Sunday, April 10, 2011

पारिजातकाच्या चारोळ्या

रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस, पहाटे
अंगणातला  पारिजात वेचताना.


पहाटेची स्वप्ने खरी होतात का गं? रात्र चांदण्यांचा सडा शिंपत जागी असते आणि मी ही त्या रात्री बरोबर चांदण्यांमधे तुला शोधत जागा असतो. पण जशी रात्र पहाटेकडे झुकु लागते माझे डोळेही पेंगू लागतात. खरं तर मला पहाटेचीच झोप हवी असते. पहाटे पहाटे पडलेल्या स्वप्नांत तू दिसावी आणि ते स्वप्न खरं व्हावं म्हणून!

पहाटे जेव्हा गार वारा अंगावरुन वाहू लागतो, ओघळणार्‍या पारिजातकाच्या फुलांची चादर नकळत अंगावर ओढली जाते. हळूहळू डोळे मिटू लागतात आणि त्या मिटलेल्या पापण्यांच्या आड एक सुंदर स्वप्न दिसू लागतं. आपल्या अंगणातला बहरलेला पारिजात आणि त्याखाली फुलं वेचणारी तू! फुलांनाही लाजवणार्‍या तुझ्या नाजुक हालचाली माझ्या डोळ्यांत मी साठवून घेतोय. मी हळूच उठून तू मला बघणार नाहीस याची काळजी घेवून पारिजातकाच्या आडोश्याला लपून तुला पाहतोय. थोड्यावेळाने तुझ्या ते ध्यानात येतं. कसं काय कोण जाणे? माझ्याकडे पाहून तुझी सैरभैर झालेली नजर! हातातल्या फुलांशी चालणारी तुझी हालचाल. मला हसू येतयं. माझ्या हसण्याने तू अजुनच बावरून जातेस. मी हळूहळू तुझ्याकडे येतो. तुझे भिजलेले, मोकळे सोडलेले केस आणि त्या केसांवरुन तुझ्या खांद्यांवर निथळणारे पाण्याचे टपोरे थेंब! अगदी तसेच जसे अळवाच्या पाण्यावर स्वःताला सावरत, धडपडणारे थेंब.तू तशीच स्तब्ध! एखाद्या निश्चल मुर्तीसारखी माझ्यासमोर उभी. तुला न्याहाळताना माझे डोळे तुझ्या त्या रुपाने भरून गेलेत. तुला स्पर्श करुन तुझी ती समाधी तोडावी अशी प्रखर इच्छा माझ्या मनाला स्पर्शुन जातेय. पण नको! तू अशीच छान दिसतेयस. पहटेच्या त्या अंधुक, गारठ्लेल्या काळोखात तुझ्या चेहर्‍यावर एक वेगळंच तेज मला भारावून टाकतेय.

तुला तसं बघून आज वाराही जरा जास्तच अल्लड झालाय. त्याची नियत ही बिघडलीय. तुला स्पर्श करण्याच्या इर्ष्येने तो तुझ्या अंगावरुन वाहून जातो. समाधीत मग्न असलेल्याची समाधी तोडावी त्याप्रमाणे तू दचकतेस आणि वार्‍याच्या त्या गार स्पर्शाने शहारून जातेस. तसं करुन त्या बदमाष वार्‍याला काय मिळालं काय ठाउक? 
छे ! किती छान दिसत होतीस तू! पण.. त्या गार वार्‍याच्या स्पर्शाने शहारलेली तू, न राहवून माझ्या मिठीत शिरतेस आणि  साखरझोपेत असलेला तो पारिजात आपल्या दोघांच्या अस्तित्त्वाच्या जाणिवेने अंग झाडून आपल्यावर बरसू लागतो. मनोमन मी वार्‍याच्या त्या बदमाषी कृत्याचे आभार मानतो आणि तुझ्या मिठीत तो पारिजातकाचा पाउस न्हाउ लागतो. न्हाता न्हाता चिंब झालेल्या तुझ्या ओठांतुन काही अस्पष्ट शब्द बाहेर पडतात आणि माझं ते सुंदर स्वप्न खळळकन तुटुन जातं!

घेता जवळी तू मला
पारिजात बरसत राहतो
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो.


कसे सुचतात गं तुला असे शब्द?? मी किती शोधतो तरी मला सापडत नाहीत. आजकाल हे असं होतं. माझ्या प्रत्येक स्वप्नांत मी तुला शोधत फिरतो. जेव्हा आजुबाजुला तू नसतेस. अनेक दिवस मी तुला पाहिलेलं नसतं. तुझा आवाजही ऐकलेला नसतो. तेव्हा मी या पारिजातकाजवळ येतो. त्याच्या पायथ्याशी विषण्ण मनाने बसून राहतो. स्वप्नातली तू पुन्हा आठवू लागतेस. सैरभैर झालेली माझी नजर फक्त तुलाच शोधत असते. येणारी जाणारी लोक मला तसं बसलेला बघून माझ्यावर हसून निघून जातात. तेव्हा हळूच पारिजातकाची एक फांदी माझ्या डो़क्यावर झुकते. माझ्या गालांवर काही फुलं सांडते. जणू ती तुच आहेस, माझ्या गालांवरुन हात फिरवणारी!  माझ्या  सार्‍या व्यथा फक्त त्या पारिजातकालाच ठाउक. माझ्या सार्‍या तुटलेल्या स्वप्नांचा तोच एक मुक साक्षीदार! तुला पडतात का गं पहाटे पहाटे अशी स्वप्नं?? बहरता बहरता तुटणारी, फुलता फुलता विखुरणारी?? नसतिल तर ऐक

बहरलो होतो कधी असाच
तुझ्या मिठीतल गुलमोहर होउन
विखुरलो होतो कधी असाच
तुझ्या स्वप्नातला पारिजात होउन.


मी असाच किती तरी वेळ त्या पारिजातकाखाली बसून राहतो. तुझ्या आठवणीत स्वःताला झोकून देतो. पुन्हा एकदा तुझे ते वेड लावणारे डोळे सारखे आठवत राहतात. तुझे आभास मला जाणवू लागतात. कधी तरी हातात घेतलेला तुझा हात, मला तो शीतल स्पर्श जाणवू लागतो. नेहमी सोबत असताना जाणून बुजुन, या ना त्या कारणाने एकमेकांना केलेले चोरटे स्पर्श पुन्हा पुन्हा आठवू लागतात. तुझ्या टपोर्‍या डोळ्यांइतकेच मला तुझ्या त्या चोरट्या स्पर्शांनी वेडं केलं होतं. मी ते सारे स्पर्श कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात असेच जपून ठेवलेत. तुझ्या आठवणींनी वेडं केलं की मी त्या स्पर्शांची पाने उलगडू लागतो. हळूवार, मोहक असे ते स्पर्श पुन्हा पुन्हा आठवू लागतो. त्यात भरीस भर म्हणून की काय पारिजात ही माझ्यावर ओघळू लागतो. तुझ्या स्पर्शांच्या आभासांना सत्यात आणण्याचा
प्रयत्न करतो. ती नाजुक फुले माझ्या देहावर जेव्हा बरसू लागतात तेव्हा एक विलक्षण अनुभूति ने माझं मन बहरुन जातं, पण ते तात्पुरतचं!! तुझ्या स्पर्शांची उणिव तो पारिजात भरुन काढू शकत नाही, पण तरीही त्या नाजुक फुलांचं ते  ऋण मी विसरू शकत नाही. अशी जीवघेणी संध्याकाळ संपली की जीवावर उठलेली ती रात्र येईल तेव्हा मी काय करु?

पारिजात जेव्हा देहावर ओघळतो
तुझे चोरटे स्पर्श बहरू लागतात,
दिवस सहन होतात कसे तरी
रात्री तुझ्या ओढीने झुरू लागतात..


स्पर्श बोलके असतात. जेव्हा शब्द संपतात तेव्हा स्पर्शच बोलू लागतात, पण हे त्या पारिजातकाला ठाउक आहे का? तो तसाच निश्चल असतो. अबोल, मूकपणे माझ्याकडे बघत उभा असतो. त्याचं तसं ते बघत राहणं मला सहन नाही होतं. तू ही कधी कधी अशीच माझ्याकडे बघायचीस. संदिग्धपणे, ओठ मिटून माझ्याकडे बघत राहायचीस. तुझ्या मनातलं सारं तुझ्या डोळ्यांत उतरायचं. तुझं तसं ते बघत राहणं मला अजुनही आठवतं. पायात खोलवर रुतलेल्या काट्यासारखं अजुनही कधीतरी चालताना खुपतं. मी का पुन्हा पुन्हा त्या आठवणी कुरतड्तोय, तू विचारशील मला.  काय करू अगदी थोड्याश्या आठवणी आहेत गं या माझ्याकडे. ज्या आहेत त्या तश्याच जपून ठेवल्यात. हा पारिजात जेव्हा असाच गप्प राहतो  न बोलता, संदिग्धपणे माझ्याकडे बघत राहतो. मी आसुसलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहतो अगदी तसाच जसा मी तुझ्याकडे पाहायचो की तू काही तरी बोलशील, मनातलं सारं काही माझ्यापुढे रितं करशील! पण नाही त्या अबोल पारिजातकाला ही माझी दया येत नाही. त्याच्या त्या अबोल नजरेचे घाव मग माझ्या मनावर घाला घालू लागतात.

बोलक्या स्पर्शांचे होणारे
भास अजुनही सरले नाहीत
अबोल पारिजातकाने दिलेले
घाव अजुनही भरले नाहीत.
.


हे घाव भरतील तेव्हा भरतील, त्यांची मला पर्वा नाही.मला ठाउक आहे हे घाव तू सुद्धा सहन केलेत. आठवणींच्या वणव्यात तू ही तशीच जळलीयस. तुझ्या डोळ्यांत मी ते जळणं पाहिलयं. प्रत्येकाला आपली दु:खे डोंगराएवढी वाटतात मी ही त्याला अपवाद नाहीय. पण काय करु कधी कधी तुझ्या आठवणी उफाळून आल्या की शब्दांच्या लाटा होउन मनाच्या किनार्‍यावर आदळू लागतात. तुझ्या आठवणींनी काठोकाठ भरलेल्या या मनाला कुठेतरी रितं करावंच लागतं,म्हणून मग या शब्दांचा आधार. पण कधी कधी एक अनामिक भीती मनाला ग्रासू लागते. आता शब्द आहेत म्हणून मी ते उधळतोय पण एक दिवस जेव्हा हे शब्दच संपतिल तेव्हा??? तेव्हा कळेल का गं तुला माझ्या डोळयांत उतरलेलं माझ्या मनातलं??

एक दिवस माझे सारे
शब्द आटुन जातिल
कळेल तुला मनातलं माझ्या
जेव्हा डोळे दाटून येतिल..


माझ्या वेदनाही तशाच! मी त्यांनाही कुठेतरे खोलवर मनात गाडून ठेवलयं, कुणासमोरही त्या डोळ्यांतून वाहू नयेत म्हणुन. मायेने, मोठ्या प्रेमाने मी त्यांना जपलयं. पण मला ठाउक आहे, कधी तरी या वेदना वाहतिल, मी कितीही थोपवून धरल्या तरी!  मग जर तुला कधी त्यांना बघावसं वाटलं, तुझ्या मायेची फुंकर त्या वेदनांवर घालावीशी वाटली तर रात्र सरताना, पहाटे माझ्या दारातल्या पारिजातकापाशी ये. त्याच्या उरात उरलेल्या माझ्या वेदना तुला दिसतील.

चंद्र आर्त आक्रोशाच्या
रात्री जेव्हा सरतिल,
उरात पारिजातकाच्या तेव्हा
वेदना मझ्या उरतिल.


एक दिवस नक्की माझ्या मनातलं माझ्या  डोळ्यांतुन  तुला  कळेल मला खात्री आहे. जर नाही कळलं ना तर कधी अंगणातल्या पारिजातकाच्या पायथ्याशी येवून बस. बहरलेल्या पारिजातकाचा सुगंध तुझ्य रोमांरोमात भिनेपर्यंत त्या फुलांमध्ये मिसळून जा. त्या नाजुक फुलांत आपल्या सार्‍या आठवणी मी गुंफुन ठेवल्यात. कधी त्या फुलांना ओंजळीत घे, डोळेभरुन त्यांना बघून घे. तुझ्या चेहर्‍यावरुन अलगद त्या फुलांना सोड. त्या नाजुक फुलांच्या तुझ्या गालाला होणार्‍या गुदगुल्या बघ तुझ्या ओठांवर हसू फुलवतिल. मला अजुन काय हवं? काही नको! तुझं फक्त एक मधुर हास्य. हसताना तुझ्या गालांवर स्वार झालेले तुझे ओठ आणि हसणारे डोळे! हे सगळं मला हवयं! पण कधी कधी हे सगळं माझ्यापासून दुरावत चाललेलं असतं. दुर कूठे तरी अथांग समुद्रात वाट चुकलेल्या गलबतासारखी तू माझ्यापासून दुर जातेस. मी तुझ्यापर्यंत पोहचण्याच्या इर्ष्येने त्या अथांग समुद्रात स्वःताला झोकून देतो पण हातपाय मारुन पाणी कापण्याचा माझा वेग फार कमी पडतोय. त्या भरलेल्या समुद्रात, चोहोबाजुनी वेढलेल्या खार्‍या पाण्यात मी तुला दूर जाताना बघत तरंगतोय. पुन्हा किनार्‍यावर परत फिरावेसे वाटत नाही. पण खरचं मला सोडून जाउ नको, अगदी स्वप्नातही...

मला सोडून जाउ नकोस
खरं सांगतो मरुन जाईन
माझ्या अंगणातला पारिजात
तुझ्या अश्रुंवर फुलं वाहील..
.


आता पुन्हा नेहमीसारखी ती रात्र येईल. मी पुन्हा रात्रभर तुला चांदण्यात शोधत फिरत राहीन. पुन्हा रात्रभर जागून पहाटेची वाट बघत राहीन. पहाटे पडणार्‍या त्या गोड स्वप्नाची. पण आज रात्रभर जागुनही पहाटे मला झोप येत नाहीय. रात्र उलटुन हळूहळूपहाटेकडे झुकतेय पण माझे डोळे सताड उघडे, खिडकीतून अंगणातल्या पारिजातकाकडे बघत आहेत.काही केल्या माझे डोळे मिटायला तयार नाहीत. जणू तो पारिजात मला खुणावतोय, मला बोलावतोय! मी ऊठून त्या पारिजातकापाशी जातो. त्याच्याकडे उद्विग्न नजरेने पाहतोय. माझ्या नजरेतली उद्विग्नता त्याला कळते. तू नसल्याची जाणिव त्यालाही आहे. वाराही आज त्या वेगाने वाहत नाहीय. तू नसल्याने सारं काही शांत आहे. निश्चल आणि विषण्ण आहे. आता वारा कुणाची छेड काढणार? त्याच्या त्या छेडण्याने कोण शहारुन माझ्या मिठीत येणार! असू दे ! तसही स्वप्नंच होतं ते नाही??  मी त्या निरभ्र आकाशाकडे बघून तुला विचारतोय पहाटेची स्वप्नं कधी खरी होतात का गं???

तू नसताना सतावते
पारिजातकी अल्लड सकाळ,
हवयं मला शेवटचं एकदा
तुझ्या मिठीतलं उरलेलं आभाळ.....
.....

21 comments:

  1. 'तू नसताना सतावते
    पारिजातकी अल्लड सकाळ,
    हवयं मला शेवटचं एकदा
    तुझ्या मिठीतलं उरलेलं आभाळ.....'

    सुंदर दीपक!
    असं नेहेमी का होतं...
    वेदना का अधिक सुंदर दिसू लागतात?
    :)

    ReplyDelete
  2. जखमा सुगंधी अशा झाल्या काळजाला...
    केला वार ज्याने तो पारिजातक असावा.

    ReplyDelete
  3. हे दी...आता पाणी पारिजातकावरून वाहायला लागलं बाबा...

    मम्मीचा नं दे...तूझ्या लग्नाची तारीख फिक्स करायला लागणार...

    तू लिहलेलं वाचून तूझ्याच प्रेमात पड्णा-या मुलींपासुन सावधान...

    बाकी पोस्ट नेहमीपेक्षा जास्तच अप्रतिम...

    ReplyDelete
  4. दीप्या...अप्रतिम...खुप जबरदस्त ....प्रचंड आवडलेली पोस्ट :)

    ReplyDelete
  5. आभार अनघा !
    काय सांगु वेदना अशा का अधिक सुंदर दिसू लागतात, कदाचित त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी सुंदर आणि प्रेमळ झाली की त्या वेदनाही तितक्याच सुंदर दिसू लागतात..
    सारे नजरेचे आणि मनाचे खेळ !

    ReplyDelete
  6. हे हे हे सिद्धु अगदी बरोबर !
    सुगंधी वार ज्याने केले तो पारिजातच आहे! :):)

    ReplyDelete
  7. आभार सारिका !!
    दुथडी भरुन वाहणारी नदी एक्वेळ ओसरेल गं पण बहरलेला पारिजात मनातून कधी ओसरत नाही, तो असाच निरंतर मनातून भरुन वाहू लागतो ! :)

    बाकी मम्मीचा नंबर कशाला हवा? ती बिचारी वाटच बघतेय की मी कधी कुणाला घेउन येतोय ते !!

    ReplyDelete
  8. यवगेशा ! खूप खूप आभार प्रतिक्रियेबद्दल !!

    ReplyDelete
  9. तू नसताना सतावते
    पारिजातकी अल्लड सकाळ,
    हवयं मला शेवटचं एकदा
    तुझ्या मिठीतलं उरलेलं आभाळ.....


    मान गये दिप्या शेठ...शब्दांचा धनी आहेस. चारोळ्यांचा तरी नक्कीच.

    अप्रतिम आवडली

    ReplyDelete
  10. धन्यवाद सुझे भाउ !!
    कसला धनी रे ! आळसातुन वेळ मिळाला की असं काही तरी खरडतो !!
    बाकी चारोळ्यांच्या बाबतित म्हणशील तर मला आपोळ्या, सुपोळ्या आणि अ‍ॅप्सोळ्या जाम आवडतात!!
    त्यांच्यावर एक पोस्ट टाकवी लागेल !! :):):)

    ReplyDelete
  11. सुंदर.. अप्रतिम.....

    ReplyDelete
  12. धन्यवाद इंद्रधनू!
    आणि ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत !:)

    ReplyDelete
  13. दीपक, खरं तर ही पोस्ट मी कधीच वाचली पण त्यावेळी खूप धावपळ सुरु होती म्हणून आज पुन्हा थोड्या निवांतपणे वाचून कमेंट देतेय....
    तुझ्या चारोळ्यामधून बरेच दिवस पारिजातकाची भेट होत होती..या पोस्ट मध्ये तो पूर्णपणे भेटला असं म्हणेन...खूपच सुंदर लिहिलंस...म्हणजे चारोळ्या सुंदर की हे लिहिलंस ते सुंदर असं प्रश्न पडावा...खूप हळवा क्षण पकडीत घेतल्यासारख....तुझा चारोळीसंग्रह निघेल आणि त्यानंतर तुझ्यासाठी "नक्षत्रांचे देणे" करू तेव्हा हे वाचायला मला नक्की आवडेल....:)

    ReplyDelete
  14. अपर्णा !! काय बोलु मी आता???
    तुझ्या या प्रतिक्रियेने मी खरंच भारावून गेलोय.
    आतापर्यंतची मला सगळ्यात आवडलेली, भावलेली आणि टॉप कमेंट आहे ही !!
    खूप खूप धन्यवाद गं !!

    ReplyDelete
  15. नमस्कार दीपक
    मी नेहमी तुझा ब्लॉग वरचे पोस्ट्स वाचतो खूप छान असतात
    मनाला भावणारे, कुठेतरी स्वताला शोधायाला लावणारे मस्तच

    "तू नसताना सतावते
    पारिजातकी अल्लड सकाळ,
    हवयं मला शेवटचं एकदा
    तुझ्या मिठीतलं उरलेलं आभाळ....."

    अप्रतिम आहे हि चारोळी ...
    thanks हा सगळा आनंद दिल्याबद्दल

    यशवंत

    ReplyDelete
  16. प्रिय यशवंत,

    प्रतिक्रियेकरता अनेक आभार ! मनापासुन जे सुचतं ते लिहायचा प्रयत्न करतो !
    अशीच भेट देत राहा ! आनंद देण्याचा मझा नेहमी प्रयत्न राहील. !

    दीपक परुळेकर

    ReplyDelete
  17. वेदनांनाही पारिजातकाच्या सुगंध लाभावा...
    ओल्या पापणीतही हास्याचा बुरखा चढावा...

    खुप छान....

    ReplyDelete