Tuesday, November 30, 2010

नक्षत्राच्या चारोळ्या!

रात्री आकाश ओसंडुन
गेलं होतं तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी! 


गेले कित्येक रात्री मी तुला शोधतोय. काल रात्री तर सारं आकाश असंख्य तार्‍यानी भरुन गेलं होतं. मी हर्षोल्हासाने तुला शोधत फिरत होतो तर सगळेजण मला वेडा म्हणु लागले.माझं हे आकाशाचं वेड नवं नाही पण या शब्दांनी मला आजकाल वेडं केलयं. आणि शब्दही कसे तर अगदी वेचुन आणावे तसे. तुला शोभुन दिसतिल असे. तुझ्यासारखं नक्षत्र अशा सामान्य आकाशगंगेत सापडत नाही. तरीही मी तुला माझ्या आकाशात बोलावतोय.
रात्री सारं जग जेव्हा झोपी जातं तेव्हा मी हळुच फिरत फिरत समुद्रावर येतो. आता इथे कुणी मला वेडा नाही म्हणणार! गरम उबदार वाळुत स्वतःला झोकुन देतो. आता सारं आकाश फक्त माझं आणि नक्षत्रही! मी रात्रभर आकाश धुंडाळत असतो. या क्षितिजापासुन त्या क्षितिजापर्यंत सारे आकाश मी पालथे घालतो. रात्रभर सगळ्या तार्‍यांना त्या नक्षत्राबद्दल विचारत फिरतो..   
समुद्र शांतपणे हेलकावे देत डुलक्या काढतोय. दुरवर एक गलबत मिणमिणत कुठेतरी पाणी कापत जातेय. टेकडीवरल्या दीपगृहाचे फेरे ठराविक वेळेनुसार चोहोबाजुनी घिरट्या घालत आहेत. अशात मी त्या निराकार आभाळाकडे टक लावुन तुला शोधतोय.! 
तु दुरकुठेतरी लपलेली! कूठच्या तरी तार्‍यांच्या पुंजक्याआडुन माझी मजा बघणारी. पण मी तुला शोधल्याशिवाय राहणार नाही! 
काहीवेळाने ते नक्षत्र मला दिसतं! तेजस्वी, मोहक्,सुंदर! अश्या अनेक छोट्या तार्‍यानी बनलेलं. त्याचा आकारही सुबक! मी आनंदाने वेडा होतो आणि नक्षत्र मला बघुन गोडं लाजतं.त्या नक्षत्राचं लाजणंही तितकंच मनमोहक! त्याला बघुन मी आता बुचकाळ्यात पडलोय. अचंबित होउन मी मनाशीच खेळतोय! त्या नक्षत्राला कोणतं नाव देउ? त्याची तोड इतर नक्षत्रांना नाही! 

नक्षत्र असं की
ओंजळीत भरुन घ्यावं,
सुचत नाही मला आता
त्याला कोणतं नाव द्यावं!

 

माझी स्थिती अशी झालीए! तुला हसु येतयं ना? 
हस तु ! तुझ्या हसण्याने सारं आभाळ उजळून जाईल. नाहितरी माझ्या या सुन्या आभाळात काहिच नव्हतं! मी केव्हापासुन तुझी वाट बघत होतो..माझ्या आभाळाला तुझ्यासारख्या नक्षत्राने सजवायला मी अधीर होतो. 

आकाश असे सुने सुने
भासे मज जुने जुने
उजळले क्षणात सारे
नक्षत्र ते तुझ्या रुपाने...


तु तिथे काय करतेस? माझी हाक ऐकु येत नाही का तुला? 
माझ्या ह्रदयाची साद तुझ्या ह्रदयाला हेलावत नाही का? 
आता किती लपशील? तुला कदाचित ठावुक नसेल पण तु इतकी तेजस्वी आहे की आता तु कुठेही लपलीस, कोणत्याही ढगाआड, एखाद्या ग्रहाच्या छायेत किंवा तार्‍यांच्या पुंजक्यात तरी माझ्यापसुन लपणे तुला शक्य नाही. 
अगं वेडे! तुझ्या या तेजस्वी रुपाने सारं आभाळ उजळुन निघालयं आणि सारे ग्रह तारे फक्त तुलच बघताहेत. मग अशावेळी तु का लपुन राहतेस माझ्यापासुन? 
कस्तुरीमृगाला माहित नसंत की ह्रदयाला धुंद् करणारा सुगंधाचा कोष त्याच्या बेंबीत आहे आणि त्या सुगंधाने वेडावुन त्याला धुंडाळत ते रानभर धावत असते. तशीच काहिशी स्थिती तुझी झालीय!


आता सोड ते आकाश आणि
ये माझ्या जगात
तारे हि असेच तुटतात
तुला पाहुन वेगात...


तु लाजत लाजत येतेस आणि मी तुझ्या तेजस्वी रुपाने न्हाउन निघतो. माझं सारं आभाळ तुझ्या येण्याने उजळून निघते. आता त्या समोरच्या आभाळात उरलेत फक्त काही तारे आणि काही निस्तेज नक्षत्रे! तरीही मला त्या आभाळाचा मोह आवरत नाही. 
आपल्याकडे अजुन बराच वेळ आहे. सकाळ झाली नाही अजुन! आता रात्रभर आपण असेच पडुन राहु! एकमेकांसोबत काही गप्पा मारु. किती तरी दिवसांपासुनची एक आस होती तुझ्यासोबत समुद्राच्या किनार्‍यावर रात्रीच्यावेळी वाळूत पडुन तारे मोजण्याची. आज ती पुर्ण होतेय! आता मला त्या समोरच्या आभाळाची किव येतेय आणि स्वःतच्या आभाळाची गुर्मी! आज माझ्यावर कधी नव्हे ते शब्दही मेहेरबान झालेत आणि त्या शब्दांनी मी तुझ्या रुपाला सजविण्याचा प्रयत्न करतोय. 

आज रोखु नकोस तु मला,
होउन जाउ दे चिंब मला.
शब्दांचं असं वेड
लागत नाहे नेहमी मला!


हो हे वेडच म्हणावं लागेल. तुझ्या सहवासाने मला वेड लावलयं! वेडं ही कसं तर न सुटणारं आणि ते ही तुझ्या अस्तित्त्वचं. अस्तित्त्वाची वेडं फार कठीण असतात सखे! सुटता सुटत नाहीत! मनाचे हे पाश तुटता तुटत नाहीत. तरीही आज सारे पश तोडुन तु माझ्या आभाळात आलीस आणि मी त्याने सुखावून गेलोय.तुला कुठे ठेवु आणि कुठे नको असं मला झालयं. आजवर राखुन ठेवलेले सार्‍या शब्दांचं औक्षण मी तुझ्या पदरात ओततोय. ठावूक आहे मला की तुझ्या तेजस्वीतेपुढे हे शब्द निस्तेज आहेत पण माझ्याकडे या शब्दांव्यतिरिक्त तुला देण्यासारखं अजुन काही नाही. माझं प्रेम, माझी माया, माझं अस्तित्त्व, माझी काया हे सारं काही या शब्दांचचं देणं आहे. असं हे माझं शब्दांचं वेड कधी सुटणार कोण जाणे?


काही वेडं सुटता सुटत नाहीत
आवडेल तुला माझं शहाण्यासारखं
वागणं?
काही शब्द सुचता सुचत नाहीत
आवडेल तुला माझं मुक्यासारखं
बोलणं??? 


माझ्या या शब्दांवर तु गालातल्या गालात हसतेस आणि हलकेच मला स्पर्श करतेस. तुझा प्रत्येक स्पर्श मी जपुन ठेवलाय माझ्या मनात. मला आज डोळेभरुन तुला पाहायचयं. तुला माझ्या मनात भरुन घ्यायचयं! 
आता रात्रीचा प्रहर संपेल आणि पहाट होईल. मग तु निघुन जाशील. पुन्हा कुठल्यातरी आकाशगंगेत हरवशील आणि पुन्हा लपुन मला शोधताना पाहुन ह्सशील. तुला आवडतं का गं असं छळणं?
पण नको, तु अशीच रात्रीच येत जा. मी नेहमी तुला शोधत राहिन. आणि पुन्हा तुला माझ्या आभाळात घेउन येईन.
  
एक तु मैत्रीण माझी
सखी माझी सोबतिण माझी
तुझ्या पदरात माझे आभाळ
त्या आभाळाची तु चांदणी माझी!


9 comments:

  1. नक्षत्रांच वेड जरा जास्तच फोफावतयं...संभाळ रे बाबा स्वतःला...बाकी शब्दांची सांगड अप्रतिम...तोडलंस मर्दा...

    ReplyDelete
  2. भाऊ, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेमच असतं! :) चालू द्या! छान चाललंय! :)

    ReplyDelete
  3. सपा भाय बोले तो एकदम झक्कास !!

    ReplyDelete
  4. सारिका: जे फोफावत नाही ते वेड कसलं गं?? बस्स काही वेडे असे जगभर बडबड करत फिरतात आणि काही वेडे मुकपणे त्यांना बघत बसतात!! हे हे हे !! सही ना??

    ReplyDelete
  5. अनघा - आभार आभार !! चले चलो ! चले चलो !!

    ReplyDelete
  6. लग्न झालं की ओसरेल.. काळजी नसावी..
    स्वानुभवावरुन...

    ReplyDelete
  7. दीपक, आ का ने लिहीलेलं सध्या तरी नजरेआडच ठेव रे... आणि लगे रहो...
    सहीच लिहलंस रे....

    ReplyDelete
  8. श्री ताई नक्की गं!
    आकाचे अनुभव आनि माझे अनुभव नक्कीच वेगळे आहेत ! हे हे हे ! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

    ReplyDelete