Wednesday, January 8, 2014

तुटलेला तारा ... (२)

              ट्रेन सुरु झाली आणि त्याबरोबर तिची विचारचक्रही. तिची अस्वस्थता आता शिगेला पोचली होती. एका अनामिक,भयाण भीतीचं सावट तिच्या मनावर पसरलं होतं.अचानक त्याच्याबद्दल तिला खूप सारी काळजी वाटु लागली होती.कोण होता तो तिचा? आतापर्यंत तिने त्याला कधीही आपलं मानलं नव्हतं.त्याच्या प्रेमालाही तिने मान्य केलं नव्हतं.जगाला सांगण्यासाठी तो फक्त तिचा मित्र होता. पण तसं नक्की होतं का? तिचं तिलाच कळत नव्हतं. आता याक्षणी त्याला बघायची ओढ तिला लागली होती. तिच्या धडधडत्या मनाला, अस्वस्थतेला त्याला पाहिल्याशिवाय चैन पडणार नव्हती. त्यावेळी देखिल असंच व्हायचं. त्याच्याशी एक दिवस जरी बोललं नाही तरी कसं तरीच व्हायचं तिला.दिवसभर कसली तरी उणिव तिला भासु लागे. कधी कधी तिलाही बोलायचं नसे मग अशावेळी ती टेक्स्ट्सवर त्याला पिडायची. पण ते मुद्दाम नाही.त्याची काळजी तिला नेहमी वाटायची. 

             असाच एकेदिवशी तिला न सांगता तो सिंगापूरला गेला होता. त्याच्या कंपनीची कसली तरी कॉन्फरन्स होती आणि काही कारणामुळे त्याचा सेल फोन दोन दिवस बंदच होता. इकडे ही हैराण. त्याचा काहीच ठावठीकाणा लागला नव्हता. नेहमेप्रमाणे तिने ग्रुपमध्येही कुणाला विचारलं नाही. तिला उगीच वाटत राहायचं की त्याने काही कारण नसताना ग्रुपमध्ये बबल केलं होतं. त्याबद्द्ल तिला तसं कुणीच विचारलं नव्हतं पण तिला नेहमी ते ऑकवर्ड वाटत राहायचं.मग काही महिने दोघेही ग्रुपच्या ट्रेकला वैगरे जाणं टाळत होते.

         तर त्यावेळी सुद्धा असंच हा तिकडे कूठे सिंगापूरला आणि ही इकडे त्याच्या काळजीने हैराण.तिचं आपलं सारखं त्याला फोन ट्राय करणं, त्याचा एफबी प्रोफाईल चेक करणं सुरुच होतं. दोन दिवस तिला अन्न गोड लागलं नव्हतं.ती धड झोपली नव्हती. तिसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी अपडेट आली. त्याला त्याच्या कलिगने सिंगापूर एअपोर्टवरच्या चेक इन मध्ये टॅग केलं होतं. ते वाचून तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव आला होता.तो मुंबईला त्या संध्याकाळी आला आणि त्याचा सेल सुरु झाल्या झाल्या त्याने तिला कॉल केला. कारण तिच्याच नंबरवरुन ३०-४० मिस्ड कॉल अलर्ट्चे मेसेज आले होते. त्याने कॉल केला तेव्हा तिने त्याला झाप झाप झापला होता.बिचार्‍याला तोंडही उघडु दिले नव्हतं तिने. दुसर्‍या दिवशी तो तिला भेटायला गेला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ते स्टेशनच्या बाहेर भेटले.ती खूप रागावली होती.काही केल्या बोलायला तयार नव्हती.शेवटी कसं बसं ती बोलली.

"प्रॉब्लेम हा आहे ना की, मला तुझ्यावर रागावता येत नाही."
"तेच म्हणतो मी, का रागवायचं पण?"
"अरे पण नालायका तुला सांगुन जायला का धाड भरली होती?"
"अगं पण सगळं इतक्या घाईत झालं की काय सांगु? रात्री ११ ची फ्लाईट होती. ऑफिसमधुन घरी, घराकडुन सगळं आवरुन मरत मरत एअरपोर्ट्ला पोचलो. तिथुन तुला कॉल करणार तर फोनच डेड. म्हटलं तिकडे पोचल्यावर फोन चार्ज करुन तुला कॉल करेन, पण कसलं काय फोनच सुरु झाला नाही."
"स्टोरीज रे! फक्त स्टोरीज! तिथुन कुणा दुसर्‍याच्या फोनवरुन किंवा लँडलाईनवरुन कॉल नाही करता आला तुला?"
"अगं कसं करणार? तुझा नंबरच पाठ नाही मला." आणि त्याने पटकन जीभ चावली. 

त्याच्या या वाक्यावर ती जाम भडकली. नंबर पाठ नाही म्हणजे काय? तिला कसं बसं त्याने आवरलं. त्यावेळी तिच्यासाठी त्याने एक मस्त जॅकेट आणलं होतं. ती घ्यायला तयारच नव्हती पण तिने ते घेतलं. 

"अरे खूप मोठ्ठं होतयं रे हे ! साल्या स्वतःच्या साईजचं आणलंस का?"
"आयला हो का? असु दे. तसं पण युनिसेक्स आहे. मी ही वापरेन कधीतरी."
"एक नंबरचा स्वार्थी साला! सेल्स माइंडेड! घे हे तुझं तुलाच. काही नको मला." 


"पुढील स्टेशन मुलुंड."
"अगला स्टेशन मुलुंड."
"नेक्स्ट स्टेशन.... "
ती डब्यातल्या त्या कर्कश अनाउंसमेन्टने ताळ्यावर आली. डब्बा बायकानी एव्हाना भरला होता. त्यांच्यातुन वाट काढत ती दरवाज्यापर्यंत पोचली.


           ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. ट्रेनमधुन उतरुन ब्रीजवरुन, ती पटकन पूर्वेला जाउन उतरली. समोर असलेल्या ऑटोच्या रांगेत जाउन उभी राहिली. दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती.
 

             कदाचित हा कुठे तरी मागल्यावेळेसारखा बाहेर वैगरे गेला असेल. नोकरीही बदलली असेल आणि कदाचित म्हणुन फोन नंबरही बदलला असेल. पण एफबी आणि ट्वीटर अकाउंट का डीलीट करेल? एक ना अनेक असे तर्क वितर्क ती लढवत होती. तोवर तिच्या समोर रिक्षा आली. कुठे जायचे ते सांगुन ती रिक्षात जाउन बसली. तो राहत असलेली बिल्डींग ही स्टेशनच्या कोलाहलापासुन थोडी दूरच पण शांत जागी होती. कधी कधी घरी जाताना ती दोघं स्टेशनवरुन चालतच जायची. संध्याकाळच्या वेळी मस्त वारा सुटलेला असायचा त्या परिसरात. 

                 दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे, छोट्या बागा, खेळाचं मैदान सगळ्या ओळखिच्या खुणा तिला दिसत होत्या.बर्‍याच दिवसांनी आज ती इकडे आली होती.काही फरक जाणवत नव्हता फक्त त्याची उणिव जाणवत होती; पण आता थोड्याच वेळात ती पण भरुन निघेल. तिचं ते वेडं काळीज पुन्हा धडधडायला लागलं.कुठुन तरी ती जुनीच फुलपाखरं पुन्हा पोटात गुदगुल्या करु लागली. आज त्याचं आवडतं ड्रेस काँबिनेशन तिने केलं होतं. तो घरी असेल की नाही याची शाश्वती नव्हती. काळजाची धडधड तिने कंटिन्यु ठेवली पण फुलपाखरांना उडवून लावलं. थोड्याच वेळात त्याच्या बिल्डींगपाशी रिक्षा थांबली. रिक्षावाल्याला पे करुन ती बिल्डींगच्या गेटमधुन आत शिरणार तोच वॉचमनने त्याच्या खुराड्यातुन तिला आवाज दिला.
"किसके यहाँ जाना हैं म्यॅडम?"
ती थबकली आणि त्या वॉचमनच्या खुराड्यापाशी आली.
"अरे आप? कैसी है आप मॅडम" वॉचमनने तिला ओळखलं.
"ठीक हुँ मिश्राजी. आप कैसे है? मैं, वो वहाँ.... उपर... " ती अडखळली.
"जानता हुँ, पाटकर साहब के इधर ना?"
"हाँ! हाँ!" ती वॉचमनला कटवून जायला वळली....
"पर अब वो लोग यहाँ नही रहते, म्यॅडमजी...."
त्याच्या या वाक्याने ती हादरलीच. तिचे पाय जागच्या जागी जमिनीत रुतले.
"क्या मतलब अब यहाँ नहीं रहते?" कहाँ गये फिर....?" तिच्या घशाला कोरड पडली होती.
"दुई-तीन महिना हो गया म्यॅडम. वो लोग यहाँसे चले गये. अभय बाबा की तबियत ठीक नहीं थी. तो वो लोग गाँव चले गये."
तिच्या काळजाचा ठोका चुकला.
"क्या हुआ था अभयको?" काळजे आणि भीतीने तिचा आजाज फुटत नव्हता.
" पता नही म्यॅडम.पर अब वो यहाँ नहीं रहते."
ती खूप घाबरुन गेली. काय करावे ते तिला सुचेना.
"आप एक काम करीये म्यॅडम उपर उनके बाजुमें जो गोरे साहब रहते हैं ना शायद उनको मालुम होगा. आप उनसे जाकर मिलिये."
भरलेल्या मनाने ती जायला वर जायला वळली.
काय झालं असेल?
कसा असेल तो?
मला एक कॉलही करावासा नाही का वाटला त्याला?
भयंकर अस्वस्थतेत तिने गोर्‍यांच्या दारावरली बेल दाबली. सेफ्टी दरवाजाच्या आडुन गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि नाकावरला चष्मा सावरुन त्या तिला निरखू लागल्या.
"नमस्कार काकु. मी...."
"अगं तू होय! ये ये! कधी आलीस." तिला ओळखल्याने पुढचं काही न बोलता गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि ती आत गेली.
"कशी आहेस? बर्‍याच दिवसानी आलीस."
"मी ठीक आहे काकु. तुम्ही कशा आहात.?"
"माझं काय मेलीचं? आहे आपली निवांत.तू सांग. अभयला भेटायला आली होतीस ना?"
"हो. पण खाली वॉचमन म्हणाला की ते लोक आता.... "
"हो. खरयं ते. दोन महिन्यापूर्वीच गावी गेलेत."
"का पण?"
"अगं काय माहित का ते? अभयची तब्येत बिघडली होती. साधा तापच होता. १०-१२ दिवस अ‍ॅडमिट होता. नंतर बरा झाला. पण मग त्याचं कशात लक्ष्य लागेना. सारखा चिडचिड करायचा. जॉबपण सोडला त्याने. मग काही दिवसानी ते लोक गावी गेले."
"अच्छा. मग त्यानी हा फ्लॅट विकला का?"
"नाही अगं. मला वाटतं डॉक्टरच्या सल्यानुसार अभयच्या हवाबदलासाठी ते गावी गेले असतिल. कोकणातले ना ते."
"हो असेल. कदाचित."
"फ्लॅटची किल्ली आमच्याचकडे आहे ना."
का कुणास ठाउक तिला वाटलं की अभयच्या घरात जावं. तिने गोरे काकुंकडुन फ्लॅटची किल्ली घेतली आणि ती गोरे काकूंकडुन निघाली. 


               अनलॉक करुन तिने दरवाजा लोटला आणि पाउल घरात टाकले. एका उष्ण वार्‍याचा झोत तिच्या अंगावरुन गेला आणि ती शहारली.हॉलमधले सगळे फर्निचर झाकून ठेवलेले होते. सामसुम किचन. हॉलमधुन ती अभयच्या रुममध्ये गेली. त्याच्या खोलीत पाउल ठेवताच एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती तिला जाणवली. एक अनामिक रितेपण त्या खोलीत तिला जाणवू लागले. अनेक जुन्या आठवणीनी ती खोली भरुन गेली. गप्पा, दंगामस्ती, भांडणं, गॅलरीत बसुन संध्याकाळच्या वेळेची कॉफी एक ना अनेक आठवणीनी तिचं मन दाटुन आलं. त्याच्या खोलीतल्या त्याच्या वस्तु तशाच होत्या. त्याचं कपाट, लॅपटॉपचा डेस्क.पुस्तकांचं कपाट, आणि त्याच्या बाजुलाच त्याची क्रिकेट किटची बॅग आणि त्याची ती आवडती 'ग्रे-निकल्स'ची बॅट. भिंतीवरलं त्याचं पोर्ट्रेट तिने काढुन घेतलं. धुळीचा थर रुमालाने पुसुन काढला. थोडावेळ ती त्याच्या त्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहत राहिली. का कुणास ठाउक तिला त्याचा तो हसरा चेहरा छातीशी घट्ट धरावासा वाटला. हे सगळं नवीन होतं. आज तो आपल्यापासुन दूर गेलाय म्हणुन असं वाटतयं का? आणि आज जर आत्ता तो इथं असला असता तर; इतके दिवस का कॉल केला नाहीस म्हणुन आपण त्याच्यावर रागावलो असतो की त्याला बिलगुन रडलो असतो. काही असो, तो आत्ता या क्षणी तिला हवा होता. ते रिकामं घर आणि आणि त्याची ती रिकामी खोली तिला खायला उठले होते. क्षणभर तिने विचार केला आणि तशीच तिथुन निघाली. दरवाजा लॉक करुन तिने गोरे काकूंकडे किल्ली दिली आणि ती तिथुन निघून थेट स्टेशनवर पोचली.  

               मुलुंड पश्चिमेला जाउन बोरीवलीला जाणारी एसी बस पकडुन ती घराच्या दिशेने निघाली. तो दिवस शुक्रवार होता.आता पुढचा मागचा विचार न करता सरळ त्याचा गावी जाउन त्याला गाठायचं असं तिने ठरवलं. ती कधीच त्याच्या गावी गेली नव्हती. पण तिला ते ठाउक होतं. त्याच्या बोलण्यात तो गावाचा उल्लेख करी. कोकणातलं त्याचं गाव तो वर्णन करत असताना तिच्या डोळ्यापुढे अगदी चित्रवत दिसे. 
"एकदा तरी आपण तुझ्या गावी जाउया हां रे." ती त्याला नेहमी सांगायची.
"हो. नक्की जाउया. आणि रात्री समुद्राच्या किनारी आकाशातल्या चांदण्या बघत पडून राहु." त्याच्या या बोलण्यावर तिला गम्मत वाटे.पण तिलाही वाटायचं की एकदा तरी समुद्राच्या किनार्‍यावर पडुन रात्रभर चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघत राहावं.


          तिने त्याच्या गावी जायचं नक्की केलं. एका मित्राला कॉल करुन ट्रेनच्या तिकिटाचा बंदोबस्त केला.ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी साडे पाचला दादरवरुन सुटणार होती.तिकीटाच्या कन्फरमेशनचं मेल आणि एसएमएस तिला तिच्या मित्राने फॉरवर्ड केला.दिड - दोन तासांत ती घरी पोचली. आवरा आवर करुन तिने तिची बॅगपॅक भरुन ठेवली. शनीवारी त्याला भेटुन, एक रात्र तिथे राहुन रवीवारी परत मुंबईला यायचं. गाडी पहाटेची असल्याने तिला रात्र स्टेशनवरल्या वेटींग रुममध्ये घालवणं भाग होतं. रात्री जेवताना तिने आई वडीलांना याबाबत सांगितलं.

"मी तुला त्याच्याबद्दल विचारणारच होतो.इतके दिवस तो कुठे दिसला नाही." वडिलांनी विचारणा केली.
"भांडले असतिल नेहमीप्रमाणे आणखि काय? हिला भांडण्यापलिकडे काहि सुचत असेल तर शप्पथ." आई. 


ती शान्तपणे जेवत होती.


जेवण आटोपुन सगळं आवरुन ती जायला बाहेर पडली.तिचे वडील स्टेशनपर्यंत सोडायला आले. 


"येते मी बाबा. जा आत तुम्ही घरी. ट्रेन पकडली  की कॉल करेन."
"बेटा, सांभाळून जा आणि हे बघ आता पर्यंत आम्ही तुझ्या आयुष्यात कसली आडकाठी आणली नाही.तुझे निर्णय तुच घेत आलीस.ते सगळे नेहमी योग्यच होते असं नाही आणि ते निर्णय सर्वस्वी जरी तुझे असले तरी काही अंशी आम्हीही त्याला जबाबदार होतोच."
"बाबा... पण..."
"ऐक पोरी. आम्ही कदाचित असू जुन्या विचाराचे वैगरे पण तुला कधीच कसल्या बंधनात, रिती रिवाजात जखडुन ठेवलं नाही. तुझं स्वातंत्र्य तुला दिलेलंच आम्ही.तुझं लग्नाचं वय सुद्धा निघुन जातयं हे तुला आम्ही कितीवेळा समजावून सांगतोय. तुला अजुन किती वर्षे तुझं सो कॉल्ड स्वातंत्र्य उपभोगायचं आहे ते तू ठरवं; पण आयुष्याच्या एका वळणावर तो रितेपणा, ते एकाकीपण खायला ऊठणारच आणि नेमकी त्याचवेळी आपल्याला हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती आपल्यापासुन फार दूर गेलेली असणार. इतकी दूर की त्याचं अस्तित्व ही तुला जाणवणार नाही. मग त्यावेळी अचानक हे आयुष्य निरर्थक वाटु लागेल. पश्चाताप ग्रासु लागेल, तेव्हा काय करशील? आज, आत्ता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहेस हे विसरु नकोस.
पण यावेळी एक विनंती करतो.जर तो तुला खरंच आवडत असेल तर आता यावेळी तरी निर्णय घेवून टाक. You know what I mean." 

तिचे वडील बोलता बोलता थांबले. तिचे डोळे दाटुन आले.बाबा असं काहे बोलतील हे तिला अपेक्षित नव्ह्तं. त्यांच्या त्या बोलण्याने तिला थोडा धीर आला होता. इतके दिवस स्वत:च्या मनाशी चाललेला खेळ तिला थांबवायचा होता आणि बाबांच्या बोलण्याने तिला थोडं बळ आलं. 

               वडीलांचा निरोप घेउन ती लोकल पकडुन दादरला पोचली. वेटींग रुममध्ये रजिस्टरवर नाव आणि तिकीट नंबर नोदंवून तिथल्या खुर्चीवर बसली.हळूहळू ती वेटींग रुम भरु लागली. रात्रभर तिला झोप लागलीच नाही. पहाटे साडेचारचा अलार्म वाजला. वॉशरुममध्ये जाउन फ्रेश होउन ती वेटींग रुममधुन बाहेर पडली आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागली.


               गाडीची अनाउंसमेंट झाली होती.ती वेटींग रुममधून निघुन दादर टर्मिनसच्या दिशेने चालू लागली. गाडी नुकतिच प्लॅटफॉर्मवर आली होती.गाडीत चढण्यासाठी माणसांची लगबग सुरु झाली.तिनेही आपला डब्बा शोधला व आपल्या सीटवर जाउन बसली.या ट्रेनचं एक बरं होतं; ट्रेनला मोजकेच स्टॉप्स होते आणि दुपारी साडे बाराच्या दरम्यान ती पोचणार होती.बरोबर साडे पाचला गाडीने हॉर्न दिला आणि हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला. एव्हाना अंधुक प्रकाशात मुंबई जागी होत होती.लोकल्स धडधडत ये-जा करत होत्या. १५-२० मि. ट्रेन ठाण्याला पोचली तेव्हा तिने फेरीवाल्याकडुन न्युज पेपर घेतला, पनवेल येईपर्यंत तो चाळून झाला. पनवेलला ट्रेनमधल्या फेरीवाल्याकडला एक मस्त चहा तिने मारला.आता तिला थोडं फ्रेश वाटु लागलं. लोकांची वर्दळ कमी झाली.आता ट्रेन थेट दोन अडीच तासांनी चिपळूणला थांबणार होती. गाडीने पनवेल सोडलं आणि गार वारा तिच्या अंगाला झोंबू लागला.पाउस ओसरुन एक महिना झाला होता पण कोकणातला परिसर हिरवागार होता.तिने पूर्वेकडे पाहिलं, सह्याद्रीच्या डोंगराआडुन सुर्यदेव हळुहळू वर येत होता.गुलाल उधळावा तशी पुर्व दिशा तांबड्या आणि केशरी रंगानी उजळली होती.कॅनवासवर ब्रशने फटकारा मारावा तसा एखादा पाखरांचा थवा भुर्र्कन उडुन जात होता.एव्हाना गाडीने वेग घेतला आणि खिडकितुन झोंबणार्‍या गार वार्‍यासवे खेळता खेळता तिने डोके खिडकीला टेकले आणि डोळे मिटुन घेतले. डोळे मिटताच ४ महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. आता यावेळी तिला तो प्रसंग आठवायचाही नव्हता.पण नाही त्या भरधाव वेगात तिच्या डोळ्यांसमोरुन तो प्रसंग वेगाने सरकू लागला.

          एके संध्याकाळी त्याने तिला भेटायला बोलावले होते. दोघेही चर्चगेटला भेटुन समुद्राच्या दिशेने निघाले.तो थोडा अस्वस्थच वाटत होता.तिने तसं विचारलंही पण त्याने काही नाही असं सांगुन तिला टाळलं.पण तिला ठाउक होतं की काही तरी बिनसलयं.चालत चालत ते नरीमन पॉईंटला समुद्राच्या टोकावर पोचले. किती तरी वेळ तो नुसता समुद्रकडे टक लावुन बघत होता. तिने बराच वेळ त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला पण तो काहिच बोलत नव्हता. कंठाळून ती जायला उठली त्याने तिचा हात धरला. गेल्या ३-४ वर्षात आज पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता. जरी त्या स्पर्शात अडवणूक होती तरी त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली. हात धरून त्याने तिला खाली बसायला सांगितलं. यावेळी बसताना दोघांमधलं अन्तर बरंच कमी झालं होतं. ती बसली. 

"अभी काय झालयं? सांगशिल का?"
"काय सांगु?" तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोलला. त्याने असं डोळ्यांत पाहिलं की ती नेहमी नजर चुकवायचा प्रयत्न करायची,कारण त्याच्या नजरेत एक प्रकारची नशा होती.तिला ती जाणवायची. त्याच्या मनातलं तिच्याविषयीचं सारं प्रेम त्याच्या डोळ्यांत दाटुन यायचं तेव्हा तिचं काळीज धडधडायला लागे.
"प्लिज बोल रे.काय झालयं सांग ना." नजर चुकवत ती बोलली.
 


"ऐकायचयं तुला? ऐक तर मग...;
हे बघ, मला नाही माहित की तुला माझ्याकडुन काय हवयं ते? आय मीन, मला नाही कळत की का आपण पुन्हा पुन्हा भांडतो आणि पुन्हा पुन्हा एकत्र येतो ते? तू पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंस त्यानंतर मी तुला त्याबाबत कधी विचारलं तरी का? मग का हे सगळं पुन्हा पुन्हा? मला नाही सहन होत यार हे सगळं.त्रास होतो मला या सगळ्याचा. भयंकर त्रास होतो! किती वेळा मी माझ्याच मनाचा, माझ्या भावनांचा खून करायचा आणि किती वेळा एखाद्या प्रेताप्रमाणे पुन्हा तुझ्याबरोबर राहायचं? अजुन कितीवेळा आपण एकमेकांना शेवटचं गुडबाय म्हणणार आहोत? आणि किती वेळा सॉरी म्हणून पुन्हा खोटं खोटं जगणार आहोत? मला या असल्या आयुष्याचा कंठाळा आलाय. वैताग आलाय. कळत नाहीय मला की हे सगळं कधी थांबणार आहे ते.पण कधी तरी या सगळ्यांना पूर्णविराम द्यावाच लागेल ना? कधी तरी आपण कायमचे वेगळे होणारच ना? मग आता का असं कुढत कुढत जगायचं आपण?" तो बोलत होता आणि ती भरल्या डोळ्यांनी उठुन उभी राहिली. 

"त्रास फक्त तुलाच होतो हो ना? मला नाही होत. मी काय मेणाची बाहुली रे.मला कसल्या आल्यात फिलिंग्ज. आय अ‍ॅम जस्ट अ हार्टलेस पर्सन! मला काय कळतयं की तुला काय होतयं ते? तुला कसला त्रास होतोय ते? मी खेळतेय ना रे तुझ्याशी.तुझ्या भोळ्या मनाचा फायदा उचलतेय.माझा वेळ जावा म्हणुन तुझ्याबरोबर फिरतेय.बस्स! हेच करते मी. खुष?" तिचा आवाज ओलसर झाला होता. त्याने उठुन तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले. 

"नाही ना असं करत तू? मग अजुन किती दिवस माझी परीक्षा पाहणार आहेस? मी नाही गं जाळू शकत स्वतःला असं. नाही सहन होत मला माझं हे असं वागणं. नाही सहन होत मला तुझ्याशिवाय जगणं. हरतो यार मी! स्वत:शीच हरतो नेहमी.मला तू हवी आहेस का समजत नाहीय तुला?" 

               त्याच्या डोळ्यात संपूर्ण आवेश होता. त्याच्या या प्रश्नांना ती उत्तर देणारच होती. 
"हो! मी ही नाही राहु शकत तुझ्याशिवाय. तू ही हवा आहेस मला. कायमचा." 

         शब्द तिच्या ओठावर येणारच होते की अगदी अनपेक्षितपणे तिच्या ओठांवरील शब्दांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं. हे सगळं तिला अपेक्षित नव्हतं. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने वीज सळसळत तिच्या शरीरात गेली.एक दोन तीन सेकंद तिला वाटलं पावसाची पहिली वहीली कोवळी सर तिच्या ओठांवर सरसरतेय पण नाही तिला ते अयोग्य वाटलं.तिला ती पावसाची सर वाटलीच नाही तर एक अजस्त्र लाटच आपल्यावर उसळलीय असं वाटलं.दुसर्‍या क्षणी तिने त्याला झिडकारलं आणि साटकन एक कानाखाली ठेवून दिली. तो हादरला.भरला डोळ्यानी आणि रडवेल्या चेहर्‍याने ती निघुन गेली, "आय हेट यु अभय!"  

          गाडीने कर्णकर्कश भोंगा वाजवला आणि एका टनलमध्ये शिरली. तिने खाडकन डोळे उघडले.कान बहिरा करणारा गाडीचा आवाज आणि बाहेर फक्त बोगद्यातला काळोख होता.... क्रमश:

  

4 comments: