Showing posts with label कोंकण. Show all posts
Showing posts with label कोंकण. Show all posts

Tuesday, December 17, 2013

कोंकणसफारी - किल्ले विजयदुर्ग


गावच्या जत्रेला जायचा योग यावर्षी तब्बल १७ वर्षांनी जुळून आला होता. मी आणि आई दोघेही; मी नववीत असताना जत्रेला गेलो होतो त्यानंतर कधी जमलंच नाही. मुंबईला आल्यावर जत्रेला जायची खूप इच्छा असायची पण कधी अभ्यासामुळे तर नंतर कधी कामामुळे जमत नव्हतं. यावेळी जमलं. जत्रा विकांताला होती. मग विचार केला की गावी जातोयच तर जरा व्यवस्थित फिरुन पण घेउ. गावी दहा वर्षे होतो पण त्यावेळी शाळेमुळे कुठे धड फिरायला मिळाले नव्हते. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वेंगुर्ला बंदरावर कधी गेलो नव्हतो. नेहमी एस.टी.तुन प्रवास करताना बस वेंगुर्ल्याच्या डोंगरावर आली की बसमधुन वेंगुर्ला बंदराचे विहंगम दृश्य दिसायचं फक्त १०-१२ सेकंदासाठीच. पण ते बघयालाही मी तेव्हा जाम धडपडायचो. यावेळी विचार केला की कोकणातलं जे काही फिरायचं, बघायचं राहुन गेलयं ते यावेळी बघून घ्यायचं. को़कणात फिरण्यासारख्या जागा म्हणजे नितांत सुंदर समुद्र किनारे. लखलखत्या वाळूचे, चमचत्या हिरव्यागार पाण्याचे, खार्‍या वार्‍यावर डोलणार्‍या माडांचे. समुद्र म्हणजे जीवसखा. पण यावेळी ओढ होती ती समुद्रावर आसणार्‍या ऐतिहासिक किल्ल्यांची. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. किल्ले निवती, यशवंतगड वैगरे लिस्टवर होते. मग ठरवलं आणि निघालो. सोबतिला सचिन पाटील हा माझा मित्र होता. बुधवारी ४ डिसेंबरला पनवेलहुन जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये चेक इन केलं. गावी जायला ही ट्रेन मी नेहमी प्रेफर करतो. फक्त ६ तासांत मुंबईहुन कुडाळ. सकाळी पावणे सातला पनवेलहुन ट्रेन पकडली आणि १२:४५ ला कुडाळला हजर. कुडाळला माझा मावशी राहते. तिला अगोदरच सांगुन ठेवलं होतं त्याप्रमाणे तिने मच्छी कढी करुन ठेवली होती. :)

दुपारी तिथे मस्त जेवून पुढच्या प्रवासाला म्हणजे वेंगुर्ल्याला जायला निघालो. त्यादिवशी कुडाळचा बाजार होता त्यामुळे एसटीला गर्दी असणं साहजिक होतं. पण इतकीही गर्दी नव्हती. कोकणात बराच विकास झालेला दिसतो. बहुतांश लोकांकडे आता स्वत:ची वाहनं झालीत. कुडाळहुन वेंगुर्ला एसटी स्टँडवर उतरलो. एके काळी हा एसटी स्टँड नेहमी गजबजलेला असायाचा. आता तिथे कुत्रंही  नव्हतं. असो. 


वेंगुर्ल्याहुन मग पालला पोचलो तेव्हा सुर्य केव्हाचा बुडाला होता. जेउन लवकर झोपी जायचं होतं कारण दुसर्‍या दिवशी प्लॅनप्रमाणे उठुन विजयदुर्ग गाठायचा होता. पहिल्या दिवशी विजयदुर्ग, कुणकेश्वर आणि जमल्यास देवगडचा किल्ला असा प्लॅन होता. प्रवास एसटीनेच करायचा होता त्यामुळे एका दिवसात एवढं सगळं अशक्य होतं, कारण विजयदुर्ग वेंगुर्ल्यापासुन ११८ किमी आहे. आणि इतक्या लांब बाईक मारणं जमलं नसतं म्हणून आम्ही एसटीनेच जायचं ठरवलं. रुट थोडा कन्फ्युझिंग होता कारण कुणालच धड माहित नव्हतं की तिथे कसं जायचं ते. जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने आमच्या घरातल्यापैकी कुणाचाच जास्त संबंध नव्ह्ता. त्यात वेंगुर्ल्याहुन पहिली बस साडे सहाची होती जी गाठणं अशक्य होतं.

गुरुवारी ५ डिसें. ला सकाळी शक्य तितक्या लवकर उठलो. मामा आम्हाला वेंगुर्ला एसटी स्टँडवर सोडायला आला. वेंगुर्ल्याहुन कुडाळपर्यंत एसटी मिळाली. कुडाळला साडे नउला पोचलो. कुडाळहुन ताबडतोब देवगडला जाणारी एसटी मिळाली. विजयदुर्ग देवगडपासुन जवळच आहे. मला तीच एसटी कन्टीन्यु करायला हवी होती. पण विजयदुर्गाला जाण्यासाठी कुठे उतरु अशी विचारणा कंडक्टरला करायची दुर्बुद्धी मला झाली आणि पुढे सगळा घोळ झाला. घोळ इतका भयंकर की जिथे त्याच एसटीने आम्ही २-३ तासांत विजयदुर्गला पोचलो असतो तिथे आम्हाला तब्बल साडेपाच तास लागले. मी कंडक्टरला विचारल्यावर त्याने असा चेहरा केला की जणु मी त्याला दिल्लीच्या निवडणुकीच्या रिझल्टबद्दल त्याला काय वाटतं असं विचारलं असं वाटलं. त्याने सल्ला दिल्ला की तुम्ही कणकवलीला उतरा. तिथे चौकशी करा की विजयदुर्गला बस आहे का ते. मग आम्ही कणकवलीची तिकिट्स घेतल्या आणि तासाभरात कणकवलीला उतरलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजसयदुर्गासाठी पुढली बस दीड वाजता आहे. आणि कणकवलीहुन विजयदुर्ग तब्बल ७४ किमी. आहे. मग पुन्हा मी त्या कंडक्टरकडे आलो आणि त्याने आम्हाला दुसरा सल्ला दिला. तुम्ही इथुन दुसरी बस पकडा आणि तरेळेला उतरा तिथुन विजयदुर्गसाठी चांगली फ्रिक्वेन्सी आहे. त्याला अजुन दोघा तिघांनी दुजोरा दिला. 


कणकवलीहुन वैभववाडीला जाणारी एसटी पकडली आणि पुढल्या अर्ध्या तासात तरेळेला पोचलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की विजयदुर्गसाठीची एसटी बाराला होती. तोवर हलकं फुलकं खाउन घेतलं. उन चांगलच माथ्यावर आलं होतं. कधी एकदा विजयदुर्गला पोचतो असं झालं होतं. कारण आतापर्यंतचा वेळ लक्ष्यात घेता घरीसुद्धा परतायचं होतं. बाराला विजयदुर्गला जाणारी एसटी आली आणि आम्हाला हायसे वाटले. तरेळेहुन विजयदुर्ग ५२ किमी आहे. मी अंदाज बांधला किमान एक दिड तासांत आम्ही विजयदुर्गाला पोहचु. पण 'गाव तिथे एसटी' असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाला ते मान्य नव्हतं. 

एसटी सुरु झाली आणि आम्ही विजयदुर्गचं तिकिट घेउन मार्गस्थ झालो. कोकणातल्या नागमोडी वळणावरुन एसटी धाउ लागली. एकएक गाव घेत नंतर एसटी कापावर आली आणि भरधाव धाउ लागली. माझे डोळे नुसते पश्चिमेकडे लागले होते की कधी एकदा समुद्राचे दर्शन होते. पण बराच वेळ एसटी नुसती कापावरुन धावत होती. नंतर ती एका घाटातुन खाली उतरत होती. घाटवळणातुन खाली उतरत असताना खाली पायथ्याला एक सुंदर नदी नागमोडी वळणं घेत आमच्यासोबत लपाछपी खेळत होती. एसटी जसजशी त्या नदीच्या जवळ येत होती तसतशी ती नदी अधिकच सुंदर दिसत होती. त्या नदीचं सौंदर्यात मुग्ध होउन आम्ही इतका वेळचा प्रवासाचा शीण विसरलो होतो. एसटी मणचे या गावी जाउन थांबली ती अगदी नदीच्या किनारीच.  तिथुन एसटी निघाली. वाटलं आता थेट विजयदुर्गला जाउ पण वाटेत अजुन एक गाव होतं आणि एसटीला तिथेही जाणं भाग होतं. मणचेतुन एसटी मुटाट या गावी थांबली. तिथे काही शाळेची मुलं चढली. आता मला कंटाळा यायला लागला होता. तरेळे-मणचे-मुटाट-पडेल तिठा असं मजल दरमजल करत जेव्हा एसटी विजयदुर्गाला पोचली तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. विजयदुर्ग जेट्टीच्या बाजुने एसटी उतरत असताना समोर वाघोटन खाडी विसावली होती आणि डाव्याबाजुला असलेली घरे, दुकाने दुपारच्यावेळी निपचीत पडली होती. 




आम्ही स्टँडवर पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. इथुन परतीच्या गाड्या साडे तीन आणि शेवटची देवगडला जाणारी एसटी साडे चारला होती. जराही वेळ न दवडता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालु लागलो. सकाळपासुन आराम करणारा कॅम मी बाहेर काढला आणि खाडीच्या किनार्‍यावरल्या तटबंदीकडुन चालत किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. मुख्य दरवाज्याला असलेले उत्तुंग बुरुज आकाशाला भिडत होते. 

    विजयदुर्ग किल्ला :-


     तटबंदी





ट्रेक क्षितिजच्या कृपेने किल्ल्याच्या नकाशाची कॉपी होती. त्याप्रमाणे किल्ला बघायला सुरुवात केली. दरवाज्यातुन प्रवेश करताच खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे पूर्वेच्या दरवाज्यातुन शिरुन उत्तरेकडल्या तटबन्दीवरुन चालायला सुरुवात केली. विजयदुर्गाचं मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राच्या पोटात असलेली ती संरक्षक भिंत. एनीवेज ती भिंत काही दिसणार नव्हती पण या भिंतीबद्दल बरचं काही वाचलं होतं. श्री निनाद बेडेकर यांचं  "विजयदुर्गाचं रहस्य" नावाचं एक पुस्तक आहे. त्यात त्या अद्वितिय संरक्षक भिंतीबद्दल आणि विजयदुर्गाच्या इतिहासाबद्दल बरीचशी माहिती आहे. महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून विजयदुर्ग प्रसिद्ध आहे. किल्ल्यापासुन दोन किमी अंतरावर गिर्रेवाडीत ३५० वर्षांपूर्वीचा जहाजे बनवण्याचा कारखाना म्हणजे गोदी आहे.

विजयदुर्ग नकाशा :- साभार http://trekshitiz.com/







 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यात 'विजयदुर्ग' हा अतिशय बळकट किल्ला उभा आहे. तिन्ही बाजुनी पाणी आणि एका बाजुला खुष्कीचा मार्ग, अशी भौगोलिक रचना असल्याने हा किल्ला नैसर्गिकरित्या बेलाग झालेला आहे. विजयदुर्गाची बांधणीही रेखीव आहे. एका पाठोपाठ एक अशी तिहेरी तटबंदी किल्ल्याला अधिकाधिक मजबूत जरत आहे. यातिल काही बुरुज तर चक्क तिन मजली आहेत. विजयदुर्गाला छुपे दरवाजे आहेत. त्यातलाच एक आहे जिभीचा दरवाजा. जिभी म्हणजे लाकडी दरवाज्यापुढे रचलेली दगडांची तटबंदी.ह्याला हस्तीनख असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी म्हाराजांनी विजय संवत्सरात 'गिर्ये' गावानजिकचा हा दुर्ग जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण केलं, 'विजयदुर्ग'. गिर्याचा किल्ला म्हणून ह्या दुर्गाला 'घेरिया' असेही म्हणतात.

शिवाजीमहाराजांनंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्रे ह्यांच्याकडे मराठी आरमाराचे अधिपत्य आले. विजयदुर्गही आंग्र्यांच्या ताब्यात आला. आंग्र्यांचं आरमार दर्यावर आपला वचक ठेवून होतं. ते बुडविण्यासाठी डच आणि विशेषतः इंग्रजांनी अथक परिश्रम केले; ते आंग्र्यांनी हाणून पाडले.

आमच्याकडे वेळ कमी होता. आमहाला काही करुन साडे तीनची एसटी पकडायची होती. पण किल्ल्याचं सौंदर्यच असं काहीसं होतं की पावलोपावली तटबंदीवरुन चालताना फोटो घेत होतो. 







गणेश बुरुजावरुन दुपारच्या उन्हात विजदुर्गाचा किनारा शांत पहुडला होता आणि समुद्राच्या लाटा एका संथ लयीत त्याला थोपटवत होत्या. 


   वाघोटन खाडी आणि विजयदुर्ग जेट्टी :-


पुछे चालत चालत दर्या बुरुजापर्यंत आलो तेव्हा तिथे तटबंदीला खिंडार पडलं होतं आणि त्याच्या डागडुज्जीचं काम सुरु होतं. 










पुढे शाह बुरुजावर चढुन पुन्हा दक्षिणेच्या तटबंदीवरुन चालत चालत निघालो. इथुन तो विशाल समुद्र दुपारच्या उन्हात अतिशय तेजस्वी दिसत होता. कितीतरी वेळ फक्त त्याला पाहत राहीलो. 




एव्हाना तीन वाजत आले होते. गड पाहुन झाला होता. वेळेअभावी खूपच धावती भेट झाली होती पण नाकाशाप्रमाणे सगळा किल्ला बघुन घेतला. पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी आलो तेव्हा तिथे हे तोफेचे गोळे ओळीत ठेवले होते. 


किल्ला पाहुन आम्ही पुन्हा एसटी स्टँडवर आलो. बस यायला अजुन अवकाश होता. आणि मला किल्ल्याचे बाहेरुन म्हणजे जेट्टीवरुअन काही फोटो घ्यायचे होते. 




फोटो घेउन झाल्यावर काहीतरी खायला म्हणुन आम्ही शेजारच्या हाटेलात शिरलो. तितक्यात बस आली. आम्ही ऑर्डर कॅन्सल करणार होतो इतक्यात हॉटेलच्या मलकवजा असलेल्या युवकाने आम्हाला माहिती पुरवली की शेवटची बस साडेचार वाजता आहे आणि ही साडे तीनची बस दुनियादारी करत तरेळेला पोचणार होती. तरेळेचं नाव ऐकताच अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. तो अडीच तीन तासांचा प्रवास पुन्हा नको होता आम्हाला त्यापेक्षा देवगडला जाउन तिथुन कणकवली किंवा कुडाळ पर्यन्त तरी पोचता आले असते. आम्ही पहिल्यांदा तिथे मिसळ आणि डोनट्स आणि चहा खाउन घेतलं आणि बाहेर पडलो. 



देवगड एसटीला अजुन अवकाश होता म्हणुन मग अजुन फोटोज घेतले. मग कंठाळा आला म्हणुन चालत चालतवर विजयदुर्ग डेपोला येऊन बसलो. 







साडेचारची एसटी सव्वापाचला आली. या एसटीने थेट देवगड न गाठता जामसंडे या गावी उतरुन तिथुन पुन्हा नांदगाव तिठ्यापर्यंत पोचा, नांदगाव हे मुंबई - गोवा महामार्गावर असल्याने तिथुन कुडाळ-सावंतवाडीकडे जाणार्‍या गाड्या मिळतिल असा मोलाचा आणि अचूक सल्ला विजयदुर्गातलया एला देवमाणसाने दिला. 







त्याप्रमाणे आम्ही सहाच्या सुमारास जामसंडेला उतरलो. विजयदुर्ग ते जामसंडे २०-२५ किमी. तिथुन लागलीच देवगडहुन पुण्याला जाणारी एशियाड मिळाली. जामसंडे ते नांदगाव ३५ किमी. नांदगावला पोचलो तेव्हा सात सव्वासात झाले होते. तिथेच एका दुकानात कोकम सरबत मारला. आणि दुकानदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे कणकवलीला जाणार्‍या एसटीची वाट बघत उभे राहिलो. काही वेळाने एक एसटी आली. तीत बसलो आणि आठवाजता कणकवलीला उतरलो. नांदगाव ते कणकवली १६ किमी. आता आम्ही हुशार झालो होतो. कणकवलीतुन कसंही वेंगुर्ल्यापर्यन्त पोचलो असतो. नाहीच तर कुडाळपर्यंत तरी नक्की पोचलो असतो. आणि उशीर झालच असता तर कुडाळला मावशीकडे राहिलो असतो. पण तसं काही झलं नाही. कणकवली एसटी स्टँडवर चौकशी केली तेव्हा कळलं की पुणे - वेंगुर्ला ८ ची गाडी अजुन आली नव्हती. डायरेक्ट वेंगुर्ल्यापर्यन्त बस असल्याने काळजीच मिटली. 


परतीच्या प्रवासात आम्ही विचार करत होतो की जर सकाळची ती देवगड एसटीच कंटिन्यु केली असती तर किती तरी वेळ वाचला असता आणि निदान कुणकेश्वराचं दर्शन तरी झालं असतं. पण प्रवासादरम्यान मणचे गावात  त्या नदीच्या रूपाने का होईना फार बरं वाटलं होतं. पण एक मात्र आहे की विजयदुर्ग आणि आसपासच्या परिसरात भटकण्यासाठी स्वत:चं वाहन असणं फार आवश्यक आहे. 

सव्वा आठला पुणे-वेंगुर्ला एसटी कणकवलीहुन पकडली आणि दिवसभराच्या थकव्यामुळे विंडो सीटला डोके टेकउन डोळे मिटुन घेतले. पावणे दहाच्या सुमरास बस वेंगुर्ला पावर हाउस पाशी थांबली. इथुन रिक्शा करुन घरी पालला जायचं म्हणुन रिक्षाला विचारायला गेलो तर त्याने सहा किमी साठी दिडशे रुपडे सांगितले. शेवटी मामाला फोन केला तो बाईक घेउन आम्हाला घ्यायला आला. घरी पोचलो तेव्हा साडे दहा - अकरा वाजले असतिल. दिवसभरच्या प्रवासाची गंम्मत सांगत, जेउन आम्ही झोपी गेलो कारण दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट, किल्ले निवती असा प्लॅन होता....

Monday, August 16, 2010

किल्ले सुधागड ..

  सुधागडचा ट्रेक हा आतापर्यंतचा थ्रीलिंग ट्रेक होता.. भर पावसात किल्ला सर करताना, फिरताना आणि तो उतरताना भारी कसरती झाल्या.. मराठी ब्लॉगर्स चा विसापुरच्या ट्रेकमध्ये सुहास्,अनुजा यांच्याशी ओळख झाली होती..विसापुरच्या  ट्रेकबद्दल आपण रोहनच्या ब्लॉगवर वाचलेस असेल.. त्यानंतर बझवर रोहनने सुधागडला जातोय म्हणुन लिहिले, त्याला रिप्लाय म्हणुन मी बोललो की अरे मी सुद्धा पुढच्या रविवारी म्हणजे १-०८-२०१० ला प्लॅन करतोय असे लिहिले.. त्यानंतर अनुजा बोलली की ती सुद्धा येतेय, मग सुहासही तयार झाला.. झाले तर मग आम्ही ३० जुलैला रात्री निघायचे ठरले... हे सगळे दोन दिवस बझ्झ्वरच अपडेट होत होतं, म्हणजे कसं जायचे, कितिजण येणार वैगरे.. आता पर्यंत आम्ही चौघेचजण होतो.. मी, अनुजा,सुहास आणि माझा एक मित्र महेश ज्याच्या गाडीने आम्ही जाणार होतो...नंतर अनुजाने सांगितले की तिच्याकडुन अजुन ५ जण येणार आहेत पण जायच्या दोन दिवस आधी त्यातले ४ जण कॅन्सल झाले.. मग मी, अनुजा,तिचा मित्र आशु, सुहास आणि महेश एवढेचजण तयार झालो... जायच्या आधी अनुजाने गडावर जेवण बनवायच्या प्लॅन केला होता. दाल खिचडी किंवा कोंबडी रस्सा.आयडीया थ्रीलींग होती ,पण नंतर काहीजण कॅन्सल झाल्यामुळे गडभोजनाचा प्लॅन रद्द करण्यात आला...


 


सुधागड तसा फारसा लांब नाही मुंबईहुन पाली आणि पालीहुन जेमतेम १०-१२ किमी वर हा गड आहे.. शनीवारी रात्री निघायचे ठरले.. मला शनीवारी हाफ डे असतो, अनुजा, आशु आणि सुहास असे आम्ही संध्याकाळी अंधेरीला भेटायचे ठरवले...रात्री थोडं लेटच निघायचे होतं. अनुजा ५.३० ला ऑफिसवरुन सुटणार होती आणि मला हाफ डे असल्याने मी ऑफिसमध्येच बसलो होतो.. बाहेर हलकासा पाउस होता. काम नसल्याने मी अनुजासोबत चॅटवर अंताक्षरी खेळत बसलो होतो... आणि त्याचबरोबर किशोरी  ताईंचा तीन ताल मधील तराणा ऐकत होतो....सव्वा पाच ला अनुजाचा टेकस्ट आला की मी निघतेय तु ६.०० वाजता अंधेरी स्टेशनला पोच. ट्रॅफिकमुळे मला पोहचायला थोडा उशीरच झाला... तोवर आमची एस्.एम्.एस अंताक्षरी सुरुच होती...आशु आणि सुहास येइपर्यंत आम्ही स्टेशनवर गप्पा मारत बसलो...काही वेळाने आशु आला आणि सुहासपण आला.. महेश काही कामानिमित्त कांदिवलीला गेला होता..आणि त्याला यायला थोडा उशीर होणार होता तोवर आपण खादाडी करुन घ्यावी असं ठरवलं.. त्यासाठी अनुजा ने आरफाचं नाव सुचवलं ( आरफाच्या खादाडीबद्द्ल अनुजाने वेगळी पोस्ट टाकली आहे ती इथे वाचु शकता ). जेवण तुडुंब झाल्यावर आम्ही चालत स्टेशनच्या दिशेने आलो.. महेश अजुनही कांदिवलीलाच होता आणि त्याला यायला अजुन थोडा वेळ लागणार होता... काही वेळाने साल्याचा फोनच लागेना तेव्हा हा टांग देतोय की काय असं वाटायला लागलं कारण आम्ही त्याच्याच गाडीतुन जाणार होतो... मी ही शंका बोलुन दाखवल्यावर तर बाकीच्यांनी माझा हनुमान करायचा ठरवलं आधीच माझ्या हनुवटीला काय तरी छोटीसी पुळी आली होती आणि हनुवटी थोडीशी सुजली होती....काही वेळाने महेशचा फोन आला आणि त्याने आम्हाला अंधेरी ईस्टच्या विनायक मंदीराच्या इथे थांबायला सांगितले. तिथेही साला लेटच आला... पण शेवटी आला... आम्ही पालीच्या दिशेने कुच केले.. गप्पा मारत्.गाणी ऐकत्,गुणगुणत आम्ही निघालो होतो..

पनवेल नंतर तुफान पाउस कोसळु लागला.. भर पावसात ड्राईव्ह करत आम्ही पालीला पोचलो तेव्हा दोन - तीन वाजले असावेत... मग पालीच्या बल्लाळेश्वराच्या भक्त निवार्‍यात आसरा मागायला गेलो पण जागा नाही मिळाली. मग गाडी एका दुकानाच्यासमोर लावून आम्ही गाडीतच झोपी गेलो...पाउस कोसळतच होता... सकाळी साडे पाचच्या दरम्यान मला जाग आली. गाडीच्या खिडकिवर एक गावातला मुलगा टकटक करत होता.. मी वैतागुन खिडकीची काच खाली केली. बोललो, "काय आहे? "
" साहेब तुम्हाला माहीत आहे ना पुढचा टायर पंक्चर आही तो!"
तो असं बोलताच आमची झोपच उडाली...भर पावसात आम्ही तो टायर बदली केला त्यानंतर एका गॅरेजमध्ये जाउन तो पंक्चरही काढला.. या सगळ्यात तास - दोन तास् वाया गेले... मग सकाळचहा नास्ता आटपुन क्षणाचाही विलंब न लावता आम्ही पाछापुरच्या दिशेने कुच केले..बराच वेळ झाला तरी गड नजरेत येत नव्ह्ता त्यात धुकंही बरच होत... ठाकरवाडीला पोहचता पोहचता गड दिसु लागला... हिरवागार, वरुन धुक्याने आच्छादलेला, आणि उमाळे फुटावे तसे पांढरेशुभ्र धबधबे खाली कोसळत होते.. डोळ्याचं पारणं फेडणारे ते दृश्य आम्ही कॅमेर्‍यात बंदिस्त केले आणि ठाकरवाडीला पोचलो. शाळेजवळ गाडी पार्क केली.. आणि वाट विचारत विचारत गडाच्या दिशेने चालु लागलो...




चढण तशी कठीण नाही.. आम्ही गप्पा मारत वर चढत होतो.. सुधागड करायचा दुसरा हेतु म्हणजे मला तेलाबैलाचं दर्शन  घ्यायचं होतं पण शेवटपर्यंत दिसलाच नाही. कदाचित आम्ही दुसर्‍याबाजुला गेलोच नाही...रानातुन वाट काढत आणि दिशादर्शक बाणांचा मागोवा घेत आम्ही गडाच्या दरवाज्याशी पोचलो... वर चढताच अनुजा नावाच्या चोराला चोर दरवाजा दिसला मग त्या चोर दरवाज्यातुन शिरुन आम्ही दुसर्‍या वाटेला बाहेर आलो.. आणि पुन्हा त्याच दरवाज्यातुन वर चढलो. चोर दरवाज्याचा तो अनुभव थ्रीलींग होता...मला आणि सुहासला सोडुन ( आमच्या गुटगुटीतपणामुळे )बाकिच्यांना त्या चोर दरवाज्यातुन जायला यायला काही विशेष अडचण नाही जाणवली.






काही वेळाने पाउस सुरु झाला.. आणि चांगलाच कोसळु लागला.. गडाच्या त्या हिरव्यागार माथ्यावर आम्ही अक्षरशः ढगात विहार करत होतो... तिथुन हलावेसे वाटतच नव्हते.. काही वेळाने आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.पाउस थांबायचें नाव घेत नव्ह्ता.. चालत चालत आम्ही गडावर असलेल्या पंत सचिव वाड्यावर आलो... तिथे आधी पासुनच काही भटक्यांचा बॅग्स होत्या.. एका शेगडीवर असलेल्या टोपात जेवण बनवले होते.. ते काय होते ते अनुजा ( माउच्या पावलांनी ) जाउन चेक करुन आलीच.. खिचडी होती कदाचित.. मग आम्ही सुद्दा आमचं जेवण उरकायचं ठरवलं त्यासाठी अनुजाने ठेपले आणले होते. लोणच्याबरोबर ठेपले आणि केळ्यांचे चिप्स असा बरगच्च जेवणाचा कार्यक्रम आट्पुन आम्ही निघलो...





पुढे महादरवाजा बघायचा होता...वाटेत भोराई देवीचे दर्शन घेतले आणि निघलो..मंदीरासमोरची दीपमाळ फारच सुंदर होती... बराच वेळ हुडकुनही महदरवाज्याचा रस्ता सापडत नव्हता.. पण महादरवाजा बघितल्याशिवाय जायचंच नाही असं ठरलं होतं नाही तर त्या ट्रेकचा उपयोगच काय??? शेवटी दगडांच्या पायर्‍या दिसायला लागल्या. वाटे अजुन काही भटके सापडले. काही वेळाने आम्ही महादरवाज्यापाशी पोचलो आणि ट्रेक सार्थकी लागला असं वाटलं. आमची गाडी ठाकरवाडीत होती आणि जर आम्ही महादरवाज्याने उतरलो तर धोंडसे गावात पोचणार होतो. पण पुन्हा उलटं जाण्याऐवजी आम्ही धोंडसे गावात उतरुन मग ठाकरवाडीला जाउ असे ठरले. आणि इथेच फसलो..



पण प्रॅक्टिकली ट्रेकचा हाच पॅच थ्रीलिंग होता.. उतरताना गडाच्या पायर्‍यावरुन पाणी अगदी फोर्सफुली वाहत होते त्यामुळे ते दगड गुळगुळीत झाले होते त्यामुळे प्रत्येक पाउल सांभाळुन टाकावे लागत होते... तरीही दोन वेळा मी गोल केलाच... पहीला गोल एकदम सही होता.. मी एका दगडावरुन बसुन हळूच उतरत होतो आणि माझा पाय घसरला. धाड धुड माझ्या तंगड्या वर झाल्या आणि मी त्या खडकांमधे आदळलो. नशीब पाठीवर बॅग होती त्यामुळे जास्त लागलं नाही... मी कसाबसा उठलो आणि पुन्हा सांभाळून चालु लागलो... काही वेळाने अगदी सहज चालताना एका दगडावर पाय ठेवला आणि पुन्हा सटकलो यावेळी उजव्या हातावरच पडलो. हात मजबुत दुखावला. माझ्यामागे अनुजा होती,तीने मला पटकन सावरलं नाहीतर मी सरळ खाली असलेल्या दुसर्‍या कातळावर आदळलोच असतो. ( विशेष म्हणजे हा अनुजाचा पहिलाच ट्रेक होता जिथे तिने एकही गोल नाही केला ) आजचा दिवस काही खरं नव्हतं एका मागुन एक दोन गोल झाले होते... उतरता उतरता एक गोष्ट जाणवत होती की गेला एक - दिड तास आम्ही चालत होतो पण बेस काही सापडत नव्हता... इतर ट्रेकर्स ग्रुप सोबत होतेच.. पण एका ठिकाणी येउन आम्ही थबकलो कारण पुढे रस्ताच नव्ह्ता..आणि तो पाण्याचा प्रवाह पुढे धबधब्यात कन्व्हर्ट झाला होता.. जो ट्रेकर्सचा ग्रुप सोबत होता त्यांच्यातले काहीजण पुढे गेले होते. ते नक्की कोणत्या मार्गाने गेले तेच समजत नव्हते त्यामुळे चुकामुक झाली आम्ही रस्ता शोधत होतो शेवटी आरोळ्यांना प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो... काही वेळाने खाली उतरलो आणि बघतो तर बरेच जण होते आणि नदीतुन मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. मग आम्हीही त्यांच्याबरोबर नदी पार केली... चालता चालता मला राहुन राहुन वाटत होते की आपण रस्ता चुकलोय.. तरीही नदीच्या एका बाजुने आम्ही चालत होतो.. काही वेळाने लक्षात आलं की आपल्याला नदीच्या दुसर्‍या बाजुला जायचयं.मग काय चला रिव्हर क्रॉसिंग.. एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही नदी पार केली. प्रवाह बराच होता पण सावरत सावरत आम्ही नदी पार केली.. फार मजा आली..मग त्या बाजुने चालताना मला आम्ही जिथुन गड चढायला सुरु केला होता तो स्पॉट दिसला आणि मग सगळं लक्षात्त आलं.. ( खरं तर आम्ही पहिल्यांदा नदी पार केली त्या ऐवजी आम्हाला नदीच्या त्याच बाजुने किनार्यावरुन जायचे होते, पण वाट चुकल्याने आम्हाला दोन वेळा नदी पार करावी लागली ) त्याच परत पुढे गेल्यावर काही मुले पोहत होती... त्यांना ठाकरवाडीचा रस्ता विचारल्यावर त्यांनी रस्ता दाखवला.. म्हणजे आम्हाला पुन्हा नदी पार करायची होती.. चला परत कंबरभर पाण्याच्या प्रवाहात आम्ही पुन्हा नदी पार केली.ऑस्स्सम !! नथिंग लाईक इट! काय हवं आयुष्यात अजुन???

काही वेळाने नदीवर छोटा पुल दिसला... काही क्षण गडाला पुन्हा डोळ्यात भरुन घेतले आणि चालु लागलो..समोर एक गुराखी दिसला त्यांना ठकरवाडीचा रस्ता विचारला तर तो बोलला की समोरुन चालत गेलात तर १ तासात पोहचाल. आम्ही आता धोंडसे गावात पोहचलो होतो. म्हणजे आमची गाडी जिथे होती तिच्या अगदी विरुद्द दिशेस.. मग स्थानिकांकडुन माहीती घेउन आम्ही धोंडसे गावातुन एस्.टी. पकडुन एकवीस गणपतीच्या स्टॉपवर उतरुन मग पुन्हा ठाकरवाडीला एस्.टींए जायचे असे ठरले.. काही वेळाने आम्ही तिथे पोहचलो. इथुन पाली फक्त ४ किमी होते आणि ठाकरवाडी १० किमी. आम्ही महेशला एका बाईकवरुन पुढे जाउन गाडी आणण्यास पाठवले आणि आम्ही तिथेच टेकलो..महेशला जाउन बराच वेळ झाला होता... ठाकरवाडीची शेवटची बस जाउन परत पालीला गेली तरीही हा आला नाही.. आता बराच वेळ झाला होता तरीही महेशचा काही पत्ता नव्हता. आता हळूहळू काळोख पडु लागला आणि आमची काळजी अधिकच वाढु लागली.. याला इतका वेळ का लागावा??? आम्ही वैतागलो होतो.. मग ठरवलं की रिक्षा करुन आपण ठकरवाडीला जायचं पण रिक्षावाले २०० - ३०० च्याखाली ऐकेनात. त्यात महेशचे दोन्ही सेल बंद होते..आम्ही गेलो आणि हा झर्रकन निघुन गेला आणि त्याला आम्ही सापडलो नाही मग पुन्हा चुकामुक... वळणावरुन येणारी प्रत्येक गाडी आम्हाला आमचीच गाडी दिसत होती... आशु आणि मी वळणावर जाउन उभे होतो... आता ९ वाजायला आले होते. काहीच कळत नव्हत काय करायचे ते... शेवटी एक स्विफ्ट थांबली त्यात ५-६ जण तरुण बसले होते.. त्यांआ आम्ही झालेला प्रकार सांगितला.. ते सर्वजण नशेत होते, प्रोबॅबली डोपर्स.. त्यातला एकजण बोलला की तुमच्यापैकी कुणीतरी एकाला पाठवा आमच्याबरोबर आम्ही बघुन येतो.मी तयार झालो. मुलं ठिक दिसत नव्हती पण सोड ना यार!! आम्हाला महेशची काळजी वाटत होती. अनुजाने मला बाजुला घेउन शंका बोलुन दाखवली, पण अजुन काही उपाय नव्हता मी त्यांच्या गाडीत बसणार इतक्यात समोरच्या वळणावरुन एक गाडीचे प्रखर हेडलाईटस आमच्या डोळ्यावर पडले आणि ओळखिचा हॉर्न कानावर पडताच आमच्या जिवात जिव आला... हो आमचीच गाडी होती ती... आम्ही सारेजण गाडीत बसलो.. महेश फार टेन्सड वाटत होता.. (आम्ही त्याला काहीच विचारले नाही असे आधीच ठरले होते).आता नॉनस्टॉप मुंबई !!  पण काहीवेळाने अनुजाने त्याला विचारलं की काय झालं रे ? इतका उशीर का झाला.???  त्यावर महेशने त्याची कहाणी ( झालेला सगळा प्रकार) सांगितली... महेश ज्या बाईकवाल्यासोबत गेला होता तो बाईकवाला ठाकरवाडीला नाही तर नांदगावला जाणारा होता.. त्याने महेशला मुख्य रस्त्यावर न सोडता नांदगावला नेउन सोडले जो गाव ठाकरवाडीपसुन ६ - ७ किमी होता.. नांदगावातुन उलट चालत येउन परत मुख्य रस्त्यावरुन चालुन त्याला पाछापुरहुन ठाकरवाडीला जावे लागले.. बरे, काळोख पडत होता आणि हा त्या निर्जन रस्त्यावरुन एकटाच चालत होता. आजुबाजुला मानसांचा मगमुसही नव्ह्ता त्यामुळे तो घाबरला होता.. वाटेत एका गावात त्याने विचारल्यावर त्या लोकांनीही त्याला घाबरवले की अरे आता तु नाही पोचणार, पुढे जंगल आहे, स्मशान आहे वैगरे वैगरे.. तरीही चालत चालत बिचारा रडवेला होउन कसाबसा ठकरबाडीला पोचला आणि तिथुन गाडी घेउन १० मि. परत आला.. चालुन चालुन त्याचे पाय गळ्यात आले होते आणि त्याला गाडीही नीट चालवता येत नव्हती, मग आशुने गाडीचा ताबा घेतला... बराच वेळ झाला होता... अनुजा आणि आशुला पालघरला पोचायचे होते, सुहासला सकाळी ३.०० वाजता ऑफीसला पोचायचे होते, सगळा प्रॉब्लेम झाला होता... मग आशु,अनु, आणि महेशला मी माझ्या घरी राहायला सांगितले, सुहासला कसंही करुन ऑफिसला पोचायचे होते. साडे दहा - अकरा वाजता आम्ही हाय - वे वर एकवीरा मध्ये डीनर आटपला आणि पनवेलच्या दिशेने निघालो... सुहासला पनवेल स्टेशनवर सोडले, त्याच्या नशीबाने त्याला शेवटची लोकल मिळाली...मग रात्री मस्तपैकी झोपुन सकाळी आम्ही आपापल्या ऑफिसच्या दिशेने निघालो पुन्हा एकदा आठवडाभर कॉर्पोरेट विश्वाचा ट्रेक सर करण्यास........

नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते, महाराजानी त्यासाठी सुधागडची पाहणी केली पण महराजांनी रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली - सौजन्य अनुजा सावे....