Monday, October 10, 2016

पद्मनाभपूरम महाल:त्रावणकोर साम्राज्याचा कलात्मक साक्षिदार


गेल्यावर्षी कम्पनीच्या कामानिमित्त ३-४ वेळा तुतिकोरीनला जावं लागलं. तुतिकोरीन हे नाव यापूर्वी कधी ऐकलं होतं का तुम्ही? ऐकलं असेलही! पण बऱ्याचजणांना हे नाव माहिती देखील नाही. गम्मत म्हणजे माझ्या एका मित्राने विचारलं,”अरे तिकडे जायला व्हिजा वैगरे लागतो का?” असो. घाबरू नका. हे ठिकाण भारतातच आहे. तामिळनाडू राज्यात पार खाली, तिकडे कन्याकुमारीच्या बाजूला. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात या शहराचं नाव वाचलं होतं. इथल्या समुद्रात भरपूर प्रमाणात मोती सापडतात. मोती असलेल्या शिंपल्यांच्या शेतीसाठी देखील हे शहर प्रसिद्ध आहे. पण खरं तर मला या शहराबद्दल इथे लिहायचं नाहीये. ज्या अद्भुत आणि अप्रतिम अश्या वास्तूबद्दल मला लिहायचं आहे तिथे मी कसा पोचलो यासाठी या शहराचा संदर्भ.

तर ३-४ वेळा मला तुतिकोरीनला कामानिमित्त जावे लागले. खरं तर मला हे शहर अजिब्बात आवडले नाही आणि पुन्हा आवडेल असेही नाही. पण काम असल्याने मला तिथे जावे लागत होते. बरं क्लायंट सरकारी असल्याने काम लवकर होत नव्हतं, त्यामुळे सारखा मुक्काम वाढायचा. मला कुठेही एकट्याला फिरायला अजिब्बात आवडत नाही आणि मुंबईसोडून दुसरीकडे ४-५ दिवसांच्या वर मुक्काम अजिबात जमत नाही. पण यावेळी पापी पेट का सवाल असल्याने इथे प्रत्येक भेटीत १५-२० दिवस मुक्काम होत होता. त्यात आठवडाअखेर सरकारी कार्यालयाला सुट्टी असल्याने शनिवार-रविवार हॉटेलवर लोळत, टीव्ही बघत घालवत होतो. अति वैताग आला म्हणून मग एकदा मदुराईला जाऊन मीनाक्षी मंदिर आणि तिथूनच जवळ असलेला प्रसिद्ध थिरूमलाई नायक्कर महाल बघून आलो. एका भेटीत कन्याकुमारीला जाऊन आलो. खरंतर अश्या ठिकाणी एकटं फिरणं ही मोठी शिक्षा असते. कुणीतरी सोबत बोलायला असणं फार गरजेचं असतं. असो. तुतिकोरीनच्या शेवटच्या भेटीतहि मुक्काम १५-२० दिवस झाला होता. यावेळी जाताना सोबत कॅमेरा घेऊनच गेलो होतो. यावेळी तिथून जवळ असलेल्या रामेश्वरम आणि निघताना केरळला श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन मुंबईला परतायचा बेत केला होता. कामासोबत थोडी फोटोग्राफीहि होईल असा विचार केला. मागच्यावेळी कॅमेरा सोबत नसल्याने कन्याकुमारीची भेट अगदी रुखरुख लावून गेली होती; इतक्या अप्रतिम फ्रेम्स तिथे होत्या. तर पद्मनाभस्वामीला जायची माहिती गुगलवर शोधताना अचानक ‘पद्मनाभपूरम पॅलेस’ या जागेने लक्ष्य वेधून घेतलं. मग त्याची माहिती मिळवताना आणि गुगलवर काही संदर्भ वाचताना निर्धार केला की आधी हाच महाल बघून घेऊया.

गुगल नकाशावर तुतिकोरीन ते पद्मनाभपूरम महाल हे अंतर मोजले. कुठून कुठे जायचे याचा बेत आखला. एका दिवसात जाऊन येण्यासारचे अंतर होते. त्यात आधी कन्याकुमारीला मी याच मार्गाने गेलो होतो त्यामुळे काळजी नव्हती. एका शनिवारी पहाटे पाच वाजता उठलो आणि पटपट आवरून हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या तुतिकोरीन सिटी बस स्टँडवरून तिरुनलवेलीला जाणारी बस पकडली. तिरुनलवेली हे नागरकोइल-बेंगळूरु-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरी एक मुख्य शहर आहे. पाउण तासात तिरुनलवेलीला पोचलो, तिथून मग नागरकोइलला जाणारी बस पकडली. तामिळनाडू राज्यातले हे रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत. मी सगळा प्रवास तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधूनच केला. सरकारी बसेसची अवस्था पुण्यातल्या पीएमटीला लाजवेल अशी पण रस्ते सुबक असल्याने काही वाटत नव्हतं. ड्रायव्हरदेखील एफवनच्या ड्रायव्हरला लाजवेल अशी तुफान पण संयमित ड्रायव्हिंग करतात. हायवेवरून सुसाट धावताना उजव्या बाजूला असलेल्या उत्तुंग पर्वतरांगा मन वेधून घेतात. आणि त्या पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या, वाऱ्याने भिरभिरणाऱ्या असंख्य पवनचक्क्या बघून थक्क व्हायला होत होतं. उजव्या बाजूच्या पर्वतरांगा ओलांडल्या की तिकडे केरळ. या पर्वतरांगा म्हणजे पश्चिम-घाटाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच शेवटच्या टोकाच्या पायथ्याशी म्हणजे वेल्ली पर्वताच्या सुंदर अश्या बॅकड्रॉपवर वसलेला आहे पद्मनाभापूरम पॅलेस. पण तिथे पोचायला अजून बराच वेळ होता.


तासा-दीड तासात नागरकोइलला पोचलो. इथे दक्षिणेत दुसऱ्या राज्यातून आलेल्या माणसाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून आलेल्यांना दोन मोठ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागतं; एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे जेवण. जेवणाच्या आणि भाषेच्या बाबतीत माझा चेन्नईमधला अनुभव देखील अतिशय वाईट होता. जेवण एकवेळ आपण वेळ मारून नेऊ पण भाषेचं काय करणार? इथले लोक तमिळ शिवाय काहीच बोलत नाही. येत असेल तरी हिंदी मुद्दाम बोलत नाहीत, नाहीतर आपण महाराष्ट्रातले लोक समोरचा मराठीत असेल तरी हिंदीत सुरु होतो. नागरकोइलला पोचल्यावर इथून पद्मनाभपूरम पॅलेसला जायला १४ किमी वर असलेल्या ‘थकलाई’ (Thuckalay) या गावी पोहचायचे होते. बऱ्याच लोकांना हिंदीत विचारून बघत होतो, पण कुणीच दाद देत नव्हतं. इकडल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं इंग्लीश देखिल भयानक असतं. मला जिथे जायचं होतं त्या गावाचं नाव कुणालाच समजत नव्हतं. शेवटी एक देवमाणूस भेटला त्याने मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तो देखील त्याच मार्गाने थिरूवनंतपुरमला चालला होता. त्याच्यासोबतच मी बस पकडली. ही बस मस्त होती. सुंदर नक्षिकाम केलेल्या लाकडी खिडक्या वैगरे होत्या. मला गम्मतच वाटली. मग त्या माणसाने सांगितलं की ती केरळ ट्रान्सपोर्टची बस होती. नागरकोइल सोडताना एक सुंदर नदी ठिकठिकाणी सोबत करत होती. २० मिनिटात मी ‘थकलाई’ गावात पोचलो तेव्हा साधारण अकरा वाजले होते. ‘थकलाईहून आता पद्म्नाभापूरमला जायला अजून एक बस पकडली आणि ५ मिनिटात महालाच्या ठिकाणी पोचलो.

या महालाचे प्रथम दर्शन अतिशय मुग्ध करणारे होते. पद्मनाभपुरम किल्ल्याच्या आवारात हा अतिशय सुंदर असा महाल गेली ३५०-४०० वर्षे उभा आहे. महालाच्या मागच्या बाजूला असलेला उत्तुंग अश्या वेल्ली पर्वताच्या बॅकड्रॉपवर हा नक्षिदार महाल अतिशय उठून दिसत होता. पर्थम दर्शनी मला राहवले नाही इतकावेळ बॅगमध्ये पडून आराम करणारा कॅमेरा काढला आणि आवारातून काही फ्रेम्स टिपल्या. नंतर बाजूला असलेल्या तिकीटघरातून माझे आणि माझ्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे तिकीट घेतले. बॅग आणि बूट तिथल्या अमानतघरात जमा केले आणि आम्ही दोघे (मी आणि माझा कॅमेरा) महालात शिरलो.


त्रावणकोर साम्राज्याची राजधानी असलेली ही जागा आणि तिथे उभं असलेलं हे नितांत सुंदर वास्तुशिल्प आजही त्या गतवैभवाची साक्ष देत उभं आहे. ई.स. १६०१ मध्ये त्रावणकोर साम्राज्याचा त्यावेळचा अधिपती, राजा इरावी वर्मा कुलसेखरा पेरूमल याने हा महाल बांधल्याचे समजते. त्याने १५९२ – १६०२ पर्यंत त्रावणकोर साम्राज्याची धुरा वाहिली. हा संपूर्ण महाल एकाच राजाच्या कार्यकालात बांधला गेला असे नाही; कारण या महालाच्या आवारात असलेली ‘थाई कोट्टरम’ अर्थात ‘राणीच्या आईचा महाल’ ही इमारत अंदाजे ई.स. १५५० साली बांधण्यात आली. म्हणजे यामितीला ५०० वर्षाहून अधिक काळ लोटला आणि तरीही ही इमारत आणि त्यावरील लाकूडकाम आजही जसेच्या तसे आहे. ई.स. १७५० साली राजा अनिझाम थिरूनल मार्थांड वर्मा याने हा संपूर्ण महाल बांधून काढला आणि ते शहर आपलं कुलदैवत श्री पद्म्नाभाला अर्पण केलं त्यावरून मग या महालाला देखील हेच नाव पडले. पुढे त्रावणकोर साम्राज्याची राजधानी त्रिवेंद्रमला नव्याने स्थापण्यात आली आणि पद्मनाभपूरम महालाची रया गेली. आता जरी ही जागा भौगोलिकरीत्या तामिळनाडू राज्यात असली तरी हा महाल आणि महालाची जागा केरळ सरकारच्या अखत्यारीत आहे. या महालाची देखरेख केरळ पुरात्तव विभागाद्वारेच केली जाते. 
चला तर मग या महालाची अद्भूत सफर करूया:

सहा एकर परिसरावर पसरलेल्या या भव्य महालात लहानमोठ्या अशा १४ वास्तू उभ्या आहेत. महालाच्या मुख्य दरवाजातून म्हणजेच ‘पुड्डीपुरा’मधून आपण प्रवेश करताच ‘पूमुखम’ या स्वागतकक्षात दाखल होतो. इथे समोरच असलेल्या स्वागातदारावरील लाकडावरची नक्षि  आणि कोरीव असे ग्रॅनाईटचे खांब आपलं लक्ष्य वेधून घेतात. इथेच पुरातत्वविभागाद्वारे नेमून दिलेले काही तरुण तुम्हाला माहिती देण्यासाठी उभे असतात. हिंदी, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजीपैकी तुम्हाला जी भाषा हवी ती निवडू शकता आणि त्या भाषेत माहिती पुरवली जाते. या स्वागतकक्षाचे छत देखील अतिशय रेखीव अशा लाकूडकामाने सजविले आहे. वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ९० फुले या स्वागतकक्षाच्या छतावर कोरली आहेत. बघून डोळेच काय कॅमेरा देखील थक्क होतो! अतिशय सुंदर असा हा स्वागतकक्ष बघून झाल्यावर मार्किंगला अनुसरून मी पहिल्या माळ्यावर गेलो. इथे ‘मंत्रासाला’ म्हणजे राजाची आणि मंत्रिमंडळाची बैठकीची खोली आहे. या खोलीत प्रकाश, तापमान आणि हवा यांचा सुरेख मेळ जमवला आहे त्यामुळे या खोलीत नेहमीच एक प्रकारचा गारवा पसरत असतो. मंत्रासाला जोडून खाली ‘उत्तुपुरा’ म्हणजे भोजनगृहात उतरायचे. ७२ बाय ९ मीटरचा हे भोजनगृह म्हणजे त्यावेळचे कँटिन असावे. एकेवेळी २००० लोक जेवायला बसायची क्षमता असलेल्या या भोजनगृहात त्यावेळी सणासुदीला राजाकडून गरीब प्रजेला भोजन दिले जाई. तिथे एका जागी भली मोठी चीनी मातीची भांडी अजूनही आहेत. ही भांडी मुख्यत्वे लोणची आणि मसाले मुरवायला वापरायचे अशी माहिती तिथल्या माहितीगाराने पुरवली.


तिथून पुढे आपण ‘थाई कोट्टारम’ म्हणजेच राणीच्या आईच्या महालात प्रवेश करतो. आधीच सांगितल्याप्रमाणे हा दुमजली महाल सर्वात आधी म्हणजे १५५० साली बांधण्यात आला. आणि तेव्हापासून ही वास्तू आजही सुस्थितीत आहे. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एकांथ मंडपम’ म्हणजेच तिथला व्हरांडा आणि या व्हरांड्यात असलेले अतिशय सुबक, अद्भूत असे नक्षिकाम केलेले कोरीव खांब. इथलं छत देखील अप्रतिम अश्या कोरीव लाकडी फुलांनी सजवले आहे. त्याकाळी या महालाचे बांधकाम करताना जो मुख्य खांब आधारस्तंभ म्हणून रोवला होता तो फणसाच्या झाडाचा खांब आपण आजही तिथे पाहू शकतो. ‘थाई कोट्टारम’ प्रामुख्याने राजघराण्यातील स्त्रिया अंत:पूर म्हणून वापर करत असत. या महालात चार बाजूला चार मोठे शयनकक्ष आहेत.


‘थाई कोट्टारम’ बघून पुढे बाहेर पडून मार्गिकेच्या खुणेनुसार एका चिंचोळ्या गल्लीतून चालत ‘उप्परीकामलिका’ या दुसऱ्या वास्तूत प्रवेश करायचा. परिसरातली ही सर्वात उंच आणि तशी एकदम नवी वास्तू ई.स. १७५० मध्ये राजा मार्थंड वर्मा याने बांधली. ही वास्तू त्याने आपले कुलदैवत श्री पद्मनाभ याला अर्पण केली म्हणून या वास्तूला ‘पेरूमल कोट्टरम’ म्हणजेच देवाचा महाल असेही म्हटले जाते. ‘उप्परीकामलिका’ याचा शब्दश: अर्थ अनेक मजले असलेली वास्तू असा होतो. या महालाला एकूण तीन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर कोषागार आहे तर दुसऱ्या मजल्यावर राजाचे शयनकक्ष आहे. या शयनकक्षात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवायची व्यवस्था आहे. अतिशय सुबक अश्या एकून ६४ प्रकारच्या लाकडी नक्षीकामाच्या जोडणीतून राजाचा झोपायचा पलंग या खोलीत आहे. त्या पलंगावरील नक्षिकाम डोळे दिपविणारे आहे. तिसऱ्या मजला हा प्रार्थनेसाठी वापरण्यात येत असावा. इथे तिसऱ्या मजल्यावर नितांत सुंदर, अप्रतिम आणि खरोखर शब्दात ज्यांचे सौंदर्य मांडता येणे शक्यच नाही अशी १७ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. कितीही पाहिली तरी डोळे आणि मन भारत नाहीत इतकं सौंदर्य त्या भित्तीचितत्रात सामावलेलं आहे. ज्या निष्णात कलाकाराने ही चित्रे काढली, त्यात मनमोहक रंग भरून ती फुलवली त्या अज्ञात निर्मिकाला आपण मनोमन नमन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहि. (सुरक्षेच्या कारणावरून या भित्तीचित्रांचे फोटो घ्यायला बंदी आहे.)


उप्परीकामलिकाला जोडूनच पुढे ‘प्लामूट्टील कोट्टारम’ नावाचा दुसरा महाल आहे. या महालाचे सगळे इंटेरिअर लाकडापासूनच बनविले आहे. छोट्या, छोट्या लाकडी पुलांनी हा महाल उप्परीकामलिकाला जोडला गेला आहे. ‘वेप्पीनमोडू कोट्टारम’ ही वास्तू ‘पुमुखम’ला जोडली गेली आहे. या वास्तूचे व्हरांडे अतिशय कलात्मकतेने उभारले आहेत. स्टेन्ड ग्लास आणि मायकाचा वापर करून एक सौम्य प्रकाश इथे खेळविला आहे. त्या काचेवरील चित्रे देखील अप्रतिम आहेत. खरं तर या महालातून फिरताना आपण एका भूल भूलैय्यातून फिरत असलाच भास होतो. आणि फिरताना एखाद्या खिडकीतून किंवा सज्जातून मागचा वेल्ली पर्वत खूप छान फ्रेम्स देत राहतो. पुढे ‘इंद्रविलास महालाला जोडून एक लांबलचक कोरिडोअर आहे. या कोरिडोअरच्या भिंतीवर काही ऐतिहासिक जुनी चित्रे आहेत. ‘अंबरी मुखपम’ म्हणजे सज्जा किंवा ‘Bay Window’ हे इथले मुख्य आकर्षण आहे. इथल्या खोल्यांना असलेल्या भल्या मोठ्या खिडक्या, दरवाजे हे फोटोग्राफीसाठी खूप आकर्षक फ्रेम्स मिळवून देतात.


या महालात जरा जास्तच रेंगाळल्यावर बाहेर मोकळ्या आवारात येतो. इथे बाजूला एक छोटे गार्डन आहे. तिथून पुढे आवारात असेलेल्या ‘दक्षिण महाल’ या वास्तूला भेट द्यावी. ही वास्तू केरळी स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर असा नजराणा आहे. अतिशय जुन्या वस्तू जसे की, टेबल, खुर्च्या, काही वाद्ये आजही तिथे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या महालाच्या  परिसरात असलेल्या वास्तू आकाराने छोट्या, एकमेकांना जोडलेल्या होत्या. आणि दरवाजे तर उंचीला अतिशय कमीच. एक दोनदा फोटो घ्यायच्या नादात चांगलाच आपटलो. ‘हे दरवाजे इतके कमी उंचीचे का?” अशी विचारणा केल्यावर तिथल्या माहितीगाराने जे उत्तर दिले ते भारावून टाकणारे होते. तो माहितीगार म्हणाला, “आपण जिथे राहतो, जी वास्तू आपल्याला आधार देते तिचा आदर आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करताना नेहमी झुकून, आदराने प्रवेश करावा; यासाठी हे सगळे दरवाजे उंचीला कमीच असतात.” ही वास्तू म्हणजे ‘दक्षिण महाल’ राष्ट्रीय ठेवा म्हून जाहीर करण्यात आली आहे.

‘पुत्थन कोट्टारम’ म्हणजे नवीन महाल ही या समुहातली सर्वात नवीन वास्तू. या वास्तूचा उपयोग मुदपाकखाना म्हणून केला जाई. यालाच लागून एक सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीचे पाणी जेवणासाठी वापरले जाई. त्यावेळची किचन सिस्टम इथे बघावयास मिळते, तसेच मॉडर्न स्टाईल ग्रॅनाईटसने बांधलेल्या टॉयलेट्सच्या रचना देखील बघावयास मिळतात. संपूर्णपणे ग्रॅनाईटच्या दगडाने बांधलेला ‘नवरात्री मंडपम’ म्हणजे तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा. इथे अनेक कलाकार संगीत, नाट्य, नर्तन अश्याप्रकारच्या आपल्या कला सदर करीत. या नवरात्री मंडपमचे छत म्हणजे एक अक्खा ग्रॅनाईट दगड आहे. त्याला आधार देणारे खांब आणि त्यावर कोरलेल्या मुर्त्या देखील अतिशय सुंदर आहेत. हे सर्व पाहून झाल्यावर मनात आणि कॅमेऱ्यात साठवून मार्गिकेच्या खुणेनुसार पुढे जायचे. ‘थाई कोट्टारम’ ला जोडून एका दुसऱ्या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर सैन्याची शस्त्रे ठेवायची जागा म्हणजेच ‘आयुधपुरा’ आहे. त्याची रचना देखील अत्यंत  सोयीस्कर आहे. आता शस्त्रे तिथे नाहीत. हे संपल्यावर आपण तिथून खाली उतरलो की थेट महालाच्या बाहेरच्या आवारात पोचतो. झाला आपला आतील महालाचा प्रवास. पण बाहेर अजून एक वास्तू आपली वाट पाहत उभी असते. केरळ पुरातत्वविभागाचे एक वस्तूसंग्रहालय इथे आहे. इथे त्रावणकोर (केरळ आणि तामिळनाडू चा काही भाग) मध्ये सापडलेली अति प्राचीन शिल्पे ठेवण्यात आली आहेत. वेळ होता तेव्हा तिथे भेट देऊन आलो.


हे सगळं संपेपर्यंत साडे तीन वाजले होते. खरंतर मी खूप घाई घाईत फिरलो, हा महाल व्यवस्थित बघायला किमान एक पूर्ण दिवस तरी हवा आणि फोटोग्राफी करायची असेल तर दोन दिवस पकडून चला इतक्या अप्रतिम फ्रेम्स मिळतात इथे. स्टील फोटोग्राफीसाठी तर ही जागा स्वर्ग आहे. भारतातून अनेक मोठ्या आर्किटेक्ट कॉलेजेसमधून विद्यार्थी या महालाचा आणि स्थापत्यकलेचा आभ्यास करण्यासाठी येतात. केरळ, कन्याकुमारीला जाणारे परदेशी पर्यटक देखील इथे वाट वाकडी करून येतात. आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा लाकडी महाल असून अजून देखील UNESCO च्या ड्राफ्ट यादीत पडून आहे. या महालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या महालाचे लाकडावरील नक्षिकाम. हा संपूर्ण महाल म्हणजे प्राचीन दक्षिणात्य स्थापत्यकलेचं एक अप्रतिम असं जिवंत उदाहरण आहे. कालपरत्वे महालाच्या रचनेत बराच बदल होत गेला. महालाचे स्थापत्य आणि लाकूडकाम हे अति भव्य आणि नेत्रदीपक आहे. एकएक इमारत बघताना डोळे आश्चर्याने थक्क होतात; इतकं प्राचीन आणि नाजूक कलाकुसर जाणणारे आणि करणारे स्थापत्यविशारद आपल्या देशात होते. पारंपारिक स्थापत्यशास्त्र, निपुण शिल्पकारिता आणि भौतिक विज्ञानाचे सखोल ज्ञान म्हणजे पद्म्नाभापुरम महाल. आजही हे वास्तुशिल्प अतिशय काळजीपूर्वक जतन करणाऱ्या केरळ सरकार आणि पुरातत्व विभागाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या वैभवाची म्हणजेच गड-किल्ल्यांची दुरवस्था बघितली की मन विषण्ण होते. १७०० च्या आसपास बांधलेला आपला शनिवारवाडा आज त्याची जी दुरावस्था झालीय त्याच्याकडे कोणाला बघायला देखील वेळ नाहीय. आपले गड-किल्ले, त्यांची अवस्था तर काय विचारूच नका! फक्त फुकाचा अभिमान आणि माज दाखवण्यात आपण आपल्या या वास्तूंची विल्हेवाट लावत आलोय आणि लावतोय. त्याची ना आपल्याला कदर आहे ना आपल्या पुरातत्व विभागाला! पार तिकडे इंग्लड –फ्रांसला जाऊन बघू नका की पुरातन वास्तू, शिल्पे कशी जपायची ती आपल्या भारतात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे ह्या वास्तुंचा आजही आदर केला जातो आणि त्यांना जपलं जातं. कधी दक्षिणेकडे कन्याकुमारी किंवा थिरूवनंतपुरमला भटकायला आलात तर या वास्तूला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. इतकं सुंदर आणि पुरातन वास्तुशिल्प दुसरीकडे कुठे बघावयास मिळेल की नाही माहित नाही. डोळ्याचे पारणे फिटविणारा हा महाल एकदा तरी डोळे भरून पाहावाच.

कसे जाल? 
कन्याकुमारी पासून : ३६ किमी  
थिरूवनंतपुरम पासून: ६३ किमी. 
जवळचा एअरपोर्ट: थिरूवनंतपुरम
जवळचे रेल्वे स्टेशन: नागरकोइल.