Monday, May 7, 2012

माझी "शाळा"...( भाग - ३)


नाईकच्या हातात ते पत्र कसं पडलं याच विचारात मी होतो. मग कळलं की साल्याने ते जेवणाच्या सुट्टीत माझ्या कंपास पेटीतुन ढापलं होतं. मग संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्या पत्राचे धिंडवडे निघाले. पत्रातलं एक एक वाक्य शिरोडकर ज्या मुलींच्या ग्रुपमधुन जात होती तिथे जाउन ते मोठ्या मोठ्याने ऐकवण्यात आलं.. अक्षरशः कहर झाला.. नशीब बाकीच्यांना ते माहीत नव्हतं...

नववीत पुन्हा शालेय स्पर्धा सुरु झाल्या. यावेळी सुद्धा सगळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक ( फुल फेकाफेकी ;)  ) उंच उडी, लांब उडी.. फक्त धावण्याच्या शर्यतित मी भाग घेत नसे.. पण एकाही खेळात मला बक्षिस नाही मिळालं. माझी खूप इच्छा होती की एका तरी खेळात मला तो बक्षिस म्हणून कप देतात ना तो मिळावा, पण मला नेहमी सर्टीफिकेट्स मिळायची. निबंध स्पर्धेत आपला निर्विवाद नंबर होताच.. ;)  

अशाच एका कार्यक्रमाच्या वेळी सातार्डेकर बाईंनी इंग्लिश मधलं एक नाटक करवून घेतलं. वाल्याचा वाल्मिकी काइंड ऑफ.. त्यात मी नारद झालो. प्रशांत वाल्या आणि त्याची बायको व्हायला वर्गातली कोणतीच मुलगी तयार होईना त्यामुळे सातार्डेकर मॅडम सगळ्या मुलींवर जाळ काढू लागल्या. मग सरतेशेवटी कोळसुलकरला वाल्याची बायको बनवली.. रोज संध्याकाळी मॅडम आमच्याकडून प्रॅक्टीस करुन घेत. त्यात आमचं गावच्या पोरांचं इंग्लिश अ‍ॅक्सेंट म्हणजे आम्ही ज्या सुरा- तालात उत्तरे पाठ करायचो त्याच तालात ते संवाद बोलत होतो. कोळसुलकर कढुन संवाद पाठ करुन घेता घेता आमच्या नाकी नउ आले. त्यात तो उंच आणि प्रशान्त कसाबसा त्याच्या खांद्यापर्यंतचा..  (कोकणात नाटकं म्हटली की दशावतार सगळ्यात फेमस.. त्या दशावतारांच्या नाटकात नारदाची भुमिका नेहमी असायची. त्या दशावतारातला तो नारदाची भुमिका करणारा नट एका विशिष्ट लयीत "नारायण, नारायण" म्हणायचा ) तर माझी भुमिका नारदाची असल्याने मी ही जेव्हा नारायण नारायण म्हणायचो ते त्याच सुरात, मग मॅडम वैतागायच्या. पण शेवटी कसे बसे ते संवाद पाठ केले आणि शाळेत मुलांच्या समोर ते नाटक सादर केलं. आम्ही सगळे गणवेशातच होतो. फक्त कोळसुलकरला बायकोचा फील यावा म्हणुन कुठून तरी एक ओढणी अरेंज केली होती.. माझ्या आणि प्रशान्तच्या एंट्रीपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा प्रशांत (वाल्या) त्याच्या बायकोला विचारण्यास जातो तेव्हा हाफ चड्डीतल्या वाल्याच्या बायकोला  बघुन सगळी पोरं सुटली.. कोळसुलकर बायकी आवाज काढु लागला की पोरं अजुनच चेकाळायची.. नाटकाचा बट्ट्याबोळ होणार असं दिसताच आम्ही ते कसंबसं सावरलं..

यावर्षी पण कुठे लांब सहल नाही गेली. गॅदरिंग पण नाही झालं.. सहलीच्या नावाखाली आम्हाला वेंगुर्ल्याच्या फुल-फळ झाडांच्या नर्सरीत घेउन गेले. पण तिथे एक मज्जा झाली. दुपारी डब्बे खाउन झाल्यावर तिथेच सगळेजण बसलो होतो. मध्येच सामंत बाईनी घोषणा केली की जिल्हास्तरीय गायनाच्या स्पर्धेसाठी त्यांना काही स्पर्धक पाठ्वायचे आहेत आणि निवड करण्यासाठी नॉमिनेशन्समध्ये इतर स्पर्धक गायकांमध्ये माझं नाव ऐकुन माझा आवाजच गप्प झाला.. सगळी मुले समोर बसली होती आणि मी, तुळशीदास, वैशाली आणि अजुन एक कुणीतरी असे गायक ठरले होतो.. मला कापरं भरलं होतं कारण गाणं सादर करण्याच्या जागेच्या अगदी समोर शिरोडकर बसली होती.. गाण्याच्या प्रकारामध्ये भावगीत किंवा भक्तीगीत असं होतं. तुळशीदास आला आणि एक फक्कड अभंग गाउन गेला. हां! तो दुसरा वासुदेव होता. मग वासुदेवने ही एक मस्त अभंग सादर केला. वैशालीने समोर बसलेल्या सगळ्या शिक्षकांना उद्देशुन "ब्रम्हा, विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले" गायला सुरुवात केली. सरतेशेवटी माझा नंबर आला. मी कसाबसा पुढे गेलो आणि गप्प बसुन राहिलो. सगळेजण ओरडायला लागले परुळेकर सुरु कर ! पण श्या! धीरच होत नव्हता.. त्यात माझा आवाज म्हणजे काय विचारु नका.. मनात येत होतं सामंत बाईंनी कधी माझा दैवी आवाज ऐकला आणि माझं नाव नॉमिनेशन्समध्ये दिलं..
"मॅडम मला नाही येत ओ गायला, आम्ही खेळायला जाउ?"
" गायला येत नाही? अरे तुझा मामा कसला मस्त गातो आणि तुला येत नाही म्हणजे काय?  ते काही नाही गायचं म्हणजे गायचंच !"
सामंत बाई ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या.
" अहो मॅडम पण माझा आवाज खरचं चांगला नाहीय ! मला नाही येत.!'
मग सर ऊठले आणि बोलले," जोपर्यंत परुळेकर गाणं गात नाही तोपर्यंत कुणीही इथुन हलणार नाही! " 
बस्स्स सगळे पोरं ओरडू लागली.. समोर शिरोडकर बसली होती.  ओह्ह तिचे डोळे खरंच खूप ब्राउन होते...
समोरच्या मुली पण ओरडु लागल्या " गा ना रे, किती भाव खातोय वैगरे.. !" 
मी तिच्याकडे बघितलं ती हळूच हसली.. आणि तिच्या ओठान्ची हालचाल झाली
" गा ना प्लिझ... " 
बस्स ! मी खल्लास...
शेवटी माझा धीर चेपला मी गायला लागलो...
"तू तेव्हा तशी, तू
तेव्हा अशी.. तू बहरांच्या बाहुंची.... " 
आणि तिच्या चेहर्‍यावरची लाली मला स्पष्ट दिसू लागली. कधी तरी कोणत्या तरी पुस्तकात वाचलेल्या "गालावर लाली चढणे" या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ मला जाणवला.. :)
मी गाणं कसं बसं संपवलं.. आणि तिथुन कल्टी... मग दिवसभर कधी मी तर कधी ती नेहमी एकमेकंच्या आजुबाजुला फिरत होतो.... दिवस मस्त गेला होता.. आणि रात्र तिचे ते ब्राउनी डोळे, आणि तिचा तो लाजलेला चेहरा आठवण्यात झुरत गेली....
***********************************************************************
परीक्षेच्यावेळी तिनही वर्गातल्या मुलांचे बसण्याचे क्रमांक मिक्स असायचे. मी नेहमी प्रार्थना करायचो की तिचा नंबर माझ्या आजुबाजुलाच पडावा..पण तिचा नंबर नेहमी माझ्या मागे दोन - तीन बाकं सोडुन असायचा त्यामुळे मी पेपर सुरु असताना नेहमी मागे वळून बघायचो..
शिक्षकांना खात्री असायची की कॉपी वैगरे करणार्‍यातला मी नव्हतो पण त्यांना कळायचं नाही की मी का सारखा मागे वळून पाहतोय ते. असाच एका पेपरच्या वेळी मी मागे वळून तिला बघायचा प्रयत्न करत होतो, आणि कोळसुलकर मोठ्याने ओरडला, "परुळेकर पुढे बघ, मागे काय आहे? मॅडम हा आठवीतल्या मुलांची उत्तरं कॉपी करतोय! " 
सगळे हसायला लागले. सातार्डेकर बाई आल्या, दोन धपाटे घातले..

असेच नववीचं वर्ष संपत होतं आणि मी तिच्या त्या डोळ्यांत हरवत चाललो होतो. म्हणता- म्हणता वार्षिक परिक्षा जवळ आली. आम्ही सगळे अभ्यास करायला शाळेत थांबायचो. शनीवारचा दिवस होता. दुपारी शाळा सुटली. त्यादिवशी माझ्याकडे सायकल नव्हती. मी चालत घरी जायला निघालो. नदीवरलं ब्रीज ओलांडून मी डावीकडे वळणार इतक्यात मागुन शांताराम परब आणि राकेश दोघे त्यांच्या सायकलवरुन आले. परीक्षेच्यावेळी परबचा सीट  क्रमांक माझ्या मागेच पडायचा.  परब आला आणि मला डबल सीट घेउन जातो म्हणुन बोलला, त्याच्यासोबत राकेशही होता. राकेश हा आमच्या वर्गातला एक नंबरचा गबाळा मुलगा होता. हुशार होता पण सायको काइंड होता. त्याचे कपडे नीट नसायचे. कुठे शर्टला शाई लगलेली असायची. नाकातुन नेहमी बारमाही नद्या वाहायच्या आणि त्यासाठी कसल्याही पाटबंधार्‍याची योजना तो करत नसे. खूप आडदांड होता. आठवीत असताना मी त्याला "मी राकस" ( राक्षसचा मालवणी अपभ्रंश ) चिडवले होते तेव्हा त्याने मला मारलं होतं.. त्यामुळे माझा त्याच्यावर राग होता आणि त्याचा ही माझ्यावर.. मी त्याच्याशी बोलत नसे. मी परबला बोललो की मला नाही यायचं मी चालत जाईन. तो मला खूप रिक्वेस्ट करु लागला, पण मी गेलो नाही. घरी जायला रस्त्यातुन न जाता मी मळ्यात उतरलो आणि चालु लागलो. चालत चालत खाजणादेवीच्या मंदीराच्या मागल्या बाजुला रस्त्याला लागलो. रस्ता क्रॉस करणार इतक्यात परत हे दोघे मागुन आले आणि परब मला थांब ! थांब म्हणून ओरडू लागला.. मला कळेना की काय चाललयं ते... परब ने मला थांबवलं. तो आणि राकेश दोघेही उतरले. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर कुणीही नव्हतं..
परब आला आणि बोलला, " दीपक , माझा एक काम आसा तुझ्याकडे !"
" कसला काम?" मी विचारलं..
तो घाबरत कचरत बोलत होता.. " बघ कोणाक सांगा नको, पन माका मदत कर !"
" काय ता सांग.!"
पण तो काही बोलतच नव्हता. इतक्यात राकेश माझ्यासमोर आला आणि त्याने मझी कॉलर धरली.. आणि त्याच्या राक्षसी आवाजात बोलला,
" ए दिपाड्या! या वार्षिक परीक्षेत तू शांतारामाक उत्तरा दाखवक होयी. नायतर !"
मी घाबरलो पण तरीही धीराने बोललो, " नायतर ? नायतर काय करशील?"
तो भडकला. आजुबाजुला काही तरी शोधु लागला, परब त्याला थांबवायचा प्रयत्न करु लागला.. त्याने रस्त्याच्या बाजुला पडलेली एक काठी उचलली आणि धावत माझ्या अंगावर आला.
" नायतर? काय करतलयं ता तुका बघुचा आसा? मार- मार मारतलयं तुका! गेल्यावर्षीचा आठावता मा तुका ?"
मी घाबरलो. मला घाम फुटला. परब त्याला आडवत होता आणि मला रिक्वेस्ट करत होता. जाता जाता मी परब ला बोललो, जर सरळ रिक्वेस्ट केली असती तर तुला परीक्षेत मदत केली असती पण आता नाही..
परब रडत मला बोलला की हे कुणाला सांगु नकोस.. पण आता राकेशचा बदला घ्यायचा मला फुल्ल चान्स होता.. मी तिथुन निघालो आणि सरळ घरी गेलो. घरी गेलो आणि आईला झालेली हकीकत सांगितली.. आई घाबरली आणि ती राकेशच्या घरी गेली..
नंतर मला कलळं की, म्हणजे आईनेच सांगितलं की तिच्यासमोर , राकेशच्या काकानी त्याच्या एक सणसणीत ठेवून दिली.. नंतर मला उगाच खाल्ल्यासारखं वाटु लागलं. उगाच बाउ केला असं वाटु लागलं. आई तिथुन परबाच्या घरी पण जात होती पण मीच तिला थांबवलं.. संध्याकाळी हा प्रकार मामाला कळला तर तो आईला ओरडला.. की उगाच का बाउ केला म्हणून .. पण एकवेळ मला वाटलं की जर परब तिथे नसता तर त्या राकसाने मला खरोखरं मारलं असतं.....परीक्षेच्यावेळी मी परब मदत केली नाहे असं नाही.. पण तो सीन भयंकर होता..
आता हे सगळं आठवतयं आणि लिहिताना इतकं हसायला येतयं की फुल्ल लोळालोळी... :D:D

शिरोडकर आता एक दिड महिना तरी दिसणार नव्हती कारण मे च्या सुट्टीत ती तिच्या गावी जाणार होती.. तरी एक दिवस रस्त्यात भेटली. धड बोलणं नाही झालं. मी सायकलवरुन तिच्या मागोमाग येत होतो आणि अनेकदा ती मागे वळून बघत होती. मी तिच्याजवळ पोचलो आणि सायकल स्लो केली.
तिने विचारलं, "पेपर्स कसे गेले?" 
मी बोललो," मस्त गेले. आणि तुझे?"
 "ठीक होते." ती.. 

बराचश्या आठवणी, मस्ती, मारामारी, गप्पा, खेळ, क्रिकेटच्या मॅचेस संपवून नववीचं वर्ष आता संपलं होतं आणि नववीच्या शेवटच्या पेपरच्या दुसर्‍या दिवसापासुनच दहावीचे क्लास सुरु झाले.. 


- दीप्स..

10 comments:

 1. बादवे त्या गायनस्पर्धेचं काय झालं? चुकुन माकुन सिलेक्शन नाय ना झालो तुजा. माका तं डोल्यासमोर सारका त्येच येवान र्‍हवलय. ;)
  लिही अजुन लिही, मजा येतीय !

  ReplyDelete
 2. मस्त रे .... एकदम दिल सें :) :)

  ReplyDelete
 3. फुल्टू सुटलायस जोश्या ;)

  ReplyDelete
 4. हम्म्म्म :) :) सध्या शिरोडकर कुठे आहे ?! :D

  ReplyDelete
 5. :) भारी रे दीपकभाऊ... येऊ दे अजून लवकर! :)

  ReplyDelete
 6. हा हा हा हा! विशाल्दा नाही रे नाही सिलेक्शन झालं. माझा आवाज म्हंजे दैवी होता माणसांना झेपला नसता.. :):):)

  ReplyDelete
 7. धन्स सुहासा..
  हो दिल से पण त्याच सुमारास रिलीझ झाला होता..
  हह्हाहह :) :)

  ReplyDelete
 8. हाभार्स हेरंबा....
  संपवतो लवकरच..

  ReplyDelete
 9. अनघा,
  माहीत नाही गं कुठे आहे ती..
  जिथे कूठे असेल तिथे सुखी असेल हेहेहेहेह ;)

  ReplyDelete
 10. ओह हो!!!!
  साक्षात बाबामहाराज इटलीकरांची कमेंट !!!
  माझा ब्लॉग धन्य झाला आज.. :)
  खूप खूप हाभार्स विभी.. :)
  लवकरच संपवतो पुढचा भाग..

  ReplyDelete