"तो दिसतोय न? हं! तोच कोहोज किल्ला!
आणि ही समोरची पायवाट. इथुनच जायचयं आपल्याला. पुढे एक तलाव आहे. तलावाच्या काठानेच जायचयं. मॅप आहे माझ्याकडे. माझ्या अंदाजाप्रमाणे २-३ तास लागतिल वर जायला. आणि उतरायला २ तास पुरे. येउ आपण खाली ३-४ च्या दरम्यान.
आता किती वाजलेत? आयला! ११:३० वाजलेत. चला, चला लवकर चला."
आता किती वाजलेत? आयला! ११:३० वाजलेत. चला, चला लवकर चला."
असं म्हणुन
आम्ही कोहोज किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. पण सकाळी ११:३० वाजता, इतक्या
उशिरा ट्रेक सुरु करण्याचे कारण? त्यासाठी थोडं मागे जाउ. जास्त नाही ३-४
तास मागे जाउ.
त्याचं
झालं काय की ट्रेक ठरला. मेंबर्स पण ठरले आणि धुंडीराज सोडुन सगळे वेळेवर
पण आले. शनीवारी सकाळी ७ वाजता प्लाझा, दादरला भेटायचं ठरलं होतं,
त्याप्रमाणे मी पनवेलहुन, आनंद डोंबिवलीहुन, सचिन पवईहुन, राजिव काका
ठाण्याहून, अनघा दादरलाच राहते आणि धुंडीराजला वाटेत जोगेश्वरी हायवेवरुन
उचलायचे ठरले. आम्ही सगळे दादरला जमलो तेव्हा धुंडीला कॉल केला तेव्हा तो
उठला होता. त्याला सांगितलं १५-२० मि. पोचतो आम्ही. त्याप्रमाणे अनघाची नवी
कोरी स्कोडा घेउन आम्ही दादरहुन वेस्टर्न हायवेवर सुटलो. राजीव काका
ड्राईव्ह करत होते. त्यांना सांगितलं की पालघरला पोचल्यावर मनोर - वाडा
रोड आपल्याला पकडायचा आहे त्याच मार्गावर कोहोज किल्ल्याच्या पायथ्याचे गाव
वाघोटे आहे. पण माझंच काहीतरी चुकलं; पण त्याआधी आम्ही ७:३० जोगेश्वरी हायवेला
पोचलो तरी धुंडीराजचा पत्ता नव्हता. कॉल करुन करुन थकलो. येतो रे, आलोच,
असं सांगुन पठ्ठा ८ ला आला. झालं! त्यानंतर ट्रेकमध्ये पुढे जे काही झालं
ते सगळं धुंडीराज मुळेच झालं असं बोलुन बोलुन त्याला पिडलं.
तो आल्या आल्या राजीव काकांनी गाडी हायवेवर सुसाट सोडली. काका ड्राईव्ह करु लागले की आम्ही निर्धास्त होतो आणि आमच्या चकाट्यांना उत येतो. आम्हाला माहीत असतं की काका डेस्टीनेशनला आमच्या गप्पांमध्ये सामिल होउनही बरोब्बर वेळेत पोचवतात.पण यावेळी माझंच चुकलं. म्हणजे मी काकाना म्हणालो की मला रस्ता माहीत आहे. पालघरच्या आधी वाडाला जायला जो मनोर-वाडा एग्झिट आहे तोच घ्यायचा. एरव्ही काका चुकले नसते किंवा त्यानी आधी रोड मॅप पाहिला असता तरी ते चुकले नसते आणि चुकायचा प्रश्नच नव्ह्ता सरळ सरळ हायवे वरुन पालघरच्या आधी मनोर-वाडा फाटा गाठायचा होता. एक तर धुंडीराजमुळे आधीच उशिर झाला होता. :D
तर हायवेवर असतानाच ९ च्या सुमारास
पोटात कवळे ओरडु लागले. मग काका त्यांना माहित असलेल्या हायवेवर असलेल्या
महागड्या इडलीवाल्याच्या (कामताच्या) हाटेलात घेउन गेले. तिथे मस्त
फ्रेश वैगरे झालो आणि ब्रेकफास्ट करुन पुन्हा पालघरच्या दिशेने निघालो.
पुन्हा गाडी आणि आमच्या गप्पा सुसाट सुटल्या. बराच वेळ झाला तरी पालघर येत
नव्हते. मी आजुबाजुला साईनबोर्डस पाहत होतो, अचानक एक साईनबोर्ड वाचला
आणि मला धडकीच भरली. "डहाणु स्थानका कडे" " महालक्ष्मी मंदीर" हा बोर्ड
वाचल्यावर डोळेच फिरले. आम्ही गप्पांच्या नादात डहाणुला पोचलो होतो.
ताबडतोब मागे फिरण्यासाठी यु टर्न शोधु लागलो. तो पण २-३ कि.मी. वर
सापडला.(केजरीवालला कसा काय सापडतो लगेच काय माहीत) तिथुन काकांनी पुन्हा
गाडी दामटवली. लोकांना विचारत विचारत आम्ही मनोर-वाडा या रस्त्यावर आलो
तिथुन टोल भरुन वाघोटे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गाडी लावली.
११:०० वाजले. अजिबात वेळ न दवडता आम्ही गडाच्या दिशेने चालु लागलो आणि हा
सगळा उशिर एकट्या धुंडीराजमुळे झाला. :D
नकाशाप्रमाणे पहीली खूण म्हणजे दीलच्या आकाराचं तळं होतं.
ते शोधत शोधत आम्ही चालू लागलो
आणि ते सापडलं. पुन्हा चालत चालत दुसर्या खुणेपाशी म्हणजे पाझर तलावापाशी आलो
आणि तलावापाशी येताच हबकुनच गेलो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा प्रचंड,
शांत तलाव बघुन फार प्रसन्न वाटलं. पाउस नव्हता पण गारव्यामुळे वातातवरण
आल्हाददायक होते. काळे बाळे ढग मुक्तपणे विहार करत होते. मग आमच्या
फोटोग्राफीला उत आला आणि आम्ही तिथे जरा जास्तच रमलो.
घड्याळ्याकडे बघत काका चला चला म्हणुन मागे लागले तसे आम्ही
पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे शेतातुन चिखल तुडवत गडाच्या पायथ्याच्या
रानवाटेजवळ आलो. तिथुन माहीती असल्याप्रमाणे पायवाटेने वर चढायचे होते. रान
तुडवत, गप्पा हाकत आम्ही चालु लागलो. बराच वेळ झाला तरी वाट संपत नव्हती.
वाट चुकलो तर नाही ना असं वाटु लागलं. एकतर इथे कुठे मार्किंग्ज पण
नव्हत्या. आम्ही चालु लागलो आणि किमान तासभर चालल्यावर लक्ष्यात आलं की आपण
चुकलोय, कारण चढ कुठेच लागला नव्हता. किती तरी वेळ रानातच चालत होतो.
एका ठीकाणी वाटेला दोन फाटे फुटले होते. एक वाट उजवीकडे तर दुसरी वाट सरळ
जात होती. आता जायचं कुठे यावर आमची चर्चा सुरु झाली. एक वाजायला आला होता.
पाउस नसला तरी दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. ज्या ठीकाणी
वाटेला फाटे फुटले होते तिथुन उजव्या बाजुला गेलो तर तो मघासचा तलावाच्या
समोर असलेला कातळ दिसु लागला. ट्रेकक्षितिजच्या नकाशाप्रमाणे गडावर एक
मंदीर आहे, तर त्या कातळाच्या माथ्यावर मंदिरासारखी शेड दिसू लागली. म्हणून
धुंडी आणि आका वाट शोधायला गेले. आम्ही पुन्हा नकाशा नीट बघू लागलो.
काहीवेळाने ते दोघे परत आले, पुढे वाटच नव्हती. काही वेळ चर्चा करुन आम्ही
मागे फिरलो आणि समोरच्या सरळ वाटेने जायचे ठरवले. खूप उशीर झाला होता, वाट
समजत नव्हती, गडाची काही खूण दिसत नव्हती आणि घामाने निथळून गेलो होतो.
मघापासुन वाटत होतं की कुणीतरी वाटेत भेटाव शेतकरी किंवा गुराखी निदान
त्यांना वाट विचारता आली असती, पण कुणीच नव्हतं.हे सगळं काही धुंडीमुळेच झालं होतं. :D
महाचर्चा :D
त्या वाटेवरुन चालताना कुठे मार्किंग्ज आहेत का ते पाहत
होतो आणि अचानक कसला तरी आवाज ऐकू आला. मला वाटलं कुणी तरी ताटली वाजवत
येतं होतं. आम्ही सावध झालो. झाडा झुडुपातुन कुणीतरी येतं होतं आणि घंटेचा
आवाज. काहीच कळत नव्हतं. आम्ही सावधपणे चालू लागलो आणि समोरुन काही
बकर्या म्यँ म्यँ करत आल्या. बकर्या आलया म्हणजे कुणीतरी असणार असा विचार
करुन आम्ही पुढे चालु लागलो आणि अचानक उजवीकडुन एक आज्जीबाई समोर आल्या.
त्यांना बघुन थोडं हायसं वाटलं. त्यांना विचारलं गडावर जायची वाट कुठे? आणि
आज्जीबाईनी आम्हाला वाट दाखवली. ज्या वाटेवरुन आज्जीबाई आल्या होत्या तीच
वाट गडावर जात होती. पण ती पायवाट आम्हाला बिलकुल दिसलीच नसती आणि आम्ही
पुन्हा सरळ वाटेने चालत कुठच्या कुठे पोचलो असतो. आज्जीबाई अगदी
देवासारख्या त्या वाटेवर भेटल्या. आजीबाईंचे आभार मानुन आम्ही त्या
वाटेवरुन चालायला लागलो तेव्हा दीड वाजले होते .
आता थोडी हुशारी आली आणि काही वेळातच एका मोठ्या दगडापाशी आलो इथे मार्किंग होती. व्वा रे ! मार्किंग करणार्यांनो. मग
आम्ही आता त्या वाटेने चालु लागलो. आता खरा चढ सुरु झाला. मोठमोठ्या
दगडांमधुन वाट जात होती. पण आताही तेच इतका वेळ चाललो पण गड किंवा गडाची
एखादी खूण काहीच दिसत नव्हते. चालून चालून पायांची चाळण झाली होती. तरी
बाकीचे सगळे काटक आणि मी जड असल्याने मलाच उशीर होत होता. हॉल्ट घेत घेत मी
चालत होतो. अडीच वाजायला आले तरी गड दिसतच नव्हता आणि माझी सटकली. म्हटलं
मरु दे तो ट्रेक चला जाउया परत. पहिल्यांदाच मी एखाद्या ट्रेकला वैतागलो
होतो. इतकावेळ पायपीट करुनही गड दिसत नव्हता त्यामुळे अजुन सटकली होती.
एरव्ही एखाद्या ट्रेकला निदान गडाचा बुरुज, किंवा झेंडा किंवा अन्य काहीतरी
दिसत जेणेकरुन समजतं की आपण बरोबर चालतोय आणि काही वेळात तिथे पोहचू. पण
इथे चारी बाजुला फक्त माजलेलं रान आणि मोठाले दगड-धोंडे. मी वैतागलो.
म्हणालो मरु दे तो ट्रेक चला परतुया. पण बाकीचे म्हणाले नाही, पूर्ण करुया
त्यात अनघाही एकदम इरेला पेटली. मग पुन्हा एकदा आई भवानीचं नामस्मरण करत मी
चालायला सुरुवात केली. आणि हो! हे सगळं काही धुंडीमुळेच झालं. :D
आता पाउस सुरु झाला आणि गड पुर्ण धुक्यात गायब झाला.
काहीवेळाने चढुन एका मोकळ्या पठारावर आलो आणि धुक्याच्या पडद्याला छेदुन
गडावरली पहीली खूण म्हणजे मंदीर दिसलं आणि हायसं वाटलं. तिथल्याच एका
दगडावर बसलो. इतकावेळ तंगडतोड करुन शेवटी गडावर पोचलो तर. थोडं सटर फटर
खाउन घेतलं आणि आता गड फिरायची घाई होउ लागली कारण ३ वाजले होते आणि वर
यायला लागलेला वेळ लक्ष्यात घेता काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते आणि
पुन्हा वाट चुकलो तर मग काही विचारायलाच नको.
आम्ही रिमझिम पावसात धुक्यातून वाट काढत त्या मंदिरापाशी
येउन पोचलो आणि गड फिरायला सुरुवात केली. गडावर विशेष काही बघण्यासारखं
नाही. पण मला जे बघायचं होतं ते म्हणजे तो गडाच्या माथ्यावर असलेला
निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा
पुतळा. तो पुतळा म्हणजे निसर्गाचं एक आश्चर्यच आहे. कधी वाडा -
मनोर रस्त्यावरुन जात असाल तर उजवीकडे गडावर हा पुतळा दिसतो. रिओ मधल्या
ख्रिस्ताच्या पुतळ्यासारखा हा देखिल आपले बाहु पसरुन उभा आहे. पण वेळेअभावी
वर जाता आले नाही आणि पाउस ही सुरु झाला. तितक्यात त्या पुतळ्याच्या
वाटेवरुन एक ग्रुप खाली उतरताना दिसला. मग आम्ही तिथेच फोटोग्राफी करायला
सुरुवात केली.
काही वेळ भटकून ४ वाजताच काकानी परत फिरायचा इशारा दिला.
आता घाई घाई करुन आम्ही गड उतरायला लागलो. पण नेहमीचा अनुभव आहे एखादा गड
चढताना जितका वेळ लागतो तितकाच उतरताना देखिल लागतो. त्यात वाट निसरडी
असल्याने आमच्या लीड स्ट्रायकर अनघाने ४-५ गोल मारले. :ड कसे बसे त्या
रानातुन वाट काढत, शेतातला चिखल तुडवत एकदाचे पाझर तलावापाशी आलो तेव्हा
साडे पाच - सहा वाजले होते. तिथे पायातले बूट काढले आणि पाण्यात पाय
बुडवून बसुन राहिलो. पुन्हा आवरुन जायला निघालो आणि गाडीपाशी येउन वेस्टर्न
एक्सप्रेसवरुन वाटेत धुंडीराजला टाकून दादरला पोचलो तेव्हा सात - साडेसात वाजले होते. नाही
म्हणायला एक भन्नाट ट्रेक झाला होता. पहिल्यापासुन चुकलेली
वाट आणि त्यामुळे झालेली दमछाक, वैताग, पाउस. आणि हे सगळं कुणामुळे?? तर
धुंडीराजमुळे. :D :P
एकदा केल्यावर पुन्हा कधीही न करण्याच्या ट्रेक मध्ये राजमाची, माहुली बरोबर कोहोजगडाची एंट्री झाली..
काही इतर छायाचित्रे :
- दीपक परुळेकर