Monday, November 25, 2019

हेल्लारो - स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेणारा गरबा

सन १९७५. कच्छच्या रणात सतत ३ वर्षे पाऊस न पडल्याने रखरखलेलं १०-१५ कुटुंबांच्या वस्तीचं एक गाव. 
सिनेमा सुरू होतो ते एका पौर्णिमेच्या रात्रीला आई अंबेला पावसासाठी साकडं घालणाऱ्या गावातल्या पुरुषांच्या 'तलवार रास'ने. या रास किंवा गरबा मद्ये स्त्रियांना स्थान नाही. त्यांनी घरीच बसायचं, घरातली कामं करायची आणि रोज सकाळी ५-६ किमी दूर पायपीट करत जात पाणवठयावरून पाणी आणायचं. पावसासाठी पुरुषांनी गरबा खेळायचा आणि बायकांनी उपवास करायचे असे नियम.स्त्रियांनी नियमात राहायचं. मान वर करून बघायचं देखील नाही.सगळ्या पुरुषांमध्ये, म्हणजे अगदी लहान आणि म्हाताऱ्या पुरुषांमध्ये मर्दानगी ठासून भरलेली जी ते कधीही आपल्या बायकांवर काढतात. 
अशातच एका कुटुंबातल्या पुरुषाचं लग्न होतं. हा फौजी आहे आणि सध्या भारत-चीन युद्धात हिमालयाच्या सीमेवर आहे. 
लग्नाच्या पहिल्याच रात्री तो त्याच्या मर्दानगी आवाजात बायकोला विचारतो, "तू कितवी पर्यंत शिकलीयस?" 
"सातवी पर्यंत" ती चाचरत उतरते. 
"सातवी म्हणजे खूपच झालं! बरं मी ऐकलंय की जास्त शिकलेल्या मुलींना पंख किंवा शिंगं फुटतात. यातलं तुला काय फुटलंय?" 
कॅमेरा तिच्या वर जातो, तिचा चेहरा घुंघट मध्ये आहे. ती काहीच बोलत नाही. 
तो पुढे सुरु होतो,"तुला जे काही फुटलं असेल पंख किंवा शिंगं ते तू स्वतःच कापून टाक. कारण, जर मी कापायला गेलो तर तू ते सहन करू शकणार नाहीस." 
अशा मर्दाना धमकीने पहिल्या रात्रीपासूनच तो त्याचं पौरुषत्व तिच्यावर लादतो.
तिचं नाव असतं मंझरी..हीच मंझरी पुढे त्या गावातल्या बायकांसाठी आणि पर्यायाने गावासाठी अंबेच्या रूपाने वरदान ठरते. 




त्या संबंध गुजराती लोकांनी भरलेल्या थिएटर मध्ये मी आणि माझा मित्र असे दोघेच मराठी असू कदाचित. 
पण पहिल्या सिनपासून ते शेवट्पर्यंत थिएटर अगदी शांत होतं. तसंही सिनेमा पहिल्या फ्रेमपासून कथेत प्रचंड गुंतवून ठेवतो. 
सिनेमाचं सेटिंग, दिग्दर्शन, पटकथा, संगीत, नृत्य,अभिनय, संवाद सगळेच भारी आहेत. मुख्य कथेला एक उपकथा पण आहे जी त्या ढोलीची (ढोल वाजवणारा) आहे. कच्छच्या रणातल्या वाईड फ्रेम्स आणि त्या रणात ढोलीच्या तालावर सुरु असलेला त्या बायकांचा मन हरवून टाकणारा गरबा.. प्रत्येक प्रसंगानंतर हा गरबा बदलत राहतो. स्वातंत्र्य, मनातला राग, दु:ख, द्वेष,आनंद व्यक्त करण्यासाठी प्रसंगानुरूप गरब्याच्या गाण्यांची प्लेसमेंट अप्रतिम आहे. 
क्लायमॅक्सचा गरबा तर अगदी जबरदस्त, जो त्या सिनेमाचं सार एका गाण्यात सांगून मोकळं करून टाकतो.
स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेणारा हा रखरखता गरबा नक्की बघा..
 

Monday, November 18, 2019

आभाळ नेसूनि ये..

विझला सूर्य, निजली संध्या
तू चंद्राला जागवीत ये
चांदण्यांची फुले माळूनी
रात्र सारी फुलवित ये

काळोखाचे काजळ अन्
लाली त्या संध्येची घे 
गर्द घनांची शाल ओढुनी 
आभाळ सारे नेसूनि ये

नक्षत्रांचा हार गळा 
बांधून पैंजण लाटांचे
वाऱ्यावरती स्वार होऊनि 
अलगद अवनीवरती ये

गात तराणे मुग्ध नदीचे 
क्षितिजावरती नाचत ये
पाऊलखुणा शोधीत माझ्या
हासत ये, लाजत ये

ये प्राणांची ज्योत होऊनि 
वेड्या मनाची प्रीत होऊनि 
स्वप्न साजिरे तुटण्याआधी 
ये जराशी मिठीत ये.. 


- दीपक परुळेकर 



Monday, November 21, 2016

कौल - भन्नाट विचित्रपट!

“And those who were seen dancing were thought to be insane by those who could not hear the music.”
Friedrich Nietzsche च्या या Quote ने 'कौल' सुरु होतो तो अखेरपर्यंत या शब्दांना जागतो असं म्हटलं तर वावगं ठरूच नये. 

'कौल'चं विश्व वेगळं आहे. तो बघायचा नाही तर अनुभवायचा सिनेमा आहे. हां,बघायचंच म्हटलं तर मग तुम्ही टेक्निकली या सिनेमातलं अफलातून कॅमेरा वर्क बघू शकता पण ते देखील समजून घ्यायला आपला पारंपारिक मसाला सिनेमे बघायला चष्मा उतारावयालाच लागेल. तळकोकणातल्या कुंद, गूढ तरीही अप्रतिम पावसाळी फ्रेम्स आणि त्यात कुठेतरी कोपऱ्यात बोटाएवढी पात्रं; ती देखील बहुतांश जबरदस्तीने कोंबलेली. कधी-कधी २-३ मिनिटांचा सलग स्टील शॉट आणि त्यात घडणाऱ्या अतिशय मंद हालचाली. तर कधी जणू प्रोटेगनिस्ट असल्यासारखा संथ वेगाने पात्रांसोबात फिरणारा कॅमेरा. एक सलग अशी गोष्ट नाही. एक प्रसंग मध्यंतराच्या आधी नायकासोबत घडतो आणि त्या प्रसंगाची उकल म्हणजे चित्रपटाची सुरुवात ते शेवट. पण ती उकल तरी नीट होते का? तर नाही! तसं काहीच नाही. इथे कथेच्या नायकाकरवी जे प्रश्न आपल्याला पडतात त्याची उत्तरं चित्रपट देत नाही किंबहुना ती आपण शोधावी, तर्क लढवावे असा अट्टाहासही सिनेमा धरत नाही. पण मग नक्की काय आहे हा सिनेमा? सिनेमातल्या एका डायलॉगनुसार सांगायचं झालं तर; "शोधूचा थांबवलंस की सगळा गावताला." (When You Will Stop Searching,You Will Find Everything.) 



उत्तरार्धात नायक आणि म्हातारा यांच्यामधला जो संवाद आहे तो जीवघेणा आहे. त्या म्हाताऱ्याची गोष्ट ही सिनेमाची उपकथा असू शकते; ती कथा विषण्ण करून सोडते. कथा सांगणारा म्हातारा आणि पडद्यावरील दृशे यांचा तिळमात्रही संबन्ध नसतो आणि आपण तो लावायचाही नसतो. फक्त ते संभाषण ऐकायचं. अगदी लक्ष देऊन ऐकायचं. उत्तरार्धात पडद्यावर दिसणाऱ्या फ्रेम्स ही रुपकं असू शकतात आणि नसू देखील शकतात. अनुभवायच्या त्या फ्रेम्स धडकी भरवणाऱ्या साउंडसकट! 

हॉलिवूड आणि जागतिक सिनेमात कौल सारखे अनेक चित्रपट येत असतात. अशा सिनेमांचा  प्रेक्षकवर्गही अगदी ठराविक तरीही संख्येने फार मोठा आहे. याच वर्षी आलेला Jake Gyllenhaal चा Demolition हा अशाच धाटणीचा सिनेमा. हा सिनेमा देखील नायकासोबत आपल्याला भरकटवत त्याच्या दुनियेत घेऊन जातो. Jake Gyllenhaal अभिनित "Donnie Darko" आणि "Enemy" पण असेच विचित्रपट आहेत. कथा आणि पटकथा याबाबतीत कौल 'Demolition' आणि "Enemy" च्या जवळपास असतो पण 'कौल'चं  कॅमेरावर्क अफलातून आहे. इथे खरं तर कंपॅरिझन करायचं नाहीए कारण प्रत्येक सिनेमा त्याच्या कथेनुसार उच्च आहे; फक्त 'कौल'साठी रेफरन्स म्हणून ही  नावे द्यावीशी वाटली. 

आपल्या 'कोर्ट' ला देखील असाच संमिश्र प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांकडून मिळाला. काल तर कौल बघताना आमच्या मागच्या सीट वर बसलेले लोक मोठ्याने हसत-खिदळत, फालतू कमेंट्स मारत इतरांनाही त्रास देतच होते. आपल्या प्रेक्षकांना असे काही वेगळ्या धाटणीचे, प्रायोगिक सिनेमे बघायची मुळात सवयच नाही पण असे सिनेमे भारतात पण बनत आहेत हेच कौतुकास्पद आहे आणि अशा सिनेमांचा भारतात देखील एक मोठा चाहता वर्ग आहे. कुणीतरी आपली आर्थिक गणितं बाजूला टाकून केवळ एक कलाकृती म्हणून काहीतरी वेगळं करतंय, ते महत्त्वाचं. 
'कौल'च्या निमित्ताने एका वेगळ्या कलाकृतीचा अनुभव घेता आला त्यासाठी दिग्दर्शक आदीश केळुसकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! 



Monday, October 10, 2016

पद्मनाभपूरम महाल:त्रावणकोर साम्राज्याचा कलात्मक साक्षिदार


गेल्यावर्षी कम्पनीच्या कामानिमित्त ३-४ वेळा तुतिकोरीनला जावं लागलं. तुतिकोरीन हे नाव यापूर्वी कधी ऐकलं होतं का तुम्ही? ऐकलं असेलही! पण बऱ्याचजणांना हे नाव माहिती देखील नाही. गम्मत म्हणजे माझ्या एका मित्राने विचारलं,”अरे तिकडे जायला व्हिजा वैगरे लागतो का?” असो. घाबरू नका. हे ठिकाण भारतातच आहे. तामिळनाडू राज्यात पार खाली, तिकडे कन्याकुमारीच्या बाजूला. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात या शहराचं नाव वाचलं होतं. इथल्या समुद्रात भरपूर प्रमाणात मोती सापडतात. मोती असलेल्या शिंपल्यांच्या शेतीसाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे. पण खरं तर मला या शहराबद्दल इथे लिहायचं नाहीये. ज्या अद्भुत आणि अप्रतिम अश्या वास्तूबद्दल मला लिहायचं आहे तिथे मी कसा पोचलो यासाठी या शहराचा संदर्भ.

तर ३-४ वेळा मला तुतिकोरीनला कामानिमित्त जावे लागले. खरं तर मला हे शहर अजिब्बात आवडले नाही आणि पुन्हा आवडेल असेही नाही. पण काम असल्याने मला तिथे जावे लागत होते. बरं क्लायंट सरकारी असल्याने काम लवकर होत नव्हतं, त्यामुळे सारखा मुक्काम वाढायचा. मला कुठेही एकट्याला फिरायला अजिब्बात आवडत नाही आणि मुंबईसोडून दुसरीकडे ४-५ दिवसांच्या वर मुक्काम अजिबात जमत नाही. पण यावेळी पापी पेट का सवाल असल्याने इथे प्रत्येक भेटीत १५-२० दिवस मुक्काम होत होता. त्यात आठवडाअखेर सरकारी कार्यालयाला सुट्टी असल्याने शनिवार-रविवार हॉटेलवर लोळत, टीव्ही बघत घालवत होतो. अति वैताग आला म्हणून मग एकदा मदुराईला जाऊन मीनाक्षी मंदिर आणि तिथूनच जवळ असलेला प्रसिद्ध थिरूमलाई नायक्कर महाल बघून आलो. एका भेटीत कन्याकुमारीला जाऊन आलो. खरंतर अश्या ठिकाणी एकटं फिरणं ही मोठी शिक्षा असते. कुणीतरी सोबत बोलायला असणं फार गरजेचं असतं. असो. तुतिकोरीनच्या शेवटच्या भेटीतहि मुक्काम १५-२० दिवस झाला होता. यावेळी जाताना सोबत कॅमेरा घेऊनच गेलो होतो. यावेळी तिथून जवळ असलेल्या रामेश्वरम आणि निघताना केरळला श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन मुंबईला परतायचा बेत केला होता. कामासोबत थोडी फोटोग्राफीहि होईल असा विचार केला. मागच्यावेळी कॅमेरा सोबत नसल्याने कन्याकुमारीची भेट अगदी रुखरुख लावून गेली होती; इतक्या अप्रतिम फ्रेम्स तिथे होत्या. तर पद्मनाभस्वामीला जायची माहिती गुगलवर शोधताना अचानक ‘पद्मनाभपूरम पॅलेस’ या जागेने लक्ष्य वेधून घेतलं. मग त्याची माहिती मिळवताना आणि गुगलवर काही संदर्भ वाचताना निर्धार केला की आधी हाच महाल बघून घेऊया.

गुगल नकाशावर तुतिकोरीन ते पद्मनाभपूरम महाल हे अंतर मोजले. कुठून कुठे जायचे याचा बेत आखला. एका दिवसात जाऊन येण्यासारचे अंतर होते. त्यात आधी कन्याकुमारीला मी याच मार्गाने गेलो होतो त्यामुळे काळजी नव्हती. एका शनिवारी पहाटे पाच वाजता उठलो आणि पटपट आवरून हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या तुतिकोरीन सिटी बस स्टँडवरून तिरुनलवेलीला जाणारी बस पकडली. तिरुनलवेली हे नागरकोइल-बेंगळूरु-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरी एक मुख्य शहर आहे. पाउण तासात तिरुनलवेलीला पोचलो, तिथून मग नागरकोइलला जाणारी बस पकडली. तामिळनाडू राज्यातले हे रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत. मी सगळा प्रवास तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधूनच केला. सरकारी बसेसची अवस्था पुण्यातल्या पीएमटीला लाजवेल अशी पण रस्ते सुबक असल्याने काही वाटत नव्हतं. ड्रायव्हरदेखील एफवनच्या ड्रायव्हरला लाजवेल अशी तुफान पण संयमित ड्रायव्हिंग करतात. हायवेवरून सुसाट धावताना उजव्या बाजूला असलेल्या उत्तुंग पर्वतरांगा मन वेधून घेतात. आणि त्या पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या, वाऱ्याने भिरभिरणाऱ्या असंख्य पवनचक्क्या बघून थक्क व्हायला होत होतं. उजव्या बाजूच्या पर्वतरांगा ओलांडल्या की तिकडे केरळ. या पर्वतरांगा म्हणजे पश्चिम-घाटाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच शेवटच्या टोकाच्या पायथ्याशी म्हणजे वेल्ली पर्वताच्या सुंदर अश्या बॅकड्रॉपवर वसलेला आहे पद्मनाभापूरम पॅलेस. पण तिथे पोचायला अजून बराच वेळ होता.


तासा-दीड तासात नागरकोइलला पोचलो. इथे दक्षिणेत दुसऱ्या राज्यातून आलेल्या माणसाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून आलेल्यांना दोन मोठ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागतं; एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे जेवण. जेवणाच्या आणि भाषेच्या बाबतीत माझा चेन्नईमधला अनुभव देखील अतिशय वाईट होता. जेवण एकवेळ आपण वेळ मारून नेऊ पण भाषेचं काय करणार? इथले लोक तमिळ शिवाय काहीच बोलत नाही. येत असेल तरी हिंदी मुद्दाम बोलत नाहीत, नाहीतर आपण महाराष्ट्रातले लोक समोरचा मराठीत असेल तरी हिंदीत सुरु होतो. नागरकोइलला पोचल्यावर इथून पद्मनाभपूरम पॅलेसला जायला १४ किमी वर असलेल्या ‘थकलाई’ (Thuckalay) या गावी पोहचायचे होते. बऱ्याच लोकांना हिंदीत विचारून बघत होतो, पण कुणीच दाद देत नव्हतं. इकडल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं इंग्लीश देखिल भयानक असतं. मला जिथे जायचं होतं त्या गावाचं नाव कुणालाच समजत नव्हतं. शेवटी एक देवमाणूस भेटला त्याने मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तो देखील त्याच मार्गाने थिरूवनंतपुरमला चालला होता. त्याच्यासोबतच मी बस पकडली. ही बस मस्त होती. सुंदर नक्षिकाम केलेल्या लाकडी खिडक्या वैगरे होत्या. मला गम्मतच वाटली. मग त्या माणसाने सांगितलं की ती केरळ ट्रान्सपोर्टची बस होती. नागरकोइल सोडताना एक सुंदर नदी ठिकठिकाणी सोबत करत होती. २० मिनिटात मी ‘थकलाई’ गावात पोचलो तेव्हा साधारण अकरा वाजले होते. ‘थकलाईहून आता पद्म्नाभापूरमला जायला अजून एक बस पकडली आणि ५ मिनिटात महालाच्या ठिकाणी पोचलो.

या महालाचे प्रथम दर्शन अतिशय मुग्ध करणारे होते. पद्मनाभपुरम किल्ल्याच्या आवारात हा अतिशय सुंदर असा महाल गेली ३५०-४०० वर्षे उभा आहे. महालाच्या मागच्या बाजूला असलेला उत्तुंग अश्या वेल्ली पर्वताच्या बॅकड्रॉपवर हा नक्षिदार महाल अतिशय उठून दिसत होता. पर्थम दर्शनी मला राहवले नाही इतकावेळ बॅगमध्ये पडून आराम करणारा कॅमेरा काढला आणि आवारातून काही फ्रेम्स टिपल्या. नंतर बाजूला असलेल्या तिकीटघरातून माझे आणि माझ्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे तिकीट घेतले. बॅग आणि बूट तिथल्या अमानतघरात जमा केले आणि आम्ही दोघे (मी आणि माझा कॅमेरा) महालात शिरलो.


त्रावणकोर साम्राज्याची राजधानी असलेली ही जागा आणि तिथे उभं असलेलं हे नितांत सुंदर वास्तुशिल्प आजही त्या गतवैभवाची साक्ष देत उभं आहे. ई.स. १६०१ मध्ये त्रावणकोर साम्राज्याचा त्यावेळचा अधिपती, राजा इरावी वर्मा कुलसेखरा पेरूमल याने हा महाल बांधल्याचे समजते. त्याने १५९२ – १६०२ पर्यंत त्रावणकोर साम्राज्याची धुरा वाहिली. हा संपूर्ण महाल एकाच राजाच्या कार्यकालात बांधला गेला असे नाही; कारण या महालाच्या आवारात असलेली ‘थाई कोट्टरम’ अर्थात ‘राणीच्या आईचा महाल’ ही इमारत अंदाजे ई.स. १५५० साली बांधण्यात आली. म्हणजे यामितीला ५०० वर्षाहून अधिक काळ लोटला आणि तरीही ही इमारत आणि त्यावरील लाकूडकाम आजही जसेच्या तसे आहे. ई.स. १७५० साली राजा अनिझाम थिरूनल मार्थांड वर्मा याने हा संपूर्ण महाल बांधून काढला आणि ते शहर आपलं कुलदैवत श्री पद्म्नाभाला अर्पण केलं त्यावरून मग या महालाला देखील हेच नाव पडले. पुढे त्रावणकोर साम्राज्याची राजधानी त्रिवेंद्रमला नव्याने स्थापण्यात आली आणि पद्मनाभपूरम महालाची रया गेली. आता जरी ही जागा भौगोलिकरीत्या तामिळनाडू राज्यात असली तरी हा महाल आणि महालाची जागा केरळ सरकारच्या अखत्यारीत आहे. या महालाची देखरेख केरळ पुरात्तव विभागाद्वारेच केली जाते. 
चला तर मग या महालाची अद्भूत सफर करूया:

सहा एकर परिसरावर पसरलेल्या या भव्य महालात लहानमोठ्या अशा १४ वास्तू उभ्या आहेत. महालाच्या मुख्य दरवाजातून म्हणजेच ‘पुड्डीपुरा’मधून आपण प्रवेश करताच ‘पूमुखम’ या स्वागतकक्षात दाखल होतो. इथे समोरच असलेल्या स्वागातदारावरील लाकडावरची नक्षि  आणि कोरीव असे ग्रॅनाईटचे खांब आपलं लक्ष्य वेधून घेतात. इथेच पुरातत्वविभागाद्वारे नेमून दिलेले काही तरुण तुम्हाला माहिती देण्यासाठी उभे असतात. हिंदी, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजीपैकी तुम्हाला जी भाषा हवी ती निवडू शकता आणि त्या भाषेत माहिती पुरवली जाते. या स्वागतकक्षाचे छत देखील अतिशय रेखीव अशा लाकूडकामाने सजविले आहे. वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ९० फुले या स्वागतकक्षाच्या छतावर कोरली आहेत. बघून डोळेच काय कॅमेरा देखील थक्क होतो! अतिशय सुंदर असा हा स्वागतकक्ष बघून झाल्यावर मार्किंगला अनुसरून मी पहिल्या माळ्यावर गेलो. इथे ‘मंत्रासाला’ म्हणजे राजाची आणि मंत्रिमंडळाची बैठकीची खोली आहे. या खोलीत प्रकाश, तापमान आणि हवा यांचा सुरेख मेळ जमवला आहे त्यामुळे या खोलीत नेहमीच एक प्रकारचा गारवा पसरत असतो. मंत्रासाला जोडून खाली ‘उत्तुपुरा’ म्हणजे भोजनगृहात उतरायचे. ७२ बाय ९ मीटरचा हे भोजनगृह म्हणजे त्यावेळचे कँटिन असावे. एकेवेळी २००० लोक जेवायला बसायची क्षमता असलेल्या या भोजनगृहात त्यावेळी सणासुदीला राजाकडून गरीब प्रजेला भोजन दिले जाई. तिथे एका जागी भली मोठी चीनी मातीची भांडी अजूनही आहेत. ही भांडी मुख्यत्वे लोणची आणि मसाले मुरवायला वापरायचे अशी माहिती तिथल्या माहितीगाराने पुरवली.


तिथून पुढे आपण ‘थाई कोट्टारम’ म्हणजेच राणीच्या आईच्या महालात प्रवेश करतो. आधीच सांगितल्याप्रमाणे हा दुमजली महाल सर्वात आधी म्हणजे १५५० साली बांधण्यात आला. आणि तेव्हापासून ही वास्तू आजही सुस्थितीत आहे. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एकांथ मंडपम’ म्हणजेच तिथला व्हरांडा आणि या व्हरांड्यात असलेले अतिशय सुबक, अद्भूत असे नक्षिकाम केलेले कोरीव खांब. इथलं छत देखील अप्रतिम अश्या कोरीव लाकडी फुलांनी सजवले आहे. त्याकाळी या महालाचे बांधकाम करताना जो मुख्य खांब आधारस्तंभ म्हणून रोवला होता तो फणसाच्या झाडाचा खांब आपण आजही तिथे पाहू शकतो. ‘थाई कोट्टारम’ प्रामुख्याने राजघराण्यातील स्त्रिया अंत:पूर म्हणून वापर करत असत. या महालात चार बाजूला चार मोठे शयनकक्ष आहेत.


‘थाई कोट्टारम’ बघून पुढे बाहेर पडून मार्गिकेच्या खुणेनुसार एका चिंचोळ्या गल्लीतून चालत ‘उप्परीकामलिका’ या दुसऱ्या वास्तूत प्रवेश करायचा. परिसरातली ही सर्वात उंच आणि तशी एकदम नवी वास्तू ई.स. १७५० मध्ये राजा मार्थंड वर्मा याने बांधली. ही वास्तू त्याने आपले कुलदैवत श्री पद्मनाभ याला अर्पण केली म्हणून या वास्तूला ‘पेरूमल कोट्टरम’ म्हणजेच देवाचा महाल असेही म्हटले जाते. ‘उप्परीकामलिका’ याचा शब्दश: अर्थ अनेक मजले असलेली वास्तू असा होतो. या महालाला एकूण तीन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर कोषागार आहे तर दुसऱ्या मजल्यावर राजाचे शयनकक्ष आहे. या शयनकक्षात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवायची व्यवस्था आहे. अतिशय सुबक अश्या एकून ६४ प्रकारच्या लाकडी नक्षीकामाच्या जोडणीतून राजाचा झोपायचा पलंग या खोलीत आहे. त्या पलंगावरील नक्षिकाम डोळे दिपविणारे आहे. तिसऱ्या मजला हा प्रार्थनेसाठी वापरण्यात येत असावा. इथे तिसऱ्या मजल्यावर नितांत सुंदर, अप्रतिम आणि खरोखर शब्दात ज्यांचे सौंदर्य मांडता येणे शक्यच नाही अशी १७ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. कितीही पाहिली तरी डोळे आणि मन भारत नाहीत इतकं सौंदर्य त्या भित्तीचितत्रात सामावलेलं आहे. ज्या निष्णात कलाकाराने ही चित्रे काढली, त्यात मनमोहक रंग भरून ती फुलवली त्या अज्ञात निर्मिकाला आपण मनोमन नमन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहि. (सुरक्षेच्या कारणावरून या भित्तीचित्रांचे फोटो घ्यायला बंदी आहे.)


उप्परीकामलिकाला जोडूनच पुढे ‘प्लामूट्टील कोट्टारम’ नावाचा दुसरा महाल आहे. या महालाचे सगळे इंटेरिअर लाकडापासूनच बनविले आहे. छोट्या, छोट्या लाकडी पुलांनी हा महाल उप्परीकामलिकाला जोडला गेला आहे. ‘वेप्पीनमोडू कोट्टारम’ ही वास्तू ‘पुमुखम’ला जोडली गेली आहे. या वास्तूचे व्हरांडे अतिशय कलात्मकतेने उभारले आहेत. स्टेन्ड ग्लास आणि मायकाचा वापर करून एक सौम्य प्रकाश इथे खेळविला आहे. त्या काचेवरील चित्रे देखील अप्रतिम आहेत. खरं तर या महालातून फिरताना आपण एका भूल भूलैय्यातून फिरत असलाच भास होतो. आणि फिरताना एखाद्या खिडकीतून किंवा सज्जातून मागचा वेल्ली पर्वत खूप छान फ्रेम्स देत राहतो. पुढे ‘इंद्रविलास महालाला जोडून एक लांबलचक कोरिडोअर आहे. या कोरिडोअरच्या भिंतीवर काही ऐतिहासिक जुनी चित्रे आहेत. ‘अंबरी मुखपम’ म्हणजे सज्जा किंवा ‘Bay Window’ हे इथले मुख्य आकर्षण आहे. इथल्या खोल्यांना असलेल्या भल्या मोठ्या खिडक्या, दरवाजे हे फोटोग्राफीसाठी खूप आकर्षक फ्रेम्स मिळवून देतात.


या महालात जरा जास्तच रेंगाळल्यावर बाहेर मोकळ्या आवारात येतो. इथे बाजूला एक छोटे गार्डन आहे. तिथून पुढे आवारात असेलेल्या ‘दक्षिण महाल’ या वास्तूला भेट द्यावी. ही वास्तू केरळी स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर असा नजराणा आहे. अतिशय जुन्या वस्तू जसे की, टेबल, खुर्च्या, काही वाद्ये आजही तिथे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या महालाच्या  परिसरात असलेल्या वास्तू आकाराने छोट्या, एकमेकांना जोडलेल्या होत्या. आणि दरवाजे तर उंचीला अतिशय कमीच. एक दोनदा फोटो घ्यायच्या नादात चांगलाच आपटलो. ‘हे दरवाजे इतके कमी उंचीचे का?” अशी विचारणा केल्यावर तिथल्या माहितीगाराने जे उत्तर दिले ते भारावून टाकणारे होते. तो माहितीगार म्हणाला, “आपण जिथे राहतो, जी वास्तू आपल्याला आधार देते तिचा आदर आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करताना नेहमी झुकून, आदराने प्रवेश करावा; यासाठी हे सगळे दरवाजे उंचीला कमीच असतात.” ही वास्तू म्हणजे ‘दक्षिण महाल’ राष्ट्रीय ठेवा म्हून जाहीर करण्यात आली आहे.

‘पुत्थन कोट्टारम’ म्हणजे नवीन महाल ही या समुहातली सर्वात नवीन वास्तू. या वास्तूचा उपयोग मुदपाकखाना म्हणून केला जाई. यालाच लागून एक सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीचे पाणी जेवणासाठी वापरले जाई. त्यावेळची किचन सिस्टम इथे बघावयास मिळते, तसेच मॉडर्न स्टाईल ग्रॅनाईटसने बांधलेल्या टॉयलेट्सच्या रचना देखील बघावयास मिळतात. संपूर्णपणे ग्रॅनाईटच्या दगडाने बांधलेला ‘नवरात्री मंडपम’ म्हणजे तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा. इथे अनेक कलाकार संगीत, नाट्य, नर्तन अश्याप्रकारच्या आपल्या कला सदर करीत. या नवरात्री मंडपमचे छत म्हणजे एक अक्खा ग्रॅनाईट दगड आहे. त्याला आधार देणारे खांब आणि त्यावर कोरलेल्या मुर्त्या देखील अतिशय सुंदर आहेत. हे सर्व पाहून झाल्यावर मनात आणि कॅमेऱ्यात साठवून मार्गिकेच्या खुणेनुसार पुढे जायचे. ‘थाई कोट्टारम’ ला जोडून एका दुसऱ्या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर सैन्याची शस्त्रे ठेवायची जागा म्हणजेच ‘आयुधपुरा’ आहे. त्याची रचना देखील अत्यंत  सोयीस्कर आहे. आता शस्त्रे तिथे नाहीत. हे संपल्यावर आपण तिथून खाली उतरलो की थेट महालाच्या बाहेरच्या आवारात पोचतो. झाला आपला आतील महालाचा प्रवास. पण बाहेर अजून एक वास्तू आपली वाट पाहत उभी असते. केरळ पुरातत्वविभागाचे एक वस्तूसंग्रहालय इथे आहे. इथे त्रावणकोर (केरळ आणि तामिळनाडू चा काही भाग) मध्ये सापडलेली अति प्राचीन शिल्पे ठेवण्यात आली आहेत. वेळ होता तेव्हा तिथे भेट देऊन आलो.


हे सगळं संपेपर्यंत साडे तीन वाजले होते. खरंतर मी खूप घाई घाईत फिरलो, हा महाल व्यवस्थित बघायला किमान एक पूर्ण दिवस तरी हवा आणि फोटोग्राफी करायची असेल तर दोन दिवस पकडून चला इतक्या अप्रतिम फ्रेम्स मिळतात इथे. स्टील फोटोग्राफीसाठी तर ही जागा स्वर्ग आहे. भारतातून अनेक मोठ्या आर्किटेक्ट कॉलेजेसमधून विद्यार्थी या महालाचा आणि स्थापत्यकलेचा आभ्यास करण्यासाठी येतात. केरळ, कन्याकुमारीला जाणारे परदेशी पर्यटक देखील इथे वाट वाकडी करून येतात. आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा लाकडी महाल असून अजून देखील UNESCO च्या ड्राफ्ट यादीत पडून आहे. या महालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या महालाचे लाकडावरील नक्षिकाम. हा संपूर्ण महाल म्हणजे प्राचीन दक्षिणात्य स्थापत्यकलेचं एक अप्रतिम असं जिवंत उदाहरण आहे. कालपरत्वे महालाच्या रचनेत बराच बदल होत गेला. महालाचे स्थापत्य आणि लाकूडकाम हे अति भव्य आणि नेत्रदीपक आहे. एकएक इमारत बघताना डोळे आश्चर्याने थक्क होतात; इतकं प्राचीन आणि नाजूक कलाकुसर जाणणारे आणि करणारे स्थापत्यविशारद आपल्या देशात होते. पारंपारिक स्थापत्यशास्त्र, निपुण शिल्पकारिता आणि भौतिक विज्ञानाचे सखोल ज्ञान म्हणजे पद्म्नाभापुरम महाल. आजही हे वास्तुशिल्प अतिशय काळजीपूर्वक जतन करणाऱ्या केरळ सरकार आणि पुरातत्व विभागाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या वैभवाची म्हणजेच गड-किल्ल्यांची दुरवस्था बघितली की मन विषण्ण होते. १७०० च्या आसपास बांधलेला आपला शनिवारवाडा आज त्याची जी दुरावस्था झालीय त्याच्याकडे कोणाला बघायला देखील वेळ नाहीय. आपले गड-किल्ले, त्यांची अवस्था तर काय विचारूच नका! फक्त फुकाचा अभिमान आणि माज दाखवण्यात आपण आपल्या या वास्तूंची विल्हेवाट लावत आलोय आणि लावतोय. त्याची ना आपल्याला कदर आहे ना आपल्या पुरातत्व विभागाला! पार तिकडे इंग्लड –फ्रांसला जाऊन बघू नका की पुरातन वास्तू, शिल्पे कशी जपायची ती आपल्या भारतात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे ह्या वास्तुंचा आजही आदर केला जातो आणि त्यांना जपलं जातं. कधी दक्षिणेकडे कन्याकुमारी किंवा थिरूवनंतपुरमला भटकायला आलात तर या वास्तूला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. इतकं सुंदर आणि पुरातन वास्तुशिल्प दुसरीकडे कुठे बघावयास मिळेल की नाही माहित नाही. डोळ्याचे पारणे फिटविणारा हा महाल एकदा तरी डोळे भरून पाहावाच.

कसे जाल? 
कन्याकुमारी पासून : ३६ किमी  
थिरूवनंतपुरम पासून: ६३ किमी. 
जवळचा एअरपोर्ट: थिरूवनंतपुरम
जवळचे रेल्वे स्टेशन: नागरकोइल. 
  

Friday, September 16, 2016

पापी पेट I आमची पहिली नॅनो फिल्म

तुम्ही फिचर फिल्म पाहिली ?

डॉक्युमेंट्री फिल्म पाहिली ?

म्युझिक व्हिडीओ फिल्म पाहिली ?

शॉर्ट फिल्म पहिली ?

म्हणजे काय ? पाहिलीच असणार!


पण तुम्ही कधी नॅनो फिल्म पाहिलीय का ?

नाही ना ?

मग आमची ही  पापी पेट I Nano Film  पहिली वहिली नॅनो फिल्म बघा आणि आम्हाला आपले म्हणा !

लाईक करा, शेअर करा , सबस्क्राईब करा :)

ओपन टॉकीज फेसबुक पेज 

ट्विटर वर फॉलो करा





धन्यवाद !




Friday, June 26, 2015

‘ती’ मैत्रीण...

      त्यादिवशी तिला भेटलो. भेट काही ठरवून नव्हती घेतली. काही योगायोग असतात आणि जुन्या, कित्येक वर्षं अधुऱ्या राहिलेल्या भेटी पूर्ण होतात, तसंच काहीसं. तसा तिला मी अगदी लहानापानापासुंच ओळखतो. दर दिवशी शाळेत जाताना, किंवा त्याबाजूने गेलो की ती दिसायची. इतर मित्र - मैत्रीणीसारखीच ती सुद्धा. पण मला आठवतयं, तिच्याशी कधी मी जास्त बोललोच नाही. जितका इतर मित्रांसोबत वागायचो, बोलायचो, खेळायचो तसा मी तिच्याशी कधी वागलोच नाही. पण एक मात्र खरं की तिचं एक सुप्त असं आकर्षण मला अगदी लहानपणापासुनच होतं आणि आजही आहे. पण मी ते कधी कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का? अगदी स्वत:ला ही मी ते जाणवू दिलं नव्हतं, का कुणास ठाऊक? 

        त्यादिवशी तिला भेटलो तो एक योगायोगच असावा. नेहमीच्याच रस्त्याने जात होतो आणि सहज बाजूला लक्ष्य गेलं. ती दिसली. तशीच, अगदी लहानपणी दिसायची तशीच. तिच्यात जास्त बदल झालाच नव्हता. काहीसं मनात ठरवून मी चालत तिच्यापाशी गेलो. माझ्यासमोरच होती ती. तिला पाहून एक उसनं स्मित द्यायचा प्रयत्न केला, ते बघून ती खुदकन हसली. काय बोलावे ते सुचेनाच. मला तसा बावचळलेला पाहून ती अजूनच हसायला लागली. खूप सारे स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहू लागले. कुठूनशी वाऱ्याची एक मंद झुळूक तिच्या स्मिताबरोबर माझ्या अंगावरून गेली. मी थोडासा शहारलो. काहीच न सुचल्याने मी तिथेच तिच्यासमोर  माडाच्या झाडाला टेकून बसलो. ती समोरच. दोघेही शांत. तिला इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. ती खरंच अतिशय सुंदर दिसत होती. बाहेर चैत्राचं उन भाजून काढत होतं, पण ती बहरून गेल्यासारखी भासत होती. किती तरी वेळ मी फक्त तिच्याकडे तंद्री लागल्यासारखा पाहताच राहिलो, ते ही अगदी पहील्यांदाच. ती ही पाहत राहिली; बऱ्याच वेळाने मी बोलायला सुरुवात केली,
“कशी आहेस?”
“ठीक आहे. तू कसा आहेस? आणि आज इतक्या दिवसांनी इकडे कुठे वाट चुकलास?” तिने माझ्याकडे पाहत हसत विचारलं.
“काही नाही, सहजच. सुट्टी होती म्हणून गावी आलोय काही दिवसांसाठी.” मी उत्तरलो.
“बरं. बाकी काय? सगळं ठीक ना?”
“हो. सुरु आहे. ठीक चाललयं.”
पुन्हा दोघांत एक शांतता पसरली. एक रानपक्षी हेल देऊन गाऊ लागला. तिथून, तिच्यासामोरून मला उठावसं वाटत नव्हतं. पण अजून काय बोलू ते कळतच नव्हतं.
“इतक्या वर्षात आपण पहिल्यांदाच असं भेटतोय ना?” मी त्या शांततेत एक खडा टाकला; पुन्हा अनेक स्मित-तरंग तिच्या चेहऱ्यावरुन वाहू लागले.
“हो. म्हणूनच मी विचारलं तुला की आज इकडे कुठे वाट चुकलास म्हणून.” तिच्या चेहऱ्यावर ते स्मित अजूनही विरत होतं. 
“नाही. तसं काही नाही. म्हणजे तुलाही आठवत असेल शाळेत जाताना नेहमी भेटायचो की आपण.” मी चाचरत काही तरी बोललो.
“भेटायचो नाही रे. फक्त एकमेकांना बघायचो. हां, एक दोन वेळा तू इथे मित्रांसोबत अभ्यासाला यायचास ते आठवतयं, पण तेव्हाही तू इथे मित्रांसोबतच असायचास. आपण तसे कधी भेटलो किंवा बोललोच नाही. मग शाळा संपल्यावर तू निघून गेलास.” ती.
“हो. तसंच काहीसं. तेव्हा वाटायचं तुझ्याशी खूप बोलावंस, पण का कुणास ठाऊक हिम्मत नाही व्हायची.” मी.
“आता तरी आहे का हिम्मत बोलायची? की...?” ती पुन्हा हसली.
“अगं, काहीही काय. बोलतोय ना तुझ्याशी आता.” मी हसत म्हणालो.
“काय रे, आपल्या मैत्रीणीशी बोलायला काय घाबरायचं? बोलायचं बिनधास्त.”
“घाबरत नाही गं. तुझ्याकडे येऊन बसून बोलावसं खूपदा वाटायचं पण माहीत नाही का? नाही जमलं कधी. तुझ्याबद्दल लहानपणापासूनच एक आकर्षण होतं मला. पण कधी जमलंच नाही तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी बोलायला. जेव्हा जेव्हा तू दिसायचीस तेव्हा तेव्हा मनात अगदी समुद्र भरून यायचा. फार सुंदर दिसायचीस तू; म्हणजे आताही, आय मीन, आताही तू तशीच सुंदर दिसतेस. दर पावसाळ्यात मी तुला पाहायचो. चिंब होऊन जायचीस तू. बेभान होऊन नाचायलाच लागायाचीस. सगळे बंध तोडून तू सगळीकडे पसरलेली असायचीस. तेव्हा तुझ्याकडे नुसतं बघत राहावं असं वाटत राही. हिवाळ्यात अगदी उलट. पहाटे जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा तू धुक्याची चादर पांघरून असायचीस, तुझ्या श्वासांतून उमटणारी बाष्पाची वलयं तुझ्या चेहऱ्याभोवती दाटून यायची, आठवतयं मला.” 
“बापरे! माय, माय! किती ते वर्णन. आई शप्पथ! इतकं कधी कुणी मला माझ्याबद्दल बोललंय असं आठवत नाही!” ती हसत हसत म्हणाली.
“बघितलंस, माहिती होतं की तू हसणार म्हणून मी कधी तुझ्याशी असं काही बोलायचो नाही.” मी थोडा रागवत म्हणालो.
“काय यार, मस्करी पण नाही का करायची? लगेच कसला रे फुगतोस? खरं सांगू मलाही नेहमी वाटायचं की तू माझ्यापाशी यावसं. आपण खूप साऱ्या गप्पा माराव्यात, या इथे बागडावं, गाणी गावीत. पण ते कधी तुला सांगू नाही शकले. तू इथेच या गावात राहिला असतास तर ते शक्यही झाले असते, कदाचित. पण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतातच नाही का? मला बापडीला काय, मी आहे अशीच. मी ही हे सगळं सोडून कुठे जाणार ना? मग आहे. पण कधी कधी वाटत की तुझ्यासारखा कुणी तरी मित्र असावा. घटकाभर येऊन त्याने भेटावं, बोलावं, सुख - दु:खाच्या चार गोष्टी सांगाव्यात. वाऱ्यावर ताल धरून एक सुंदरसं गाणं गावं. बस्स, अजून काही नाही. आपल्या मैत्रीसाठी एखाद्याने एवढं तरी करावं ना रे? नाहीतरी इथे कोण असतं कुणाचं? ” ती स्तब्ध झाली.

“खरं सांगतो, मलाही कित्येकदा असं वाटलंय. अगदी अस्सच वाटलंय की पुन्हा तुला पावसात बेभान होऊन नाचताना बघावं आणि तुझ्यासोबत आपणही पावसात नाचावं, चिंब होऊन बागडावं. तुझ्या अंगणात पुन्हा येवून खेळावं, तुझ्यासोबत गाणी गावी. कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटेचं तुझं धुक्याने आच्छादून गेलेलं रूपं पाहत बसावं. खूप वाटतं असं. पण तुझ्याबद्दल मला नेहमीच एक आदर आहे. मी इतर मित्रांशी कसाही वागू शकतो, बोलू शकतो. पण तुझ्याशी तसं नाही करू शकत. असं वाटतं की अगदी लहानपणापासूनची आपली ही मैत्री अखेर पर्यंत तशीच राहावी; अभंग. त्या मैत्रीला कुठेही, कसलाही बांध नसावा. हा प्रवाह असाच निरंतर रहावा.” मी. 

“मैत्रीचं काय आहे? ती राहिली तर राहते. टीकवली तर टिकते, नाही तर जाते वाहून. पण कधी कधी उगाच ओढूनताणून टीकवण्यापेक्षा ती वाहीलेलीच बरी असते. मैत्री हे काही नातं नाहीय. त्यात कुणी कुणाला बांधील नसतं आणि नसावंच मुळी. मलाही असंच वाटतं आपल्याबद्दल. कधी कुठे भेटलो तर निदान एकमेकांची ओळख तरी विसरत नाही आपण. ओळखीचं, मैत्रीचं, जाणीवेचं एखादं स्मित पुरेसं आहे आपल्यात, आणि हे असंच असावं नाही का रे?” ती.

 मी पुढे काही बोललो नाही. ती ही शांतच राहिली. थोड्यावेळाने उठून मी तिचा निरोप घेतला.

“येत जा असा अधूनमधून. बरं वाटतं कुणी ओळखीचं भेटलं की.” 
ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली.
“हो. नक्की.” असं म्हणून मी जायला वळलो. तिच्या चेहऱ्यावरले तरंग पुन्हा विरत गेले. खूप दिवसांनी त्या दूरच्या मैत्रीणीला भेटून, तिच्याशी बोलून फार बरं वाटलं. 



'नदी’ माझी दूरची मैत्रीण.  





        नदीचं एक सुप्त आकर्षण मला कधीपासून तरी आहे. मी तसं कुणाला जाणवू दिलं नाही. कुणालाच का अगदी स्वत:लाही मी हे जाणवू दिलं नव्हतं. माझ्या गावात एक नदी आहे. कुठून रानावनातून, दऱ्या-खोऱ्यातून वाहत येते आणि समुद्रात विलीन होते. का कुणास ठाऊक कधी प्रवासात मला एखादी नदी दिसली की मन अगदी भरून जातं. समुद्र जीवाभावाचा मित्र असेल तर नदी ही मैत्रीण. इतके दिवस नव्हतं जाणवलं. ती सुद्धा माझ्याशी तशीच वागते, दूरच्या मैत्रीणीसारखी. काही दूरचे नातेवाईक असतात तशीच ही माझी दूरची मैत्रीण. पण दूरची असूनही अगदी जीवाभावाची. कधी भेटली तर ती जास्त बोलत नाहीत. कधी तरी, क्वचितच एखादं संयत, संथ आणि नितांत सुंदरसं स्मित झळकेल तिच्या चेहऱ्यावर. कधी चालताना, तर कधी प्रवासात बस-ट्रेन मधून ती जोवर दिसेल तोवर आमची सोबत. एखादं स्मित दोघांच्यात. बस्स! नंतर ती तिच्या वाटेला मी माझ्या वाटेला. निरोप असा घेत नाही आम्ही. माहीत असतं पुन्हा भेट होईलच. पण तोवर हुरहूर ही लागलेलीच असते जीवाला.

लहानपणापासून समुद्र माझा मित्र, सखा, सोबती, यार सगळं काही. आमच्या गावात समुद्रही अगदी तसा जवळच. पण समुद्रावर कधी जायला मिळायचं नाही, त्यामुळे कधी प्रवास करताना गाडीतून १-२ मिनिटासाठी दिसणारा समुद्र मी अधाशीपणे प्राशून घ्यायचो. लहानपणापासून समुद्र माझ्या सोबतीलाच. एका सच्च्या दोस्तासारखा. आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा तो जणू एक साक्षीदारच. सगळया सुख दु:खांत तो माझ्यासोबत. नंतर किती तरी वेळा मी त्याच्या किनारी जाऊन त्याच्याशी बोलत बसलोय. कितीतरी वेळा त्याच्या लाटांच्या तालावर गाणी गात बसलोय. कितीदा तरी किनाऱ्यावरल्या उष्ण वाळूत अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजल्यात; पण नदीशी मी असा कधी वागलोच नाही. माझ्या गावात नदीही आहे. नदीच्याच बाजूला गाडीरस्ता. येणाऱ्या - जाणाऱ्यांची नेहमीची वाट. आम्ही देखिल शाळेत जाताना याच नदीच्या बाजूच्या रस्त्याने जायचो यायचो. प्रत्येक मोसमात नदीची वेगवेगळी रूपं दिसायची. पावसाळ्यात दुथडीभरून ती वाहायची. नदीचं पाणी काठ फोडून शेतमळ्यात शिरायचं. सगळा शेतमळा एखाद्या प्रचंड मोठया सरोवारासाराखा भासायचा. पावसाळ्यात नदीचं पाणी पुलावरून गेलं की शाळेला हमखास सुट्टी. श्रावणात एखाद्या माहेरवाशीणीसारखी बेभान होऊन नाचणारी, बागडणारी नदी शिशिरात गारठून जायची. आम्ही पहाटे शाळेत कुडकुडत जायचो तेव्हा पुलावरून दिसायचं; नदी धुक्याची चादर पांघरून शांत वाहायची. जणू पुन्हा सासरी जाणाऱ्या मुलीसारखी आतल्या आतच रडायची.                                    

लहानपणापासून मला पाण्याचा प्रवाह, डोह, समुद्र दिसला की त्यात स्वत:ला झोकून द्यावेसे वाटायचे. पोहायची भयंकर इच्छा असूनही घरच्यांच्या ओरडण्याने साध्या दारातल्या ओहोळातही जायला मनाई होती. नदीचा दुसरा काठ सहज दिसायचा. मला लहानपणी नेहमी वाटायचं की उडी मारली तर सहज पोहून नदीच्या दुसऱ्या काठावर जाईन. त्यावेळी त्या शांत, गूढ नदीच्या रुपाची मला कल्पना नव्हती. मला वाटायचं की असा कसा बुडेन नदी मला तरंगवत दुसऱ्या काठावर घेऊन जाईल. पण हां! असा प्रयत्न कधीच केला नाही. तुम्ही नदीची विविध रूपं लक्ष्य देऊन बघा, ती प्रत्येकवेळी वेगळीच भासते. पण मला सर्वात भावतं ते तिचं गूढ, शांत, रूप. पण तेव्हाची पाण्यात जायची ओढ आता नाही राहिली. हां, फक्त त्या प्रवाहाला, डोहाला, अथांग समुद्राला दुरून बघत राहतो. समुद्राची ओढ असली तरी नदीचं वेगळंच असं आकर्षण मनाला लागून आहे.                   

खरंच जितका मुक्तपणे मी समुद्राशी वावरतो, बोलतो तितका नदीशी कधीच नाही. मला आठवत नाही की, मी कधी तासनतास नदीच्या किनारी बसलोय. तिच्याशी भरभरून बोललोय. तिच्या काठावर बसून, वाऱ्याच्या आणि रानपक्ष्यांच्या साथीवर कधी गाणी गायलीत. तिच्यासाठी कधी ३-४ ओळी खरडल्या. नाही, कधीच नाही. ही अशी अबोल मैत्री गेली कित्येक वर्षे आमच्यात आहे. तिच्याविषयी नेहमीच एक आदर वाटत राहतो मला. त्यामुळेच असेल की, मी तिच्याशी तितक्या सलगीने नाही वागत. कधी जाऊन तिला मनातलं नाही सांगत. तिच्या काठावर तासन तास, तिला न्याहळत नाही बसत. पण वाटतं हेच ठीक आहे. 

प्रत्येकासमोर आपल्या आयुष्याचं पुस्तकं उघडून वाचण्यात काय अर्थ आहे? 
बसावं कधी निवांत एकमेकांसमोर, नुसतंच. 
काहीही न बोलता, उलगडावे मनातले बोल आपोआप. 
सुख-दु:खांच्या पलीकडे ही असावं काहीतरी बोलण्यासारखं. 
नसावी कोणतीच भावना हसवणारी, रडवणारी, मोहवणारी. 
असावी फक्त एक निरपेक्ष जाणीव. 
एकमेकांच्या अस्तित्वाची. एकामेकांच्या असण्याची. 



Wednesday, April 15, 2015

बालपणीचा ‘खेळ’ सुखाचा !

                                                        देऊळ


     आमच्या वाडीतलं श्री देव दांडेकराचे देऊळ म्हणजे आमचं हक्काचं खेळायचं छोटसं स्टेडियमच होतं. सकाळी तोंडावर शिरा मारल्यापासून ते संध्याकाळी अभ्यासाला बसेपर्यंत आमचा अक्खा दिवस त्या देवळात जायचा. रविवारच्या सकाळी मोगली, चंद्रकांता, शक्तिमान वैगरे बघून झालं की आमची टोळी दांडेकराच्या देवळात. मग तिथे बसून आज काय खेळायचं याची चर्चा व्हायची. दिवसभर नुसता गोंगाट त्या देवळात असायचा. क्रिकेट, धप्पा, खांबोळ्या, गोट्या, डोंगर का पाणी, चोर-पोलीस, आबाधुबी, लंगडी, कबड्डी, असे कितीतरी खेळ आम्ही दिवसभर त्या देवळात खेळत राहायचो. आमचं सगळं बालपण त्या देवळात खेळ खेळण्यातच गेलं. उना-पावसात आम्ही त्या देवळात पडलेले असायचो. मला आठवतं, जेव्हा मला आई मी मस्ती केल्यावर धपाटे द्यायची तेव्हा-तेव्हा मी देवळात पळायचो कारण देवळात बायकांना प्रवेश नव्हता. अगदी लहान मुली येऊ शकत पण मोठ्या मुली आणि बायकांना प्रवेश नव्हता. त्यामुळे आईच्या मारापासून बचावाचा एक बंकर म्हणू देवळाचा उपयोग होई.

देऊळ अगदी लहानच, १२-१३ चिऱ्याच्या खांबावर उभं असलेलं. सगळीकडून उघडं असलेलं, त्यामुळे नेहमीच खेळती हवा असायची. गाभारा वैगरे असा काही नाहीच. १०-१२ दगडांचे देव जमिनीत रुतून ठेवलेले. मुख्य देव श्री दांडेकर, मध्यभागी; इतर देवांपेक्षा थोडा मोठा आणि त्रिकोणी. काही देव जमिनीत अगदी घट्ट रुतलेले तर काही असेच ठेवलेले. खांबांना लागून देवळाच्या आतला बाजूला बसायला कठडे. देवांची जागा सोडून बाकीचं देऊळ मोकळं. देवळाच्या खालच्या अंगाला व्हाळ (छोटा नाला) होता. दर पावसाळ्यात हा व्हाळ खळखळून वाहायचा. आम्ही तिथे मासे पकडायला जायचो. व्हाळाच्या थोड्या खाली आमचं अंडर-आर्म क्रिकेटचं छोटं मैदान होतं. गणपती विसर्जनाच्यावेळी देवळासमोर लोकांचे गणपती येत. तिथे आरती व्हायची आणि मग तुडुंब भरून वाहणाऱ्या व्हाळात श्रींचं विसर्जन वाजतगाजत व्हायचं. मोठे लोक आम्हाला उतरू देत नसत. देवळाच्या दुसऱ्या बाजूला खाली, वाडीची सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीला लागून एक मोठ्ठं ओवळाच्या (बकुळ) फुलांचं झाड आहे. दर सकाळी आम्ही विहीरवर ओवळं वेचायला जायचो. विहिरीच्या मागल्याबाजूला गावातल्या लोकांची शेतजमीन. उन्हाळ्यात ही शेतजमीन, मळे आम्हाला क्रिकेट खेळायला मोकळे असायचे. मिरगाचा पाउस पडला की मी आणि मामा रात्री पेट्रोमॅक्सचा कंदिल घेऊन व्हाळापासून ते विहीर आणि या मळ्यात कुर्ल्या (खेकडे) पकडायला जायचो.

वाडीतल्या मोठ्या लोकांच्या मासिक सभा आणि देवाकडे गाऱ्हाणी घेऊन येणारे लोक यांच्याव्यतिरिक्त ते देऊळ फक्त आमच्या ताब्यात असायचं. पण आम्ही फक्त खेळायला म्हणून त्या देवळात जमायचो नाही. कधी गोष्टींची पुस्तकं वाचायला, कधी दुपारची डुलकी काढायला, कधी देवळाच्या मोकळ्या खांबावर चित्रकला करायला, तर कधी मारामारीला आम्ही त्या देवळात पडीक असायचो. दर पंधरावडयाला आम्ही ते देऊळ धुवून काढायचो, देवांना अंघोळ घालायचो, घाड्यांच्या गोठ्यातले शेण आणून देऊळ सारावायचो आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून देवळात धिंगाणा घालायचो. सणावाराला वाडीतला पुजारी ते देऊळ स्वच्छ करायचा. देवांची पूजा करून मग त्यांना नैवेद्य दाखवायचा. हा नैवेद्य म्हणजे खीर किंवा शीरा असायचा त्याला ‘ऊपार’ पण म्हणायचे. पूजा झाल्यावर फणसाच्या पानांवर देवांना नैवेद्य दाखवायचा. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्हाला पण मिळायचा, पण एकदा का पुजारी गेला की आम्ही त्या देवांच्या समोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुटून पडायचो. गावातले बरेचजण आडप्रसंगाला देवाकडे गाऱ्हाणी घेऊन येत. मग संध्याकाळी वाडीतला पुजारी देवळात येत असे. देवासमोर आसन घालुन शांतपणे बसे. काही वेळातच त्याच्या अंगात देव येई आणि तो बसल्या जागी कुदायाला लागे. त्यावेळात ज्याचं गाऱ्हाणं असे तो आपली विपदा देवाला सांगे आणि मग देव त्याला योग्य तो सल्ला / मार्ग सांगे. कुदता-कुदता देव त्याला चिमुटभर अंगारा देई. मोठ्या श्रद्धेने गाऱ्हाणं घेऊन येणारी माणसे तो अंगारा आणि देवाने सांगीतालेल्या गोष्टी करायचे. मला आठवतं मी लहानपणी आजारी पडल्यावर कित्येकदा आज्जीने देवाला गाऱ्हाणी घातली होती. कित्येकदा मी देवाचा अंगारा पाण्यातून प्रसाद म्हणून घेतला होता. 



        क्रिकेट खेळताना काही देवांचा स्टंप्स म्हणून उपयोग व्हायचा. काही देव जे हलवता येत असत ते खेळताना टाईमप्लीज देवून बाजूला करायचो पुन्हा खेळून झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर आणून ठेवायचो. गोटया खेळतानाही सेम, गलीत गोटी जाण्यासाठी देवांना बाजूला करून ठेवायचो. काही ठराविक देवांना बॉल लागल्यास एक्स्ट्रा रन्स मिळायचे. देवळाच्या डायरेक्ट बाहेर गेल्यास आउट. समोरच्या कठड्याला फोर, डायरेक्ट लागल्यास सिक्स. खांबोळ्या आणि डोंगर का पानी खेळताना एखाद्याला पिदवायला ज्याम धम्माल यायची. पण सगळ्यात धम्माल यायची धप्पा (लपाछुपी) खेळताना. ज्याच्यावर राज्य असायचं त्याला एका वेळी १०-१५ जणांना शोधून देवळाच्या एका खांबाला धप्पा द्यायचा असे, पण जर लपलेल्यापैकी कुणी अगोदर येवून त्या खांबाला धप्पा दिला की त्याच्यावर पुन्हा राज्य. एकदा खेळताना ज्याच्यावर राज्य होतं त्याने सगळ्यांना शोधून काढलं, फक्त एक जण काही केल्या सापडत नव्हता. खरं तर तो कुठे लपलाय हे आम्हाला देखिल ठाऊक नव्हतं. कधी कधी जो शेवटचा राहिलेला असायचा तो कुठून तरी लपत छपत यायचा आणि धप्पा द्यायचा. मग आम्ही सुटायचो. एखाद्याला जर जास्तच पिदवायचे असेल तर मग आम्ही सगळेजण धावत त्याच्यासमोर यायचो आणि तो सगळ्यांना धप्पा द्यायच्या आत आम्ही त्यालाच धप्पा द्यायचो. तर हा जो शेवटचा होता त्याने काही वेळाने कुठून तरी धप्पा दिला पण आम्हाला धप्प असा आवाज आला. पाहिलं तर तो जमिनीवर पडला होता, हा आला कुठून? मग लक्ष्यात आलं की ज्या खांबावर धप्पा द्यायचा त्याच खांबाच्या वरच्या छपराच्या फटीत हा लपला होता पण अडकल्यामुळे त्याला बाहेर पडता येईना आणि धप्पा द्यायचा असल्यामुळे तो ओरडू ही शकत नव्हता. कसाबसा फटीतून बाहेर पडताना धप्पा द्यायच्या नादात हा देवळात धप्पकन पडला.

        कधी कधी मूड असला की देवळात आमचा ऑर्केस्ट्रा जमायचा. इंगा नावाचा मुलगा तोंडाने बुलबुल (बेंजो) वाजवल्याचा आवाज काढायचा आणि त्याच्या तालावर आम्ही काठ्यांनी देवळाचे कठडे बडवायचो. चित्रकलेचा मूड झाला की मग पाटीवरल्या पेन्सिलने देवळाच्या कठड्यांवर वेगवेगळी चित्रं उमटायची मग त्यात रंग भरण्यासाठी मातीतल्या जांभ्या दगडांचा वापर व्ह्यायचा. आठवड्याच्या बाजारातून कुणाच्या घरात चणे, फुटाणे, भजी असं काही येई,  मग ते सगळं देवळात येई आणि सोबत बसून खाणं होई. कधी प्रत्येकी चार-आठ आणे जमवून गुरु भटाच्या दुकानातून फरसाण आणि आईस्फ़्रोट आणून जंगी पार्टी पण होई. इतकं सगळं जे काही आम्ही गडबड - गोंगाट, जो उच्छाद देवळात घालायचो तो काही मोठयांना आवडत असे असं नाही. आमच्या या गोंधळाचा त्रास त्याना नेहमीच व्ह्यायचा. कोणताही खेळ असो तो शांतपणे कसा खेळला जाईल? बॅट-बॉल, गोटया, खांबोळ्या, डोंगर का पानी हे काय गप्प राहून खेळायचे खेळ आहेत का? 
माझी बॅटींग - तुझी बॅटींग, 
कोणार राज्य? 
बॉल हळू मार रे!, 
बॉल हरावलो तर भरचूक - नो भरचूक, 
कोयबा, तुझ्या आवशीचो घोव, 
बरोबर फिल्डींग कर मरे!, धाव – धाव, नेम धरून ठोक! अरे पडलो रे पडलो! 
या अश्या वाक्यांपासून ते शिवीगाळ मारामारीपर्यंत सगळं काही देवळात सुरु असायचं. या गोंगाटाचा त्रास मोठ्या लोकांना होताच असे. त्यात ते देऊळ अगदी माझ्या घराला लागुनच त्यामुळे मलाच जास्त मार बसे. पण तरीही पुन्हा देवळातच खेळायला जमायचो.


            मागल्यावेळी गावी गेलो तेव्हा सहजच मंदिरात गेलो. एकेकाळी आमच्या गोंगाटाने  थरारणारं ते देऊळ आज अगदी शांत होतं. सगळे देव स्थितप्रज्ञ अवस्थेत बसले होते. आमच्या खेळात फिल्डर्स, स्टंप्स, म्हणून असणारे देव आज रिटायरमेंट घेतल्यासारखे निपचित पडले होते. आताशा ते देऊळ कुणी सारवतं की नाही कुणास ठाऊक. सगळया देवांवर एक कारुणीक छटा उमटली होती. चारी बाजूनी उघडं असलेल्या त्या देवळात एरव्ही वाराही आमच्यासोबत खेळायचा तिथे आज जीव गुदमरू लागला. देवळातले खांब शापित असल्यासारखे, धुळीने माखून गुपचूप उभे. सगळया देवळाला जणू अवकळाच आलेली. आमच्यासारखं बालपण आताच्या मुलांच्या नशिबी नव्हतं. दुर्दैवाने काही नालायक लोकांनी वाडीची वाट लावलीय. घराघरांत, कुटुंबात गटबाजी – राजकारणांना उत आल्याने आता पूर्वी सारखे लोक जमत नाहीत. बोलत नाहीत. जसे मोठे वागतात तसेच ते आपल्या मुलांनाही वागायला शिकवतात. त्यामुळे मुलेसुद्धा गटागटांनी राहतात. आमच्यावेळीपण हे सगळं नव्हतं अश्यातला भाग नाही, पण आम्ही आमच्यात कधी फूट पडू दिली नव्हती. खेळ, मस्ती, अभ्यास या सगळ्यात आम्ही एकत्र बांधले गेलो होतो. ते सगळं आठवून खिन्न मनाने काहीवेळ देवळातल्या कठड्यावर टेकलो. कुठून तरी शीळ घालत वारा देवळात शिरला आणि अंगावरून अलगद वाहू लागला. एक – दोन रानपक्षी, चिमण्या देवळाच्या वाश्यांवर येवून किलबिलू लागल्या. मी शांतपणे डोळे मिटून घेतले आणि पुन्हा बालपणात शिरलो....


Saturday, August 16, 2014

वारी कोहोजगडाची...

"तो दिसतोय न? हं! तोच कोहोज किल्ला! 
आणि ही समोरची पायवाट. इथुनच जायचयं आपल्याला. पुढे एक तलाव आहे. तलावाच्या काठानेच जायचयं. मॅप आहे माझ्याकडे. माझ्या अंदाजाप्रमाणे २-३ तास लागतिल वर जायला. आणि उतरायला २ तास पुरे. येउ आपण खाली ३-४ च्या दरम्यान.
आता किती वाजलेत? आयला! ११:३० वाजलेत. चला, चला लवकर चला." 
असं म्हणुन आम्ही कोहोज किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. पण सकाळी ११:३० वाजता, इतक्या उशिरा ट्रेक सुरु करण्याचे कारण? त्यासाठी थोडं मागे जाउ. जास्त नाही ३-४ तास मागे जाउ. 


                  त्याचं झालं काय की ट्रेक ठरला. मेंबर्स पण ठरले आणि धुंडीराज सोडुन सगळे वेळेवर पण आले. शनीवारी सकाळी ७ वाजता प्लाझा, दादरला भेटायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे मी पनवेलहुन, आनंद डोंबिवलीहुन, सचिन पवईहुन, राजिव काका ठाण्याहून, अनघा दादरलाच राहते आणि धुंडीराजला वाटेत जोगेश्वरी हायवेवरुन उचलायचे ठरले. आम्ही सगळे दादरला जमलो तेव्हा धुंडीला कॉल केला तेव्हा तो उठला होता. त्याला सांगितलं १५-२० मि. पोचतो आम्ही. त्याप्रमाणे अनघाची नवी कोरी स्कोडा घेउन आम्ही दादरहुन वेस्टर्न हायवेवर सुटलो. राजीव काका ड्राईव्ह करत होते. त्यांना सांगितलं की पालघरला पोचल्यावर मनोर - वाडा रोड आपल्याला पकडायचा आहे त्याच मार्गावर कोहोज किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघोटे आहे. पण माझंच काहीतरी चुकलं; पण त्याआधी आम्ही ७:३० जोगेश्वरी हायवेला पोचलो तरी धुंडीराजचा पत्ता नव्हता. कॉल करुन करुन थकलो. येतो रे, आलोच, असं सांगुन पठ्ठा ८ ला आला. झालं! त्यानंतर ट्रेकमध्ये पुढे जे काही झालं ते सगळं धुंडीराज मुळेच झालं असं बोलुन बोलुन त्याला पिडलं. 

        तो आल्या आल्या राजीव काकांनी गाडी हायवेवर सुसाट सोडली. काका ड्राईव्ह करु लागले की आम्ही निर्धास्त होतो आणि आमच्या चकाट्यांना उत येतो. आम्हाला माहीत असतं की काका डेस्टीनेशनला आमच्या गप्पांमध्ये सामिल होउनही बरोब्बर वेळेत पोचवतात.पण यावेळी माझंच चुकलं. म्हणजे मी काकाना म्हणालो की मला रस्ता माहीत आहे. पालघरच्या आधी वाडाला जायला जो मनोर-वाडा एग्झिट आहे तोच घ्यायचा. एरव्ही काका चुकले नसते किंवा त्यानी आधी रोड मॅप पाहिला असता तरी ते चुकले नसते आणि चुकायचा प्रश्नच नव्ह्ता सरळ सरळ हायवे वरुन पालघरच्या आधी मनोर-वाडा फाटा गाठायचा होता. एक तर धुंडीराजमुळे आधीच उशिर झाला होता. :D 

          तर हायवेवर असतानाच ९ च्या सुमारास पोटात कवळे ओरडु लागले. मग काका त्यांना माहित असलेल्या हायवेवर असलेल्या महागड्या इडलीवाल्याच्या (कामताच्या)  हाटेलात घेउन गेले. तिथे मस्त फ्रेश वैगरे झालो आणि ब्रेकफास्ट करुन पुन्हा पालघरच्या दिशेने निघालो. पुन्हा गाडी आणि आमच्या गप्पा सुसाट सुटल्या. बराच वेळ झाला तरी पालघर येत नव्हते. मी आजुबाजुला  साईनबोर्डस पाहत होतो, अचानक एक साईनबोर्ड वाचला आणि मला धडकीच भरली.  "डहाणु स्थानका कडे" " महालक्ष्मी मंदीर" हा बोर्ड वाचल्यावर डोळेच फिरले. आम्ही गप्पांच्या नादात डहाणुला पोचलो होतो. ताबडतोब मागे फिरण्यासाठी यु टर्न शोधु लागलो. तो पण २-३ कि.मी. वर सापडला.(केजरीवालला कसा काय सापडतो लगेच काय माहीत)  तिथुन काकांनी पुन्हा गाडी दामटवली. लोकांना विचारत विचारत आम्ही मनोर-वाडा या रस्त्यावर आलो तिथुन टोल भरुन वाघोटे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गाडी लावली. ११:०० वाजले. अजिबात वेळ न दवडता आम्ही गडाच्या दिशेने चालु लागलो आणि हा सगळा उशिर एकट्या धुंडीराजमुळे झाला. :D

        नकाशाप्रमाणे पहीली खूण म्हणजे दीलच्या आकाराचं तळं होतं. ते शोधत शोधत आम्ही चालू लागलो आणि ते सापडलं. पुन्हा चालत चालत दुसर्‍या खुणेपाशी म्हणजे पाझर तलावापाशी आलो आणि तलावापाशी येताच हबकुनच गेलो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा प्रचंड, शांत तलाव बघुन फार प्रसन्न वाटलं. पाउस नव्हता पण गारव्यामुळे वातातवरण आल्हाददायक होते. काळे बाळे ढग मुक्तपणे विहार करत होते. मग आमच्या फोटोग्राफीला उत आला आणि आम्ही तिथे जरा जास्तच रमलो. 






          घड्याळ्याकडे बघत काका चला चला म्हणुन मागे लागले तसे आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे शेतातुन चिखल तुडवत गडाच्या पायथ्याच्या रानवाटेजवळ आलो. तिथुन माहीती असल्याप्रमाणे पायवाटेने वर चढायचे होते. रान तुडवत, गप्पा हाकत आम्ही चालु लागलो. बराच वेळ झाला तरी वाट संपत नव्हती. वाट चुकलो तर नाही ना असं वाटु लागलं. एकतर इथे कुठे मार्किंग्ज पण नव्हत्या. आम्ही चालु लागलो आणि किमान  तासभर चालल्यावर लक्ष्यात आलं की आपण चुकलोय, कारण चढ कुठेच लागला नव्हता. किती तरी वेळ रानातच चालत होतो. एका ठीकाणी वाटेला दोन फाटे फुटले होते. एक वाट उजवीकडे तर दुसरी वाट सरळ जात होती. आता जायचं कुठे यावर आमची चर्चा सुरु झाली. एक वाजायला आला होता. पाउस नसला तरी दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. ज्या ठीकाणी वाटेला फाटे फुटले होते तिथुन उजव्या बाजुला गेलो तर तो मघासचा तलावाच्या समोर असलेला कातळ दिसु लागला. ट्रेकक्षितिजच्या नकाशाप्रमाणे गडावर एक मंदीर आहे, तर त्या कातळाच्या माथ्यावर मंदिरासारखी शेड दिसू लागली. म्हणून धुंडी आणि आका वाट शोधायला गेले. आम्ही पुन्हा नकाशा नीट बघू लागलो. काहीवेळाने ते दोघे परत आले, पुढे वाटच नव्हती. काही वेळ चर्चा करुन आम्ही मागे फिरलो आणि समोरच्या सरळ वाटेने जायचे ठरवले. खूप उशीर झाला होता, वाट समजत नव्हती, गडाची काही खूण दिसत नव्हती आणि घामाने निथळून गेलो होतो. मघापासुन वाटत होतं की  कुणीतरी वाटेत भेटाव शेतकरी किंवा गुराखी निदान त्यांना वाट विचारता आली असती, पण कुणीच नव्हतं.हे सगळं काही धुंडीमुळेच झालं होतं. :D


महाचर्चा :D






        त्या वाटेवरुन चालताना कुठे मार्किंग्ज आहेत का ते पाहत होतो आणि अचानक कसला तरी आवाज ऐकू आला. मला वाटलं कुणी तरी ताटली वाजवत येतं होतं. आम्ही सावध झालो. झाडा झुडुपातुन कुणीतरी येतं होतं आणि  घंटेचा आवाज. काहीच कळत नव्हतं. आम्ही सावधपणे चालू लागलो आणि समोरुन काही बकर्‍या म्यँ म्यँ करत आल्या. बकर्‍या आलया म्हणजे कुणीतरी असणार असा विचार करुन आम्ही पुढे चालु लागलो आणि अचानक उजवीकडुन एक आज्जीबाई समोर आल्या. त्यांना बघुन थोडं हायसं वाटलं. त्यांना विचारलं गडावर जायची वाट कुठे? आणि आज्जीबाईनी आम्हाला वाट दाखवली. ज्या वाटेवरुन आज्जीबाई आल्या होत्या तीच वाट गडावर जात होती. पण ती पायवाट आम्हाला बिलकुल दिसलीच नसती आणि आम्ही पुन्हा सरळ वाटेने चालत कुठच्या कुठे पोचलो असतो. आज्जीबाई अगदी देवासारख्या त्या वाटेवर भेटल्या. आजीबाईंचे आभार मानुन आम्ही त्या वाटेवरुन चालायला लागलो तेव्हा दीड वाजले  होते .




      आता थोडी हुशारी आली आणि काही वेळातच एका मोठ्या दगडापाशी आलो इथे मार्किंग होती. व्वा रे ! मार्किंग करणार्‍यांनो. मग आम्ही आता त्या वाटेने चालु लागलो. आता खरा चढ सुरु झाला. मोठमोठ्या दगडांमधुन वाट जात होती. पण आताही तेच इतका वेळ चाललो पण गड  किंवा गडाची एखादी खूण काहीच दिसत नव्हते. चालून चालून पायांची चाळण झाली होती. तरी बाकीचे सगळे काटक आणि मी जड असल्याने मलाच उशीर होत होता. हॉल्ट घेत घेत मी चालत होतो. अडीच वाजायला आले तरी गड दिसतच नव्हता आणि माझी सटकली. म्हटलं मरु दे तो ट्रेक चला जाउया परत. पहिल्यांदाच मी एखाद्या ट्रेकला वैतागलो होतो. इतकावेळ पायपीट करुनही गड दिसत नव्हता त्यामुळे अजुन सटकली होती. एरव्ही एखाद्या ट्रेकला निदान गडाचा बुरुज, किंवा झेंडा किंवा अन्य काहीतरी दिसत जेणेकरुन समजतं की आपण बरोबर चालतोय आणि काही वेळात तिथे पोहचू. पण इथे चारी बाजुला फक्त माजलेलं रान आणि मोठाले दगड-धोंडे. मी वैतागलो. म्हणालो मरु दे तो ट्रेक चला परतुया. पण बाकीचे म्हणाले नाही, पूर्ण करुया त्यात अनघाही एकदम इरेला पेटली. मग पुन्हा एकदा आई भवानीचं नामस्मरण करत मी चालायला सुरुवात केली. आणि हो! हे सगळं काही धुंडीमुळेच झालं. :D




        आता पाउस सुरु झाला आणि गड पुर्ण धुक्यात गायब झाला. काहीवेळाने चढुन एका मोकळ्या पठारावर आलो आणि धुक्याच्या पडद्याला छेदुन गडावरली पहीली खूण म्हणजे मंदीर दिसलं आणि हायसं वाटलं. तिथल्याच एका दगडावर बसलो. इतकावेळ तंगडतोड करुन शेवटी गडावर पोचलो तर. थोडं सटर फटर खाउन घेतलं आणि आता गड फिरायची घाई होउ लागली कारण ३ वाजले होते आणि वर यायला लागलेला वेळ लक्ष्यात घेता काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते आणि पुन्हा वाट चुकलो तर मग काही विचारायलाच नको.






            आम्ही रिमझिम पावसात धुक्यातून वाट काढत त्या मंदिरापाशी येउन पोचलो आणि गड फिरायला सुरुवात केली. गडावर विशेष काही बघण्यासारखं नाही. पण मला जे बघायचं होतं ते म्हणजे तो गडाच्या माथ्यावर असलेला निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा पुतळा. तो पुतळा म्हणजे निसर्गाचं एक आश्चर्यच आहे. कधी वाडा - मनोर रस्त्यावरुन जात असाल तर  उजवीकडे गडावर हा पुतळा दिसतो. रिओ मधल्या ख्रिस्ताच्या पुतळ्यासारखा हा देखिल आपले बाहु पसरुन उभा आहे. पण वेळेअभावी वर जाता आले नाही आणि पाउस ही सुरु झाला. तितक्यात त्या पुतळ्याच्या वाटेवरुन एक ग्रुप खाली उतरताना दिसला. मग आम्ही तिथेच फोटोग्राफी करायला सुरुवात केली.








     काही वेळ भटकून ४ वाजताच काकानी परत फिरायचा इशारा दिला. आता घाई घाई करुन आम्ही गड उतरायला लागलो. पण नेहमीचा अनुभव आहे एखादा गड चढताना जितका वेळ लागतो तितकाच उतरताना देखिल लागतो. त्यात वाट निसरडी असल्याने आमच्या लीड स्ट्रायकर अनघाने ४-५ गोल मारले. :ड कसे बसे त्या रानातुन वाट काढत, शेतातला चिखल तुडवत एकदाचे पाझर तलावापाशी आलो तेव्हा साडे पाच - सहा  वाजले होते. तिथे पायातले बूट काढले आणि पाण्यात पाय बुडवून बसुन राहिलो. पुन्हा आवरुन जायला निघालो आणि गाडीपाशी येउन वेस्टर्न एक्सप्रेसवरुन  वाटेत धुंडीराजला टाकून दादरला पोचलो तेव्हा सात - साडेसात वाजले होते. नाही म्हणायला एक भन्नाट ट्रेक झाला होता. पहिल्यापासुन चुकलेली वाट आणि त्यामुळे झालेली  दमछाक, वैताग, पाउस. आणि हे सगळं कुणामुळे?? तर धुंडीराजमुळे. :D :P
 
एकदा केल्यावर पुन्हा कधीही न करण्याच्या ट्रेक मध्ये राजमाची, माहुली बरोबर कोहोजगडाची एंट्री झाली..



काही इतर छायाचित्रे :












- दीपक परुळेकर