. बुधवारी ४ डिसेंबरला पनवेलहुन जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चेक इन केलं. गावी जायला ही ट्रेन मी नेहमी प्रेफर करतो. फक्त ६ तासांत मुंबईहुन कुडाळ. सकाळी पावणे सातला पनवेलहुन ट्रेन पकडली आणि १२:४५ ला कुडाळला हजर. कुडाळला माझा मावशी राहते. तिला अगोदरच सांगुन ठेवलं होतं त्याप्रमाणे तिने मच्छी कढी करुन ठेवली होती. :)

दुपारी तिथे मस्त जेवून पुढच्या प्रवासाला म्हणजे वेंगुर्ल्याला जायला निघालो. त्यादिवशी कुडाळचा बाजार होता त्यामुळे एसटीला गर्दी असणं साहजिक होतं. पण इतकीही गर्दी नव्हती. कोकणात बराच विकास झालेला दिसतो. बहुतांश लोकांकडे आता स्वत:ची वाहनं झालीत. कुडाळहुन वेंगुर्ला एसटी स्टँडवर उतरलो. एके काळी हा एसटी स्टँड नेहमी गजबजलेला असायाचा. आता तिथे कुत्रंही  नव्हतं. असो. 


वेंगुर्ल्याहुन मग पालला पोचलो तेव्हा सुर्य केव्हाचा बुडाला होता. जेउन लवकर झोपी जायचं होतं कारण दुसर्‍या दिवशी प्लॅनप्रमाणे उठुन विजयदुर्ग गाठायचा होता. पहिल्या दिवशी विजयदुर्ग, कुणकेश्वर आणि जमल्यास देवगडचा किल्ला असा प्लॅन होता. प्रवास एसटीनेच करायचा होता त्यामुळे एका दिवसात एवढं सगळं अशक्य होतं, कारण विजयदुर्ग वेंगुर्ल्यापासुन ११८ किमी आहे. आणि इतक्या लांब बाईक मारणं जमलं नसतं म्हणून आम्ही एसटीनेच जायचं ठरवलं. रुट थोडा कन्फ्युझिंग होता कारण कुणालच धड माहित नव्हतं की तिथे कसं जायचं ते. जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने आमच्या घरातल्यापैकी कुणाचाच जास्त संबंध नव्ह्ता. त्यात वेंगुर्ल्याहुन पहिली बस साडे सहाची होती जी गाठणं अशक्य होतं.

गुरुवारी ५ डिसें. ला सकाळी शक्य तितक्या लवकर उठलो. मामा आम्हाला वेंगुर्ला एसटी स्टँडवर सोडायला आला. वेंगुर्ल्याहुन कुडाळपर्यंत एसटी मिळाली. कुडाळला साडे नउला पोचलो. कुडाळहुन ताबडतोब देवगडला जाणारी एसटी मिळाली. विजयदुर्ग देवगडपासुन जवळच आहे. मला तीच एसटी कन्टीन्यु करायला हवी होती. पण विजयदुर्गाला जाण्यासाठी कुठे उतरु अशी विचारणा कंडक्टरला करायची दुर्बुद्धी मला झाली आणि पुढे सगळा घोळ झाला. घोळ इतका भयंकर की जिथे त्याच एसटीने आम्ही २-३ तासांत विजयदुर्गला पोचलो असतो तिथे आम्हाला तब्बल साडेपाच तास लागले. मी कंडक्टरला विचारल्यावर त्याने असा चेहरा केला की जणु मी त्याला दिल्लीच्या निवडणुकीच्या रिझल्टबद्दल त्याला काय वाटतं असं विचारलं असं वाटलं. त्याने सल्ला दिल्ला की तुम्ही कणकवलीला उतरा. तिथे चौकशी करा की विजयदुर्गला बस आहे का ते. मग आम्ही कणकवलीची तिकिट्स घेतल्या आणि तासाभरात कणकवलीला उतरलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजसयदुर्गासाठी पुढली बस दीड वाजता आहे. आणि कणकवलीहुन विजयदुर्ग तब्बल ७४ किमी. आहे. मग पुन्हा मी त्या कंडक्टरकडे आलो आणि त्याने आम्हाला दुसरा सल्ला दिला. तुम्ही इथुन दुसरी बस पकडा आणि तरेळेला उतरा तिथुन विजयदुर्गसाठी चांगली फ्रिक्वेन्सी आहे. त्याला अजुन दोघा तिघांनी दुजोरा दिला. 


कणकवलीहुन वैभववाडीला जाणारी एसटी पकडली आणि पुढल्या अर्ध्या तासात तरेळेला पोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजयदुर्गसाठीची एसटी बाराला होती. तोवर हलकं फुलकं खाउन घेतलं. उन चांगलच माथ्यावर आलं होतं. कधी एकदा विजयदुर्गला पोचतो असं झालं होतं. कारण आतापर्यंतचा वेळ लक्ष्यात घेता घरीसुद्धा परतायचं होतं. बाराला विजयदुर्गला जाणारी एसटी आली आणि आम्हाला हायसे वाटले. तरेळेहुन विजयदुर्ग ५२ किमी आहे. मी अंदाज बांधला किमान एक दिड तासांत आम्ही विजयदुर्गाला पोहचु. पण 'गाव तिथे एसटी' असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाला ते मान्य नव्हतं. 

एसटी सुरु झाली आणि आम्ही विजयदुर्गचं तिकिट घेउन मार्गस्थ झालो. कोकणातल्या नागमोडी वळणावरुन एसटी धाउ लागली. एकएक गाव घेत नंतर एसटी कापावर आली आणि भरधाव धाउ लागली. माझे डोळे नुसते पश्चिमेकडे लागले होते की कधी एकदा समुद्राचे दर्शन होते. पण बराच वेळ एसटी नुसती कापावरुन धावत होती. नंतर ती एका घाटातुन खाली उतरत होती. घाटवळणातुन खाली उतरत असताना खाली पायथ्याला एक सुंदर नदी नागमोडी वळणं घेत आमच्यासोबत लपाछपी खेळत होती. एसटी जसजशी त्या नदीच्या जवळ येत होती तसतशी ती नदी अधिकच सुंदर दिसत होती. त्या नदीचं सौंदर्यात मुग्ध होउन आम्ही इतका वेळचा प्रवासाचा शीण विसरलो होतो. एसटी मणचे या गावी जाउन थांबली ती अगदी नदीच्या किनारीच.  तिथुन एसटी निघाली. वाटलं आता थेट विजयदुर्गला जाउ पण वाटेत अजुन एक गाव होतं आणि एसटीला तिथेही जाणं भाग होतं. मणचेतुन एसटी मुटाट या गावी थांबली. तिथे काही शाळेची मुलं चढली. आता मला कंटाळा यायला लागला होता. तरेळे-मणचे-मुटाट-पडेल तिठा असं मजल दरमजल करत जेव्हा एसटी विजयदुर्गाला पोचली तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. विजयदुर्ग जेट्टीच्या बाजुने एसटी उतरत असताना समोर वाघोटन खाडी विसावली होती आणि डाव्याबाजुला असलेली घरे, दुकाने दुपारच्यावेळी निपचीत पडली होती. 




आम्ही स्टँडवर पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. इथुन परतीच्या गाड्या साडे तीन आणि शेवटची देवगडला जाणारी एसटी साडे चारला होती. जराही वेळ न दवडता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालु लागलो. सकाळपासुन आराम करणारा कॅम मी बाहेर काढला आणि खाडीच्या किनार्‍यावरल्या तटबंदीकडुन चालत किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. मुख्य दरवाज्याला असलेले उत्तुंग बुरुज आकाशाला भिडत होते. 

    विजयदुर्ग किल्ला :-


     तटबंदी





ट्रेक क्षितिजच्या कृपेने किल्ल्याच्या नकाशाची कॉपी होती. त्याप्रमाणे किल्ला बघायला सुरुवात केली. दरवाज्यातुन प्रवेश करताच खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे पूर्वेच्या दरवाज्यातुन शिरुन उत्तरेकडल्या तटबन्दीवरुन चालायला सुरुवात केली. विजयदुर्गाचं मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राच्या पोटात असलेली ती संरक्षक भिंत. एनीवेज ती भिंत काही दिसणार नव्हती पण या भिंतीबद्दल बरचं काही वाचलं होतं. श्री निनाद बेडेकर यांचं  "विजयदुर्गाचं रहस्य" नावाचं एक पुस्तक आहे. त्यात त्या अद्वितिय संरक्षक भिंतीबद्दल आणि विजयदुर्गाच्या इतिहासाबद्दल बरीचशी माहिती आहे. महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून विजयदुर्ग प्रसिद्ध आहे. किल्ल्यापासुन दोन किमी अंतरावर गिर्रेवाडीत ३५० वर्षांपूर्वीचा जहाजे बनवण्याचा कारखाना म्हणजे गोदी आहे.

विजयदुर्ग नकाशा :- साभार http://trekshitiz.com/







 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यात 'विजयदुर्ग' हा अतिशय बळकट किल्ला उभा आहे. तिन्ही बाजुनी पाणी आणि एका बाजुला खुष्कीचा मार्ग, अशी भौगोलिक रचना असल्याने हा किल्ला नैसर्गिकरित्या बेलाग झालेला आहे. विजयदुर्गाची बांधणीही रेखीव आहे. एका पाठोपाठ एक अशी तिहेरी तटबंदी किल्ल्याला अधिकाधिक मजबूत जरत आहे. यातिल काही बुरुज तर चक्क तिन मजली आहेत. विजयदुर्गाला छुपे दरवाजे आहेत. त्यातलाच एक आहे जिभीचा दरवाजा. जिभी म्हणजे लाकडी दरवाज्यापुढे रचलेली दगडांची तटबंदी.ह्याला हस्तीनख असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी म्हाराजांनी विजय संवत्सरात 'गिर्ये' गावानजिकचा हा दुर्ग जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण केलं, 'विजयदुर्ग'. गिर्याचा किल्ला म्हणून ह्या दुर्गाला 'घेरिया' असेही म्हणतात.

शिवाजीमहाराजांनंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्रे ह्यांच्याकडे मराठी आरमाराचे अधिपत्य आले. विजयदुर्गही आंग्र्यांच्या ताब्यात आला. आंग्र्यांचं आरमार दर्यावर आपला वचक ठेवून होतं. ते बुडविण्यासाठी डच आणि विशेषतः इंग्रजांनी अथक परिश्रम केले; ते आंग्र्यांनी हाणून पाडले.

आमच्याकडे वेळ कमी होता. आमहाला काही करुन साडे तीनची एसटी पकडायची होती. पण किल्ल्याचं सौंदर्यच असं काहीसं होतं की पावलोपावली तटबंदीवरुन चालताना फोटो घेत होतो. 







गणेश बुरुजावरुन दुपारच्या उन्हात विजदुर्गाचा किनारा शांत पहुडला होता आणि समुद्राच्या लाटा एका संथ लयीत त्याला थोपटवत होत्या. 


   वाघोटन खाडी आणि विजयदुर्ग जेट्टी :-


पुछे चालत चालत दर्या बुरुजापर्यंत आलो तेव्हा तिथे तटबंदीला खिंडार पडलं होतं आणि त्याच्या डागडुज्जीचं काम सुरु होतं. 










पुढे शाह बुरुजावर चढुन पुन्हा दक्षिणेच्या तटबंदीवरुन चालत चालत निघालो. इथुन तो विशाल समुद्र दुपारच्या उन्हात अतिशय तेजस्वी दिसत होता. कितीतरी वेळ फक्त त्याला पाहत राहीलो. 




एव्हाना तीन वाजत आले होते. गड पाहुन झाला होता. वेळेअभावी खूपच धावती भेट झाली होती पण नाकाशाप्रमाणे सगळा किल्ला बघुन घेतला. पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी आलो तेव्हा तिथे हे तोफेचे गोळे ओळीत ठेवले होते. 


किल्ला पाहुन आम्ही पुन्हा एसटी स्टँडवर आलो. बस यायला अजुन अवकाश होता. आणि मला किल्ल्याचे बाहेरुन म्हणजे जेट्टीवरुअन काही फोटो घ्यायचे होते. 




फोटो घेउन झाल्यावर काहीतरी खायला म्हणुन आम्ही शेजारच्या हाटेलात शिरलो. तितक्यात बस आली. आम्ही ऑर्डर कॅन्सल करणार होतो इतक्यात हॉटेलच्या मलकवजा असलेल्या युवकाने आम्हाला माहिती पुरवली की शेवटची बस साडेचार वाजता आहे आणि ही साडे तीनची बस दुनियादारी करत तरेळेला पोचणार होती. तरेळेचं नाव ऐकताच अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. तो अडीच तीन तासांचा प्रवास पुन्हा नको होता आम्हाला त्यापेक्षा देवगडला जाउन तिथुन कणकवली किंवा कुडाळ पर्यन्त तरी पोचता आले असते. आम्ही पहिल्यांदा तिथे मिसळ आणि डोनट्स आणि चहा खाउन घेतलं आणि बाहेर पडलो. 



देवगड एसटीला अजुन अवकाश होता म्हणुन मग अजुन फोटोज घेतले. मग कंठाळा आला म्हणुन चालत चालतवर विजयदुर्ग डेपोला येऊन बसलो. 







साडेचारची एसटी सव्वापाचला आली. या एसटीने थेट देवगड न गाठता जामसंडे या गावी उतरुन तिथुन पुन्हा नांदगाव तिठ्यापर्यंत पोचा, नांदगाव हे मुंबई - गोवा महामार्गावर असल्याने तिथुन कुडाळ-सावंतवाडीकडे जाणार्‍या गाड्या मिळतिल असा मोलाचा आणि अचूक सल्ला विजयदुर्गातलया एला देवमाणसाने दिला. 







त्याप्रमाणे आम्ही सहाच्या सुमारास जामसंडेला उतरलो. विजयदुर्ग ते जामसंडे २०-२५ किमी. तिथुन लागलीच देवगडहुन पुण्याला जाणारी एशियाड मिळाली. जामसंडे ते नांदगाव ३५ किमी. नांदगावला पोचलो तेव्हा सात सव्वासात झाले होते. तिथेच एका दुकानात कोकम सरबत मारला. आणि दुकानदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे कणकवलीला जाणार्‍या एसटीची वाट बघत उभे राहिलो. काही वेळाने एक एसटी आली. तीत बसलो आणि आठवाजता कणकवलीला उतरलो. नांदगाव ते कणकवली १६ किमी. आता आम्ही हुशार झालो होतो. कणकवलीतुन कसंही वेंगुर्ल्यापर्यन्त पोचलो असतो. नाहीच तर कुडाळपर्यंत तरी नक्की पोचलो असतो. आणि उशीर झालच असता तर कुडाळला मावशीकडे राहिलो असतो. पण तसं काही झलं नाही. कणकवली एसटी स्टँडवर चौकशी केली तेव्हा कळलं की पुणे - वेंगुर्ला ८ ची गाडी अजुन आली नव्हती. डायरेक्ट वेंगुर्ल्यापर्यन्त बस असल्याने काळजीच मिटली. 


परतीच्या प्रवासात आम्ही विचार करत होतो की जर सकाळची ती देवगड एसटीच कंटिन्यु केली असती तर किती तरी वेळ वाचला असता आणि निदान कुणकेश्वराचं दर्शन तरी झालं असतं. पण प्रवासादरम्यान मणचे गावात  त्या नदीच्या रूपाने का होईना फार बरं वाटलं होतं. पण एक मात्र आहे की विजयदुर्ग आणि आसपासच्या परिसरात भटकण्यासाठी स्वत:चं वाहन असणं फार आवश्यक आहे. 

सव्वा आठला पुणे-वेंगुर्ला एसटी कणकवलीहुन पकडली आणि दिवसभराच्या थकव्यामुळे विंडो सीटला डोके टेकउन डोळे मिटुन घेतले. पावणे दहाच्या सुमरास बस वेंगुर्ला पावर हाउस पाशी थांबली. इथुन रिक्शा करुन घरी पालला जायचं म्हणुन रिक्षाला विचारायला गेलो तर त्याने सहा किमी साठी दिडशे रुपडे सांगितले. शेवटी मामाला फोन केला तो बाईक घेउन आम्हाला घ्यायला आला. घरी पोचलो तेव्हा साडे दहा - अकरा वाजले असतिल. दिवसभरच्या प्रवासाची गंम्मत सांगत, जेउन आम्ही झोपी गेलो कारण दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट, किल्ले निवती असा प्लॅन होता....