Thursday, January 12, 2012

सायंकाळी एके वेळी...

गजबजलेला दिवस सरताना आणि निद्रेची रात्र पांघरताना, या दोन्ही वेळेंना जोडणारी एक प्रसन्न संध्याकाळ मला नेहमीच हवी हवीशी वाटते. आज बर्‍याच दिवसांनी अशी एक संध्याकाळ आली. बरं, आली तर ती एकटी थोडीच येणार होती. मागल्या सार्‍या संध्याकाळच्या आठवणी सोबत घेउन आली. घराच्या बाजुला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन मोठ्याने हॉर्न देत धडधडत निघून गेली. वेगळं काही नाही. या ट्रॅकवरुन अशा अनेक ट्रेन्स दिवस रात्र धडधडत ये-जा करत असतात. पण आजच्या या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेनही माझ्या आठवणी धडधडत घेउन आल्यागत वाटतेयं. समोरच्याच झाडावर दाटीवाटीने जमलेले पक्षी. स्थलांतर करुन आलेले. दिवसभरच्या प्रवासाने थकलेले, दमलेले. त्यांच्या त्या किलबिल आवाजातही माझ्या अशाच दडलेल्या आठवणी. आणि पश्चिमेकडे मावळणारे ते सोनेरी आकाश. अक्षरशः सोनेरी! जाताना सूर्याने दिवसभर गोळा केलेले सोने सायंकाळी क्षितिजावर फेकून गेलाय.. लूटा! ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी ते लूटा! पण मला फक्त लूटायच्या आहेत त्या सोनेरी आठवणी.

आयुष्यातली महत्त्वाची स्थित्यंतरे या अशा संध्यासमयीच माझ्या मनाच्या क्षितिजावर दाटीवाटीने जमा होतात. मग सुरु होतो आठवणीचा पाठ्शिवणीचा खेळ. त्या सोनेरी क्षितिजाच्या रेषेवर उलगडत जातं एक एक पान. शक्य नसतं, सगळ्या आठवणी एका संध्येला वाहून देणं आणि अशी संध्याकाळ पुन्हा पुन्हा येणं हे ही आजच्या गजबजत्या आयुष्यात कठीण होउन राहयलयं. मग जश्या आठवणी त्या संधीप्रकाशात उजळत जातिल तश्या त्या चेहर्‍यावर खुलत जातिल. कधी किंचीत स्मित, कधी गालांवर स्वार झालेले ओठ, कधी खोल गेलेले डोळे, तर कधी हसणारे डोळे तर कधी ओलावलेल्या पापण्या.... 
आठवणी चेहर्‍याच्या तर्‍हाच बदलून टाकतात नै! आणि संध्याकाळ ही ती केवढी? अगदीच लहान.. जेमतेम डोळ्यांत भरुन वाहुन जाईल इतकीच... 

संध्याकाळ जीवघेणी असते. उजेड आणि काळोख यांचा मध्य साधणारी ही संध्याकाळ ह्रद्यात खोलवर रुतत जाते. मग कधी अश्याच जेवाघेण्या संध्यासमयी फराझच्या डोळ्यातुन हे शब्द पाझरले असतिल...

हुई है शाम तो आँखों में बस गया फिर तू
कहाँ गया है मेरे शहर के मुसाफ़िर तू .....
  

शब्दांची माळ गुंफत, असेच शायर, कवी या उद्विग्न संध्याकाळी निरंतर फिरत असतात...
मी सुद्धा असाच मग या संध्येच्या प्रवासाचा एक यात्रिक होउ पाहतो. माझ्या जोडीला असते माझी उध्वस्त कविता आणि संध्येला वाहीलेले डोळे. मी ही शोध घेत राह्तो त्या हरवलेल्या नजरेचा. माझ्या उध्वस्त कवितेला कधी तुझ्या अस्तित्वाची छाया जरी मिळाली तरी मग ती कविता फूलु लागेल. विखुरलेल्या शब्दांना एक लिरीकल आयाम मिळू लागेल. तुझ्या डोळ्यातून पाझरणारे संध्येचे शब्द माझ्या ओठांनी टीपून घेईन, तुझा एखादा असाच कधीचा चोरटा स्पर्श माझ्या अंगावरुन शहारुन जाईल आणि मग माझी ही एक कविता अशीच तयार होईल...  

अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात साचलेली.
तुझ्या स्पर्शाची आठवण
पापणीआड दाटलेली...

तुझ्या या अशा चोरट्या स्पर्शाच्या आठवणीत मला लोटुन माहीत नाही ही संध्याकाळ आता मला कुठे घेउन जाईल. माझ्या क्षितिजावरली संध्याकाळ तुझ्या क्षितिजावर ही उमटेल का? कधी पुन्हा जर अशीच एखादी संध्याकाळ जर मिळाली ना तर मग मी तुला साद देईन, मनात सारे आकाश भरुन माझ्या क्षितिजाच्या रेषेवर निघून ये. उरात असलेले सारे कोंडलेले, गुदमरलेले श्वास माझ्या मिठीत रिते कर...निघून ये डोळ्यांत भरुन सार्‍या दु:खांचा पाउस आणि करुन टाक चिंब मला... ये घेउन तुझं ते घायाळ ह्रद्य !!

खायला उठलेल्या जगापासून, सर्वकाही सोडून एक कोकरु हळूच, धडधडते, कोवळे ह्रद्य एका सिंहाच्या हवाली करते,ते ही अशाच संधीप्रकाशात! आणि तो सिंह ही त्या कोकराच्या किलकिलत्या डोळ्यांत पाहुन अस्पष्टपणे उच्चारतो,
"And, so the Lion fell in love with Lamb..!"
आणि या त्याच्या वक्तव्यावर ते कोकरु स्वःताच्या वेडेपणावर हासत बोलते, 
"What a stupid Lamb!"
आणि मग त्या संधीप्रकाशात दोघेही विलिन होउन जातात. प्रेमाचा हा वेडेपणाही अशाच एका संध्येला भरात येतो.  त्याच्या आठवणीत उद्विग्न, झालेलं कोकरु मग त्या सांजगारव्यात गाउ लागतं...
   

I'hv died everyday waiting for you,
Darling don't be afraid I've loved you,
For a thousand years,
I'll love you for a thousand more years...
 

14 comments:

  1. शब्दातीत...

    तू इतके सुंदर लिहले आहेस की काय प्रतिक्रिया देऊ कळत नाहीए.

    Take a Bow Dude!!!

    ReplyDelete
  2. कातर कातर संधिकाल ..
    आर्त आर्त माया जाल !!!

    ReplyDelete
  3. दीपक. एकदम भारी लिहिले आहेस .....आठवांचा खेळ आणि अशीच एक मस्त संध्याकाळ.....पण अचानक येणाऱ्या आठवणी जास्त त्रास देतात. ह्याला त्रास म्हणायचे कि आणखीन काही कोणास ठावूक...पण हवाहवासा वाटणारा हा आठवणींचा धरलेला फेर आणि मग आपल्याभोवती जमणारी आठवणीतली चित्र,जिवंत जगात असूनही नसल्यागत भारावून वाहवत जाणारे मन....आणि मग तू जसे म्हंटले आहेस तसे बरेच काही.....सुंदर झाले आहे पोस्ट.....

    ReplyDelete
  4. Wow...sahi re...
    jya kokaru sathi lihila aahes tyala aavadala ki naihi?

    ReplyDelete
  5. खूप दिवसांनी असलं भारी ललितलेखन वाचायला मिळालंय. फार सुंदर लिहिलंय.

    ReplyDelete
  6. थँक्स सिद्ध्या !
    असंच वाहत गेलो होतो. :)

    ReplyDelete
  7. बी...
    हम्म्म!
    शाम से आँख में नमी सी है..

    ReplyDelete
  8. धन्स मोनिका...

    संध्याकाळच्या आठवणींवर लिहायला गेलं तर शब्दच पूरणार नाहीत, हो ना....

    ReplyDelete
  9. Sarika,
    It dosn't matter...
    tula aavadale na, I'm Haapy :)

    Thanks for the comment !

    ReplyDelete
  10. धन्यवाद पंकज भावा..
    थोडेसे ओरखडले रे असंच काही तरी... :)

    ReplyDelete
  11. मागे एकदा ते तुझ्या बझच्या स्टेट्स मध्ये पाहिलं
    होतं...
    >> And, so the Lion fell in love with Lamb..!
    आता अर्थ पण कळला...
    फारच छान लिहिलं आहेस रे....तुला मी काय कमेंट देणार..शब्द तोकडे पडतील...

    ReplyDelete
  12. अ‍ॅप्स ! खूप खूप हाभार्स गं...
    LIon & lamb वर एक गाणं पण आहे मी पाठवेल तुला ते...
    आणि आजचा बिंगो सही होता ना हे हे हे

    ReplyDelete