Sunday, February 10, 2013

नावात काय आहे???? -----> ठेवलेलं नाव :)


"हाय शोना, काय करतेस?"
" काही नाही रे! काम, काम आणि काम सुरु आहे..."
"ओह्ह! कित्ती काम करते माझी छकुली. जेवलीस का वेळेवर?"
" नाही रे! जेवेन आता. तू जेवलास का?
"माझं जाउ दे ग राणी! मी जेवेन, पण तू ते काम बाजुला ठेव आणि जेउन घे बरं लवकर."
" हो! नक्की. आता जेवायलाच जाते."
"ह्म्म शहाणी माझी बबडी!"
"मग, किती वाजता निघणार ऑफिसमधून? संध्याकाळी भेटशील ना सोनुली!"
"हो! भेटुया. मी निघताना कॉल करते मग तू ये."
"ओके चिक्कू. पण नक्की भेट हां का, अ‍ॅम मिस्सिंग यू सो मच!
"ओके. मिस्सिंग यू टू चिक्कुड्या.. :)  ए, हॅल्लो! तुला एक विचारु का?"
"हो! विचार ना बब्बू, काय विचारायचयं??"
" When was the last time you called me with my real name?"
"What?"
"तू मला नेहमी, शोना, राणी, छकुली, चिक्कू, पेरु, बबडी, छबडी अशा नावाने हाक मारतोस. नाही! मला आवडत नाही असं नाही पण तुला माझं खरं नाव आठवतं तरी का?"
"म्हणजे काय? आणि तुला मी अशा नावानी हाक मारलेली आवडत नाही का?"
"तसं नाही अरे! पण तू मला माझं नाव घेउन हाक मारलीस की अजुन बरं वाटतं.."
'ओके. अगं लग्नानंतर मी तुला तुझ्या खर्‍या नावानेच हाक मारणार ना.घरात तर तुला बबडी, छ्बडी, चिक्कू, पेरु असं नाही ना हाक मारणार. मग लग्नानंतर तूच म्हणशील हल्ली ना तुझं प्रेमच नाही राहीलं माझ्यावर.लग्नाआधी कसा मला नेहमी राणी, शोना, छकुली, बाहुली म्हणायचा..."
" हे हे हे :)"
"हे हे हे ! चला आता जेउन घ्या वेळेवर. संध्याकाळी भेटुया. बाय, बाय शोनुली!
" तू सुधरणार नाहीस ! :) बाय. बाय. शोनुल्या..."

हा संवाद काल्पनिक आहे. नसला तरी काही फरक नाही पडत ;)  पण या संवादावरुन मी आठवू लागलो की खरंच मी नेहमी कुणाला ना कुणाला त्याच्या खर्‍या नावावरुन हाक मारतच नाही. वरील सांवादात नवीन असे काही नाही पण मला पटकन जाणवलं की माझे असे किती मित्र-मैत्रिणी, माझ्या आजुबाजूचे लोक, माझे नातेवाईक, यांची पण अशीच नाव असतिल का??? आणि एकेकाचं दुसरं नाव माझ्या मनःपटलावर उमटत गेलं आणि पुन्हा जुन्या आठवणीत हुंदडायला लागलो...
___________________________________________________________ 

आमच्या कोकणात ना सवयच आहे की कुणाचं नाव म्हणून कोण सरळ घेणारचं नाहीत. त्यात मालवण पट्ट्यात तर ही सवय नाही प्रथाच आहे. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या नावाचं एक दुसरंच नाव असतं. आणि ते नाव एखाद्या व्यक्तिला चिडवण्याकरता किंवा आपल्या उच्चारांच्या सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स बनवले जातात. 


सुरुवात माझ्या घरापासुनच. माझं सगळं बालपण गावीच गेलं. आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या कोकणात तर फक्त चिडवण्यासाठी म्हणूनच एकमेकांच्या नावाची वाट लावली जाते. पण त्या चिडवण्यात सुद्धा एक मायेचा ओलावा असतो. अगदी शहाळ्यातल्या मलईसारखा..
माझ्या आज्जीचं खरं नाव तारामती असलं तरी प्रेमाने सगळी तिला 'आवशी' अशीच हाक मारतात. गावातले जुने लोक तिला तिच्या स्थूलपणामुळे "जाडुली" अशी हाक मारतात. माझ्या आईचं माहेरचं नाव रजनी. पण सगळे तिला 'रज्जू', 'रज्ज्या', आणि भावंडात ती मोठी असल्याने तिला 'बायो' अशी हाक मारली जाते. माझ्या मामाने लहानपणी खेळता खेळता एकदा गोटी गिळली होती. खेळायच्या गोटीला आमच्याकडे 'गुट्टी' म्हणतात. म्हणून मग सगळे त्याला 'गुट्टी' म्हणुन चिडवायचे. मग तो सगळ्यांवर भडकायचा. आता ते आठवून मला सिंघम मधला ''ए गोट्या!" वाला सीन आठवतोय. त्यावेळी, वाड्यातली जी जुनी, जाणकार, आजोबा मंडळी होती त्यांचीही नावं अशीच होती.
तुकारामला हाक मारताना, "ए तुकल्या!"
लाडू नावाच्या व्यक्तिला हाक मारताना."ए लाडक्या!" 
सहदेवला, "ए सादल्या!"
काळूला, "ए काळग्या!"
अर्जुनला,"ए अर्ज्या!"
श्रीधरला, "ए शिरग्या!"
त्याचप्रमाणे साबाजीला "साबल्या", भदूला " भदग्या", फटूला " फडग्या" अशी नावांची प्रेममय वाट लावली जायची... 


आम्ही लहानगे पण यात कमी नव्हतो. मला लहानपणापासुनच सगळे "दिपू" म्हणून हाक मारायचे, पण जर मी कुणाची कळ काढली, कुणाला काही चिडवलं की त्याबदल्यात माझ्या नावाची "दिपड्या-फिपड्या", 'ढिपाळ' (म्हणजे मातीचं ढेकळ.) अशी वाट लावली जायची. अर्थात मी सुद्धा दुसर्‍यांच्या नावाची वाट लावण्यात किंवा त्यांना नवीन नावं देण्यात मागे नव्हतो.
आमच्या पोरांमध्ये असलेल्यांपैकी, ज्ञानेश्वरला "ज्ञानी" आणि जर त्याने कळ काढली तर त्याच्या तिर्थरुपांच्या नावावरुन "डमरु" चिडवण्यात येई. त्याच्या वडीलांचे नाव 'शंकर' होते.
दुसरा सतिश. हा आमच्यात जाडजुड होता.याला नेहमी 'सतल्या' अशी हाक मारली जायची आणि जर का कळीला आला तर त्याच्या वडलांच्या पोटाच्या घेरावरुन त्याला "पोटल्या", "पोटली बाबा की" असं चिडवलं जायचं.
किरणला "किरण्या" आणि त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळे "बटर" किंवा "शंभरचे गुलुप" ( १०० W चा बल्ब.)
प्रविणचा शॉर्टफॉर्म 'पम्या' असा होता पण तो 'पम्या' वरुन 'कोम्या' आणि कोम्यावरुन "कोंब्या" झाला. (कोंबा - कोंबडा )
पांडुरंगला पांडग्या,
रामदासला मात्र डाबू का चिडवाचे हे मला अजुन माहीत नाही पण त्याला डाबू म्हटलं की तो मारायलाच धावायचा.
समीरला "बच्ची" ( हा तोच "माझ्या शाळे"तला समीर ज्याचे दात पडले होते.)
संतोष ला त्याच्या तिरक्या डोळ्यांमुळे "तिरश्या".
सुनिलला सुनल्या. याच्या लहान भावाशी माझं कधीच पटायचं नाही. अतिशय गलिच्छ मुलगा! नेहमी तोंडात शिव्या असायच्या आणि म्हणूनच की याचे गाल, गालगुंडांमूळे नेहमी फुगलेले असायचे.
एकदा माझ्या कळीला आला आणि मी त्याला त्याच्या गालगुंडानी सुजलेल्या गालांकडे बघून "पाववाला" म्हणुन नाव ठेवलं. साल्याने मला घाल घाल शिव्या घातल्या पण त्यानंतर सगळे त्याला "पाववाला" म्हणूनच चिडवायचे. 
प्रशांतचे केस लहानपणापासुनच पांढरे होते. साहजिकच त्याला "ए म्हातार्‍या" असं म्हणायचे. 
तर अशी ही आमची टीम होती. आम्ही सगळे एकत्रच देवळात जमायचो, खेळायचो, मारामार्‍या करायचो, एकमेकांना चिडवायचो पण त्या सगळ्या दुसर्‍या नावांत एक वेगळीच दुनिया होती. लहानपणी एकमेकांची कळ काढल्यामुळे चिडवायचो पण आता असं एकमेकांना हाक मारली की अचानक ते जुने दिवस डोळ्यांसमोरुन तरळून जातात..

शाळेत जायला लागलो आणि मग अजुन नवे मित्र भेटत गेले. त्यांची नावे आणि त्यांना ठेवलेली नावे वाढत गेली.
नयन  - नयन्या, बाबलो
वासुदेव - वासू
अमोल - अमल्या, म्हातार्‍या,
शांताराम - आबा, शंतुल्या, ( हा गावच्या पोलीस पाटलाचा मुलगा. श्रीमंतीत वाढलेला. गोरा गोरापान नुसता. क्रिकेट खेळताना बॉलच्या मागे धावताना हळूहळू धावायचा. रन्स घेतानापणब जिथे सहज दोन मिळतिल तिथे एकच रन घ्यायचा. त्यामुळे वैतागुन् मी त्याला म्हणायचो, " आबा मेल्या तुझी पावलां काय "सितेची पावलां" आसत? मेल्या जोरात धाव मरे! ( सितेची पावलां - सितेची नाजुक पाउले.)
बाबाजी - लांबनाक्या, याचे नाक लांब होते पण आमच्या सामंत बाई नेहमी म्हणायच्या "मेल्या बाबाजी तुझा नाक काय सुंदर चाफेकळी सारखा आसा! जरा शिरा मार त्याच्यावर!"
योगेश - आजो
गुरुनाथ - गुरग्या
प्रशांत - विठोबा. ( काळा रंग )
राकेश - राकस
अशी मित्रांची दुसरी नावं होती. या नावांत एक मज्जा होती. त्यावेळी फक्त चिडवाचिडवीच होती. कुरघोड्या होत्या. पण यामध्ये एक आपुलकी होती जी आता जाणवतेय.
शाळा संपली आणि मुंबईला आलो. इथेही ज्या चाळीत राहायचो तिथे मोस्ट ऑफ कोकणातलेच होते त्यामुळे इथे ही काही नविन नावं ऐकायला मिळाली. ज्यांच्याकडे राहायला होतो ते माझ्या आईचे काका होते. त्यांचा मुलगा माझा मामा लागायचा पण वयात जास्त फरक नसल्याने मी त्याला त्याच्या प्रचलित नावाने "बन्या" म्हणून हाक मारायचो. त्याची आई त्याला लाडाने 'बाबू" आणि रागाने "भाड्या, भडव्या" म्हणायची. मग चाळीतली पोरं त्याला "ए भाड्या बाबू!" अशी हाक मारायचे. इथे मला एक नवीन मित्र मिळाला. याचं नाव अमर. हा गोविंदाच जबरद्स्त फॅन. त्याच्यामुळे मला पण गोविंदाच्या सिनेमाचा नाद लागला.( गोविंदावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिणार मी हां का. ) त्याला सगळे जण "भाई" म्हणायचे. मी अमरवरुन, अंबर केलं. अंबर वरुन अंबरनाथ केलं. 
मोकळ्या वेळेत तो, मी आणि पप्या म्हणुन एकजण होता. आम्ही तिघे व्हरांड्यात बसुन सगळ्यांची खेचाखेची करायचो. चाळीतल्या एका खोलीत १०-१२ भैय्या राहत होते. त्यातल्या एकाच नाव होतं 'मिठाईलाल.' त्यावेळी 'लगान' चे प्रोमोज टी.व्ही. वर लागायचे त्यात ते गाणं आहे," ओ मितवा, ओ मितवा तुझ को क्या डर हैं रे!" हे गाणं मी आणि भाई नेहमी गुणगुणायचो. एकदा आम्ही बाहेर बसलो होतो आणि काही केल्या ते गाणं आम्हाला आठवेना. अगदी ओठांवर होतं पण शब्दच आठवत नव्हते. आणि का आठवत नाही म्हणून आम्ही दोघे डेस्परेट झालो होतो. ते गाणं आठ्वायचा प्रयत्न करत होतो. 
इतक्यात कुणी तरी ओरडलं, "का हो मिठवा, का करी?"
बस्स्स! मिठवावरुन आम्हाला लगेच आठवलं, "अरे, ते ओ मितवा होतं." आणि आम्ही पोट धरुन हसायला लागलो.
मग नेहमी मिठाईलाल समोर आला की आम्हाला ते गाणं आठ्वायचं आणि आम्ही गायचो," ओ मिठवा, ओ मिठवा तुझ को क्या डर हैं रे !!! "
चाळीतल्या पोरांची नावं बंट्या, पप्या, बबल्या, मामा अशीच होती.  

बालपणी माझी शाळा पहिली, दुसरी आणि चवथी मुंबईत, घाटकोपरला झाली होती. त्यामुळे तिथे असताना काही मित्र जमले होते. दहावी संपवून मुंबईला आलो तेव्हा कधी कधी घाटकोपरला राहायला जायचो. आता घाटकोपरच्या मित्रांची नावं ही बदलली होती.
घाटकोपरला राहायचो तो एरिया 'जागृतिनगर" होता. ही एक झोपडपट्टीच होती पण सगळ्यांची घरं पक्की होती. अगदीच झोपड्या नव्हत्या.
आमच्या घरातल्यामध्ये माझा जो काका लागायचा त्याचं नाव होतं "बाबुराव"; पण हा अतिशय काळा होता म्हणून त्याला सगळे "ए लिक्या" अशी हाक मारयचे. त्यात क्रिकेट तर मस्तच खेळायचा. घाटकोपरच्या त्या एरियात क्रिकेटच्या मॅचेस असल्या की याचा नंबर पहिला असायचा आणि त्याच्या तूफान बॅटींगमुळे आणि काळ्या रंगामुळे काही काळ तो "लारा" म्हणून प्रसिद्ध होता.
माझा लहानपणी शाळेतला मित्र दिनेश आता 'दिन्याभाय' आणि 'च्याय' म्हणून प्रसिद्ध झाला होता.
याच्या छोट्या भावाने डॉक्टर डॉक्टर खेळताना कुणाला तरी खरे खुरे इंजेक्शन टोचले होते तेव्हा पासुन तो 'डॉक्टर' झाला होता.
माझा आतेभाउ सचिनला सगळेजण "बुआ" म्हणायचे. का ते माहीत नाही.
एकाचं नाव "वजडी" होतं. :D 
एक मुलगा, त्याचे मधले दात पडले होते म्हणुन त्याला सगळे "दाता" म्हणायचे.
एका मुलीला सगळेजण "ढेकूण" ही म्हणायचे,
मच्छींद्रला "मच्छ्या"
त्याचबरोबर भुलेस्वर, मदारी, बाप्पल, काळ्या, चिक्या, गोट्या अशी कितीतरी दुसरं नावं असलेले मित्र होते. आणि मला त्यांची खरी नावं ही आठवत नाहीत. त्यांना कधी त्यांच्या ख-या नावाने हाक मारलीच नाही.  

कॉलेजमध्ये असताना, आमच्या क्लासमधला एक मुलगा नेहमी कंप्युटर लॅबमध्ये चिकटलेला असायचा. त्याला सगळे "व्हायरस" / "किडा" म्हणायचे.
भरत पालशेतकर ला सगळे भरत पांडे म्हणायचे मी ही त्याला पांडे म्हणून हाक मारायचो. तो एकदा मला बोलला अरे माझं नाव पांडे नाही रे पालशेतकर आहे. 
एकाचं नाव होतं अजगर! तो वर्गात आला की सगळे जण "फुस्स्स! फुस्स्स! फुस्स!" असा फुत्कार सोडायचे. वर्गात प्रोफेसर असले तरीही.
गिरी ला 'चिरीमीरी' म्हणायचे आणि सगळ्यात वाट माझ्या नावाची लावली होती. मला सगळे दीपक - चिपक म्हणायचे.
आणि वर्गात चिडवण्याचा एक प्रकार होता.एकाने सुरु केलं की एकामागे एक सगळे बोलायचे. जसं चिपक... चिपक... चिपक... चिपक  असं वर्गात घुमायचं. आणि प्रोफेसर शिकवताना चीप वैगरे असा शब्द आला की त्या शब्दाला धरुन चीप्...चीपक ... चपक करायचे. मेल्याहुन मेल्यासारखं व्हायचं. पण नंतर काही वाटायचं नाही. फक्त टीपी आणि मज्जा. 
:D 

जॉबला लागल्यावर अजुन नवीन मित्र आणि त्यांची नवीन नावं. 

तेजसला आम्ही म्हणजे मी, प्रियांका आणि शितल 'बगळ्या' म्हणून हाक मारायचो. शितलच्या घरी पाळलेले कुत्रे होते. आणि स्विटी नावाची जी कुत्री होती तिच्यावर हिचा खूप जीव होता. शितलला कधी कॉल केला आणि जर ती घरी असली तर मागुन कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा. मग तिला आम्ही "भॉ भॉ!" नाव ठेवलं. 

हरप्रीत चंडोक नावाची एक पंजाबन आमची मॅनेजर होती. तिला आम्ही सगळे हरप्रीत बिनडोक म्हणायचो. :D 
बिचारीला काही कळायचं नाही. 

व्हीएसएनएल मध्ये असताना. मी, तेजस, अभिजीत, चंद्राहास, बालाजी, धोंडे, असे सगळे एकाच टीममध्ये होतो. आणि आमच्यात एक ४०-५० तला गृहस्थ होता. त्याची सगळेजण म्हाताऱ्या म्हणून टींगल उडवायचे.
अरे यार ! राम वैद्य हे एक अफलातून कॅरॅक्टर होते. मी जेव्हा Iqiara Telecom मध्ये होतो तेव्हा ओळख झाली. याला सिगरेट्चा खूप नाद होता. दर १५-२० मि. याला सिगरेट लागायची. त्याच्या तब्येतिकडे बघून वाटायचे की हा असाच सिगरेटचा धूर बनून स्वाहा होईल.
मी व्हीएसएनएल मध्ये त्याला घेउन आलो. याला एक वाईट सवय होती आपलं ते पुढे पुढे करायची. एक तर चष्मिस, त्यात एक डोळा थोडा तिरकस होता. डो़क्यावर थोडे बहूत केस होते. शरीर फक्त हाडांचा सापळा आणि हे सगळं असूनही नुसता फूकत राहायचा. एकदा आमच्या एका मॅनेजर ने त्याला सिगरेट फुकताना पाहिलं आणि तो म्हणाला," साले राम! सिगरेट तो ऐसे फूंक रहा हैं जैसे सिगार पी रहा हो!  स्टायल मारना बंद कर ! साले डाकू माणसिंग!" आणि बस्स तेव्हापासुन तो आमच्यासाठी 'डाकू माणसिंग' झाला.

Net4 India मध्ये असताना मी, समीर खान आणि तेजस अशी आमची गट्टी जमली होती. सगळ्यांची मस्करी उडवणे हा आमचा नेहमीचा उद्योग होता. आमच्या ऑफिसमध्ये देवजी नावाचा प्युन होता. तो नेहमी अस्पष्ट आणि अर्धचं बोलायचा. काय बोलायचा ते धड कळायचंच नाही. तेजस सांगायचा "अबे देवजी के अ‍ॅक्सेंटसे तो लगता है की ये अरेबिक बोल रहा हैं." 
त्यात एकदा एक नवीन मुलगी आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली. तिचं आड नाव होतं चांगे. हिचं नुकतंच लग्न झालं होतं. अगदी केबीसी टाईप होती. ( केबीसी - कमळा, बकुळा, चंपा. इती. पियू मॅडम ) तर ही जेव्हा जॉईन झाली तेव्हा नेहमीप्रमाणे एच.आर.कडुन सगळ्या एम्प्लॉइजना मेल गेलं. संध्याकाळी फावल्या वेळात समीर माझ्या डेस्कवर आला आणि मला विचारु लागला, "अबे यार ये चेंज कौन हैं?"  
मला काही कळलं नाही मी म्हटलं, " कौन चेंज?"
"अबे वो ही! कोई नयी जॉईन हु ई हैं ना 
शिला चेंज!"
"चेंज??? मी परत  ते मेल ओपन केलं आणि वाचु लागलो. आणि वाचता वाचता फुटलोच.
"अबे वो चेंज नही हैं वो चांगे हैं!
 
नंतर तिला आम्ही चेंज अशीच हाक मारायचो. चिडवायला तिला नेहमी विचारायचो, " अगं तुझ्याकडे १०० चे चेंज आहे का?" :D
चंगेजखान, चेंगराचेंगरी, चेक रिपब्लिक, चांगभलं अश्या कित्येक नावांनी तिला चिडवायचो.
 

अशी अजुन कित्ती तरी अनेक नावं, खर्‍या नावांपेक्षा वेगळी. कधी चिडवण्यासाठी, कधी सोयीनुसार शॉर्ट्फॉर्म्स तर कधी असंच प्रेम म्हणून..
माझी एक मैत्रीण मला पहिल्यांदा दिपू म्हणून हाक मारायची. तिला नंतर कळलं की मला सगळेच जण दिपू म्हणतात मग तिने 'दीप' म्हणायला सुरुवात केली. परत तिला कळलं की अजुन कुणीतरी मला दीप म्हणतं मग तिने एक वेगळचं नाव शोधून काढलं आणि माझं पुन्हा बारसं करुन त्या नावाने हाक मारते. 
मी विचारलं तू असं का करते?  तर बोलली तुला ज्या नावाने सगळे हाक मारतात त्या नावाने मी हाक मारणार नाही. "यू आर डीफरन्ट फॉर मी!" 
उगाच मला जरा भाव चढला. असो.  :) 
तर या नावांची ना एक वेगळीच गम्मत असते आपल्या आयुष्यात! खर्‍या नावापेक्षा या दुसर्‍या नावांच एक वलय सतत त्या व्यक्तीभोवती असतं. ते दुसरं नाव त्या व्यक्तिचं एकंदर कॅरॅक्टर डीफाईन करतं असं मला वाटतं. आणि मला अजुनही सवय आहे की माझ्या मित्र-मैत्रीणींना मी काही तरी एखादं वेगळं नाव ठेवतोच आणि हक्काने त्यांना तशी हाक मारतो. इंजिनिअरींगला माझ्यासोबत असलेला एक मित्र नंतर पोलीस खात्यात नोकरीला लागला. त्याला मी 'हवालदार' अशी हाक मारतो. फोनच्या डीरेक्टरीमध्ये ही त्याचं; त्याचंच असं नाही बहुतेक टोपण नावंच सेव्ह असतात.
सपा, साबा, योमु, सेनापती,सुझे, स्नेल अशी नावं माझ्या सेल फोनमध्ये दिसतील. :)

शेक्सपीयर ने म्हटलयं, "नावात काय आहे?"
खरंच नावात काही नाही. जे काही आहे ते सगळं या दुसर्‍या ठेवलेल्या नावात आहे. तेव्हा बघा आठवून तुमच्या भोवती, आजुबाजुला अशा वेगळ्या, विचित्र नावांची यादी सापडते का ते ...
आणि ती यादी सापडली की हळुहळू त्या एका एका नावाच्या आठ्वणी कशा मनात फेर धरुन नाचू लागतात त्या.. :) :) :) 


- दीप्स  

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. दिपक, सही! मस्त लिहीलेस. खरेच काही काही नावे कशी पडतात याचा अर्थ लागत नाहीच. प्रसंगामुळे पडलेल्या नावांचे बहुतेक असे होते. गंमत!

    आता मला पण एकेक जोकर आठवू लागलेत. :D :D

    ReplyDelete
  3. हाहाहा भारी एकदम.. आता आपल्यातच बघ ना किती नावं ठेवलेली आहेत :)

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete