Saturday, May 19, 2012

माझी "शाळा" ...( भाग - ४ )

दहावी.. 
एस.एस.सी.,मेरीट, बोर्ड, परिक्षा, सराव, प्रश्नसंच, व्याकरण, सिद्धता, प्रमेये, समीकरणे, रासायनिक सूत्रे, पाठांतर आणि काय काय.. दहावीच्या वर्षाचा एक ही दिवस असा गेला नाही की या शब्दांशिवाय माझ्या कानावर दुसरं काही पडलं असेल.. माझ्या अभ्यासाच्या खोलीत पुस्तके, वह्या, अपेक्षित प्रश्नसंच, व्यवसाय यांचा अक्षरशः खच पडला होता. घरी येणारा जाणारा, पाहुणे, नातेवाईक जो तो भेटेल तो मला दहावीच्या वर्षाची आठवण करुन देत होता. खेळ, टवाळक्या, उनाडक्या आता टोटल बन्द. फक्त अभ्यास एके अभ्यास. पण माझं काही तरी वेगळंच सुरु होतं. असं नव्हतं की मी अभ्यास करत नव्हतो पण जरा मोकळा वेळ मिळाला की मी पाय मो़कळे करायला सायकल घेउन तिच्या घराच्यासमोरुन फेर्‍या मारायचो.. ती नव्हती तरीही...

शाळा सुरु झाली. आम्ही सगळ्यांनी दहावीच्या वर्गात प्रवेश केला. नववीचा वर्ग आमच्या वर्गाच्या मागेच होता. पावसाळ्याचे दिवस. तुफान पाउस कोसळत होता. दिवस रात्र पाउस कोसळायचा. मग त्या पावसात शाळेत जाता येता कधी ती दिसायची. एका हाताने छत्री सांभाळत, दुसर्‍या हाताने दफ्तरं सांभाळत. घरी आलो की त्या पावसाच्या सरीत भिजणारी ती आठवायची. मी माझ्या खोलीच्या खिडकीतुन तो तासनतास तो पाउस न्याहळत बसायचो. कारण फक्त "ती" नसायची पण पाउस मला नेहमीच वेड लावायचा. भिरभिरणारा पाउस, त्याच्यासोबत भरकटलेला वारा, दुथडी भरुन वाहणारी नदी, दूरवरुन ऐकू येणारा समुद्राचा गाज.. हे सारं काही मला वेड लावायचं.मी पावसात चिंब भिजायचो अगदी मन भरेपर्यंत...

दहावीच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांनी वर्गात येवून शुभेच्छा दिल्या. अभ्यास, आणि परीक्षेचं महत्त्व पटवून दिलं. दहावीला आम्हाला वर्गशिक्षिका म्हणून वेटे मॅडम होत्या. आता आमची खरी परीक्षा सुरु झाली होती. आमची शाळेची नवीन वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी होती. म्ह्णजे सकाळी ७ वाजता शाळेतच एक्स्ट्रा क्लासेस, मग नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता इतर मुलांबरोबर शाळा भरायची. संध्याकाळी इतर वर्ग सुटले की आम्ही ८वी, ९ वीच्या वर्गात जाउन अभ्यासाला बसायचो. मी, अमोल, कोळसुलकर, आबा, प्रशांत असे नववीच्या वर्गात बसायचो आणि मी शक्यतो तिच्या बेंचवरच बसायचो:) शाळेत नेहमी दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक जे खूप हुशार असतात, ज्यांना आभ्यासाखेरीज अजुन काही ही प्रिय नसतं. आणि एक जे अतिशय ढ असतात आणि त्यांना अभ्यास सोडुन सगळं काही प्रिय असतं. आमच्या शाळेत या दुसर्‍या प्रकारातल्या विद्यार्थ्यांकडुन अशी तयारी करुन घेतली जायची के ते निदान ३५ मार्कांच विचार करुन लागायचे. आणि पहिल्या प्रकारात मोडणारा आमच्या वर्गात फक्त प्रशान्त होता आणि कदाचित संतोषी. माझं काय सुरु होतं हे मलाच कळत नव्हतं. एकदा बीजगणिताच्या ट्युटोरिअलच्या वेळी २ मार्काचं उदाहरण अख्ख्या वर्गात फक्त माझंच चुकलं होतं. त्यामुळे ना मी प्रशांतच्या कॅटॅगरीत मोडत होतो ना ही अगदी ढ विद्यार्थ्यांच्या आणि म्हणुनच माझ्यासाठी हे सगळं मेंटली कठीण जाणार होतं. त्यात वर्गात मी काय काय करतो, मस्ती करतो, की अजुन काय टवाळक्याअ करतो याचा डायरेक्ट रिपोर्ट मामाला मिळत असे कारण एनीवे तो शाळेतच नोकरीला होता. त्यामुळे मग संध्याकाळी त्याचा लेक्चर, आईचा लेक्चर ऐकावा लागे. मग मी पुन्हा अभ्यासाकडे लक्ष्य केंद्रित केलं आणि गाडी रुळावर आली.

दिवस भराभर जात होते. दिवसेंदिवस आमचा अभ्यास सुरुच होता. सगळे शिक्षक आमच्या साठी अक्षरश्: दिवस रात्र मेहनत घेत होते. काही विद्यार्थी जे अगदीच कमजोर होते अशा एक दोन विद्यार्थ्याना मला, प्रशान्त, संतोषी, अमोल यांना दत्तक दिले गेले होते. म्हणजे शाळा सुटल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी शाळेत येवून आमच्या अभ्यासाबरोबर आम्ही त्यांचाही अभ्यास घेत असू. निदान ३५ मार्कस पुरती तरी त्यांची तयारी व्हावी. पावसाळा संपत आला होता. आता वातावरण थंड झाले होते. सकाळी सकाळी उठुन शाळेत जाताना बोचर्‍या थंडीने कुडकुडायला व्ह्यायचं. एकदा असाच शनीवारच्या दिवशी मी चालत जात होतो. पहाटे खूप धुकं पडलं होतं. तिच्या घरासमोर एक छोटसं उतार वळणं होतं. मी त्या वळणावरुन पुढे गेलो समोर काहीच दिसत नव्हतं इतकं धुकं पसरलं होतं. इतक्यात कुणीतरी मागुन ओरडलं.
"ताई, मी येते गं !"
मी मागे वळून पाहिलं, धुक्यातुन अस्पष्ट ती दिसली. माझ्या मागुन चालत येत होती. मी पुन्हा मागे वळून न पाहता चालू लागलो. काही वेळात आमच्या खाजणादेवी शाळेच्या आधी एक चढाव आहे तिथे पोचलो. तोवर तिने मला गाठलं होतं. आता रस्त्याच्या एका कडेला ती आणि एका कडेला मी असे समांतर चालत होतो. कधी त्या धुक्याला छेदुन, चोरुन एकमेकांना बघायचा प्रयत्न करत होतो.
" किती वाजले?" रस्त्याच्या दुसर्‍या कडेने तिचा आवाज धुक्यातुन पसरत माझ्या कानवर पडला.
"अम्म्म, हां!!  ६:१० झालेत" मी घडाळ्याकडे चाचपडत बघुन बोललो.
" खूप थंडी आहे ना!" ती पुन्हा काही तरी बोलली..
" हो! खूपच थंडी आहे.!" मी.
शाळा येईपर्यंत आम्ही दोघेच त्या रस्त्यावर चालत होतो आणि कुणीही नव्ह्तं. शाळेच्या गेटवरुन आपापल्या वर्गात जाताना ती छानशी हसली आणि माझ्याही चेहर्‍यावर आपोआप हसु आलं.

हे  असे छोटे - छोटे प्रसंग आमच्यात घडले किंवा तिच्याशी कोणत्याही कारणाने मला बोलायचा योग मिळाला की मी अगदी हवेत असायचो. अगदीच ती समोर आली तर मग तिच्या त्या ब्राउन डोळ्यांत मी स्वःताला झोकुन द्यायचो. किंबहुना तिला नेहमी बघता यावं, तिच्याशी थोडं तरी बोलता यावं म्हणुन मी फक्त चान्स शोधत असायचो. असाच एक दिवस आला. सप्टे. - ऑक्टो. महिन्याचा शेवटचा दिवस होता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्यादिवशीही आमची शाळा अर्ध्या दिवसाने सुटली. शाळेतुन आईने राशनवरुन
रॉकेल आणायला सांगितले होते. तर मी शाळेच्या बाजुलाच असलेल्या श्री. गावडे यांच्या दुकानावर रॉकेल आणायला गेलो. दुपारची वेळ होती आणि दुकानावर थोडी फार गर्दी ही होती. त्या गर्दीत ती सुद्धा होती. आणि ती सुद्धा रॉकेलच घ्यायला आली होती. 

"तुका घाई नाय मा परुळेकरा?" गावडे यांच्या दुकानातल्या त्यांच्या मुलाने मला विचारले.
"नाय नाय.. ठीक आसा. द्या सावकाश!" मी रेशनकार्ड त्यांच्याकडे देत बोललो.
"घाई नाय कशी?? दहावीचा वर्ष आसा ना? ए, त्याका लवकर दे रे, पोरांचो वेळ फुकट घालवु नका." दुकानाचे मालक श्री. गावडे उद्गारले. ( आमच्या दहावीच्या अभ्यासाची आणि आमची काळजी गावातल्या प्रत्येक व्यक्तिस होती.)
तर
"ती" बया तिथेच होती आणि घाई करत होती. मी शांतपणे एका बाजुला खुर्चीवर बसलो होतो. चोरुन चोरुन तिला बघत होतो. कधी नजर भिडली की मग बिंगो !!!!! हहहाहः 

हळूहळू गर्दी कमी झाली. तिने रॉकेल घेतले आणि ती दुकानातुन बाहेर पडली. मी सुद्धा ५-६ मिनिटात रॉकेल घेतलं आणि माझ्या सायकलवरुन निघालो. दुपारचे अडीच - तीन वाजले असतिल. मला माहीत होतं की आता जातान ही पुन्हा मला दिसणार.
रॉकेलचं कॅन पिशवीत टाकलं, सायकलला अडकवलं आणि सायकल मारत रस्त्यावर आलो. समोर ब्रीजवर मला "ती" एका हातात रॉकेलचं कॅन घेउन चालताना दिसली. तिच्यासोबत अजुन एक गावातली कुणी तरी बाई होती. मी सायकल मारत मारत ब्रीजवर पोचतो ना पोचतो तोच मला त्या बाईने थांबवले. हां! त्या बाईला मी ओळखत होतो.
" दिपू, वायचं माझा याक काम करशील रे बाबू?" त्या बाईने मला विचारले. 

आता ती बाई तिच्या हातातली सामानाची पिशवी तिच्या घरी पोचवायला सांगणार यापलिकडे अजुन काय काम असेल असं समजुन मी बोललो,
" हां, मावशी काय करु?" तोवर "ती" तिथेच होती.
माझ्या विचारण्यावर त्या मावशीने जे मला सांगितले त्यावर माझा त्यावेळी कानावर विश्वासच बसला नव्हता.. मी सैरभर झालो. काय करु आणि काय नको असं झालं होत...
"अरे, वायच या पोरीला तुझ्या सायकलवरुन घराकडे सोडशील? दुपारचा उन लय आसा, आणि पोरगी चालत इतक्या लांब घासलेट्चा कॅन आणि दफ्तर घेउन कशी जाईल? जरा घेउन जा तिला.."
मी तिच्याकडे पाहिलं. ती गाल्यातल्या - गालात हासत होती.
मैं कौन हूँ? मैं कहाँ हूँ?? बस्स्स मी खूशीने बेशुद्ध व्हायचा बाकी होतो..
"घेउन जाशील ना रे?" त्या मावशीने विचारलं...
"अं?? हो ! हो ! जातो घेउन!" मी स्वःताला कसाबसा सावरत बोललो..
मग ती मावशी तिथुन निघुन गेली.
दुपारची वेळ. रस्ता निर्मनुष्य्.....

आज माझं नशीब जोरावरं होतं. वर्गातलं किंवा शाळेतलं कुणीही रस्त्यावर नव्हतं..
ती मावशी गेल्यावर आम्ही रस्त्याचा कडेला आलो. आता अरेंजमेंट करायची होती. तिचं दफ्तर, तिच्या हातातलं रॉकेलचं कॅन, माझं दफ्तर, माझ्याकडलं रॉकेलचं कॅन.. आणि ती..
मी फार विचलित झालो होतो. तिच्याकडे न बघता बोलत होतो.
"कसं अ‍ॅडजस्ट करुया?'' तिच्याकडे बघत मी विचारलं.
"अम्म ! एक काम करुया. तुझं आणि माझं दफ्तर सायकलच्या कॅरीअरवर ठेवुया. मी रॉकेलचं कॅन घेउन पुढे बसते. तुझ्याकडलं रॉकेलचं कॅनसाठी पिशवी आहेच ना..!"
व्वा! पोरीकडे प्लॅन पहिल्यापासुनच तयार होता तर..
"हो! ठीक आहे असंच करुया.!" मला धड बोलायला पण सुचत नव्हतं आणि ती गालातल्या गालात हसत होती.
मी दोघांची दफ्तरं मागे कॅरिअरला लावायचा प्रयत्न करु लागलो. पण माझं एकट्याचं
दफ्तर कॅरिअरला लागत नव्हतं तर तिचं कुठे ठेवणार .. मग मी माझं दफ्तर पाठीला अडकवलं. तिचं दफ्तर सायकलच्या हँडलच्यापुढे जो "हिरो" या ब्रँडचा "एच" आकाराचा जो हुक कसा होता त्याला अडकवलं. ती तिचं रॉकेलचं कॅन हातात धरुन पूढे बसली.. हुश्श्श! झाली बाबा कशी कशी अ‍ॅडजस्ट्मेंट! आता राईड.. 

पहिल्यांदाच मी एका मुलीला सायकलवरुन, ते ही पुढल्या सीटवर; ते ही गावासारख्या ठीकाणी आणि मुलगीही कोण तर जिच्या एका नजरेसाठे मी तडफडायचो.. भगवान देता हैं तो छप्पर फाड के देता हैं....
तिचा सुगंध माझ्या रोमांरोमात भिनत होता., अचानक सुर्य ही कुठे गायब झाला होता.
वातावरण अगदी थंड झाले होते. नदीच्या बाजुने रस्त्यावरुन आम्ही सायकलवरुन जात होतो. वार्‍याने उडणारे तिचे केस माझ्या चेहर्‍यावर रेंगाळत होते.
"सोने की सायकल, चांदी की सीट, आओ चले डार्लिंग, चले डबल सीट..." कोणतं, कसलं गाणं उगाच माझ्या मनात गुणगुणत होतं.
अचानक ती बोलली,"दीपू!! थांबव जर सायकल!"
दीपू!!!!.......

आई ग्गं ! कसली गोड बोलली होती.
"काय झालं गं?"
"अरे हे रॉकेल बघ ना डुबकतयं..सगळं माझ्या ड्रेसवर सांडलयं.हळू चालवं ना जरा सायकल.."
"अं? हं.. ठीक आहे. तू नीट बस."
ती पुन्हा गोड हसली..
इतका वेळ आम्ही दोघे सायकलवरुन जात होतो, पहिल्यांदाच इतका वे़ळ आम्हाला मिळाला होता. कुणीही रस्त्यावर नव्हतं. पण दोघे जास्त काही बोललोच नाही. ती डुबक्या मारणारं रॉकेलचं कॅन सांभाळत बसली होती आणि मी डुबक्या मारणार्‍या माझ्या मनाला सांभाळत..
थोड्यावेळाने आम्ही खाजणादेवीचं मंदीर पार करुन राउळंच्या घरांच्या इथल्या चढावापाशी आलो. दोघेही उतरलो आणि तो चढाव पार करुन लागलो. चढाव पार करुन वर पर्यंत आलो. आता तिचं घर फारस लांब नव्हतं..
मी तिला बोललो, "आता जाउ का मी? तू जाशील ना आता?"
ती हसली," काय रे घाबरलास? घरापर्यंत नाही सोडणार?"
"नाही गं असं काय नाही! उगाच लोकं काही तरी...."
माझ्याकडे बघुन ती मोठ्याने हसली.. "ठीक आहे, ठीक आहे तू जा. मी जाईन आता..आणि थँक्यु सो मच.."
मी हसलो. " चल, तुझ्या घरापर्यंत चालत जाउ. तुझं दफ्तर ठेव सायकलवर.."
"नको रे! तू जा. मी जाईन आता.."
मी सायकलवर बसलो.. जायला निघालो पण तिला सोडुन जावंस वाटत नव्हतं. मी सायकल हळुहळू चालवत होतो आणि प्रत्येकवेळी मागे वळून पाहत होतो. ती ही मला पाहत होती. आणि हसत होती. पुढल्या उतारापाशी पोचलो आणि सायकल थांबवलि. मागे वळून तिच्याकडे बघत राहिलो.
तिने हातानेच इशारा करुन विचारलं." काय झालं? "
मी मानेनेच "काही नाही" बोललो..
ती हळुहळू माझ्या जवळ येत होती आणि माझ्या काळजात धडधड वाढत होती. ती जवळ आली.
"काय रे, का थांबालास?"
" काही नाही गं ! असंच.... "
" मग, जा ना आता! "
मी बाय बोललो आणि उतारावरुन सायकल सोडुन दिली.. नंतर लक्ष्यात आलं की मी सायकल ब्रेक न लावताच उतारावरुन सोडली होती.
माझ्या मनालाच कसले ब्रेक उरले नव्हते तर सायकलची काय बात......
ती संध्याकाळ फक्त तिच्या आठवणीत, तिचे हसरे डोळे, तिचे माझ्या चेहर्‍यावर रेंगाळणारे केस आठवण्यातच गेली.

पहला नशा, पहला खुमार......................................

- दीप्स..

25 comments:

 1. इतकी हिंदी गाणी??मला वाटलं होतं एखादी पावसाची चारोळी येईल...

  लगे रहो दिपू......:)

  ReplyDelete
 2. >> ती डुबक्या मारणारं रॉकेलचं कॅन सांभाळत बसली होती आणि मी डुबक्या मारणार्‍या माझ्या मनाला सांभाळत..

  जबरी क्र १

  >> माझ्या मनालाच कसले ब्रेक उरले नव्हते तर सायकलची काय बात......

  जबरी क्र २

  संपूर्ण पोस्टच जबरी आहे इचिभना... !!

  ReplyDelete
 3. श्रद्धाMay 19, 2012 at 10:08 AM

  वाह!!! शेवटी बाजी मारलीस तर....
  मजा आली वाचून.

  ReplyDelete
 4. >>>ती डुबक्या मारणारं रॉकेलचं कॅन सांभाळत बसली होती आणि मी डुबक्या मारणार्‍या माझ्या मनाला सांभाळत...
  वाह... सहीये... मज्जा आली वाचताना...( आणि "शाळा" मधले "बेहने दो" वाजत होते मनात वाचताना ... :-) )
  आणि गावाचे वर्णन वाचून envious feel झालं. Lucky आहेस रे तू...

  ReplyDelete
 5. Kay lihlaes yaar ! Shalechi athvan zali :)
  MAsttt, chaan lihtos :)
  Mazya blog var mi lihto stories, love story matra nastat, jamla tar vaacha :)
  And yess, kharach ek nirmal anubhav hota :)

  ReplyDelete
 6. हे हे हे अ‍ॅप्स...
  तेव्हा काही केल्या चारोळ्या सुअचायच्या नाहीत गं.. मग चंगोच्या चारोळ्या तिच्या बेन्चवर लिहायचो..
  चारोळ्या फक्त पारिजातकासाठीच फुलल्या... :)

  ReplyDelete
 7. इचिभना ! जबरी कमेंट..
  धन्स भावा..:)

  ReplyDelete
 8. श्रद्धा धन्यवाद गं..
  अजुन पुढे लिहायचं आहे , लवकरच लिहितो.. :)

  ReplyDelete
 9. हे हे हे थँक्स मैथिली..
  खरंच माझा गाव खूप सुंदर आहे गं.. आणि पावसात तर अक्षरशः वेड लावतो..
  जाउया हं सगळॅ एके दिवस, मस्त पिकनिक करुया... :)

  ReplyDelete
 10. धन्यवाद शैलेश.. :)

  अरे शाळेच्या इतक्या आठ्वणीत मी ही बुडुन गेलो रे आणि आता आठवून आठवून लिहितोय...
  तुझा ब्लॉग पाहिला आता वाचायला घेतोय.. :)

  ReplyDelete
 11. मस्त !!! सगळं नजरेसमोर आलं ! अगदी सायकलवर डुचमळत बसलेली जोडगोळी सुद्धा !! :D
  ह्या पावसाळ्यात जाऊया हा तुझ्या गावी ! :) :)

  ReplyDelete
 12. काय गाववाल्या हता मात्र बरा असा तुझा गावात रव्हान मजा केलस तर...
  खरच खूप छान आहे ... मी गाव पहिला आहे म्हणून प्रत्येक सीन माला डोळ्यासमोर येत होता नसता पहिला तरी आला असता ..
  पण खरच तो नदीवरचा ब्रिज वेड लावून जातो....
  खूप छान लिहिलीस story...शाळा पार्ट-२ साठी तुझी स्टोरी घेऊ शकतोस एकदम निरागस.. आणि location मात्र पालीलाच हव ...:)

  ReplyDelete
 13. अनघा नक्की जाउया...
  पावसाळ्यात फिरायला कोकणासारखं ठीकाण नाही.. :)
  जाउया सगळे , मस्त धम्माल करुया.. :)

  ReplyDelete
 14. लईछ कमेंट विभी.. :):):)

  ReplyDelete
 15. धन्स यशवंत..
  अरे तो नदीवरला ब्रीज सहीच आहे ना...
  आणि आपला गाव पण सहीच..
  बरीच वर्षे गेलो नाही रे आता गेलो ना सगळं असं मनात आणि डोळ्यात भरुन येईल..

  ReplyDelete
 16. व्वा व्वा.... लैच भारी :) :)

  ReplyDelete
 17. पहिलं प्रेम....कुणीच विसरत नाहि....

  तूझ्या सुपिक डोक्यातून (सॉरी धुंद मनातून) जन्माला आलेली हि पोस्ट तूझ्यावर आजिबात गेली नाहिये....

  एकदम निरागस....कधी काळी तू सांगितलेला किस्सा आठवला....पहिल्या प्रेमाचा आणि ब्राऊन डोळ्याचा....

  ReplyDelete
 18. चारोळ्या फक्त पारिजातकासाठीच फुलल्या... :)

  हे खरं का रे...?

  ReplyDelete
 19. इचिभना.. ! लईछ !
  त्या काळी सीसीडी असतं तर.. यावरही तू एक काल्पनिक पोस्ट लिहूनच टाक ना भौ !

  ReplyDelete
 20. धन्स सारिका,
  पहिली गोष्ट, ही पोस्ट काल्पनिक नाहीय.. ;)
  दुसरी, जसं तू म्हणतेस की ही निरागस पोस्ट माझ्यावर बिलकुल गेली नाहीय.. तर असेल कदाचित त्यानंतर आतापर्यंत कुणीही इतकं निरागस भेटलंच नाही की मी माझी निरागसता जपून ठेवावी. :)
  आणि हो चारोळ्या फक्त पारिजातकासाठीच फुलल्या होत्या आणि कदाचित फुलत राहतिल.... :):):)

  प्रतिक्रियेकरता धन्यवाद...

  ReplyDelete
 21. इचिभना पंक्या,
  सीसीडीवर काल्पनिक कशाला ? अगदी खरी खरी पोस्ट लिहीन.. इन्फॅक्ट लिहिली पण होती.. But The time is not right to post it or may be that time would never come....;);)

  ReplyDelete
 22. प्रत्येकाच्या मनातील जोश्या आणि शिरोडकर च्या आठवणी ह्या पोस्ट मुळे ताज्या झाल्या

  ReplyDelete
 23. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद निनाद ! :)

  ReplyDelete