डीएसएलआर घ्यायचे डोहाळे लागले असतानापासुनच जागोजागी फक्त फ्रेम्स दिसायच्या. मुंबई टाउन साईडला तर अशा फ्रेम्स दिसतात. फक्त नजर हवी.
कधी लहानपणीचं स्वप्न की आपला पण एक कॅमेरा असावा. आठवतयं, लहानपणी मामाकडे असताना, त्याच्याकडे एक हॉट शॉटचा कॅम होता. कोनिका पॉप. भारी कॅम होता. छान फोटो यायचे. आणि हॉट शॉट असल्याने काही सेटींग्ज वैगरे अॅडजस्ट करायची गरज नव्हती. फक्त फोटो क्लिक करायचे. तर एकदा मामा घरी नसताना मी तो कॅम नाचवत होतो. नाचवताना त्याची लेन्स कॅप कुठेतरी पडलं आणि संध्याकाळी नेमकी ती मामालाच सापडली. मग काय ५०१ साबणानं माझी धुलाई. बार बार लगातार.. :)
असो. पण आता काही वाटत नाही. शेवटी इतकी वर्ष थांबुन, पैसे
साठवून निकॉन डी ५१०० हा डीएसएलआर घेतला आणि मग विकेंडला घरातुन बाहेर
पडायचं आणि क्लिक क्लिक करत फिरायचं. माझ्यासोबत नेहमी असणारे आमचे सचिन
पाटील दादा. कधीही कॉल केला की तय्यार. मग नेहमी मुंबईत फिरताना ज्या
फ्रेम्स मनात साठलेल्या होत्या आधी अधाश्यासारख्या त्या क्लिक केल्या. गेट
वे, ताज हॉटेल, भाउचा धक्का, एलिफंटा केव्हज, कान्हेरी केव्ह्ज, बाणगंगा,
वसईचा किल्ला, संध्याकाळच्या वेळी फ्लोरा फाउंटन, अफगाण चर्च, ग्लोबल
विपश्यना पॅगोडा, आमची नेहमीची खादाडी, असे बरेच क्लिक क्लिक.. अरे हो एकदा
तर स्नेहलच्या घरी सफाळ्याला पण पोचलो आणि मग तिथे सन्ध्याकाळी
मठाण्याच्या बीचवर केलेली फोटोग्रॅफी. तर असं फिरता फिरता अगदी मनात आणि
डोळ्यांत साठवलेलं एक लोकेशन म्हणजे पालघर. नाही म्हणायला बोर्डीला जाउन
आलो होतो पण पालघर म्हटलं की त्या मनात साठलेल्या फ्रेम्स अशा उफाळून
यायच्या. केळवे आणि माहीम बीच तर मस्तच. पण त्यातल्या त्यात केळव्याला
दांडा खाडीवरला तो ब्रीज मला खूपच अट्रॅक्ट करायचा. कधी ७-८ वर्षापूर्वी
केळव्याला मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा तो ब्रीज पाहिला होता. त्यानंतर
कधी योगच आला नाही. तर मग यावेळी ठरवलं की पालघरला जायचं आणि निवांत क्लिक
क्लिक करत फिरायचं.
एका शनीवारी पहाटे मी आणि पाटील दादा निघालो. आता चर्चगेट -
डहाणू लोकल सेवा झाल्यामुळे मेमु किंवा पॅसेंजर गाड्या पकडण्याची घाई
नव्हती. तरीही आम्ही उशिरा म्हणजे १०:३० ला वैगरे पालघर स्टेशनवर लँड
केलं आणि तिथुनच देवेन ला कॉल केला. त्यानेही आत्ताच कॅनन ६०० डी घेतला
होता. मग म्हटलं त्यालाही बोलवावं. सुदैवाने साहेब घरी होते. येतो म्हणाला.
मग त्याल डायरेक्ट शिरगावच्या किल्ल्यावर बोलावलं आणि मी आणि पाटील दादा
निघालो. नेहमीप्रमाणे टमटम पकडून जायचं पण त्या दिवशी एक ही टमटम रिकामी
नव्हती. प्रत्येक टमटम अगदी भरुन जात होती. बसही नव्हती. त्या टमटमच्या
नादात अर्धा तास तरी गेला. काही वेळानं कळलं की तिथल्या जवळच्या गावात
सातपाटीला जत्रा असल्याने टमटम भरुन जात होत्या. मग वैतागुन १५० रु. ठरवून
रिक्षा केली आणि शिरगावच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो. या आधी आम्ही या
किल्ल्यावर येउन गेलो होतो. आमची एक मैत्रिण अनुजा सावे हीचं घर पालघरलाच
आहे. एकदा तिथे खादाडी पिकनिक झाली होती. तेव्हा या किल्यावर आलो होतो.
उतरल्या उतरल्या क्लिक क्लिक करायला सुरुवात केली. किल्ल्याचं मुख्य दार,
आणि पडझड झालेली तटबंदी. तरीही काही ठराविक फ्रेम्स क्लिक करुन झाल्या.
देवेन अजुन आला नव्हता. मग फिरत फिरत मी आणि पाटील वरच्या तटबंदीवर सावलीत
जाउन बसलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकडत होतं पण समोर असलेल्या
समुद्रामुळे एक सौम्य गारवाही जाणवत होता. दमुन भागुन आम्ही तिथे असलेल्या
एक घुमटीत जाउन बसलो आणि गप्पा मारु लागलो. तितक्यात देवेन आपल्या बाईकवरुन
तिथे हजर झाला. आल्या आल्या त्याने इडली आणि चटणीचा डब्बा समोर ठेवला. ते
खाउन झाल्यावर ठरलं की जत्रेला पण जायचं. तिथे काही शॉट्स मिळतिलच आणि
देवेनची बाईक असल्याने काही टेंशन नव्हतं. मग किल्ल्यात अजुन थोडावेळ
फिरलो. अजुन काही क्लिक क्लिक केले. काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती.
तटबंदी |
किल्ला क्रिकेट |
शिरगाव किल्ला झाल्यावर मग निघालो सातपाटीच्या जत्रेला.
दुपार असल्याने जत्रेला काही मज्जा नसणारच होती. संध्याकाळी मज्जा आली
असती, पण तरीही आम्ही तिकडे गेलो. बरीच दुकानं मांडलेली होती. पण सगळेजण
विश्रांती घेत होते. आम्ही मंदीरात गेलो. श्री रामाचे दर्शन घेतले आणि
थोडावेळ मंदीरातच बसलो. मग जत्रेत फिरायला गेलो. उन अगदी कडक होतं पण शॉट्स
मिळणं मुश्किल होतं. आमच्या गळ्यातले कॅम्स बघुन एका ऑर्गनायझर काईंड ऑफ
माणसाने आम्हाला हटकलं. त्याने टाकलेली होती. फोटो का घेताय?? मिडीयावाले
आहात का वैगरे विचारु लागला. त्याच्याशी वाद घालण्यात किंवा बोलण्यात काहीच
अर्थ नव्हता. मग आम्ही तिथुन निघालो. खाउच्या दुकानापाशी गेलो आणि माहिमचा
फेमस हलवा खायला घेतला. त्या रसरशीत फोडी बघुन तोंडाला पाणे सुटलं होतं.
पाव किलो हलवा घेतला. ( आम्हालाच खायला ) आणि तिथुन निघालो.
माहिमचा हलवा |
आता कुठे??
पोटात कावळे काव काव करतच होते. मग केळवे बीचच्या दिशेने निघालो. तिथे
पोचलो आणि जेवायला रेस्टॉरंट्स शोधु लागलो. शेवटी एका हॉटेलमध्ये मस्त
घरगुती जेवण मिळालं. जेउन झाल्यावर खरं तर झापड आली होती. पण मग बीचवर
गेलो. बीचवर फिरलो. काही फोटो घेतले. पण उन बरंच होतं. तिथुन निघालो.. आता
कुठे???
केळवे बीच |
आता.. आता केळवे दांडा खाडी.
त्या ब्रीजवर मला जायचंच होतं. मी सांगेल तिकडे पाटील आणि देव्या येत होते. काय करणार बिचारे... हे हे हे हे.
त्या ब्रीजवर मला जायचंच होतं. मी सांगेल तिकडे पाटील आणि देव्या येत होते. काय करणार बिचारे... हे हे हे हे.
ब्रीजवरुन सनसेट मस्त टीपता आला असता ही आयडीया होती. पण सुर्यास्ताला अजुन बराच वेळ होता. मग आठवलं की तिथे भवानगड नावाचा एक छोटा किल्ला टाईप आहे. किल्ला म्हणजे एक छोट्याश्या डेकडीवजा डोंगरावर टेहाळणी चौकी असावी. आम्ही विचारत विचारत तिथे पोचलो. रस्त्याच्या कडेलाच, झाडा-झुडुपात लपलेली एक छोटीशी टेकडी आणि त्यातून डोकावणारा भगवा! झालं! खूण पटली आणि आम्ही पायवाटेने निघालो. अवघ्या ५- १० मि. पायवाट आणि आम्ही तिथे पोचलो. तिथे शंकराचे एक मंदीर आहे जत्रेच्या खाणाखुणा जागोजाग पसरलेल्या. वाट काढत काढत आम्ही वरच्या बाजुला पोचलो. तटबंदी ढासळलेली तरी अजुनही शाबुत आहे. वर पोचल्यावर एक विहीर दिसली. पण ती लोखंडी जाळीने झाकून ठेवली होती. थोडावेळ तिथे बसलो. समोर केळवे, माहीमचा विस्तिर्ण किनारा दिसत होता. थोडावेळ बसुन मग तिथुन निघालो. आजच्या या भटकंतीत चिमुकला का होईना एक ट्रेक झाला होता आणि लाल डायरीत अजुन एका किल्ल्याचं नाव जमा झाल्याचं समाधान मला आणि देव्याला झालं होतं.
तिथुन पुन्हा त्या ब्रीजवर आलो. आता संध्याकाळ होत आली होती. पण
पश्चिमेला थोडसं ढगाळ होतं. त्यात कधी सुर्य डोकावायचा तर कधी गायब
व्हायचा. त्यामुळे सुर्यास्त टीपण्याची आशा आम्ही सोडुन दिली. पण
सुर्याच्या मावळणार्या सोनेरी किरणांनी खाडी अगदी सोनेरी झाली होती. बराच
वेळ तिथे क्लिक क्लिक करत राहिलो आणि मग खाली किनार्यावर गेलो. जिथून मला
तो ब्रीज क्लिक करायचा होता तिथे पोचलो. तिथुन मला अगदी हवी तशी फ्रेम
मिळाली त्या ब्रीजची. काय माहीत का पण हा ब्रीज मला खूप म्हणजे खूप
अट्रॅक्ट करतो. फक्त दोनदाच पाहिलाय. पण एखादं गुढ असं काहीसं या ब्रीजबाबत वाटत राहतं.
केळवे दांडा खाडीवरील ब्रिज |
मग किनार्यावर काही फोटो घेतले. आणि दिवसभा आम्हा सहा जणांचं ;) ओझं घेउन धावणार्या देव्याच्या बाईकचे ही. आता निघायची तयारी पण त्यापूर्वी मला पालघर-माहीम मधला तो फेमस वडा खायचा होता. मग पुन्हा देव्याला बाईक तिकडे दामटायला सांगितली. कधी पालघरला गेलात तर माहीमचा तो प्रसिद्ध वडा खायला विसरु नका. अल्टीमेट!! तोवर बरीच संध्याकाळ झाली होती. दिवसभर आम्ही उंदडत होतो. मग देव्याचा निरोप घेतला. माहीमवरुन टमटम पकडुन पालघरला पोचलो आणि घराच्या दिशेने निघालो....
एक मस्त धमाल, उनाड दिवस ! एका दिवसात मस्त भटकंती. बर्याच दिवसानी भेटलेला देवेन. एक ट्रेक, जत्रा, खादाडी आणि त्या सर्व फ्रेम्स ज्या कधीपासुन तरी मनात होत्या....
- दीप्स
- दीप्स