Tuesday, May 1, 2012

माझी "शाळा"... ( भाग - २ )

"अणसूर - पाल हायस्कूल, अणसूर. ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग. माझ्या शाळेचे नाव !
अणसूर आणि पाल या दोन गावंच्या नावावरुन हायस्कूलला दिलेलं हे नाव. शाळा ही अणसूर गावातच होती. अणसूर आणि पाल या दोन गावातुन एक नदी वाहते आणि मोचेमाड या गावाच्या इथे अरबी समुद्रास जाउन मिळते. आमचा गाव म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेला. शेती हा गावातला मुख्य व्यवसाय आणि काही जण सरकारी नोकरीत. खरं तर हा माझ्या मामाचा गाव, पण मला तो नेहमी माझाच गाव वाटायचा. माझा खुद्द गाव परुळे हा वेंगुर्ले तालुक्यापासुन ३२ किमी वर आहे. पण मी शाळेमुळे कधी तिकडे जायचो नाही. कधी तरी सणाच्या दिवशी किंवा सुट्टी पडली तर जायचो. माझ्या गावी माझी आज्जी एकटीच राहायची. आणि मलाही तिकडे करमायचं नाही कारण माझी सगळी मित्रमंडळी इकडेच होती.

अ‍ॅडमिशन घेण्यासाठी मे च्या सुट्टीत मी शाळेत गेलो होतो. शाळेत माझा मामा होता आणि शाळेचे मुख्याध्यापक ही हजर होते. त्यांनी माझी मार्कलिस्ट पाहिली आणि काही प्रश्न विचारले.त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझी चांगलीच गाळण उडाली. मी जाम घाबरलो होतो कारण आधीच्या मुलांकडून मी सरांबद्दल बरंच ऐकून होतो. सर शिस्तप्रिय आहेत. आणि अभ्यास केला नसेल तर ठोकून काढायचे. तर इयत्ता आठवीत माझा हायस्कूलमध्ये प्रवेश झाला. नेहमीप्रमाणेच जूनच्या ७ तारीखला पहिल्यादिवशी मी माझ्या सगळ्या मित्रांसकट एका नव्या विश्वात प्रवेश करता झालो आणि इथेच माझ्या त्या पहिल्या वहिल्या किशोरवयीन प्रेमाची ती "शिरोडकर" मला सापडली..... :)  ( तिचं नाव शिरोडकर नव्हंत, पण मी इथे तिला शिरोडकरच म्हणतो. तसं ही तिच्या गावापासुन शिरोडा हे गाव जास्त लांब नाहीय ;)  )

इयत्ता आठवी, शाळेचा पहिला दिवस. आता इथे बाजुच्या गावातली म्हणजे तुळस सावंतवाडा आणि अणसुर इथली मुलं पण अ‍ॅड झाली होती. आणि आम्ही सगळे आपापल्या ग्रुपमध्यल्या पोरांबरोबर बसलो होतो. रच्याक शाळेत बसायला बेंचेस होते. आम्ही सगळेजण एकमेकांना नविन होतो. पटांगणात पार्थना झाली. इथे सकाळच्या प्रार्थनेचं स्वरुप प्राथमिक शाळेपेक्षा फार वेगळं होतं. एक विद्यार्थी ऑर्डर देत असे. मग राष्ट्रगीत, मग एक विद्यार्थी प्रतिज्ञा सांगायचा, मग सर्वजण प्रार्थना म्हणायचे, मग एक विद्यार्थी सुविचार सांगायचा आणि मग एक विद्यार्थी वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून दाखवायचा.. असं रुटीन होतं.  (काही दिवसांनी त्या समोरच्या प्रतिज्ञा सांगणार्‍या, बातम्या वाचणार्‍या आणि ऑर्डर्स देणार्‍या विद्यार्थ्यांची जागा मी, प्रशांत सावंत, संतोषी सावंत यांनी घेतली आणि दहावीच्या वर्षापर्यंत आम्हीच ती चालवत होतो. प्रशांत इंग्रजीतुन प्रतिज्ञा सांगायचा, मी हिंदीतुन आणि संतोषी मराठीतुन. असं प्रत्येकी दोन दिवस आम्ही प्रतिज्ञा सांगायचो. ) तर शाळेचा पहिला दिवस प्रार्थना संपली आणि आम्ही आपापल्या वर्गात गेलो. आमच्या वर्गशिक्षिका सातार्डेकर मॅडम वर्गात आल्या. मॅडम उंच होत्या आणि नेहमी हसतमुख असायच्या. त्या आम्हाला इंग्रजी आणि भूगोल शिकवत असतं. त्यांनी आम्हा सगळ्यांना स्वःताचा परिचय करुन देण्यास सांगितला.. सगळ्यांनी आपापली नावं, शाळा, मार्कस सांगितले. प्रशांत सावंत हा  त्याच्या शाळेतुन प्रथम क्रमांकाने पास झाला होता आणि मी ही आमच्या प्राथमिक शाळेतुन पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. सर्व शिक्षकांनी आधीपासुनच आमच्या कुंडल्या तयार करुन ठेवल्या होत्या. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यामध्ये किती कॅलिबर आहे आणि बोर्डाच्या परीक्षेत कोणता विद्यार्थी कसा प्रगती करु शले ते. प्रशांतची बहीण ही दोन वर्षांपूर्वी बोर्डात  हिंदी विषयात पहिली आली होती आणि आतापर्यंत तिनेच सगळ्यात जास्त परसेंटेज घेउन पास आउट झाली होती. माझ्यावर मामाचा डबल प्रेशर आतापासुनच सुरु झाला होता. एकतर प्रशांतला टक्कर देउन पहिला क्रमांक पटकवायचा आणि दुसरा एका तरी विषयांत बोर्डात येण्याचा...

पहिला दिवस असल्याने फक्त ओळख परेड झाली. मुख्याध्यापकांनी येवून शाळेबद्दल माहिती दिली. आणि असाच पहिला दिवस निघून गेला. दुसर्‍या दिवसापासुन अभ्यासाला सुरुवात झाली. आणि मला जाणवू लागलं की मी प्रशांतच्या हुशारीच्या आसपास ही नाहीय. 

तो खूप हुशार होता आणि मला धड काहिच येत नव्हतं. भूमितीच्या तासाला घाटवळ सरांनी कोनमापक माझ्यासमोर धरला आणि याला काय म्हणतात असं विचारलं. माझं उत्तर अफाट होतं.. मी बोललो "अर्धा सुर्य" आणि वर्गात एकच हशा पिकला.. म्हणजे हसणारी फक्त पाच - सहाच मुलं होती आणि बाकीची गप्प होती यावरुन मी ताडलं की मायला मीच एकटा असा नाहीय. यापुर्वी प्राथमिक शाळेत आम्हाला शिक्षकांनी कोनमापक, गुण्या, कंपास हे सगळं कशाशी खातात याचा काहीच बोध केला नव्हता. त्यामुळे कंपासपेटीत असणारी ही सगळी आयुधं आम्ही वेगवेगळ्या कामांसाठी वापरत असू. जसं की करकटक घेउन झाडावर नेम धरुन मारणं वैगरे..  तर त्या कोनमापकाला "अर्धा सुर्य" नाव देण्यामागचं लॉजिक म्हणजे एक तर तो अर्धा गोल होता आणि त्यावर कोन मोजण्यासाठी ज्या रेषा होत्या त्या म्हणजे सुर्याची किरणे. माझं लॉजिक ऐकून घाटवळ सरांनी मस्त एका पातळश्या छडीने माझ्या पोटरीवर रेषा काढल्या. मला माझ्या अज्ञानपणाचं अतिव दु:ख झालं. :( 

शाळेत शिक्षक आम्हाला आडनावावरुन हाक मारत. जसं मला परुळेकर, योगेश ला कोळसुलकर, अमोल ला नाईक , राहुल ला शेणई . वर्गात गावडे, पालकर, आणि सावंत यांची संख्या जास्त असल्याने त्याना त्यांच्या प्रथम नावावरुन हाक मारली जायची.. नंतर मी सिरीअसली अभ्यास करु लागलो. प्रशांतला टक्कर देउ लागलो. माझा भाषांवर चांगला पगडा होता पण गणित - भूमिती खूप त्रास द्यायचे. तरीही कसा कसा मी दुसरा क्रमांक पटकावतच होतो. प्रशांत आणि माझ्यात हार्डली ८-९ ट्क्क्यांचा फरक असायचा. पण मला सहामाही आणि कधी कधी घटक चाचणी सोडुन त्या तीन वर्षात कधीही  पहिला क्रमांक मिळवता नाही आला. प्रशांत म्हणजे मला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम वाटायचा काही ही होवो वार्षिक परीक्षेत नेहमी पहिला नंबर मारायचा..

आठवीचं वर्षात विशेष असं काही झालं नाही. त्यावेळी शिरोडकर इयत्ता सातवीत होती.  ती दिसायला छान होती. उंच, सडपातळ. लांब केस आणि तिचे ते ब्राउनी डोळे. ती मुलगी जाम अ‍ॅक्टीव होती. नेहमी ह्सत असायची. कधी - कधी मला अशीच रस्त्यात वैगरे भेटायची. पण बोलणं व्ह्यायचंच नाही. माझ्या वाडीतला एक मुलगा समीर ( याचे तिच्यामुळे दात पडले होते. कसे ते नंतर सांगतो! ) तिच्या वर्गात होता. पण नाही आठवीच्या त्या काळात मला तिच्याबद्दल विशेष असं काही वाटतच नव्हतं.

हायस्कूल मध्ये मी, कोळसुलकर, अमोल नाईक, आबा गावडे, सदाशीव गावडे अशी पाचजणांची गट्टी जमली होती. आमच्यात कोळसुलकर फार उंच होता आणि दांडगाही त्याला सामंत बाईंनी आजोबा नाव ठेवलं होते. 
"मेल्या कोळसुलकरा स्वःत तर अभ्यास करत नाहीस आणि आजुबाजुच्या पोरांका आज्यासारखो बसान गजाली कसल्या संगतोस?"
सामंत बाई असं त्याला नेहमी म्हणायच्या त्यामुळे तो आमचा आजा आणि आम्ही त्याची नातवंडे असा ग्रुप झाला होता...
आठवीचं वर्ष गेलं. आठवित शाळेची सहल गेली नाही. गॅदरिंगच्या नावाखाली फक्त बक्षिस समारंभ झाला. शाळेतल्या वार्षिक खेळांमध्ये मी हिरहिरीने भाग घेतला होता पण एका ही स्पर्धेत माझा नंबर नाही आला. नाही म्हणायला निबंध स्पर्धेत शाळेत पहिला क्रमांक आला. वक्तृत्व स्पर्धेत  प्रशांतचा तिसरा नंबर आला. पण वेटे मॅडमनी परुळेकरचं भाषणही फार छान झालं, मुख्यत्वे त्याने भाषण स्वःत तयार केलं होतं सगळे शब्द त्याचे होते. असं म्हणुन कौतुक केलं. माझ्यासाठी तेवढं पुरेसं होतं. त्यावर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आमच्या टीम नेउपविजेता करंडक मारला. 

मी आठवित असताना, दहावीची जी बॅच होती त्यातले बरेचसे माझ्या ओळखिचे होते. आणि त्यातले बरेचजण मिशा फुटलेले, दांडगे होते. मुलीसुद्धा खात्या पित्या घरच्या होत्या. आणि आमच्या आठविच्या वर्गातल्या मुली म्हणजे पाप्याची पितरं होती. पीटीच्या तासाला सगळ्यांना हाफ चड्ड्या( शॉर्ट्स ) आणि टी शर्ट्स कंपलसरी असायचे. पण आमच्या वर्गातल्या मुली इतक्या लाजाळू होत्या की आमच्यासमोर येतच नसतं. आणि दहाविच्या बॅचमधल्या मुली बिंधास्त शॉर्ट्स आणि टीज वर प्रॅक्टीस करायच्या. त्य आमच्यापेक्षा बर्‍याच मोठ्या होत्या.

एकदा सहज प्रॅक्टीस म्हणून आठवीतल्या मुलांची कबड्डीची मॅच दहावीच्या मुलींबरोबर घाटवळ सरांनी लावली. ती जस्ट प्रॅक्टीस मॅच होती. त्या दहावीतल्या मुली आमच्यापेक्षा खूप आडदांड होत्या. सर्विस घेउन एखादी आली की सहज आमच्यातल्या २-३ जणांना काखेत मारुन घेउन जायच्या.. आम्ही म्हणजे त्यांच्यासमोर पाळण्यातली बाळं होतो.. त्या मॅचमध्ये असं काही विशेष नव्हतं.. 

तर आठवीचं वर्ष असंच सरलं. मे महिन्यातली सुट्टी सुरु झाली पण आमच्यासाठी सुट्टी नव्हती. आमचे शिक्षक आमच्यासाठी खूप मेहनत घेत. त्यामुळे मे च्या सुट्टीतही मला, प्रशान्त, अमोल, कोळसुलकर, शांताराम अशा काहींना शाळेत जाउन नववीची तयारी करावी लागायची. त्यात सातार्डेकर मॅडम इंग्लिश ग्रॅमर वैगरे शिकवत आणि इंग्लिश फ्लुएंटली कसं बोलावं यासाठी त्यांनी काही ऑडीयो कॅसेट्स आणल्या होत्या त्या आम्हाला ऐकवत. पण त्यावेळीही आम्ही वर्गात अभ्यास कमी आणि गजालीच जास्त मारत असायचो. आणि शाळेत एखादा शिपायी आणि माझा मामा असायचा पण ते सगळे कार्यालयात असायचे त्यामुळे आम्हाला कसला डीस्टर्ब होत नसे.;)  त्यावेळी आमचे चर्चेचे विषय म्हणजे क्रिकेट, टेनिस, आणि मुली.. कोण कोणाची माल आहे वैगरे वैगरे..

पुन्हा नेहमीप्रमाणे ७ जुनला शाळा सुरु झाली. इयत्ता नववी! नववीला आम्हाला सामंत मॅडम वर्गशिक्षिका होत्या.  शाळेतले सगळ्यात हॅपनिंग डेज म्हणजे नववी! एव्हाना मी, प्रशांत कोळसुलकर, नाईक असे शाळेत बरेच प्रसिद्ध झालो होतो. अर्थात प्रशांत अभ्यासासाठी आणि आम्ही बाकीचे टगेगिरीसाठी. मी नववीत गेलो आणि शिरोडकर आमच्या शाळेत इयत्ता आठवित दाखल झाली. तिला इंप्रेस करायला मला जास्त काही  करावं लागणार नव्हतं. कारण प्रार्थनेच्यावेळी पासुनच मी पुढे पुढे असायचो. त्यात सगळ्या मुलांना व्यवस्थित रांगेत उभं करणं वैगरे आम्हीच करायचो. आता आम्ही थोडे मच्युअर झालो होतो म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत आणि शाळेतल्या इतर अ‍ॅक्टीविटीजमध्ये आमचा सहभाग मुख्य असायचा. नववीचा वर्गप्रमुख बाबाजी होता. दुसर्‍यांच्या खोड्या काढण्यात याचा पहिला नंबर होता. पण व्हायचं काय की वर्गातली सगळी कामं जशी निबंधाच्या वह्या मुलांअमध्ये वाटणं, ट्युटोरिअलच्या वह्या वाटणं. बाकीच्या मुलांचा होमवर्क तपासणं अशी कामं मी, प्रशान्त आणि संतोषी कडे असायची. त्यात आम्ही हुशार काईंड ऑफ असल्याने सगळे शिक्षक आमच्याकडूनच सगळं काही करुन घ्यायचे.

घाटवळ सरांनी "सायन्स आय" नावाची एक अ‍ॅक्टीव्हीटी सुरु केली होती. त्यावर्षी त्या संस्थेचा मला अध्यक्ष करण्यात आलं. शाळेत किंवा शाळेच्या बाहेर होणार्‍या विज्ञानविषयक स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. या सायन्स आय मंडळाची एक कोअर टीम होती म्हणजे आठवी ते दहावीच्या वर्गातुन प्रत्येकी ३-४ मुले या मंडळाचे अ‍ॅक्टीव मेंबर होते. त्यावर्षी सायन्स आय ची सुरुवात प्रश्नमंजुषेने झाली. या स्पर्धेत ४ टीम होत्या आणी ८ वी, ९वी, १०वी मधून प्रत्येकी एक विद्यार्थी प्रत्येक टीममध्ये होता. या स्पर्धेत माझ्या टीमने निर्विवाद पहिला क्रमांक पटकावला. तेव्हा माझ्या एक गोष्ट ध्यानात  आली की प्रशांत फक्त शालेय पुस्तकांचाच अभ्यास करतो आणि सामान्य ज्ञान वैगरे मध्ये त्याला जास्त रस नाहीय. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या टीमला आलं नाही तर मग तो प्रश्न प्रेक्षक विद्यार्थ्यांना विचारला जायचा. शिरोडकरने २-३ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि पुढच्या प्रश्नमंजुषेच्यावेळी तिला माझ्या टीममध्ये घेण्याचे माझे प्रयत्न सुरु झाले... 

दुसर्‍यावेळी, "सायन्स आयच्या" एका कार्यक्रमात घाटवळ सरांनी संगणकावर लेक्चर देण्यासाठी वेंगुर्ल्याहुन दोन फ्रोफेसर्स बोलावले होते. कार्यक्रम संध्याकाळचा होता आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मी चूकुन मागल्या बेंचवर बसणार्‍या नयन, वासुदेव, आबा, जयदेव अशा मंडळींच्या गजालीला गेलो. गजाली कुठच्या कूठे गेल्या आणि साल्यांनी मला जमिनीवर लोळवलं. दोघांनी दोन हात आणि दुसर्‍या दोघांनी दोन पाय धरुन माझा झोका केला आणी लोळवलं. लोळवल्यामुळे माझं सफेद शर्ट पाठीमागुन मातीने बरबटलं. मला चिंता होती ती संध्याकाळच्या कार्यक्रमाची. कारण अ‍ॅज अ अध्यक्ष्य मलाच सगळं करायचं होतं. कसंबसं मी शर्ट साफ केलं पण कार्यक्रमाच्यावेळी मी जेव्हा पाहुण्यांना फुलं वैगरे द्यायला जायचो तेव्हा माझी पाठ बघून सगळे जण हसायला लागायचे.. तर मग माझा तो लोळलेला शर्ट सांभाळत कसाबसा तो कार्यक्रम पार पाडला.

सकाळी शाळेत जाताना, दिवसभर शाळेत आणि संध्याकाळी घरी जाताना शिरोडकर नेहमी दिसायची किंवा ती फक्त दिसावी म्हणून मी कसला ना कसला बहाणा शोधत फिरायचो. दिवसातुन उगाच तिच्या वर्गाबाहेरुन फेर्‍या मारणं. मधल्या सुट्टीत व्हरांड्यात ती पाणी प्यायला आली की माझं मुद्दाम तिथं जाणं. एकदा देव पावला आणि तीने मला मधल्या सुट्टीत गाठलं. तिला हिन्दीचं एक पुस्तक हवं होतं. ते मागायला ती आली होती. तसं पुस्तक माझ्याकडे होतं पण उद्या देतो म्हणून सांगितलं.. ती हसुन निघून गेली. त्या रात्री अभ्यास करताना तिला जे पुस्तक द्यायचं होतं त्यावर जिथे जागा मिळेल तिथे मी चंगोच्या काही इंप्रेसिव्ह चारोळ्या लिहिल्या.. दुसर्‍या दिवशी ती पुन्हा माझ्याकडे आली आणि तिने पुस्तक मगितलं. मी ते तिला दिलं. ती ते घेउन निघुन गेली... आणि वर्गातुन सगळ्या पोरा पोरींची चिडवण्याचे आवाज येवू लागले. आपण एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडलोय हे आपल्याला आपल्या मित्रांकडुनच जास्त कळतं आपल्याला ते माहितच नसतं मुळी. पण आता ती दिवस - रात्र माझ्या मनात घिरट्या घालू लागली. आणि जेव्हा जेव्हा मी तिला मिस्ड करायचो तेव्हा तेव्हा ती कुठून काय माहित माझ्या समोर यायची. ( रात्रीची वेळ सोडुन ;)  )

एकेदिवशी मी आजारी पडलो आणि आई मला गावातल्या परब डॉक्टरकडे घेउन गेली. मी डॉक्टरकडे जायला टाळायचो कारण मला इन्जेक्शनची खूप भीती वाटायची. (अजुनही वाटते! ) त्यावेळी डॉक्टर इंजेक्शन भरायला सुरुवात करायचा आणि मला इथे हुडहुडी भरायची.. मी खूप रडायचो, आरडाओरडा करयचो पण इंजेक्शन घ्यायचो नाही. मग त्यासाठी मम्मी आजुबाजुंच्या काही लोकांना बोलवून आणायची आणि मग ते सगळे मला घट्ट धरुन ठेवायचे आणि मग मला इंजेक्शन टोचलं जायचं. मी खूप रडायचो त्यावेळी. तर मी डॉक्टरकडे बसलो होतो आणि माझा नंबर आला. चेकींग झाल्यानंतर कळलं की ताप खूप होता. डॉक्टरचे हावभाव बघुन मी समजलो की आता हा मला इंजेक्शन देण्याच्या तयारीत आहे. मी त्यांना विनंती करु लागलो की मला त्या इंजेक्शनच्या पावरच्या गोळ्या द्या, सिरप द्या पण इंजेक्शन नको. पण डॉक्टर काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. झालं नेहमीप्रमाणे मला हुडहुडी भरायला सुरुवात झाली आणि मी रडू लागलो. मम्मी वौतागुन मला मारत होती आणि मी अजुनच रडू लागलो. आई पुन्हा मला धरायला म्हणून कुणाला तरी बोलवायला गेली आणि तिच्या दोन - तीन मैत्रीणींना घेउन आली. मी अजुनच रडु लागलो आणि अचानक थांबलो ! दचकलो ! पाहिलं तर बाजुला शिरोडकर होती आणि मला बघुन हसत होती.. आत काय करायचं? मग मी आईला  बोललो की सगळ्यांनी बाहेर जा मी  इंजेक्शन घेतो म्हणुन कारण इंजेक्श कमरेवर दिलं जायचं. त्या आईच्या  
मैत्रिणी ठीक होत्या म्हणजे मी लहानपणी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो होतो पण शिरोडकर समोर.. मग मी देवाचं नाव घेत कसं बसं इंजेक्शन घेतलं आणि डोळे पुसत बाहेर आलो. ही बया खुदुखुदु हसत होती.. :)

माझ्या तिच्याविषयीच्या सगळ्या फिलिंग्ज मी तेव्हा समीरबरोबर शेअर करायचो. तो ही मला तिच्याबद्दल बरचं काही सांगयचा कारण तो तिच्या वर्गात होता. तिची फक्त एक झलक दिसावी म्हणून मी दिवसातुन कित्येक वेळा उगाच तिच्या घरासमोरुन फेर्‍या मारत असे. अभ्यासाच्या नावाखाली खाजणादेवीच्या मंदीरात जात असे. तिथे अभ्यासात तर मन लागायचचं नाही पण मंदीरातल्या त्या नीरव शांततेत ती अजुनच आठ्वायची आणि मग भूक लागली की कुण्या भाविकाने देवीला वाहीलेली केळी तो भाविक मंदीरच्या पायर्‍या उतरतो ना उतरतोच तोवर मी फस्त करायचो.. ..

सहामाही परीक्षा संपली आणि जसजसा वेळ जात होता मी तिच्या अधिकच जवळ जात होतो. पण मी समीरशिवाय अजुन कुणालाही या बाबत बोललो नव्हतो. पण जेव्हा जेव्हा ती माझ्यासमोर यायची तेव्हा तेव्हा तिच्या त्या ब्राउनी डोळ्यांत मी हरवून जायचो. तिच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य खुललेलं असायचं. एकेदिवशी राहवलं नाही. मी तिच्यासाठी एक प्रेमपत्र लिहिलं. तिला ते देणार नव्हतोच. आणि जर याबाबतित माझ्या मामाला जराही काही कळलं असतं की माझी मजल प्रेमपत्रापर्यंत गेलीय तर त्याने मला ठोकून काढलंच असतं. पण मनातल्या सगळ्या भावना कुणाबरोबर तरी शेअर कराव्या म्हणून त्या पत्रामध्ये  लिहून काढल्या
आणि ते पत्र कंपासपेटील्या आयुधांच्या खाली लपवून ठेवलं. त्या पत्रात तू मला का आवडतेस, मी कसा तुझ्या प्रेमात पडलो वैगरे वैगरे लिहून काढलं होतं. दिवसातुन एक दोनदा तरी ते पत्र मी हळूच कुणाच्याही नकळत वाचायचो आणि मनातच हसायचो.कोळसुलकर आणि अमोल नाईकला माझं वगणं विचित्र वाटु लागलं कारणं एका घटक चाचणीत चक्क संतोषीने  दुसरा नंबर मारला आणि मी तिसर्‍या नंबरवर घसरलो. त्या तिसर्‍या नंबरचं मला जाम टेंशन आलं. कारण अशावेळी मला मामा पालक म्हणून प्रगति-पुस्तकावर सही देत नसे आणि कित्येक महिने ते प्रगति - पुस्तक माझ्या दफ्तरात पडून असायचं. त्यामुळे बाईंचा वेगळा मार मला खावा लागत असे.

एकेदिवशी संध्याकाळच्या छोट्या सुट्टीत आम्ही असेच बोलत होतो. बोलता बोलता मी नाईक ला बोललो की," हम किसी से कुछ छुपाते नहीं है!" आणि ताबडतोब साल्याने माझं ते प्रेमपत्र माझ्यासमोर धरलं," अगर छुपाते नहीं तो ये क्या हैं!" 

माझा चेहरा गोरामोरा झाला आणि मी त्यांच्यासमोर कबुल केलं.. की हो मला ती आवडते. :) 

तळटीप : हुश्श!!! दमलो लिहून... पुढचा भाग टाकतो लवकरच !  ;)
दीप्स.

14 comments:

 1. :) हुश्श..दमलो वाचून....आपलं दमले वाचून...दोन्ही भाग एकदम वाचले नं..वाचता वाचता माझा मुलगाच झाला की काय? असं शाळा वाचताना झालं होतं...(हो २००८ मध्येच वाचलंय आणि मग गाव सोडताना एका मैत्रीणीला दिलं...:)
  लगे रहो दोस्त..
  अरे "करकटक" किती दिवसांनी वाचतेय हा शब्द...असे आपल्या वेळचे काही शब्द संग्रहीत करून मुलांना शिकवायला हवेत नाहीतर त्यांना ती मजा कशी येणार ...:)

  ReplyDelete
 2. बरेच दीप लावलेत की आपण!

  ReplyDelete
 3. हुश्श.. आम्हीही दमलो वाचून..

  जोश्याची झाली आता "दिप्याची शाळा" यावर लिहिता का विचारलं पाहिजे बोकील सरांना :)

  ReplyDelete
 4. Agree with Heramb !!!
  Baki Deepakaa......barech dive lavles ki re ...

  ReplyDelete
 5. अ‍ॅप्स, हेहेहेहे: मला माहितीय तू शाळेत असताना टॉमबॉय होती ते .. ;)
  हो असले सगळ शब्द आपण जतन केले पाहिजेतच..
  आजकालच्या पोरांना विन्ग्लिश शाळेत असले शब्द कुठे गं ऐकायला मिळतात..
  मी माझ्या पोराला/पोरीला मराठी मेडीयममध्येच टाकणार.. ;)

  ReplyDelete
 6. पंक्या नावंच आहे आपलं दिवे लावलेच पाहिजे होते ना..
  आता पण काय कमी नाही लावत.. ;)

  ReplyDelete
 7. हहहहहः
  हेरंबा धन्स रे भावा.. :)

  ReplyDelete
 8. हाभार्स माउ ताई..
  अगं आठवून आठवून लिहितोय गं त्यामुळे..
  आता लवकर संपवतोच..

  ReplyDelete
 9. हेओ, अरे "दिप्याने केलेली शाळा’ असं नाव हवय त्या पुस्तकाचं ! सह्ही है भिडू.... ;)

  ReplyDelete
 10. हा हा हा किस्सा ऐकून होतो... तूच सांगितला होतास :p

  ReplyDelete
 11. हहह्हहः विशालदा! माझ्या शाळा आजही सुरुच असतात..
  विद्यार्थीदशा संपली पण शाळा अजुन मनातुन जात नाही..

  ReplyDelete
 12. हां सुझे ! आकाशच्या घरी पार्टीच्या वेळी ! जब मिल बैठें थे तीन यार.. :)

  ReplyDelete
 13. आयला भारी ........तुझी शाळा किंवा शाळा पुस्तक किंवा इतर कुठलतरी लिखाण ......असं का वाटत कि माझी शाळा पण सेम होती आणि काही घटनाही ............;)
  मस्त लिहिलयस.........लागे रहो.....!!

  ReplyDelete
 14. हाभार्स धुंडीराज,,
  अरे आपल्या सगळ्यांची शाळा म्हणजे आपलं वय रे.. ते बाल आणि किशोरवय असंच असतं..
  शाळा फक्त या सगळ्याला निमित्त.... :):)

  ReplyDelete