Saturday, August 16, 2014

वारी कोहोजगडाची...

"तो दिसतोय न? हं! तोच कोहोज किल्ला! 
आणि ही समोरची पायवाट. इथुनच जायचयं आपल्याला. पुढे एक तलाव आहे. तलावाच्या काठानेच जायचयं. मॅप आहे माझ्याकडे. माझ्या अंदाजाप्रमाणे २-३ तास लागतिल वर जायला. आणि उतरायला २ तास पुरे. येउ आपण खाली ३-४ च्या दरम्यान.
आता किती वाजलेत? आयला! ११:३० वाजलेत. चला, चला लवकर चला." 
असं म्हणुन आम्ही कोहोज किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. पण सकाळी ११:३० वाजता, इतक्या उशिरा ट्रेक सुरु करण्याचे कारण? त्यासाठी थोडं मागे जाउ. जास्त नाही ३-४ तास मागे जाउ. 


                  त्याचं झालं काय की ट्रेक ठरला. मेंबर्स पण ठरले आणि धुंडीराज सोडुन सगळे वेळेवर पण आले. शनीवारी सकाळी ७ वाजता प्लाझा, दादरला भेटायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे मी पनवेलहुन, आनंद डोंबिवलीहुन, सचिन पवईहुन, राजिव काका ठाण्याहून, अनघा दादरलाच राहते आणि धुंडीराजला वाटेत जोगेश्वरी हायवेवरुन उचलायचे ठरले. आम्ही सगळे दादरला जमलो तेव्हा धुंडीला कॉल केला तेव्हा तो उठला होता. त्याला सांगितलं १५-२० मि. पोचतो आम्ही. त्याप्रमाणे अनघाची नवी कोरी स्कोडा घेउन आम्ही दादरहुन वेस्टर्न हायवेवर सुटलो. राजीव काका ड्राईव्ह करत होते. त्यांना सांगितलं की पालघरला पोचल्यावर मनोर - वाडा रोड आपल्याला पकडायचा आहे त्याच मार्गावर कोहोज किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघोटे आहे. पण माझंच काहीतरी चुकलं; पण त्याआधी आम्ही ७:३० जोगेश्वरी हायवेला पोचलो तरी धुंडीराजचा पत्ता नव्हता. कॉल करुन करुन थकलो. येतो रे, आलोच, असं सांगुन पठ्ठा ८ ला आला. झालं! त्यानंतर ट्रेकमध्ये पुढे जे काही झालं ते सगळं धुंडीराज मुळेच झालं असं बोलुन बोलुन त्याला पिडलं. 

        तो आल्या आल्या राजीव काकांनी गाडी हायवेवर सुसाट सोडली. काका ड्राईव्ह करु लागले की आम्ही निर्धास्त होतो आणि आमच्या चकाट्यांना उत येतो. आम्हाला माहीत असतं की काका डेस्टीनेशनला आमच्या गप्पांमध्ये सामिल होउनही बरोब्बर वेळेत पोचवतात.पण यावेळी माझंच चुकलं. म्हणजे मी काकाना म्हणालो की मला रस्ता माहीत आहे. पालघरच्या आधी वाडाला जायला जो मनोर-वाडा एग्झिट आहे तोच घ्यायचा. एरव्ही काका चुकले नसते किंवा त्यानी आधी रोड मॅप पाहिला असता तरी ते चुकले नसते आणि चुकायचा प्रश्नच नव्ह्ता सरळ सरळ हायवे वरुन पालघरच्या आधी मनोर-वाडा फाटा गाठायचा होता. एक तर धुंडीराजमुळे आधीच उशिर झाला होता. :D 

          तर हायवेवर असतानाच ९ च्या सुमारास पोटात कवळे ओरडु लागले. मग काका त्यांना माहित असलेल्या हायवेवर असलेल्या महागड्या इडलीवाल्याच्या (कामताच्या)  हाटेलात घेउन गेले. तिथे मस्त फ्रेश वैगरे झालो आणि ब्रेकफास्ट करुन पुन्हा पालघरच्या दिशेने निघालो. पुन्हा गाडी आणि आमच्या गप्पा सुसाट सुटल्या. बराच वेळ झाला तरी पालघर येत नव्हते. मी आजुबाजुला  साईनबोर्डस पाहत होतो, अचानक एक साईनबोर्ड वाचला आणि मला धडकीच भरली.  "डहाणु स्थानका कडे" " महालक्ष्मी मंदीर" हा बोर्ड वाचल्यावर डोळेच फिरले. आम्ही गप्पांच्या नादात डहाणुला पोचलो होतो. ताबडतोब मागे फिरण्यासाठी यु टर्न शोधु लागलो. तो पण २-३ कि.मी. वर सापडला.(केजरीवालला कसा काय सापडतो लगेच काय माहीत)  तिथुन काकांनी पुन्हा गाडी दामटवली. लोकांना विचारत विचारत आम्ही मनोर-वाडा या रस्त्यावर आलो तिथुन टोल भरुन वाघोटे या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात गाडी लावली. ११:०० वाजले. अजिबात वेळ न दवडता आम्ही गडाच्या दिशेने चालु लागलो आणि हा सगळा उशिर एकट्या धुंडीराजमुळे झाला. :D

        नकाशाप्रमाणे पहीली खूण म्हणजे दीलच्या आकाराचं तळं होतं. ते शोधत शोधत आम्ही चालू लागलो आणि ते सापडलं. पुन्हा चालत चालत दुसर्‍या खुणेपाशी म्हणजे पाझर तलावापाशी आलो आणि तलावापाशी येताच हबकुनच गेलो. डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा प्रचंड, शांत तलाव बघुन फार प्रसन्न वाटलं. पाउस नव्हता पण गारव्यामुळे वातातवरण आल्हाददायक होते. काळे बाळे ढग मुक्तपणे विहार करत होते. मग आमच्या फोटोग्राफीला उत आला आणि आम्ही तिथे जरा जास्तच रमलो. 






          घड्याळ्याकडे बघत काका चला चला म्हणुन मागे लागले तसे आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. पुढे शेतातुन चिखल तुडवत गडाच्या पायथ्याच्या रानवाटेजवळ आलो. तिथुन माहीती असल्याप्रमाणे पायवाटेने वर चढायचे होते. रान तुडवत, गप्पा हाकत आम्ही चालु लागलो. बराच वेळ झाला तरी वाट संपत नव्हती. वाट चुकलो तर नाही ना असं वाटु लागलं. एकतर इथे कुठे मार्किंग्ज पण नव्हत्या. आम्ही चालु लागलो आणि किमान  तासभर चालल्यावर लक्ष्यात आलं की आपण चुकलोय, कारण चढ कुठेच लागला नव्हता. किती तरी वेळ रानातच चालत होतो. एका ठीकाणी वाटेला दोन फाटे फुटले होते. एक वाट उजवीकडे तर दुसरी वाट सरळ जात होती. आता जायचं कुठे यावर आमची चर्चा सुरु झाली. एक वाजायला आला होता. पाउस नसला तरी दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. ज्या ठीकाणी वाटेला फाटे फुटले होते तिथुन उजव्या बाजुला गेलो तर तो मघासचा तलावाच्या समोर असलेला कातळ दिसु लागला. ट्रेकक्षितिजच्या नकाशाप्रमाणे गडावर एक मंदीर आहे, तर त्या कातळाच्या माथ्यावर मंदिरासारखी शेड दिसू लागली. म्हणून धुंडी आणि आका वाट शोधायला गेले. आम्ही पुन्हा नकाशा नीट बघू लागलो. काहीवेळाने ते दोघे परत आले, पुढे वाटच नव्हती. काही वेळ चर्चा करुन आम्ही मागे फिरलो आणि समोरच्या सरळ वाटेने जायचे ठरवले. खूप उशीर झाला होता, वाट समजत नव्हती, गडाची काही खूण दिसत नव्हती आणि घामाने निथळून गेलो होतो. मघापासुन वाटत होतं की  कुणीतरी वाटेत भेटाव शेतकरी किंवा गुराखी निदान त्यांना वाट विचारता आली असती, पण कुणीच नव्हतं.हे सगळं काही धुंडीमुळेच झालं होतं. :D


महाचर्चा :D






        त्या वाटेवरुन चालताना कुठे मार्किंग्ज आहेत का ते पाहत होतो आणि अचानक कसला तरी आवाज ऐकू आला. मला वाटलं कुणी तरी ताटली वाजवत येतं होतं. आम्ही सावध झालो. झाडा झुडुपातुन कुणीतरी येतं होतं आणि  घंटेचा आवाज. काहीच कळत नव्हतं. आम्ही सावधपणे चालू लागलो आणि समोरुन काही बकर्‍या म्यँ म्यँ करत आल्या. बकर्‍या आलया म्हणजे कुणीतरी असणार असा विचार करुन आम्ही पुढे चालु लागलो आणि अचानक उजवीकडुन एक आज्जीबाई समोर आल्या. त्यांना बघुन थोडं हायसं वाटलं. त्यांना विचारलं गडावर जायची वाट कुठे? आणि आज्जीबाईनी आम्हाला वाट दाखवली. ज्या वाटेवरुन आज्जीबाई आल्या होत्या तीच वाट गडावर जात होती. पण ती पायवाट आम्हाला बिलकुल दिसलीच नसती आणि आम्ही पुन्हा सरळ वाटेने चालत कुठच्या कुठे पोचलो असतो. आज्जीबाई अगदी देवासारख्या त्या वाटेवर भेटल्या. आजीबाईंचे आभार मानुन आम्ही त्या वाटेवरुन चालायला लागलो तेव्हा दीड वाजले  होते .




      आता थोडी हुशारी आली आणि काही वेळातच एका मोठ्या दगडापाशी आलो इथे मार्किंग होती. व्वा रे ! मार्किंग करणार्‍यांनो. मग आम्ही आता त्या वाटेने चालु लागलो. आता खरा चढ सुरु झाला. मोठमोठ्या दगडांमधुन वाट जात होती. पण आताही तेच इतका वेळ चाललो पण गड  किंवा गडाची एखादी खूण काहीच दिसत नव्हते. चालून चालून पायांची चाळण झाली होती. तरी बाकीचे सगळे काटक आणि मी जड असल्याने मलाच उशीर होत होता. हॉल्ट घेत घेत मी चालत होतो. अडीच वाजायला आले तरी गड दिसतच नव्हता आणि माझी सटकली. म्हटलं मरु दे तो ट्रेक चला जाउया परत. पहिल्यांदाच मी एखाद्या ट्रेकला वैतागलो होतो. इतकावेळ पायपीट करुनही गड दिसत नव्हता त्यामुळे अजुन सटकली होती. एरव्ही एखाद्या ट्रेकला निदान गडाचा बुरुज, किंवा झेंडा किंवा अन्य काहीतरी दिसत जेणेकरुन समजतं की आपण बरोबर चालतोय आणि काही वेळात तिथे पोहचू. पण इथे चारी बाजुला फक्त माजलेलं रान आणि मोठाले दगड-धोंडे. मी वैतागलो. म्हणालो मरु दे तो ट्रेक चला परतुया. पण बाकीचे म्हणाले नाही, पूर्ण करुया त्यात अनघाही एकदम इरेला पेटली. मग पुन्हा एकदा आई भवानीचं नामस्मरण करत मी चालायला सुरुवात केली. आणि हो! हे सगळं काही धुंडीमुळेच झालं. :D




        आता पाउस सुरु झाला आणि गड पुर्ण धुक्यात गायब झाला. काहीवेळाने चढुन एका मोकळ्या पठारावर आलो आणि धुक्याच्या पडद्याला छेदुन गडावरली पहीली खूण म्हणजे मंदीर दिसलं आणि हायसं वाटलं. तिथल्याच एका दगडावर बसलो. इतकावेळ तंगडतोड करुन शेवटी गडावर पोचलो तर. थोडं सटर फटर खाउन घेतलं आणि आता गड फिरायची घाई होउ लागली कारण ३ वाजले होते आणि वर यायला लागलेला वेळ लक्ष्यात घेता काळोख व्हायच्या आत खाली उतरायचे होते आणि पुन्हा वाट चुकलो तर मग काही विचारायलाच नको.






            आम्ही रिमझिम पावसात धुक्यातून वाट काढत त्या मंदिरापाशी येउन पोचलो आणि गड फिरायला सुरुवात केली. गडावर विशेष काही बघण्यासारखं नाही. पण मला जे बघायचं होतं ते म्हणजे तो गडाच्या माथ्यावर असलेला निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा पुतळा. तो पुतळा म्हणजे निसर्गाचं एक आश्चर्यच आहे. कधी वाडा - मनोर रस्त्यावरुन जात असाल तर  उजवीकडे गडावर हा पुतळा दिसतो. रिओ मधल्या ख्रिस्ताच्या पुतळ्यासारखा हा देखिल आपले बाहु पसरुन उभा आहे. पण वेळेअभावी वर जाता आले नाही आणि पाउस ही सुरु झाला. तितक्यात त्या पुतळ्याच्या वाटेवरुन एक ग्रुप खाली उतरताना दिसला. मग आम्ही तिथेच फोटोग्राफी करायला सुरुवात केली.








     काही वेळ भटकून ४ वाजताच काकानी परत फिरायचा इशारा दिला. आता घाई घाई करुन आम्ही गड उतरायला लागलो. पण नेहमीचा अनुभव आहे एखादा गड चढताना जितका वेळ लागतो तितकाच उतरताना देखिल लागतो. त्यात वाट निसरडी असल्याने आमच्या लीड स्ट्रायकर अनघाने ४-५ गोल मारले. :ड कसे बसे त्या रानातुन वाट काढत, शेतातला चिखल तुडवत एकदाचे पाझर तलावापाशी आलो तेव्हा साडे पाच - सहा  वाजले होते. तिथे पायातले बूट काढले आणि पाण्यात पाय बुडवून बसुन राहिलो. पुन्हा आवरुन जायला निघालो आणि गाडीपाशी येउन वेस्टर्न एक्सप्रेसवरुन  वाटेत धुंडीराजला टाकून दादरला पोचलो तेव्हा सात - साडेसात वाजले होते. नाही म्हणायला एक भन्नाट ट्रेक झाला होता. पहिल्यापासुन चुकलेली वाट आणि त्यामुळे झालेली  दमछाक, वैताग, पाउस. आणि हे सगळं कुणामुळे?? तर धुंडीराजमुळे. :D :P
 
एकदा केल्यावर पुन्हा कधीही न करण्याच्या ट्रेक मध्ये राजमाची, माहुली बरोबर कोहोजगडाची एंट्री झाली..



काही इतर छायाचित्रे :












- दीपक परुळेकर  

Wednesday, April 16, 2014

द हंट - विक्षिप्त शिकार.


              
 
 
                  यावर्षीच्या ऑस्कर्सच्या बेस्ट फिल्मच्या मानांकनातले बहुतेक सर्व सिनेमे पाहुन झाले होते. फक्त नेब्रास्का आणि फिलोमिना राहिला. सहज चाळाचाळ करता लक्ष "Best Foreign Language's लिस्टवर गेले. पाच सिनेमांपैकी 'द हन्ट' (The Hunt) ह्या डॅनिश सिनेमाच्या नावाने थोडंस आपल्याकडे खेचल्यासारखे केलं. या वर्षीचा बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मचा बहुमान 'द ग्रेट ब्युटी' या इटालियन सिनेमाने पटकावयला. तो ही पाहण्याच्या लिस्टमध्ये असतानाच मी पहिल्यांदा 'द हन्ट' पाहायचं ठरवलं.

       लुकास ( Mads Mikkelsen ) हा तिथला स्थानिक डॅनिश कम्युनिटीधला इतर स्थानिकांसारखाच सदस्य आहे. चरितार्थासाठी तो तिथल्या एका किंडरगार्टेन मध्ये शिक्षकाचं काम करतोय. त्याची पत्नी घटस्फोट घेउन त्याच्या मुलाला घेउन सोडुन गेलीय आणि आपल्या मुलाशी एक चांगलं नातं जपण्याच्या प्रयत्नात तो आहे. आधीच मोडलेला संसार आणि त्यामुळे आपल्या एकुलत्या एका मुलाच्या कस्टडीसाठी प्रयत्नशील आहे. हे सगळं असताना देखिल तो त्याचं नेहमीचं काम खूप चांगल्याप्रकारे एंजॉय करतोय. छोटी छोटी मुलंही त्याच्या गोष्टींमध्ये, खेळांमध्ये रमतायत. त्या किंडरगार्टेनमधली ती सगळी छोटी मुलं म्हणजे त्याच्या मित्र-मैत्रीणीचीच मुलं आहेत. त्याचं केजीमधल्या को वर्कर नाजा शी ( Alexandra Rapaport )  अफेअर पण आहे आणि त्यामुळे ती हल्ली त्याच्याच घरी राहतेय. 
 
 

             सगळं काही सुरळीत सुरु असतं. मित्रांबरोबर शिकारीला जाणं, मजा करणं, मित्र-मैत्रीणीच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेट करणं आणि त्यातल्या त्यात त्याला अजुन एक गुड न्युज मिळते की त्याचा ९-१० वर्षांचा मुलगा मार्कस ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये त्याच्याकडे येणार असतो. हे सगळं असं सुरळीत सुरु असताना एक घटना घडते आणि त्याच्या आयुष्याची विल्हेवाट लागायला सुरुवात होते. किंडरगार्टेन मधली एक छोटी चार - साडेचार वर्षांची मुलगी क्लारा केजीच्या हेडबाईंना सांगते की लुकासने काही वेळा तिला त्याचे गुप्तांग दाखवले आणि तो घाणेरड्या गोष्टी करत राहतो. ही क्लारा लुकासच्या अतिशय जिवलग मित्राची, थिओची मुलगी असते. लुकासचं नेहमी थिओच्या घरी येणं जाणं असतं. त्यामुळे कधी कधी क्लाराला लुकास शाळेत सोडायचा किंवा घरी घेउन यायचा. त्यात आई वडीलांच्या नेहमीच्या भांडणामुळेही क्लारा नेहमी लुकास बरोबर मजेत असायची. खरं तर असं काहीच नसतं. ती लुकासने आपल्याशी असं वर्तन केल्याचं खोटंच सांगते. ती असं का करते हे दिग्दर्शकाने एक - दोन छोट्याश्या प्रसंगातुन दाखवून दिलेय आणि ते प्रसंग तितकेसे परिणामकारकही आहेत. पण तिच्या या सांगण्यावर मात्र सगळेजण लगेच विश्वास ठेवतात आणि लुकासचं जिवन विस्कळीत होउन जातं.त्याला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात येतं. कम्युनिटीमधले सगळेजण त्याला लिंगपिसाट ठरवून त्याच्यावर बहिष्कारच टाकतात. त्याची बायको मुलाला त्याच्याकडे पाठवण्यास मनाई करते आणि या सगळ्याच्या प्रेशरमुळे नाजाशी ही त्याचं ब्रेक अप होतं. एकंदरीत त्याचं आयुष्यच धुळीला मिळाल्यासारखं होतं. तरीही तो आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यसाठी झगडत असतो. त्याचा मुलगा त्याच्याकडे येतो. मुलाला आपल्या वडीलांवर विश्वास असतो. खरं काय ते कळल्यावर त्याला क्लारा आणि थिओ कुटुंबियांचा अतिशय राग येतो. उद्विगन होउन तो थिओच्या घरी जातो आणि आपले वडील निर्दोष असल्याचे आनि क्लारा खोटं बोलत असल्याचे सांगतो पण त्याचा कुणावरही परिणाम होत नाही उलट काही लोक त्यालाच रक्त सांडेपर्यंत मारतात. त्याला लोकल मॉलमध्येही काही विकत मिळत नाही. तिथुन त्याला हाकललं जातं. तिकडे केजेमधली अजुन काही छोटी मुले लुकासने आपल्याशी असचं वर्तन केल्याचं सांगून क्लाराच्या बोलण्याची री ओढतात त्यामुळे प्रकरण अजुनच चिघळतं. लुकासचं नेहमीचं जगणं मुशिकल झालेलं असतं. कम्युनिटीने त्याला बहिष्कृत केलेलंच असतं. एकेदिवशी मॉलमध्ये खाण्याचे जिन्नस घ्यायला गेलेल्या लुकासला तिथला कामगार मरेपर्यंत मारतो. म्हणजे हे सगळं बघुन अंगावर काटाच उभा राहतो. रक्तबंबाळ अवस्थेत लुकास मॉलमधुन बाहेर पडतो तेव्हा थिओ आणि त्याची बायको त्याला पाहते. थिओला वाईट वाटतं. कम्युनिटीतले लोकं दोघा बापलेकांचं जगणं हराम करुन टाकतात. रात्रीच्या वेळी दगड मारुन त्याच्या घराच्या काचा फोडुन टाकल्या जातात. त्याची लाडकी कुत्री, फॅनीला कुणीतरी मारुन टाकतं आणि पिशवीत बांधून त्याच्या घराच्या आवारात फेकलं जातं. लोकांच्या या अशा वागण्याने लुकास अतिशय अस्वस्थ होतो. सगळ्या कम्युनिटीच्या लोकांना तो नको झालेला असतो. या सगळ्याने त्रस्त झालेला लुकास ख्रिसमसच्या संध्याकाळी चर्चमध्ये जातो जिथे सगळेजण प्रार्थनेसाठी जमलेले असतात. तिथे जाउन सगळ्यांसमोर तो थिओची कानउघड्णी करतो.

           शेवट काय होतो हे इथे सांगत नाही. Mads Mikkelsen ने लुकासची भुमिका अतिशय प्रभावीपणे पार पाडलिय. मॅड्स ला तुम्ही जेम्स बॉन्डच्या कसिनो रॉयलमध्ये व्हिलनच्या भुमिकेत पाहिलं असेलच. एकंदरीत सिनेमा लुकास आणि क्लारा भोवतीच फिरत राहतो. त्या छोट्या मुलीने देखिल क्लाराचा रोल सुंदररित्या आणि अगदी नॅचरली पार पाडलाय. प्रत्येकवेळंचं तिचं लुकासबरोबरचं वागणं, नंतर तिच्या आरोपांमुळे लुकासला होणारी मारहाण आणि अगदी शेवटच्या प्रसंगात लुकासच आणि तिचं संभाषण हे सगळं त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदरपणे सादर केलयं. अन्न किंवा अन्य उपयोगी वस्तू विकत घेणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही डवलू शकत नाही असं मार खात खात सांगणारा लुकास जेव्हा त्याला दुकानातून बाहेर फेकलं जातं तेव्हा तो पुन्हा दुकानात शिरतो आणि त्या कामगाराला मारतो. आपल्याला हव्या असलेल्या वस्तु घेतो, पैसे फेकतो आणि तसाच रक्तबंबाळ होउन घराच्या दिशेने चालत जातो. हा प्रसंग मॅड्सने अतिशय परिणामकारक उभा केलाय. दिग्दर्शक Thomas Vinterberg ने काही प्रसंग अतिशय परिणामकारकरित्या उभे केलेत. शिकारीच्या वेळच्या डेन्मार्कच्या त्या गावातल्या जंगलातल्या काही फ्रेम्स तर क्लासच आहेत.



                लहान मुलांचे लैंगिक शोषण ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि हल्ली तर असे प्रसंग आपल्या आजुबाजुला देखिल सर्रास घडतात. त्यावर एक समाज म्हणुन आपली प्रतिक्रिया काय असते? म्हणजे निदान भारतात तरी अशी विशेष काही शिक्षा होत नाही. हा सिनेमा काही मुद्दे ठळकपणे मांडतो. एक तर जेव्हा क्लारा लुकासवर आरोप करते तेव्हापासुनच सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात कारण ती लहान असते, आणि त्यात ती मुलगी असते. 'लहान मुलं कधीही खोटं बोलत नाहीत' असं केजीच्या हेडबाई लुकासला ठणकाउन सांगतात आणि त्याला नोकरीवरुन काढलं जातं. इथे आपल्याला कळतं की समाज सत्य जाणुन न घेता एखाद्याच्या विरोधात आंधळेपणाने कसा वागू शकतो. पण लुकास निर्दोष आहे हे तो त्यावेळी सिद्ध करु शकत नाही किंबहुना त्याला तसा चान्सच दिला जात नाही. कुणीही त्याचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं. थिओचा लुकासवर फार विश्वास असतो आणि  तो आपल्याला प्रत्येक प्रसंगात जाणवत राहतो अगदी शेवटच्या प्रसंगातसुद्धा जेव्हा थिओला सत्य कळतं तेव्हा तो तडक ड्रींक्स आणि खायला घेउन लुकासच्या घरी जातो. एका प्रसंगाने आपली कित्येक वर्षांची मैत्री कशी लयास जाउ शकते आणि आपण कधी कधी अशा प्रसंगी काहीच करु शकत नाही हा हताशपणा थिओच्या भुमिकेतुन जाणवू लागतो. क्लारा प्रत्येकवेळी कन्फ्युझिव्ह स्टेट्समेंट देत राहते. पण ती कदाचित त्या धक्क्यात असेल असे समजुन सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात. तसं बघायला गेलं तर अशी घटना क्वचितच घडत असेल. पण लहान मुलांच्या कल्पनाविस्ताराला आणि त्यांच्या स्वतःच्या जगाला थारा नसतो. त्यांच्या आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा नकळत त्यांच्या बालमनावर परिणाम होत असतो. काही प्रश्नांचं मोठ्यांकडून समाधान न झाल्यास कदाचित मुलं त्यांच्या समजेनुसार एखादी घटना किंवा प्रसंग जन्माला घालत असावेत. क्लाराचं अगदी तसंच काहीसं होतं पण शिकार होते बिचार्‍या निर्दोष लुकासची. 
 
- दीपक परुळेकर

Wednesday, April 9, 2014

सून्न करणारी - 'द लॉटरी'


           शर्ली जॅक्सनची ( Shirley Jackson ) "द लॉटरी" ही शॉर्ट स्टोरी वाचताना मनात त्या गोष्टीबद्द्ल किंवा शिर्षकाबद्दल आलेले विचार किंवा कल्पना उतार्‍यानुसार बदलत जातात ते अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत. त्यामुळे कसलाही विचार न करता ही गोष्ट वाचत जावी. आपल्याकडील खांडेकरांच्या जशा रूपककथा अगदी तशाच प्रकारच्या जॅक्सनच्या शॉर्ट स्टोरीज. "द लॉटरी' नंतर मी 'Charles' आणि 'After You My Dear Alphonse' या गोष्टी वाचल्या त्या ही अगदी तशाच धाटणीच्या. सुरुवातीपासुन काही कळत नाही की गोष्ट कुठे संपणार आणि जेव्हा संपते तेव्हा त्या शेवटच्या वाक्याने हादरण्यापलिकडे आपल्या हाती काही नसतं.पण मला 'द लॉटरी' अतिशय आवडली. अगदी २० पानांचं, २००/-  रुपयांचं  हे पुस्तक मी अ‍ॅमेझॉन वरुन मागवलं तेव्हा १० -१५ दिवस लागले कारण ते भारतात उपलब्ध नव्हतं.

            लॉटरी म्हणजे आपली सर्वसाधारण कल्पना की काहीतरी कोणीतरी जिंकणार किंवा हरणार त्याबद्दची कथा. तसंच काहीसं पण कथा फार रोचक आहे. जॅक्सन बाईंची ही कथा १९४८ साली अमेरीकेच्या 'द न्यूयॉर्कर' या मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी तर कथेच्या शेवटावर नाराज होउन अनेक वाचकांनी 'द न्यूयॉर्कर' ला निषेधाची पत्रं पाठवुन सबस्क्रिप्शन्स रद्द करवले होते. तेव्हापासुन अमेरिकन साहित्यविश्वातला एक मैलाचा दगड म्हणून या गोष्टीकडे पाहिले जाते.       

             जॅक्सनच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे कथेची मांडणी. अगदी थोडक्या शब्दात प्रत्येक घटनेची मांडणी त्यातल्या प्रमुख पात्रांसह करुन देण्याची खासियत. 'द लॉटरी' ची सुरुवात अशीच काहीशी.अमेरिकेतल्या ३०० लोकांच्या वस्तीच्या एका छोट्या गावात २७ जून हा दरवर्षीप्रमाणे  लॉटरीचा दिवस असतो आणि त्याची तयारी म्हणुन सगळेजण सकाळीच गावातल्या पोस्ट ऑफिसच्या चौकात जमा होतात;कारण लॉटरीचा कार्यक्रम लवकारत लवकर आटोपून त्यांना दूपारचं जेवण घ्यायचं असतं.लहान मुले चौकातल्या एका कोपर्‍यात दगडांची रास जमवतात. मोठी माणसे, म्हातारे, बायका, मुली लहान मुले सगळेजण एका उद्विग्नतेने लॉटरीत कुणाचं नाव येणार याची वाट पाहत असतात. हळूहळू आपल्याला एका एका पात्राची ओळख होत जाते आणि त्या पात्रांची लॉटरीबद्दलची मानसिकताही एखाद्या वाक्यातुन कळून येते. मि.समर्स हे लॉटरीच्या प्रोसेसचे सर्वेसर्वा असतात आणि मि. ग्रेव्ह्स त्यांचे मदतनीस.या मि. समर्सचा कोळशाच्या खाणीचा उद्योग आहे आणि त्यांची बायको त्यांना सोडुन गेलीय. लॉटरीच्या आदल्या दिवशी गावतल्या सगळ्या कुटुंबांची नावे एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून त्या चिठ्ठ्या एका काळ्या पेटीत ( ब्लॅक बॉक्स ) ठेवले जातात. या सगळ्या नावांच्या चिठ्ठ्यांमध्ये एक चिठ्ठी अशी असते त्यावर काळ्या शाईने एक मोठा ठिपका गिरवलेला असतो. ज्याला ही चिठ्ठी मिळाली त्याची लॉटरी!

              लॉटरीला सुरुवात होण्याआधी गावातले सगळेजण हजर आहेत की नाही याची पडताळणी मि.समर्स करतात तेवढ्यात घाईघाईने मिसेस हचिसन येतात."साफ विसरुनच गेले होते मी तर.मला वाटलं मला चूकते की काय लॉटरी!" असे काहीसे संभ्रमित उद्गार तिच्या तोंडातुन निघतात. मिसेस डनबारने आपल्या मुलाला आधीच सांगून ठेवलेलं असतं की, "तयार रहा आणि लॉटरीचा निकाल लागताच धावत जावून तुझ्या वडीलांना सांग जे आजारी असल्याने लॉटरीला येवू शकले नव्हते."  

           लॉटरीला सुरुवात होते आणि मि. समर्स एका एक कुटुंबाची नावे उच्चारु लागतात. ज्याचं नाव उच्चारलं जाईल त्याने येवून त्या काळ्या पेटीतली एक चिठ्ठी उचालायची आणि आपल्या जागेवर परत जायचं आणि जोवर मि. समर्स सांगत नाहीत तोवर ती चिठ्ठी उघडायची नाही. ही वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा होती. नावं उच्चारत असताना मि. अ‍ॅड्म्स म्हातार्‍या वॉर्नरला म्हणतात, " मी असं ऐकलंय की उत्तरेकडल्या काही गावांनी लॉटरी बंद पाडलीय."
"मुर्ख लेकाचे! चार बुकं शिकले म्हणुन स्वतःला शहाणे समजतात हे आजकालचे तरुण." म्हातार्‍या वॉर्नरला ते अजिबात पसंत नव्हतं.
"पण ही प्रथा अजुन किती वर्षे चालणार? कधी तरी ती बंद करावीच लागणार!" मि. अ‍ॅडम्स.
"काही होत नाही. 'जूनमध्ये लॉटरी तर शेतं भरभरुन पिकली. ( Lottery in June, corns be heavy soon.) " म्हातारा वॉर्नर असं बोलुन मि. अ‍ॅडम्सची बोलतीच बंद करतो.तिकडे मि.समर्सच एकेएका कुटुंबाचं नाव घेणं सुरुच असतं. 

         इथवर वाचेपर्यंतसुद्धा आपल्याला जरासुद्धा मगमुस लागत नाही की ही लॉटरीची भानगड काय आहे ते. अगदी तोवर जोवर ज्या व्यक्तीला लॉटरी लागते ती व्यक्ती आनंदून न जाता घाबरुन जाते, लॉटरी पुन्हा पडताळण्याची मागणी करते, का? ते मात्र शेवटच्याच वाक्यात आपल्या ध्यानात येतं. इथे मी सांगणार नाही कारण त्याने गोष्टीचं रहस्यच निघून जाईल. रादर मी सुचविन की तुम्ही सुद्धा ही गोष्ट वाचा. गुगलवर "The lottery by Shirley Jackson" असं सर्च मारल्यावर पीडीएफमध्ये ही गोष्ट उपलब्ध आहे. तसे बाकीच्या गोष्टीपण आहेत. लॉटरीनंतर 'चार्ल्स' पण वाचा ती सुद्धा अप्रतिम आहे. जॅक्सनच्या या शॉर्ट स्टोरीज भयंकर प्रसिद्ध आहेत आणि 'द लॉटरी' त्यातली सर्वात अप्रतिम अशी गोष्ट आहे. त्यावरुन प्रेरित होउन मी जॅक्सनच "We Have Always Lived In Castle" हे पुस्तक माझ्या ग्रुपकडुन वाढदिवसाची भेट म्हणुन मागुन घेतलं पण ते काही वाचायला अजुन जमलं नाही. इतक बोजड इंग्लिश वाचायला जमलंच नाही राव! :p  असो. पण तुम्ही 'द लॉटरी' जरुर वाचा आणि निकाल समजल्यावर सून्न होउन जा.



- दीपक परुळेकर  

Saturday, February 1, 2014

तुटलेला तारा .. (३)

          बरोब्बर साडे बारा वाजता ट्रेन कुडाळला थांबली. लगबगीने ती स्टेशनवर उतरली आणि बाहेर आली. स्टेशनबाहेर प्रवाशी आणि रिक्षांची झुंबड उडाली होती.कोकणात पहिल्यांदाच तिने पाउल ठेवं होतं आणि जसं अभी सांगायचा अगदी तसंच वातावरण होतं ते. दुपार असली तरी वार्‍याची एक मंद झुळूक अंगावरुन वाहतच होती.इथुन तिला अभयच्या गावी जाण्यासाठी एसटीने जाणे भाग होते. रिक्षा करुन ती एसटी स्टँडवर जायला निघाली.तिथे पोचल्यावर तिने चौकशी खिडकीपाशी जाउन गाडीची चौकशी केली तेव्हा गाडीसाठी अजुन १५-२० मि. बाकी होती.तोवर ती गाडीची वाट बघत तिथेच बसली आणि आजुबाजुला न्याहळू लागली. स्टँडवर थोडी गर्दी होती. गाडीची वाट बघत कुणी गप्पा मारत होते.शाळा कॉलेजच्या मुलांचा गोंधळ सुरु होता.क्वचित एखादे रडणारं लहान मुल आणि त्याला धपाटा घालणारी आई.बाजार करुन आता घरी जायची वाट बघत असलेल्या बायका. या सगळ्यात कोणतीही गाडी आली की त्याच्यामागे धावणारे हे सगळे लोक आणि एका विशिष्ट आवाजात त्या गाडीची होणारी अनाउंसमेंट. हे सगळं ती बघून हसत होती. मग ५-१० मि. तिला समजलं की इथे बसुन गाडी मिळणार नाही. कारण मोस्ट ऑफ गाड्यांचे फलक धड वाचताच येत नव्हते. मग ती सुद्धा एखादी गाडी आली की त्या लोकांमध्ये मिसळून जायची. अभी पण त्या एसटी स्टँडवरची ही गम्मत नेहमी सांगायचा.तिला ते आठवलं आणि उगाचच स्वतःवर हसू आलं. १५ मि. तिची गाडी आली आणि पुन्हा ती त्या सगळ्या लोकांमध्ये मिसळून गेली.लोकांची घाई फक्त बसण्यासाठी जागा हवी म्हणून होती हे तिला महत्प्रयासानी एसटीत चढल्यावर कळलं.कशी बशी तिला एक विंडो सीट मिळाली आणि ती स्वतःवरच खुश झाली.बसमध्ये नुसता गोंधळ सुरु होता आणि तो सुद्धा मालवणीत.ती ते एक एक संभाषण ऐकायचा आणि समजायच प्रयत्न करत होती. मालवणी भाषा समजायला कठीण नव्हती पण तिला ती बोलता नसती आली.कधी कधी ती अभयला संगायची,"मला पण शिकव ना रे मालवणी." मग तो सांगायचा एखाद्या मालवणी मुलाशी लग्न कर महिन्या-दोन महिन्यात मस्त बोलायला लागशील. त्यावर ती नाक मुरडायची. गाडी बरीच भरली होती आणि त्या सगळ्या गर्दीतुन वाट काढत,लोकांच्या सामानावर पाय ठेवत, शिव्या घालत आणि लोकांच्या शिव्या घेत कंडक्टर तिकिटं फाडत होता. काही वेळाने गोंगाट कमी झाला. बरीच लोकं उतरली होती. तिला लास्ट स्टॉपवर उतरायचं असल्याने काळजी नव्हती.पाउण एक तासाने गाडी एका मो़कळ्या पठारावर आली. दोन्ही बाजुला लांबवर पसरलेलं पठार आणि मधून ती एसटी सूसाट धावत होती. वार्‍याने उडणारे केस सावरत ती दूरवर त्या पठारकडे बघत होती. कातळावर मध्येच कुठेतरी सोन्यासारख्या पिवळ्या गवताचा पट्टा तिच्याबरोबर धावत होता. त्यावर चरणारी गुरं, एखादं दुसरं झाड, एखादी टपरी, मध्येच कुठल्यातरी गावाला गेलेली वाट, असं सारं तिच्याबरोबर मागे पडत होतं. एसटी शिडांत हवा भरलेल्या जहाजासारखी ते पठार कापत सूसाट निघाली होती.थोड्यावेळाने पठार संपलं आणि एक दोन स्टॉप घेउन एसटी एका घाटातून उतरु लागली तोच तिची नजर समुद्रवर गेली आणि समुद्राचे दर्शन होताच ती हरखून गेली. दूरवर तो समुद्र पसरलेल होता.मध्येच एक डोंगर समुद्रात घुसला होता. दुपारच्या वेळी शांतपणे लाटा किनार्‍याला थोपटत होत्या. गाडी घाटवळनातून जात असल्याने समुद्र मधे मध्येच दिसायचा पण त्या घाटवळणातूनच तो फार छान दिसत होता. अभी नेहमी सांगायचा ती हीच जागा तर नसेल ना. तिला आठवलं अभय नेहमी त्या जागेचा उल्लेख करायचा. गाडी घाट उतरुन आता त्या छोट्याश्या शहरात शिरली आणि पाच एक मिनिटात एसटी स्टँडवर पोचली.

          "चला, लास्ट स्टॉप." म्हणत कंडक्टरने आरोळी दिली आणि बाकीच्या प्रवाशांसोबत ती खाली उतरली तेव्हा दुपारचे पावणे तीन वाजले होते.तिने वळून पाहिलं हे एसटी स्टँड फार प्रशस्त होते. पशिमेकडुन समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येत होती.गाड्यांसाठी फलाट होते आणि कसलाही गजबजाट नव्हता. ती अभयच्याच गावी पोचली होती. फक्त त्याने कधी तरी उल्लेख केल्याप्रमाणे स्टँडवरुन रिक्षाने त्याच्या घरी जायचं होतं.पण काही केल्या तिला त्या जागेचं नाव आठवेना. आता काय करायचं या विचारात ती पडली.बराचवेळ डोक्याला ताण देउन झाला तरी तिला ते नाव आठवेना.पण तिथे उभं राहुन काही होणार नव्हतं म्हणुन तिने रिक्षावाल्यांना विचारायचं ठरवलं. अनोळख्या ठीकाणी ते थोडं रिस्कीच होतं म्हणा पण नाईलाज होता.
रिक्षा स्टँडवर जाउन तिने अभयच्या नावावरुन त्याच्या घराची चौकशी करायचा प्रयत्न केला पण ते नाव धड कुणाला माहित नव्हतं. मोठी पंचाईतच होउन बसली होती.काय करावं या विचारातच असताना एक रिक्षावाला तिच्याकडे आला आणि त्याने विचारलं,
"म्यॅडम,ते अभय पाटकर म्हणजे मुंबैवाले काय?"
"हो! हो ! मुंबईलाच असतात ते." तिला थोडा धीर आला.
"तुमच्याकडे त्येन्चा पूर्ण अ‍ॅड्रेस नाही काय किंवा मोबाईल नंबर वैगरे?" त्याने विचारले.
"नाही ना! म्हणजे याच शहरात तो राहतो कुठेतरी पण मला त्या जागेचं नावंच आठवत नाहीय."
"अरे देवा, आता काय? मला वाटता म्यॅडम तेंचा घर समुद्राच्या बाजुस आसा काय?"  काही तरी आठवल्यासारखं करुन तो रिक्षावाला बोलला.
"होय अगदी. त्याचं घर समुद्राच्या बाजुलाच आहे."
"बरा. चला तर मग मला माहिती आहे ते कुठे राहतात ते."
"नक्की ना? प्लिज मला घेउन चला तिथे." ती जायला उठली. एका अनोळख्या ठीकाणी अनोळख्या व्यक्तिबरोबर जायला ती कधीच तयार झाली नसती पण आता तिचा नाईलाज होता. ती रिक्षात जाउन बसली आणि निघाली. ५-६ मिनीटात मुख्य रस्त्या सोडुन रिक्षा एका कच्च्या रस्त्याला लागली. ती थोडी धास्तावली,पण आजुबाजुला घरं होती त्यामुळे तिला थोडा धीर होता. आजुबाजुची घरं अगदी ठेवणीतली होती. प्रत्येक घराला कुंपण होतं आणि ती कुंपणं वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांच्या वेलीनी आणि फुलानी भरुन गेली होती. १-२ मिनिटानी रिक्षा थांबली. तिने रिक्षाचे पैसे दिले आणि रिक्षातुन उतरली.
"इथेच आहे का त्यांचं घर?"  तिने विचारलं.
"होय. इथुन पुढे सरळ चलत जावा, आनि उजवीकडे वळा. तिथे एक न्हानसं देउळ आसा. त्या देवळाच्या पाठीच आहे त्यांचा घर."
"मनापासुन आभार तुमचे. तुम्ही नसता तर आज माझं काही खरं नव्हतं." ती म्हणाली आणि जायला वळली.
"तुम्ही कोण त्यांच्या नातेवाईक का?" रिक्षावाल्याने विचारले. ती थबकली.
"हो. म्हणजे, ते अभय माझे मित्र आहेत." ती उत्तरली.
"बरा.सांभाळून जावा." रिक्षावाला तिच्याकडे न बघता बोलला आणि रिक्षा घेउन निघून गेला.


तिने आजुबाजुला पाहिलं आणि एक मोठा श्वास घेतला.फायनली आपण पोचलो.
ती अभयच्या घराच्या दिशेने चालू लागली. समुद्राची गाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होती.वारा तिच्या अंगावरुन झुले घेत बागडत होता. त्या वार्‍यासोबत आजुबाजुचे माड पण संथ लयीत डोलत होते.पायवाटेवरली रेती तिच्या फ्लोटर्समधुन तळव्यांना टोचत होती. हळूहळू चालत ती त्या देवळापाशी आली आणि देवळामागले अभयचे घर तिला दिसले. मागच्या दोन दिवसाची तिची धावपळ,अस्वस्थता,धडधड सारं काही आता शिगेला पोचलं होतं.तिचे सगळे प्राण तिच्या डोळ्यांत जमा झाले होते.कधी एकदा त्याला पाहतेय असं तिला झालं होतं. देवळाला वळसा घालुन ती देवळाच्या मागे आली. समोर ते घर उभं होतं. आजुबाजुच्या घरांप्रमाणेच या घरालाही कुंपण होतं. तिने हळूच त्या कुंपणाला असलेला छोटा गेट खोलला आणि अंगणात पाउल टाकलं. अंगण प्रशस्त होतं. अंगणाच्या पुर्वेला एक तुळशी वृंदावन होतं आणि कोपर्‍यात पारिजातकाचं झाडही.घरात कसलीच हालचाल जाणवत नव्हती. अंगणातुन चालत ती त्या घराच्या व्हरांड्यात आली.तिथेही कुणी नव्हतं.व्हरांड्यातला झोपाळा स्थिर होता. मुख्य दरवाज्याच्यावर बरेच जुने फोटो होते. ती थोडीशी घाबरली आणि इकडे तिकडे पाहू लागली. आपण बरोबर अभयच्याय घरी आलोय ना?तिच्या मनात उगाच शंकेची पाल चुकचुकली आणि तिचा चेहरा पडला. कुणाला हाक मारावी का असा विचार करुन ती मुख्य दरवाजाच्या दिशेने चालू लागली तोच अभय बाजुच्या खोलीतून बाहेर आला.
" ओह्ह माय गॉड! लूक व्हू इज हीयर!" तो तिला बघून ओरडलाच.
तिला बघून ती दचकली पण लगेच सावरली. हो. तिच्यासमोर तोच उभा होता. नेहमीसारखा हसत. ती त्याच्याकडे पाहत राहिली. "अभय" म्हणुन त्याला जाउन मिठीच मारावी असं तिला प्रकर्षाने वाटलं.
"अभय!!" ती उच्चारली. चटकन तिच्या डोळ्यांतून दोन थेंब
घरंगळत गेले
"काय गं?" बरी आहेस ना? आणि कशी पोचलीस तू? तुला कसं सापडलं घर? ठीक आहेस ना? घरी सगळे ठीक आहेत ना?" तो तिला विचारत होता आणि तिचं कशावरही लक्ष्य नव्हतं.आत्ता याक्षणी त्याला फक्त बघत राहावं किंवा त्याच्या मिठीत झोकून देउन रडून द्यावं असं तिला प्रकर्षाने वाट होतं. ती स्तब्ध होती.पण एक अनावर हुंदका तिला आवरता आला नाही.
तो तिच्याजवळ गेला. तिच्या गालावरल्या आसवांना पुसत म्हणाला,"चित्रा, इट्स ओके. काय झालयं? इज एव्हरीथिंग ऑलराईट?"
त्याचा तो शीतल स्पर्श होताच ती कोसळली आणि तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकुन दिलं आणि इतकावेळ कोंडून ठेवलेल्या आसवांना त्याच्या छातीवर रितं करु लागली.
 "आय मिस्ड यू अभी. आय मिस्ड यू सो मच. का असं केलंस रे माझ्याशी? तुला कितीदा फोन ट्राय केला. तुझ्या ऑफीस, तुझ्या घरी जाउन आले. तुला एकदाही नाही वाटलं का मला कॉल करावासा. काहीही न सांगता तू मला सोडुन आलास." त्याला बिलगून रडता रडता ती बोलतं होती. त्याने दोन्ही हात तिच्याभोवती वेढेले त्यासरशी ती अजुनच त्याला बिलगली.
"ए वेडी! आहे ना मी इथे आणि आज इतक्या दिवसांनी भेटलीस तर भांडणारच आहेस का? बघ माझ्याकडे , चित्रा!" त्याच्या मिठीतून हळूहळू बाहेर पडली. तिचे डोळे आसवांनी डबडबून गेले होते. त्याने ओंजळीत चेहरा घेउन तिचे अश्रू पुसले.
"ये बैस इथे.थांब मी पाणी आणतो." तिला बाजुलाच असलेल्या खूर्चीवर बसवून तो आतमध्ये गेला आणि पाणी घेउन आला. तोवर ती सावरली होती.
ती पाणी पिउ लागली आणि तो तिच्याकडे बघू लागला. 

"घरी कुणी नाही का? आई - बाबा कुठेत?" पाणी पिता पिता तिने विचारलं. 
"नाही. अगं माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे आज त्यामुळे घरातले सगळेजण कालच देवगडला गेलेत. येतिल संध्याकाळपर्यंत."
"ओके."
काही वेळ दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले.
"असा काय बघतोय? असं बघू नको माझ्याकडे." ती लाजण्याचा निरर्थक प्रयत्न करु लागली.
तो हसला. "बरं मग बोल."
"काय बोलु? मला काहि नाही बोलायचयं. तूच बोल. सांग पुन्हा एखादी स्टोरी. का सोडुन आलास मला ते." ती लटक्या रागाने बोलली.
तो पुन्हा हसला."बरं सांगतो. तू एक काम कर. बाहेर वॉशरुम आहे. फ्रेश हो. मी तोवर आपल्यासाठी मस्त कॉफी बनवतो. मग बोलुया आपण."
"ठीक आहे." ती उठली आणि बॅगपॅकमधून टॉवेल आणि काही कपडे घेउन वॉशरुमच्या दिशेने गेली. वॉशरुम प्रशस्त होता.काल रात्रीपासुन ते दिवसभराच्या प्रवासात अंगाला चिकटलेले कपडे तिने उतरवले तेव्हा तिला अगदी हलकं हलकं वाटु लागलं. तिने हलकेच शॉवर ऑन केला.
काही शीतल थेंब तिच्या चेहर्‍यावर पाझरले आणि मग तिला राहवलं नाही. त्या पाण्याचा तो गारवा ती शरीरभर झेलू लागली.प्रवासाचा शीण त्या थेंबांबरोबर तिच्या शरीरावरुन वाहून जात होता आणि एक विलक्षण प्रसन्नता तिला जाणवत होती. कितीतरी वेळ ती शॉवरखाली नुसतीच उभी होती.तिच्या मनातली सारी काही कालवाकालव,भीती, धडधड ती त्या गार पाण्याच्या प्रवाहावर वाहवू देत होती. काही वेळाने तिने शॉवर बंद केला आणि कपडे बदलून जेव्हा ती केस पुसत वॉशरुमच्या बाहेर पडली तेव्हा तिला जाणवलं की वातावरण खूप आल्हाददायक झालं होतं. खट्याळ वारा तिला हलकेच स्पर्शुन जात होता, एक दोन चाफ्याची फुलं अलगद तिच्यावर निसटुन पडली होती. कुठला तरी रानपक्षी त्याच्या मंजुळ आवाजात ताना देत होता. या सगळ्याने ती क्षणभर हरखून गेली. तितक्यात अभय एका ट्रेमध्ये दोन कप कॉफी, एक ग्लास पाणी आणि काही बिस्किटे घेउन अंगणातच आला आणि ते दोघं तुळशी वृंदावनाच्या मागे पारिजातकाच्या झाडाखाली अंगणाच्या कठड्यावर जाउन बसले.
"पाणी कसलं गार होतं रे." केस पुसत ती म्हणाली.
"अगं पण गीझर ऑन करायचा ना, आणि तू केस पण भिजवलेस का? वेडे सर्दी होईल ना पाणी बदललं तर." तो एक कप तिला देत बोलला.
"काही होत नाही सर्दी." ती कप घेत बोलली. तो वाफाळलेला कप तिने नेहमीप्रमाणे नाकाकडे नेला आणि त्या कॉफीचा तो सुगंध भरुन घेतला.
"अम्म्म्म!! धीस इज व्हॉट आय वॉझ मिसिंग बॅडली! " कॉफीचा एक सीप घेवून ती बोलली.
"ओह्ह! म्हणजे फक्त माझ्या हातच्या कॉफीसाठी इतक्या लांबवर आलीस तर." तो मिश्किलपणे म्हणाला.
"ह्हो! कॉफीसाठीच आलीय. बस्स? तसं पण मला तुझ्यात काहीच इन्ट्रेस्ट नाही. तू फक्त सकाळ संध्याकाळ अशी मस्त कॉफी बनवून देत जा मला.खुश्श??" ती पुन्हा लटक्या रागाने बोलली.
खरं तर या इतक्या संवांदात दोघांत भांडणं व्हायला हवी होती आणि "गुडबाय" पर्यंत पोचायला हवी होती. पण यावेळी तसं झालं नाही. दोघेही गालातल्या गालात हसत होते. ती शांतपणे कॉफीचा एक एक सीप घेत होती मध्येच ओठांच्या कोपर्‍यावर ओघळणारा थेंब हलकेच जीभेने टीपत होती. तो फक्त तिला बघत होता. ती आज फार वेगळीच दिसत होती.म्हणजे नेहमीसारखी नाही. तिच्या चेहर्‍यावर एक वेगळीच प्रसन्नता खेळत होती.पश्चिमेकडे झुकलेल्या सुर्याची सोनेरी किरणे माडांच्या झावळ्यातून तिच्या चेहर्‍यावर झिरपत होती. तिच्या शरीरालाही एक उन्मत्त उभार आला होता.
"फक्त बघतच राहणार आहेस की काही बोलणार पण आहेस." ती त्याच्याकडे न बघता बोलली.
तो पुन्हा हसला.
"हसतोस काय माकडा. बोल ना. काय झालं होतं तुला? सगळं काही सोडुन येण्याआधी तुला एकदाही मला कॉल करावासा नाही वाटला का रे? मला माहीत आहे की त्यादिवशी जे घडलं ते घडायला नको हवं होतं. मलाही नाही कळलं की मी असं का वागले ते. तुझी माफीही मागायची होती.पण धीर होत नव्हता. राग आला होता. पण खरं सांगते अभी, तो राग फार क्षणिकच होता रे! म्हणजे मी तिथुन निघुन गेले, ट्रेन मध्ये बसले आणि अचानक वाटलं की मी हे काय करुन बसले? आय मीन, मला असं करायचंच नव्हतं.पण सगळं अनपेक्षित! विचित्रच!
पण नंतर तुझ्याशी बोलायचा धीरच होईना. उगाच मनात अपराधी वाटायला लागलं. स्वतःला समजावलं की कदाचित मी तुझ्या लायकच नसेन म्ह्णुन अशी वागले तुझ्याशी.मनाशी खेळत, स्वत:ला समजावत मी राहु लागले. तुझी फार आठवण यायची. वाटायचं तू कॉल करशील. पण नंतर वाटू लागलं की तुला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, तू माझ्या या अशा वागण्याने हर्ट झाला असशील, मी कॉल केला तर बोलशील की नाही? सगळे मनाचे खेळ मी खेळत राहिले. पण काल परवा जेव्हा तुझा कुठेच ठावठीकाणा लागेना तेव्हा मात्र मी घाबरले. खूप घाबरले रे. तू कुठेच नव्हतास अभी. अचानक मला एक भयंकर रितेपणा जाणवू लागला. कधी आली नव्हती इतक्या प्रकर्षाने तुझी आठवण येवू लागली. बस्स कसंही करुन तू एकदाचा मला माझ्या डोळ्यांसमोर हवा होतास. सगळीकडे फिरले. तुझ्या ऑफिसला कॉल केला तू तिथे नाही. तुझ्या फोन नंबर बंद, एफबी, ट्विटर बंद. मग शेवटी तुझ्या घरी गेले. तिथेही वॉचमन जेव्हा म्हणाला की तुम्ही इथे नाही राहत म्हणुन तेव्हा अभी, तेव्हा मी कोसळले रे! काय करावं ते सुचेनाच! तेव्हा बाजुच्या गोरे काकूनी सांगितल की तुम्ही गावी आलात तेव्हा मला थोडं हायसं वाटलं आणि मग मी इथवर आले." बोलता बोलता पुन्हा तिचे डोळे डबडबले.
अभयने तिच्या हातावर हात ठेवला. ती थोडीशी शहारली. "आय अ‍ॅम सॉरी अभी. आय हर्ट यु."
"ईट्स ओके. चिउ." खूप दिवसांनी तिने त्याच्या तोंडातुन "चिउ" ऐकलं आणि पुन्हा तिला भरुन आलं.
"चल. आपण समुद्राव्रर जाउया. मी ही बरेच दिवस बाहेर नाही पडलोय. तू थकली नाहीस ना? आय मीन तसं असेल तर घरीच थांबुया." त्याने तिला हात धरुन उठवलं.
"नाही नाही, सगळा थकवा, शीण केव्हाच निघुन गेलाय.चल जाउया.पण अरे हे ट्रे!" ती उठत बोलली.
"असू दे इथेच आल्यावर घेउन जाईन आतमध्ये चल." ती दोघं घराबाहेर पडली.
समुद्र अगदी हाकेचा अंतरावर होता. माडांच्या आणि सुरुच्या झाडांतुन पायवाटेवरुन ते दोघे चालत होते. सुर्य उगाचच समुद्रावर रेंगाळत होता. चालत चालत ते दोघे किनार्‍यावर आले आणि तिने पायातले फ्लोटर्स काढुन एका हातात घेतले आणि अनवाणी चालू लागली.
"अगं पायाला काही तरी टोचेल ना. चप्पल घालून चाल." तो काळजीने बोलला.
"काही नाही टोचत-बिचत. आणि टोचलं तर टोचलं तू आहेस ना काढायला." ती हसून बोलली.
"कोणता फालतू बॉलीवूड सिनेमा बघितलाय रिसेन्टली असे डायलॉग मारायला?" तो तिला चिडवत बोलला.
त्या मउशार वाळूत तिचे पाय हलकेच रुतत होते. वाळूचा स्पर्श तिला गुदगुल्या करत होता. एका हात तिने अभयच्या हातात गुंफला होता. चालत चालत ते एका ठीकाणी आले. तिथे किनार्‍यावर एक नाव होती. त्या नावेला टेकून दोघेही बसले.
"ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे. इथुन समुद्र काय सुन्दर दिसतो ना?" तो म्हणाला.
ती समोर पाहु लागली. तो विशाल समुद्र दूरवर पसरला होता. त्या अवखळ लाटा गर्जना करत किनार्‍यावर आदळून पुढे जोरात किनार्‍याला स्पर्श करायला धावत होत्या. जणु त्यांच्यात स्पर्धाच होती कि कोण कितपत पुढे जाते त्याची. सुर्य समुद्रात अर्धामुरदा उरला होता. समुद्रावर उडणारे समुद्रपक्षी आपापल्या घराच्या दिशेने जात होते. दूरवर समुद्रात काही नावा समुद्राशी झगडत पुढे जात होत्या. उजव्याबाजुला दूरवर एक डोंगर समुद्रात घुसला होता. त्यावर एक लाईटहाउस होते. हे सगळं डोळ्यांत भरुन घेत तिने अभयच्या खांद्यावर हलकेच डो़कं ठेवलं आणि तितक्यात एका घंटेचा टोला संधीप्रकाश चिरत तिच्यावरुन सरसरत गेला, आणि एकामागुन एक असे सहा टोले त्या आसमंतात घुमले होते आणि त्यासरशी तीने त्याच्या हात घट्ट धरुन ठेवला होता.
"अगं, इथे पुढेच थोड्या अंतरावर गावतलं चर्च आहे. घाबरलीस?" त्याने विचारलं.
"अं?? नाही." ती.
आता सुर्याला समुद्राने गिळून टाकलं आणि काळोखाने आपले बाहुपाश पसरवायला सुरुवात केली. वारा हळूहळू घोंगावू लागला आणि लाटांची गर्जना अधिकच वाढली. डोंगरावरले लाईटहाउस तांबड्या प्रकाशाने उजळले आणि एका ठराविक अंतराने तांबड्याप्रकाशाचा झोत सभोवार फेकू लागले. समुद्रात एखाद दुसरा कंदील हेलकाउ लागला आणि ह्ळूहळू आकाशात चांदण्या जमा होउ लागल्या. आता ती दोघं त्या किनार्‍यावर विसावली होती. त्याच्या उजव्या बाहुची उशी करुन ती आभाळाकडे एकट़ बघत पडली होती. 


"चिउ......" काही वेळाने त्याने तिला हाक मारली.
"हम्म्म." ती उच्चारली.
"काही नाही." तो.
"बोल ना." ती.
"काही नाही. तुला आठवत मी तुला नेहमी सांगायचो की माझ्या गावी समुद्र किनार्‍यावर पडुन आकाशातल्या चांदण्या मोजायला फार मज्जा येते." तो बोलला.
ती हळूच हसली."हो. आणि जेव्हा जेव्हा तू असं सांगायचास तेव्हा तेव्हा मला वाटायचं की काय मज्जा येईल ना, आपण दोघं असे किनार्‍यावर पडुन असे आभाळ बघत पडून राहु."
"शाहणी कुठली. मग तेव्हा का नाही बोलायची?"
"असंच. नाही बोलायचे. पण आज जेव्हा ते सगळं पाहतेय तेव्हा बोलावसं वाटलं." ती आभाळाकडे बघत बोलली.
"वेडी कुठली."
"असुन दे. वेडी तर वेडी. वेडीबरोबर असतो तो वेडा." ती खुदकन हसली.
"तू वेडी."
"हां बाबा. मी वेडी. बस्स! तू हुशार, शहाणा." ती कुशीवर वळत त्याच्याकडे पाहत हसत हसत बोलली. तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहर्‍याजवळ आलेला.
"श्या! काय हे? भांड ना जरा. मला तू अशी शरण आलेली. नाही आवडत." तो तिचे उष्ण श्वास चेहर्‍यावर झेलत, अडखळत बोलला.
"पण तू मला असाच आवडतोस आणि प्लिज आता मला नाही भांडायचयं तुझ्याशी. अगदी मस्करीतही नाही. तू भांडलास तरी चालेल. तू माझ्यावर रागावलास तरी चालेल,पण मला नाही भांडायचं तुझ्याशी.आता या क्षणापासुन मला तुला हरवायचं नाहीय. दोन दिवस माझी काय अवस्था झाली होती हे तुला नाही समजणार अभी." खोल गेलेल्या आवाजात त्याच्या चेहर्‍यावर बोटं फिरवत ती बोलली.
तो शहारला. अलगद दुसर्‍या हाताने त्याने तिला वेढुन घेतलं. चांदण्यांच्या सौम्य प्रकाशात तिचा चेहरा खुलला होता. तिच्या श्वासांचा जोर वाढला होता. तिने डोळे मिटुन घेतले होते. मिटलेल्या डोळ्यांनी ती सर्व काही पाहत होती. तो थोडासा बावरला होता. दोघंही एकमेकांच्या मिठीत होते. त्याचे श्वास तिला जाणवत नव्हते पण अगदी भरलेल्या ढगाप्रमाणे तो तिला भासत होता. तिचं धडधडणारं काळीज आणि विलंबित श्वासोच्छवासांनी तिच्या छातीची होणारी दोलने त्याच्या छातीवर अडखळत होती. हळूहळू त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. जणु तो भरलेला ढगच तिच्या ओठांवर अलगद बरसला होता आणि कैक वर्षापासुन तहानलेला चातकाप्रमाणे ती ही त्याच्या ओठांच्या ढगातुन बरसणारे थेंब हळूहळू प्राशुन घेउ लागली. ही अनुभूती विलक्षण होती. किती तरी वेळ ते दोघे एकमेकांच्या ओठांत मिसळत होते. एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. काळोखाने दोघांना वेढुन घेतले होते पण आभाळातून लुकलुकणार्‍या तार्‍यांनी त्या काळोखाला भेदुन एक जाळीदार सौम्य प्रकाशाची चादर दोघांवर पांघरली होती. 


हळूहळू ते दोघं विलग होउ लागले.लाजुन चिंब झालेलं ती आभाळाकडे एकटक पाहु लागली.तो ही तिच्या डोळ्यांतली नक्षत्रं छेडू लागला.लुकलुकणार्‍या तार्‍यांनी गच्च भरलेलं ते आभाळ तिला अभयच्या मिठीपुढे क्षुद्र वाटु लागलं. किती बरं वाटलं होतं त्याच्या मिठीत. ती विचार करु लागली.कसे स्वतःला आपण हरावून बसलो होतो. त्याच्या मिठीत एक वेगळाच आधार जाणवला होता.
"काय बघतेस आभाळाकडे?" त्याने हसुन विचारलं.
"काही नाही." ती ही हसली.
इतक्यात त्या गच्च भरलेल्या आभाळातून एक तारा निखळला आणि वेगाने नाहीसा झाला. तिने पाहिलं.
"अभी, तुटलेला तारा!" ती हरखून ओरडली आणि क्षणात डोळे मिटुन काही तरी पुटपुटली.
" काय हसतोस रे?"
"काही नाही! असंच"
"सांग ना, का ह्सलास?"
"तू काय मागितलसं त्या तार्‍याकडे"?
यावर ती लाजली त्याच्या कुशीत चेहरा लपवत बोलली, "काही नाही. जे मागितलं ते असं सांगायचं नसतं मग इच्छा पूर्ण होत नाही."
"ओह्ह्ह! असं आहे का?"
"होहह्ह्ह! असंच आहे."
"पण जे मागितलं ते कधी मिळालं का?"
"यापूर्वी मी कधीच काही मागितलं नव्हतं....."
"मग आता काय मागितलं? "
"काही नाही मागितलं, आणि तुला ते नाही समजणार." त्याच्याकडे डोळे भरुन बघत ती उच्चारली आणि तिच्या त्या टपोर्‍या डोळ्यांतुन दोन थेंब गालांवर ओघळले. त्या थेंबांचं सौंदर्य आकाशातल्या कोणत्याही तार्‍यापेक्षा नितांत सुंदर होतं.
तो तिच्याकडे बघत राहिला.ती दूर कुठेतरी पुन्हा त्या आकाशात हरवून गेली. तिला तसं पाहून तो बोलला..

"आता सोड ते आकाश,
आणि ये माझ्या जगात.
तारे ही असेच तुटतात,
तुला पाहून वेगात."

ती गोड हसली," कश्या सुचतात रे तुला अशा ओळी? अगदी प्रसंगानुरुप!"
"पण खरं सांग, असा तुटलेला तारा दिसल्यावर काही मागितलं की मिळतं का गं? " त्याने तिला टाळत विचारलं.
"माहित नाही. पण काही इच्छा, स्वप्ने ही अशीच त्या तुटलेल्या तार्‍यासारखी कुठेतरी आयुष्याच्या या अंतराळात लुप्त होउन जातात ना रे?आकाशातून अचानकपणे ज्या वेगाने एखादा तारा निखळतो त्यावेळी त्याचे  ते क्षणिक सौंदर्य पार वेडावून टाकते. क्षण दोन क्षण दिसणारे ते सौंदर्य डोळ्यात आणि मनात भरता भरत नाही तर मग त्यावेळी मनातल्या अनेक अपूर्ण इच्छेंपैकी अशी कोणती इच्छा व्यक्त करावी हे मला कळतच नाही.पहिल्यांदा असं नव्हतं पण जेव्हापासुन तू आयुष्यात आलायसं माझी प्रत्येक अंधश्रद्धेवर श्रध्दा जडू लागलीय."
"वेडूबाई. असं काही नसतं."
"माहितीय मला. पण अभ्या, पुन्हा नाही ना रे सोडुन जाणार तू मला असा?" तीने काळजीने विचारलं.
"नाही गं वेडे, आता कुठे जाउ मी? आणि गेलो तरी तू काय सह्जा सहजी मला थोडी जाउ देणारेस? शोधुन काढशीलच ना? आणि तसंपण आत्ताच त्या तुटलेल्या तार्‍याकडे मला मागुन घेतलयंसच ना?
ती क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली,"तुला कसं कळलं रे? मी हे मागितलं ते?"
"बस्स कळलं. न कळायला काय झालं?" तो गालात हसत म्हणाला.
"चोर आहेस एक नंबरचा, लबाड.सगळं कळतं होतं ना तुला मग का मला सोडुन आलास असा?"
"माहित नाही चिउ.पण खरं सांगतो त्यादिवशीच्या प्रकारामुळे मी हर्ट वैगरे झालो नव्हतो. तुझी रिअ‍ॅक्शन साहजिक होती.पण माहित नाही का मला त्यावेळी सगळंच तुटल्यासारखं वाटलं.तू निघुन गेलीस आणि मग उगाच गिल्टी वाटु लागलं.ठरवलंही होतं तुला कॉल करायचा, तुझी माफी मागायची पण नाही त्यादिवसापासुन माझ्यातला मी हरवून बसलो.पण चिउ खरं सांगतो एक-दोन दिवसानी मी जसं तू म्हणालीस तसंच नॉर्मल झालो गं. ठाउक होतं की एवढं काही झालेलं नाही.काही दिवस गेले आणि एकदा मला सडकून ताप आला.डॉक्टर वैगरे सगळं झालं. १० दिवस हॉस्पिटलमध्येच होतो.आई उश्याशी बसुन असायची. म्हणायची चित्राला बोलावून घेते म्हणुन. पण मीच नको म्हणालो. मला तुझी खूप आठवण यायची गं. खूप वाटायचं तुला बघावं, तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी भांडावं पण माहित नाही आजार बळावत होता आणि सगळेच काळजीत होते. काही दिवसानी बरं वाटलं पण नंतर एक प्रकारची विरक्ती येउ लागली मनाला.कशातच लक्ष्य लागेना. वैतागुन जॉब पण सोडुन दिला.पण हे सगळं आपल्या त्या प्रकारामुळे नाही हे मी नक्की सांगतो."
बोलता बोलता त्याने तिला छातिशी कवटाळलं.
"मग तिकडे करमेना म्हणुन इकडे आलो.थोडे दिवस बरं वाटलं पण आजाराने पुन्हा डोकं वर काढलं.मग आजाराचा आणि माझा तो लपंडाव सुरुच राहिला.ठाउक होतं तू एके दिवशी नक्की येशील.असं नव्हतं की तुला मी भेटणारच नव्हतो, तुला कॉल करणार नव्हतो; पण मी पुरता हरलो होतो या आजाराशी.कधी कधी वाटायचं की हा आजार आता मला घेउनच जाणार.त्याआधी तुला एकदा भेटायचं होतं, पण त्याआधीच........." त्याचा आवाज क्षीण झाला.
"त्याआधीच??? त्याआधीच काय अभी?" तिने विचारले
"काही नाही. चल घरी नको जाउया का?उशीर झालाय," तो तिचे गाल ओढत बोलला.
"नको. इथेच थांबुया, असेच रात्रभर एकमेकांच्या कुशीत. मला नाही जायचं कूठे तुला सोडुन." ती.
"वाह! आई आपल्या दोघांची वरात काढेल." तो.
"जाउया रे थोड्यावेळाने.मला तुला असा भरुन घेउ दे." ती त्याच्या गालावर गाल घासत म्हणाली.
"बरं." तो.
"ए अभी, ती अंगाई गा ना रे."
"काही काय? अंगाई आणि आता? रात्री झोपताना गाईन हं."
"नाही आत्ता गा ना प्लिज,प्लिज्,प्लिज.." ती लाडात आली.
"चिउ काय गं?"
"गा ना रे, असं काय करतो."  

एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती त्याच्या कुशीत शिरली. एका हाताने तिला थोपटवत तो गाउ लागला. त्याचे आर्त स्वर तिच्या अंगावरुन वाहुन लाटांमध्ये मिसळून समुद्रात विलीन होउ लागले. ती त्या स्वरांनी भारावुन गेली आणि एक संदिग्ध ग्लानी हलकेच तिच्या डोळ्यांवर पसरु लागली. 


एका लाटेच्या प्रचंड आवाजाने तिला जाग आली. हळूहळू तिने डोळे उघडले तेव्हा टॉर्चचे एक दोन प्रखर झोत तिच्या डोळ्यांवर पडले. समोर काही दिसेना. पण काही लोक आहेत हे तिला जाणवलं. ती ताडकन उठून बसली आणि बावरुन इकडे तिकडे पाहु लागली.
"अभी, उठ रे. अभी बघ ना कुणीतरी आहे इथे, अभ्या." ती बाजुला चाचपडुन अभयला शोधु लागली. पण तो तिथे नव्हता. ती घाबरली. इकडे तिकडे बघु लागली. त्यांच्या वेशावरुन तिने ताडलं की ते कोळी होते.घाबरुन त्याला हाका मारु लागली. काही वेळासाठी तिला कळेना की हा असा सोडुन कुठे गेला ते.
"कुणागेरच्या पावण्या तुमी?" समोर उभ्या असलेल्यांपैकी एकाने विचारले.
"अं? काय? मी? मी त्या अभय पाटकरांच्या घरी.. तो इथेच होता माझ्यासोबत, आजुबाजुला गेला असेल. आम्ही गेले एक दोन तास इथेच होतो... अभीssssss, अभ्या.." ती घाबरुन हाका मारु लागली.
त्या लोकांमध्ये पुन्हा कुजबुज सुरु झाली. तिचं अभयला हाका मारणं सुरुच होतं.
"आमचं ऐकाल का जरा?" एकजण म्हणाला.
"काय? मी काही नाही ऐकणार, अभयला येउ दे. तो आत्ता इथेच होता माझ्यासोबत." तिला दरदरुन घाम फुटला होता.
"म्यॅड्म, कदाचित तो घरी गेला असेल. आमचं ऐका रात लय चढली आसा. अशावेळी इथे थांबणा बरोबर नाय.तुमी आमच्याबरोबर चला त्याच्या घरी सोडतो तुम्हाला." विनवणीच्या सुरात एकजण म्हणाला.
ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पण तिला भयंकर भीती वाटत होती. कुठे गेला असेल हा आपल्याला सोडुन? त्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना. एकदम त्याला हाका मारत ती किनार्‍यावर धावत सुटली. तिच्या मागोमाग ते लोकही धावू लागले. त्यातल्या दोघांनी एका अन्तरावर तिला गाठलं आणि तिला समजाउ लागले. आता ती फुटली आणि रडु लागली. मग ते सगळे तिला घेउन अभयच्या घरी निघाले. तिला काही सुचत नव्हतं. अतिशय घाबरलेली ती त्यांच्याबरोबर चालत होती. काहीवेळाने ते अभयच्या घराच्या अंगणात पोचले. पैकी एकजण हाक मारु लागला. ती तशीच उभी होती. घरातुन अभयची आई, वडील, भाउ बाहेर आले. अभयच्या आईला बघताच चित्रा धावतच तिच्याकडे गेली आणि तिला बिलगुन रडु लागली. अभयच्या आईला हे सगळं अनपेक्षित होतं.
"चित्रा? तू कधी आलीस? आणि कुठे होतीस? हरवली होती का बाळा? काय गं? काय झालं?" अभयची आईने तिला छातीशी कवटाळलं.
"आई अभय कुठाय? तो मला पुन्हा सोडुन आला! आई, असं का करतो तो नेहमी?" ती आईला बिलगुन अधिकच रडु लागली. सगळेजण या प्रकाराने अचंबित झाले होते. तिला जे लोक किनार्‍यावरुन घेउन आले होते ते अभयच्या बाबांशी आणि भाबाशी बोलत उभे होते. अभयच्या आईने तिला घरात नेले तोवर अभयची वहिनी पाणी घेउन आली. तिचं रडणं थांबतच नव्हतं ती सारखी अभयला हाक मारत होती पण तो कुठेच दिसत नव्हता. त्याच्या आईला सगळी हकीकत ती सांगत होती. ते कधी आणि कशी पोचली. अभय कसा भेटला, कॉफी घेउन आपण समुद्रावर गेलो आणि हा तिथुन कसा गायब झाला. ती भरभर बोलत होती. तिचे श्वास फुलले होते.बोलता तिचं खोलीतल्या भिंतीवर लक्ष्य गेलं आणि ती स्तब्ध झाली. तिच्या तोंडुन शब्दच फुटेना. फक्त ती त्या समोरच्या भिंतीकडे पाहत राहिली. 


अभय त्या भिंतीवरल्या फोटोमध्ये गोंड्याच्या फुलांआडुन हासत तिला पाहत होता..... 



"उध्वस्त मनांच्या विरहाची
गाणी गातो वारा,
कूणाची तरी स्वप्ने घेउन कोसळतो
प्रत्येक तुटलेला तारा...."



 

समाप्त

Wednesday, January 8, 2014

तुटलेला तारा ... (२)

              ट्रेन सुरु झाली आणि त्याबरोबर तिची विचारचक्रही. तिची अस्वस्थता आता शिगेला पोचली होती. एका अनामिक,भयाण भीतीचं सावट तिच्या मनावर पसरलं होतं.अचानक त्याच्याबद्दल तिला खूप सारी काळजी वाटु लागली होती.कोण होता तो तिचा? आतापर्यंत तिने त्याला कधीही आपलं मानलं नव्हतं.त्याच्या प्रेमालाही तिने मान्य केलं नव्हतं.जगाला सांगण्यासाठी तो फक्त तिचा मित्र होता. पण तसं नक्की होतं का? तिचं तिलाच कळत नव्हतं. आता याक्षणी त्याला बघायची ओढ तिला लागली होती. तिच्या धडधडत्या मनाला, अस्वस्थतेला त्याला पाहिल्याशिवाय चैन पडणार नव्हती. त्यावेळी देखिल असंच व्हायचं. त्याच्याशी एक दिवस जरी बोललं नाही तरी कसं तरीच व्हायचं तिला.दिवसभर कसली तरी उणिव तिला भासु लागे. कधी कधी तिलाही बोलायचं नसे मग अशावेळी ती टेक्स्ट्सवर त्याला पिडायची. पण ते मुद्दाम नाही.त्याची काळजी तिला नेहमी वाटायची. 

             असाच एकेदिवशी तिला न सांगता तो सिंगापूरला गेला होता. त्याच्या कंपनीची कसली तरी कॉन्फरन्स होती आणि काही कारणामुळे त्याचा सेल फोन दोन दिवस बंदच होता. इकडे ही हैराण. त्याचा काहीच ठावठीकाणा लागला नव्हता. नेहमेप्रमाणे तिने ग्रुपमध्येही कुणाला विचारलं नाही. तिला उगीच वाटत राहायचं की त्याने काही कारण नसताना ग्रुपमध्ये बबल केलं होतं. त्याबद्द्ल तिला तसं कुणीच विचारलं नव्हतं पण तिला नेहमी ते ऑकवर्ड वाटत राहायचं.मग काही महिने दोघेही ग्रुपच्या ट्रेकला वैगरे जाणं टाळत होते.

         तर त्यावेळी सुद्धा असंच हा तिकडे कूठे सिंगापूरला आणि ही इकडे त्याच्या काळजीने हैराण.तिचं आपलं सारखं त्याला फोन ट्राय करणं, त्याचा एफबी प्रोफाईल चेक करणं सुरुच होतं. दोन दिवस तिला अन्न गोड लागलं नव्हतं.ती धड झोपली नव्हती. तिसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी अपडेट आली. त्याला त्याच्या कलिगने सिंगापूर एअपोर्टवरच्या चेक इन मध्ये टॅग केलं होतं. ते वाचून तेव्हा कुठे तिच्या जिवात जीव आला होता.तो मुंबईला त्या संध्याकाळी आला आणि त्याचा सेल सुरु झाल्या झाल्या त्याने तिला कॉल केला. कारण तिच्याच नंबरवरुन ३०-४० मिस्ड कॉल अलर्ट्चे मेसेज आले होते. त्याने कॉल केला तेव्हा तिने त्याला झाप झाप झापला होता.बिचार्‍याला तोंडही उघडु दिले नव्हतं तिने. दुसर्‍या दिवशी तो तिला भेटायला गेला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ते स्टेशनच्या बाहेर भेटले.ती खूप रागावली होती.काही केल्या बोलायला तयार नव्हती.शेवटी कसं बसं ती बोलली.

"प्रॉब्लेम हा आहे ना की, मला तुझ्यावर रागावता येत नाही."
"तेच म्हणतो मी, का रागवायचं पण?"
"अरे पण नालायका तुला सांगुन जायला का धाड भरली होती?"
"अगं पण सगळं इतक्या घाईत झालं की काय सांगु? रात्री ११ ची फ्लाईट होती. ऑफिसमधुन घरी, घराकडुन सगळं आवरुन मरत मरत एअरपोर्ट्ला पोचलो. तिथुन तुला कॉल करणार तर फोनच डेड. म्हटलं तिकडे पोचल्यावर फोन चार्ज करुन तुला कॉल करेन, पण कसलं काय फोनच सुरु झाला नाही."
"स्टोरीज रे! फक्त स्टोरीज! तिथुन कुणा दुसर्‍याच्या फोनवरुन किंवा लँडलाईनवरुन कॉल नाही करता आला तुला?"
"अगं कसं करणार? तुझा नंबरच पाठ नाही मला." आणि त्याने पटकन जीभ चावली. 

त्याच्या या वाक्यावर ती जाम भडकली. नंबर पाठ नाही म्हणजे काय? तिला कसं बसं त्याने आवरलं. त्यावेळी तिच्यासाठी त्याने एक मस्त जॅकेट आणलं होतं. ती घ्यायला तयारच नव्हती पण तिने ते घेतलं. 

"अरे खूप मोठ्ठं होतयं रे हे ! साल्या स्वतःच्या साईजचं आणलंस का?"
"आयला हो का? असु दे. तसं पण युनिसेक्स आहे. मी ही वापरेन कधीतरी."
"एक नंबरचा स्वार्थी साला! सेल्स माइंडेड! घे हे तुझं तुलाच. काही नको मला." 


"पुढील स्टेशन मुलुंड."
"अगला स्टेशन मुलुंड."
"नेक्स्ट स्टेशन.... "
ती डब्यातल्या त्या कर्कश अनाउंसमेन्टने ताळ्यावर आली. डब्बा बायकानी एव्हाना भरला होता. त्यांच्यातुन वाट काढत ती दरवाज्यापर्यंत पोचली.


           ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. ट्रेनमधुन उतरुन ब्रीजवरुन, ती पटकन पूर्वेला जाउन उतरली. समोर असलेल्या ऑटोच्या रांगेत जाउन उभी राहिली. दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती.
 

             कदाचित हा कुठे तरी मागल्यावेळेसारखा बाहेर वैगरे गेला असेल. नोकरीही बदलली असेल आणि कदाचित म्हणुन फोन नंबरही बदलला असेल. पण एफबी आणि ट्वीटर अकाउंट का डीलीट करेल? एक ना अनेक असे तर्क वितर्क ती लढवत होती. तोवर तिच्या समोर रिक्षा आली. कुठे जायचे ते सांगुन ती रिक्षात जाउन बसली. तो राहत असलेली बिल्डींग ही स्टेशनच्या कोलाहलापासुन थोडी दूरच पण शांत जागी होती. कधी कधी घरी जाताना ती दोघं स्टेशनवरुन चालतच जायची. संध्याकाळच्या वेळी मस्त वारा सुटलेला असायचा त्या परिसरात. 

                 दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे, छोट्या बागा, खेळाचं मैदान सगळ्या ओळखिच्या खुणा तिला दिसत होत्या.बर्‍याच दिवसांनी आज ती इकडे आली होती.काही फरक जाणवत नव्हता फक्त त्याची उणिव जाणवत होती; पण आता थोड्याच वेळात ती पण भरुन निघेल. तिचं ते वेडं काळीज पुन्हा धडधडायला लागलं.कुठुन तरी ती जुनीच फुलपाखरं पुन्हा पोटात गुदगुल्या करु लागली. आज त्याचं आवडतं ड्रेस काँबिनेशन तिने केलं होतं. तो घरी असेल की नाही याची शाश्वती नव्हती. काळजाची धडधड तिने कंटिन्यु ठेवली पण फुलपाखरांना उडवून लावलं. थोड्याच वेळात त्याच्या बिल्डींगपाशी रिक्षा थांबली. रिक्षावाल्याला पे करुन ती बिल्डींगच्या गेटमधुन आत शिरणार तोच वॉचमनने त्याच्या खुराड्यातुन तिला आवाज दिला.
"किसके यहाँ जाना हैं म्यॅडम?"
ती थबकली आणि त्या वॉचमनच्या खुराड्यापाशी आली.
"अरे आप? कैसी है आप मॅडम" वॉचमनने तिला ओळखलं.
"ठीक हुँ मिश्राजी. आप कैसे है? मैं, वो वहाँ.... उपर... " ती अडखळली.
"जानता हुँ, पाटकर साहब के इधर ना?"
"हाँ! हाँ!" ती वॉचमनला कटवून जायला वळली....
"पर अब वो लोग यहाँ नही रहते, म्यॅडमजी...."
त्याच्या या वाक्याने ती हादरलीच. तिचे पाय जागच्या जागी जमिनीत रुतले.
"क्या मतलब अब यहाँ नहीं रहते?" कहाँ गये फिर....?" तिच्या घशाला कोरड पडली होती.
"दुई-तीन महिना हो गया म्यॅडम. वो लोग यहाँसे चले गये. अभय बाबा की तबियत ठीक नहीं थी. तो वो लोग गाँव चले गये."
तिच्या काळजाचा ठोका चुकला.
"क्या हुआ था अभयको?" काळजे आणि भीतीने तिचा आजाज फुटत नव्हता.
" पता नही म्यॅडम.पर अब वो यहाँ नहीं रहते."
ती खूप घाबरुन गेली. काय करावे ते तिला सुचेना.
"आप एक काम करीये म्यॅडम उपर उनके बाजुमें जो गोरे साहब रहते हैं ना शायद उनको मालुम होगा. आप उनसे जाकर मिलिये."
भरलेल्या मनाने ती जायला वर जायला वळली.
काय झालं असेल?
कसा असेल तो?
मला एक कॉलही करावासा नाही का वाटला त्याला?
भयंकर अस्वस्थतेत तिने गोर्‍यांच्या दारावरली बेल दाबली. सेफ्टी दरवाजाच्या आडुन गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि नाकावरला चष्मा सावरुन त्या तिला निरखू लागल्या.
"नमस्कार काकु. मी...."
"अगं तू होय! ये ये! कधी आलीस." तिला ओळखल्याने पुढचं काही न बोलता गोरे काकुनी दरवाजा उघडला आणि ती आत गेली.
"कशी आहेस? बर्‍याच दिवसानी आलीस."
"मी ठीक आहे काकु. तुम्ही कशा आहात.?"
"माझं काय मेलीचं? आहे आपली निवांत.तू सांग. अभयला भेटायला आली होतीस ना?"
"हो. पण खाली वॉचमन म्हणाला की ते लोक आता.... "
"हो. खरयं ते. दोन महिन्यापूर्वीच गावी गेलेत."
"का पण?"
"अगं काय माहित का ते? अभयची तब्येत बिघडली होती. साधा तापच होता. १०-१२ दिवस अ‍ॅडमिट होता. नंतर बरा झाला. पण मग त्याचं कशात लक्ष्य लागेना. सारखा चिडचिड करायचा. जॉबपण सोडला त्याने. मग काही दिवसानी ते लोक गावी गेले."
"अच्छा. मग त्यानी हा फ्लॅट विकला का?"
"नाही अगं. मला वाटतं डॉक्टरच्या सल्यानुसार अभयच्या हवाबदलासाठी ते गावी गेले असतिल. कोकणातले ना ते."
"हो असेल. कदाचित."
"फ्लॅटची किल्ली आमच्याचकडे आहे ना."
का कुणास ठाउक तिला वाटलं की अभयच्या घरात जावं. तिने गोरे काकुंकडुन फ्लॅटची किल्ली घेतली आणि ती गोरे काकूंकडुन निघाली. 


               अनलॉक करुन तिने दरवाजा लोटला आणि पाउल घरात टाकले. एका उष्ण वार्‍याचा झोत तिच्या अंगावरुन गेला आणि ती शहारली.हॉलमधले सगळे फर्निचर झाकून ठेवलेले होते. सामसुम किचन. हॉलमधुन ती अभयच्या रुममध्ये गेली. त्याच्या खोलीत पाउल ठेवताच एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती तिला जाणवली. एक अनामिक रितेपण त्या खोलीत तिला जाणवू लागले. अनेक जुन्या आठवणीनी ती खोली भरुन गेली. गप्पा, दंगामस्ती, भांडणं, गॅलरीत बसुन संध्याकाळच्या वेळेची कॉफी एक ना अनेक आठवणीनी तिचं मन दाटुन आलं. त्याच्या खोलीतल्या त्याच्या वस्तु तशाच होत्या. त्याचं कपाट, लॅपटॉपचा डेस्क.पुस्तकांचं कपाट, आणि त्याच्या बाजुलाच त्याची क्रिकेट किटची बॅग आणि त्याची ती आवडती 'ग्रे-निकल्स'ची बॅट. भिंतीवरलं त्याचं पोर्ट्रेट तिने काढुन घेतलं. धुळीचा थर रुमालाने पुसुन काढला. थोडावेळ ती त्याच्या त्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहत राहिली. का कुणास ठाउक तिला त्याचा तो हसरा चेहरा छातीशी घट्ट धरावासा वाटला. हे सगळं नवीन होतं. आज तो आपल्यापासुन दूर गेलाय म्हणुन असं वाटतयं का? आणि आज जर आत्ता तो इथं असला असता तर; इतके दिवस का कॉल केला नाहीस म्हणुन आपण त्याच्यावर रागावलो असतो की त्याला बिलगुन रडलो असतो. काही असो, तो आत्ता या क्षणी तिला हवा होता. ते रिकामं घर आणि आणि त्याची ती रिकामी खोली तिला खायला उठले होते. क्षणभर तिने विचार केला आणि तशीच तिथुन निघाली. दरवाजा लॉक करुन तिने गोरे काकूंकडे किल्ली दिली आणि ती तिथुन निघून थेट स्टेशनवर पोचली.  

               मुलुंड पश्चिमेला जाउन बोरीवलीला जाणारी एसी बस पकडुन ती घराच्या दिशेने निघाली. तो दिवस शुक्रवार होता.आता पुढचा मागचा विचार न करता सरळ त्याचा गावी जाउन त्याला गाठायचं असं तिने ठरवलं. ती कधीच त्याच्या गावी गेली नव्हती. पण तिला ते ठाउक होतं. त्याच्या बोलण्यात तो गावाचा उल्लेख करी. कोकणातलं त्याचं गाव तो वर्णन करत असताना तिच्या डोळ्यापुढे अगदी चित्रवत दिसे. 
"एकदा तरी आपण तुझ्या गावी जाउया हां रे." ती त्याला नेहमी सांगायची.
"हो. नक्की जाउया. आणि रात्री समुद्राच्या किनारी आकाशातल्या चांदण्या बघत पडून राहु." त्याच्या या बोलण्यावर तिला गम्मत वाटे.पण तिलाही वाटायचं की एकदा तरी समुद्राच्या किनार्‍यावर पडुन रात्रभर चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघत राहावं.


          तिने त्याच्या गावी जायचं नक्की केलं. एका मित्राला कॉल करुन ट्रेनच्या तिकिटाचा बंदोबस्त केला.ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी साडे पाचला दादरवरुन सुटणार होती.तिकीटाच्या कन्फरमेशनचं मेल आणि एसएमएस तिला तिच्या मित्राने फॉरवर्ड केला.दिड - दोन तासांत ती घरी पोचली. आवरा आवर करुन तिने तिची बॅगपॅक भरुन ठेवली. शनीवारी त्याला भेटुन, एक रात्र तिथे राहुन रवीवारी परत मुंबईला यायचं. गाडी पहाटेची असल्याने तिला रात्र स्टेशनवरल्या वेटींग रुममध्ये घालवणं भाग होतं. रात्री जेवताना तिने आई वडीलांना याबाबत सांगितलं.

"मी तुला त्याच्याबद्दल विचारणारच होतो.इतके दिवस तो कुठे दिसला नाही." वडिलांनी विचारणा केली.
"भांडले असतिल नेहमीप्रमाणे आणखि काय? हिला भांडण्यापलिकडे काहि सुचत असेल तर शप्पथ." आई. 


ती शान्तपणे जेवत होती.


जेवण आटोपुन सगळं आवरुन ती जायला बाहेर पडली.तिचे वडील स्टेशनपर्यंत सोडायला आले. 


"येते मी बाबा. जा आत तुम्ही घरी. ट्रेन पकडली  की कॉल करेन."
"बेटा, सांभाळून जा आणि हे बघ आता पर्यंत आम्ही तुझ्या आयुष्यात कसली आडकाठी आणली नाही.तुझे निर्णय तुच घेत आलीस.ते सगळे नेहमी योग्यच होते असं नाही आणि ते निर्णय सर्वस्वी जरी तुझे असले तरी काही अंशी आम्हीही त्याला जबाबदार होतोच."
"बाबा... पण..."
"ऐक पोरी. आम्ही कदाचित असू जुन्या विचाराचे वैगरे पण तुला कधीच कसल्या बंधनात, रिती रिवाजात जखडुन ठेवलं नाही. तुझं स्वातंत्र्य तुला दिलेलंच आम्ही.तुझं लग्नाचं वय सुद्धा निघुन जातयं हे तुला आम्ही कितीवेळा समजावून सांगतोय. तुला अजुन किती वर्षे तुझं सो कॉल्ड स्वातंत्र्य उपभोगायचं आहे ते तू ठरवं; पण आयुष्याच्या एका वळणावर तो रितेपणा, ते एकाकीपण खायला ऊठणारच आणि नेमकी त्याचवेळी आपल्याला हवीहवीशी वाटणारी ती व्यक्ती आपल्यापासुन फार दूर गेलेली असणार. इतकी दूर की त्याचं अस्तित्व ही तुला जाणवणार नाही. मग त्यावेळी अचानक हे आयुष्य निरर्थक वाटु लागेल. पश्चाताप ग्रासु लागेल, तेव्हा काय करशील? आज, आत्ता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहेस हे विसरु नकोस.
पण यावेळी एक विनंती करतो.जर तो तुला खरंच आवडत असेल तर आता यावेळी तरी निर्णय घेवून टाक. You know what I mean." 

तिचे वडील बोलता बोलता थांबले. तिचे डोळे दाटुन आले.बाबा असं काहे बोलतील हे तिला अपेक्षित नव्ह्तं. त्यांच्या त्या बोलण्याने तिला थोडा धीर आला होता. इतके दिवस स्वत:च्या मनाशी चाललेला खेळ तिला थांबवायचा होता आणि बाबांच्या बोलण्याने तिला थोडं बळ आलं. 

               वडीलांचा निरोप घेउन ती लोकल पकडुन दादरला पोचली. वेटींग रुममध्ये रजिस्टरवर नाव आणि तिकीट नंबर नोदंवून तिथल्या खुर्चीवर बसली.हळूहळू ती वेटींग रुम भरु लागली. रात्रभर तिला झोप लागलीच नाही. पहाटे साडेचारचा अलार्म वाजला. वॉशरुममध्ये जाउन फ्रेश होउन ती वेटींग रुममधुन बाहेर पडली आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागली.


               गाडीची अनाउंसमेंट झाली होती.ती वेटींग रुममधून निघुन दादर टर्मिनसच्या दिशेने चालू लागली. गाडी नुकतिच प्लॅटफॉर्मवर आली होती.गाडीत चढण्यासाठी माणसांची लगबग सुरु झाली.तिनेही आपला डब्बा शोधला व आपल्या सीटवर जाउन बसली.या ट्रेनचं एक बरं होतं; ट्रेनला मोजकेच स्टॉप्स होते आणि दुपारी साडे बाराच्या दरम्यान ती पोचणार होती.बरोबर साडे पाचला गाडीने हॉर्न दिला आणि हळूहळू प्लॅटफॉर्म सोडला. एव्हाना अंधुक प्रकाशात मुंबई जागी होत होती.लोकल्स धडधडत ये-जा करत होत्या. १५-२० मि. ट्रेन ठाण्याला पोचली तेव्हा तिने फेरीवाल्याकडुन न्युज पेपर घेतला, पनवेल येईपर्यंत तो चाळून झाला. पनवेलला ट्रेनमधल्या फेरीवाल्याकडला एक मस्त चहा तिने मारला.आता तिला थोडं फ्रेश वाटु लागलं. लोकांची वर्दळ कमी झाली.आता ट्रेन थेट दोन अडीच तासांनी चिपळूणला थांबणार होती. गाडीने पनवेल सोडलं आणि गार वारा तिच्या अंगाला झोंबू लागला.पाउस ओसरुन एक महिना झाला होता पण कोकणातला परिसर हिरवागार होता.तिने पूर्वेकडे पाहिलं, सह्याद्रीच्या डोंगराआडुन सुर्यदेव हळुहळू वर येत होता.गुलाल उधळावा तशी पुर्व दिशा तांबड्या आणि केशरी रंगानी उजळली होती.कॅनवासवर ब्रशने फटकारा मारावा तसा एखादा पाखरांचा थवा भुर्र्कन उडुन जात होता.एव्हाना गाडीने वेग घेतला आणि खिडकितुन झोंबणार्‍या गार वार्‍यासवे खेळता खेळता तिने डोके खिडकीला टेकले आणि डोळे मिटुन घेतले. डोळे मिटताच ४ महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. आता यावेळी तिला तो प्रसंग आठवायचाही नव्हता.पण नाही त्या भरधाव वेगात तिच्या डोळ्यांसमोरुन तो प्रसंग वेगाने सरकू लागला.

          एके संध्याकाळी त्याने तिला भेटायला बोलावले होते. दोघेही चर्चगेटला भेटुन समुद्राच्या दिशेने निघाले.तो थोडा अस्वस्थच वाटत होता.तिने तसं विचारलंही पण त्याने काही नाही असं सांगुन तिला टाळलं.पण तिला ठाउक होतं की काही तरी बिनसलयं.चालत चालत ते नरीमन पॉईंटला समुद्राच्या टोकावर पोचले. किती तरी वेळ तो नुसता समुद्रकडे टक लावुन बघत होता. तिने बराच वेळ त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला पण तो काहिच बोलत नव्हता. कंठाळून ती जायला उठली त्याने तिचा हात धरला. गेल्या ३-४ वर्षात आज पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता. जरी त्या स्पर्शात अडवणूक होती तरी त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली. हात धरून त्याने तिला खाली बसायला सांगितलं. यावेळी बसताना दोघांमधलं अन्तर बरंच कमी झालं होतं. ती बसली. 

"अभी काय झालयं? सांगशिल का?"
"काय सांगु?" तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोलला. त्याने असं डोळ्यांत पाहिलं की ती नेहमी नजर चुकवायचा प्रयत्न करायची,कारण त्याच्या नजरेत एक प्रकारची नशा होती.तिला ती जाणवायची. त्याच्या मनातलं तिच्याविषयीचं सारं प्रेम त्याच्या डोळ्यांत दाटुन यायचं तेव्हा तिचं काळीज धडधडायला लागे.
"प्लिज बोल रे.काय झालयं सांग ना." नजर चुकवत ती बोलली.
 


"ऐकायचयं तुला? ऐक तर मग...;
हे बघ, मला नाही माहित की तुला माझ्याकडुन काय हवयं ते? आय मीन, मला नाही कळत की का आपण पुन्हा पुन्हा भांडतो आणि पुन्हा पुन्हा एकत्र येतो ते? तू पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलंस त्यानंतर मी तुला त्याबाबत कधी विचारलं तरी का? मग का हे सगळं पुन्हा पुन्हा? मला नाही सहन होत यार हे सगळं.त्रास होतो मला या सगळ्याचा. भयंकर त्रास होतो! किती वेळा मी माझ्याच मनाचा, माझ्या भावनांचा खून करायचा आणि किती वेळा एखाद्या प्रेताप्रमाणे पुन्हा तुझ्याबरोबर राहायचं? अजुन कितीवेळा आपण एकमेकांना शेवटचं गुडबाय म्हणणार आहोत? आणि किती वेळा सॉरी म्हणून पुन्हा खोटं खोटं जगणार आहोत? मला या असल्या आयुष्याचा कंठाळा आलाय. वैताग आलाय. कळत नाहीय मला की हे सगळं कधी थांबणार आहे ते.पण कधी तरी या सगळ्यांना पूर्णविराम द्यावाच लागेल ना? कधी तरी आपण कायमचे वेगळे होणारच ना? मग आता का असं कुढत कुढत जगायचं आपण?" तो बोलत होता आणि ती भरल्या डोळ्यांनी उठुन उभी राहिली. 

"त्रास फक्त तुलाच होतो हो ना? मला नाही होत. मी काय मेणाची बाहुली रे.मला कसल्या आल्यात फिलिंग्ज. आय अ‍ॅम जस्ट अ हार्टलेस पर्सन! मला काय कळतयं की तुला काय होतयं ते? तुला कसला त्रास होतोय ते? मी खेळतेय ना रे तुझ्याशी.तुझ्या भोळ्या मनाचा फायदा उचलतेय.माझा वेळ जावा म्हणुन तुझ्याबरोबर फिरतेय.बस्स! हेच करते मी. खुष?" तिचा आवाज ओलसर झाला होता. त्याने उठुन तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले. 

"नाही ना असं करत तू? मग अजुन किती दिवस माझी परीक्षा पाहणार आहेस? मी नाही गं जाळू शकत स्वतःला असं. नाही सहन होत मला माझं हे असं वागणं. नाही सहन होत मला तुझ्याशिवाय जगणं. हरतो यार मी! स्वत:शीच हरतो नेहमी.मला तू हवी आहेस का समजत नाहीय तुला?" 

               त्याच्या डोळ्यात संपूर्ण आवेश होता. त्याच्या या प्रश्नांना ती उत्तर देणारच होती. 
"हो! मी ही नाही राहु शकत तुझ्याशिवाय. तू ही हवा आहेस मला. कायमचा." 

         शब्द तिच्या ओठावर येणारच होते की अगदी अनपेक्षितपणे तिच्या ओठांवरील शब्दांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं. हे सगळं तिला अपेक्षित नव्हतं. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने वीज सळसळत तिच्या शरीरात गेली.एक दोन तीन सेकंद तिला वाटलं पावसाची पहिली वहीली कोवळी सर तिच्या ओठांवर सरसरतेय पण नाही तिला ते अयोग्य वाटलं.तिला ती पावसाची सर वाटलीच नाही तर एक अजस्त्र लाटच आपल्यावर उसळलीय असं वाटलं.दुसर्‍या क्षणी तिने त्याला झिडकारलं आणि साटकन एक कानाखाली ठेवून दिली. तो हादरला.भरला डोळ्यानी आणि रडवेल्या चेहर्‍याने ती निघुन गेली, "आय हेट यु अभय!"  

          गाडीने कर्णकर्कश भोंगा वाजवला आणि एका टनलमध्ये शिरली. तिने खाडकन डोळे उघडले.कान बहिरा करणारा गाडीचा आवाज आणि बाहेर फक्त बोगद्यातला काळोख होता.... 



क्रमश:

  

Friday, January 3, 2014

तुटलेला तारा....

         आपण एकमेकांशिवाय फार जास्त वेळ दूर राहु शकत नाही हे त्या दोघांना चांगलंच ठाउक होतं आणि गेली ५-६ वर्षे हे असंच सुरु होतं. ते ज्या दिवशी भेटले होते त्या दिवसापासुन ते आतापर्यंत अनेकदा त्यांच्यात भांडणं झाली होती. अगदी बोलता बोलता देखिल भांडणं व्हायची. कधी कधी ही भांडणं 'गुडबाय फॉरेव्हर',"आय विल नेव्हर गॉना सी यु अगेन" अशा वाक्यांनी संपायची. पण ते फॉरेव्हर जास्तित जास्त २-३ महिने असायचं. पुन्हा ते एकमेकांना आठवू लागत. पुन्हा त्या दोघांना एकमेकांची उणिव जाणवू लागे आणि मग दोघे पुन्हा एकमेकांना कुठूनतरी शोधुन आणुन एकमेकांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत. या एकमेकांना शोधुन आणण्याच्या कामात तिचा पुढाकार जास्त असायचा. तो जितका प्रेमळ तितकाच कठोर. त्याचे गुडबाय फॉरेव्हर हे त्याच्यासाठी नेहमीच फॉरेव्हर असायचे. त्याच्या बर्‍याच मित्र मैत्रीणीना आणि काही नातेवाईकांनाही त्याचा हा स्वभाव ठाउक होता. त्याने एकदा ठरवलं की एखाद्या व्यक्तीचं तोंड नाही बघायचं तर नाहीच. एखादी व्यक्ती मग ती कितीही जवळची का असेना एकदा का त्याच्या मनातून उतरली की ती कायमची असायची.पण तिच्याबाबतित असं नव्हतं. तो तिच्यापासुन किती तरी वेळा दूर गेला होता, पण जेव्हा जेव्हा ती हाक मारायची तो तिच्या हाकेला  'ओ' द्यायचाच. त्यालाही कळत नव्हतं की असं का ते? 

           तिच्यावर त्याचं प्रेम होतं. जीवापाड प्रेम करायचा तो तिच्यावर. त्याबाबत एकदा त्याने तिला धीर धरुन सांगितलं ही होतं आणि अपेक्षेप्रमाणे तिने नकार दिला होता. तो त्याने पचवलाही होता. प्रेम नाही तर फ्रेन्ड्शिप ही असली फालतु लॉजिक्स त्याच्या अखत्यारीत कधीच नव्हती. त्यामुळे असेल तो तेव्हापासुन तिच्यापासुन दोन हात दूरच राहत असे. पण असं कितीही केलं तरी त्याला ठाउक होतं की तिला मनातुन काढणं फार कठीण जाणार होतं. तिच्या नकाराचं कारण त्याने तिला कधीही विचारलं नाही. कारण, "Do you love me?" असं त्याने तिला कधीच विचारलं नाही,पण "I love you." हे मात्र त्याने तिला निक्षुन सांगितलं होतं. त्यामुळे तिच्या नकाराची कारणं त्याच्यादेखत निकृष्ट्च होती. 

          पण तिच्या मनात काय सुरु होतं हे तिलाच कळत नव्हतं. तो तिला आवडत होताच. पण प्रेम वैगरे?? तिला काय हवं होतं हे तिला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही कळलं नव्हतं. पण तो तिच्यापासुन दूर गेलेला मात्र तिला कधीच सहन होत नसे. थोडे दिवस ती मन मारुन राहायची. गेला तर गेला उडत असं काहीसं उगाच आपल्या मनाला समजावत राहायची. पण ते फक्त काही दिवसच! मग नेहमीच्या वाटेवर, ट्रेनमध्ये, इकडे तिकडे फिरताना तिला तो सतत आठवत राहायचा. त्याच्या नसण्याने अचानक एक प्रकारचा रितेपणा तिला जाणवू लागे. ती पोकळी तिचा जीव घेउ लागे. दिवस-रात्र तो तिच्या मनात घर करुन असायचा. पण हे तिने कधीही त्याला जाणवू दिलं नाही. तेव्हाही नाही, आताही नाही आणि हे ती त्याला कधी जाणवू देणारही नव्हती. पण यावेळी असं नव्ह्तं. का कुणास ठाउक यावेळी त्यांची ही "जुदाई" बडी लंबीच झाली होती. ३-४ महिने तरी निघून गेले होते. त्याचा काहीच ठावठीकाणा नव्हता. प्रत्येकवेळी मीच का जायचं त्याच्याकडे त्याला कधीच वाटत नाही का स्वतःहून यावसं? तिला ठाउक होतं की तो असं कधीच करणार नाही; पण तरिही तिला मनोमन असं वाटत राहायचं की भांडण झाल्यावर त्याने स्वतः येवून तिचा रुसवा दूर करावा.पण मग तिला वाटु लागे अशी अपेक्षा तरी तिने त्याच्याकडून का करावी? तो थोडीच माझा बॉयफ़्रेंड आहे? ती स्वत:शीच भांडत राहि. 

            तिला आठवलं. एकदा असंच त्यांचं छोटुसं भांडण झालं. नेहमीप्रमाणे दोघेही एकमेकांशी बोलायचे बंद झाले. दोन - तीन दिवस झाले असतिल या भांडणाला.ती एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी जायला बाहेर पडली.चर्चगेट स्टेशनला जात असताना रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला तो उभा असलेला तिला दिसला. त्याला बघताच अचानक तिचं काळीज धडधडायला लागलं. का ते तिलाही कळलं नव्हतं.उगाच पोटात फुलपाखरांच्या गुदगुल्या तिला जाणवू लागल्या. हा मला भेटायला तर आला नसेल ना. तिला वाटुन गेलं. पण कदाचित त्याचं लक्ष्य नव्हतं कारण तो फोनवर कुणाशी तरी बोलत उभा होता. सिग्नल अजुन ग्रीन झाला नव्हता त्यामुळे ती त्याला बघत उभी राहिली आणि पोटातल्या रेशीमी गुदगुल्या थांबवायचा नाहक प्रयत्न करु लागली. सिग्नल ग्रीन झाला आणि माणसं भराभर रस्ता क्रॉस करु लागली. तो सुद्धा फोनवर बोलत बोलत इकडे तिकडे कुणाला तरी शोधत त्याबाजुने चालू लागला. तो जसा जसा जवळ येत होता तिच्या पोटातली फुलपाखरं अजुनच चेकाळत होती. ओठ उगाच हसत होते. त्याचं अजुनही लक्ष्य नव्हतं. चालता चालता दोघेही समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांना पाहिलं. तिचे ओठ गालांवर स्वार झाले. पण तिला पाहूनही न पाहिल्या सारखं करुन तो भरभर निघूनही गेला. तिला ते बिलकुल अपेक्षित नव्हतं. रस्ता क्रॉस करुन तिने मागे वळून पाहिलं. जिथे ती उभी होती तिथेच एक फुलपाखरु उभं होतं. तो तिच्याजवळ गेला. तिने त्याच्या हातात हात गुंफले आणि ती दोघं तिथुन उडुन गेली. त्याने एकदाही मागे वळून तिच्याकडे पाहिलं नाही. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. नाही, तो कुणाबरोबरही का जाईना पण मला बघुनही न बघितल्यासारखं करतो म्हणजे काय? इतका कसला ह्याला तोरा? साला, स्वत:ला शाणा समजतो का? गेला उडत!यापुढे मी साल्याचं तोंडही बघणार नाही. संतापत तिने जाउन ट्रेन पकडली. पोटातली फुलपाखरं केव्हाच उडुन गेली. पण त्यावेळी सुद्धा काही दिवसानी तिनेच पुन्हा पॅच अप केले होते. त्याच्या त्यावेळी कितीही राग आला असला तरी काही दिवसांनी तो तिला आठवू लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं ते फुलपाखरु कोण होतं ज्याच्या हातात हात गुंफुन तो तिच्याकडे न बघता उडून गेला होता हे तिला माहिती करु घ्यायचं होतं. 

              तो प्रसंग तिला आठवला आणि उगाच हसु आलं.नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा आपल्यालाच पॅच अप करावे लागणार हे तिला पक्कं ठाउक होतं. आज घरी जाताना स्टेशनवर उतरल्यावर त्याला कॉल करुया असं ठरवून ती स्टेशन यायची वाट बघत राहीली. पण का कुणास ठाउक यावेळी तिला त्याची प्रकर्षाने आठवण येउ लागली होती. न रहवून तिने त्याला 'हाय." असा मेसेज टाकला. पण बराच वेळ झाला तरी त्याचा काहीच रिप्लाय नाही आला. काहिवेळाने तिने पाहिलं तेव्हा तो टेक्स्ट अन्डिलिव्हर दाखवत होता. तिने पुन्हा तो फॉरवर्ड केला तरीही तेच.तिला राहवेना. स्टेशन यायला अजुन बराच वेळ होता. सेल फोनमधले त्यांचे मेसेज कॉन्वरसेशन्स ती वाचू लागली. आणि मनात हसू लागली. काय वेड्यासारखे आपण टेक्स्टसवर भांडत बसायचो. ते टाईप करुन भांडण्यात काय मजा होती. तरीही मग तो वैतागुन एक टेक्स्ट टाकायचा,
"हे बघ मला टाईप करायला कंठाळा येतोय, भांडायचं असेल तर भेटुन भांड किंवा कॉल कर, मी टाईप करत बसणार नाहीय. गुडबाय." आणि तरीही ते भांडण रात्रभर टेक्स्ट्सवर सुरुच असायचं. ते सगळं वाचत ती मनात हसत होती. वेडा नुसता!

       तोवर स्टेशन आलं. ट्रेनमधुन पटकन बाहेर पडुन ती एका शांत ठीकाणी आली. धडधडत्या काळजाने तिने त्याचा नंबर डायल केला. तिचे प्राण तिच्या कानात गोळा झाले होते. खूपवेळ झाला तरी तिला समोरची कॉलर ट्युनही ऐकू आली नाही. कॉल डिसकनेक्टकरुन तिने पुन्हा डायल केला यावेळी " द नंबर यु हॅव डायल इज इन करेक्ट." असा मेसेज आला म्हणुन पुन्हा चेक करुन तिने डायल केला तेव्हा, " द नंबर यु आर ट्राईंग टु रिच टू इज टेंपररली डिसकनेक्टेड." असा मेसेज आला. ती हिरमुसली. गेली कित्येक वर्षे त्याचा नंबर कधीच बंद नव्हता. नॉट रिचेबल असेल पण डिसकनेक्टेड का? फेसबुकवर मेसेज टाकुया असा विचार करुन तिने त्याचं नाव फेसबुकच्या सर्च बार मध्ये टाकलं. त्याच्या नावाचे ५-६ जण होते पण तो नव्हता. तिने बरीच शोधाशोध केली. म्युचुअल फ्रेंड्सच्या लिस्टमध्येही जाउन बघितलं तरी त्याचा प्रोफाईल कुठे दिसला नाही. सेम केस ट्विटरवर सुद्धा. तो सापडतच नव्हता. आता काय करावे? मित्र- मैत्रिणींपैकी कुणाला कॉल करुन विचारावं का? पण उगाच सगळ्यांना वाटेल की ही आता का चौकशी करतेय? त्यावेळी तर त्याच्यावर किती भडकली होती त्याने मित्रांना त्यांच्याबद्दल सांगितलं होतं तेव्हा. त्याला किती घालुन पाडुन बोलली होती. तिला तो प्रसंग आठवला. जाउ दे. उद्या बघते हा कुठे हरवलाय ते असा विचार करुन ती घरी गेली. पण तिला राहवत नव्हतं. काही तरी विचार करुन तिने एका मैत्रिणीला कॉल केला. इकडच्या तिकडच्या गोष्टी आटपून तिने त्याच्याबद्दल तिला विचारलं पण तिला काहीच ठाउक नव्हतं. आता तिला उगाच त्याच्याबद्दल काळजी वाटु लागली. त्या चिंतेत ती धड जेवलीही नाही. हा असा अचानक कुठे गायब झालाय? फोन नाही पण फेसबुक आणि ट्वीटरवर तर नेहमी पडीक असायचा आणि आता तर त्याचा तिथे प्रोफाईलच नाहीय. रात्रभर तिला झोप लागलीच नाही. कुठे  असेल हा? ती विचार करत करत झोपी गेली. 

          पहाटे तिला जाग आली तिच एका भयानक स्वप्नाने. भयभीत होउन ती बेडवर उठून बसली. तिचं सर्वांग भीतीने थरथरत होतं. घमाघूम होउन ती कितीतरी वेळ त्या भयंकर स्वप्नाच्या छायेत बसुन राहिली. काहीवेळाने तिने घडाळ्याकडे पाहिलं साडे पाच वाजले होते. तशीच उठुन ती खिडकीपाशी गेली. आजुबाजुचा परिसर हळूहळू जागा होत होता. पहाटेचा मंद वारा तिच्या अंगावरुन वाहू लागला. काळोखात दूर कूठेतरी बघत आताच पडलेलं स्वप्न ती आठवू लागली. खरं तर तिला ते भयंकर स्वप्न आठवायचचं नव्हतं पण कित्येक महिन्यानी तिने त्याला स्वप्नात पाहिलं होतं. ती हरखून गेली होती. पण नको.... त्या स्वप्नाचा शेवट काही करुन तिला आठवायचा नव्हता. 

          ऑफिसला तयारी करायची वेळ झालीच होती. ब्रश करत ती बाथरुममध्ये शिरली पण त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरुन जातच नव्हता. हे असं इतकं आजच का होतयं. तिला कळत नव्हतं. विचार करत करत तिने शॉवर ऑन केला. त्या शॉवरमधुन होणारा  वर्षाव तिच्या त्या गोर्‍या देहावर शांतपणे एका लयीत कोसळू लागला. तिच्या त्या सतेज कांतिवर त्या वर्षावाचे टपोरे थेंब बरसून निसटू लागले. अळवाच्या पानावर जसे पावसाचे थेंब मोत्यासारखं दिसण्याच्या नादात निसटुन जातात ना अगदी तस्सेच. त्याने जर आपल्याला असं पाहिलं असतं तर नक्कीच असं काहीसं काव्यात्मक बोलला असता आणि डोळेभरुन पाहत राहिला असता. तिला उगाच तो आपल्याला कुठून तरी चोरून पाहतोय असं अचानक वाटलं आणि लाजेने तिने डोळे मिटुन घेतले. तिचे भिजलेले गाल लाजेने अजुनच आरक्त झाले आणि तिच्या त्या केवड्याच्या फुलासारख्या फुललेल्या देहावर सर्र्कन काटा उभा राहिला. हळूहळू तिने डोळे उघडले आणि समोरच्या आरशात स्वतःला निरखू लागली. कसलीशी ओढ तिच्या डोळ्यांत साठून राहिली होती. अंगावर आलेला काटा शॉवर जेलच्या फेसाने हळूहळू नाहीसा होत होता. शरीराच्या उंचवट्यावरुन ओघळणारे पाणी तिला अस्वस्थ करत होते. 

            तिने पटपट अंघोळ आटोपली आणि शेगडीवर कॉफीसाठी दूध ठेवलं. ही कॉफीची सवयही त्याच्यामुळेच लागलेली.नाहीतर चहा म्हणजे तिचा जीव की प्राण. एकदा त्याच्या घरी ती गेली होती  तेव्हा त्याने जी कॉफी केली होती तेव्हापासुनच की काय कॉफी तिला आवडु लागले होती. पण तिला ती धड करता येत नसे. मग फक्त कॉफीसाठी म्हणून ती त्याच्या घरी जात असे. तो फार छान कॉफी करायचा आणि मग ती दोघं त्याच्या बेडरुमला लागुन असलेल्या गच्चीत समोर पसलेल्या मुंबईकडे बघत बघत कॉफी घेत गप्पा मारत बसायचे.  


           आईने लक्ष्यात आणुन दिलं तेव्हा तिने त्या उतू जाणार्‍या दूधावर फुंकर मारली. आज तिचंही मन त्याच्यासाठी असंच उतू जात होतं. सकाळच्या स्वप्नामुळे ती अस्वस्थ तर होतीच पण ते सगळं ती इग्नोअर करत होती. आज जर त्याच्याशी काँटॅक्ट झालंच तर त्याला भेटायलाच जायचं असं तिने मनाशी ठरवूनच टाकलं होतं.बस्स झालं आता! कधी एकदा त्याला बघते,त्याला ऐकते असं तिला झालं होतं. त्याला भेटायला गेले तर मग काय घालुन जाउ? नकळत ती तिच्या कपाटाकडे गेली आणि तिने तो अबोली रंगाचा कुडता आणि व्हाईट लेगिंग्ज काढली. जेव्हा ती दोघं पहिल्यांदा एकमेकांसोबत फिरायला गेली होती तेव्हा तिने हे काँबिनेशन घातले होते.तिला लांबूनच त्याने पाहिलं होतं. लोकांच्या घोळक्यातून स्टेशनच्या पायर्‍या सावकाश उतरुन ती बाजुलाच असलेल्या एका झाडापाशी उभी राहुन त्याची वाट बघत उभी राहिली होती. तिने तिला अगोदरच पाहिलं होतं. तो सवकाश चालत तिच्यापाशी गेला. अबोली रंगाच्या कुर्तीवर व्हाईट लेगिंग्ज.इतकी सुंदर ती पहिल्यांदा कधीच दिसली नव्हती. त्याने तिला पाहुन एक लार्ज स्माईल दिली आणि प्रतिसादादाखल तिचेही ओठ खुलले. 

"या काँबीनेशनमध्ये तू नुकत्याच उमलेल्या पारिजातकाच्या फुलासारखी दिसतेस!" तो उद्गारला

 आणि ती क्षणभर स्तब्ध झाली होती. नंतर त्याच्या प्रत्येक कवितेत पारिजात असाच भरभरुन फुलला होता.तो क्षण आता तिच्या मनाला गुदगुल्या करुन गेला. तिने तेच कपडे घालायला घेतले आणि सगळं आवरुन ती घराबाहेर पडली. जाता जाता सहज ट्राय म्हणुन तिने त्याचा नंबर पुन्हा डायल केला पण तो डिसकनेक्टेडच होता. 


               आज काम करायचा तिचा बिलकूल मूड नव्हता. त्याला कसं शोधावं याचा विचार करत ती राहिली.त्याच्या ऑफिसमध्ये कॉल केला तर? अरे हां! इतका वेळ आपल्याला का सुचलं नाही हे? तिने पटकन त्याच्या कंपनीचं नाव गुगल केलं काँटॅक्ट अस ऑप्शनमध्ये जाउन तिने त्याच्या कंपनीच्या बोर्डलाईन्वर कॉल केला.बर्‍याच वेळाने समोरुन कॉल अ‍ॅन्सर झाला.

"गुड मॉर्निंग! हाव कॅन आय हेल्प यु?" समोरुन टिपिकल रिसेपशनिस्टचा गोड आवाज.
"हॅलो! गुड मॉर्निंग! कॅन आय टॉक टु मि.अभय पाटकर?"
"अम्म! अभय पाटकर? व्हीच डिपार्टमेंट मॅम?"
"सेल्स!"
"ओह! सेल्स! अ‍ॅम सॉरी मॅम, मि. अभय इज नो मोअर वर्किंग विथ अस."
"व्हॉट?? व्हेन ही लेफ्ट?"
"आय थिंक ३ मंथ्स बॅक. मे आय नो व्हू इज धिस? अ‍ॅन्ड व्हॉट्स इट्स रिगार्डींग?"
"नथिंग! नथिंग" तिने फोन ठेउन दिला.



         तिला आता अधिकच भीती वाटु लागली. नक्की काय झालं असेल? कुठे गेला हा? तिच्या मनात अनेक विचार येउ लागले आणि ते सकाळचं स्वप्न फणा काढुन तिच्या समोर उभं राहिलं. आता शेवटचा उपाय म्हणून तिने त्याच्या घरीच जायचं ठरवलं. कालपासुनची तिची अस्वस्थता वाढतच होती. त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला होता.आता ती खूपच घाबरली होती.डेस्कवरुन उठून ती मॅनेजरच्या केबिनमध्ये गेली आणि तब्येत बरी नसल्याने त्याच्याकडुन घरी जायची परवानगी मागितली.मॅनेजरने तशी परवानगीही दिली कारण ती फारच अस्वस्थ दिसत होती. एका ड्रायव्हरला तिला कारमधून स्टेशनवर सोडुन येण्यास सांगितले.  ड्रायव्हर तिला सिएसटी स्टेशनवर पोहचवून परत ऑफिसला गेला.तिकीट घेवून ती ट्रेनमध्ये चढली आणि विंडो सीटवर जाउन बसली.
  
 
 क्रमश: