Friday, December 31, 2010

दसविदानिया: २०१०!

मी क्षणांचा भागीदार, क्षणांचा साक्षीदार!
युगांच्या भाषा कुठुन करणार?
अशाच काही क्षणांच्या आठवणींनी हे वर्ष आता सरेल.  

डिसेंबर महिन्याचे  अखेरचे दिवस. या वर्षातली शेवटची पोस्ट लिहतोय. बाहेर मस्त थंडी पडलीय. खिडकीच्या शेजारी बसुन, गार वार्‍याच्या झुळूकीबरोबर मन आपोआप मागे मागे जातेय आणि शब्द होउन लॅपटॉपच्या स्क्रीनवर उमटतयं. बरंच काही दिलं या वर्षाने मला आणि तेवढचं हिरावून घेतलं. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल! गेल्या वर्षी डिसे. ०९ मध्ये ट्युलिप टेलिकॉम मध्ये जॉईन झालो. या डिसे. ला १ वर्ष पुर्ण झालं. बघु अजुन किती वर्ष काढतो ते इथे! :)

या वर्षी एप्रिलमध्ये बर्‍याच वर्षापासुन मनात असलेली गोवा ट्रीप आम्ही केली. वेल, माझ्या आयुष्यातली सगळ्यात खराब ट्रीप होती. माझे अगदी जीवाभावाचे मित्र मी या ट्रीपमुळे तोडले. ४ दिवसांची ट्रीप होती. पण मी ज्या दिवशी गेलो फक्त तो दिवस फिरुन, एक रात्र काढुन दुसर्‍या दिवशी मित्रांचा निरोप घेतला, तो कायमचा! होतात काही समज - गैरसमज मैत्रीत असे; पण प्रत्येकाला त्याची चुक समजायला हवी ना? मला समजली आणि मी बाजुला झालो. खूप गहन मैत्री होती आमची. आयुष्यातले बरेच, ऑलमोस्ट खूप काही क्षण आम्ही एंजॉय केले होते. दिवसभर ऑफीसमध्ये धुमाकूळ, संध्याकाळी मुव्हीज, नाहीतरी पार्कात टाईमपास! कधी हुक्की आली की स्टॉक घेउन पार्कातल्या पीचवर रंगलेल्या गप्पा! एकमेकांची खेचाखेची! पोरींच्या गजाली! आणि बरंच काही! खुप मिस्ड करतोय मी हे सगळं! अगदी कठोर होउन मी त्यांच्यापासुन दुर गेलो. आता परत जावेसेपण वाटत नाही! :(

यावर्षी ट्रेक छान झाले. रोहनने मराठी ब्लॉगर्सची ट्रेक अरेंज केली होती. १७ जुलै ला आम्ही ६ जण विसापुर ट्रेक करुन आलो. रोहनबरोबर ट्रेक करण्याची इच्छा होती. सही माणुस आहे! त्याच ट्रेकला काही नवीन ब्लॉगर्स मित्रांशी ओळख झाली. अनुजा, सागर नेरकर, सुहास झेले, भारत मुंबईकर! त्यानंतर नुसता बझबझाट! धमाल! 
त्यानंतर सुधागड, तांदुळवाडी, रतनगड, रायगड असे ट्रेक्स केले. अनुजाच्या इथे एक खादाडी ट्रेक पण केला! ( स्वगत:- आयला त्या पिकनिक ची पोस्ट मला टाकाअय्ची आहे अजुन! ) एकदम मस्त आणि खतरनाक! धम्माल आली! आता सारे अगदी जीवाभावाचे मैतर झालेत!

बरचं काही झालं या वर्षात, वेल सगळं काही सांगण्यासारखं नाहिए! 

तरीही, सगळी मज्जा मज्जा! 
अशीच मज्जा मज्जा आपणा सर्वांच्या आयुष्यात येवो आणि हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो!

Sunday, December 26, 2010

निशिगंध..७

अवेळी पावसामुळे घरी पोहचेपर्यंत बराच उशीर झाला. त्यात ट्रॅफीकने अजुन डोकं फिरवलं. घरी पोहचलो तेव्हा खुप दमलो होतो. चेंजही न करता तसाच बेडवर आडवा झालो. डोळे उघडले तेव्हा रात्रीचे साडे दहा - अकरा वाजले असतिल. सारं अंग ठणकत होतं. संध्याकाळी मीराला भेटायला पण नाही गेलो. मस्तपैकी शॉवर घेतला आणि परत बेडवर येउन पडलो. जेवण नको म्हणुन ममाला सांगितलं. मीराने दोन वेळा कॉल केला होता म्हणुन मम्मीने सांगितले. बेडवर पडल्या पडल्या मी मिराला कॉल केला. ती जणु माझ्या कॉलची वाटच बघत होती. रिंग वाजते न वाजते तोच तिने कॉल रिसिव्ह केला. " हाय मीरा" 
"काय रे काय झालं? आर यु ओके? संध्याकाळी कॉल का नाही केला रे? तु ठीक आहेस ना? तब्येत ठीक आहे ना तुझी?"
एकामागोमाग एक नुसते प्रशन विचारत होती. तिचा काळजीने भरलेला आवाज मला थोडा दिलासा देउन गेला. 
"काही नाही गं, या अवेळी पावसाने सगळी वाट लावली. भयंकर ट्रॅफीक, नुसता वैताग, घरी पोचायला पण उशीर झाला. पोचलो तेव्हा खुप दमल्यासारखं वाटलं गं! मग तसाच पडलो बेडवर, सॉरी तुला आज भेटता नाही आलं." 
"इट्स ओके रे! पण तुझा कॉलच नाही आला त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. मी फोन केला तेव्हा तु झोपला होतास. आई बोलल्या मला.म्हणुन मग मी तुला परत कॉल नाही केला." 
"ओके. अजुन बोल हाव वॉझ युवर डे?" 
"वेल, यु कॅन गेस, हाव इट वॉज विदाउट यु?" 
"ओह्ह्ह! यु मिस्ड मी?" 
"ना रे! मी का मिस्ड करु तुला? मी कधीच नाही मिस्ड करत तुला!" 
"का रे? का मिस्ड नाही करत तु मला? मी तर नेहमी तुला मिस्ड करतो!" 
"मी ही खुप मिस्ड केलं रे तुला आज! शीट! काय होतयं मला काहीच कळत नाही. सारखा तु समोर असावासा वाटत राहतं.सारखं तुला बघत राहवं, तुला ऐकत राहावं. तुझ्यासोबत राहावं असं नेहमी वाटत रे!" 
"मलाही तेच वाटत गं! बस्स थोडे दिवस अजुन मग काय फक्त तु आणि मी ! अजुन कुणी नाही!" 
" आणि आई- पपा आणि वैशु?" अगदी सालसपणे तिने विचारलं. 
"डब्बु ते कशाला येतिल आपल्या बेडरुममध्ये तु आणि मी असताना?" 
"हे हे हे, शहाणा आला!" 
"तु लाजली का गं?" 
"चल, नालायक कुठला! मी कशाला लाजु? चल आता झोप, दमलायस ना? सकाळी बोलु आपण!" 
"नको, मला झोप नाही येत!" 
"का रे? काय झालं बाळाला? का नाही झोप येत?" 
"मीरा, अंगाई गा ना! प्लीज!" 
"काही काय? आता या वेळी?" 
"बाय द वे अंगाई रात्रीच गातात ना?" 
"पण तु काय छोटा बाळ आहेस? मी नाही जा!" 
"अरे असं काय करतेस, गा ना प्लीज!" 
"ओके. ओके. कोणती गाउ?" 
"तुला आवडेल  ती!" 
"बरं, माझ्या छकुल्या!" असं म्हणुन ती गाउ लागली, "नीज माझ्या नांदलाला!" आणि मी केव्हा झोपलो ते मला कळलंच नाही!..
रात्री पुन्हा तेच स्वप्न पडलं.पण यावेळी हॉस्पिटलमध्ये समीरही दिसला. मीरा रियाच्या बाळाला माझ्यापाशी घेउन आली आणि बोलली," हे बघ आपलं बाळं, किती छान दिसतयं ना? अगदी माझ्यावर गेलयं!" 
मी बाळाला घ्यायला जातो तेव्हा समीर समोर येतो आणि बोलतो, "स्टॉप! हे बाळं माझं आहे! माझं आणि रियाचं. आमचं बाळ!" आणि मी पुन्हा दडबडुन जागा झालो. घामाघुम होउन, तहानेने व्याकुळ झालो होतो. का हे स्व्प्न सारखं सारखं पडतयं मला कळत नव्हतं!
**********************************************************************************
त्यादिवशी आमची एंगेजमेंट झाली. अगदी अचानक आणि त्याच दिवशी लग्नाची तारिखही ठरली १७ जानेवरी! मी आणि मीरा अगदी हवेत होतो.आता आम्हालाही एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. मागचे सगळे दिवस आठवून मला हसु येत होतं. किती लवकर आणि अचानक झालं ना हे सगळं?  संध्याकाळी घरी पोचत होतो. कट्ट्यावर मुलं दिसली, मी टॅक्सीतुन उतरलो आणि कट्ट्यावर जात होतो.तेवढयात रियाचा कॉल आला. "बोल गं पोरी, काय करतेस?" 
"काही नाही रे, बस बसलिय अशीच, तु काय करतोयस?" 
"मी काय करणार? आय जस्ट गॉट एंगेज्ड! आताच आमची एंगेज्मेंट झाली! " 
"वा वा! ग्रेट! मज्जा आहे लेका तुझी! मग लग्न कधी करताय तुम्ही?" 
"१७ जानेवरी ची डेट ठरलीए! माझं सोड तु बोल तुझं काय चाललयं? तु कशी आहेस?" 
"मी मजेत रे, बस गोईन ऑन......... " "आय टोल्ड यु टु अ‍ॅबॉर्ट धिस बेबी! आणि तुझं काय चाललयं हे?" मला पलिकडुन समीरचा अस्पष्ट आवाज आला आणि त्याचबरोबर रियाचा सेलफोन खाली पडल्यासारखा वाटला.आवाज जरा लांबुनच येत होता. 
"समीर! प्लीज! सोड मला!" रियाचा अस्पष्ट आवाज, कॉलमध्ये बराच डिस्टर्बन्स, स्प्ष्ट-अस्पष्ट मला काहीच कळेना! मी हॅलो हॅलो करतोय पण समोरुन काहीच प्रतिसाद येत नव्ह्ता. 
"समीर!! समीर प्लीज सोड!" 
"व्हाय आर यु डुईंग धीस टु मी? हं?  आय टोल्ड यु टु अ‍ॅबॉर्ट धीस चाईल्ड!" 
"समीर प्लीज असं नको रे बोलु! हे बाळ आपलचं आहे! प्लीज मला अजुन काही नको तुझ्याकडुन, पण माझं बाळ माझ्याकडुन नको हिरावुन घेउस!" 
"रिया, शट अप! जस शट अप!! मला हे बाळ नकोय! हे बाळ माझं नाहीच! ज्याचं पाप आहे त्याच्याकडे जाउन मर, पण माझ्या घरी नको. समजलं??" 
"सम्म्म्मीरररर!! आईईई गं!!!!" समीरचा दातओठ खात आवाज आणि रियाची किंकाळी ऐकु आली आणि मी हतबल झालो. काही तरी अघटीत घडतेय याची मला जाणिव झाली. घराकडे वळता वळता समोर अक्षय त्याच्या बाईकवरुन येताना दिसला. मी त्याला थांबवला आणि फोन डिस्कनेक्ट न करताच बाईकवर बसलो आणि त्याला वाशीच्या दिशेने चलायला सांगितले. "फास्ट! फास्ट ! एके! लवकर चल!" 
"अरे काय झालंय? ते तर सांग!" 
"तु चल लवकर, नंतर सांगतो!" अक्षयने किक मारली आणि आम्ही वाशीच्या दिशेने निघालो. गॅलरीत ममा उभी होती, तिला खुणेनेच मी येतो म्हणुन सांगितले. आता फोन मी पुन्हा ऐकु लागलो. रियाचे हुंदके आणि समीरची बडबड! " समीर, असं का बोलतोस? मी काय पाप केलयं रे? ही बाळं आपलच आहे! तुझी शप्पथ, या माझ्या पोटातल्या बाळाची शप्पथ रे!" 
"हे बघ रिया मला काहीही ऐकायचं नाहीए! तुला जे करायचं ते कर पण माझ्या घरात हे पाप नको! इफ यु वॉन्टेड टु स्टे विथ मी देन गेट रिड ऑफ धीस! ऑर द डोर इज ओपन! " 
"हाव कॅन यु से दॅट सॅम?" आता रियाचा आवाज थोडा गंभीर झाला होता. 
"हाव कॅन यु से दॅट? गेली ४ वर्षे मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्यासाठी सारं काही सोडुन, माझं घर, माझे आईवडील, सगळ्यांची मनं मोडुन मी तुझ्यासोबत आले. ते आज हे ऐकायला? आता मी जाउ कुठे? सांग ना! काही ऑप्शन आहे का मला? तुझा काय प्रॉब्लेम आहे तो तुलाच माहीत, तु कधीही मला ते नाही सांगितले! हजारवेळा विचारलं तुला! आता तुला माझी गरज काय? झालं मन भरलं तुझं? आतापर्यंत सगळं काही तुझ्याच मनासारखं केलं ना? तुला जे हवं तेच! कधी मला विचारलंस मला काय हवं ते?" 
परत काही तरी डिस्टर्बन्स आणि आवाज येणं बंद झालं! फोन डिसकनेक्ट! नंतर लक्षात आलं की आम्ही वाशी ब्रीजवर पोचलो होतो आणि नेटवर्क नव्हतं. शीट! अक्षयला जोरात बाईक दमटवायला सांगितली. थोड्याचवेळात आम्ही रियाच्या बिल्डींगखाली पोचलो.अक्षयला तिथेच थांबायला सांगुन मी पळतच रियाच्या फ्लॅटच्या इथे पोचलो! डोर बेल वाजवणार होतो पण घाईत हात दरवाज्यावर पडला आणि दरवाजा उघडला. 
"रिया?? रिया?? " मी ओरडतच आतमध्ये शिरलो. सगळीकडे शांतता पसरली होती. कसलाच आवाज येत नव्हता! समोरचा बेडरुम ओपन दिसला. मी त्या रुमच्या दिशेने चालु लागलो. हळूच दार लोटलं आणि समोरचं दॄश्य पाहुन हडबडलो. रिया बेडवर निपचित पडली होती. तिच्या तोंडातुन रक्त वाहत होतं. पुर्णपणे विस्कटलेली. तिला तसं बघुन माझ्या काळजात धस्स झालं! मी धावत तिच्याजवळं गेलो. ती बेशुद्ध होती. मी तिला हाक मारुन उठवू लागलो. पण ती प्रतिसाद देईना. काय करु ते सुचत नव्हतं. काय झालं ते धड कळत नव्हतं. 
"आलास? वाटलच मला तु येशील धावत." समीर मागे उभा होता. त्याला बघुन माझं डोकं फिरलं! 
" समीर व्हॉट द हेल इज धीस?? व्हॉट यु डीड विथ हर?" 
"ए, ओरडु नकोस! तु कोण मला विचारणार? आणि तुला हिनेच बोलावलं ना फोन करुन? तुच ना यार तिचा!" तो बरळत होता, त्याने घेतली होती आणि बरळत सुटला, "माहित आहे मला, हे सगळं तुम्हा दोघांचं घडवलेलं आहे! बीच शी इज!" 
"समीरररर! इनफ नाव! तुला मी बघतो नंतर, आता तु शुद्धीत नाहीस!" 
"तु काय रे बघणार मला हं? समजतोस कोण तु स्वतःला?" असं बोलत तो माझ्यासमोर आला आणि त्याने मला धक्का दिला. 
"समीर! आपण नंतर बोलु! मी पहिल्यांदा रियाला हॉस्पिटलमध्ये घेउन जातो!" मी त्याला समजावण्याच्या स्वरात बोललो, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता! 
"ए, चल! तु काय करणार? ती माझी बायको आहे! आणि बघतो तु तिला कशी घेउन जातो ते?" तो धडपडत आला आणि त्याने माझ्या कॉलरला पकडलं! आता माझं डोकं सटकलं, 
"समीर! यु सन'अफ्'बीच!" आणि एक सणसणीत डाव्या हाताची ठेवुन दिली. तो गरगरला आणि बाजुला पडला! मी रियाला उचललं आणि बाहेर पडलो. मला बघुन अक्षय हडबडला! 
"अरे बघतो काय बाहेर जा आणि टॅक्सी घेउन ये!" तो बिचारा मी सांगेन ते करत होता. मला बघुन त्या सोसायटीतले सगळेजण अचंबित होउन बघत होते. मी रियाला घेउन गेटच्या बाहेर आलो. अक्षय तिथेच टॅक्सी घेउन आला. मी टॅक्सी एमजीएम हॉस्पिटलच्या दिशेने घ्यायला लावली. अक्षय मागुन बाईकवरुन येत होता. रिया अजुनही शुद्धीत नव्हती. तिला तसं बघुन मला कसं तरी होत होतं! तिच्या तोंडातुन वाहणारं रक्त मी पुसत होतो. काही वेळातच आम्ही हॉस्पिटलला पोचलो. तिला ताबडतोब कॅज्युलटीमध्ये घेउन गेलो.डॉक्टरांनी लगेचच तिच्यावर उपचार सुरु केले. माझं काळीज धडधडत होतं. 
मीराचा कॉल आला," हं मीरा, बोलं" 
"काय रे? पोचलास की नाही घरी? आणि असा धाप लागल्यासारखा  का बोलतोस?" 
"काही नाही गं, थोडा प्रॉब्लेम झालायं." 
"का रे काय झालं? इज एव्हरिथिंग ओके? तु ठीक आहेस ना?" 
"हो गं! राणी, मी ठीक आहे, रियाच्या इथे प्रॉब्लेम झालाय, मी तिला हॉस्पिटलमध्ये घेउन आलोय," अक्षय आला आणि बोलला की डॉक्टर बोलावतायत," मीरा, मी कॉल करतो तुला नंतर.. डॉक्टर बोलावतायत, ओके , बाय!, आय,ल कॉल यु बॅक!" 
"अरे, ऐक ना....." तिचं पुढे काही ऐकण्याआधीच मी फोन डिसकनेक्ट केला आणि इमरजन्सी वार्डच्या इथे पळालो. 
"आपण कोण?" डॉक्टरने विचारलं.
"मी, मी फ्रेंड आहे यांचा? का? काय? झालं? इज समथिंग सिरिअस?" 
"नाही. विशेष नाही! थोडा बीपी लो आहे, आणि त्यात मला वाटतं गेले २ -३ दिवस त्यांच्या पोटातही काही नाही, आर यु अवेअर शी इज प्रेग्नेंट?" 
"यस्स, अ‍ॅ'म अवेअर, इज बेबी ऑलराईट?" 
"वेल, या आय कॅन से! आय मीन, ४था मन्थ आहे! आणि त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. असं उपाशी राहुन, आणि टेंशन्स घेउन नाही चालणार. काही झालं होतं का? आय मीन, त्यांच्या तोंडातुन रक्त वैगरे येत होतं. यांचा हजबंड???" 
"हो, काही तरी झालं होतं! दोघांचं कशावरुन तरी भांडण झालं आणि..." 
"ओके. काही प्रॉब्लेम नाही, बरं केलसं लवकर घेउन आलात ते! मी आता ग्लुकोज चढवलयं. थोड्यावेळाने येईल ती शुद्धीवर! बट, यु हॅव टु बी व्हेरी केअरफुल अबाउट हर अ‍ॅन्ड मेक शुअर शी शुडन्ट कॅरी एनी टेन्शन्स अ‍ॅज् इट वुड बी डेन्जरस फॉर बोथ, मदर अ‍ॅन्ड बेबी!" 
"ओके डॉक्टर, थँक यु सो मच!" डॉक्टर नर्सला काही इंस्ट्रक्शसन्स देउन निघुन गेले! मी रियाच्या बाजुला गेलो. पार कोमुजुन गेलेल्या फुलासारखा तिचा चेहरा झाला होता. ओठांच्या कडेला किंचित रक्त दिसलं. मी ते पुसलं! तिच्या कपाळावरुन हात फिरवला! आणि तिला बघत उभा राहिलो. नर्सने नंतर बाहेर थांबायला संगितलं. मी बाहेर आलो आणि ममाला कॉल केला. झाला प्रकार तिला सांगितला, ती पपाना घेउन हॉस्पिटलला यायला निघाली. मी अक्षयला घरी जायला सांगितलं आता, रात्रीचे ९ वाजायला आले होतं, पण तो माझ्याबरोबरच थांबला! झाल्या प्रकाराने माझं डोकं सुन्न झालं होतं. डोक्याला हात लावुन मी तिथेच बसलो, सारा प्रसंग एखाद्या मुव्हीसारखा माझ्या डोळ्यासमोरुन जात होता. मला समीरची आठवण आली. काय करत असेल तो? माझा हात चुरचुरत होता. पहिल्यांदाच इतक्या जोरात कुणाच्या तरी ठेवली होती. शांतपणे मीराला कॉल केला. तिलाही सारा प्रसंग सांगितला. ती जास्त काही बोलली नाही! फक्त काळजी घे, मी जमलं तर येईन उद्या असं बोलुन तीने फोन ठेवला! आज फोन ठेवताना आय लव्ह यु बोलली नाही! आय लव्ह यु टु! मनातल्या मनात मी बोललो! औषधे आणण्यासाठी नर्स बोलवायला आली. आम्ही दोघे आत गेलो. रिया अजुनही शुद्धीवर आली नव्हती. मी तिच्याकडे बघतच होतो, एवढ्यात ती जोरात किंचाळली, "नाही, नाही ! समीर!, नो! नो! प्लिज! हे माझं बाळ आहे! प्लीज असो नको करुस!" 
आणि ती उठुन बसली. तिला तसं बघताच मी आणि नर्स दोघेही तिच्याकडे धावत गेलो, "रिया, रिया!" 
तिने मला बघितलं आणि तिच्या जीवात जीव आला. मला बिलगुन ती रडुन लागली. 
"मला वाचव रे, माझ्या बाळाला वाचवं. तो समीर! समीर वेडा झालायं. तो माझ्या बाळाला मारायला टपलाय. प्लीज तु मला सोडुन नको जाउस! नाही ना जाणार? नाही ना?" ती जोरात रडु  लागली. 
मी आवेशाने तिला कवटाळलं, ''नाही जाणार तुला सोडुन, ओके? आणि बाळालाही काही नाही होणार, तु लवकर बरी हो!" मी तिचे डोळे पुसले. ती फार घामाघुम झाली होती. तिच्या चेहर्‍यावरुन घामाच्या धारा निथळत होत्या. मी तिला बेडवर निजवलं आणि नर्सने दिलेली औषधांची चिट्ठी अक्षयला दिली आणि त्याला औषधे आणायला पाठवलं. मी तिच्या कपाळावरुन हात फिरवत बसलो होतो. तिने माझा हात घट्ट धरुन ठेवला होता. काही वेळाने अक्षय ओषधे घेउन आला, त्याच्यासोबत मम्मी आणि पपाही आले. नर्सने रियाला काही इंजेक्शन्स दिली, त्याबरोबर ती हळूहळू झोपी गेली. नंतर आम्ही सगळेजण बाहेर वेटींग रुममध्ये आलो. आणि आता काय करायचं यावर आमची चर्चा सुरु झाली. मी मम्मी - पपाना सारं काही समजावलं आणि रियाला आपल्या घरी घेउन जाउया म्हणुन सांगितलं, कुणी काही बोललं नाही, कारण सगळ्यांना मी समीर आणि रियाची परिस्थिती समजावुन सांगितली. 
"मला रियाला परत समीरकडे पाठवायला भीती वाटतेय, आणि मला नाही वाटत की आजच्या प्रसंगाने ती परत समीरकडे जाईल. पार घाबरुन गेलीय ती! त्यात प्रेग्नेंट आहे, उगाच टेशन्स घेउन काही बरं वाईट करुन घेतलं तर?" 
"ठीक आहे, आपण ती शुद्धीवर आल्यावर तिच्याशी बोलु, तुम्ही काही तरी खाउन घ्या, अक्षय तु घरी जा रे, तुझी आई काळजी करत असेल! आता रात्रही फार झालीय." 
मी आणि ममा हॉस्पिटलमध्ये थांबलो अक्षय पपाना घेउन घरी गेला. ती रात्र मी आणि ममा हॉस्पिटलमध्येच थांबलो. दोघेही रात्रभर जागेच होतो. सकाळी साडे सहा वाजता नर्सने बोलावलं. रिया शुद्धीवर आली होती. आम्ही तिच्याजवळ गेलो."गुड मॉर्निंग मॅम, कसं वाटतयं आता?" ती हसली,. मान हलवुन ओके बोलली. काही वेळाने डॉक्टर आले. त्यांनी तिचं चेक अप केलं, "वेल, शी इज परफेक्टली फाईन नाव!" 
नंतर डॉक्टरने मला बाजुला बोलावुन घेतलं." लुक! यु हॅव टु बी वेरी केअरफुल अबाउट हर! नो स्ट्रेस! ट्राय टु किप हर नॉर्मल ऑलवेज! मेंटली शी इज टु वीक! अ‍ॅन्ड इट कुड बी डेंजरस फॉर बोथ अ‍ॅज आय टोल्ड यु यस्टर्डे!" 
"या! डॉक्टर! आय विल! व्हेन शी'ल बी गोईन टु गेट डिस्चार्ज?" 
"यु कॅन टेक हर नाव! शी इज ओके!" 
"थँक्स!" मी रियाकडे गेलो. आणि पुढे काय करायचे त्याबाबत विचारले. ती काहीच बोलत नव्हती. मग ममाने आणि मी आधीच ठरवल्याप्रमाणे तिला आमच्या घरी न्यायचे ठरवले. तिला तसं बोलुन दाखवलं, पण तिला समीरची भीती आणि चिंता दोन्ही सतावत होत्या. त्यात तिच्या माहेराकडुनही असं कुणी नव्हतं की जिथे ती रिलॅक्स राहिल. मी बराच मोठा निर्णय घेत होतो. माझ्या या निर्णयाचे बरेच परिणाम होणार होते. पर्यायाने मी, मीरा, रिया आणि तिचं बाळं आणि समीर या सगळ्यांवर या निर्णयाचे परिणाम होणार होते. पण मला जे योग्य वाटले ते मी करत होतो. रात्रभर मी आणि ममाने सगळ्या गोष्टींचा विचार आणि होणारे परिणाम या सगळ्यांचा विचार करुन हे डिसीजन घेतले होते. आणि ममा मला या सगळ्यात मदत करत होती. तिने रियाला याबाबत समजावले आणि मग ती तयार झाली. मनातुन ती तयार नव्हती. पण अजुन काही उपाय सापडत नव्हता. पुढचं पुढे बघु म्हणुन मी रियाला कनव्हींस केलं आणि डिस्चार्ज घेउन आम्ही सगळे आमच्या घरी पोचलो. माझ्या रुममध्ये रियाची सोय केली आणि तिला बेडवर निजवलं. ममाने गरमागरम कॉफी केली. मी आणि रिया ती घेत बसलो होतो.
"काय ना हे सगळं झालं? माझ्या एका हट्टापायी, किती जणांना मी त्रास देणार आहे काय माहित?" 
"इट्स ओके, रिया! तु आता कसलाही विचार करु नकोस, जे होईल ते आपण बघुन घेउ! लेट्स फेस इट ऑन अ‍ॅन्ड ऑन!" 
मीराचा कॉलः " गुड मॉर्निंग डार्लिंग!"  
"हो ती ठीक आहे आता!" 
"अरे नको, तु हॉस्पिटलला नको येउस, आपल्या घरी ये, मी तिला आपल्या घरी आणलयं!" 
"हो! माहित  नाही! बघु! तु कशी आहेस?" 
"ठीक आहे. ये मग घरी!" 
"या बाय! टेक केअर!" 
*************************
"ममा, मीरा येतेय गं!" 
"रिया तु फ्रेश होउन घे! आणि कपडे??? वैशुचे होतिल तुला, किंवा माझे ट्रॅक्स आणि टी'स आहेत." 
"जरा फोन दे ना!" 
"समीरला कॉल करतेस?" मी तिच्याकडे फोन देत बोललो.
"अम्म्म! काय करु? कसा असेल तो? काल त्याच्या अंगात सैतान शिरला होता. पण तुला कसं कळलं आणि तु कधी आलास?" 
"अरे आपण बोलत होतो, इतक्यात तुझा फोन खाली पडला वाटत! पण तो बंद नव्हता झाला. तुमचं बोलणं मला ऐकु येत होतं, काही तरी होणार याची भनक लागुन मी माझ्या मित्राबरोबर आलो. येवुन बघतो तर काय? त्याने तुला मारलं का गं?" 
"हम्म्म! मला काही नाही रे! मी बाळाला वाचवायचा प्रयत्न करत होते!" 
"हाव कॅलस! ही इज! तु खरचं त्याला कॉल करणार आहेस?" 
"हो करते! उगाच पुढे प्रॉब्लेम्स नको. मी तुला किती दिवस त्रास देणार अजुन?" 
"रिया, नको करुस! आपण नंतर बघु काय करायचे ते! तु आता फ्रेश हो! नंतर बोलु!" 
मी जायला वळलो! तीने माझा हात धरला," थँक्स! तु नसला असता तर काय माहीत काय झालं असतं?" 
मी हसलो. तिच्या हातावर हात ठेवत बोललो, "डोन्ट वरी! आय वील बी देअर व्हेनेव्हर यु वॉन्ट मी!"
दुपारी १२ च्या दरम्यान मीरा आली. मी हॉलमध्ये पडलो होतो. रिया झोपली होती. तिला बघुन उठलो. ती धावत येउन मला बिलगली. "ए,काय झालं?" 
"काही नाही! खुप मिस्ड करत होते तुला! तु ठीक आहेस ना?" 
"मला काय झालयं? मी ठीक आहे! तु कशी आहेस?" 
"काल पासुन चित्त थार्‍यावर नव्हतं तुला बघुन जीवात जीव आला. रिया कशी आहे?" 
"ठीक आहे आता, झोपलीय!" 
"मग तु काय करणार आहेस पुढे?" 
"माहित नाही, सध्या तरी तिला इथेच राहु दे! तिला समीरकडे पाठवण्यात अर्थ नाही. उगाच काही तरी होईल!" 
"पण समीर हे सगळं मानेल?" 
"माहित नाही! बघुया! जे होईल ते होईल, सध्या तरी मला अजुन काही सुचत नाही!" 
"आणि आपलं काय? आपलं लग्न पोस्ट्पोन करावं लागेल का?" 
"असं वाटतयं, बघु! काही तरी उपाय काढु! पण तिला या अवस्थेत दुसरीकडे कुठे ठेवु नाही शकत! यु कॅन अंडरस्टँड दॅट!" 
"अम्म्म! हो!" 
तिचा चेहरा उतरला, पण तसं न दाखवता ती किचनमध्ये गेली आणि मम्मीशी काही तरी बोलु लागली. काही वेळाने ती रियाच्या रुममध्ये गेली आणि तिच्याशी गप्पा मरु लागली. ममीने रियासाठी पेज बनवली होती. ती तिला भरवत होती. 
जेवण झाल्यावर मी आणि मीरा बाहेर गॅलरीत बसलो होतो. दोघेहे गप्प! बोलायला काही नव्हतेच! दोघेही एकमेकांकडे बघत उभे! एकमेकांच्या डोळ्यातुन बोलायच्या प्रयत्नात! ती हळूहळू जवळ आली आणि माझा हात हातात घेतला! आता तिच्या स्पर्शातुन जाणवू लागलं की ती खुप मिस्ड करतेय मला! तिच्या जवळ असुनही! पण का माहित, ती जवळ असुनही मला दूर वाटु लागली!

क्रमशः

Monday, December 20, 2010

स्पर्शांचे आलेख !


स्पर्श! 
खुप काही सांगतो ना? जेव्हा बोलुन बोलुन थकतो. शब्द संपतात. डोळेही  सांगुन सांगुन थकतात तेव्हा एक स्पर्शच सगळं काम करुन जातो ना? 
म्हणजे बघ ना! आपण एखाद्यावर प्रेम करतो. बर्‍याचदा बोलण्यातुन, लिहिण्यातुन, नेहमीच्या वागण्यातुन आपण ते जाणिव करुन देण्याचा प्रयत्न करतो. काहींना ते कळतही, काहींना कळत नाही आणि काहींना कळत असुनही वळत नाही आणि काहींना कळुन घ्यायचचं नसतं. मग अशावेळी एक नाजुकसा स्पर्श सारं काही सांगुन जातो. अनुभवलेयत कधी हे स्पर्शशब्द? फार वेगळं, काहीसं, कुठेतरी नेउन सोडणारं! एका क्षणात भावनांची जाणिव करुन देणारे स्पर्श! 

स्पर्श तरसणारे, बरसणारे, शहारणारे, मोहवणारे...  स्पर्शांची जादुच काही वेगळी असते. लहानपणी आईचा मांडीवर किंवा कुशीत शिरल्यावर, तिचा पाठीवरुन थोपटणारा हात कधी झोपेत घेउन जायचा कळायचे देखिल नाही. मग कधी रागाने मारलेला धपाटाही, जोरात बसला तरी तितकाच प्रिय! कौतुकाने घेतलेला एक पापा, गालगुच्चा, दृष्ट काढताना कडाकडा मोडलेली बोटे, राग ओसरल्यावर छातीशी घट्ट धरलेली तिची मिठी हे सगळं तिच्या शब्दातुन इतक्या सहज समजलं नसतं ना? म्हणुन मग स्पर्श! 

आईसारखा बाबाचाही हात. खरखरीत, ट्णक असला तरी जेव्हा तो मायेने फिरायचा तेव्हा त्यातल खरखरीतपणा कुठ्ल्या कुठे गायब व्हायचा. काटेरीपणा निघुन जायचा आणि मग रसाळ फणसातल्या गर्‍यांसारखा गोड वाटायचा!
वयाबरोबर मन आणि शरीरही बदलु लागतं आणि स्पर्शही बदलु लागतात. पण खरं सांगतो आई-बाबांचा स्पर्श तसाच राहतो.

आपल्या आयुष्यात कुणीतरी मन चोरुन नेणारं येतं. आपण तिच्याबरोबर नेहमी बोलतो, ती सुद्धा नेहमी बोलत राहते. बडबड, गप्पा, गाणी, नेहमीच्याच.पण कधी कधी हे सगळं पुरेसं नाही होतं. शब्द समजतात, पण त्या शब्दांमागच्या  भावना स्पर्शांशिवाय नाही समजत! 
बोलता बोलता एकदा तिचा हात हातात घ्यावा. बोटांत बोटे घट्ट गुंतवावी! त्या स्पर्शाबरोबर तिला आपल्या विश्वात घेउन जावं. तसाच तिचा हात घट्ट धरुन. ती ही मग सारं काही विसरुन त्या स्पर्शावर स्वार होउन मुक्त विहार करु लागते.

कधी कधी ती गोड दिसते. तशी ती नेहमीच गोड दिसते! ती समोर बसलेली असते. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच लहर असते. ती बोलत राहते, हसत राहते, आपण सारं जग विसरुन तिच्या त्या बोलण्यात, हसण्यात स्वत:ला हरवून टाकतो. मग तिला वाटतं की तुमचं लक्ष्य नाहीए तिच्या बोलण्याकडे मग ती सारखी हात लावुन, कधी एक टपली देउन तुम्हाला तिच्याकडे बघायला सांगते. कधी अनुभवलाय तो जाणिवेचा स्पर्श?

कधी कधी ती नाराज असते. उदास होते. दु:खी होते. अश्रुंनी तिचे डोळे भिजतात. मग आपसुकच आपले हात तिच्या गालांवर जातात. आणि ते ओघळणारे अश्रु  जमिनीवर पडायच्या आधीच आपल्या  बोटात मुरुन जातात. कधी कधी हे अश्रु आपण  नुसत्या बोलण्यानेही पुसु शकतो पण ते स्पर्शांनी पुसण्याची गोष्टच काही न्यारी असते. त्या स्पर्शात तिच्या मनात एक जाणिव निर्माण होते की आहे कुणी तरी आपलं, आपले अश्रु पुसणारं!

कधी कधी ती धुंद होते. बरसणार्‍या पावसाच्या सरींचा स्पर्श अंगावर झेलते. झोंबणार्‍या वार्‍याने ती शहारते. धुंद होउन, स्वैर होउन त्या पावसाशी आणि वार्‍याशी खेळू लागते. तिच्या शरीराची होणारी लाही लाही पावसाच्या सरी शीतल करतात. गार वारा त्यावर अलगद फुंकरही घालतो. पण तिच्या तप्त मनाला गारवा फक्त तो एक स्पर्शच देतो. तिच्यासोबत आपणही भिजावं, धुंद व्हावं, आणि मग ती थंडीने कुड्कुडायला लागल्यावर तिला आपल्या बाहुत बंधिस्त करावं. ती थरथरुन आपल्या मिठीत शिरते. तिच्या सर्वांगावर ओघळणार्‍या पावसाच्या सरींनी ती चिंब होते. त्यावेळी तिच्या डोळ्यात बघावं. लाजेने आरक्त झालेल्या तिच्या गालांवरील पावसाचे थेंब टीपून घ्यावेत्.लाजुन ती मिठीत अजुनच घट्ट शिरते. तिच्या मानेवरुन ओघळणार्‍या थेंबाना टीपून घ्यावे. आता तिचं तप्त मन कुठेतरी गार होत असतं. ती हळूच तिचे उष्ण श्वास कानाजवळून नेते आणि छातीवर विसावते. गरम पाण्याचा झरा फुटावा तसे तिच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी आपल्या छातीवरुन वाहु लागते. ते सुखाश्रु असतात! पाउस अजुन कोसळायला लागतो. विजा तळपायला लागतात,ढग गडगडायला लागतात. उधाणलेल्या समुद्राच्या किनारी, भर पावसात, उधाणलेली मने घेउन आपण उभे असतो. ढगांच्या गडगटाने ती घाबरुन आपल्याला घट्ट धरते. त्याचबरोबर तिला वेढलेले आपले हातही अजुनच घट्ट होतात. घाबरलेल्या सश्याच्या पिल्लासारखी ती धापा टाकु लागते. तिच्या श्वासांचा वेग वाढतो. अशावेळी तिच्या हनुवटीला स्पर्श करुन तिचा चेहरा आपण समोर धरतो. तिची नजर कावरीबावरी असते. तिच्या चेहर्‍यावरुन पावसाचे थेंब ओघळत असतात. दोन्ही हातांच्या ओंजळीत तो चेहरा भरुन, डोळे बंद करुन तिच्या ओठांवर विसावलेले थेंब प्राशुन घ्यावेत. त्याचवेळी पावसाला अजुन जोर येतो, वारा भरकटल्यासारखा वाहु लागतो. समुद्र जोरदार गर्जना करत लाटांचा मारा करतो! अनुभवलाय कधी हा भिजलेला स्पर्श?

कधी कधी एक दुरावा निर्माण होतो. गैरसमजाची अनामिक दरी तयार होते. ती दरी दोघांना पार करायची असते, कारण दोघांना माहित असतं की आपण एकमेकांशिवाय नाही जगु शकत. पण कधी कधी दरी इतकी खोल होते की एकमेकांचे घट्ट धरलेले हात सुटतात. न बोलताच, न बघताच, न जाणताच आपण एकमेकांपासुन दुर होतो. पण जास्त वेळ  दुर नाही राहु शकत. ही समज - गैरसमजाची दरी बुझवून टाकायलाच हवी. खुप दिवसांच्या विरहानंतर आपण एकमेकांना भेटतो. एकमेकांच्या नजरते आरपार बघतो. पटकन जाणवतं की एकमेकांना खुप मिस्ड केलयं आपण, कारण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये आपलीच प्रतिबिंब दिसतात. अशावेळी काही बोलायचं नसतं. सगळे गैरसमज मिटलेले असतात. न बोलताच, कोणतंही एक्स्प्लेनेशन न देता. ते सारं काही नजरेतुन सेटल्ड होतं. खुपवेळ आपण एकमेकांना बघत उभे असतो. एकमेकांच्या स्पर्शाला तरसलेले असतो. तिच्या गालावरुन अलगद, हिमनदीसारखे संथ वाहणारे गोठलेले पाणी न राहवुन आपण पुसायला जातो आणि तिच्या गालांवरुन हात फिरवतो. आपल्या पापण्यांच्या कडाही ओल्या होतात पण शक्यतो पाणी कोसळत नाही. ती पटकन आपल्या हातावर हात ठेवते आणि विवश होउन तिला मिठीत घेतो. आता तिच्या अश्रुंचा बांध फुटतो आणि एका मोठ्या आत्मविश्वासाने ती रडु लागते.
"अ‍ॅम सॉरी, मी नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय, प्लीझ मला पुन्हा सोडुन नको जाउस!" तिच्या या शब्दानी आपण अधिकच व्याकुळ होतो आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतो.
" अ‍ॅम सॉरी टू! नाही जाणार पुन्हा तुला सोडुन कूठे! मी ही नाही जगु शकत गं तुझ्याशिवाय!" 
तो चंद्र विझेपर्यंत आणि ती शांत निजेपर्यंत आपण असेच एकमेकांच्या मिठीत पडुन राहतो! अनुभवलायं कधी हा विरहानंतरच्या मिलनाचा स्पर्श?

Saturday, December 11, 2010

मनसंचिताच्या चारोळ्या!

(हा लेख मोगरा  फुलला दीपावली अन्क  २०१० मध्ये प्रकाशित केलेला आहे.) 

तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी;
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी...

जेव्हापासुन तू आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.कूठुन आलोय? कुठे जायचयं? दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो.तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.माणसाला एकदा स्वःताची सुरुवात आणि अंत कळल्यावर कदाचित मधाला सारा प्रवास व्यवस्थित पार पडत असेल नाही?माहित नाही अजुन प्रवास करायचायं पण तो तुझ्याबरोबर असेल या जाणिवेने मला अजुन काही सुचत नाही!
तुला माझं असं बोलणं निव्वळ वेडेपणा वाटत असेल ना?मला माहित आहे हा वेडेपणाच आहे.पण ठिक आहे यार, तू इथल्या शहाण्यांच नेहमीचं जीवन बघितलंयस ना? मग कशाला मी शहाणा बनु?राहु दे मला असाच, तुझ्या प्रेमात वेडा होउन!पण हे भासचक्राचे संभव जास्त काळ टिकत नाहीत कधीतरी शहाण्यासारखं जगावंच लागतं.
तुझं हसणं, तुझं बोलणं आणि तुझं माझ्या आयुष्यात असणं या सर्वातच मी हरवून गेलोय आणि हे हरवणं ही इतकं सुंदर आहे की मी पुन्हा कुणालाच सापडु नए, अगदी स्व:तालाही!
तुझ्या एका हास्याने मी वेडा होतो.तुझ्या बोलण्याने माझ्या ह्रदयाच्या तारा आपोआप छेडल्या जातात.मुग्ध होउन मी तुझ्यात पुन्हा हरवून जातो आणि सगळ्यांत जास्त जर कुणी वेड लावलं असेल तर ते तुझ्या त्या जुलुमी डोळ्यांनी! अक्षरशः छळ मांडलाय त्यांनी माझा.बर्‍याचदा असं होतं की मी तुझ्याशी काही तरी बोलायला जातो पण शब्द्च निघत नाहीत आणि मी काही बोलत नाहे म्हणुन तू रुसुन बसतेस.अशावेळी मी या चार ओळी तुझ्या पदरात टाकतो.आशा आहे तू समजुन घेशील...

माझा प्रत्येक शब्द
मी तुझ्या ओंजळीत टाकतोय.
भरुन जाउ दे ओंजळ तुझी,
तुझ्यासाठी नविन शब्द शोधतोय...

खरंच काय लिहु तुझ्यासाठी मला कळत नाही.तुला पाहिल्यावर मला काही सुचतच नाही.फक्त तुला बघत राहावं.काय बोलु? ते ही कळत नाही. तुच बोल ना काही तरी, तोवर मी तुझ्यासाठी काही नविन शब्द सापडतात का ते पाहतो.
तू बोलताना मला फार गम्मत वाटते.कधी कोसळणार्‍या पावसा सारखं, तर कधी रिमझिम सरींसारखं, कधी अळवाच्या पानावर असलेल्या मोत्याच्या टपोर्‍या थेंबासारखं तुझं बोलणं मी ऐकत राहतो.तू बोलत राहिलीस की मला सार्‍या जगाचा विसर पडतो.सारं काही विसरुन मी तुझ्याकडे पाहत राहतो. 
" बोल ना रे काही तरी, मीच किती वेळ बोलायचे रे?' तुझ्या या वाक्याने मी भानावर येतो. 
आता काय बोलु?? तू समोर असलिस की शब्द्च जणु मु़के होतात आणि माझे डोळे बोलु लागतात. तला डोळ्यांची भाषा कळते का? चल आपण डोळ्यांनी बोलुयात. 
मला तुझे डोळे फार आवडतात, तुला कधी बोललो नाही पण आज सांगतो एखाद्या मासोळीचे असतात ना अगदी तसेच वाटतात मला तुझे डोळे. हसतेस काय?खरं सांगतोय.या,या तुझ्या डोळ्यांनीच मला वेड लावलंय. इतकं की कधी कधी माझे डोळे सुद्धा माझ्याकडे अनोळख्यासारखे बघत राहतात.कधी कधी तर हे वेड इतकं शिगेला पोहचतं की मला सगळीकडे तुझेच डोळे दिसु लागतात.मग कावरा बावरा होउन तुला सांगावंस वाटतं;

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात.
तसा आहेच मी थोडा वेडा,
पण ते चारचौघातही मला वेड्यात काढतात.

एकदा ना मला तुझ्या डोळ्यांत मिसळून जायचंय.पण मला माहितीए कि तू माझ्या डोळ्यांत कधी पाहत नाहीस.फक्त त्यादिवशी आपण कॉफी शॉपमध्ये बसलो होतो, तेव्हा तू किती तरी वेळ माझ्याकडे पाहत होतीस्.पण संदिग्ध नजरेने! तुझं तसं ते मुकपणे पाहत राहणं मला सहन होत नव्हतं. मला डोळ्यांच्या भाषा फार लवकर कळतात. साध्या सरळ आणि प्रॅक्टीकल गोष्टींच्या मी सहसा वाटेला जात नाही. त्यात काही मजा नाही गं ! बरंच काही चाललं होतं तुझ्या मनात.तुझ्या डोळ्यांत ते स्पष्टपणे  दिसत होतं. त्यादिवशी मी पहिल्यांदा तुला स्पर्श केला होता.थरथरत्या हाताने तुझा हात हातात घेतला होता.
काही तरी वेगळंच जाणवत होतं.तुझी नजर माझ्यावरुन हालत नव्हती.थोडंसं पाणी दिसतयं त्यांत पण मोठ्या शिताफीने तू ते परतवून लावतेस.ते पाणी कुणासाठी का असेना पण तुझ्या डोळ्यांचं सौंदर्य घालवतात.तुझे डोळे असेच छान दिसतात. हसरे, बोलके, खट्याळ अगदी माश्यांचे असतात ना तसेच! तू कधी माशांच्या डोळ्यात पाणी पाहिलंय?? नाही ना?? 
मग मला तुझ्याही डोळ्यांत पाणी नाही बघवतं.मग ते माझ्यासाठीही का असेना.मग अशावेळी या चार ओळी मी तुझ्या गालावरुन अलगद पुसतो.

माहीत आहे मला 
तू रडतानाही हसण्यचा प्रयत्न करतेस,
माझे अश्रु तुझ्या डोळ्यांतुन
अलगद पुसण्याचा प्रयत्न करतेस.

त्यांतर मला नाही आठवत की आपण  एकमेकांना कधी डोळे भरुन पाहीलं.पण खरं सांगु, तोंडाने बोलण्यापेक्षा डोळ्यांनी बोलायची गम्म्त फार वेगळी असते. असंच वेड्यासारखं एकमेकांच्या डोळ्यांत मिसळून जाउन डोळ्यांनीच बोलायचे आणि बोलता बोलता एकमेकांच्या ह्रदयात उतरायचे आणि मग एकमेकांच्या ह्रदयाची धडधड ऐकायची; एकमेकांच्या नावाचे ध्वनी - प्रतिध्वनी ऐकायचे! काही तरी वेगळं, कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात नेउन सोडणारं. जिथे फक्त तू आणि मी! 

चल असंच कधीतरी एखाद्या समुद्राच्या किनारी जाउ. तासनतास एकमेकांच्या डोळ्यांत पाहत राहु. एकमेकांमध्ये इतके हरवून जाउ की त्या समुद्रालाही आपल्या अस्तित्त्वाची भूल पडावी आणि तो त्याचं ते विशाल रुप विसरुन,स्तंभित होउन आपल्या दोघांना बघत बसावा. चल कधी एखादया उंच पर्वतावर जाउ, खोल दरीच्या काठावर, त्या निराकार आभाळाच्या छायेत विसावू.एकमेकांमधे इतके विरुन जाउ कि त्या पर्वतालाही स्व:ताच्या उंचीचा हेवा वाटावा. दरीला आपला तळही न सापडावा, आणि आभाळाला त्याची निराकारता सोडुन आपल्यासाठी एक आकार घ्यावा लागावा. पण मनाच्या या सार्‍या गोष्टी, मनाचे हे सारे खेळ फक्त एकमेकांच्या मनालाच ठावूक. त्यावर कसलाही जोर आजमावून चालत नाही आणि म्हणून अगदी निर्भयतेने मी तुला विचारतो,

तुझं मन माझं मन माझं मन डोंगर दर्‍यांची रांग
तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग??
वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने;
एकच असेल तर विरुन जाउ एकमेकांच्या मिठीमध्ये.

मी असं बोलतोयं खरं पण तुझ्यापसुन दुर होणं मला कधीही शक्य नाही होणार. हे तुलाही माहित आहे.. पण अशी शंका तरी का यावी माझ्या मनात??? 
"तू वेडा आहेस अगदी वेडा, ठोंब्या कुठचा!! तुला का रे असं वाटतं की आपण वेगळे होउ??"
तुझ्या या भाबड्या प्रश्नावर मी फक्त एक मंद स्मित करतो. 
काय सांगु तुला??? माझ्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नाही, पण एक विचारु??

माझा वेडेपणा इतरांना कळतो
तुला का नाही कळत
जुन्या वाटा सोडुन तुझं पाउल
माझ्याकडे का नाही वळत??

यावर तू स्तब्ध होतेस. काहीच बोलत नाहीस्. मला तुझी स्तब्धता कळते, ती पटकन तुझ्या डोळ्यांत उतरते. 
पण डोंगर दर्‍या,नदया नाले, समुद्र,पर्वत,वाळवंटे, आडवाटा तुडवून आलेल्या आपल्या दोघांच्या मनाला एकमेकांशिवाय कोणाचाच आधार नाही.मग अशावेळी त्यांना एकमेकांच्या मिठीत विरुन जाउ दे!! आपण त्यांना पाहत बसु!! अशावेळी आपण थोडा संमजसपणा दाखवू.म्हणजे मीच गं !! मला ठावूक आहे की आपल्यांत मीच जास्त चुका करतो. पण तरीही.. 

चल, काही क्षण  वाटुन घेउया,
तुझं - माझं,
माझं - तुझं करण्यापेक्षा,
आपलं म्हणुन जगुन घेवुया.

अशाच एका वर्षासंध्येला मी बाहेर पडलोय. घरात मन लागत नाही.. पाउस नुकताच पडुन गेलाय. तुझ्या आठवणी मनात घेउन मी चाललोय.चालत चालत एका माळरानावर येतो.सुसाट वाहणारा वारा त्याच्याबरोबर वाहत आणलेल्या पावसाच्या थेंबानी मला भिजवून जातोय.जशी तू माझ्या छातीवर डोकं ठेवून तुझ्या अश्रुनी माझ्या ह्रदयाला न्हाउ घालतेस ना अगदी तसाच.त्या मो़कळ्या, निर्जन माळावर मी तुला खूप मिस्ड करतोय.त्यात हा वारा, त्याच्याबरोबरचे थेंब, वाटेवरची फुले, गाणारे पक्षी, खळाळून वाहणारे झरे, दुर कुठेतरी वाहत जाणारी नदी हे आज सारेजण माझ्याविरुद्ध कट रचुन तुझ्या आठवणीत अजुन भर घालत आहेत.
आजं अचानक आभाळ सोनेरी झालंय. सुर्य पश्चिमेकडे कलंडतोय आणि जाता जात सारं सोनं आभाळात फेकुन जातोय.सारं आभाळ सोन्याने भरुन गेलंय. ते लुटायला इथे कूणीही नाही.
हा सोनेरी पिवळा रंग मला तुझी पिवळ्या साडीतल्या छबीची आठवण करुन देतोय.आज का सारं विश्व मला तुझी आठवणं करुन देतयं?? आणि जसं ते मला तुझी आठवण करुन देतयं तसंच तुलाही तुझं विश्व माझी आठवण करुन देतं का?? नसेल देत तर असु दे!! 
आता थोड्यावेळाने सुर्य मावळेल..?? कूठे जाईल तो?? कदाचित त्याच्या घरी.. 
थांब !! आकाशात पसरलेल्या या सोन्याची एक माळ करतो आणि माझी आठवण म्हणून या सुर्याकरवी तुला पाठवून देतो...

माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ,
सये माझ्या गळ्यातली

तू सोनियाची माळ!

आवडली का तुला??? धड गुंफायला ही वेळ नाही मिळाला.पण मला माहित आहे तुला नक्की आवडेल. आता थोड्यावेळाने काळोख होईल, हे सोनेरी आभाळ कभिन्न काळोखाने भरुन जाईल.रात्र जीवघेणी असते.सार्‍या आठवणींना एकत्र करते. रात्र नकोशी वाटते.दिवसाचं एकटेपण मी गर्दीत काढु शकतो पण रात्री आठवणींच्या गर्दीत एकटा नाही राहु शकत. पण, कदाचित तू ही माझ्यासारखीच एकटीच असशिल ना?? हा गर्दीतला एकटेपणा फार सतावणारा असतो.
चल आता ये परत मी तुझी वाट पाहतोय त्याच वळणावर जिथे आपण एकमेकांच्या मनांना एकत्र करुन स्वःता वेगळे झालो होतो.
जाता जाता पुन्हा चार ओळींचं अर्ध्य मी तुझ्या ओंजळीत वाहतोय...

डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना!

एकदा मला रडायचयं !

मला आठवत नाही, लास्ट टाईम मी कधी रडलो होतो ते? 
रडणं म्हणजे?? अश्रुनी डोळ्यांना भिजवलं नाही, गालावरुन पाणी घरंगळत ह्रदयावरुन गेलं नाही! 
"छे! पुरुषासारखा पुरुष तू आणि रडतोस काय?" असं कुणी तरी म्हटलं! 
का? पुरुषानी कधी रडुच नए? मग त्यांना अश्रु तरी का दयावे देवाने? 

पण मला खरंच आठवत नाही की मी लास्ट टाईम कधी रडलो होतो ते! 
कधी कधी वाटतं की माझे अश्रुच गोठुन गेलेत.त्यांचे हिमनग झालेत. किती रडावसं वाटलं तरी अश्रु बाहेर पडत नाहीत! ते ही माझ्यासारखेच कठोर, पाषाण झालेले! पण खरं सांगतो मला खुप रडावसं वाटतयं. डोळे ओसंडुन जातिल इतकं रडायचं आहे! 

रडायला मला जागाही नाही सापडत. माणसांच्या; प्रेमळ माणसांच्या, मायेच्या माणसांच्या, वैतागलेल्या, रुसलेल्या, चिडलेल्या, रागावलेल्या, हसणार्‍या, गाणार्‍या, माणसांच्या दुनियेत मी कुठे माझे अश्रु वाहु? 

"अश्रु मौल्यवान असतात सखे, ते असे ओसंडुन वाया घालवु नकोस, ते मातीत मिसळुन जातिल! सगळ्याच आसवांची मातीत मिसळल्यावर फुलं होत नाहीत!"  

मी तिला नेहमी सांगायचो. त्यावेळी खरं तर मला तिचा हेवा वाटायचा. मला का नाही येत असं रडता? मला नेहमी वाटायचं की मी माझे अश्रु गोठवुन कुणाचे तरी अश्रु पुसतोय. पण नाही! खरं तर मी माझेच अश्रु पुसायचो त्यांच्या  डोळ्यांतुन! पण तरीही माझा हा अट्टाहास आहे की कधी त्यांनी ही त्यांचे अश्रु माझ्या डोळ्यातुन पुसावेत! 
का, माझ्या अश्रुंना काहीच किंम्मत नाही? की ते दिसत नाहीत म्हणुन त्यांना जाणवत नाहीत? 
अश्रु म्हणजे फक्त पाणीचं ना गं? 
नाही! नुसतं पाणी नाही! खारं पाणी, सुख दु;खाचं मिश्रीत पाणी! 

कधी ह्रदय भरुन आलं, की बरसणारं पाणी! पण या पाण्याने कुणी सुखावतं का गं? दुसर्‍याच्या डोळ्यात स्वःतासाठी अश्रु बघण्यात एक अपुर्व आनंद असतो, आनंदापेक्षा एक धीर असतो त्या अश्रुंत! खांडेकरानी कुठेतरी लिहिलंए! खरं आहे ना ते? कुणी तरी आपल्यासाठी रडतयं ही भावना किती सुखास्पद असते ना? खोटं वाटतं तुला? असेलही कदाचित! 

तुला कधी वाटलं का मी रडावं तुझ्यासाठी? तुझ्या विरहाने व्याकुळ होउन, धावत येवुन तुला छातीशी घट्ट धरुन ठेवावं, मी नाही गं जगु शकत तुझ्याशिवाय असं म्हणुन माझ्या अश्रुनी तुला न्हाउ घालावं! आईच्या कुशीत रडायचो तसं? 
मग तु ही भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत मला तसंच म्हणावं, "मी ही नाही रे राहु शकत तुझ्याशिवाय!"
दोघांचे काठोकाठ भरलेले डोळे! खार्‍या पाण्याने डबडबलेले! त्या अश्रुंतुन आरपार आपण एकमेकांना बघावे! कुणी कुणाचे अश्रु पुसु नयेत. ते तसेच वाहु देत. अश्रु संपेपर्यंत, डोळे कोरडे होईपर्यंत रडत राहावे! 

मला खरंच खुप रडायचयं गं! ह्रदयातला सारा भार, सार्‍या वेदना, वाहुन घालवायच्या आहेत. मी असं ऐकलयं की रडल्याने सार्‍या वेदना, ह्रदयातल्या वेदना अश्रुंबरोबर वाहुन जातात. खरं आहे का ते?
बघं इतका विवश झालोय तरी एखादा थेंबही, थेंब तर सोड पापण्यांच्या कडाही ओल्या होत नाहीत!



एकदा मला रडायचयं,
पाण्यासारखं वाहायचयं,
तुझ्या डोळ्यातुन वाहताना,
तुला माझ्या डोळ्यातुन वाहताना पाहायचयं!
कधी हे अश्रु असेच रडवतात,
बांध फुटला तरी, 
गालांवर ओघळत नाहीत, 
बाष्पासारखे हवेत विरुन जातात!
गाल तसेच कोरडे राहतात!
कोरडे डोळे,
कोरडे गाल,
कोरडे ह्रदय,
कोरडा मी! तू मात्र काठोकाठ भरलेली!

Friday, December 10, 2010

निशिगंध ६

आजचा सगळा दिवस कसा स्वप्नवत होता. हे सगळं इतक्या लवकर आणि असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. तसा मुलींच्या आणि खरंतर प्रेमाच्या बाबतित मी थोडासा अपेशीच होतो. त्यामुळे असेल कदाचित मी कधी त्या फंदात पडलो नव्हतो. पण आज वाटलं, वेल! प्यार इज पॉसिबल, है ना?..कधी नव्हे ते रात्री लवकर झोप लागली, मीरेची स्वप्ने मला जागं राहु देतच नव्हती! 
रवीवार असल्याने मला लवकर उठवायच्या भानगडीत कोण पडत नाही. ११ वाजता जाग आली ती रियाच्या कॉलने. दोन तीन टेक्स्ट ही डिस्प्ले होत होते. ते मीराशिवाय कुणाचेच नसणार याची खात्री होती. " हे रिया, गुड मॉर्निंग!" .... 
" इट्स संडे, स्टील इन बेड, डोन्ट वेक मी अप"... 
" हो, आम्ही येतोय. सहा साडे सहा वाजेपर्यंत पोहचु..." 
" ओय, एक गुड न्युझ आहे, शी सेड येस टु मी! "
.. 
"या, अ‍ॅम सो हॅप्पी!" ... 
" थँक्स, ओके. आम्ही येतो संध्याकाळी. बाय, टेक केअर!" 
मीराच्या गुड मॉर्निंग टेक्स्टना रिप्लाय देउन मी पुन्हा बेडमध्ये शिरलो आणि पुन्हा मीरेच्या स्वप्नात झोकुन दिले. पण आता एक वेगळीच चिंता मला जाणवायला लागली आणि ती म्हणजे रियाची. मागचे काही दिवस आमचं विशेष काही बोलणं झालं नव्हतं. बघु संध्याकाळी भेटल्यावर बोलु असा विचार करुन मी बेडमधुन उठलो. डोळे चोळत हॉलमध्ये प्रवएश केला तर समोर मीरा! 
मी गडबडलो! आयला एकतर बॉक्सरवर फिरत होतो! तिला बघुन घरातले सगळेच गडबडले! ती संध्याकाळी येणार होती आणि अचानक बया टपकली. ममाने तिला दारातच थांबवलं. मी तिला बघत उभा! भानावर आलो तेव्हा बेडरुममध्ये पळालो आणि ट्रॅक शोधु लागलो! काय खतरनाक पोरगी आहे! कॉल पण नाही केला. आयला ही ट्रॅकपण का सापडत नाहीए आता!! घरात यायच्या अगोदर ममीने तिला ओवाळलं आणि तिची दृष्ट काढली आणि तिला घरात आणलं. आज पहिल्यांदाच ती घरात येत होती.
" अगं तु संध्याकाळी येणार होतीस ना?" 
" तुला काही प्रॉब्लेम आहे का मी लवकर आले तर?" ती चिडवत बोलली. 
" आणि मी तुला भेटायला नाही आले काही, आई/पपाना भेटायला आले.आणि साडे बारा वाजले तरी तु झोपतोस, आळशी कुठला! चालणार नाही हं हे!" ती बडबड करत सुटली होती आणि सगळेजण तिच्याकडे बघत होते. वैशु खुणेने "असंच पाहिजे तुला" म्हणुन मला वेडावुन दाखवत होती. 
" अरे, तु अजुन इथेच उभा! जा ना अंघोळ करुन ये!" 
"अं?? अम्म ? हो! आलोच मी!" असं बोलुन मी बाथरुममध्ये पळालो. फ्रेश होउन आलो. किचनमध्ये ती, ममा आणि वैशु यांची काही तरी खुसरफुसर सुरु होती.पपा मला बघुन गालातल्या गालत हसत होते. विअर्ड!! 
" ममा. कॉफी??" मी आवाज दिला.. 
काहि वेळाने मीरा कॉफी घेउन आली. तिला तसं बघुन मला असं वाटत होतं की खरंच माझं लग्न झालंय! आणि ती सकाळी सकाळी माझ्यासाठी गरम गरम कॉफी घेउन येतेय. इतक्यात बाजुचा रम्या आला आणि ओरडु लागला," अरे, चल लवकर आयला पक्याच्या टीमबरोबर ५०० रु. मॅच घेतलिय. सगळे जमले. चल चल! बॅट कुठे आहे? आयला आज पक्याचा टीमला हरवायच्चं आहे." बोलता बोलता मीराला बघुन थांबला! आणि त्याचा आवाज खाली आला. मीरा आतमध्ये गेली आणि हा साला मला खुणावु लागला. त्याला खुणेनेच मी बोललो तु जा मी येतो. तो बॅट घेउन गेला आणि जाता जाता ओरडला, " विकेट पडली रे !!" 
नंतर काहि वेळाने साले एक एक करुन यायचे आणि खेळायला चल म्हणुन बोलायचे आणि जाताना, " विकेट पडली रे!" म्हणुन ओरडुन जायचे! मी हे सगळं एंजॉय करत होतो. तिकडे मीरा लाजेने चुर झाली होती आणि किचनमधुन बाहेरही पडत नव्हती. दुपारचं जेवण झाल्यावर थोडावेळ विश्रांती घेतल्यावर संध्याकाळी आम्ही रियाकडे जायला निघालो. मीर तयारी करुन बाहेर आली तेव्हा तिने ममाची साडी नेसली होती. खुप सुंदर दिसत होती. मी तिला पाहत गॅलरीत उभा. आम्ही दोघेही घराबाहेर पडलो. सार्‍यांच्या नजरा झेलत झेलत कशीबशी टॅक्सी पकडुन आम्ही वाशीला जायला निघालो.हुश्श्श!! आता थोडं हायसं वाटलं. मीरा रियाबद्दल बरचं काही विचारत होती आणि मी तिच्या प्रश्नांना उत्तरे देत होतो. वाशीला उतरल्यावर एक बुके आणि एक रेड वाईनची बॉटल घेउन आम्ही रियाच्या घरी पोचलो तेव्हा ७ वाजले होते. हसतमुखाने रियाने आम्हा दोघांचे स्वागत केले. समीरही उठुन आला. मी मीराची ओळख करुन दिली. आणि दोघांनाही विश केलं. रिया आणि मीरा किचन मध्ये गेल्या. मी आणि समीर दोघेही हॉलमध्ये बसुन गप्पा मारु लागलो. 
" व्हॉट वुड यु लाईक?"
समीरच्या या प्रश्नावर मी उत्तरलो," वेल, व्हॉट यु हॅव?" 
" स्कॉच?" 
" या, विल डु!!" 
" ग्रेट!" समीर. 
आम्ही दोघेही ग्लास घेउन बाल्कनित आलो. रियाने माझ्याशिवाय कुणालाही इन्व्हाईट केलं नव्हतं. " सो, हाव इज गोईन ऑन?" 
" वेल, व्हॉट कुड आय से? यु कॅन सी द कंडीशन ऑफ मार्केट! इट्स पथेटिक! अँड ऑल वर्क प्रेशर.!!! " " ड्युड, रिलॅक्स! मी तुला तुझ्या आयुष्याबद्दल, लाईफबद्दल विचारतोय. इट्स युवर वेडींग अ‍ॅनिवर्सरी यार! अ‍ॅन्ड यु आर गिव्हींग मी द शीट ऑफ बिझनेस! कम आउट ऑफ दॅट शीट मॅन! एन्जॉय अ ब्युटीफुल इव्ह." मी त्याला अडवत बोललो. 
तो हसला! " सॉरी यार! या कामाने नुसतं हैराण केलयं!" 
" तरी बरं अजुन तुला मुलं नाहीत, आताच एवढा हैराण झालायस उद्या त्यांची जबाबदारी कशी सांभाळणार?" माझ्या अश्या डायरेक्ट प्रश्नाने तो थोडा बावरला. पण काही बोलला नाही. विषय टाळत बोलला, " सो तु कधी लग्न करतोयस? वन थिंग आय शुड से, मीरा इज डॅम्न ब्युटीफुल! शी इज वेरी नाईस! लकी यु! " 
"थँक्स! सो डु यु टु!" माझ्या प्रत्येक प्रत्युत्तरावर तो थोडासा बावरायचा! पण नेहमी विषय टाळायचा! त्याचं ग्लास रिकामी बघुन मी बोललो,' वन मोअर?" 
" या!" 
" वेट आय्'ल गेट इट!' असं बोलुन मी हॉलमध्ये आलो. माझ्या हातात ग्लास बघुन मीरा माझ्याकडे डोळे वटारुन बघु लागली, मी हळुच सॉरी बोललो तर हसायला लगली, " किती घाबरतो रे? कसं होणार तुझं?" असं काहीसं खुणेने बोलली! मी तसाच किचनमध्ये गेलो. " क्या खिचडी पक रही है?" 
" कुछ नहीं वो हमारा सिक्रेट है! जब थाली में पडेगा तब देख लेना, सही ना रिया?" 
" हो! एकदम सही! " रिया माझ्याकडे बघुन हसु लागली! " तुला अगदी साझेशी मुलगी मिळालीए! "  "चालु द्या तुमचं" बोलत मी परत बाल्कनीत आलो. समीरला ग्लास दिला आणि पुन्हा बोलायला सुरुवात! " मस्त आहे रे घर तुमचं! आवडलं मला!" 
" थँक्स! ४५ लॅक्स!" त्याने लगेच किंम्मतही सांगितली! 
" एवढं मोठं घर! आणि तुम्ही दोघेच! खायला नाही येत घर तुम्हाला?" माझ्या य प्रश्नाने तो परत चलबिचल झाला. 
" तुला काय बोलायचयं स्पष्ट का नाही बोलत?" तो थोडासा खवळला. मी स्व:ताला आवरलं आणि विचार केला याला परत कधी तरी गाठु आज नको. 
" अरे, छोड ना, आय नीड युवर हेल्प, मला एक गाडी घ्यायची आहे.जरा हेल्प कर ना!" 
" कोणती गाडी? तुझं बजेट काय आहे?" 
आयला बिझनेस, पैसे बोललो की बरा येतो वळणावर.मग त्याला त्याच विषयात मे गुंतवून ठेवलं आणि तेवढ्यात रिया जेवायला बोलवायला आली. त्याआधी दोघांनी केक कापला. 
" आता दोघे किती केक कापणार? लहान आहात का अजुन? कुणी तरी लहान आणा आता घरात केक कापायला!" मीरेने बीमर टाकला. समीरचा चेहरा परत उतरला. रिया आणि समीरसाठी टोस्ट करुन आम्ही जेवायला बसलो. 
" अरे बिर्याणी मीराने बनवलिय बरं का!" रिया.
" अच्छा?? वा! छान झालिए गं?" समीर. 
मीरा माझ्याकडे बघुन हसु लागली. जेवण झाल्यावर आम्ही दोघांनी त्यांना निरोप दिला आणि जायला निघालो. समीरने उशीर होईल म्हणुन गाडी घेउन जायला खुप फोर्स केला. मग मी रियाची गाडी घेउन निघालो. आणि मीराला तिच्या घरी सोडलं. वाटेत आमच्या रियाबद्दल गप्पा सुरु होत्या. त्यादिवशीचा प्रसंग मी तिला सांगितला. : " तु असं कसं बोललास तिला?" 
" माहित नाही गं पण खुप डिस्टर्ब्ड होती बिचारी मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते बोललो!" 
" तसं नव्हे रे, पण त्या दोघांचा तो पर्सनल मॅटर आहे आणि तो ही बराच नाजुक त्यात आपण तिसर्‍याने काय बोलणार?"
" हे मलाही जाणवलं गं! पण तु आजपण पाहिलंस ना कशी चुकल्या चुकल्यासारखी वागत होती.मला ती अशी सहन नाही होत. मी तिला असं कधी बघितलं नाही गं!" 
''तु बराच इनव्हॉल्व झालायस! गेट रिअल किड! तु समजतोस तसं नसतं सारं!, वेल ती तुझी मैत्रीण आहे, तिला मदत करणं तुला भाग आहे! ऑल द बेस्ट फॉर!" तिच्या स्वरात किंचीत दुरावा जाणवला! एव्हाना तिचं घर आलं. ती जायला निघाली. " चल, गुड नाईट! मजा आली ना, जावु मी आता?"
" मी नको बोललो तर नाही जाणार?" 
" हे हे हे, शहाणा! साहेब इट्स ११.३० नाव.!"
"सो? रोजच वाजतात!"
" मीरा!!!" 
" काय रे?"
" नको ना जावू! प्लिझ!!"
" ए, काय रे? जाउ दे ना! उदया भेटु परत!" 
" उदया कुणी बघितलाय? मला आज काहितरी झालं तर??" 
माझ्य या वाक्यावर माझ्या ओठांवर हात ठेवत ती बोलली," शुशुशु!! वेडा! काहिही काय बोलतो! बर ठीक आहे नाही जात! थांबते तुझ्यासोबत. झालं तर दोघाना होउ दे!" ते लटके रागवत बोलली. 
" ए,मीरा! अ‍ॅम सॉरी रे!"
"आत्ताच भेटलायस आणि आत्ताच सोडुन जायच्या गोष्टी करतोस. माझा विचार कधी केलास का? मी काय करु इथे तुझ्याशिवाय." 
"अरे, बाबा अ‍ॅम सॉरी, परत नाही बोलणार असं! चल आता तु घरी जा! उद्या भेटु आपण!" 
" ती गोड हसली! " चल बाय! सांभाळून ड्राईव्ह कर आणि पोचल्यावर मला कॉल कर. " 
" ओके." असं म्हणुन मी गाडी स्टार्ट करणार इतक्यात तिने माझ्या गालावर ओठ टेकवले, 
"बाय द वे गुड नाईट असं विश करतात, ठोंब्या!" असं बोलुन ती पळाली,
" अगं ए, मीरा, मला पण विश करायचयं तुला! धिस इज चिटींग!''
" बेटर लक नेक्स्ट टाईम डुड! " गोड हसुन ती निघुन गेली. 
******************************************************************************
काही दिवस गेले. मीरा आणि मी! मी आणि मीरा! दुसरं काहीच सुचत नव्हतं. नेहमी भेटणं, रात्र दिवस एकमेकांशी बोलत राहणं! दिवसेंदिवस आमचं हे वेड! हो वेडच! वाढत होतं. दुसरीकडे रिया! आजकाल ती खुप शांत होती. माझंही तिच्याशी जास्त काही बोलणं होत नव्हतं.खुप दिवस झाले होते तिझ्याशी मनमोकळेपणाने बोलुन. खरं तर असं वाटत होतं की ती मला अव्हॉइड करतेय. मी बर्‍याच वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने कामाच्या नावाखाले नेहमी टाळाटाळ केली. आजकाल मिटींग्ज, कॉल्स, क्लायंट व्हीजिट्ससाठी ती मलाच पाठवायची. त्यामुळे तिच्याशी धड बोलणंच होत नव्हतं.त्यात मला जरा वेगळीच चिंता सतावत होती. एके दिवशी असा योग आला. मी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफीसला जायला निघत होतो आणि रियाचा कॉल आला. " अरे आपल्याला परत पुण्याला जायचयं. मागे आपण गेलो होतो ना त्याच क्लायंटकडे. नवीन रि॑क्वाअरमेंट आहे आणि तो मलाच बोलावतोय. मी तुलाच पाठवणार होते पण बॉस इज इन्सिस्टींग की मीच जायला हवं. एनीवेज तु चल माझ्यासोबत." 
"ओके." काहिवेळाने ती पोचली. मी स्टेअरिंग हातात घेतलं आणि आम्ही निघालो. काही वेळाने मीराचा कॉल. मी ड्राईव्ह करत असल्याने रियाने रिसीव्ह केला आणि ती तिच्याशी बोलु लागली. रिया काहिच बोलत नव्हती. फक्त कामाबद्दलचे कॉल्स आणि अवांतर गप्पा सुरु होत्या. पुण्याला क्लायंटकडे पोहचेपर्यंत दोघेही असेच गप्प! क्लायंटने जास्त वेळ न घेता पीओ रिलीझ केला पण यावेळी लंचचं आमंत्रण रिया मोडु शकली नाही. लंच झाल्यावर आम्ही निघालो आता रिया ड्राईव्ह करत होती. माझ्या आणि मीराच्या टेक्स्टवर गप्पा सुरु होत्या.  ती कुठे चालली होती ते कळत नव्हतं. वाट मिळेल, रस्ता दिसेल तिथे ती गाडी हाकत होती. थोड्यावेळाने मी भानावर येवून तिला विचारले," रिया?? आपण कुठे चाललोय?" 
" माहीत नाही!" 
" मीन्स? व्हेअर द हेल वी आर?" ती शांत..... 
"रिया??? बोलशील का?" 
"माहित नाही!" "ओके, अ‍ॅज यु विश! तु नेशील तिथे!" 
"तुला काहीच फरक नाही पडत ना?" 
" म्हणजे?" 
" काही नाही!" 
" विल यु प्लीज स्टॉप द कार?" पण तिने अजुन वेग घेतला.
" रिया! रिया! प्लीज स्टॉप द कार डॅम्न! व्हॉट द हेल इज राँग विथ यु?" 
ती काही न बोलता सेम स्पीडवर ड्राईव्ह करत होती. माझ्या बोलण्याने उगाच ती अजुन रिअ‍ॅक्ट होईल म्हणुन मी शांत बसलो.म्ह्टलं करु दे तिला काय करतेय ती. पाच एक मिनिटात तीने हळूहळू वेग कमी केला आणि रस्त्याच्या बाजुला कार थांबवली. थरथरलेली!!
" अ‍ॅम सॉरी!" मी काहीच बोललो नाही.
" सॉरी!" मी शांतच. 
" सॉरी बोलले ना! प्लीज!"
मी तिच्याकडे पाहिले. " हे सगळं काय होतं?" 
तीची नजर खाली गेली.
" रिया, काय झालयं काय तुला? हल्ली धड बोलतही नाहीस तु माझ्याशी, व्हॉट्स राँग? कॅन आय नो?" 
" नथिंग! मलाच कळत नाहीए, माझं काय चाललयं ते? अ‍ॅम लॉस्ट! कंप्लीटली लॉस्ट! काय करु? कुठे जाउ? कुणाला काय सांगु?" 
"काय झालं ते सांगशील?"
" नको रे जाउ दे! मी उगाच तुला इन्व्हॉल्व्ह करतेय. यु हॅव युवर लाईफ! आय डोन्ट वॉन्ट टु मेस युवर्स! माझं रडगाणं नेहमीचचं आहे!"  
"तु समीरशी बोललीस का परत या विषयावर?" 
"हो!"
"मग?" 
" मग काय? तो मानायला तयारच नाही! त्याला मुल नकोए! आता तर....!!" 
" आता तर?? तर काय?" 
" काय बोलु रे? आता तर हे मुल त्याचं नाहीच आहे असं तो बोलतोय!" बोलता बोलता ती दुभंगली! आणि ओक्साबोक्शी रडु लागली! 
" काय्य्य? हाव कॅन ही से दॅट? त्याचा प्रॉब्लेम काय आहे? तो असं कसं बोलला? काहि काय? आणि तु हे ऐकुन घेतलसं?" मी ही हैराण झालो होतो. काय एक एक या पोरीच्या नशीबी वाढुन ठेवलयं काय माहीत! 
"आता मी काय करु रे?कुणाकडे बघु? मला काही सुचत नाहीए! काय करु या पोटातल्या गोळ्याचं? त्याला जन्म देउ कि......?" ती पुढे काही बोलणार इतक्यात मी तिच्या ओठांवर हात ठेवला!! 
" श्श्श्स्श्ट ... अप!, हाव कॅन यु से दॅट?, चाललयं काय तुझं? हाव कुड बी यु सो वीक?? तो तुला काहीही बोलतो, तुझ्या चरित्र्यावर हल्ला करतो आणि तु ऐकुन घेतेस?, तु काय आता सीतेसारखी अग्नीपरीक्षा देणार आहेस? बरं चल, तु एकवेळ अ‍ॅबोर्शन करशीलही! पण त्यानंतर तो तुझ्याकडे त्याच नजरेने बघेल का? रिया तो तुझ्या चारित्र्यावर संशय नाही संशय नाही सरळ सरळ खून करतोय आणि तु निर्जीव असलेल्या प्रेतासारखी सगळं सहन करतेयस! कम आउट! जर तुझा तुझ्यावर विश्वास आहे तर मग तु कशाला त्याच्या या फालतुपणाला भीक घालतेस? माझ्यामते तर तु आता काहीही करुन तुझ्या बाळाला जन्म देच!" 
" आणि मग समीरला सोडुन देउ? नाही रे! मी नाही जगु शकत त्याच्याशिवाय! आय लव्ह हिम! आय लव्ह हिम सो मच! त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे!" 
"आणि तुझ्यासाठी तो काहि तरी करायला तयार आहे का?" 
" माहित नाही? मी कधी त्याच्याकडुन एका बाळाशिवाय कसलिही अपेक्षा केली नाही! कारण तो माझा हक्क आहे!"
" रिया! आय जस्ट डोन्ट अंडरस्टँड युवर फिलॉसॉफी ऑफ लव्ह!! यु आर सो लॉस्ट डीअर! वेक अप! कम बॅक टु प्लॅनेट! मला तुझं त्याच्यावरचं प्रेम समजतं रे! जर तुझा तुझ्या प्रेमावर इतकाच विश्वास असेल न तर, यु मेक हिम टु फील यु! अ‍ॅन्ड गेट हिम बॅक! मला अजुन काही बोलायचे नाही!''
एवढ्या संवादात असताना मीराचा कॉल आला! 
" हां मीरा!" ..... 
" नाही गं! आत्ताच मिटींग संपली! आम्ही निघालोय. पोचतो चार-साडेचार पर्यंत!" ....
" हो रे! नक्की पोचल्यावर कॉल करतो!" ....  
"या व्हाय नॉट?".....
" चल, बाय! अ‍ॅन्ड टेक केअर!"  
मी काही बोलणार इतक्यात रियाने गाडी स्टार्ट केली आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो!.
का कुणास ठावुक परतिच्या वाटेवर आभाळ अचानक भरुन आले आणि धो धो पाउस कोसळू लागला! 

क्रमशः

Monday, December 6, 2010

हात !

लहानपणापासुन म्हणजे पाचवी - सहावीपासुन असेल कदाचित मला एक स्वप्न नेहमी सतावते. त्या स्वप्नाने आजतागायत माझा पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी गेली एक दोन वर्षे मला ते स्वप्न पडले नव्हते. पण हल्ली ते स्वप्न बर्‍याचदा पडतं. महिन्यातुन एक दोनदा तरी पडतच पडत. मी लहान असताना हे स्वप्न एका रात्री मला पडलं होतं मी अक्षरशः ओरडतच उठलो होतो. 

स्वप्नात एक तुडुंब, दुथडी भरुन वाहणारी नदी, आमच्या गावातलीच. कर्ली नदी. 
नदीचं पात्र बरचं मोठं. भर पावसात मी त्या नदीच्या काठावर एकटाच उभा आहे. इतका लहान असुन मला मम्मीने सोडलं कसं त्या नदीपर्यंत? किंवा मी तिथे कसा पोचलो हे मला कळत नव्हतं. (या आधी मी या नदीतुन ३-४ वेळा होडीतुन प्रवास केला होता.त्यामुळे या नदीचं आकर्षण मला भारीच होतं) पण मी ते सारं विसरुन त्या दुथडीभरुन वाहणार्‍या नदीकडे डोळेभरुन पाहत होतो. त्या नदीच्या पैलतीरीही नजर पोचत नव्हती इतकं त्या नदीचं पात्र विशाल होतं नदीला पुर आला होता आणि भयंकर आला होता. नदीचा प्रचंड प्रवाह माझ्याच दिशेने झेपावत येत होता. मी घाबरुन परत जायला वळतो इतक्यात कुणीतरी माझा पाय धरतं आणि मला नदीत ओढतं.मी माझा पाय सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न करतो पण तो कुणीतरी घट्ट पकडुन ठेवलाय आणि मला त्या भरलेल्या नदीत ओढतयं. माझे सारे प्रयत्न फोल ठरतात आणि मी त्या भरलेल्या नदीच्या पात्रात खेचला जातो. गटांगळ्या खातो. नदीचं पाणी माझ्या नाकातोंडात जातं, माझा  श्वास कोंडला जातो. मला पोहता येत नाही ( मला अजुनही पोहता येत नाही!:( कोकणात अख्खं बालपण काढुनही मला अजुनही पोहता येत नाही. असो.) पण काहीवेळाने मी शांत होतो. कदाचित मी मेलोय असं वाटतं. 
पण थोड्यावेळाने मी पुन्हा वर येतो आणि  खुप प्रयासाने काठावर पोचायचा प्रयत्न करतो. कसेबसे हात मारत, पोहण्याचा प्रयत्न करत मी काठावर पोचायचा प्रयत्न करतो. आता काठावर मला कुणाचा तरी हात दिसतो आणि माझा पाय ओढणारा तो पाण्यातला हात मला बाय बाय करतो आणि काठावरचा हात लवकर पोचण्याचा इशारा करतो. पण मी त्या काठावरच्या हातापर्यंत पोचतच नाही आणि पुन्हा मी मरतो की काय या विचाराने माझी झोप उडते. आणि मी खाडकन उठतो. 




लहानपणी पडलेलं हे स्वप्न मला आजही सतावत राहतं. अगदी परवाच्या रात्रीच पडलं होतं.
वेल, त्या स्वप्नाचा अर्थ आता कुठे माझ्या लक्षात येतोय. 
ते पाणी, ती दुथडी भरुन वाहणारी नदी म्हणजे माझं जीवन, आयुष्य असावं आणि माझा पाय ओढणारा तो हात म्हणजे काही प्रलोभने, भावना, मोह असावा. पण मी स्वत:हुन त्यात जात नाही कुणीतरी मला ओढतं. किंवा मी त्या नदीच्या रुपाने भारावुन जावून स्वःताच जातो की काय? ते कळत नाही. एकावेळी मी नदीत बुडल्यावर मरुन जातो असं वाटतं आणि काही क्षणात परत वर येतो. आता कळत की मी त्या नदीत अडकुन पडलोय आणि वेळीच बाहेर नाही पडलो तर बुडुन मरुन जाईन जीव वाचवायच्या प्रयत्नात मी हातपाय मारत वर येतो.  काठावरचा हात मला त्याच्याकडे बोलावतोय आणि पाण्यातला हात मला बाय बाय करतो. त्या काठावरचा हात कुणाचा ते मला आता कळुन चुकलयं. 
तो हात तिचाच. तिने अनेकवेळा मला असं वाचवलयं.जेव्हा जेव्हा मी असाच वाहत गेलोय, भावनांच्या पुरात भरकटत गेलो, आयुष्यातल्या काही बिकट परिस्थितीत तिने कसलिही पर्वा न करत मला वेळोवेळी मदत केलीय.प्रत्येकवेळी माझ्या भावनांना, माझ्या विचारांना तिने योग्य दिशा दिली. पण मी त्या स्वप्नात त्या काठावरच्या हातापर्यंत कधी पोचलोच नाही, तरीही त्या काठावरल्या हाताच्या अस्तित्त्वाने मला जगायची नेहमी उमेद मिळते आणि मी पुन्हा हातपाय मारत त्या काठावरल्या हातापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो!
लहानपणी स्वप्नात दिसणारा तो हात आज कुठे मला कळला आणि स्पष्ट दिसला आणि त्या स्वप्नाची भीती कायमची माझ्या मनातुन निघुन गेली !

Saturday, December 4, 2010

आत्मा!

त्या धगधगत्या चितेवर तो शांतपणे जळत होता.
आज पहिल्यांदाच असेल की त्याच्या शरीराला आगीच्या त्या ज्वाळा हिमवर्षावाप्रमाणे भासत होत्या. तसा जन्मापासुन आयुष्याच्या आगीत तो होरपळून निघाला होता. क्षणोक्षणी, पावलोपावली नाती, भावना,प्रेम,माणसांच्या या आगीत तो पोळुन निघाला होता! आज कित्येक वर्षानी तो त्या चितेच्या शय्येवर शांतपणे निजला होता. कसलीही पर्वा,काळजी, चिंता त्याची ती चिरनिद्रा हिरावून घेउ शकत नव्हती. त्याचे त्यालाच कळत नव्हते की असं का होतयं? आज त्याला कसालाही हिशेब करायचा किंवा द्यायचा नव्हता. आज त्याला उद्याची चिंता खात नव्हती. सगळी अकांउट्स आज सेटल्ड झाली होती. 
तरी, काही तरी उरलं, राहिलं तर नाही ना? अशी शंका त्याला वाटु लागली आणि हि शंका त्याला त्या चितेवर अस्वस्थ करु लागली.

इतक्यात कूणाचं तरी छद्मी हास्य त्याला ऐकु आलं!

" अं? कोण आहे?" त्याने विचारलं. 
प्रत्युत्तर आलं नाही. ते हास्य थोड्यावेळापुरत बंद झालं!
तो पुन्हा विचार करु लागला आणि पुन्हा ते हास्य! छद्मी हास्य! 
आता न राहवून त्याने पुन्हा विचारलं, " कोण आहे तिकडे? कोण हसतयं मला?" 
 समोरुन तुच्छपणे उत्तर आलं," हं! हे विचारणारा तु कोण?"
" मी कोण? मी माणुस!"
" हो ते कळलं मला! म्हणुनच मेल्यावरही हिशेब मांडतोयस!"
" म्हणजे?"
" अरे, मुर्खा आज सारं काही संपलं, आता शांतपणे या अंतराळात विरुन जायचं तरहिशेब कसले मांडतोय? मेल्यावर काही उरतं का? उरतो तो फक्त विहार! मुक्त झाल्याचा!" 
" पण मला हे तत्त्वज्ञान समजावणारा तु कोण?"
परत काही वेळापुरती शांतता. 
त्याने परत विचारले," कोण? आहेस कोण तु?" 
समोरुन उत्तर आलं, " मी?? मी तुझा आत्मा!" 
आणि तो पुन्हा शांतपणे जळु लागला!