Friday, June 1, 2012

माझी "शाळा".. ( भाग ५ )

दिवाळीची सुट्टी पडेपर्यंत आमचा सगळा सिलेबस शिकून झाला होता. त्यानंतर फक्त सराव एके सराव सुरु होता. शिक्षक जिथुन मिळेल तिथुन सरावसंच, संभाव्य प्रशनोत्तरे, जमवून आणून आमच्याकडुन सराव करुन घेत होते. दिवसभर शाळेत आणि रात्रभर घरी फक्त अभ्यास एके अभ्यास सुरुच होता. मामा मला नेहमी पहाटे चार वाजता उठून अभ्यास करायला सांगत असे पण पहाटेची साखरझोप मला खूप प्रिय होती आणि पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात असा माझा समज होता ( अजुनही  आहे, ;)  ) मी पहाटे लवकर उठुन अभ्यास करावा, माझ्या डोळ्यावर झापड येवू नये म्हणुन मामाने एक शक्कल लढवली. पहाटे साडेचारच्या दरम्यान तो मला उठ्वायचा आणि विहीरीवर आंघोळीला घेउन जायचा. गावतले थंडीचे दिवस आणि त्यात पहाटे - पहाटे विहीरीवर थंड पाण्याने आंघोळ. त्यानंतर आई चहा करुन द्यायची पण इतकं सगळं करुनही मला पहाटे झोप यायचीच. मग मी तडजोड केली आणि मामाला बोललो की हवं तर मी रात्री उशिरापर्यंत जागुन अभ्यास करेन पण पहाटे नाही जमणार. पण रात्री मी वाचायला बसलो की तिथेच बाजुला कोसळायचो, मग आई मला येउन उठवायची, तोंडावर पाणी मारायची, चहा करुन द्यायची. बिचारी माझ्यावर पहारा देत ती सुद्धा रात्रभर जागीच असायची.. आता काय करायचे??? मग शेवटी मी एक युक्ती केली वाचून वाचुन झोप यायची म्हणुन मग मी, एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका घ्यायचो, त्या विषयाला परीक्षेत किती वेळ असतो तो वेळ लावयाचो आणि प्रश्नपत्रिका सोडवत बसायचो. त्याने माझी झोप पण जायची आणि अभ्यासही व्हायचा.

मी आधीच सांगितल्याप्रमाणे, दहावी असल्याने येणारा - जाणारा, कोणीही असो मला अभ्यास करताना किंवा न करतना बघितल्यावर लेक्चर द्यायला सुरुवात करायचा. मला त्यावेळी अशा लोकांचा खूप राग यायचा. उगाच आपली यांची बडबड असायची. करायला, मरायला मी मर - मर अभ्यास करायचो आणि या लोकांची उगाच बडबड. नोव्हें - डिसेंच्या दरम्यान गावातली जत्रा भरायची. कोकणातल्या कोणत्याही गावची जत्रा म्हणजे खूप भारी मज्जा असते. दशावतार, देवीची पालखी, खेळणी, बरंच काही. दोन - तीन दिवस देवीच उत्सव असतो. रात्री मंदिरात दशावतार असतो आणि गावातल्या लोकांना तोच एक विरंगुळा. तर या जत्रेच्या दरम्यान मुंबईतले बरेच चाकरमनी हटकून यायचे. घरी पाहुण्या मंडळींची दोन - तीन दिवस रेलचेल असायचीच. त्यावेळी आमच्या ही घरीच अशीच पाहुण्यांची गर्दी झाली होती. मी माझ्या खोलीत गुपचूप अभ्यास करत बसलो होतो. माझा मोठा मामा जो मुंबईला असायचा तो ही गावी जत्रेसाठी आला होता. संध्याकाळी माझे मित्र मस्त नविन कपडे वैगरे घालुन जत्रेला जायला निघाले आणि मला न्यायला माझ्या घरी आले. तसं मी जत्रेला गेलो असतो तर एका दिवसानी तसा काही विषेष फरक नसता पडला. पण त्यावेळी मोठ्या मामाने मला भरपूर काही सुनावलं. ते ऐकून मी आणि आई दोघे ही जत्रेला गेलो नाही ते आतापर्यंत अजुन योग आलाच नाही. असो. 
तसं ही मला जत्रेला जायचं नव्ह्तंच कारण दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मला विज्ञान निबंध स्पर्धा आणि मेळाव्याला वेतोरे हायस्कूल ला जायचं होतं. सकाळी उठुन मी बस स्टॉपवर जाउन उभा राहीलो. जत्रा संपवून सगळी मंडळी परत आपापल्या घरी जात होती. त्यात माझा एक नातेवाईक ही होता. त्याने मला पाहिलं आणि बरळायला लागला. 
तुला अक्कलच नाही, दहावीच वर्षं; जत्रा कसल्या करतोस, अभ्यास नाही काय नाही.. आणि काय काय बरळायला लागला.. ऐकुन ऐकून घेतलं आणि मग डोकं सटकलं.. तिथेच त्याला खरं - खोटं सुनवलं आणि तडक गाडी पकडून वेतोर्‍याला गेलो. 
विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धा आटोपून घरी आलो पण यावेळी माहित होतं की निबंध स्पर्धेत नंबर येणार नव्हता.. संध्याकाळी घरी आलो तेव्हा माझ्या मामाला त्या नातेवाईकाने अगोदरच सकाळचा किस्सा तिखटमिठ् लावून सांगितला होता. मामा मला त्याच्या समोर ओरडला. मग रात्री वॉकच्या निमित्ताने मला बाहेर घेउन गेला आणि माझी समजूत काढली. त्यावेळी मला जाणवू लागलं होतं की मामा मला आता मारत नव्हता. फक्त त्याला माझी कंप्लेंट कुणाकडुन मिळाली की तो ओरडायचा. खूप काही बोलायचा. पण मारायचा नाही. लहानपणी मामाकडून खूप मार खाल्ल्ला होता राव... आता अभ्यासाला नुसतं उधाण भरलं होतं. प्रशांत आणि माझ्यात मार्क्स मिळवायची खूप स्पर्धा सुरु होती. माझ्या अभ्यासाबरोबर मी माझ्या दत्तक मुलांचा ही अभ्यास घेत होतो.

एकदा भूमितीच्या तासाला घाटवळ सर आम्हाला काही तरी शिकवत होते. घाटवळ सरांची शिकवण्याची पद्धत खूप भारी होती. प्रत्येकवेळी काही तरी लाईव्ह उदाहरणे देउन ते एखादा विषय समजावून सांगायचे. आणि मारताना टोच ओढायचे. टोच म्हणजे नाक आणि ओठांच्यामधला जो भाग असतो ना तो धरुन जोरात ओढायचे.  एकदा असंच काही तरी शिकवता शिकवता ते आमच्या बेंचपाशी आले. आमच्या म्हणजे मी आणि प्रशांत एकाच बेंचवर बसायचो. तर ते समोर आले आणि बोलायला लागले,
"समजा, हा आपला परुळेकर आणि हा प्रशांत. दोघे ही मित्र आहेत. दोघे ही एकाच बेंचवर बसतात, अभ्यास करतात. तर समजा परुळेकरच्या हातात दोन लाडु आहेत आणि प्रशांत कडे तीन लाडु आहेत. परुळेकरने प्रशांतला एक लाडू दिला." 
इतकं बोलले आणि ते क्षणभर थांबले वर्ग शांत होता. आणि सर मला आम्हाला उद्देशून बोलु लागले,
"काय रे एकमेकांना लाडू देता की नाही?"
सरांनी असं विचारताच बाबजी गावडे ओरडला, "सर, सर! ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत." ....
"काय्य्य्य्य्य्य??? बोलत नाहीत??? कधी पासुन ?"
"सर आठवी पासुन ?
"आठवीपासुन??" सरांना डबल शॉक..
म्हणता म्हणता ही बातमी शाळेच्या ऑफिसमध्ये पोचली. परुळेकर आणि प्रशांत गेली तीन वर्षे एकत्र, एकाच बेंचवर बसतात पण एकमेकांशी बोलत नाही आणि एका ही शिक्षकाच्या लक्ष्यात ही गोष्ट आली नव्हती. सगळे शिक्षक आमच्या वर्गात आले आणि मुलांचाही गोंधळ सुरु झाला. म्हणजे आम्ही दोघे बोलत नाहीत हे वर्गात सगळ्यांना माहीत होतं पण त्यात इतकं काही विशेष असं नव्ह्तच मुळी. आठवीत असताना एकदा कोळसुलकर, नाईक , नयन, आणि काही मुलांनी मला शाळा सुटायच्या वेळी माझं डोकं खाली असताना चापट्या मारल्या होत्या आणि त्यावेळी प्रशांतनेही हात साफ करुन घेतले होते. त्यामुळे मला त्याचा राग आला होता आणि मीच त्याच्याशी बोलायचा बंद झालो होतो. त्या वयात या मारामार्‍या, एकमेकांशी न बोलणं हे चालायचंच.
मग काय आमचं भरत मिलन घडवण्यात आलं. पण त्यानंतरही आम्ही धड बोललो नाहीच..
**********************************************************************************************************************************************************************************************************************************************
तीन वर्षे होत आली होती, ना आमची कुठे सहल गेली होती ना शाळेत स्नेहसंम्मेलन झालं होतं. त्यामुळे आम्ही सगळेच वैतागलो होतो. स्नेहसंम्मेलन नको निदान सहल तरी घेउन जा म्हणून आम्ही शिक्षकांच्या मागे लागलो होतो. सुरुवात आम्ही सातार्डेकर मॅडम पासुन केली. त्यांना सहलीसाठी मस्का मारु लागलो. काही दिवसांनी आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकदाची सहल ठरली. ठीकाण ठरलं गोवा. तिनही वर्गातुन कोण कोण येणार आहेत याची यादी बनवली जाउ लागली. प्रत्येकी ३०० रु. ठरले होते. जेवणाचा डब्बा प्रत्येकाने आणायचा होता. सहल एका दिवसाचीच होती. आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. सहलीच्या १५-२० दिवस अगोदरच मी वडीलांना पत्र लिहून थोडे पैसे आणि कपडे पाठवायला सांगितले होते पण सहलीला ३-४ दिवस राहिले तरी त्यांनी काही पाठवलं नाही. आईला सांगितलं होतं पण ती तरी कुठुन अरेंज करणार होती??  त्या महिन्यात मामाची परिस्थिती ही थोडी वीक होती. थोडक्यात माझी सहल हुकणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली. दोन दिवस अगोदर सगळ्यांची फायनल लिस्ट तयार झाली होती. मी खूप अपसेट होतो. मित्राना काही बोललो नव्हतो. सातार्डेकर बाई वर्गात आल्या आणि त्यांनी दहावीच्या वर्गातल्या लिस्टमधुन कुणी कॅन्सल होतयं का असं विचारलं. मी हळूच उभा राहिलो. सगळेजण माझ्याकडे बघू लागले. मला परिस्थितीची पूर्ण जाणिव होती. सहलीला भरायला पैसेच नव्हते तर कसली सहल?? मी काही बोलणार इतक्यात सातार्डेकर मॅडम बोलल्या, ''बस्स खाली!"
"पण मॅडम!" मी कचरत बोलायचा प्रयत्न करु लागलो..
"खाली बस, बोलले ना! "
मी गप्प बसलो.. नंतर कळलं की आईने  कुठून तरी पैसे अरेंज केले होते आणि शाळेत पाठवून दिले होते. 
त्यावेळी माझा मोठा मामा मुंबईहून गावी आला होता आणि मी सहलीला चाललोय म्हणून सारखा ओरडत होता पण सुधीर मामाने त्याला समजावले की काही फरक पडत नाही सगळेचजण जातायत.
शेवटी एकदा सहलीचा दिवस उजाडला. सकाळी सात वाजता शाळेत जमायचे होते. माझे नेहमीचे नवीन कपडे जे मला आठवीत असताना घेतले होते ते काढले. तीन वर्षे मी तो एकच ड्रेस ठेवणीतला ड्रेस म्हणून वापरत होतो. ती ट्राउझर पायच्या घोट्याच्यावर आली होती आणि ते शर्ट, त्याचा केव्हाच रंग उडुन गेला होता. पायात गावातली "पायल" या ब्रँडची रबरी स्लीपर. सहलीला जातोय खरा पण हातात पैसे नकोत का?? आईने कुणाकडुन तरी मागुन आणलेले ३० रु . माझ्या हातावर ठेवले. यापेक्षा सहलीला न जाणं मला परडवलं असतं पण पुन्हा हे सगळं मिळणार नव्हतं. मित्रांसोबत ही मज्जा मिस्ड करणं ही मला जमलं नसतं. तसं पण गावतली सगळीच मुलं काही फॅशनेबल कपडे घालुन येणार नव्हती. सगळ्यांचाच अवतार सेम असणार हे मला माहीत होतं पण त्यातल्या त्यात माझे वडील मुंबईला असयाचे त्यामुळे... 
असो.. जाउ दे त्या सगळ्या कटु आठ्वणी.. 
आई त्यावेळी बोलली होती ," हे सगळं बदलेल एक दिवस, आणि तू बदलायला हवंस.. " 
आता कधी शॉपिंगला गेल्यावर ते दिवस आठ्वतात.. 
बॅक टू द सहल...
तर आईने दिलेले ३० रु. आणि जेवणाचा डब्बा घेउन मी मित्रांसोबत शाळेत पोचलो. सगळेजण मस्त रंगीबेरंगी कपडे घालुन बागडत होते. शिरोडकरही सुंदर दिसत होती.. सहलीला जाण्यासाठी ५ ट्रॅक्स आणि एक मिनीबस होती. त्यामुळे एकाच बसमधुन प्रवास करण्याचा आणि टवाळक्या करण्याच्या आमच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्या ५ ट्रॅक्स मध्ये ग्रुपने मुले बसवली गेली. आणि प्रत्येक ट्रॅक्समध्ये एक शिक्षक असे बसले होते. आम्ही म्हणजे, मी, कोळसुलकर, नाईक, प्रशांत, शांतराम (आबा), सदाशीव, आणि इतर टगे असे १० -१२ जणांचा ग्रुप करुन एका ट्रॅक्सवर कब्जा केला. मातोंडकर सर आमच्या ट्रॅक्सजवळ आले आणि विचारु लागले, "पोरांनो, मला जागा आहे का रे इथे?"
आम्ही सगळे ओरडलो, " सर, नाही, नाही! फुल्ल झालीय ही ट्रॅक्स!"
सर हसले आणि बोलले " ठीक आहे मजा करा. कोळसुलकर, परूळेकर तुमच्यावर जबाबदारी या ट्रॅक्सची!!"
" हो सर! आम्ही सांभाळतो! " मी बोललो..
सर दुसर्‍या ट्रॅक्समध्ये गेले. सगळ्या गाड्या सुटल्या.. आणि  गोव्याच्या दिशेने निघाल्या. आमचा गावापासुन गोवा बाय रोड फार लांब नाही. सांवतवाडीहुन हार्डली १-२ तासांचं रनिंग..
ट्रॅक्समध्ये आम्ही फुल्ल धम्माल करत होतो. गाणी गात होतो. एकमेकांची खेचाखेची फुल्ल धम्माल सुरु होती.  वाटेत नाईक, आबा हे लोक्स खायला काही ना काही घेत होते. माझ्याकडले ३० रु. कसे खर्च करु? काय घेउ ? या विचारातच मी तसेच सांभाळून ठेवले होते. बरं वाटत नव्हतं पण सगळे मस्तीच्या मूडमध्ये होते त्यामुळे ... 

गोव्यातली काही निवडक ठीकाणं, जसं ओल्ड चर्च, शांतादुर्गा मंदीर, मंगेशीचं मंदीर, डोनापॉला पॉईंट, म्हापसा बाजार अशा ठीकाणांना भेट देउन आमची सहल संपणार होती.
सर्वात पहिल्यांदा आम्ही ओल्ड गोव्याला गेलो तिथे Basilica of Bom Jesus ला भेट दिली. हा गोव्यातला एक सुंदर चर्च आहे. याचं बांधकाम, नक्षी, आणि आतमधे प्रवेश केल्यावर त्या चर्चची भव्यता खूप संदर आहे. गोव्यातला हा अतिशय जुना चर्च आहे. याच चर्चमध्ये फादर फ्रांसिस झेवियर यांचं मृतदेह अजुन जतन करुन एका पेटीत ठेवला आहे.. तर अशाच ठीकाणांना भेट देत आमची सहल सुरु होती. मी शिरोडकरला बघायला जीवाचा आटापीटा करत होतो पण ती नेहमी इतर मुलींमध्ये असायची आणि त्यात सगळे शिक्षक सोबत होते. दुपारी एका बीचवर आम्ही सगळे जेवायला थांबलो. सगळ्यांनी डब्बे आणले होते. जेउन झाल्यावर आम्ही असेच इकडे तिकडे रेंगाळायला लागलो. बीचवर जायला आम्हाला परवानगी नव्हती. माडांच्या सावलीत, त्या वाळुत आम्ही सगळे बसलो होतो. मी असाच कुठेतरी बसलो होतो. सगळी मुले इकडे तिकडे रेंगाळत होती. अचानक ती माझ्या बाजुने पास झाली आणि तिच्यासोबत असलेल्या एका मुलीला बोलली,
"काय गं एकटी, एकटी जेवलीस ना? बोलवायचं तरी जेवायला..!"
माझं लक्ष्यच नव्ह्तं, मी भानावर येवुन पाहिलं तर ती ह्सत हसत गेली सुद्धा.. मला काही बोलायलाच मिळालं नाही.
जेवून झाल्यावर शांतादुर्गा मंदीर, मंगेशी मंदीर बघून डोना-पॉला पॉईंटवर गेलो. हा एक मस्त रोमँटीक पॉईंट आहे. आणि याबद्दल एक आख्याईका पण आहे ती तुम्ही विकीवर वाचा. ;) http://en.wikipedia.org/wiki/Dona_Paula

सगळं बघुन झाल्यावर, शेवटी आम्ही म्हापसाला जमलो. इथे सरांनी सांगितलं की १-२ तास आहेत. फिरा, कुणाला काय घ्यायचे तर खरेदी करा आणि परत इथेच या..
चला, आम्हाला रान मोकळे होते. मी अजुनही माझ्याकडल्या ३० रु चं काय घेउ याच विचारात होतो. आम्ही फिरत होतो. एके ठीकाणी थांबुन कोल्डड्रींक्स प्यायलो. वडे खाल्ले. सगळे जण काय ना काय घेत होते आणि मी...
शेवटी गाडीकडे परत फिरताना एके ठीकाणी मला एक बाई टोपलीत गुलाबं घेउन बसलेली दिसली. ती लाल गुलाबं, बघताक्षणी माझ्या मनात भरली.. मला काय झालं काय माहीत मी सरळ जाउन ६ रु. एक गुलाब विकत घेतलं आणि ते हातात नाचवत गाडीकडे आम्ही निघालो. मुलींची मिनीबस समोरच उभी होती. असं काही होईल याची मला जराही कल्पना नव्हती. माझ्या हातातलं गुलबाचं फुल बघुन सगळ्या मुली ओरडून ते गुलाब मागु लागल्या.. मला काही कळत नव्हतं.. अर्थात मी ते तिला ही देण्यासाठी घेतलं नव्हतं पण सगळ्या मुली माझ्याकडे ते गुलाब मागु लागल्या.. मी पाहिलं ती खिडकीजवळ बसली होती आणि हे सगळं पाहत होती. मी दुसर्‍या खिडकीपाशी गेलो आणि ते गुलाब खिडकितून आत टाकलं, "कूणाला हवं तिने घ्या.."
मी बोललो आणि माझ्या गाडीकडे निघालो. हे सगळं काही क्षणातच घडलं होतं.. शिक्षकही आजुबाजुला नव्हते.. माझं काळीज धडधडत होतं की ते गुलाब कुणी घेतलं असेल... काही वेळाने मिनीबसमधुन खबर आली. की, जे गुलाब मी बसमध्ये टाकलं होतं ते "ती" सोडुन कुणीही उचललं नाही.. :) :)   हे सगळं काय होत होतं तेच कळत नव्हतं. आणि सगळं काही भराभर घडत होतं. ती खबर ऐकताच कोळसुलकरचं प्रेम जागृत झालं. त्याने पण त्याच्या लाईनला गुलाब द्यायचं ठरवलं. त्याने पळत जाउन तिथुन गुलाब घेउन आला पण त्याची हिम्मत होत नव्हती. त्याने मला सांगितलं की तू जा, शिरोडकरकरवी हे गुलाब तिला पोचतं कर.. 
मी खुश झालो कारण त्या निमित्ताने मला परत तिला भेटता येणार होतं आणि आता माझा बर्‍यापैकी धीरही चेपला होता.. मी छाती पुढे काढुन ते गुलाब घेउन मिनीबसकडे गेलो. पोरींचा आतमध्ये नुसता गोंधळ सुरु होता. मी तिला हाक मारली आणि बाहेर बोलावलं. परत पोरींचा कल्ला सुरु.. ती बाहेर आली. मी तिला कोळसुलकरचं ते काम सांगितलं. ती तयार झाली आणि मी ते गुलाब तिला दिलं. विजयी मुद्रेने मी आमच्या ट्रॅक्सकडे आलो. कोळसुलकर फुल्ल टेंशनमध्ये होता. मी त्याला धीर देत बोललो, "काही होत नाही रे, घेईल् ती गुलाब!"
काही वेळाने तिकडच्या गोटातुन बातमी आली आणि आम्ही दोघेही उडालो.. आमची भीतीने गाळण उडाली.
कोळसुलकरची लाईन भडकली होती. आमचा खबर्‍या सांगत होता, की ती जाम भडकलीय म्हणे कोळसुलकरची हिम्मत कधी झाली मला गुलाब द्यायची? आणि द्यायचचं होतं तर स्वःता येवून द्यायचं होतं. तो स्वःताला काय समजतो? मी कंप्लेंट करणार वैगरे वैगरे बडबडत होती. त्यानंतर घरी जायला गाडी सुटेपर्यंत आम्ही गाडीतून हललो नाही. आम्ही दोघेही फुल्ल टेंशनमध्ये होतो आणि टेंशनमध्ये अजुन एक वाढ झाली. परतीच्या प्रवासात सातार्डेकर मॅडम आमच्या गाडीत येवुन बसल्या. पुढे मी आणि सातार्डेकर मॅडम बसलो होतो. आम्ही सगळे चिडीचूप होतो. मॅडम बर्‍याच विषयांवर गप्पा मारत होत्या.. आणि मी घामाघूम झालो होतो. मला माहीत होतं की तो गुलाबांचा किस्सा मॅडम पर्यंत पोचलाय.. तो त्यांच्या पर्यंत पोचलाय यात काहीच हरकत नव्हती पण जर तो किस्सा मुख्याध्यापकांपर्यंत आणि पर्यायी माझ्या मामापर्यंत जर गेला तर मात्र माझी काही धडगत नव्हती,...
कसेबसे आम्ही आपापल्या घरी पोचलो.. 

दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळी सात वाजता शाळेत पोचलो. आजच्या दिवसात काय वाढुन ठेवलयं याची जरा ही कल्पना नव्हती.. कोळसुलकरची लाईन काय करणार होती काय माहीत.. मी आणि कोळसुलकर दोघेही वर्गात अधुनमधुन एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने बघायचो. १० वाजत शाळा भरली. शिरोडकराला गेटमधुन येताना पाहिलं. कालचं गुलाब माळून आली होती. मला थोडं बरं वाटलं. 
प्रार्थना वैगरे झाली. आणि सातार्डेकर मॅडम वर्गावर आल्या. आज हसल्या नाहीत. येताक्षणी फळ्यावर ग्रामरची काही वाक्य लिहीली आणि अ‍ॅक्टीव्ह टु पॅसिव्ह करायला सांगितली आणि शांत बसुन राहील्या. आजचे वाक्यं खरोखरच कठीण होती. मला एखाद - दुसरं जमलं असेल. काही वेळाने त्यांनी कोळसुलकरला उठवलं आणि उत्तरं वाचायला सांगितली. त्याने कैच्याकै सोडवलं होतं. मग माझ्याकडे आल्या. माझी वही तपासली. माझी पण सगळी वाक्यं चुकली होती. मॅडम भडकल्या..
"सहल संपली आता. बाहेर या सगळे सहलीतुन. अभ्यासाला लागा. हे हुशार विद्यार्थी बघा, एकही वाक्य जमलं नाहीय. बाकीच्यांकडे तर जायला पण नको."
"काय चाललयं काय? सहल भारी पडलीय काय?"
"मुलींना गुलाबं देता येतात, ग्रामर जमत नाही. उद्या परीक्षेला काय गुलाबं वाटणार आहात?"
"काय बोलत का नाहीत? काय गुलाबराव परुळेकर? काय  गुलाबराव कोळसुलकर?"
मॅडम बोलत होत्या आणि वर्गातली मुले खुदुखुदु हसत होती.. झालं म्हणजे हा किसा शाळेच्या ऑफीसपर्यंत गेला होता तर.. आता काही धडगत नव्हतीच. 

दुपारच्या सुट्टीत मी जेउन आलो आणि व्हरांडयातल्या पाण्याच्या पिंपापाशी पाणी प्यायला गेलो. तितक्यात घाई घाईने शिरोडकर माझ्यापाशी आली.
"दीपक, प्रॉब्लेम झालाय."
"काय झालं आता?"  मी घाबरत विचारलं..
"अरे ती ऐकायला तयारच नाहीय. ती विचारतेय की कोळसुलकरने कोणत्या अर्थाने तिला गुलाब दिलयं आणि ती घरी आणि शाळेत कंप्लेंट करणार असं बोलतेय."
पाणी पिता पिता मला हे ऐकून जोराचा ठसका लागला.
"आता कसला अर्थ मी तरी सांगु गं? मला काय माहीत कसला अर्थ तो."
"शी बाबा! आपण उगाच त्यांच्यात पडलो ना?" ती.
"हो ना! अगं ती त्याची लाईन आहे हे मला कालच माहीत पडलं.."
"आता काय करायचं रे? मला खूप भीती वाटते."
मी काही बोललो नाही... गुपचुप माझ्या वर्गात निघून गेलो. 

दुपारी दोन - अडीचच्या दरम्यान सगळं काही सुरळीत आहे असं वाटतानाच कोळसुलकरने मला इशारा करुन बाहेर बघायला सांगितलं.. वेटे मॅडम वर्गावर होत्या.. मी हळूच बाहेर पाहिलं आणि माझी पाचावर धारण बसली...
कोळसुलकरच्या लाईनचा भाउ शाळेच्या गेटमधुन आत आला आणि शाळेच्या ऑफिसमध्ये गेला..
आता सारं काही संपलं होतं. थोड्यावेळाने मला आणि कोळसुलकरला ऑफीसात बोलावणं येणार होतं आणि मस्त धुलाई होणार होती. माझी डब्बल होणार होती. घरी गेल्यावर मामा काय मला सोडणार नव्ह्ता..
मला ते सगळं समोर दिसत होतं आणि मी घामाघूम झालो होतो. माझं सारं लक्ष्य दरवाज्याकडे लागुन होतं आणि १५-२० मिनिटात शाळेचा शिपाई जगदीश आला.
"बाई, परूळेकरला मुख्याध्यापकांनी बोलावलयं."
मी ते ऐकलं आणि गलितगात्र झालो. काय करु तेच कळेना..
मी ऊठलो आणि बहेर पडता पडता कोळसुलकरकडे बघितलं, त्याची ही तंतरली होती...
मी घाबरत घाबरत ऑफीसमध्ये गेलो आणि मान खाली घालुन उभा राहीलो. कोणत्याही क्षणी आता मार बसणार होता.
"परूळेकर इकडे वर बघ!" सरांचा आवाज माझ्या कानात घुमला..
मी सरांकडे पाहिलं.
"हे बघ! हे सदगृहस्थ नवनीत प्रकाशनकडुन आले आहेत. आणि हा दहावीच्या अपेक्षित प्रश्नसंच शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांना भेट म्हणुन आणला आहे. तू आणि सावंत वाटुन घ्या."
"काय?? हो! घेतो!" 
इतकं बोललो, अपेक्षितं उचलली आणि ऑफिसच्या बाहेर आलो. फार हलकं वाटत होतं.. मायला पण मग तो कोळसुलकरच्या लाईनचा भाउ कुठे गेला.. मरु दे तिकडे ..
मुद्दाम नववीच्या वर्गाच्या बाहेरुन पास झालो. जाता जात तिच्याकडे पाहिलं तिने ही माझ्याकडे पाहिलं.. .
वर्गात आलो. कोळसुलकर वाटच बघत होता... मी त्याच्याकडे बघुन हसलो.. तो समजून गेला धोका नाहीय...
मधल्या सुट्टीत बाहेर पडलो आणि आम्ही खूप हसलो पण ह्सतान एक ठरवलं परत असले किडे करायचे नाहीत निदान बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत तरी नाहीच.........

.... दीप्स