Sunday, July 8, 2012

माझी "शाळा" ... (भाग ६)

आता या भागात माझ्या शाळेचा निरोप घ्यायची वेळ आलीय. खरं तर खूप आठवणी आहेत. तरी ही आठवून आठवून लिहिल्यात. शाळेतला प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी धम्माल असायचा. अरे हो! मागच्या एका भागात लिहीलं होतं की एकदा शिरोडकरला भेटायला जाताना बिचार्‍या समीरचे दात पडले होते. तो किस्सा असा... 

फक्त ती कधी थोडी तरी दिसावी म्हणून मी तिच्या घरासमोरुन सायकलवरुन फिरायचो किंवा नाईकच्या घरी अभ्यासाच्या निमित्ताने जायचो. एकदा रवीवारी संध्याकाळी घरी अभ्यास करत बसलो होतो. कंठाळा आला आणि तिची आठवण येवू लागली म्हणुन सायकल घेतली आणि फिरायला निघालो. जाता जाता वाटेत समीर भेटला. म्हटलं चला याला पण घेउन जाउया. त्याला सायकल दिली आणि मी मागे बसलो. म्हटलं जर ती दिसली तर तिला सोयीस्करपणे बघता  येईल. सायकल मारत मारत तिच्या घरासमोरुन जात होतो. मी लांबूनच तिला ओळखलं. मी सायकल चालवत नसल्याने मस्तपैकी अँगल सेट करुन तिला बघत जाणार होतो. ड्रायवर समीर होता. तिच्या घरासमोर एक शार्प वळणाचा उतार होता. त्या वळणावरुन आम्ही पास झालो. ती मला दिसली. मी तिला पाहत, शायनिंग मारत होतो, उतारावरुन पास झालो आणि काहि तरी गडबड झाली., सायकल अचानक दडबडु लागली. समीर ओरडला, "दिपक्या ब्रेक लागत नाहित.." मला काही समजले नाही समोर रस्त्यावर म्हशी दिसत होत्या. काय झालं किंवा काय होतयं हे कळायच्या आतच सायकल सकट समीर पडला. मी मागे बसल्याने आणि माझे पाय जमिनीपर्यंत पोचत असल्याने मला काहीच झालं  नाही.पण माझ्या समोरचं दृश्य भयानक होतं. समीर सायकल सकट जबरी पडला होता. सायकलमध्ये अक्षरशः अडकून पडला होता आणि ओरडत होता. मी कसाबसा त्याला बाहेर काढला. सायकलचे तीन तेरा वाजले होते. त्याचा हात दुखावला होता आणि जेव्हा मी त्याला ऊठवला आणि जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मी घाबरुन गेलो. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं आणि त्याचे समोरचे दोन्ही दात पडले होते. त्याल तसा बघून मला धडकीच भरली. त्याचा हात दुखावला होता. बर्‍याच ठीकाणी त्याला लागलं होतं. त्याच्या तोंडाची तर वाटच लागली होती. बिचार्‍याचे समोरचे दोन्ही दात पडले होते. मी कसाबसा त्याला परब डॉक्टरच्या दवाखान्यात घेउन गेलो. आता माझी काही धडगत नव्हती. आई, मामा मला काय सोडणार नव्हते. अपघात जर फक्त खरचटणं वैगरे पर्यंत असता तर ठीक होतं पण त्याचा हात ही दुखावला होता आणि समोरचे दोन दातही पडले होते त्यामुळे हे कांड लपून राहणार नव्हते. डॉक्टरकडून निघुन आम्ही घरी आलो. त्याला त्याच्या घरी सोडला आणि मी माझ्या घरी माझ्या खोलीत येवून गुपचूप अभ्यास करत बसलो.. संध्याकाळी ते कांड आईला समजलंच म्हणा. मला घरात खूप ओरडा पडला पण समीर माझा खरा मित्र होता त्याने कुणाला खरं कारण नाही सांगितलं की आम्ही दोघे सायकलवरुन कुठे जात होतो. दुसर्‍या दिवशी आई त्याच्या आईसोबत त्याला वेंगुर्ल्याच्या सरकारी इस्पितळात घेउन गेली. त्याचा हाताल प्लॅस्टर लागले आणि बिचार्‍याचे दात गेलेच.. शाळेत सगळे त्याला हसायचे, एकदा शिरोडकरने त्याला विचारलं की हे सगळं कसं झालं तर तो तिच्यावर डाफरला, " सगळं तुझ्यामुळे झालं. तुला बघायला तो दिपक तडफडत असतो आणि भोगायला मला लागतं. "  :डःडःड माझ्या नादानपणामुळे बिचार्‍याला बराच त्रास झाला.. 

तर अशी सगळी मज्जा मज्जा...
सहल संपली आणि ह्ळुहळू बोर्डाची परीक्षा जवळ येउ लागली. कितीही अभ्यास केला तरी तो कमीच होता. तशातच शालेय स्पर्धा सुरुच होत्या. काय माहीत का, पण ते वय थोडं बंडखोरीचं होतं. ओठांवर मिसरुडं फुटू लागल्याने आपण आता मोठे होतोय ही भावना आणि त्यातच
अभ्यासाच्या प्रेशरमुळे येणारा राग,चिडचिड साहजिकच होती.शालेय स्पर्धांमध्ये मी हिरहिरीने भाग घेत असे पण दहावीला मी खेळाच्या वैगरे स्पर्धेत भाग घेणे सोडुन दिले. नाही म्हणायला निबंध स्पर्धेत नेहमी पहिला नंबर असायचाच.तशातच वक्तृत्व स्पर्धेची नोटीस सामंत मॅडमनी लावली. यावेळी भाग न घ्यायचा ठरवून मी माझं नाव नोंदवलं नाही.
तसंही काय फायदा होता? काही झालं तरी पहिला प्रशांतचाच नंबर येणार होता, मग मी स्पर्धेत कशाला भाग घेउ?
फक्त तो माझ्यापेक्षा सरस आहे हे सिद्ध करायला का?
मी चिडलो होतो. तसंही वर्गात माझ्याशिवाय आणि प्रशांतशिवाय दुसरं कुणी भाग घेत नसे.सलग दोन वर्षे माझं भाषण चांगलं होउन ही मला कधीच बक्षिस मिळालं नव्हतं. म्हणून यावर्षी भाग घ्यायचाच नाही असं मी मनाशी ठरवलं होतं.
सामंत मॅडमनी मला भाग न घेण्याचं कारण विचाअरलं तर मी सांगितलं की, मला जमणार नाही.अभ्यास करायचाय आणि स्पर्धेत भाग घ्यायची माझी इच्छाही नाही.पण मॅडम
कणार नव्हत्याच,त्यांनी माझं नाव टाकलंच.पण मी ही हट्टाला पेटलोच होतो. नाही करणार म्ह्णजे नाही.

स्पर्धेचा दिवस आला आणि इतर स्पर्धकांबरोबर माझं ही नाव पुकारलं गेलं.मी उठलो आणि त्या विषयावर जे माहित होतं ते बोललो. ते केवळ Extempore होतं. कसली ही तयारी केली नव्हती.मी त्या विषयावर जे
माहित होतं ते आठवून आठवून बोलत होतो आणि त्याला काहीच अर्थ नव्हता.स्पर्धेचा निकालः अ‍ॅज युज्वल प्रशांतचा नंबर पहिल्य तिघांत आला.स्पर्धा संपल्यावर मुख्याध्यापकांनी सगळ्या स्पर्धकांचं कौतुक केलं पण माझं नाव घेउन बोलले की," कोणती ही स्पर्धा ही स्पर्धा असते.त्याचा आदर करणं ही त्या स्पर्धाची जबाबदारी असते.परुळेकरसारख्या विद्यार्थ्याकडुन मी अशी अपेक्षा केली नव्हती."
मला ते खूप लागलं. सगळे शिक्षक आणि विद्यार्थी माझ्याअकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मी खूप नर्व्हस झालो होतो. माझी चूक मला समजली पण तोवर खूप उशीर झाला होता. 


या अशा सगळ्या मिश्रित भावनांच्या गुंतागुंतीचं ते वय होतं.अभ्यासाव्यतिरिक्त मी
काय करतोय हे कधी कधी माझं मलाच कळत नसे.पण या सगळ्यात महत्त्वाचा होता तो अभ्यास.काही करुन चांगले मार्क्स मिळवायचे होतेच.परीक्षा जवळ येत होती आणि अभ्यासाचा प्रेशर वाढत होता.अभ्यास करायला आम्ही सगळे वेगवेगळे बसायचो.तरीही दिवसातले एक - दोन तास मी बाकिच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचो.एका वाक्यातली उत्तरे, दोन-तीन मार्कांची उदाहरणे वैगरे वैगरे..मी वर्गात त्यांचे पाठांतर वैगरे घ्यायचो.एकदा मी, प्रशांत, शांताराम आणि अमोल असे प्रयोगशाळेला लागुन असलेल्या छोट्या बागेत अभ्यास करत बसलो होतो.शाळा सुटायची वेळ झाली होती आणि तेवढ्यात बाबाजी गावडे धावत आमच्या इथे आला.
"दिपक्या! मेल्या, कोळसुलकरानं तुजी वाट लावल्यानं! " आणि जोराजोरात हसू लागला.
मला कळलं नाही. " काय झाला रे? काय केल्यान कोळसुलकराने?" मी घाबरत घाबरत विचारलं.
"अरे मेल्या, काय सांगा!" तो हसणं आवरतच नव्हता. आता या बुटक्याला उचलुन आपटावे असं वाटु लागलं.
हसणं आवरुन तो बोलु लागला, " अरे
सातार्डेकर म्यॅडम वर्गावर होत्या आणि नववीच्या वर्गातली मुलं बाहेर व्हरांड्यात गोंधळ घालत होती.त्यात शिरोडकरनीचो आवाज खूप होतो.मग म्यॅडमनी तिला वर्गात बोलावलं आणि ओरडू लागल्या की शिरोडकर काय गडबड सुरु आहे?का एवढा आवाज करतेय? वैगरे वैगरे... "
"मगे? फुढे काय झाला?" माझी उत्कंठा शिगेला.
"अरे,म्यॅडम तिला हे विचारित असतानाच कोळसुलकर आराडलो,"म्यॅडम, ती तशी ऐकणार नाही.खूपच मस्ती करते आजकाल. तुम्हाला ऐकणार नाही ती, परुळेकरला नाव सांगा तिचं! हा हा हा हा!"
बाबजी बरोबर आम्ही सगळे हसायला लागलो. अर्थात माझं हसणं जर वेगळंच होतं. एक हळूवार कळ ह्रद्यातून जात होती. ते वय असंच असतं ना? आपल्याला कूणेतरी आवडतयं,कुणावर तरी आपलं प्रेम आहे हे आपल्याला आपले आजुबजुचे मित्रच जास्त जाणवून देतात. माझ्या नशिबाने मला पहिल्यापासुनच असे मित्र लाभले की मी बिंधास्त त्यांच्याबरोबर सगळं शेअर करतो अगदी आजही.अर्थात आता परिस्थिती थोडे वेगळी आहे पण चलता हैं...
"मग काय झाला रे?" मी बाबाजीला विचारलं.
"मगे काय नाय रे! सगळेजण हसायला लागले. शिरोडकर लाजुन पळून गेली आणि
म्यॅडमनी कोळसुलकराक दोन धपाटे घातले." बाबाजी जे काही सांगत होता ते सगळं मी डोळ्यासंमोर आणत होतो. कशी दिसली असेल ना ती ? कशी लाजुन पळून गेली असेल.... 
_______________________________________________________________


शेवटी बोर्डाच्या परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली. आणि तशातच तो दिवस जवळ येवू लागला जो मला कधीही नको हवा होता. "निरोप समारंभ किंवा सेंड ऑफ्फ." या दिवशी शाळेचा आणि आमचा संबंध कायमचा संपणार होता. शाळेचे ते वर्ग, त्या भिंती, बेंचेस, पटांगण, सर्व.. सर्व काही आम्हाला दुरावणार होते. आयुष्यात पुढे काय वाढुन ठेवलयं याचा विचार तेहा डोक्यात नव्हताच. फक्त शाळेपासुन दूर होण्याची कल्पानाही सहन होत नव्हती. शेवटी आमचा निरोप समारंभ पार पडला. सगळेचजण अपसेट होते. काही मुली रडत होत्या.शिक्षकांच्या भाषणाने आम्ही भारावून गेलो होतो. तीन वर्ष आम्हाल अगदी स्वःताच्या मुलांप्रमाणे त्यांनी आम्हाला जपलं होतं. खरं तर आमच्यापेक्षा या दिवशी शिक्षकांनाच खूप वाईट वाटायचं कारण दरवर्षी त्यांना या दिवसाला सामोरे जावे लागयाचे. आणि प्रत्येक बॅचमधल्या मुलांवर त्यांचा तसाच जीव होता. मी ही यावेळी भाषण केलं. खूप भारावून गेलो होतो. शब्द धड बाहेरही पडत नव्हते. पण हळूच डोळ्यांतुन पाणी मात्र झिरपू लागले. एक प्रसंग आठवला. दहावीच्या सुरुवातिला मुख्याध्यापकांनी "पालक - सभेसाठी" प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या एका तरी पालकांना आणायचे असे सांगितले होते. माझे वडील मुंबईला असायचे आणि आई अशिक्षित! माझी ही शंका मी त्यांना बोलावून दाखवली.
"परुळेकर आम्ही पाचजण ( शिक्षक )  तुझे पालक आहोत, त्यामुळे तुझ्या आई किंवा बाबांना बोलवायची गरज नाही!" त्यांच्या त्या उद्गारांनी मी त्यावेळी खूप भारावलो होतो.निरोप समारंभ संपत आला होता आणि आम्ही शाळेला कायमचे पोरके झालो होतो. त्यानंतर आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी म्हणुन उरलो होतो. परीक्षा सुरु होईपर्यंत आम्ही नेहमी शाळेला जायचो, अभ्यास करायचो, सराव परिक्षा व्हायच्या पण का कुणास ठाउक उगाच एक परकेपणा जाणवायचा. निरोप समारंभ जरी झाला तरी शाळेने आम्हाला कधी पोरकं केलं नाही कदाचित आमच्या मनातच तो पोरकेपण दाटुन आला. 
________________________________________________________________

स्वारी मित्रांनो! काल पासुन गुगल्याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित? ब्लॉगवर धड पोस्टच होत नाहीय. आता हा भाग शेवटचा होता पण यापेक्षा जास्त पोस्ट होत नाहीय. त्यामुळे पुढचा आणि अंतिम भाग लवकरच टाकतो..

- दीप्स

6 comments:

  1. chhan.....mastach..pudhacha bhag lavkar tak....

    ReplyDelete
  2. :) एकदम छान. भावूक वगैरे. :)

    ReplyDelete
  3. अंतिम भाग? गुगल्या रीडरने तर तो भाग मला दाखवला... असो, दीपक मित्रा अप्रतिम, तुझी शाळा फार आवडली.. विशेषतः शेवटाचे 'माझी शाळा... आपली शाळा' वाचून तर गदगदून आल्यासारखे वाटले

    ReplyDelete
  4. धनयवाद अमोल..
    अरे काही प्रॉब्लेम झाला होता पण आत शेवटचा भाग टाकला.
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद.. :)

    ReplyDelete