Monday, December 30, 2013

कोकणातलो धयकालो (जत्रा)

                   धयकालो म्हंजे सिंधुदुर्गातल्या लोकांचो जीव की परान. दिवाळी सोपली काय एका महिन्यात सिंधुदुर्गातल्या बर्‍याच गावांत ग्रामदेवतेची सालाबाद जत्रा असता आणि ह्या जत्रेची जी काय मजा असता ना गाववाल्यानु ती अशी सांगान नाय समजाची तुमका, काय कळला? त्यासाठी एकदा तरी सिंधुदुर्गातल्या गावात जावन ही जत्रा बघुक व्हयी. जत्रेत काय तर, मालवणी खाज्याच्या दुकानापासुन, भज्याची दुकाना, न्हान पोरां-टोरांसाठी खेळण्याची दुकाना, फुगेवाले, पेपारेवाले, सोरट्वाले, लोकांची गजबज, नटान थटान इलेली बालमानसा (स्त्रीया),आरड हुएल घालणारी पोरा, भज्यांचो सुटलेलो वास आणि कुडकुडणार्‍या थंडीत चादर घेउन रात्रभर बघूचो दशवताराचो खेळ! एक दोन दिस चलणारी ही जत्रा म्हंजे कोकणातल्या लोकांचो वार्षिक सण! बाकी कोकणात जितकी मजा चतुर्थीच्या सणाक तितकीच ह्या धयकाल्याक! 

काय? येतास जत्रेक? चला तर मग देखवतय तुमका आमच्या गावची जत्रा... 

              खरा सांगाचा तर आता जत्रेक पयल्यासारखी मजा नाय रवली.आता गावाक सगळ्यांकडे टीव्ही, मोबायल झाले. तेवा आताच्या पोरांकासुध्दा या जत्रेविषयी इतको इंट्रेस्ट नसता.जुने जाणते देवाचा काम समजान अजुन पर्यत आपले करतत. तर असो. जत्रेच्या दिवशी दुपारपासुनच देवळाच्या आजुबाजुक दुकाना लागाक सुरवात होतत.लाउडस्पिकरावर सकाळपासुन देवाची गाणी लागलेली असतत. देवळाक मस्त लायटींग केलेली असता. संध्याकाळ झाली की हळूहळू देवळाकडे लोका जमाक सुरु होतत.तर आम्ही सुद्धा जेवन खावन देवळाकडे जावच्या तयारीक लागलो. या दिवसात गावाकडे मरनाची थंडी असता तेव्हा अपली स्वेटर आणि शाल घेउन आम्ही देवळाकडे जावक भायर पडलो. आमच्या गावात दोन देवळा आसत. त्यामुळे लागोपाठ दोन दिवस जत्रा असता. पयली जत्रा श्री खाजणादेवीची आणि दुसरे दिस श्री भुमिकादेवीची. आम्ही देवळाकडे पोचलो. आधी सांगलय तशी देवळाकडे दुकाना लागली होती. पेट्रोमॅक्सच्या दिव्यात दुकाना झगमगान गेली होती. रात्रीच्या येळाक लायटींग केलेला देउळ मस्तच वाटत होता. 




                 पन पयल्यासारखी गर्दीच नाय. लोका आपली येत आणि देवीची ओटी भरुन, वायच हडे-थडे फिरान, चाय भजी खावन आणि खाजा, लाडु असा इकत घेवन घराकडे जात होती. आम्ही सुद्धा देवळात जावन देवीची ओटी भरली आणि जत्रेत फिराक सुरवात केली. फिरता फिरता माका माझ्या न्हानपणीची जत्रा आठवत होती. माझा न्हानपण गावात गेल्यामुळे माका या जत्रेचा लय याड. न्हान असताना जत्रेच्या दिवशी आम्ही सगळी पोरा खूप मजा करुचो. त्यादिवशी नवीन कपडे घालुन आम्ही जत्रेक जावन वायच आकडाक गावता म्हणुन मिरवायचो. वगीच खेळण्याच्या दुकानावर गर्दी करुचो. घरातल्यानी दिलेल्या पैशांचो एखादो फुगो, ट्रक, गाडी, पिरलुक (शिट्टी),पेपारी (पिपाणी) घेवन वाजवत फिरायचो. पन सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही सगळेजण जमून असलेल्या पैशांतून खेळण्याच्या दुकानातुन ३-४ रबरी लाल बॉल घ्यायचो. आमका क्रिकेट खेळाक कधी धड बॉल नसायचे आणि वेंगुर्ल्याक जावन आमका बॉल आणुन देणारे कोन नाय होते. मग जत्रेक आम्ही पैशे जमवुन बॉल घ्यायचो आणि मग १-२ महिने आमका खेळाक गावायचा.

     मगे कोणीतरी येवन आमका चाय भजी खावक घेवन जायत. जत्रेत गावणार्‍या भज्यांचो स्वाद कधीच खयच्या भज्यांका येवचो नाय. आजुन ती चव जिभेर रेन्गाळली काय तोंडाक पानी सुटता. तर मग आम्ही हडे-थडे फिरान, शाळेतल्या मुलींसमोर ( ती सुद्धा नवीन कपडे घालुन आकडान दाखयत ) व्हायच शायनींग मारुन आम्ही दशावताराचो खेळ बघुनक देवळात जावन बसायचो, तेवा खुप दमाक झालेला असायचा आणि दशावतारी देवीची पालखी निघाल्यावर म्हण्जे बारा - एक वाजता खेळ करुन उभे रवत, तवसर आमची मध्यान रात झालेली असायची. त्यामुळे माका ह्या दशावतारी नाटक कधी पूर्णपणे बघुकच गावला नाय. पण या वेळी बर्‍याच वर्सानी माका जत्रेक येवक गावला होता आणि माका दशावताराचो खेळ बघुचोच होतो. तर जत्रेत फिरान झाल्यावर घरातल्यानी खाजा-बिजा घेतल्यानी आणि चाय भजी खावन झाली तवसर ११ वाजले. मगे मामा-मामी, माझी आई आणि बहिण घराकडे गेली मी आणि सचिन देवळाकडे रव्हलो. सचिन खास जत्रा बघुक माझ्याबरोबर माझ्या गावाक इलो होतो.

               दशावतारी उभे रवाक अजुन खूप येळ बाकी होतो. अजुन देवीची पालखी सुद्धा निघाक नाय होती. तवसर मी कोन जुने मित्र दिसतत काय म्हणुन बघत फिरत होतयं. काही वेळान देवीची पालखी निघाली. पालखी देवळाभोवती फिरवन झाली, देवीची आरती आणि गार्‍हाणी घालून झाली हुनासर बारा वाजत इले. आता लोका देवळात जमाक सुरुवात झाली कारण दशावतार सुरु होनार होतो. ह्या नाटक करुक दशावतारांची पार्टी बोलवली जाता. आमच्या देवळात सालाबादप्रमाणे चेन्दवणकरांची पार्टी येता. तशी सिंधुदुर्गात नउ दशावतार पार्टी आसत. पार्सेकर, वालावलकर, चेन्दवणकर, नाईक-मोचेमाडकर वैगरे.दशावताराचा नाटक ह्या देवळातच केला जाता. थोड्याशा जागेत एक बाकडो टाकतत. ह्योच तेंच स्टेज आणि ह्याच त्यांचा सिंवासन. दशावतार्‍यांका रंगाच्यासाठी ( मेक अप) एक खोली असता. तिथुनच ते रंगांन येतत आणि आपलो प्रवेश सादर करतत. ह्येंका स्वतःचो मेकअप स्वत:च करुचो लागता. 



            



          
             नाटकाक संगित म्हणजे एक पेटीवालो, पखवाजवालो, आणि एक झांजवालो इतकेच. ह्या संगित आणि ही कला वर्षानुवर्षे कोकणातल्या लोकांची आवडती कला आसा. तर पयलो प्रवेश असता गणपती आणि रिद्धी सिद्धीचो. पखवाजलो गायन सुरु करता आणि गणपती रिद्धी सिद्धीवांगडा प्रवेश घेवन येता आणि तेंचो नाच सुरु होता.

पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
पतीया तुझे नाम स्मरणे हो गण
गणपतीया तुझे नाम हे जित्मां ता थया था..... 


           नाच सोपल्यावर मग एक भटजी येता आणि गणपतीची पुजा करुक सुरुवात करता. खरा तर ह्यो भटजी पुजा करताना मालवणी भाषेत लय कॉमेडी करता पन लोकांच्या गोंगाटात काय धड आयकाक येना नाय. यावेळी भटजी आणि नाईक ( सुत्रधार पखवाजवाला) हेंचो संवाद रंगता. कित्येक वर्सा झाली हे संवाद आजुन बदलाक नाय पण त्यावेळी ते मजेशीर वाटतत. भटजी सांगता, नाईक, गणपतीची पुजा करायची आहे पण साहित्य नाही. साहित्य नाही तर मग चालीवर घ्या. मगे भटजी गणपतीक न्हावक घालताना बुडुबुडू चुळूचुळू असो आवाज काढुन न्हावक घालता. पूजाअर्चा झाली आता नैवेद्य?? तो पन समजून घेवा असा सांगान येळ मारुन न्हेता. मगे भटजी गनपतीची आरती गावक सुरुवात करता. मालवणीतील हे आरती लय कॉमेडी वाटता, बघा तुमका समाजता काय ती..

हेची आवस खिलोरी,बापूस खट्याळो I
काय नाय हेका, भाव शेंड्याळो II
फडफड्या कानाचो, एक दिसता सुळो I
खाजीच्या कामास भारी हुळहुळो II
थयथय थयथय नाचता,
पोरगो शिवल्याचो I
बसाक दिलो ह्येका राजा उंदराचो II
जयदेवा जयदेवा जय कानसुर देवा I
भक्तिभावान करतय मी तुझी सेवा II
चार हात एक स्वांड, आठ तुझे बायलो I
तुया दिसतयं बरो,
पण वायट तुझो खायलो II

                त्यांनर, देवासमोर फुगडी घालतत, उन्दराची आरती होता आणि मगे पुन्हा नाचान गणपती, रिद्धी सिद्धी आणि भट्जी एझ्जिट मारतत. त्यांनतर पखवाजवालो पुन्हा गळो फाडुन सरस्वतीचा स्मरण करता आणि मोरावर बसुन सरस्वती येता. ती मोरावर बसान कशी येता ह्या तुमका ह्या फोटुत दिसता ना? तर सरस्वती येता आणि नाचान परत जाता. 



   दशावतारात अजुनसुध्दा स्त्रीपात्र पुरुषच करतत. रिद्धी सिद्धी आणि सरस्वतीचा काम करणारो नट एकच असता. त्यांचा काम संपला काय मग ते एक थाळी (आरती) घेउन जत्रेत लोकांकडुन पैसे जमा करुक फिरतत. त्येंका "बिलीमारो" म्हणतत. या बिलिमारो या शब्दाचो अर्थ नेमको काय तो मात्र माका ठावक नाय. पण गावांत एखाद्या चेडमानूस किंवा एखादो पोर उगाच तोंडाक पावडर फासुन आणि मेक अप करुन शयनिंग मारत फिराक लागले काय लोक त्यांका बिलिमारो म्हणून चिडवतत. 


         त्याच्यानंतर शंखासुराचो प्रवेश असता. गणपती, भटजी, सरस्वति आणि शंखासूर हे प्रवेश ठरलेले असतत. आणि प्रत्येक नाटकात सगळा सेमच असता. शंखासुराचो प्रवेश मजेशीर असता. दैत्याचो गेटअप करुन शंखासुर आरडत येता. संकासुराचे कपडे काळे असतत. तोंडावर काळी टोपी कशी असता. डोळ्यांच्या जागी दोन भोका पाडलेली असतत तेका दिसाक व्हया म्हणुन नायतर खयतरी आपटान पडात. लाल रंगाची जीभ भायर लोंबत असता. असो तो दैत्य आरडत प्रवेश घेता. आता संकासुर आणि नाईक यांच्यात संवाद रंगता. बाकड्यावर ब्रम्हदेव समाधी लावन बसलेलो असता. संकासुर शंकराचो भक्त असल्याने पहिल्यांदा न्हावन घेता आणि शंकराची पुजा करता. संकासुर बाकड्यार बसलेल्या ब्रम्हदेवाची मालवणी भाषेत टिंगल करता आणि त्याचे वेद चोरुन घेवन जाता. मगे विष्णू येता. ब्रम्हदेव तेका सन्कासुरान वेद चोरुन नेल्याचा सांगता. विष्णु ब्रम्हदेवाक सांगता काळजी करु नको, नी ते वेद घेवन येतो आणि सगळ्यांची एग्झिट होता. पुन्हा पखवाजवालो आराडता आणि संकासुर तलवार घेवन येता. तेव्हाच विष्णू पण थयसर येता. त्यांच्यात लडाई होता आणि विष्णू संकासुराचो वध करता आणि शंखाशिवाय विष्णुची पुजा अपूर्ण राहिल असो वर तेका देवन जाता. खरा तर संकासुर आणि विष्णुची लडाई लय मजेशीर असता पण अशी सांगान नाय समजाची ती. असो.










            आता खर्‍या दशावतारी नाटकाक सुरुवात व्होवची असता. संकासुराच्या प्रवेशानंतर पेटीवालो येता. पेटईवर सुर धरता आणि पखवाजवाल्याच्या तालावर झांजवालो वाजवक सुरुवात करता. पेटीवालो गायन सुरु करता आणि त्याच्या गायनावर पयलो राजा प्रवेश करता. द्शावतारी नाटक ह्या सगळा लिहीलेला नसता. पुराणातली एखादी कथा घेवुन त्याच्यावर ह्या नाटक सादर केला जाता. सगळे संवाद आपसुक, सीनप्रमाणे असतत. तर पयलो राजा येता आणि त्याच्या भाषणातुन त्याच्या राज्याची, दरबाराची दृश्या लोकांसमोर सादर करता. तेंचे हे स्वगत असलेले संवाद खूप भारी असतत. 



              प्रत्येक नाटकात नारदमुनीची भुमिका ही असताच. नारायण SSS नारायण SSSअसो आरडत नारद येता आणि कळी लावन जाता. राजा, राणी, त्यांची कन्या, नारद, दरोडेखोर, क्रिष्णा, शंकर वैगरे असली पात्रा कॉमन असतत. दरोडेखोराच्या तावडीतुन दुसर्‍या देशाचो राजा जो शिकारीसाठी इलेलो असता तो राजकन्येक सोडवता आणि मग त्यांच्यात प्रेम वैगरे होता. खरा सांगायचा तर माका सगळ्यात आवडता ती या नाटकातली लडाई. ही लडाई साधी सुधी नसता. लडाईच्या आधी राजा किंवा दैत्य ज्यांच्यात लडाई व्होवची असता त्यांच्यातलो एकजण गायन करता. गायन करता करता जो नाच असता तो बघुक माका भारी मज्जा येता. पखवाजच्या ठेक्यावर दोघेजण मस्त तालात नाचतात आणि मग लडाई सुरु होता. ( खाली दिलेला लढाईपूर्वीचा नाचाचा व्हिडीयो बघा ) 



 या लढाईत दैत्य मारलो जाता. रात्री एक दिड वाजता सुरु झालेला ह्या नाटक सकाळन्याक पाच-सहाच्या दरम्यान संपता आणि लोका आपआपल्या घराकडे जावक निघतत. 




















          आम्ही जे नाटक पाहिलं त्याचं कथानक थोडक्यात सांगतो. असुर राजा सुरेंद्र हा पहिला राजा म्हणुन प्रवेश करतो आणि स्वगतामध्ये राज्याविषयी, प्रजेविषयी आणि देवानी पुन्हा कसं फसवलं याचे वर्णन करुन काळजी व्यक्त करतो. हे सगळे स्वगत पाठांतर नसतं. जे सुचेल ते तो कथन करतो. राजा सुरेंद्रला देवांचा राग असतो.इतक्यात त्याची एकुलती एक राजकन्या येते. हे स्त्रीपात्र पुरुषच सादर करतो. ती राजकन्या एक स्तुतिस्तवन गाउन राजाला खुश करते आणि वनविहारासाठी जायची परवानगी मागते. राजा ती नाकारतो कारण त्याल तिची कळजी असते. तरीही राजकन्या आपल्या चंदा, मंदा, कुंदा या मैत्रीणींसोबत जात असल्याचे सांगुन कशीबशी परवानगी मिळवते. त्यानंतर पृथ्वीवरल्या उज्जेन नरेश श्रीकांतचा प्रवेश होतो. तो ही स्वगतामध्ये बरंच काही सांगतो. एखादं गायन करतो. इतक्यात त्याच्या दरबारात एक ब्राम्हण येतो आणि राजा श्रीकांतला सांगतो की जंगलात एका दरोडेखोराचा उत्पात माजला आहे. त्याने मला लुटलं, आणि मरेपर्यंत मारलं. तु त्याच्या बंदोबस्त कर. राजा श्रीकांत ताबडतोब निघतो. इकडे राजकन्या वनविहारासाठीए आलेली असताना कूठेतरी चुकते आणि त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडते, तितक्यात राजा श्रीकान्त तेथे येतो आणि दरोडेखोराला युद्धासाठी आवाहन करतो. त्यांच्यात लढाई होते. दरोडेखोर मरतो आणि राजकन्या राजा श्रीकांतच्या प्रेमात पडते. पण राजा श्रीकांत उगाच भाव खातो आणि राजकन्येला लटकवत राहतो. तो तिला सांगतो, एकवेळ मी पाण्याने बहरलेल्या तलावात पडेन पण प्रेमात पडणार नाही; कारण पाण्यात पडल्यावर पोहुन बाहेर पडता येईल पण प्रेमात पडल्यावर बुडायलाच होणार. ( मला हा डायलॉग जाम अवडला ) पण नन्तर राजकन्या त्याला गाणे गाउन प्रपोझ करते आणि तो मान्य करतो. मग राजकन्या त्याला घेउन तिच्या राज्यात राजा सुरेंद्राला भेटवण्यास घेउन येते. ती राजाला सगळा प्रकार सांगते आणि राजा श्रीकांतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते. राजा सुरेंद्रपण तयार होतो पण त्याची एक अट असते की राजा श्रीकांतने ल्क्ष्मीमातेची भक्ति करणे सोडुन द्यावे. पण रजा श्रीकांत ही अट मानायला तयार होत नाही. राजा सुरेंद्र दोघांना खूप मारतो अणि तीन दिवसांची मुदत देउन तुरुंगात बंद करतो. तिकडे नारद जाउन लक्ष्मी मातेला सांगतो की तिचा भक्त राजा श्रीकांतवर कसं संकट आलयं ते. मग लक्ष्मी माता त्याच्या रक्षणार्थ धाउन येते. राजा सुरेंद्रचा वध करुन श्रीकांत आणि राजकन्येला मंगल आशिर्वाद देते आणि नाटक संपतं...








Thursday, December 26, 2013

कोंकणसफारी - रेडीचा यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला आणि हरवलेली वाट

          आजचा पल्ला जास्त दूर नव्हता. रेडीचा यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला आणि सावंतवाडी असं फिरुन यायचं होतं. संध्याकाळी जत्रा आणि दशावतार पण बघायचं होतं त्यामुळे लवकर फिरुन येउन थोडा आराम करायचा असं ठरवलं. त्यामुळे आज थोडं उशिराच निघालो. पुन्हा ती बाईक रेंटवर घेतली.आमच्या गावतुन मातोंड या गावच्या रस्त्याने वर कापावर आलो. इथुन आसोलीमार्गे आरवली, शिरोडा, रेडी असं जायचं होतं. सड्यावर पोचलो तेव्हा मस्त उन पडलं होतं. लहानपणी, मे ची सुट्टी पडली की या सड्यावर वाडीतली आम्ही सगळी पोरं फिरायला यायचो. काजु, आंबे, फणस, करवंद यांची चंगळ असायची. कधी कधी आमच्या क्रिकेटच्या मॅचेस पण व्ह्यायच्या. या विस्तृत पसरलेल्या सड्यावर क्रिकेट खेळायला फार मज्जा यायची. खूप धम्माल दिवस होते ते.
         सड्यावरुन आसोली - टांकमार्गे आम्ही वेंगुर्ला - शिरोडा रस्त्यावर आलो. इथुन पुढे आरवलीचं प्रसिद्ध देवस्थान श्री वेतोबाच्या दर्शानासाठी गेलो. वेंगुर्ल्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांपैकी आरवलीचा वेतोबा हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार झालाय. मंदिर अतिशय सुंदर आहे. तसेच आरवलीचा समुद्रकिनाराही अतिशय सुंदर आहे. इथुन पुढे शिरोड्याच्या बाजारातुन वाट काढत काढत आम्ही हुड्यावर येउन पोचलो. इथुन उजवीकडला रस्ता रेडी-तेरेखोलकडे जातो तर डावीकडला रस्ता आरोंदा,सावंतवाडीकडे जातो. आम्ही रेडीच्या रस्त्याला लागलो. पहिल्यांदा रेडीचा प्रसिद्ध गणपती पाहायचा होता. रेडी गाव मँगनिझ आणि इतर खनिज द्रव्यांच्या मुबलकतेमुळे ९० च्या दशकात झोतात आले होते. इथे बर्‍याच मोठ्या प्रमाणात मायनिंग झाले आहे. अजुनही डंपर - ट्रक्स यांची ये जा सुरु असते. 
रेडीचं गणपती मंदिर समुद्राच्या किनारीच आहे. मायनिंगमुळे तिथपर्यन्तचा रस्ता फक्त डंपर आणि ट्रक्सच्याच योग्यतेचा आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरु आहे. मंदिरातली द्विभुज गणेश मुर्ती खूप संदर आहे. 


             गणेशाचे दर्शन घेउन आम्ही यशवंतगडाकडे निघालो. गावतल्या विठोबाच्या मंदिराच्या मागुन रस्ता किल्ल्यापर्यंत आणि  किनार्‍यापर्यंत जातो. काहीवेळातच रस्त्यावरुन किल्ल्याची तटबंदी दिसु लागली. किल्ल्यापाशी येउन बाईक लावली आणि किल्ल्यात प्रवेश केला. 

यशवंतगड नकाशा :- साभार http://trekshitiz.com/trekshitiz/index.asp

        नकाशात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत. मुख्य दरवाज्याकडला बुरुज अजुन शाबूत आहे. प्रत्येक दरवाज्याची कमानही अजुन शाबूत आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या दरवाज्याच्या मध्ये एक खंदक आहे. अंदाजे २० फूट खोलीचा हा खंदक संपूर्ण किल्ल्याभोवती आहे. तिसर्‍या आणि चौथ्या दरवाज्याच्या बाजुला एक चोर दरवाजाही आहे. चवथ्या आणि पाचव्या दरवाज्याच्यामध्ये पहारेकर्‍यांसाठीच्या देवड्या आहेत. पाचवा दरवाजा भव्य आहे. आणि जुन्या वास्तुंची साक्ष देत उभा आहे. किल्ल्यात बरीच झाडी माजली आहे. नकाशात दाखवलेल्या वाटेप्रमाणे आम्ही वाड्याच्या दिशेने निघालो. वाड्यात प्रवेश करायला छोटे कमानदार दरवाजे आहेत. एका मागुन एक असे तीन दरवाजे आपल्याला दालनात घेउन येतात. हा वाडा थोडा भुलभुलैय्या टाईप आहे. वाड्याची बरीच पडझड झालेली आहे. भिंती तितक्या शाबुत आहेत. इथुन पुढच्या वाटेने आम्हाला पायर्‍या शोधुन तटबंदिवर चढायचे होते. बरीच शोधाशोध करुनही पायर्‍या सापडत नव्ह्त्या कारण किल्ल्यात बरीच झाडी माजलेली आहे. खूप वेळ इकडे तिकडे फिरुन मी जरा उत्तरेच्या बाजुने मोकळ्या जागेवर गेलो असता तटबंदीला लागून असलेल्या छोट्या पायर्‍या दिसल्या. इथुन एका बुरुजावरुन समोर निळशार अरबी समुद्र आणि रेडीच्या खाडीचे सुन्दर चित्र दिसत होते. मग त्या तटबंदीवरुन चालत चालत आम्ही पाचव्या दरवाज्यापाशी आलो आणि तिथे असलेल्या पायर्‍यांवरुन खाली उतरलो. किल्ल्यावर अजुन बघण्यासारखे काहीच नव्हते. नुसतं जंगल माजलं आहे. तिथुन आम्ही बाहेर पडलो आणि रेडीच्या किनार्‍यावर आलो. 

 किल्ल्याचे काही फ़ोटो 










 

           किल्ल्यातल्या त्या वाड्यात शिरलो तेव्हा वर पाहिलं तर एक सुंदर फ्रेम दिसली. वाड्याचं छ्प्पर केव्हाच उडून गेलेलं. वाड्याच्या भिंतीवरुन काही झाडं जगली होती आणि एक प्रकारच नैसर्गिक   छप्पर त्या वाड्याला दिसत होतं. पण सगळ्यात सुंदर त्या झाडांच्यामधुन ते निळं आकाश दिसत होतं.  




 बुरुजावरुन दिसणारा आरवलीचा किनारा आणि रेडीची खाडी


                                      महाराष्ट्रात या. वाघ तुमची वाट पाहत आहे. :)


           अह्ह्ह!! काय सुंदर किनारा होता! अगदी निळाशार पसरेला. शांत! एक - दोन अंग्रेज कपल्स तिथे समुद्रस्नान करत होते.  आम्ही तिथुन पुढे किनार्‍यावरुन चालत निघालो. अनवाणी किनार्‍यावरुन चालताना काय भारी वाटत होतं. पाणीही अतिशय गार होते. बराच वेळ तिथे फिरुन मग आम्ही तेरेखोलला निघालो. 



         तेरेखोल रेडीहुन ५ किमीवर आहे. इथला तेरेखोल हे गाव गोवा सरकारच्या हद्दीत येते. तेरेखोलची नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथे काठावर हे गाव वसले आहे. इथल्या शांततेमुळे बरेच अंग्रेज लोक्स इथे असतात. आम्ही किल्ल्यावर पोचलो तेव्हा तिथे एका शाळेची सहल आली होती आणि सगळी मुले  किल्ल्याच्या बाहेअरच्या आवारत जेवायला बसली होती. गोवा सरकारच्या हद्दीत असल्याने किल्ला उत्तम आहे. आतमध्ये एक मस्त रेस्टॉरंट आहे. गडाच्या आत पोर्तुगिजकालिन "सेंट अँथनी" चर्च आहे. किल्ल्यावर बाके काही विशेष नाही. पोर्तुगिज बांधणीचे कॅप्सुल बुरुज इथे पाहवयास मिळतात. इथुन तेरेखोलची खाडी आणि समोरे केरी बीच फार सुन्दर दिसतं. १७व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष्य ठेवण्यासाठी केली. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगिजांकडेच होता. 

                                                 किल्ल्याचे प्रवेशद्वार


                                                     किल्ल्यातले चर्च 









                        बुरुजावरून दिसणारे  केरीम बीच, तेरेखोल नदी आणि अरबी समुद्राचा संगम 



         किल्ला फिरुन झाल्यावर आम्ही तेरेखोलच्या जेट्टीवर गेलो. इथुन एक मोठ्ठी लाँच निघते आणि समोर गोव्याच्या केरीम बीचपर्यंत सोडते. इथे थोडावेळ बसुन मग आम्ही परतीला लागलो. परत येताना महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर असलेल्या जकात लाटेवर आम्हाला मपोसेच्या पोलिसांनी थांबवलं. इकडचं तिकडचं न विचारता त्याने "पहिल्यांदा बॅग चेक केली. गोव्यात दारु स्वस्त असल्याने मोस्ट ऑफ लोक इथुन दारु विनापरवाना घेउन येतात. त्यामुळेच असेल की त्याने आमची पहिली बॅग चेक केली. मागल्यावेळी इथे आलो होतो तेव्हा माझा कझिन ड्युटीवर होता. तिथुन आम्ही निघालो आणि पुन्हा हुड्यावर आलो. इथुन आता आरोंद्याला त्या कझिनच्या घरी जेवायचं आंत्रण होतं तिथे गेलो. हा कझिन म्हणजे माझ्या मामीचा भाउ. तो माझ्याच वयाचा. त्यावेळी सुट्टी पडली की मी इथे आरोंद्याला येत असे. मग दिवसभर आमचे उंडगेगिरी सुरु असायची. इथे समुद्र जवळ असल्याने मला हा गाव अतिशय आवडायचा. आम्ही दिवसभर खेळायचो, भटकायचो, कधी मासे पकडायला जायचो तर कधी किरणपाणी इथे लाँचमध्ये बसुन पलिकडे गोव्याच्या किनार्‍यावर फिरुन यायचो. इथुन अरंबोळ वैगरे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. खूप वर्षानी मी इथे आलो होतो. तिथे मस्त मच्छी खाउन आम्ही सावंतवाडीच्या रस्त्याला लागलो.
सचिनला सांवतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी त्या भाचींसाठी घ्यायची होती. मी ही कधी त्या चितार आळीत गेलो नव्हतो. चितार आळीत फिरुन काही लाकडी खेळनी खरेदी केली आणि तिथुन आम्ही घरच्या वाटेला लागलो. वाडीहुन घरी पोचायला अर्धा तास पुरेसा होता. अंदाजे पाच पर्यंत आम्ही पोचलो असतो. पण काही तरी वेगळंच झालं... 

                                       सावंतवाडि - चितार आळी ( खेळणी)







      सावंतवाडीहुन निघुन आम्ही तळवडेला पोचलो. इथुन सरळ रस्ता वेंगुर्लेला जातो आणि डावीकडे वळल्यास मातोंडमार्गे पालला म्हणजे आमच्या घरी पोचायचा शॉर्टकट होता. रस्ता मला माहीत होता. पण माहीत नाही कुठे तरी मी चुकलो. तळवडे गेटमधुन निघाल्यावर काही अंतरावरच  पालसाठी उजवीकडे वळावं लागतं, पण तो रस्ता इतका छोटा होता आणि तिथे कुठेच मार्गदर्शक फलक नव्ह्ता त्यामुळे मी चुकलो आणि सरळ पुढे गेलो. काहीवेळाने सचिनने बाईक माझ्याकडे दिली. खूप वर्षानी मी बाईक चालवायचा धाडसी प्रयत्न करत होतो. पहिल्या झट्क्यात जमली नाही मग पुन्हा किक मारली, रेझ दिला, पहिला गिअर टाकला आणि हळूहळू बाईक मारायला लागलो. रस्ता खडबडीत होता. मी ३०-४० वर बाईक मारत होतो. फक्त मला भीती चढावाची वाटत होती कारण चढाव आल्यावर बाईक नक्की कोणत्या गिअरवर आणि किती स्पीडवर ठेवायाची हे माहीत नव्हतं. तरी सचिन मागुन सांगत होता आणि मी त्याचं ऐकुन गाडी मारत होतो. थोड्यावेळ्याने मातोंड आणि पालला जोडणार तो खतरनाक चढाव आला आणि मी गांगरलो. कारण समोरुन एसटी वैगरे आली तर उतार असल्याने एसटीवाले जोरात येतात. पण तसं काही झालं नाही. सचिन सांगत होता गाडी आहे त्या स्पीडवरच ठेव. पण बाईकने थोडा वेग घेतला होता. 

चढावाच्यामध्ये आलो आणि सचिन ओरडला गिअर पुढे टाक!
आता पुढे म्हणजे नक्की कुठे हे धड कळेना. त्यात गिअर बदलायचा म्हणजे क्लच दाबायचा आणि गिअर बदलायचा हे माहित होते. मी गिअर बदलायसाटी क्लच दाबला गिअर बदलणार इतक्यात लक्ष्यात आलं की बाईकला रेझ मिळालाय.
अतिशय कन्फ्युझ्ड सिच्युएशन! सचिनने काही तरी सांगायचं म्हणुन ओरड्ला! 
मला कळलं नाही ! बाईक रेझमध्ये होती ! सचिन म्हणाला क्लच सोड! 
आय थिंक त्याला रेझ देउन नको असं म्हणायचं असेल.
मी क्लच सोडला! बाईक रेझमध्ये! फुल्ल व्हिल्ली ! काटकोनात उभी राहिली 
अगदी घोडा दोन पाय वर करुन जसा उभा राहतो ना अगदी तशीच!!
आम्ही दोघे होतो त्या पोझीशनमध्ये धपकन खाली बसलो. बाईक समोर उभी राहुन बाजुला जाउन आडवी झाली !!
हे सगळं कसं २०-३० सेकंदात घडलं!! 

        सुदैवाने आम्हा दोघांना काही लागलं नाही पण बम्सवर पडल्याने रस्त्यावरचे दगड टोचलेच!!
उठुन पहिल्यान्दा बाईक बघितली आणि तिला उचलून उभी केली. बाईकला विशेष काही झालं नव्हतं. डाव्या बाजुचा मिरर आणि पुढला इंडिकेटर दोन्ही गेले होते. बाईक दुसर्‍याची असल्याने अजुन टेंशन होतं. आम्ही बराचवेळ तिथे उभे राहिलो होतो. त्याचवेळी एक गावकरी तिथून बाईकवरुन जात होता. आम्हाला तिथे उभं बघुन त्याने बाईक थांबवली आणि आमची विचारपूस करायला सुरुवात केली. आम्ही काही नाही म्हणून वैगरे त्याला टाळलं पण त्याने ओळखलं होतं की हे दोघे बाईकवरुन पडलेत. आम्ही बाईक सुरु करुन पाहिली. ती ठीक होती. आता इथुन अगदी थोड्याच वेळ्यात आम्ही घरी पोचणार होतो. पण बाईकचं काय सांगायचं याचं टेंशन होतं. इथुन चढावावरुन आम्ही वर कापावर आलो आणि घराच्या दिशेने सुटलो. मी मामाला कॉल केला आणि त्याला सगळं सांगितलं. 

         १५-२० मि. माझ्या लक्ष्यात आलं की हे माझं गाव नाही. म्हणजे मातोंडचा चढाव चढल्यावर कापावरुन लगेच उतार सुरु होतो आणि ५ मि. आम्ही घरी पोचायला हवं होतं. पण १५-मि झाली तरी आम्ही पोचलो नव्हतो. आजुबाजुचा परिसर ओळखिचा वाटत नव्हता आणि पुढे एका वाडीकडे आलो आणि आजुबाजुची घरं बघुन मी ताडलं की मी रस्ता चुकलोय! पण चुकून कोणत्या गावात आलो हे ही कळलं नव्हतं! सचिनला बाईक थांबवायला लावली आणि तिथे उभ्या असलेल्या गावकर्‍यांना मी विचारलं की हा कोणता गांव आहे आणि इथुन पालला कसं जायचं. ते लोक आम्हाला बघुन चिंतेत आले. एकजण म्हणाला हे आजगांव आहे. 
        भेन्डी! मी कसा काय चुकलो आणि कुठे चुकलो हेच लक्ष्यात येत नव्हतं. कारण त्या चढावापर्यंत आणि तिथुन पुढे सड्यापर्यंत अगदी मला वाटलं होतं की मी माझ्याच गावी आहे. कारण सगळा रस्ता अगदी सेम होता. आता काळोख पडायला आला होता. त्यातल्या एकाने आम्हाला संगितलं की असेच जर सरळ पुढे गेलात तर शिरोड्याला पोचाल किंवा पुन्हा मागे जा. कापावर जिथे दोन रस्ते फुटतात तिथुन लेफ्ट मारा कही वेळाने अजुन दोन रस्ते दिसतील. पुन्हा लेफ्ट मारा. जोसोली मार्गे तुम्ही आसोली या गावी पोचाल. आसोलीहुन घरचा रस्ता मला माहित होता. शिरोड्याहुन पुन्हा उलटं येणं अजुन उशिर झाला असता म्हणुन आम्ही मागे फिरलो. 

           सड्यावर आलो तिथे त्या माणसाने संगितल्याप्रमाणे फाट्यावरुन लेफ्ट मारला. संध्याकाळ उलटुन गेली होती. हा रस्ता खराब होता. लालमातीच्या रस्त्यावरुन धुरळा उडवत आम्ही पुढे चाललो होतो. काही वेळाने पुन्हा एका तिठ्यापाशी आलो. इथुन लेफ्टला जायला त्या माणसाने सां गितलं होतं. तरीही पुन्हा एकदा तिथुन जाणार्‍या एका माणसाकडुन कन्फर्म करुन घेतलं आणि आम्ही जोसोलीच्या मार्गाने निघालो. हा रस्ता मस्तच होता. एका ठीकाणी डोन्गर फोडुन वळणावळणाचा सुन्दर रस्ता बनवला आहे. दोन्ही बाजुला विशाल लाल रंगाचे डोंगर उभे आहेत आणि त्या खिंडीतुन वळणावळणाच्या रस्त्यातुन आम्ही जोसोली गावात पोचलो. हा रस्ता मला अतिशय आवडला होता. स्पेशली ती खिंड. जोसोलीतुन पुढे आम्ही आसोलीला आलो आणि तिथुन घरी पोचलो. बाईकवाल्याची बाईक दिली. त्याला सगळं समजावून सांगितलं. येउन जाउन ११० किमी झालं होतं आणि आम्ही १०० रु. पेट्रोल भरलं होतं, सो त्याला ४०० रु. देउन आम्ही घरी पोचलो तेव्हा साडेसात वाजले होते. 

           तळवडेला चुकल्यामुळे आम्हाला २०-३० किमीचा अतिरिक्त फेरा पडला होता. पण आजचा दिवसही भन्नाट गेला होता. दोन किल्ले, खूप वर्षानंतर मित्राच्या घरी, सावंतवाडीची चितार आळी, छोटासा अपघात, चुकलेली वाट आणि तो जोसोलीतला खिंडीतला रस्ता !!!
घरी पोचलो आणि आता रात्री जत्रेला जायची तयारी करु लागलो....