Sunday, August 26, 2012

रतनगड आणि "टॉर्च"भूत.....

१७ जुलै २०१० मध्ये खर्‍या अर्थाने ट्रेक लाईफची सुरुवात झाली. आमचे सेनापती, रोहन याने या दिवशी पहिला वहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्या ट्रेकला अवघे सहाच जण होतो. पण तेव्हापासुन ट्रेक आणि भटकंतीची चटक लागली. त्या ट्रेकमध्ये रोहन बरोबर सुहास झेले, सागर नेरकर, अनुजा सावे, भारत असे होतो. मग आमची चांगलीच गट्टी जमली आणि ट्रेक्स सुरु झाले. १७ जुलैच्या विसापूरच्या ट्रेक नंतर ऑगस्टमध्ये आम्ही सुधागड ला गेलो. त्या ट्रेकला पण मोजकेच ५ जण होतो. त्यात मी, सुहास आणि अनुजा असे आणि दोन दुसरे मित्र होते. सुधागडचा ट्रेक झाला आणि मग  १५ ऑगस्टला रायगडस्वारी करुन आलो. रायगडनंतर त्याच महिन्यात २२ तारीखला सफाळ्याचा तांदुळवाडी किल्ला फत्ते केला.इथे देवेंद्र चुरीशी मैत्री झाली. याच ट्रेकला अनुजाने सांगितलं की सप्टें.मध्ये VAC (Vasai Adventure Club)  ने रतनगडचा ट्रेक आयोजित केलाय. मग त्या ट्रेकसाठी मी आणि देव्याने तिला तिथेच कन्फरमेशन दिलं आणि नंतर सुहास पण यायला तयार झाला. झालं! तिने आमच्या सीट्स बुक करुन  ठेवल्या.  ३ सप्टें. ते  ५ सप्टें असा ट्रेक होता. म्हणजे ३ तारखेला रात्री वसईहुन निघायचे, दुसर्‍या दिवशी सकाळी रतनवाडीला पोचायचे, ट्रेक करायचा. ती रात्र तिथेच हॉल्ट आणि मग रविवारी बॅक टू होम. असं प्लॅनिंग होतं. 

ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी ऑफिसमधुन संध्याकाळी निघालो. मिटींग पॉईंट होता वसई. पण मग मला स्लिपिंग बॅग हवी होती म्हणून अनुजाच्या मैत्रिणीच्या घरी विरारला जावं लागलं. देव्या मला वसईलाच भेटला. त्याला घेउन मी विरारला ममताच्या घरी गेलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते आणि ती बिचारी बॅग देण्यासाठी जागीच होती. तिच्याकडुन बॅग घेतली आणि आम्ही परत वसईला आलो. तिथे सुहासही भेटला. आमच्या आधीच तिथे वॅकची ट्रेकर्स मंडळी जमली होती. अनुजा लेट आली आणि मग सगळे आम्ही गाडीत आपापली जागा धरुन बसलो. साडे बाराला आमची गाडी सुटली आणि आम्ही इगतपुरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रचंड पाउस होता.मी माझा आयपॉड कानाला लटकवला आणि गाणी ऐकतच झोपी गेलो.मध्ये केव्हातरी जाग आली तेव्हा गाडी थांबली होती. आणि पाण्याचा खूप मोठा आवाज येत होता. काय झाले ते कळले नाही. परत गाडी सुरु झाली आणि मी झोपी गेलो. सुझे ने मला जेव्हा उठवल तेव्हा मला कळलं की आम्ही रतनवाडीला पोचलोय.

रतनगडला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिक हायवेने इगतपुरीला पोचल्यावर, इगतपुरीच्या पुढेच १-२ किमीवरला पहिला राईट घेउन घोटीच्या दिशेने वळायचं. घोटीवरुन पुढे शेंडी, भंडारधरा वैगरे करत रतनवाडीला पोचायचं. रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याशी असलेलं गावं आहे. यापूर्वी मी काही मित्रांसोबत रतनवाडीला अमृतेश्वराला जाउन आलो होतो. म्हणजे पिकनिक ला आलो होतो. 

पहाटे सगळे उठले. तिथल्याच एका स्थानिक हाटेलात मस्त पोहे आणि चहाचा नाश्ता झाला. ओळख परेड झाली. या ट्रेक ला सगळे मिळून किमान १५-२० जण तरी होतो.मी पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या ग्रुपबरोबर ट्रेकला आलेलो. त्यात नशीब सोबत सुझे, देचु आणि अनुजा होती त्यामुळे बोर व्हायचा प्रश्न नव्हता. तर ओळख परेड झाली आणि आमचे ट्रेक लिडर श्री. बंधू यांच्यामागुन आम्ही सगळे रतनगडाच्या वाटेने चालु लागलो. सोबत गाईडही होता. प्रवरा नदीच्या काठाने, शेतातुन चालत होतो आणि एका ठीकाणी नदी पार करावी लागली तेव्हा मला सुधागडची आठवण झाली. सुधागडला आम्हाला  दोन वेळा नदी क्रॉस करावी लागली होती. मानाने प्रवरे हे पात्र फार मोठं नव्हतं कारण तिचा उगम इथल्याच कुठल्यातरी डोंगरातुन होत होता. तरीही कंबरभर पाण्यातुन एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही प्रवरा पार केली आणि चालु लागलो. 

प्रवरेच्या प्रवाहातून
रतनगडला जायचं असेल तर सोबत एखादा तरी गाईड असावाच कारण खूप घनदाट जंगल आहे आणि पावसाळ्यात तर ते अजुनच डेन्स होउन जातं. जागोजागी मार्किंग्ज असल्या तरी वाट चुकायची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यात नाही म्हटलं तरी दोन - तीन तासांची चढाई आहेच.

आम्ही सगळे गाणी गात,एकमेकांची मस्करी करत चालु लागलो. मी, देव्या आणि सुझे एकत्र गप्पा मारत चाललो होतो. अनुजा त्या बाकीच्याबरोबर कूठे गायबली होती. तशातच भयंकर पाउस सुरु झाला. तासभरात आम्ही एका छोट्या पठारावर आलो तिथे थोडावेळ ब्रेक घेतला. गोळ्या, बिस्किटं वैगरेचं वाटप झालं. अजुन तासाभराची वाट बाकी होती. ब्रेकनंतर पुन्हा चढाई सुरु केली आणि एका ठीकाणी आलो. तिथे मग कुणी तरी माहीती दिली की या वाटेवरुन चालत दुसऱ्याबाजुने  हरिशचंद्रगडावर जाता येतं. ट्रेकच्या जगात माझा नुकताच जन्म झाला असल्याने, हरिश्चंद्रगड, कात्राबाईची खिंड,कोकणकडा वैगरे शब्द मला नविनच होते. मग तिथुन पुन्हा चालु लागलो. 

ब्रेक टाईम
पाउस थोडावेळ थांबला. आणि मग तासाभराने आम्ही रतनगडाच्या पहिल्या शिडीपाशी येउन पोचलो. तेव्हा धो धो पाउस पडत होता. धुकं तर इतकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्या शिडीची हालत तर भयानक होती. प्रचंड वाहणार्‍या  वार्‍याच्य वेगात ती शिडी लटपटत होती. "अजुन अशा ३ शिड्या पार करुन वर जायचयं" हे कुणाला तरी बोलताना ऐकलं आणि माझ्या पोटातच गोळा आला. एक तर मला हाईटचा फोबिया होता. म्हणजे चढताना काही वाटत नाही पण त्याच वाटेवरुन उतरताना मात्र माझी जाम टरकते.  सगळेजण ती शिडी सहज पार करुन जात होते आणि मी मात्र घाबरत होतो. कशीबशी ती शिडी मी पार केली. आणि वर पोचलो. पाउस तर तुफान बरसत होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. थोडं चालुन गेल्यावर अजुन एक शिडी! 

पहीली शिडी
 हे राम!  ही शिडी तर पहिल्या शिडीपेक्षा खतरी होती. आणि वार्‍याने प्रचंड हालत होती. मी कसाबसा चढु लागलो. शिडी पार केली आणि किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी येउन पोचलो. पण दरवाज्यापर्यंत पोचणं माझ्यासाठी तितकसं सोप्पं नव्हतं. शिडी पार केल्यानंतर एक निमुळती वाट होती जी पावसाने आधीच निसरडी झाली होती आणि आताही पाउस पडतच होता. धरायला आजुबाजुला भक्कम आधार नव्हता. वर जे अगोदर पोचले होते त्यांनी एक रोप टाकली होती. ती रोप पकडुन आणि माझं वजन सांभाळत कसाबसा मी चढलो. एक दोन ठीकाणी घसरलोच पण सावरलं. हा ट्रेक जाम थ्रीलिंग होता माझ्यासाठी. मुख्य दरवाज्यातुन कसाबसा आत शिरलो आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.  


गडाचा मुख्य दरवाजा
तिथुन मग पुढे गडावरल्या मुख्य गुहेत सगळेजण जमलो आणि जे काही पब्लिक खादाडीवर तुटुन पडले की विचारायला नको. ज्याच्याजवळ जे जे होतं ते सगळं बाहेर आलं आणि पुढला २०-२५ मि. आम्ही फक्त खातच होतो.खादाडी संपल्यावर आम्ही गड फिरायला गेलो पण कसंल काय! पाउस इतका प्रचंड होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. 


दुपारचा लंच :)
 गड फिरुन झाला आणि आम्ही परतीच्या वाटेवर. आता मला धडकी भरली कारण त्या वाटेवरुन उतरताना जराशी जरी चूक झाली तर माझा कडेलोटच होता. मी कसाबसा सावरुन,बसुन उतरु लागलो. मुख्य दरवाजा रोपच्या सहाय्याने उतरुन पहिल्या शिडीपाशी आलो. ती शिडी उतरलो आणि त्या निसरड्या वाटेवरुन सावरत दुसर्‍या शिडीपाशी आलो. ती शिडीसुद्धा उतरलो आणि माझा जीव भांड्यात पडला. गडावरुन खाली उतरताना अक्षरशः ढगातुन उतरत असल्याचा भास होत होता. खाली आलो आणि एक दगडावर निवांत बसलो कारण बाकीचे सुद्धा लँड व्ह्यायचे होते. सगळे उतरत होते. आणि जेव्हा अनुजा त्या शिडीवरुन, धुक्यातुन उतरु लागली तेव्हा खाली असलेल्या पोरांनी एका सुरात गायला सुरु केली. "अप्सरा आली"  हे हे हे ! 

 मग सगळे सुखरुप लँड झाले. मला कधी एकदा खाली पोचतो असं झालं होतं. भराभरा उतरायला सुरु केली आणि ४ च्या दरम्यान आम्ही पुन्हा अमृतेश्वराच्या मंदीरापाशी जिथे गाडी पार्क केली होती तिथे आलो. एक रात्र आणि दुसर्‍या दिवशीही अंघोळ न केल्याने मला फारच अस्वस्थ वाटत होतं. दिवसभर ट्रेकमध्ये पावसाने धुवुन काढलं होतं पण तरीही... मग मी सुझे आणि देव्या प्रवरेच्या काठावर जाउन बसलो. प्रवरेचा तो प्रवाह बघुन मला राहवेना. मी मस्त अंघोळ करायला सुरुवात केली ते बघुन सगळेजण मला ह्सायला लागले. ट्रेकला कुणी अंघोळ करतं का? असं चिडवू लागले. पण जेव्हा अंघोळ केली तेव्हा मला फर फ्रेश वाटायला लागला. सगळा शीण निघुन गेला. मग फोटोसेशन करुन आम्ही बसजवळ आलो. बाहेर पाउस असल्याने बसमध्येच टीपी करु लागलो. इतक्यात साडे सहा-सात च्या दरम्यान अनुजा जेवायला बोलवयला आली. सात वाजता जेवायला? मग गावातच जेवणाची ऑर्डर दिली होती तिथे जेवायला गेलो. व्हेज जेवणाचा बेत मस्त होता जेवण झालं आणि आम्ही परत बसकडे परतलो. पहिल्यांदा सगळ्यांनी मंदीराच्या धर्मशाळेत झोपायचं असं ठरलं होतं पण मग आम्ही ७-८ जणांनी बसमध्येच झोपायचं ठरवलं. तसं पण दिवसभारात सगळ्यांची मैत्री झालीच होती मग टगेगिरी करायला म्हणुन आम्ही बसमध्येच झोपायचं ठरवलं. बाहेर पाउस धो धो पडत होता.......  

रात्रीचा डीनर :)
पण इतक्या लवकर झोप कुणाला येणार होती?.. वॅकची सगळी मुलं एकमेकांची जाम खेचत होते. त्यात एकाला बिचार्‍याला टार्गेट केलं होतं. म्हणजे इतकं की त्याने चुकून हुं जरी केलं तरी त्यावर जोक व्ह्यायचे. आणि त्या गाडीत आम्ही मोठमोठ्यान खिदळत ह्सत होतो.

बाहेरचा पाउस, सोसाट्याचा वारा, पिपळाचं झाड, मंदीराची पुष्करणी, प्रवरेचा खळखळणार्‍या प्रवाहाचा आवाज आणि आजुबाजुचं गुढ जंगलं. आमच्या बसमधल्या सगळ्या गप्पा हॉरर गप्पांकडे न वळत्या तर कमालच होती. हळूहळू गप्पा हॉरर विषयाकडे वळत होत्या आणि अचानक कुणाला तरी दूरवर मंदीराच्या दिशेने एक टॉर्च दिसली. आम्ही सगळे ती टॉर्च निरखू लागलो. आमच्या बसपासुन १५-२० मीटरवर ती टॉर्च पुढेपुढे सरगकत होती. कुणी तरी गावकरी असेल म्हणुन आम्ही दुर्लक्ष्य केलं आणि पुन्हा आमच्या गप्पांकडे वळलो. पाउस कधी जोरात पडायचा तर कधी थांबायचा. कधी सोसाट्याचा वारा यायचा त्यामुळे बाहेरच्या पिंपळाची सळसळ तर अजुनच भयानक वाट होती त्यात त्या पोरांच्या गावाकडल्या भुतांच्या गोष्टी! वातावरण काय हॉरर झाले असेल याची कल्पना करा.
 

गप्पा मारता मारता आम्ही थांबलो कारण ती टॉर्च पुन्हा दिसली. एवढ्या रात्री कोण फिरत असेल? काही कळत नव्हतं.त्यात आता ती टॉर्च कधी सुर व्ह्यायची तर कधी बंद व्ह्यायची. मी  बसमध्ये एका खिडकीपाशी बसलो होतो. देव्या माझ्यापुढच्या सीटवर बसला होता. आता आम्ही गप्पा बंद केल्या आणि त्या टॉर्चच्या हालचालींकडे लक्ष्य देउ लागलो. एखादा गावकरी किंवा धर्मशाळेत झोपायला गेलेल्यांपैकी कुणीतरी आम्ही काय करतोय हे बघायला तर आला नसेल अशी शंका आली. पण मग तो इतक्या लांब काय करतो? आणि टॉर्च सारखी चालु-बंद का करतो हेच कळत नव्हते.सगळेजण श्वास रोखुन त्या टॉर्चकडे बघत होतो. टॉर्च बंद झाला आणि अचानक त्या टॉर्चचा झोत सरळ देव्याच्या खिडकीवर पडला आणि आमची तंतरली. देव्या झटकन खाली वाकला आणि सगळेजण परत आपापल्या जागेवर जाउन बसले. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं पण आमच्यातला कुणीही खाली जायची हिम्मत करत नव्हता. शेवटी आम्ही गप्प झोपायचं ठरवलं. काय असेल कुणास ठाउक? काही वेळाने टॉर्च बन्द झाली आणि आम्ही गप्प बसलो. ५-१० मीनिटांनी कुणाला तरी ती टॉर्च गाडीच्या समोर दिसली. कुणीतरी समोरुन गाडीवर टॉर्चचा प्रकाश फेकला होता. कोण आहे ते दिसत नव्हतं आम्ही सगळे चिडीचूप! फक्त बघत होतो की आता काय होईल. मी शास रोखुन धरले होते. अचानक ती टॉर्च आमच्या  दिशेने  येवू लागली आणि मी घाबरलो. सगळेजण गप्प राहिले. टॉर्च वेगात गाडीच्यासमोरुन आली आणि आमच्याबाजुने खिडकीवर प्रकाश टाकत झर्रकन निघुन पण गेली आम्ही मागेवळून पाहिलं तर ती बंद पण झाली आणि कुठे गायब झाली काय कळलं नाही.. इतकावेळा संथ चालणारी ती टॉर्च आता क्षणात आमच्या गाडीच्या बाजुने कशी काय गेली ते अजुनही कळलं नाही. तो कुणी गावकरी होता की आमच्याच ग्रुपमधला अजुन कुणी हे अजुनही समजलं नाही.. पण जे काही घडलं ते प्रचंड होतं....

बसमधली हॉरर टीम :)
बाहेर सोसाट्याच्या वार्‍याबरोबर पाउस कोसळू लागला आणि आम्ही सगळे झोपी गेलो. रात्री मध्येच ऊठलो तेव्हा आमच्या गाडीचा ड्रायवर मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याला रात्री उंदीर चावला म्हणुन तो ओरडत होता. पहाटे सुझेने उठवलं. मग मी,सुझे आणि देव्या "वाघ मारायला" निघुन गेलो. सगळ आटोपल्यावर परतिच्या प्रवासाला लागलो. वाटे भंडारधर्‍याच्या स्पिलगेटवर गाडी थांबवली तेव्हा समोरचं द्दृश्य अप्रतिम होतं. भंडारधर्‍याच्या जलाशयातुन सगळं पाणी बाहेर रस्त्यावरुन वाहत होतं. पाण्याचा प्रवाह ही जबरी होता. तिथे फोटोसेशन झाल्यावर मग रंधा फॉलच्या दिशेने गेलो. रंधा फॉल झाला आणि मग माळशेजमार्गे मुंबईच्या वाटेला लागलो.

ग्रुप फोटु
ट्रेक भारी झाला होता. पण पावसात गडावर धड काही बघायलाच नाही मिळालं. त्यामुळे पुन्हा हिवाळ्यात हा ट्रेक करायचं असं मी, देव्या आणि सुझेने ठरवून टाकलं. प्रत्येक ट्रेक आणि निसर्ग नेहमीच आपल्याला नविन काही तरी शिकवत असतो. या ट्रेक ने अजुन काही नवीन भटके मित्र दिले. आणि हो ती न विसरता येणारी टॉर्च भूताची रात्रे ही....

- दीप्स
  

18 comments:

  1. बरीच उशिराने आली पोस्ट पणन एकदम जबर मस्त मज्जा आली वाचून ट्रेक सरररकन डोळ्यासमोरून गेला.

    आणी हो "अप्सरा आली" लैच.......... ;-)

    ReplyDelete
  2. सही...


    प्रत्येक ट्रेक असा काही स्पेशल असायलाच हवा ना.. :)

    मला माझा रतनगड आठवला.. :)

    पूर्ण रात्र जागून काढलेली..

    नेढ्यावर अन त्याच्या आजूबाजूला इतके सुपर्ब असते ना... दोन्ही बाजूनी ढग अन मध्ये आपण उभे.. जवळ जवळ तरंगणारे ...

    मस्त आहे पोस्ट.. ट्रेक स्पेशल..

    ReplyDelete
  3. ट्रेकला कुणी अंघोळ करतं का?
    अगदी खरं.
    भुयार आणि नेढं नाही पाहिलं का रे? रतनगडाची गुहा ही माझी सर्वात जास्त आवडती मुक्कामाची जागा होती, अगदी परवा साल्हेरची गुहा पाहीपर्यंत. काय मस्त व्ह्यू आहे तिथून. मस्त मोठी गुहा, समोर सह्याद्री आणि त्याच्या कुशीत प्रवरेचं पाणी, दूरवर भंडारदरा धरण. अहाहाह... अतीव सुंदर.

    बाकी भूतांचे अनुभव तर प्रत्येक ट्रेकला एकदा तरी येतच असतात.

    ReplyDelete
  4. Deepya...Mast zali aahe post :)

    ReplyDelete
  5. फारच छान. एखाद्या शिकारकथे प्रमाणे जिवंत लिखाण झाले आहे.
    http://manavishwa.blogspot.com

    ReplyDelete
  6. एक नंबर मित्रा... खूप दिवसांनी शिडीचा व त्या रात्रीचा अनुभव पुन्हा एकदा अनुभवला.... धम्माल...!!!

    --
    पराग.

    ReplyDelete
  7. जबरी.. आम्हाला जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा चकवा लागला होता (चकवा हा शब्द माहित असायच्याही पूर्वी) तेव्हा आम्हाला अशीच काहीतरी भुताटकी झालीये असं वाटलं होतं :)))

    ReplyDelete

  8. हां अनुजा ! अगं कधीची लिहायचं लिहायचं म्हणुन राहुन गेली होती. लिहीली एकदाची..
    भारी झाला होता ना ट्रेक..
    धन्स :)

    ReplyDelete
  9. हे हे हे Bee! सहीच गं !
    हो तुझा तो ढगातला व्हीडीयो पाहिला ! जबरीच!

    ReplyDelete
  10. धन्स पंक्या..
    अरे पावसात उपयोग नाही रे ! रतनगडसारखं रत्न ऐन हिवाळ्यातच उठ्य्य्न दिसेल नाही?

    ReplyDelete
  11. धन्यवाद यवगेशसाई :)

    ReplyDelete
  12. हाभार्स गौरी :)

    ReplyDelete
  13. प्रतिक्रियेकरता अनेक धन्यवाद नितिन.. :)

    ReplyDelete
  14. धन्यवाद पराग दादा!
    अरे कसली मज्जा आली होती त्या ट्रेकला..
    पुन्हा असाच एक ट्रेक करायचाय वॅकसोबत :)

    ReplyDelete
  15. हहहाअ: हेरंबा! त त त प प प पेब ना?
    भारी होता तुमचा तो ट्रेक ....

    ReplyDelete
  16. ट्रेकचे वर्णन आणि फोटू नेहमीप्रमाणेच भारी रे...

    आणि भूताचो बंदोबस्त करूचो तर ट्रेकला एक भगत पण बरोबर हवो रे :D

    ReplyDelete
  17. आयुष्यात कधीही ट्रेक नाही.
    मुंबई मधील बेगडी कृत्रिम आयुष्य उपभोगले.
    मात्र हा लेख वाचून निसर्गाच्या सानिध्यात जावयाचे वाटत आहे.

    ReplyDelete