Sunday, June 16, 2013

प्रिय मैत्रिणीस..... (२)

मैत्रिणी,
खरं तर तुला सांगायचीय गोष्ट एका राजकन्येची,
एका शापित राजकन्येची.
मनापासून आवडत असलेल्या व्यक्तिवर
प्रेम न करण्याचा शाप होता तिला.
म्हणूनच ज्याच्यावर होतं तिचं खरंखुरं प्रेम
त्या प्रियकराचा तिने केला होता खून.
आजही ऐकू येते कधी त्या किनार्‍यावर
त्याच्या बासरीची संदिग्ध धून... 


मैत्रिणी, 
प्राजक्ती दवांत भिजलेली स्वप्ने
विखुरलेली असतात उशीवर.
मला वेचून करायची आहे
त्यांची एक सलग स्वप्नमाळ,
आणि वाहायचीय त्या शापित राजकन्येच्या
प्रियकराच्या आत्म्याला.
भास नाही, खरं सांगतो
मलाही ऐकू येतात कधी कधी
त्या बासरीचे संदिग्ध सूर.
त्या राजकन्येचाही तेव्हा
फुटला असेल का गं ऊर..         


मैत्रिणी,
काल पाहिलं मी एक जहाज
किनार्‍यापासुन दूर जाताना.
उरांत भरुन तो उन्मत्त वारा,
पण ते लपवू शकलं नाही
मंदावलेला वेग आणि डोळ्यांतल्या धारा..


मैत्रिणी,
मी पाठवणार आहे त्या शापित राजकन्येला
एक सलाम.
कारण, प्रत्येक सुरु केलेल्या गोष्टीला
द्यावा लागतोच ना गं पुर्णविराम....

3 comments:

  1. काल पाहिलं मी एक जहाज
    किनार्‍यापासुन दूर जाताना.
    उरांत भरुन तो उन्मत्त वारा,
    पण ते लपवू शकलं नाही
    मंदावलेला वेग आणि डोळ्यांतल्या धारा.

    हे अतिशय उच्च आहे. व्वा DPooooooooo!

    ReplyDelete