Wednesday, April 9, 2014

सून्न करणारी - 'द लॉटरी'


           शर्ली जॅक्सनची ( Shirley Jackson ) "द लॉटरी" ही शॉर्ट स्टोरी वाचताना मनात त्या गोष्टीबद्द्ल किंवा शिर्षकाबद्दल आलेले विचार किंवा कल्पना उतार्‍यानुसार बदलत जातात ते अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत. त्यामुळे कसलाही विचार न करता ही गोष्ट वाचत जावी. आपल्याकडील खांडेकरांच्या जशा रूपककथा अगदी तशाच प्रकारच्या जॅक्सनच्या शॉर्ट स्टोरीज. "द लॉटरी' नंतर मी 'Charles' आणि 'After You My Dear Alphonse' या गोष्टी वाचल्या त्या ही अगदी तशाच धाटणीच्या. सुरुवातीपासुन काही कळत नाही की गोष्ट कुठे संपणार आणि जेव्हा संपते तेव्हा त्या शेवटच्या वाक्याने हादरण्यापलिकडे आपल्या हाती काही नसतं.पण मला 'द लॉटरी' अतिशय आवडली. अगदी २० पानांचं, २००/-  रुपयांचं  हे पुस्तक मी अ‍ॅमेझॉन वरुन मागवलं तेव्हा १० -१५ दिवस लागले कारण ते भारतात उपलब्ध नव्हतं.

            लॉटरी म्हणजे आपली सर्वसाधारण कल्पना की काहीतरी कोणीतरी जिंकणार किंवा हरणार त्याबद्दची कथा. तसंच काहीसं पण कथा फार रोचक आहे. जॅक्सन बाईंची ही कथा १९४८ साली अमेरीकेच्या 'द न्यूयॉर्कर' या मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी तर कथेच्या शेवटावर नाराज होउन अनेक वाचकांनी 'द न्यूयॉर्कर' ला निषेधाची पत्रं पाठवुन सबस्क्रिप्शन्स रद्द करवले होते. तेव्हापासुन अमेरिकन साहित्यविश्वातला एक मैलाचा दगड म्हणून या गोष्टीकडे पाहिले जाते.       

             जॅक्सनच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे कथेची मांडणी. अगदी थोडक्या शब्दात प्रत्येक घटनेची मांडणी त्यातल्या प्रमुख पात्रांसह करुन देण्याची खासियत. 'द लॉटरी' ची सुरुवात अशीच काहीशी.अमेरिकेतल्या ३०० लोकांच्या वस्तीच्या एका छोट्या गावात २७ जून हा दरवर्षीप्रमाणे  लॉटरीचा दिवस असतो आणि त्याची तयारी म्हणुन सगळेजण सकाळीच गावातल्या पोस्ट ऑफिसच्या चौकात जमा होतात;कारण लॉटरीचा कार्यक्रम लवकारत लवकर आटोपून त्यांना दूपारचं जेवण घ्यायचं असतं.लहान मुले चौकातल्या एका कोपर्‍यात दगडांची रास जमवतात. मोठी माणसे, म्हातारे, बायका, मुली लहान मुले सगळेजण एका उद्विग्नतेने लॉटरीत कुणाचं नाव येणार याची वाट पाहत असतात. हळूहळू आपल्याला एका एका पात्राची ओळख होत जाते आणि त्या पात्रांची लॉटरीबद्दलची मानसिकताही एखाद्या वाक्यातुन कळून येते. मि.समर्स हे लॉटरीच्या प्रोसेसचे सर्वेसर्वा असतात आणि मि. ग्रेव्ह्स त्यांचे मदतनीस.या मि. समर्सचा कोळशाच्या खाणीचा उद्योग आहे आणि त्यांची बायको त्यांना सोडुन गेलीय. लॉटरीच्या आदल्या दिवशी गावतल्या सगळ्या कुटुंबांची नावे एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून त्या चिठ्ठ्या एका काळ्या पेटीत ( ब्लॅक बॉक्स ) ठेवले जातात. या सगळ्या नावांच्या चिठ्ठ्यांमध्ये एक चिठ्ठी अशी असते त्यावर काळ्या शाईने एक मोठा ठिपका गिरवलेला असतो. ज्याला ही चिठ्ठी मिळाली त्याची लॉटरी!

              लॉटरीला सुरुवात होण्याआधी गावातले सगळेजण हजर आहेत की नाही याची पडताळणी मि.समर्स करतात तेवढ्यात घाईघाईने मिसेस हचिसन येतात."साफ विसरुनच गेले होते मी तर.मला वाटलं मला चूकते की काय लॉटरी!" असे काहीसे संभ्रमित उद्गार तिच्या तोंडातुन निघतात. मिसेस डनबारने आपल्या मुलाला आधीच सांगून ठेवलेलं असतं की, "तयार रहा आणि लॉटरीचा निकाल लागताच धावत जावून तुझ्या वडीलांना सांग जे आजारी असल्याने लॉटरीला येवू शकले नव्हते."  

           लॉटरीला सुरुवात होते आणि मि. समर्स एका एक कुटुंबाची नावे उच्चारु लागतात. ज्याचं नाव उच्चारलं जाईल त्याने येवून त्या काळ्या पेटीतली एक चिठ्ठी उचालायची आणि आपल्या जागेवर परत जायचं आणि जोवर मि. समर्स सांगत नाहीत तोवर ती चिठ्ठी उघडायची नाही. ही वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा होती. नावं उच्चारत असताना मि. अ‍ॅड्म्स म्हातार्‍या वॉर्नरला म्हणतात, " मी असं ऐकलंय की उत्तरेकडल्या काही गावांनी लॉटरी बंद पाडलीय."
"मुर्ख लेकाचे! चार बुकं शिकले म्हणुन स्वतःला शहाणे समजतात हे आजकालचे तरुण." म्हातार्‍या वॉर्नरला ते अजिबात पसंत नव्हतं.
"पण ही प्रथा अजुन किती वर्षे चालणार? कधी तरी ती बंद करावीच लागणार!" मि. अ‍ॅडम्स.
"काही होत नाही. 'जूनमध्ये लॉटरी तर शेतं भरभरुन पिकली. ( Lottery in June, corns be heavy soon.) " म्हातारा वॉर्नर असं बोलुन मि. अ‍ॅडम्सची बोलतीच बंद करतो.तिकडे मि.समर्सच एकेएका कुटुंबाचं नाव घेणं सुरुच असतं. 

         इथवर वाचेपर्यंतसुद्धा आपल्याला जरासुद्धा मगमुस लागत नाही की ही लॉटरीची भानगड काय आहे ते. अगदी तोवर जोवर ज्या व्यक्तीला लॉटरी लागते ती व्यक्ती आनंदून न जाता घाबरुन जाते, लॉटरी पुन्हा पडताळण्याची मागणी करते, का? ते मात्र शेवटच्याच वाक्यात आपल्या ध्यानात येतं. इथे मी सांगणार नाही कारण त्याने गोष्टीचं रहस्यच निघून जाईल. रादर मी सुचविन की तुम्ही सुद्धा ही गोष्ट वाचा. गुगलवर "The lottery by Shirley Jackson" असं सर्च मारल्यावर पीडीएफमध्ये ही गोष्ट उपलब्ध आहे. तसे बाकीच्या गोष्टीपण आहेत. लॉटरीनंतर 'चार्ल्स' पण वाचा ती सुद्धा अप्रतिम आहे. जॅक्सनच्या या शॉर्ट स्टोरीज भयंकर प्रसिद्ध आहेत आणि 'द लॉटरी' त्यातली सर्वात अप्रतिम अशी गोष्ट आहे. त्यावरुन प्रेरित होउन मी जॅक्सनच "We Have Always Lived In Castle" हे पुस्तक माझ्या ग्रुपकडुन वाढदिवसाची भेट म्हणुन मागुन घेतलं पण ते काही वाचायला अजुन जमलं नाही. इतक बोजड इंग्लिश वाचायला जमलंच नाही राव! :p  असो. पण तुम्ही 'द लॉटरी' जरुर वाचा आणि निकाल समजल्यावर सून्न होउन जा.



- दीपक परुळेकर  

8 comments:

  1. Replies
    1. Yes. Nakki waach. apratim aahe hi story aani nakichya stories pan bhaari aahet :)

      Delete
    2. छानच ! पुढल्या वेळी भेटशील तेव्हा हे पुस्तक तुझ्या हातात असलं तरच आपलं बोलणं होईल ! :) :)

      Delete
    3. तो पर्यंत लाक्षणिक अबोल का आणि डायरेक्ट धमकी का?
      ताईचं प्रेमच नाही राह्यलं हल्ली. :) :) :P :D
      हे हे हे घेउन येतो नक्की.

      Delete
  2. आता वाचायलाच हवी लॉटरी उत्सुकता शिगेला पोहोचलीय

    ReplyDelete
    Replies
    1. वाच वाच आणि वाचून झाली की सांग कशी वाटली ती !

      Delete
  3. वाचली कथा. सुन्न करणारा आणि शेवट आणि गुंतवून ठेवणारी मांडणी.

    ReplyDelete