Sunday, April 29, 2012

माझी "शाळा".... (भाग - १)

त्या दिवशी मिलिंद बोकिलांच्या बेस्ट सेलर्स "शाळा" या पुस्तकावर आधारित "शाळा" हा सिनेमा पाहिला. खरं तर ते पुस्तक वाचण्याचा योग अजुन आला नाही. 
आय क्नो, आय क्नो ! आय डीझर्व अ किक ऑन ..... ! 
बर्‍याच मित्रांनी सांगितलं की पहिल्यांदा पुस्तक वाच कारण पुस्तकात जे आहे त्यातला बहुतांश भाग सिनेमात दाखवला नाहीय. त्यानंतर मी आपल्या सत्यवानाची  ही  पोस्ट वाचली.. 
आय क्नो ! आय डीझर्व वन मोअर किक ऑन......

तर हे सगळं वाचुन पाहुन झाल्यावर सगळ्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे ती शाळा ही आपलीच शाळा आहे... मग सिनेमात पाहिल्याप्रमाणे आणि हेरंबच्या पोस्टच्या आधारे जाणवलं की हो! ही आपलीच शाळा आहे आणि मग ठरवलं की मी ही माझ्या शाळेच्या आठ्वणी इथे मांडाव्या.. 
हो माझीही शाळा अशीच आहे त्यात ती सारी पात्रं आहे आणि मुख्य म्हणजे शिरोडकरही आहे. खरं तर त्या शिरोडकरच्या आणि माझ्या सगळ्या शाळेतल्या मित्रांच्या आठवणीसाठीचा हा प्रपंच. शाळा संपल्यानंतर जो तो आपापल्या मार्गाला लागला.. बस्स त्यांच्या आणि माझ्या या सार्‍या आठवणी...
***********************************************************************
माझा जन्म मुंबईतलाच. पण वडीलांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती म्हणुन जन्मानंतर मी आईबरोबर मामाच्या गावी कोकणात ( अणसुर- पाल, तालुका: वेंगुर्ले, जि. सिन्धुदुर्ग) इथे राहायचो. वयाच्या तिसर्‍या - चवथ्या वर्षी वडील पुन्हा आम्हाला मुंबईला घेउन आले. घाटकोपरला त्यांनी एक छोटीशी खोली भाडेतत्त्वार घेतली होती आणि साडे चार वर्षाचा असताना माझा इयत्ता पहिलीत प्रवेश झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर पश्चिम येथिल " माणीकलाल मेहता" या शाळेत मी दाखल झालो. (अजुनही ही शाळा अस्तित्वात आहे.)
निळी हाफ चड्डी, सफेद शर्ट आणि लाल टाय असा गणवेश होता. (या युनिफॉर्मने माझा कॉलेजपर्यंत पिच्छा पुरवला. ;) म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटमध्ये ही हाच युनिफॉर्म होता , फक्त टाय नव्हती..) शाळा सकाळची असल्याने सकाळी ७ ते दुपारी १ अशी वेळ असायची. बाकीचा वेळ उनाड़या करण्यात जायचा. या शाळेत बरेच मित्र मैत्रिणी होते. मज्जा यायची. दुसरीत गेलो.  एकेदिवशी आई आणि वडील, बहीण आजारी होती म्हणून तिला दवाखान्यात घेउन गेले होते आणि इथे शाळेच्या मधल्या सुट्टीत रस्ता क्रॉस करुन मी समोरच्या दुकानात पेन्सिल आणायला गेलो. पेन्सिल घेउन परत रस्ता क्रॉस करताना एका स्कुटरवाल्याने मला उडवलं.. ही रडारड.... ! ३ महिने एक पाय प्लॅस्टरमध्ये घेउन फिरत होतो. शाळेत जात होतो. खेळत होतो. प्लॅस्टर काढायला जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्या प्लॅस्टरच्या आतुन पेन्सिल, गोट्या, १० - २० पैशांची  एक दोन नाणी आणि अशा बर्‍याच वस्तु बाहेर आल्या.. 

दुसरी नंतर पुन्हा काहितरी झालं आणि मी, आई आणि बहीण आम्ही पुन्हा मामाच्या गावी आलो. इयत्ता तिसरीत मी गावच्या प्राथमिक शाळेत जावू लागलो. तिसरी संपली आणि माझे वडील पुन्हा आम्हाला घेउन मुंबईला आले. चवथीत परत मी माणिकलाल मेहता शाळेत जाउ लागलो. परत पहिली - दुसरीतले  मित्र मैत्रीणी मिळाले.चवथीत असताना.. अरे हो एक सांगायचं विसरलो.. इयत्ता पहिली पासुन माझा शाळेत पहिला क्रमांक असायचा.. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत वैगरे मला पूढे केलं जायचं. चवथीच्या ज्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या त्यांचा माझ्यावर खूप जीव होता, त्यामुळे प्रत्येक स्पर्धेच्यावेळी आणि परीक्षेच्यावेळी त्या माझा नेहमी जीव घेत. माझ्यात त्यावेळी स्टेज डेअरिंग नव्हती. एकदा वक्तृत्व स्पर्धेच्यावेळी ससा आणि कासवाची गोष्ट संस्कृतमधुन त्यांनी माझ्याकडुन तयार करवून घेतली आणि नेहमी प्रार्थनेच्यावेळी ती गोष्ट अ‍ॅज अ प्रॅक्टीस म्हणुन  मला स्टेजवरुन येवुन परफॉर्म करावी लागे. त्यामुळे काही दिवसांतच मी शाळेत प्रसिद्ध झालो. मुलं -मुली माझ्याबद्दल बोलु लागले. जेवणाच्यासुट्टीत डब्बा खाताना अजुन सवंगडी जमु लागले. मग त्या स्पर्धेत मी दुसरा क्रमांक पटकवला. माझं पहिलं बक्षिस! चवथीत असताना माझी शाळा दुपारची असायची, सकाळच्या शाळेत एक छाया नावाची मुलगी होती. सुंदर. गोरी गोरी , तिचे डोळे असे मोठ्ठे मोठ्ठे होते. आणि सशासारखे गोबरे गोबरे गाल! माय फर्स्ट क्रश ! पण तिची शाळा सकाळची आणि माझी दुपारची असल्याने ती दिसायची नाही पण चवथीत होणार्‍या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या क्लासेसच्यावेळी आम्ही एकत्र भेटायचो. तिचे वडील  खाजगी शिकवण्या घेत. रच्याक ती सुद्धा सकाळच्या सत्रातली टॉपर होती. एकदा तिच्या वडीलांनी माझ्या वडीलांना मला क्लासमध्ये पाठवण्यास सांगितले. महिना २० रु देउन मी त्यांच्या क्लासमध्ये जावू लागलो पण तिथे ही ती दिसायची नाही. मग म्हटलं काय पकाव क्लास आहे आणि एकदा शिडीवर मस्ती करताना माझ्या एका मित्राला चुकून धक्का लागला आणि तो पहिल्या मजल्यावरुन गडगडत खाली आला. झाले! माझा क्लास सुटला...

स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी माझे वडील माझ्या मागे हात धुवून लागलेले असायचे. कारण जर ती परीक्षा पास झालो तर पुढचं शिक्षण सरकारी खर्चात होणारं होतं. आणि माझ्या वडीलांची परिस्थिती बेताचीच होती. त्यात माझ्या शाळेचा काही खर्च, बहीण लहान असल्याने तिचा खर्च हे सगळं करताना त्यांची ओढाताण व्हायची. मग कधी कधी सगळं फ्रस्ट्रेशन ते माझ्यावर काढत. मला खूप मारायचे. एकदा मारताना त्यांनी चपातीचा स्टीलचा पलिता घेतला मी तो दोन्ही हातांनी गच्च धरुन ठेवला. रागाच्या भरात त्यानी तो खसकन खेचला आणि माझ्या दोन्ही तळहातांची बोटे सोलून निघाली. मला त्यावेळी खूप मार पडायचा. आई-वडलांच्या भांडणात सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढलं जायचं. एकदा मी वडलांकडे कॅरमसाठी हट्ट धरला होता. पुढच्य दुकानात घेउया असं म्हणताना ३-४ दुकानं गेली तरी काही कॅरम घेतला नाही तेव्हा मी कॅरमची आशा सोडून दिली.. एकदा मला पेन हवं होतं म्हणून मी त्यांना दुकानात घेउन गेलो. दोन रुपयांच्या पेनसाठी ते दुकानदाराशी हुज्जत घालू लागले ते पाहून मी मला पेन नको पेन्सिल चालेल म्हणून सांगितलं.. गरीबीची झळ तेव्हापासुनच माझ्यामनावर बसली होती आणि मग मला कळलं की आपण खूप गरीब आहोत. त्यानंतर काही मागितल्यावर मिळालं तर ठीक नायतर नेहमी  मिळणार्‍या ५० पैशात  मी खुश असायचो..

मी त्यावेळी भयंकर मस्ति करायचो. पण नेहमी कसल्याही मित्रांच्या लफड्यामध्ये माझं नाव यायचं आणि जरी मी काही केलं नसलं तरी मला धपाटे पडायचे. बाकीची मुले मुलींमध्ये जास्त मिक्स अप व्हायची नाहीत. एकदा माझ्या वर्गातल्या मुलीला पाचवीतल्या एका मुलाने काहीतरी वावगं बोलल्याने ती रडू लागली. मग मी माझ्या एका दांडग्या मित्राला सोबत घेउन गेलो. शाळेच्या बाथरुममध्ये त्या पाचवितल्या पोराची त्या मुलीकरवी ओळख परेड झाली आणि मग मी आणि माझ्या त्या दांडग्या मित्राने त्या पोराला अक्षरश: लोळवून लोळवून मारला. तो पोरगा रडत रडत गेला. मी विजयी मुद्रेने वर्गात आलो. पण परत तो पोरगा त्याच्या आईला घेउन आला आणि माझ्या वर्गात येवून माझ्याकडे बोट दाखवत माझी तक्रार केली. मला मस्तपैकी बाईंकडुन मार मिळाला. 

नंतर चवथीचं वर्ष ही संपलं. नेहमीप्रमाणे सगळ्या तुकड्यांमध्ये मी पहिल्या क्रमांकाने पास झालो. माझ्या बाईंनी तेव्हा माझ्यासाठी गोळ्या वाटल्या आणि माझं खूप कौतुक केलं.. पण स्कॉलरशिपमध्ये नापास झालो. भाषा आणि तर्क व अनुमान या विषयांत चान्गले मार्क्स मिळाले पण गणितात सपाटुन मार खाल्ला आणि तेव्हापासुन गणित माझा जन्मोजन्मीचा दुष्मन बनला.. त्यानंतर मे च्या सुट्टीमध्ये आम्ही गावी आलो. तेव्हा माझ्या मामाने वडीलांची समजून घातली आणि मला पुढच्या शिक्षणासाठी गावीच ठेवून घेतलं.  अश्या तर्‍हेने पहिली ते चवथीच्या गाव आणि मुंबई अशा हेलपाट्या संपल्या. नंतर इयत्ता पाचवी ते दहावी सहा वर्षे मी गावीच शिक्षण पुर्ण केलं ...
************************************************************************
पाचवीत मी गावतल्या जिल्हा परिषदेच्या "श्री खाजणादेवी प्राथमिक शाळेत" प्रवेश घेतला. गावच्या मुख्य देवीवरुन हे शाळेला हे नाव दिलं गेलं होतं. शाळा पहिली ते सातवी पर्यंत होती. पाचवी ते सातवी माझा प्रवास तसाच झाला. दरवर्षी पहिला क्रमांक यायचा पण तो वर्थ नव्हता. कारण एक गोडबोले गुरुजी सोडले तर बाकीचे शिक्षक त्यांच्या कामात इतके इंटरेस्टेड नसायचे. शाळेत गावतल्या प्रत्येक वाडीतुन मुले यायची. कदमवाडी, देउळवाडी, वादळवाडी, परबवाडा, खालचीवाडी, गोडावणेवाडी. अश्या बर्‍याच वाड्यांमधून मुले यायची. माझा पाचवीत प्रवेश झाला. माझा मामा म्हणजे गावतली एक प्रतिष्ठीत व्यक्ती. त्यामुळे आपसुकच मी कुठे काय करतोय, कुणाच्या खोड्या काढतोय, अभ्यास करतोय की नाही याचे सगळे रिपोर्ट्स त्याला पोहचायचे. मग तो ही माझी मस्त धुलाई करायचा. पाचवी ते सातवीमध्ये बरेच मित्र जमले. आधीच आमच्या वाडीतली मुले होतीच सोबत त्यात अमोल नाईक, नयन पालकर, वासुदेव पालकर, गुरुनाथ गावडे, शांताराम (आबा) गावडे, बाबाजी गावडे अशी बरीच मित्रमंडळी जमली. दिवसभर शाळेत मस्ती चालायची. अभ्यास फक्त नावालाच व्हायचा. मधल्या सुट्टीत गोट्या, लंगडी, कबड्डी, जमल्यास क्रिकेट असे बरेच खेळ व्हायचे. शाळेत दरवर्षी सरस्वति पूजन व्हायचं. त्यात आम्ही सगळी मुले विविध सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. त्यात बर्‍याचदा मी रेकॉर्ड डान्स, एखादं नाटुकलं करायचो. सहावित असताना गोडबोले गुरुजींनी माझ्याकडुन एकपात्री प्रयोग करुन घेतला होता. मालवणी भाषेत असलेला. " दोन बायलांचो घोव" . त्यावेळी तो खूप फेमस झाला होता.  

त्याकाळात मामा वेंगुर्ल्याच्या नगपालिकेच्या वाचनालयातुन पुस्तके घेउन यायचा मग त्याच्या नकळत मी ती वाचायचो. "ययाति" त्याचवेळी वाचलं होतं आणि त्याच क्षणापासुन शर्मिष्ठेच्या प्रेमात पडलो... त्यानंतर स्वामी, तराळ अंतराळ, अमृतवेल, माझी जन्मठेप अशी बरीच पुस्तकं वाचुन काढली. 

शाळेत प्रत्येक नेत्याची जयंती साजरी व्हायची. त्यावेळी मुलं भाषणे करायची गोळ्या वाटल्या जायच्या आणि कार्यक्रम संपायचा. एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतिच्यावेळी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मला करण्यात आलं. नेहमीप्रमाणे प्रतिमापूजन झालं. मुलांची भाषणं झाली. माझंही अध्यक्षिय भाषण झालं. कार्यक्रम संपायच्या आधी मी उठलो आणि गोडबोले गुरुजींना विनंती केली की, त्यानी ही आम्हाला बाबासाहेबांच्या जीवनावर मार्गदर्शन करावं. गुरुजींनी सगळ्यात पहिल्यांदा माझं कौतुक केलं की पहिल्यांदा कुण्या विद्यार्थ्याने अशा कार्यक्रमाच्यावेळी शिक्षकांना अशी विनंती केली. त्यांनी सुन्दर भाषण केलं. कार्यक्रम संपला आणि सगळे पांगले. मध्येच एक शिक्षक आले आणि काही विद्यार्थ्यांना बोलले," अरे उचला रे त्या आंबेडकराला, खूप झालं!" संध्याकाळी मामाला येवून सांगितलं पण तो ही काही बोलला नाही.अ‍ॅज आय सेड ती तीन वर्ष वर्थ नव्हती...

आमचे एक गुरुजी होते. गावडे मास्तर.. ते आम्हाला सातवीला वर्गशिक्षक होते. म्हणजे सगळे विषय तेच शिकवायचे. आणि आम्ही काय शिकायचो काय माहीत. सातवीला आम्हाला भूगोलात जगाचा भूगोल अभ्यासाला होता. त्यात जगातल्या इतर देशांची माहीती होती. गुरुजी शिकवायचे म्हणजे फक्त वाचुन दाखवायचे आणि धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला सांगायचे.. शिकवताना पुस्तकही आमच्याचकडुन घ्यायचे. एकदा भूगोलच तास ४ वजताचा होता आणि त्यानंतर पीटीचा तास होता. पीटीचा तास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त खेळायचो. त्यात मुले क्रिकेट किंवा गोट्या आणि मुली लंगडी किंवा सागरगोटया खेळायच्या. तर त्या भूगोलाच्या तासाच्यावेळी यु.एस्.एस्.आर. ( रशिया) चं प्रकरण होतं. आणि मोजुन धड्याची बारा पानं होती. पोरांनी विचार केला मायला बारा पानं म्हणजे पीटीचा तासही बुडणार. मग नयनने युक्ति केली मधली ३ -४ पानं फाडली आणि गुरुजी यायच्या आत आपलं पुस्तक त्यांच्या टेबलावर ठेवलं. अश्यावेळी आम्ही मुलींशी बोलत नसलो तरी त्यांच्याशी तह करायचो अ‍ॅन्ड ऑफकोर्स त्याकामात मीच मुलींशी बोलणी करायचो कारण बाकीची मुलं मुलींशी बोलायची नाहीत.. गुरुजी आले त्यानी पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली...
"गुर्जी, यु.एस्.एस्.आर. म्हन्जे काय ओ ? " आबा मध्येच कडमडला..
गुरुजी त त प प करायला लागले तितक्यात अमोल नाईक बोलला ," तुका काय करुचा रे? गपचूप आयक गुर्जी शिकयतात ता!"
आब गप्प बसला. २० मि. धडा संपला.. आणि आम्ही गुर्जींची परमिशन घेउन खेळायला गेलो. इतकी वर्षे गुरुजी तोच विषय शिकवत होते पण त्यावेळी त्यांच्या लक्ष्यात नाही आलं की रशियाचा भुगोल २० मि. कसा संपला ते..
या गुरुजिंच्या नाकाच्या शेंड्यावर एक केस होता आणी तो लांब होता. एकच केस त्यांच्या त्या नाकाच्या शेंड्यावर विचित्र दिसायचा.. एकदा अमोल नाईकाने मस्तीच्या भरात तो ओढला आणि गुरुजी संतापले.. अमोल नाईकासकट आम्हालाही बदडून काढलं, तेव्हापासुन आम्ही त्यांच्या जवळ जात नसू. शाळेच्या बाहेर त्यांनी मला कुठे पाहिलं की ते नेहमी मला कवितेत हाक मारायचे, " दीपका! मांडीले तुला सोनियाचे ताट , तुजसाठी सजविला चंदनाचा पाट ! "

त्याकाळात मी, आमोल नाईक, नयन पालकर, वासुदेव, गुरुनाथ, शांताराम आणि आबा मान्जरेकर अशी गट्टी जमली होती. नयन आमचा लीडर होता. तो नेहमी क्रिकेटच्या मॅचेस घ्यायचा आणि आम्ही त्याच्याबरोबर कुठेकुठे मॅच खेळायला जायचो.. त्या तीन वर्षात काही धड शिकलो नाही.  मी पास व्हायचं म्हणून पास झालो अर्थात पहिल्या क्रमांकानेच! एक गणित सोडून बाकिचे सार्‍या विषयात मी चांगले मार्क्स मिळवले होते. पण जेव्हा हायस्कूलमध्ये गेलो तेव्हा कळलं की पाचवी ते सातवी आपण काहीच शिकलो नाही. साधी ए, बी, सी, डी सुद्धा आपल्याला कशी लिहायची ते कळत नाही...

सातवी पास झाल्यानंतर हायस्कूलमध्ये जायची तळमळ लागली होती. नविन शिक्षक, नविन शाळा, नविन अभ्यास आणि बरंच काही नविन असणारं होतं जे कधी प्राथमिक शाळेत अनुभवायला मिळालं नव्हतं. गॅदरिंग, लांबच्या सहली, खेळाच्या स्पर्धा जे हायस्कूलच्या मुलांकडुन ऐकलं होतं! पण त्याचबरोबर पुढला अभ्यास आणि आठवीपासुनच घरच्यांचा आणि स्पेशली मामाचा दहावीत चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रेशर सुरु झाला होता.....
तळटीपः पोस्ट थोडीशी लांबल्याने
पुढचे भाग तु़कड्या तुकड्यात टाकतो आहे.

दीप्स..
 

27 comments:

 1. मस्त रे... जमलीय पोस्ट
  प्लॅस्टर ची गंमत एक नंबर वाटली. थोडं मालवणी/कोकणीत ही लिहं
  पुढच्या भागाची वाट बघतोय.

  ReplyDelete
 2. सहीच.. भन्नाट लिहिलं आहेस..

  >> दीपका! मांडीले तुला सोनियाचे ताट , तुजसाठी सजविला चंदनाचा पाट !

  लोळालोळी !!

  ReplyDelete
 3. भन्नाट .....

  पुढचे भाग टाकायचे आहेत ते लक्षात असू देत म्हणजे झाल.

  ReplyDelete
 4. मस्त... मजा आली वाचायला... :-)

  ReplyDelete
 5. धन्स नागेश !!
  हो पुढल्या भागात नक्की लिहीन. :)

  ReplyDelete
 6. हाभार्स हेरंबा !!!
  अ‍ॅक्चुअली लोळालोळी होती ती आणि ते गुर्जीए मी कुठेही दिसलो तरी तशीच हाक मारीत मला. :)

  ReplyDelete
 7. सचिन दादा हाभार्स रे !
  हो पुढले भाग लवकरच टाकतो..
  आ़ज एक भाग टाकेल बहुदा.. :)

  ReplyDelete
 8. >> पुस्तक वाचण्याचा योग अजुन आला नाही.

  यू डीझर्व अ किक ऑन ..... !
  अरे पुस्तक एकदम जबरी आहे भावा. मी देखील परवा टीव्ही वर पाहिला "शाळा" पण पुस्तक वाचताना शिरोडकरकडे चोरून बघण्यात, तिला गणपतीच्या देवळात आणि क्लासच्या वाटेवर भेटण्यात, तिच्याशी बोलण्यात जोश्यांची जी हुरहूर जाणवते नां ती चित्रपटात तितक्या प्रभावी नाही रे जाणवत. आणि पुस्तकाचा शेवट रडवतो... चित्रपट चांगला आहे पण पुस्तका इतका प्रभावी नाही.

  बाकी तुझे अनुभव भन्नाट.

  >> " दीपका! मांडीले तुला सोनियाचे ताट , तुजसाठी सजविला चंदनाचा पाट ! "

  CITY Moment of लोळकल्लोळ!!! :D

  ReplyDelete
 9. हां रे सिद्धू !! ते पुसतक वाचाणारच आता.. म्हणजे ना नेहमी असं हात को आया मुँह को ना लगाया सारखं झालं...;)
  हाभार्स ! :)

  ReplyDelete
 10. दिपू ही पोस्ट वाचून मी लोळागोळा होईन, मुख्य ते तू विंजिनियरिंगला निळी हाफ़ चड्डी घालायचास हे इतकं जाहिररित्या सांगितल्याबद्द्ल आणि तुझे क्रश इ...इ...असं सुरुवातीला वाटलं....नंतर वाचता वाचता कधी डोळ्यात पाणी आलं नं कळलंच नाही...अरे खरं सांगु का आपल्या काळात आपल्या आई-बाबांकडे रोकड पैसे नसायचे नं रे म्हणून तेही फ़्रस्टेट होत असतील असा मी आता विचार करते....म्हणजे बघ आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप काही खेळणी घेऊन दिली नाहीत पण त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण शिकलो आणि आज आपल्याला पैसे खर्च करताना त्यांच्याएवढा विचार करायला लागत नाही ...हो की नाही??

  चवथीच्या स्कॉलरशिपमध्ये नापास होण्याबद्दल आपण एकमेकांचं अभिनंदन केलं पाहिजे तेही मला मराठीत ९० मार्क मिळूनही गणिताने मात्र माझी साथ सोडली मग त्याचं उट्ट मी सातवीत स्कॉल्ररशिप मिळवून केलं...:)

  असो....थोडं मध्ये मध्ये लांबलंय पण हे लिहिलंस तर तुला स्वतःलाच बरं वाटेल म्हणून लिही....(मध्येच थांबू नकोस)

  ReplyDelete
 11. ओय ! काही ही काय मी इंजीनिअरिंगला हाफ पँट नव्हती.. फक्त कलर सेम होता ;)

  अरे खरं सांगु का आपल्या काळात आपल्या आई-बाबांकडे रोकड पैसे नसायचे नं रे म्हणून तेही फ़्रस्टेट होत असतील असा मी आता विचार करते....म्हणजे बघ आपल्या आईवडिलांनी आपल्याला खूप काही खेळणी घेऊन दिली नाहीत पण त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण शिकलो आणि आज आपल्याला पैसे खर्च करताना त्यांच्याएवढा विचार करायला लागत नाही ...हो की नाही?? ++++++++++++++++++

  चवथीच्या स्कॉलरशिपमध्ये नापास होण्याबद्दल आपण एकमेकांचं अभिनंदन केलं पाहिजे++++ अगदी अगदी मला ही चांगलेच मार्क्स मिळाले होते गं! पण गणित ना... असो..

  धन्स यार !

  ReplyDelete
 12. माझीही चौथीची स्कॉलरशिप हुकलीच, पण सातवीत मारली होती.

  ReplyDelete
 13. मायला, सगळ्यांनी सातवीत स्कॉलरशिप मारली..
  अ‍ॅज आय सेड, सातवीत काय शिकलो तेच माहित नव्हतं तर स्कॉलरशिपचे परीक्षा वैगरे कुठून येणार..
  असो . सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन.. :)

  ReplyDelete
 14. अप्रतिम....एकदम शाळेचे दिवस आठ्वले....

  तू तर शाळा पण गाजवली आहेस कि....

  पोस्ट मस्त्... नेहमीसारखी....!!!

  ReplyDelete
 15. धन्स सारिका..
  गाजवायला काय मी लोकसभापण गाजविन..
  तूर्तास असो.. ;)

  ReplyDelete
 16. मस्तच ओ मालक, लै भारी :)

  ReplyDelete
 17. खूप खूप आभार्स विशाल दादा :)

  ReplyDelete
 18. आज प्रथमच तुला कॅप्टन, गिब्ज, भावा वगैरे तादानुषंघिक विशेषणे न लावता "दिप्या" म्हणतोय, राग न मानणे....... फ़ार फ़ार भारी पोस्ट आहे बघ तुझी, तु कोकणात जे जगला तेच मी व-हाडात जगलोय बघ, परिस्थिती चे चटके तुझ्या इतके नाही सोसलेले भाई मी, पण उधळमाधळ पण कुठेच नव्हती, इन्स्पायर केलेस.... आज मी पण खरडेन म्हणतो काहीतरी.....

  ReplyDelete
 19. आबा म्हणाले होते स्कॉलरशिप कर म्हणुन तेव्हा वडील "नेमानी पास होऊन रायला त कायले त्याचे दिमागाले ताप देता" असे म्हणले होते माझे (आय लव्ह यु डॅड!!!!!!) वर "उद्यापासुन मुकाट्याने आखाड्यात येत जा भोसडीच्या!!! लाल माती उकरायला काय देव येणार आहे का!!!!!" असा कडक दम मिळाला होता

  ReplyDelete
 20. सहीचं... आता पुढचा भाग वाचतो :) :)

  ReplyDelete
 21. विशुभाउ हाभार्स रे ! आणि फेसबुकवर लिंक शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद.. !

  ReplyDelete
 22. गुरु भावा.. धन्यवाद रे !
  नक्की काही तरी लिही, अशा या बालपणीच्या आठ्वणी खरडल्या ना की खूप बरं वाटतं..

  Wil heading towards Tortuga soon..

  ReplyDelete
 23. धन्स सुहास... अरे शेवटचा भाग टाकतो लवकरच.. :)

  ReplyDelete