Saturday, December 11, 2010

एकदा मला रडायचयं !

मला आठवत नाही, लास्ट टाईम मी कधी रडलो होतो ते? 
रडणं म्हणजे?? अश्रुनी डोळ्यांना भिजवलं नाही, गालावरुन पाणी घरंगळत ह्रदयावरुन गेलं नाही! 
"छे! पुरुषासारखा पुरुष तू आणि रडतोस काय?" असं कुणी तरी म्हटलं! 
का? पुरुषानी कधी रडुच नए? मग त्यांना अश्रु तरी का दयावे देवाने? 

पण मला खरंच आठवत नाही की मी लास्ट टाईम कधी रडलो होतो ते! 
कधी कधी वाटतं की माझे अश्रुच गोठुन गेलेत.त्यांचे हिमनग झालेत. किती रडावसं वाटलं तरी अश्रु बाहेर पडत नाहीत! ते ही माझ्यासारखेच कठोर, पाषाण झालेले! पण खरं सांगतो मला खुप रडावसं वाटतयं. डोळे ओसंडुन जातिल इतकं रडायचं आहे! 

रडायला मला जागाही नाही सापडत. माणसांच्या; प्रेमळ माणसांच्या, मायेच्या माणसांच्या, वैतागलेल्या, रुसलेल्या, चिडलेल्या, रागावलेल्या, हसणार्‍या, गाणार्‍या, माणसांच्या दुनियेत मी कुठे माझे अश्रु वाहु? 

"अश्रु मौल्यवान असतात सखे, ते असे ओसंडुन वाया घालवु नकोस, ते मातीत मिसळुन जातिल! सगळ्याच आसवांची मातीत मिसळल्यावर फुलं होत नाहीत!"  

मी तिला नेहमी सांगायचो. त्यावेळी खरं तर मला तिचा हेवा वाटायचा. मला का नाही येत असं रडता? मला नेहमी वाटायचं की मी माझे अश्रु गोठवुन कुणाचे तरी अश्रु पुसतोय. पण नाही! खरं तर मी माझेच अश्रु पुसायचो त्यांच्या  डोळ्यांतुन! पण तरीही माझा हा अट्टाहास आहे की कधी त्यांनी ही त्यांचे अश्रु माझ्या डोळ्यातुन पुसावेत! 
का, माझ्या अश्रुंना काहीच किंम्मत नाही? की ते दिसत नाहीत म्हणुन त्यांना जाणवत नाहीत? 
अश्रु म्हणजे फक्त पाणीचं ना गं? 
नाही! नुसतं पाणी नाही! खारं पाणी, सुख दु;खाचं मिश्रीत पाणी! 

कधी ह्रदय भरुन आलं, की बरसणारं पाणी! पण या पाण्याने कुणी सुखावतं का गं? दुसर्‍याच्या डोळ्यात स्वःतासाठी अश्रु बघण्यात एक अपुर्व आनंद असतो, आनंदापेक्षा एक धीर असतो त्या अश्रुंत! खांडेकरानी कुठेतरी लिहिलंए! खरं आहे ना ते? कुणी तरी आपल्यासाठी रडतयं ही भावना किती सुखास्पद असते ना? खोटं वाटतं तुला? असेलही कदाचित! 

तुला कधी वाटलं का मी रडावं तुझ्यासाठी? तुझ्या विरहाने व्याकुळ होउन, धावत येवुन तुला छातीशी घट्ट धरुन ठेवावं, मी नाही गं जगु शकत तुझ्याशिवाय असं म्हणुन माझ्या अश्रुनी तुला न्हाउ घालावं! आईच्या कुशीत रडायचो तसं? 
मग तु ही भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत मला तसंच म्हणावं, "मी ही नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय!"
दोघांचे काठोकाठ भरलेले डोळे! खार्‍या पाण्याने डबडबलेले! त्या अश्रुंतुन आरपार आपण एकमेकांना बघावे! कुणी कुणाचे अश्रु पुसु नयेत. ते तसेच वाहु देत. अश्रु संपेपर्यंत, डोळे कोरडे होईपर्यंत रडत राहावे! 

मला खरंच खुप रडायचयं गं! ह्रदयातला सारा भार, सार्‍या वेदना, वाहुन घालवायच्या आहेत. मी असं ऐकलयं की रडल्याने सार्‍या वेदना, ह्रदयातल्या वेदना अश्रुंबरोबर वाहुन जातात. खरं आहे का ते?
बघं इतका विवश झालोय तरी एखादा थेंबही, थेंब तर सोड पापण्यांच्या कडाही ओल्या होत नाहीत!



एकदा मला रडायचयं,
पाण्यासारखं वाहायचयं,
तुझ्या डोळ्यातुन वाहताना,
तुला माझ्या डोळ्यातुन वाहताना पाहायचयं!
कधी हे अश्रु असेच रडवतात,
बांध फुटला तरी, 
गालांवर ओघळत नाहीत, 
बाष्पासारखे हवेत विरुन जातात!
गाल तसेच कोरडे राहतात!
कोरडे डोळे,
कोरडे गाल,
कोरडे ह्रदय,
कोरडा मी! तू मात्र काठोकाठ भरलेली!

5 comments:

  1. मला आपलं वाटतं...जेव्हांच तेव्हां रडून टाकावं. म्हणजे मग त्या पाण्याचा प्रलय नाही होत. अगदी बाळ होतास तेव्हां काय तू मुलगा आहेस म्हणून कमी रडत होतास? नाही ना? ही सगळी समाजाने लादलेली ओझी.
    असं आपलं मला वाटतं.. :)
    'अश्रुनी डोळ्यांना भिजवलं नाही, गालावरुन पाणी घरंगळत ह्रदयावरुन गेलं नाही!' हे वाक्य खूप भावस्पर्शी. :)

    ReplyDelete
  2. दीपक मित्रा..शब्दांनी तूला वेड लावलाय खरच..रडण हे पुरूष प्रधान नाही म्हणतात..पण मला ते पटत नाही. जेव्हा वाटल तेव्हा रडून घेणे..मग ते कोणाला कळो अथवा न कळो...

    >> अश्रुनी डोळ्यांना भिजवलं नाही, गालावरुन पाणी घरंगळत ह्रदयावरुन गेलं नाही!
    एकदम लागला बघ कुठे तरी खोलवर मनात.. :(

    ReplyDelete
  3. अनघा, प्रतिक्रियेकरता धन्यवाद.
    लहानपणीचं रडणं वेगळं रे! तेव्हा मस्ती करायचो, कुणाच्या खोड्या काढायचो म्हणुन शरीराला मार बसायचा त्यामुळे रडायला येत असे!
    आता, ह्र्दयाल किती मार बसला तरी रडता येत नाही!
    शरीराचे अश्रु वेगळे आणि ह्रदयाचे अश्रु वेगळे!
    बाकी तुझं म्हणणं पटलं मला, जेव्हाचं तेव्हा रडुन टाकायचं !

    ReplyDelete
  4. सुहास खरं आहे तुझं !
    रडणं स्वाभाविक आहे रे! त्यासाठी प्रुरुष किंवा स्त्री असण्याची गरजं नाही!
    उर भरुन आला की पाणी आपोआप डोळ्यांतुन बाहेर पडतचं ना!!
    पण माझ्या बाबतित असं नाहे होतं, किती वाटलं तरी नाही रडता येत!


    I think I should consult a Doc. he he he :)

    ReplyDelete
  5. hi pls continue your 7 nishigandha i m excited to read what next

    ReplyDelete