बालक पालक
शेवटी काल एकदाचा हा सिनेमा पाहिला. प्रदर्शनाच्या अगोदरपासुनच या सिनेमाची उत्सुकता होती. टी.व्ही., फेसबुक, ट्विटरवर येणार्या प्रोमोझ यावरुन तर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. त्यात रवी जाधवचं डिरेक्शन होते त्यामुळे काही तरी वेगळंच असणार यात शंकाच नव्हती. सिनेमाचे रिव्ह्युज पण बेस्ट येत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याबद्दल सगळीकडेच बोलु जाउ लागलं. सगळीकडे हाउसफुल्लचे बोर्ड लटकू लागले.घराघरातं, लहान - मोठ्यांच्या तोंडात बीपी, बीपी ऐकू येउ लागलं. भारतमाता या सिनेमागृहात तर तिकिटांवरुन एकाचा नाहक बळी ही गेला. तर असा हा बीपी शेवटी पाहिलाच. पण जेव्हा सामान्य प्रेक्षकही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की गडबड आहे असं मला वाटु लागतं.
चित्रपटगृह तर हाउसफुल्ल होते. सिनेमा सुरु होतो. एक बाप
आपल्या ११-१२ वर्षाच्या मुलाला तो अभ्यास करत नाही आपल्या रुममध्येच बसुन
काही तरी करत असतो म्हणून बडवत असतो. त्याला मारता मारता, ओरडता ओरडता
त्याला त्या मुलाकडे असलेल्या पॉर्न डिव्हीडीज सापडतात आणि तो स्तब्धच
होतो. त्याला कळतच नाही की काय बोलावं ते. तो वैतागतो आणि मुलाला अजुनच
मारायला सुरुवात करतो. हा सीन नोट करुन ठेवा.
मग तो फ्रस्टट्रेट होउन रुममधून बाहेर येतो. त्याची बायको रुमच्या बाहेरच असते. मुलाला असं मारणं तिला अजिबात आवडलेलं नसतं. ती त्याबद्दल त्याला विचारते तेव्हा तो बायकोला त्या
डीव्हीडीज दाखवतो आणि आपल्या मुलाच्या पराक्रमाबद्दल सांगतो. तिला
पहिल्यांदा विश्वासच बसत नाही. तो खूप वैतागलेला असतो. हे सगळं इतक्या लहान
वयात या मुलांना कुठुन मिळतं? यांच्या शाळेतच चौकशी केली पाहिजे....
शाळा! शाळा म्हटल्यावर तिला सगळं आठवू लागतं आणि कॅमेरा
हळुहळू तिच्या भूतकाळात घेउन जातो आणि आपल्याला ओळख होते चार मुलांची डॉली,
अव्या, भाग्या, आणि चिउ....
त्यातली डॉली आपल्याला सगळं सांगू लागते. आणि आपण ते ऐकू
लागतो. चार मित्र, एकाच चाळीत राहणारे, एकाच वर्गात शिकणारे, एकत्र
खेळणारे, एकत्र अभ्यास करणारे. प्रत्येक समस्येचं आपल्या पद्धतीने उत्तर
शोधणारे.. एकदा चाळीत काहीतरी होतं आणि त्यांच्या चाळीत राहणार्या
त्यांच्या ज्योती ताईने शेण खाल्ल्याची वार्ता त्यांच्या कानावर पडते. आता
तिने शेण खाल्लं म्हणजे नक्की काय केलं हे यांना कळत नाही. आणि शेण
खाल्ल्यामुळे तिला चाळ का सोडावी लागली ते ही कळत नाही. मग ते सगळे शेण
खाणं म्हणजे नक्की काय याचं उत्तर शोधु लागतात. पहिल्यांदा शब्दकोशात सापडत
नाही म्हणून मग आई वडीलांना विचारतात,पण आईवडील उत्तरादाखल यांच्या
कानाखाली जाळ काढतात. मग त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक नवीन
मित्र त्यांना सापडतो. विशू! किंवा विश्या! हा खूप पोचलेला असतो. शेण खाणं
म्हणजे नक्की काय हे त्याला चांगलचं माहिती असतं. मग तो या चौघांना शेण
खाण्याच्या थेअरीजची पुस्तकं वाचायला देतो. म्हणजे अॅडल्ट्स कंटेन्ट
असलेली पुस्तकं वाचायला देतो. पुस्तकं वाचुन झालयावर प्रॅक्टीकल्स म्हणजे
हे पुस्तकातलं नक्की कसं घडतं हे पाहायचं किंवा ते आवाज ऐकायचे म्हणून
रात्री चाळीत सगळे झोपल्यावर ते झाकणी मारतात. पण हा प्रयोग सफल होत नाही.
शेवटी विश्या त्यांना त्यावेळी असलेल्या व्हीसीआरचा पर्याय सुचवतो आणि मग
ते व्हीसीआर आणुन अव्याच्या घरात पॉर्न मुव्ही बघतात. पुस्तकातलं सगळं काही
त्यांच्या समोर घडत असतं. तीन मुलगे आणि दोन मुली. पचायला थोडं जड जातं पण
ते सिनेमात अॅक्सेप्ट करुया कारण त्यांची मैत्री तशी असते आणि सेक्स
म्हणजे नक्की काय यातलं त्यांना काहीच माहीत नसतं. जिज्ञासेपोटी ते हे सगळं
करतात. जिज्ञासा पुर्ण होते. पण आता एक वेगळाच बदल झालेला असतो. त्यांची
नजर बदललेली असते. त्यात डॉलीला हे सगळं पटत नसतं. आपण हे सगळं फक्त शेण
खाणं म्हणजे नक्की काय हे जाणुन घेण्यासाठी केलं होतं आणि आपल्याला आता हे
कळलेलं आहे त्यामुळे पुन्हा हे नको असं तिचं मत असतं. पण अव्या, भाग्या
यांना ते सगळं पुन्हा हवं असतं. चिउची सुद्धा हरकत नसते. त्यामुळे डॉली
वैतागून निघून जाते. पुढे अव्या, भाग्या आणि विशू यांचे हे उद्योग सुरुच
असतात. त्यात अव्याला चिउबद्दल जवळीक वाटु लागते आणि भाग्याला तिच्यापेक्षा
वयाने मोठी असलेल्या नेहा ताईबद्दल ( सई ताम्हणकर ). यात ही जवळीक हे
प्रेम नसुन फक्त शारिरीक आकर्षण आहे हे रवी जाधवांनी त्यांच्या कुशल
डिरेक्शनमधून दाखवून दिलयं. आता भाग्यासाठी ती नेहा ताई नसते. तसंच
येणार्या जाणार्या मुलींकडे बघण्याची त्यांची नजरही बदललेली असते. चिउला
कळतं की अव्या फक्त तिच्यावर चान्स मारायचा प्रयत्न करतोय मग ती ही
त्याच्यापासुन दूर होते. भाग्या एकदा सगळं बळ एकटवून नेहा ला जाउन "आय लव्ह
यू" म्हणतो. या सगळ्यामुळे एक विचित्र प्रसंग निर्माण होतो. नेहा चाळीत
राहणार्या काकांना ( किशोर कदम ) हे सगळं सांगते. काका हे सगळं त्या
मुलांच्या पालकांकडे बोलायचा प्रयत्न करतात पण पालकांची मनस्थिती हे सगळं
अॅक्सेप्ट करण्याची नसते. ते मुलांना समजाउन सांगणारे नसतात. हे सगळं
करण्याचं मुलांचं वयच नाही आणि जर त्यांनी असं काही केलं तर त्यांना फोडुन
काढु अशी त्यांची धारणा असते. मग काका आपल्या परीने मुलांना समजावयचा
प्रयत्न करतात.यात नेहा ही मदत करते. मुलं काकाना प्रामाणिकपणे सांगतात की
आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही हे सगळं केलं. काका त्यांना सांगतात की जर
कळत नसेल तर आपल्या आई वडीलांशी बोला. त्यांना विचारा. तेच तुमचे खरे
मित्र आहेत. मुलांना आपली चूक कळते आणि ते आईवडीलांशी बोलायचा प्रयत्न
करतात. पण जमत नाही. फेस टु फेस बोलायची हिम्म्तच नसते. मग शेवटी ते फोनचा
वापर करतात. आणि आई वडीलांना फोन करुन हे सगळं विचारतात असं काहीस दाखवून
डॉलीची गोष्ट संपते.
कॅमेरा परत त्या घरात येतो. तो ज्याने आपल्या मुलाला
मारलेलं असतं तो हा डॉलीच्या गोष्टीतला अव्या असतो आणि ती डॉली असते. हे
उलगडलं आणि सिनेमा निदान माझ्यासाठी तरी घसरलाच. इतका वेळ जे काही आपण
डॉलीच्या गोष्टीत बघत होतो, ऐकत होतो ते सगळं शेवटी घसरतं. या लेखाच्या
सुरुवातीला मी जिथे लिहिलयं की "हा सीन नोट करुन ठेवा." कारण या सीनचा शेवट
इथे होतो आणि चित्रपटाचाही. अव्या आपल्या मुलाकडे पॉर्न डीव्हीडीज सापडले
म्हणून वैतागलेला असतो, फ्रस्ट्रेट असतो. पण या पॉर्नमुळे त्याच्या ही
बालपणात त्याने काय केले होते. त्यांना कसल्या कसल्या प्रसंगाना सामोरे
जावे लागले होते हे तो सपशेल विसरतो आणि आपल्या मुलावर जाळ काढतो. इथेच
सिनेमा सपशेल आपटतो. आपण लहानपनी शेण खाणं या शब्दांचा अर्थ जाणून
घेण्यासाठी काय काय केलं होतं आणि त्यामुळे आपले प्रश्न कसे सुटत गेले
किंवा आपण ते सोडवण्यासाठी काय काय केलं हे सगळं तो
कसं काय विसरतो?? मग दिग्दर्शकाला नक्की काय संगायचयं या सिनेमातुन तेच कळत
नाही. कसलंही प्रबोधन हा सिनेमा करत नाही. फक्त आपण काही झालं तरी लैंगिक
शिक्षण किंवा सेक्स बद्दल आपली मानसिकता बदलू शकत नाही हेच अधिक स्पष्ट
करतो.
डिरेक्शन उत्तमच आहे यात वादच नाही. प्रत्येक प्रसंग अगदी
उत्तम प्रकारे चित्रीत केला गेलाय. संवाद पण अफलातुन आहेत. मग या
चित्रपटाच्या यशाचं गुपित कळतं. का हा चित्रपट इतका तूफान चालतोय ते कळतं.
खरं तर आजपर्यंत बीपी हा शब्द चारचौघात उच्चारायचा म्हणजे पाप होतं. बीपी -
ब्ल्यू फिल्म्स किंवा आमच्या भाषेत भक्त प्रल्हाद किंवा निला अशी सांकेतिक
नावं प्रचलित होती आणि ती फक्त मुलांमध्येच सर्रास वापरली जायची. पण या
सिनेमाने बीपी हे नाव घराघरात पोचवलं.लहानांपसुन मोठ्यांपर्यंत बीपी, बीपी
ओरडू लागले. हे जरी योग्य झालं तरी हवं ते प्रबोधन या सिनेमातुन झालं नाही.
किंबहुना ते होतच नाही.
काय असतं ना आपल्याकडे जर सेक्स या विषयावर कुठे काही
पब्लिकली बोललं गेलं किंवा लिंग, योनी, स्तन, उरोज,बूब्ज, पुस्सी, डीक असे
शब्द उच्चारात आले की सगळ्यांना त्यात इंटरेस्ट वाटु लागतो. मग जो तो आपलं
ज्ञान पाजळू लागतो. या सिनेमातले संवाद हे ही असेच जवळीक साधणारे आहेत.
जसं की "आपला हात जगन्नाथ." वैगरे संवाद हे मुलांचे किंवा पुरुषांचे
एकमेकांशी अशा विषयांवर बोलतानाचे वाक्प्रचार आहेत. ते पब्लिकली
सगळ्यांसमोर आल्यामुळे त्यातली भीती चेपली गेली. तशात या सिनेमांत
दाखवल्याप्रमाणे दोन मुलीसुद्धा या मुलांसोबत या ब्ल्यू फिल्म्स बघत असतात.
त्यामुळे कदाचित थोडासा वेगळा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. कारण लैंगिक
शिक्षण हे फक्त मुलांसाठीच नाही आहे हे त्याला स्पष्ट करायचयं. प्रेक्षक
बाहेर पडताना चित्रपटाला दाद देत बाहेर पडतो पण चित्रपटाचा नकी गाभा काय
होता हे मला तरी कळलं नाही. प्रत्येक सीनला टाळ्या, शिट्ट्या पडतात, कारण
ते प्रसंग तसे खरोखर चित्रीत केले गेले आहेत. त्यांचं पुस्तकं चोरुन वाचणं.
ब्ल्यू फिल्मस बघता बघता भाग्या आणि अव्याचं हळूच उशी मांडीवर घेणं.
नेहाला सायकल चालवताना बघत असताना भाग्याला तिच्या स्तनांचं अस्पष्ट दर्शन
घडतं आणि तो सायकलवरुन पडतो. हा प्रसंग सिनेमा बघणार्या प्रत्येक
पुरुषाच्या आयुष्यात घडलेला असतो आणि म्हणून टाळ्या पडतात.. सिनेमा फक्त
निखळ मनोरंजन करतो. आणि कदाचित दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला हेच हवं
असेल. सिनेमाने समाजात लैंगिक शिक्षणाचं प्रबोधन केलंच पाहिजे हा हट्ट बिलकुल नाहीय. पण जे लोक हा सिनेमा प्रबोधन करतोय म्हणून ओरडत आहेत ते चूक आहे.
रवी जाधवने हाच धागा पकडलाय आणि प्रत्येक पुरुषाच्या आणि मुलीच्या आयुष्यात घडलेल्या या नाजुक प्रसंगांच वर्णन पडद्यावर
दाखवलं. पण या सिनेमातुन अपेक्षित असणारं बालक आणि पालक यांचं या विषयाचं
नातं, किंवा त्यांनी काय बोध घ्यावा, त्यांनी हे विषय कसे हाताळावे हे
सांगत नाही. ते अर्ध्यावरच सोडुन देतो. शेवटी डॉली सांगते की आता या
मुलांचं जग फार वेगळं आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी
सीडीज, डीव्हीडीज, सेल फोन, इंटरनेट ही अनेक माध्यमं उपलब्ध आहेत पण
पालकांनी आपणहुन या विषयात पुढाकार घेतला पाहिजे आणि हे विषय हाताळले
पाहिजेत असं ठाम मत कुठेही दिसत नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा अव्या
आपल्या मुलाला या विषयामुळे मारतो तेव्हाच माझ्यासाठी तरी हा सिनेमा फ्लॉप
ठरतो.
कलाकारांच्या बाबती सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. अव्या, भाग्या,
चिउ, डॉली यांनी खरोखरच उत्तम एक्सप्रेशन्स दिलेत. विशूचं कॅरॅक्टर पण
जबरदस्त जमवून आणलयं. सई ताम्हणकरला सिनेमा क्षेत्रात नक्की काय करायचयं हे
तिचं तिला कळलं म्हणजे झालं. असो.
याच विषयावर हिंदीत "एक छोटीशी लव्ह स्टोरी" नावाचा सिनेमा
आला होता. तो धड चालला नाही. "द रिडर" सारख्या सिनेमात एक कोवळ्या मुलाचे
एका ३०-३५ वय असलेल्या बाईशी शारिरीक संबंधाचे चित्रिकरण होते. "मलेन" या
सिनेमात हा विषय नाही म्हणणार पण एका वयात येणार्या मुलाच्या मनातून शारिरीक आकर्षणाचा ठाव दिग्दर्शकाने घेतला होता.
बीपी या सिनेमाने काय दिलं? मी तर म्हणेन की सेक्स हा विषय चारचौघात चघळण्याची संधी. आपल्या किशोरवयातल्या त्या नुकत्याच उमलेल्या जाणिवा पडद्यावर कुटुंबासमवेत बघायची मोकळीक. पण या विषयावर आपल्या मुलांशी बोलण्याची हिम्मत, जबाबदारी, बिलकुल नाही. ती जबाबदारी दिग्दर्शक सेल फोन, इंटरनेट या माध्यमांवर सोपवून मोकळा होतो.
मी कुणी एखादा चित्रपट विश्लेषक नाही किंवा सिनेमातलं मला
फार अगाध ज्ञान आहे असं ही नाही. पण हॉलीवूडमधले किंवा वर्ल्ड सिनेमामधले
काही उत्त्म सिनेमे आणि टी.व्ही. सिरीज बघून माझा हिंदी आणि मराठी
चित्रपटांविषयीचा दृष्टीकोन बदलला आहे. आणि म्हणून जेव्हा सामान्य प्रेक्षक
ही एखाद्या सिनेमाविषयी खूप बोलू लागतात तेव्हा या सिनेमात कुठे तरी नक्की
गडबड आहे असं मला वाटु लागतं.
बीपी बघितलाय??? मग पुन्हा बघा ही गडबड ध्यानात येते का ती......
- दीपक परुळेकर
- दीपक परुळेकर
दीपक राव फारच छान पोस्ट आहे, वेळेअभावी मला अजून तरी बालक पालक बघायला नाहीन मिळाला, पण नक्की बघेन... रवी जाधव हे एकच कारण पुरेसे होतं मला, पण चित्रपट जास्तच मजेशीर दिसतोय... आणि काहीही म्हणा, रितेश चं त्याच्या मराठी चित्रपट प्रोडक्शनच्या निर्णयासाठी कौतुकच केलं पाहिजे.
ReplyDeleteपाहायचा आहे हा. तुझ्या सविस्तर आढाव्यावरुन साधारण कल्पना आलीये. :)
ReplyDeleteबाकी सईला नक्की काय करायचं आहे... याविषयी सहमत. :D
दीपक,
ReplyDeleteसर्व प्रथम उत्तम पोस्टबद्दल अभिनंदन.
तू म्हणतोयस त्या प्रमाणे सिनेमाची हाताळणी अर्धवट झालीये हे १००% मान्य. मी स्वतः जेव्हा हा सिनेमा थिएटर मध्ये बघितला तेव्हा, लोकांचा 'मार्मिक' प्रतिसाद बघून खरच डोकं भणभणत होतं. आपल्या इथे हा विषय नीट समजून घेण्याची मानसिकता अजूनही नाही हेच खरं. हा विषय एकतर केवळ मनोरंजन म्हणून किंवा मग अवाजवी उत्सुकता म्हणूनच बघितला जातो. सिनेमाचा शेवट अजून चांगल्या पद्धतीने करता आला असता हे माझं ठाम मत आहे. उदाहरणार्थ, अव्या मुलाला मारण्या ऐवजी जर त्याला जवळ बसवून त्याला पटेल असं, पण कुठेही अतिरंजितपणा न करता हा विषय उलगडू शकला असता. किंवा मग त्या चौकडीचा आणि आई-बाबांचा संवाद दाखवता आला असता.
विषय अर्धवट राहिला हे तर भ्रमनिरास करणारं आहे पण कुठेतरी हा विषय इतक्या ओपनली मांडण्याचं श्रेय या सिनेमाकडे नक्कीच जायला
हवं. इथे रवि जाधवच्या उत्तम दिग्दर्शनासाठी त्याचं अभिनंदनच. कदाचित व्यवसायिक गणितांमुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे थोडे अधिक स्वातंत्र्य त्याला घेता आले नसणार. पण सुरुवात होते आहे हे हि नसे थोडके.
श्रद्धा
मित्रा तुझं लिखाण मला नेहमीच आवडलंय पण पण प्रतीक्रियेने कधी व्यक्त केल नाही , म्हणजे मी जरा कंटाळाच केला ....पण ठीक आहे आहे त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो ..मला मनापासून निशिगंध , पैलतीर ह्या कादंबर्याचा उल्लेख करायला आवडेल...
ReplyDeleteपण , आजच्या तुझ्या ह्या विषयावर प्रतिक्रिया अवूर्जुन द्यायची इच्छा होत आहे ....
पहिल्यादा तर तुझ्या आकलानाची मी दाद देईन , खरच तुझ व्हिजन खूप छान आहे,,,
ये पण मनापासून सांगतो कि मला नाही वाटत कि दिग्दर्शक रवि जाधव यांचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय .
तू आवर्जून अव्या या व्यक्तिमत्वाच्या त्याने आपल्या मुलाच्या कानाखाली मारण्याच्या प्रसंगावरून तू संपूर्ण चित्रपट अपयशी ठरव्लास.
खर तर मला इथ तुला आवर्जून सांगावस वाटेल इथे दिग्दर्षानामाध्ये कोणतीच चूक रवि जाधव ह्यांनी केली नाही ...
माझ्या मते , दिग्दर्शकाला इथे असा दाखवायचं होत कि अव्य ह्या व्यक्तिमत्व त्याच्या आयुष्यात गुंग झालेला दाखवून हा विषय त्याच्यापुढे अकस्मात समोर आलेला दाखवलाय ज्याची त्याला कल्पनाही नव्हती , आणि ह्या प्रसंगी तो आपल्या मुलाच्या कानाखाली आवाज काढतो ....इथे दिग्दर्शक माणसाकडून होण्यार्या दुर्लक्षाची जाणीव करून देतो ....
पण , त्यानंतर अव्याला झालेली जाणीव हि तो भूतकाळात घटनांनी करवून देतो .
आणखी म्हणजे हे प्रसंग कश्या प्रकारे हाताळले पाहिजे हे आजोबांनी तिलेल्या मार्गदर्शनाच्या प्रसंगाने पूर्ण होत त्यामुळे तो अव्याच्या द्वारे करण्याची दिग्दर्शकाला गरज वाटली नसावी...... एव्हाना ती मला हि वाटली नाही ....पण ती अव्याच्या शेवटच्या डायलॉग ने पूर्ण होते....." मुलांना काय फक्त त्यांच काय हे दाखवण्या पेक्षा काय बरोबर आहे हे दाखवले पाहिजे "
तसेच अव्या आणि डॉली ह्याच्या जोडीने इथे आकर्षणाला हि दुजोरा दिला नाही .....
ह्यापेक्षा आधीक तुला काय सांगाव...अश्या प्रकारच्या संवेदनशील विषयावर बालक -पालक ह्यांच्या नात्यांना सागड घालणारा प्रयत्न मला खूप आवडला मला तर हि काळाची गरज आहे अस वाटल त्यासाठी मी रवि जाधवांचं मनापासून आभार मानेन आणि त्याच प्रभोधन माझ्यापर्यंत तर अचूक पोहचल अस मला वाटत .....
पोस्ट आवडली.
ReplyDeleteएखादा अशा प्रकारचा विषय घेताना त्या विषयाला पूर्ण न्याय देण्याची ताकद आपल्याकडे आहे का हे आत्म निरक्षण फार गरजेचे आहे. कारण हा विषय जर उत्तम रित्या हाताळता आला नाही तर चांगले परिणाम सोडून द्या त्याचे वाईट परिणाम अधिक होऊ शकतात.
म्हणजेच आजपर्यंत मुलं घाबरून ह्या गोष्टी मुलीनासमोर उघडउघड बोलत नसतील...तर आता तीही भीती वाटणार नाही.
सर्व मुलांची कामे अप्रतिम झाली आहेत हे नक्की. पण दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून बघितले तर तेव्हढी ताकद, हळूवारपण रवी जाधव दाखवू शकलेला नाही.
हा एक साफ चुकलेला प्रयत्न आहे असे माझे ठाम मत आहे.
प्रिय विजय,
ReplyDeleteप्रतिक्रियेकरता धन्यवाद. हो सिनेमा बाकीच्या बाबतीत खरोखर उत्तम आहे. तू नक्की बघच..
हे हे हे धन्स श्री ताई,.
ReplyDeleteसिनेमा तसा चांगलाच आहे अगं पण काय आता नोलन, क्युब्रिक वैगरे मंडळींचे सिनेमे पाहिल्यामुळे अशा सिनेमांकडुन जरा अपेक्षा वाढतातच ना.. :)
प्रिय श्रद्धा,
ReplyDeleteप्रतिक्रियेकरता खूप धन्यवाद. अगदी मनापासून कमेंट दिली आहेस.. सुरुवात नक्कीच चांगली झालीय पण हा ट्रेंड व्ह्यायला नको. उद्या उठसुठ मुलांना पुढे करुन हे सिनेमावाले कसले ही सिनेमे काढतिल आणि प्रबोधनाच्या नावाखाली खपवतिल. ते नको व्हायला. असं मला वाटतं.
प्रिय आनन,
ReplyDeleteसर्वात प्रथम माझं इतकं कौतुक केल्याबद्दल खूप आभारी आहे. फार बरं वाटलं इतकी स्तुती ऐकून :)
आता सिनेमाविषयी, तुझं आकलन ही बरोबर आहे. की अव्याअ नेहमीच्या व्यापात आणि आयुष्यात गुंग असताना अचानक मुलाच्या त्या पराक्रमाने विचलित होतो. पण किती वेळ?
चल आपण मान्य करु की पॉर्न डीव्हीडीज मुलाकडे सापडल्यामुळे फर्स्ट रिअॅक्शनने तो हात उगारतो. नंतर वैतागतो आणि बाहेर जातो. बायकोला ही त्याच्य फ्रस्ट्रेशनने सगळं सांगतो. यात किती वेळ गेला?
या इतक्या वेळात त्या पॉर्न डीव्हीडीज मुलाकडे बघून त्याला आपलं बालपण का आठवत नाही. कारण वयाच्या त्या नाजुक वळणावर त्याने ही ते सर्व केलेले असतं आणि ते ही खूप पुढे जाउन. इतका मोठा प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतो.
आपले आईवडील आपल्या प्रशांची उत्तरे देउ शकत नाही हे त्याला माहित असतं. मग त्याच्यासारख्या हुशार मुलाने आयुष्यात काय धडा घ्यायला हवा होता?? त्याच्या त्या रिअॅक्शन अम्धून मला तर असंच वाटलं की त्याने तीच जुनी पिढी पुढे चालवली आहे.
निदान डॉलीच्या चेहर्यावर ते सगळं दिसतं आणि तिला वाटं की आप्ण आपल्या मुलासाठी काही तरी करायला हवं. पण अव्याच्या चेहर्यावर तसं काहीच दिसत नाही.
चित्रपटाने प्रबोधन करायलाच हवं हा माझा हट्ट नाही. तुझं आकलन अगदी बरोबर आहे पण अव्याच्या आणि डॉलीच्या शेवटच्या प्रसंगातून जे तू उचललंस आणि जे तुला योग्य वाटलं तेच सगळ्यांना वाटलं असं नाही ना.
कारण बाकिचे लोक फक्त त्या मुलांच्या स्टोरीवर टाळ्या वाजवतात. हसतात, शिट्ट्या मारतात. कारण त्यांना जे हवयं ते दिग्दर्श्क त्यांना त्या मुलांच्या स्टोरीतुन दाखवतो. खरं सांगतो हा सिनेमा बघुनही आपल्या पालकांच्या मनात काही प्रकाश पडेल असं कधीच नाही होणार. प्रतिक्रियेकरता पुन्हा धन्यवाद.
असाच लोभ असावा.
दीप्स
अनघा,
ReplyDeleteअगदी बरोबर. फक्त मनोरंजनाच्या एका पातळीवर नेउन शेवटच्या दहा मिनिटात सिनेमा सपशेल आपटतो...
दीपक,
ReplyDeleteमित्र तुझ्या एका म्हणण्या बद्दल नक्कीच सहमत असेन कि माझ किव्वा तुझ मूव्ही बद्दलच जे आकलन आहे ते सर्वांचे असेल असं नाही आहे , कारण मला ही जी गोष्ट प्रकर्षाने थेटर मध्ये जाणवली , ज्या टर्निंग पॊइन्ट वर ( जेव्हा ती मुलं B P बघतात ) त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे बदल व विषयाचे गाभिर्य ह्या गोष्टी बर्याच लोकांच्या बुद्धीपालिकडच आहे असाच मला जाणवलं , कारण त्यानंतरचे प्रसंग हे मुळीच हात्स्यावारी घेणारे मुळीच नव्हते ...
पण , तो दिग्दर्शकाच अपयश आहे किव्वा त्या सिनेमाच अस मला मुळीच वाटल नाही मला तो लोकांचा अपयश वाटला ...
दुसरी गोष्ट तू जे आव्याच्या panic reaction बद्दलचा आणि वेळ गेल्याचा उल्लेख केलास त्याच्याबद्दल मला अस वाटलं , तिथे मी जे म्हणल्याप्रमाणे त्याच्या ह्या अश्या अनपेक्षितपणे अचानक आलेल्या प्रसंगावरून झालेलं दिग्दर्शकाला दाखवायचं होत अस मला वाटत; तसेच तो बाहेर येतो व डॉलीला झालेल्या प्रकाराबद्दल सांगतो त्यामुळे त्यागोष्टी आव्या आणि डॉली ह्यांच्या दोघांच्या हि आयुष्यात घडल्या होत्या हे रवि जाधव यांना दाखवायचं होत त्यामुळे तो प्रयत्न केला असावा . तसेच त्या panic स्वभावात तो आपल्या मुलाला मारतो त्याच्या अर्थ जुनी पुढी पुढे नेण्याचा होत नसून ह्या गोस्तीकादाच पालकाच दुर्लक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला अस मला वाटत . पण त्यानंतर झालेली जागरूकता तिथे दाखवली गेलेली आहे. हा तो प्रश्न आव्या आणि डोली ने कसा हाताळला हे त्यांनी दाखवला गेल नाही , पण त्याची मला गरज वाटली नाही कारण असा प्रश्न कसा सावरावा हे भूतकाळात दाखवला गेलेला आहे.......
त्यामुळे एवढ्या कारणामुळे सिनेमा आपटणे हे मला पटत नाही आहे ...
चित्रपटाने प्रभोदन करणे हा हट्ट कधीच नसावा पण चित्रपटातून नकळत काहीतरी पाभोदन व्हाव अशी अपेक्षा मी नक्कीच ठेवेन .....
प्रतिसादासाठी धन्यवाद !!
आनन म्हात्रे ...
मी सहसा मराठी सिनेमे पहात नाही परंतु या सिनेमाबद्दल खुप चर्चा ऎकली आणि म्हटलं बघुया तर खरं. पण या चित्रपटाने माझी बरयापैकी निराशा केली. चित्रपटाच्या एकुण कथानक बांधणी मध्ये नवीन असं काहीच नाहीये. दाखवण्यासारख्या बरयाच गोष्टी दाखवल्या किंवा निदान उल्लेखल्याही गेल्या नाहीत.
ReplyDelete१)जुनाच विषय आणि जुनीच उत्तरं :
चित्रपटाचं एकुण कन्क्ल्युजन मुळात आता खुपच जुनं झालंय. 'मुलांना कुतुहल असतं आणि मग ते शमवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करतात. पण जबाबदार मोठ्या व्यक्ती हा विषय टाळत रहातात आणि मग मुलं कुठल्या तरी दुसरया मित्राच्या अर्धवट द्न्यानावर आपली भुक भागवतात. हे बदललं पाहीजे वगैरे वगैरे' हे असे विचार मी माझ्या लहानपणापासुन ऎकत आलोय पण गाडी तिथेच आहे. कारण 'हे अमुक अमुक शिकवलं ,सांगितलं किंवा शैक्षणिक चित्रं दाखवली की झालं बाबा सेक्स एड्युकेशन!!' इथपर्यंत आपण कसेबसे पोहोचलोय आणि तेही म्हणण्यापर्यंतच. इतकं पुरेसं आहे? चित्रपटाच्या मते, इतकं पुरेसं आहे.
२)पुस्तकी की प्रत्यक्ष द्न्यान? :
बीपी आवडलेल्या कुणालाही सेक्स एड्युकेशन म्हणजे नक्की काय काय असावं आणि किती असावं असं एकदा विचारुन पहा. शेकडो वेगवेगळी उत्तरं मिळतील. माझ्या मते पुस्तकी शिक्षणाने काही विशेष फरक पडणार नाही. इतिहास आणि भाषेसारख्या केवळ बुद्धीशी संबंधित विषयाचं पुस्तकी शिक्षण आपण घेतो. सायकल कशी चालवावी? पाण्यात कसे पोहावे याची पुस्तकं आपण वाचतो का? मग सेक्सचं काय? यावरही उत्तर आहे. या विषयाची माही घेण्या किंवा देण्यापुर्वी याकडे बघण्याची मानसिकता आपण बदलली पाहीजे. आपलं शरीर,त्याच्या गरजा आणि त्यात दुसरयाची साथ, त्यामुळे आलेलं पुर्णत्व या गोष्टी आपण घाईघाईत उरकुन टाकायचा कार्यक्रम म्हणुन बघतो. सर्वांसमोर गळ्यात हात टाकणं, चुंबन घेणं, शरीराबद्दल खुलेपणाने बोलणं हे आपल्याला पटतं नाही. आणि अशा वातावरणात वाढलेल्या लहान मुलाची सुद्धा तशीच मानसिकता होऊन बसते.
ते सतत लपवलं गेल्यानेच त्याची उत्सुकता वाढते. प्रेम किंवा सेक्स या विषयांभोवती जे विनाकारण रहस्यमय धुकं आपण निर्माण करुन ठेवतो ना त्यानेच हा प्रश्न गंभीर होऊन बसतो. बीपी पटलेले किती पालक आपल्या मुलासोबत बसुन योनीच्या मनीच्या गुजगोष्टी पाहु शकतात?
ReplyDelete३) सेक्स स्टार्व्हेशन
आजचं वेगवान जग, कमी वेळ, कमी गुंतवणुक आणि जास्त नफा या विचारसरणीत आपण सेकस एद्युकेशन कुठे ठेवावं? म्हणजे उद्या एखाद्या १२-१३ वर्षाच्या मुलाला सेक्स एड्युकेशन देऊन झाल्यावर पुढे काय करायचं हा प्रश्न उरतोच. 'तर हे बघ बाळा, हे सगळ असं असं असतं. पण आता तु पुढची १५ वर्ष तरी याचा विचार करायचा नाहीयेस.' हे शक्य आहे? पुढे राहील? की संस्क्रुतीच्या मुखवट्याखाली आपण लिबरल जगु? जुन्या प्रश्नांची जुनीच उत्तर देत घेत nostalgic होऊ? think and decide. (recently watched the movie 'the sessions'. i was thinking to talk abt sex surrogates but we are far far away from that.)
मला मध्यंतरापूर्वीचा चित्रपट अजिबात आवडला नाही. उगाच विनोदी करण्याच्या प्रयत्नात तो फसला आहे. पण सेकंड हाफ किंवा खरं तर शेवटचा अर्धा तास विशेष आवडला.
ReplyDeleteआईवडिलांनी आपल्या मुलांशी बोलण्याची गरज, वेळेआधी आणि योग्य वयाच्या आधी अशा गोष्टी/पुस्तकं हातात पडली की बालमनातला निरागसपणा लोप पावतो आणि एक आदर्श व्यक्ती घडण्याची प्रक्रिया खुंटते. शेवटच्या प्रसंगात कदम काकांनी हेच समजावून सांगितलं आहे. प्रबोधन किंवा मेसेज म्हणजे अजून काय वेगळा असायला हवा हे मला माहित नाही परंतु माझ्या मते हा खूप मोठा मेसेज आहे.
आणि तू ज्या प्रसंगाला फसलेला प्रसंग म्हणतो आहेस तो माझ्या मते फसलेला नाही. उलट तो तसा मुद्दाम दाखवला आहे. अव्याच्या बालपणी त्याचे आई-वडील त्याच्याशी या विषयावर मोकळेपणी बोलले नाहीत त्यामुळे काही गोष्टी (त्याच्या बालपणी) चुकल्या. आणि अगदी तसाच प्रसंग त्याच्या मुलाच्या बाबतीत घडल्यावर त्याची प्रतिक्रियाही अगदी तशीच असते (मुलाला मारणे, ओरडणे वगैरे).. म्हणजे त्याच्या आईबाबांनी केलेली चूकच तो पुन्हा करतोय !! म्हणजे थोडक्यात 'भारतीय पालक' अजूनही सुधारलेला नाही.
मला फार ग्रेट वगैरे वाटला नाही चित्रपट.. किंबहुना अनेक प्रसंगात फसलेला आहे. उदाहरणार्थ जर आठवी नववीतल्या हुशार मुलांना (भाग्या) शेन खाणे या सर्रास वापरल्या जाणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ माहित नसेल तर खरंच अवघड आहे.
पण शेवटचा अर्धा तास मला खूप आवडला आणि त्यामुळे सुरुवातीचा फसलेला एक तास भरून निघाल्यासारखं मला तरी वाटलं.
" उलट तो तसा मुद्दाम दाखवला आहे. अव्याच्या बालपणी त्याचे आई-वडील त्याच्याशी या विषयावर मोकळेपणी बोलले नाहीत त्यामुळे काही गोष्टी (त्याच्या बालपणी) चुकल्या. आणि अगदी तसाच प्रसंग त्याच्या मुलाच्या बाबतीत घडल्यावर त्याची प्रतिक्रियाही अगदी तशीच असते (मुलाला मारणे, ओरडणे वगैरे).. म्हणजे त्याच्या आईबाबांनी केलेली चूकच तो पुन्हा करतोय !! म्हणजे थोडक्यात 'भारतीय पालक' अजूनही सुधारलेला नाही. "
ReplyDeleteहेरंब, हे तुझं बरोब्बर आहे! पण आपण नवीन सुधारणा दाखवाव्यात की त्या चूकाच पुन्हा पुन्हा दाखवाव्यात हे ही दिग्दर्शकाला कळायला हवं. 'भारतीय पालक' अजूनही जसा सुधारलेला नाही तसाच 'भारतीय प्रेक्षक' ही तितकासा प्रगल्भ नाहीय ना.
प्रत्येक गोष्ट तिला शेवटी तात्पर्य असतंच. मेसेज, संदेश नाही. पण तात्पर्य काय? तुम्ही पालक आहात मग मुलांशी असंच वागा. एक कदम काका सोडले तर अजुन कोणी त्या मुलांशी बोलत नाहीत; पण सगळीकडे असे कदम काका असतिल असं नाही.
असो. पसंद अपनी अपनी.. :)
@ हरवलेल्या जहाजाचा कप्तान
ReplyDeleteप्रतिक्रियेकरता धन्यवाद आणि उशिरा प्रत्युत्तरासाठी क्षमा असावी,
तुम्ही मांडलेला एकेक मुद्दा अगदी बरोबर आहे,.
फार आभारी आहे.
माझे मत काहीसे वेगळे आहे ते ब्लॉग वर दिले आहे.
ReplyDeleteमाझ्या दृष्टीने काहीतरी नवीन विषय घेऊन मराठीत चित्रपट बनतोय याचेच कौतुक आहे.
काही चुका झाल्या असतील तर त्या ठळकपणे मांडण्यापेक्षा त्यांच्या पप्रयत्नास दाद द्यायला हवी.
http://majhyamanatalekaahee.blogspot.in/2013/01/blog-post_19.html