Sunday, August 26, 2012

रतनगड आणि "टॉर्च"भूत.....

१७ जुलै २०१० मध्ये खर्‍या अर्थाने ट्रेक लाईफची सुरुवात झाली. आमचे सेनापती, रोहन याने या दिवशी पहिला वहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्या ट्रेकला अवघे सहाच जण होतो. पण तेव्हापासुन ट्रेक आणि भटकंतीची चटक लागली. त्या ट्रेकमध्ये रोहन बरोबर सुहास झेले, सागर नेरकर, अनुजा सावे, भारत असे होतो. मग आमची चांगलीच गट्टी जमली आणि ट्रेक्स सुरु झाले. १७ जुलैच्या विसापूरच्या ट्रेक नंतर ऑगस्टमध्ये आम्ही सुधागड ला गेलो. त्या ट्रेकला पण मोजकेच ५ जण होतो. त्यात मी, सुहास आणि अनुजा असे आणि दोन दुसरे मित्र होते. सुधागडचा ट्रेक झाला आणि मग  १५ ऑगस्टला रायगडस्वारी करुन आलो. रायगडनंतर त्याच महिन्यात २२ तारीखला सफाळ्याचा तांदुळवाडी किल्ला फत्ते केला.इथे देवेंद्र चुरीशी मैत्री झाली. याच ट्रेकला अनुजाने सांगितलं की सप्टें.मध्ये VAC (Vasai Adventure Club)  ने रतनगडचा ट्रेक आयोजित केलाय. मग त्या ट्रेकसाठी मी आणि देव्याने तिला तिथेच कन्फरमेशन दिलं आणि नंतर सुहास पण यायला तयार झाला. झालं! तिने आमच्या सीट्स बुक करुन  ठेवल्या.  ३ सप्टें. ते  ५ सप्टें असा ट्रेक होता. म्हणजे ३ तारखेला रात्री वसईहुन निघायचे, दुसर्‍या दिवशी सकाळी रतनवाडीला पोचायचे, ट्रेक करायचा. ती रात्र तिथेच हॉल्ट आणि मग रविवारी बॅक टू होम. असं प्लॅनिंग होतं. 

ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी ऑफिसमधुन संध्याकाळी निघालो. मिटींग पॉईंट होता वसई. पण मग मला स्लिपिंग बॅग हवी होती म्हणून अनुजाच्या मैत्रिणीच्या घरी विरारला जावं लागलं. देव्या मला वसईलाच भेटला. त्याला घेउन मी विरारला ममताच्या घरी गेलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते आणि ती बिचारी बॅग देण्यासाठी जागीच होती. तिच्याकडुन बॅग घेतली आणि आम्ही परत वसईला आलो. तिथे सुहासही भेटला. आमच्या आधीच तिथे वॅकची ट्रेकर्स मंडळी जमली होती. अनुजा लेट आली आणि मग सगळे आम्ही गाडीत आपापली जागा धरुन बसलो. साडे बाराला आमची गाडी सुटली आणि आम्ही इगतपुरीच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रचंड पाउस होता.मी माझा आयपॉड कानाला लटकवला आणि गाणी ऐकतच झोपी गेलो.मध्ये केव्हातरी जाग आली तेव्हा गाडी थांबली होती. आणि पाण्याचा खूप मोठा आवाज येत होता. काय झाले ते कळले नाही. परत गाडी सुरु झाली आणि मी झोपी गेलो. सुझे ने मला जेव्हा उठवल तेव्हा मला कळलं की आम्ही रतनवाडीला पोचलोय.

रतनगडला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिक हायवेने इगतपुरीला पोचल्यावर, इगतपुरीच्या पुढेच १-२ किमीवरला पहिला राईट घेउन घोटीच्या दिशेने वळायचं. घोटीवरुन पुढे शेंडी, भंडारधरा वैगरे करत रतनवाडीला पोचायचं. रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याशी असलेलं गावं आहे. यापूर्वी मी काही मित्रांसोबत रतनवाडीला अमृतेश्वराला जाउन आलो होतो. म्हणजे पिकनिक ला आलो होतो. 

पहाटे सगळे उठले. तिथल्याच एका स्थानिक हाटेलात मस्त पोहे आणि चहाचा नाश्ता झाला. ओळख परेड झाली. या ट्रेक ला सगळे मिळून किमान १५-२० जण तरी होतो.मी पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या ग्रुपबरोबर ट्रेकला आलेलो. त्यात नशीब सोबत सुझे, देचु आणि अनुजा होती त्यामुळे बोर व्हायचा प्रश्न नव्हता. तर ओळख परेड झाली आणि आमचे ट्रेक लिडर श्री. बंधू यांच्यामागुन आम्ही सगळे रतनगडाच्या वाटेने चालु लागलो. सोबत गाईडही होता. प्रवरा नदीच्या काठाने, शेतातुन चालत होतो आणि एका ठीकाणी नदी पार करावी लागली तेव्हा मला सुधागडची आठवण झाली. सुधागडला आम्हाला  दोन वेळा नदी क्रॉस करावी लागली होती. मानाने प्रवरे हे पात्र फार मोठं नव्हतं कारण तिचा उगम इथल्याच कुठल्यातरी डोंगरातुन होत होता. तरीही कंबरभर पाण्यातुन एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही प्रवरा पार केली आणि चालु लागलो. 

प्रवरेच्या प्रवाहातून
रतनगडला जायचं असेल तर सोबत एखादा तरी गाईड असावाच कारण खूप घनदाट जंगल आहे आणि पावसाळ्यात तर ते अजुनच डेन्स होउन जातं. जागोजागी मार्किंग्ज असल्या तरी वाट चुकायची शक्यता खूप जास्त आहे आणि त्यात नाही म्हटलं तरी दोन - तीन तासांची चढाई आहेच.

आम्ही सगळे गाणी गात,एकमेकांची मस्करी करत चालु लागलो. मी, देव्या आणि सुझे एकत्र गप्पा मारत चाललो होतो. अनुजा त्या बाकीच्याबरोबर कूठे गायबली होती. तशातच भयंकर पाउस सुरु झाला. तासभरात आम्ही एका छोट्या पठारावर आलो तिथे थोडावेळ ब्रेक घेतला. गोळ्या, बिस्किटं वैगरेचं वाटप झालं. अजुन तासाभराची वाट बाकी होती. ब्रेकनंतर पुन्हा चढाई सुरु केली आणि एका ठीकाणी आलो. तिथे मग कुणी तरी माहीती दिली की या वाटेवरुन चालत दुसऱ्याबाजुने  हरिशचंद्रगडावर जाता येतं. ट्रेकच्या जगात माझा नुकताच जन्म झाला असल्याने, हरिश्चंद्रगड, कात्राबाईची खिंड,कोकणकडा वैगरे शब्द मला नविनच होते. मग तिथुन पुन्हा चालु लागलो. 

ब्रेक टाईम
पाउस थोडावेळ थांबला. आणि मग तासाभराने आम्ही रतनगडाच्या पहिल्या शिडीपाशी येउन पोचलो. तेव्हा धो धो पाउस पडत होता. धुकं तर इतकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्या शिडीची हालत तर भयानक होती. प्रचंड वाहणार्‍या  वार्‍याच्य वेगात ती शिडी लटपटत होती. "अजुन अशा ३ शिड्या पार करुन वर जायचयं" हे कुणाला तरी बोलताना ऐकलं आणि माझ्या पोटातच गोळा आला. एक तर मला हाईटचा फोबिया होता. म्हणजे चढताना काही वाटत नाही पण त्याच वाटेवरुन उतरताना मात्र माझी जाम टरकते.  सगळेजण ती शिडी सहज पार करुन जात होते आणि मी मात्र घाबरत होतो. कशीबशी ती शिडी मी पार केली. आणि वर पोचलो. पाउस तर तुफान बरसत होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. थोडं चालुन गेल्यावर अजुन एक शिडी! 

पहीली शिडी
 हे राम!  ही शिडी तर पहिल्या शिडीपेक्षा खतरी होती. आणि वार्‍याने प्रचंड हालत होती. मी कसाबसा चढु लागलो. शिडी पार केली आणि किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी येउन पोचलो. पण दरवाज्यापर्यंत पोचणं माझ्यासाठी तितकसं सोप्पं नव्हतं. शिडी पार केल्यानंतर एक निमुळती वाट होती जी पावसाने आधीच निसरडी झाली होती आणि आताही पाउस पडतच होता. धरायला आजुबाजुला भक्कम आधार नव्हता. वर जे अगोदर पोचले होते त्यांनी एक रोप टाकली होती. ती रोप पकडुन आणि माझं वजन सांभाळत कसाबसा मी चढलो. एक दोन ठीकाणी घसरलोच पण सावरलं. हा ट्रेक जाम थ्रीलिंग होता माझ्यासाठी. मुख्य दरवाज्यातुन कसाबसा आत शिरलो आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.  


गडाचा मुख्य दरवाजा
तिथुन मग पुढे गडावरल्या मुख्य गुहेत सगळेजण जमलो आणि जे काही पब्लिक खादाडीवर तुटुन पडले की विचारायला नको. ज्याच्याजवळ जे जे होतं ते सगळं बाहेर आलं आणि पुढला २०-२५ मि. आम्ही फक्त खातच होतो.खादाडी संपल्यावर आम्ही गड फिरायला गेलो पण कसंल काय! पाउस इतका प्रचंड होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. 


दुपारचा लंच :)
 गड फिरुन झाला आणि आम्ही परतीच्या वाटेवर. आता मला धडकी भरली कारण त्या वाटेवरुन उतरताना जराशी जरी चूक झाली तर माझा कडेलोटच होता. मी कसाबसा सावरुन,बसुन उतरु लागलो. मुख्य दरवाजा रोपच्या सहाय्याने उतरुन पहिल्या शिडीपाशी आलो. ती शिडी उतरलो आणि त्या निसरड्या वाटेवरुन सावरत दुसर्‍या शिडीपाशी आलो. ती शिडीसुद्धा उतरलो आणि माझा जीव भांड्यात पडला. गडावरुन खाली उतरताना अक्षरशः ढगातुन उतरत असल्याचा भास होत होता. खाली आलो आणि एक दगडावर निवांत बसलो कारण बाकीचे सुद्धा लँड व्ह्यायचे होते. सगळे उतरत होते. आणि जेव्हा अनुजा त्या शिडीवरुन, धुक्यातुन उतरु लागली तेव्हा खाली असलेल्या पोरांनी एका सुरात गायला सुरु केली. "अप्सरा आली"  हे हे हे ! 

 मग सगळे सुखरुप लँड झाले. मला कधी एकदा खाली पोचतो असं झालं होतं. भराभरा उतरायला सुरु केली आणि ४ च्या दरम्यान आम्ही पुन्हा अमृतेश्वराच्या मंदीरापाशी जिथे गाडी पार्क केली होती तिथे आलो. एक रात्र आणि दुसर्‍या दिवशीही अंघोळ न केल्याने मला फारच अस्वस्थ वाटत होतं. दिवसभर ट्रेकमध्ये पावसाने धुवुन काढलं होतं पण तरीही... मग मी सुझे आणि देव्या प्रवरेच्या काठावर जाउन बसलो. प्रवरेचा तो प्रवाह बघुन मला राहवेना. मी मस्त अंघोळ करायला सुरुवात केली ते बघुन सगळेजण मला ह्सायला लागले. ट्रेकला कुणी अंघोळ करतं का? असं चिडवू लागले. पण जेव्हा अंघोळ केली तेव्हा मला फर फ्रेश वाटायला लागला. सगळा शीण निघुन गेला. मग फोटोसेशन करुन आम्ही बसजवळ आलो. बाहेर पाउस असल्याने बसमध्येच टीपी करु लागलो. इतक्यात साडे सहा-सात च्या दरम्यान अनुजा जेवायला बोलवयला आली. सात वाजता जेवायला? मग गावातच जेवणाची ऑर्डर दिली होती तिथे जेवायला गेलो. व्हेज जेवणाचा बेत मस्त होता जेवण झालं आणि आम्ही परत बसकडे परतलो. पहिल्यांदा सगळ्यांनी मंदीराच्या धर्मशाळेत झोपायचं असं ठरलं होतं पण मग आम्ही ७-८ जणांनी बसमध्येच झोपायचं ठरवलं. तसं पण दिवसभारात सगळ्यांची मैत्री झालीच होती मग टगेगिरी करायला म्हणुन आम्ही बसमध्येच झोपायचं ठरवलं. बाहेर पाउस धो धो पडत होता.......  

रात्रीचा डीनर :)
पण इतक्या लवकर झोप कुणाला येणार होती?.. वॅकची सगळी मुलं एकमेकांची जाम खेचत होते. त्यात एकाला बिचार्‍याला टार्गेट केलं होतं. म्हणजे इतकं की त्याने चुकून हुं जरी केलं तरी त्यावर जोक व्ह्यायचे. आणि त्या गाडीत आम्ही मोठमोठ्यान खिदळत ह्सत होतो.

बाहेरचा पाउस, सोसाट्याचा वारा, पिपळाचं झाड, मंदीराची पुष्करणी, प्रवरेचा खळखळणार्‍या प्रवाहाचा आवाज आणि आजुबाजुचं गुढ जंगलं. आमच्या बसमधल्या सगळ्या गप्पा हॉरर गप्पांकडे न वळत्या तर कमालच होती. हळूहळू गप्पा हॉरर विषयाकडे वळत होत्या आणि अचानक कुणाला तरी दूरवर मंदीराच्या दिशेने एक टॉर्च दिसली. आम्ही सगळे ती टॉर्च निरखू लागलो. आमच्या बसपासुन १५-२० मीटरवर ती टॉर्च पुढेपुढे सरगकत होती. कुणी तरी गावकरी असेल म्हणुन आम्ही दुर्लक्ष्य केलं आणि पुन्हा आमच्या गप्पांकडे वळलो. पाउस कधी जोरात पडायचा तर कधी थांबायचा. कधी सोसाट्याचा वारा यायचा त्यामुळे बाहेरच्या पिंपळाची सळसळ तर अजुनच भयानक वाट होती त्यात त्या पोरांच्या गावाकडल्या भुतांच्या गोष्टी! वातावरण काय हॉरर झाले असेल याची कल्पना करा.
 

गप्पा मारता मारता आम्ही थांबलो कारण ती टॉर्च पुन्हा दिसली. एवढ्या रात्री कोण फिरत असेल? काही कळत नव्हतं.त्यात आता ती टॉर्च कधी सुर व्ह्यायची तर कधी बंद व्ह्यायची. मी  बसमध्ये एका खिडकीपाशी बसलो होतो. देव्या माझ्यापुढच्या सीटवर बसला होता. आता आम्ही गप्पा बंद केल्या आणि त्या टॉर्चच्या हालचालींकडे लक्ष्य देउ लागलो. एखादा गावकरी किंवा धर्मशाळेत झोपायला गेलेल्यांपैकी कुणीतरी आम्ही काय करतोय हे बघायला तर आला नसेल अशी शंका आली. पण मग तो इतक्या लांब काय करतो? आणि टॉर्च सारखी चालु-बंद का करतो हेच कळत नव्हते.सगळेजण श्वास रोखुन त्या टॉर्चकडे बघत होतो. टॉर्च बंद झाला आणि अचानक त्या टॉर्चचा झोत सरळ देव्याच्या खिडकीवर पडला आणि आमची तंतरली. देव्या झटकन खाली वाकला आणि सगळेजण परत आपापल्या जागेवर जाउन बसले. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं पण आमच्यातला कुणीही खाली जायची हिम्मत करत नव्हता. शेवटी आम्ही गप्प झोपायचं ठरवलं. काय असेल कुणास ठाउक? काही वेळाने टॉर्च बन्द झाली आणि आम्ही गप्प बसलो. ५-१० मीनिटांनी कुणाला तरी ती टॉर्च गाडीच्या समोर दिसली. कुणीतरी समोरुन गाडीवर टॉर्चचा प्रकाश फेकला होता. कोण आहे ते दिसत नव्हतं आम्ही सगळे चिडीचूप! फक्त बघत होतो की आता काय होईल. मी शास रोखुन धरले होते. अचानक ती टॉर्च आमच्या  दिशेने  येवू लागली आणि मी घाबरलो. सगळेजण गप्प राहिले. टॉर्च वेगात गाडीच्यासमोरुन आली आणि आमच्याबाजुने खिडकीवर प्रकाश टाकत झर्रकन निघुन पण गेली आम्ही मागेवळून पाहिलं तर ती बंद पण झाली आणि कुठे गायब झाली काय कळलं नाही.. इतकावेळा संथ चालणारी ती टॉर्च आता क्षणात आमच्या गाडीच्या बाजुने कशी काय गेली ते अजुनही कळलं नाही. तो कुणी गावकरी होता की आमच्याच ग्रुपमधला अजुन कुणी हे अजुनही समजलं नाही.. पण जे काही घडलं ते प्रचंड होतं....

बसमधली हॉरर टीम :)
बाहेर सोसाट्याच्या वार्‍याबरोबर पाउस कोसळू लागला आणि आम्ही सगळे झोपी गेलो. रात्री मध्येच ऊठलो तेव्हा आमच्या गाडीचा ड्रायवर मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याला रात्री उंदीर चावला म्हणुन तो ओरडत होता. पहाटे सुझेने उठवलं. मग मी,सुझे आणि देव्या "वाघ मारायला" निघुन गेलो. सगळ आटोपल्यावर परतिच्या प्रवासाला लागलो. वाटे भंडारधर्‍याच्या स्पिलगेटवर गाडी थांबवली तेव्हा समोरचं द्दृश्य अप्रतिम होतं. भंडारधर्‍याच्या जलाशयातुन सगळं पाणी बाहेर रस्त्यावरुन वाहत होतं. पाण्याचा प्रवाह ही जबरी होता. तिथे फोटोसेशन झाल्यावर मग रंधा फॉलच्या दिशेने गेलो. रंधा फॉल झाला आणि मग माळशेजमार्गे मुंबईच्या वाटेला लागलो.

ग्रुप फोटु
ट्रेक भारी झाला होता. पण पावसात गडावर धड काही बघायलाच नाही मिळालं. त्यामुळे पुन्हा हिवाळ्यात हा ट्रेक करायचं असं मी, देव्या आणि सुझेने ठरवून टाकलं. प्रत्येक ट्रेक आणि निसर्ग नेहमीच आपल्याला नविन काही तरी शिकवत असतो. या ट्रेक ने अजुन काही नवीन भटके मित्र दिले. आणि हो ती न विसरता येणारी टॉर्च भूताची रात्रे ही....

- दीप्स
  

Wednesday, August 8, 2012

मृत्युंजय....

        पुस्तक वाचन हा माझा छंद नाही.. पण कधी कधी एखादं अनोळखी, अपरिचित व्यक्तिमत्व जसं आपल्याला एखाद्या अनामिक बंधानं खेचतं तसं काहीसं माझं आणि पुस्तकांचं नातं आहे असं मला वाटत राहातं. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातुन गावीच झालं. त्यावेळी लहान असताना आम्ही वेंगुर्ल्याच्या एस्.टी. स्टँडवर असलेल्या पुस्तकाच्या दुकानातून दोन-दोन रुपड्यांची गोष्टींची पुस्तकं वाचत असू. एकदा मामा वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयातून "ययाति" घेऊन आला. ते जाडजूड पुस्तक, कसल्याशा कादंबरी प्रकारातलं होतं. मामा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते वाचायचा.पण मी कधी त्या पुस्तकाच्या वाटेला जाणार नव्हतो. किंबहुना ते पुस्तक मोठ्यांसाठी असेल अशी माझी धारणा होती. कारण आम्ही लहान मुलं एवढी जाडजुड पुस्तकं कधी वाचत नसू. पण जेव्हा - जेव्हा ते पुस्तक मला घरात दिसे तेव्हा तेव्हा त्या पुस्तकावरला तो शुभ्र घोडा मला त्याच्याकडे खेचायचा प्रयत्न करी. "ययाति" ही तीन अक्षरं मला कोणत्या तरी अनामिक बंधाने स्वःताकडे बोलावित्.शेवटी एकदाचं ते पुस्तक मी हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि असा काही त्या पुस्तकात गुंतलो की मला दुसरं तिसरं काहीच सुचेना. त्यावेळी मी सहावी-सातवीत असेन, पण त्या पुस्तकाने माझ्यावर अशी काही मोहीनी घातली की मी;असो. 
"जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही." हे वाक्य त्यादिवसापासून मी कधीच विसरलो नाही आणि कदापि विसरू  ही शकणार नाही.. 

         आणि त्यादिवसापासून वि.स्.खांडेकरांचा मी भक्त झालो.  मग मामाकरवी मी त्यांची बाकीची पुस्तकं ही वाचून काढली..पण मिळेल ते कोणतेही पुस्तकं मी वाचतं नव्हतो आणि आज ही नाही वाचत याचं सर्वात मोठं कारण माझी आळशी वृत्ती हेच आहे... अशा वृत्तीमुळेच मी अनेक चांगल्या पुस्तकांना मुकलोय.. पण काही पुस्तकं आज ही मला खुणावत राहतात.. विश्वास पाटलांचं "पानिपत" ही मला असंच स्वःताकडे ओढतं होतं..ते वाचून झालं पण पानिपताचा तपशिलवार इतिहास जाणून घेण्यासाठी मग शेजवलकरांचं "पानिपत १७६१" वाचून काढलं तेव्हा कुठे समाधान झालं. काही लोकांच्या केवळ दुराग्रहांमुळे, इतिहासानं ही ज्यांची उपेक्षा केली असे "छत्रपति संभाजी महाराज" यांचं व्यक्तिमत्व ही मला असंच खुणावू लागलं आणि मी त्यांना ही शरण गेलो. अखिल मानवजातिला शांतिचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धांचं जीवन चरित्र आणि व्यक्तिमत्व मला अगदी लहानपणापासूनच त्यांच्याजवळ खेचत होतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक "बुद्ध आणि त्याचा धम्म" या बुद्ध धम्माचा धर्मग्रंथाने तर आयुष्यातल्या किती तरी प्रश्नांची उत्तरं मिळाली..

                 पण या सर्वात, महान कर्ण कुठे तरी मला साद घालत होता. दहावित असताना अचानक "मृत्युंजय" माझ्या  हाती लागलं पण अभ्यासाच्या नावापुढे ते मला वाचता नाही आलं आणि तेव्हापासुन माझी आळशी वृत्तीमुळे असेल मला हे पुस्तक वाचण्याचा योग आला नाही. मागल्या महिन्यात आम्ही काही मित्र नाटकासाठी म्हणुन दादरच्या शिवाजी मंदीरला गेलो होतो. नाटक सुरु व्ह्यायला अजुन वेळ होता म्हणून आम्ही शिवाजी मंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या मॅजेस्टीक ग्रंथ दालनात गेलो. क्षणात माझी नजर तिथे ठेवलेल्या "मृत्युंजय" वर पडली. गेली कित्येक वर्षे मला खुणावणारं हे पुस्तक आज मी घ्यायचं ठरवलं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरील तो धनुर्धर, वीर कर्ण जणू मला खुणावत होता. 

                आठवड्यापूर्वी पुस्तक वाचायला घेतलं आणि आज संपवलं ही.आज पुस्तक संपवताना शेवटच्या क्षणी अक्षरशः डोळ्यातून अश्रु पाझरले. घसा सुकला होता. ट्रेनमध्ये बसून डबडबलेल्या डोळ्यांनी मी एका महान वीराचा अंत वाचत होतो आणि तो ही भगवान श्रीकॄष्णाच्या मुखातून. जन्माच्या क्षणापासून नाळही न कापता जी उपेक्षा या महान वीराच्या नशिबात आली ती त्याच्या शेवटच्या काळापर्यंत तशीच राहीली. 

कर्ण!
सूतपुत्र कर्ण!
सुर्यभक्त कर्ण ! 
वीर धनुर्धर कर्ण !
अंगराज कर्ण!
दानवीर कर्ण !  

                  पुस्तकाच्या पहिल्या शब्दापासुन ते शेवटच्या शब्दापर्यंत कर्णाने माझं आयुष्य क्षणात व्यापून टाकलं. फक्त कर्णच नव्हे तर त्या पुस्तकात असलेल्या इतर अनेक व्यक्तिरेखांनी मला असंच भाळून टाकलं. पण शेवटी मनात राहिला तो कर्णच. यापूर्वी मी कर्णावर आधारीत कोणतं ही पुस्तक वाचलं नव्हतं कारण मृत्युंजय म्हणजेच कर्ण असं मी  माझ्या बर्‍याच वाचक मित्रांकडून ऐकत आलो होतो. महाभारतात आणि अनेक चर्चांमध्ये मी कर्णाबद्दल ऐकलं होतं. पण का माहित का जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की काही व्यक्तिमत्वं आपल्याला एका अनोळखी बंधातून आपल्याकडे आकर्षित करत राहतात त्यापैकी भगवान गौतम बुद्ध; छत्रपति शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांच्यानंतर कर्णाचं स्थान माझ्या आयुष्यात अढळ आहे.

                 खरं तर महाभारतातली ही अनेक पात्रं म्हणजे मनुष्याच्या प्रवृत्तीचं एक दर्शन आहे. जणु महर्षी व्यासांनी अखिल मानवजातीचं भवितव्यच महाभारतातून लिहून ठेवलं होतं.. प्रत्येक पात्राची एक विशिष्ट वृत्ती, एक विशिष गुण; पण कर्ण हा प्रत्येक संभ्रमित, शापित व्यक्तिचा मूळ पुरुष असावा.पुस्तक वाचताना नकळत आपण कर्णाच्या त्या प्रवासात सामिल होतो. या प्रवासाचा अन्त काय होणार ते आपल्याला ठाउक असतं पण महत्त्वाची गोष्ट महणजे या प्रवासात त्या महान वीरासोबत आपण सुद्धा आपला शोध घ्यायला लागतो. त्याच्या प्रत्येक कृतितून, त्याच्या आदर्शातून, त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण आपल्याला कुठेतरी शोधत राहतो.

आपल्या माता-पित्यांची सेवा करणारा कर्ण!
त्याच्या धाकटया भावाचा (शोण) आदर्श असलेला कर्ण! 
आपल्या जन्मजात कुंडलं आणि अभेद्य शरीर कवचाबद्दल नेहमी संभ्रमात असलेला कर्ण! 
एका अनामिक ओढीनं सुर्याची नित्यनेमानं आराधना करणारा कर्ण! 
हस्तिनापूरात गुरु द्रोणानी गुरुत्व नाकारताच त्याक्षणी सुर्याला अखेरपर्यंत गुरु मानणारा कर्ण! 
स्पर्धेत द्रोणांच्या अर्जुनप्रेमामुळं अजिंक्यत्वाचा मान हिरावलेला पण त्याहीपेक्षा पांडवांनी सूतपुत्र म्हणून केलेल्या निर्भत्सनेने मनाने जळून गेलेला कर्ण ! 
दुर्योधनाने त्याक्षणी त्याला अंगदेशाचा राजा म्हणून केलेला राज्याभिषेक आणि त्याच क्षणापासून दुर्योधनाची अखरेपर्यंत साथ देणारा कर्ण! 
वृषालीसारख्या सुंदर सारथीकन्येच्या प्रेमात पडलेला आणि तिच्याशी विवाह करुन तिच्यावर निरंतर प्रेम करणारा कर्ण! 
भर सभेत द्रौपदीने "सूतपुत्र" म्हणून ज्याची अवहेलना केली आणि ती अवहेलना गिळून गप्प बसणारा कर्ण!
संपूर्ण भारतवर्षात दिग्विजय संपादन करणारा पराक्रमी, वीर कर्ण! 

               अशी कर्णाची अनेक रुपं या प्रवासात आपल्या समोर येतिल आणि मग वाचता वाचता त्याच्यासारखीच झालेली आपल्या मनाची घालमेल.कुठे संपणार ? ठाउक नसतं.... 
अनेक भावनिक संघर्षात गुरफटलेला तरीही आपल्या सामर्थ्यावर आणि शब्दावर बद्ध असलेला कर्ण आपल्याला जवळचा वाटू लागतो. 
              "प्रत्येंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही" असं सांगणार्‍या कर्णाच्या त्या अभेद्य कवचामागे एक भावसंपन्न, प्रेमळ झरा नेहमी खळाळत असल्याची ग्वाही देत राहतो.कारण माझ्यासारखा प्रत्येक भावनिक आणि संवेदनशील माणूस त्याच्या जीवनात स्वःताचा शोध घेत राहतो. त्याच्या आयुष्यातलया प्रत्येक कटू प्रसंगात स्व:ताचं दु:ख शोधत राहतो. माणसाला त्याच्यासारखाच समदु:खी माणूस भेटला की आनंद होतोच,नाही का? त्याच्या आयुष्यातलया अनेक कोड्यांची उलगड करताना त्याच्या मनाची स्थिती आपल्या मनाचा कुठेतरी ठाव घेतेच..अखेरच्या श्वासापर्यंत सूतपुत्र म्हणून हीणवलेला गेलेला हा वीर अखेरपर्यंत आपल्या शब्दालाच जागला..

            मृत्युंजयकार श्री.शिवाजी सावंतांनी कर्णाच्या आयुष्यावर ही महान कादंबरी लिहून एक प्रकारे त्याचे संभ्रमित आणि गुढ जीवन सुर्यतेजाने झळाळून सोडले. नाहीतर कदाचित आपल्यालाही त्याच्यासारखेच अनेक प्रश्न पडले असते आणि आपण ही त्यावर धड विचार करु शकलो नसतो. सुर्यपुत्र असूनही त्याच्यावर अखेरच्या क्षणापर्यंत अन्याय झाला. हा अन्याय कोणी केला? कुंतीने कौमार्यात जी चूक केली ती तिला महाभारताच्या शेवटच्या युद्धात उमगली. फक्त आपल्या पाच पुत्रांना अभय मिळावं म्हणून ती कर्णाकडे गेली. स्वार्थ हा मनुष्याला सर्व काही विसरायला लावतो. कर्णाला तो तिचाच पुत्र आहे याची जाणिव करुन देताना तिने त्याला हस्तिनापूरचे राज्य, सुंदर द्रौपदी या सर्वांचं आमिष दाखवायचा प्रयत्न केला पण कर्ण बधला नाही. जेव्हा तिचे स्वःताला क्षत्रिय म्हणवून घेणारे पुत्र कर्णाचा सूतपुत्र म्हणून अपमान करत होते तेव्हाही कुंतीने कधी हस्तक्षेप केला नाही. याची कारणं, तिची त्यावेळची मनसिक स्थिती,भविष्य आणि वर्तमानाच्या चक्रात अडकलेल्या कुंतीच्या मनाचं यथार्थ वर्णन सावंतांनी केलं आहे. पण मी तरी या सर्वासाठी फक्त कुन्तिलाच जबाबदार धरेन. ज्या धैर्याने तिने राजा कुंतिभोजाचं राज्य सांभाळलं, ज्या धैर्याने ती हस्तिनापूरची महाराणी झाली, ज्या धैर्याने तिने आपल्या पतीच्या श्रापासाठी आपलं जीवन अरण्यात व्यतित केलं. पतिच्या झालेल्या निधनानंतर ज्या धैर्याने तिने पाचही पुत्रांना घेउन हस्तिनापूरची वाट धरली. त्या कुंतिने थोडं तरी धैर्य कर्णासाठी दाखवायला हवं होतं. सार्‍या जगाला माहित होतं की पांडव हे महाराज पंडूचे पुत्र नसून कुंतिने दुर्वास ऋषींच्या मंत्रातून त्यांना जन्मास घातलं होते. कुंतिला ही याची जाण होती पण तरीही राजकिय दृष्टीकोनातुन असेल; ती कर्णासाठी कधीही पुढे आली नाही..

              या सर्वात मला वृषालीची फार दया येते.अखेरच्या क्षणापर्यंत तिने कर्णावर निरपेक्ष प्रेम केलं.मोठ्या कर्तबगारीने कर्णासारख्या पुरुषाला प्रेमाने सावरलं. ती खर्‍या अर्थानं कर्णाची अर्धांगिनी होती.दुर्योधनाने जरी स्वःताच्या स्वार्थासाठी कर्णाला जवळ केलं होतं आणि कर्ण हे जाणुन होता तरीही कर्णाने त्याची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. जर त्या स्पर्धेच्या दिवशी दुर्योधनाने कर्णाला जवळ केलं नसतं तर कदाचित पुढे कर्णाचं काय झालं असतं काय माहीत? अश्वत्थामासारखा विचारवंत आणि हुशार मित्र कर्णाला लाभला म्हणून काही अंशी का असेना कर्णाने आपल्या आयुष्याचा निर्धार पक्का केला होता. कर्ण जितका कणखर, अजिंक्य धनुर्धर, पराक्रमी, तितकाच भावनिक होता. सुर्य आणि गंगामातेवर असलेली त्याची अनामिक निस्सिम भक्ति त्याच्या आयुष्याचा एक भागच होती. अधिररथ आणि राधामाता हेच आपले खरे आईवडील हे त्याने अखेरपर्यन्त मानले आणि मनोभावे त्यांची सेवा केली. कौंतेय असूनही त्याने स्वःताला 'राधेय' मानण्यातच त्याने धन्यता मानली..

               कादंबरीच्या शेवटच्या भागात श्रीकृष्ण कर्णाबद्दलची आत्मियता व्यक्त करतो. कर्णाच्या जन्माचं आणि कवच कुंडलांचं रहस्य माहिती असलेल्यांपैकी तो एक होता. त्यानेच कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य कथन केलं. तू सूतपुत्र नाहीस तर सुर्यपुत्र आहेस असं याची जाणिव करुन दिली.वेगवेगळी आमिषं दाखवुन कर्णाला पांडवांस मिळण्यास गळ घातली हे जाणुनही की कर्ण ते कधीच मान्य करणार नाही. त्यात श्रीकृष्ण सांगतो की, महाभारताचं युद्ध मी पेटवलं, का?? 
फक्त दुर्योधन, भिष्म, द्रोण, धृतराष्ट्र अशा काही जणांना धडा शिकवण्यासाठी? 
द्रौपदीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी? 
पदच्युत, पथभ्रष्ट झालेल्या कर्णाला मार्गस्थ करण्यासाठी? 
नाही!!तर माझ्यापुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा! प्रश्न होता चिरंतन सत्याचा!

              पण श्रीकृष्णा! तुझ्या या चिरंतन सत्याच्या? यज्ञात कर्णाची आहुति पडायला नको हवी होती.हा जो तू मानवजातीच्या कल्याणासाठी? मांडलेला यज्ञ होता त्याच्या पूर्णत्वासाठी तू कोणाला निवडलं होतंस? पांडवांना???? 

              कसलं सत्य आणि कुणाचं सत्य? जे सत्य जाणण्यासाठी कर्ण आयुष्यभर फक्त सुर्याकडे हताशपणे बघत राहिला त्याचं सत्य ही तू केव्हा सांगितलंस जेव्हा तुला त्याची गरज होती. कर्णाच्या आहुतिने तुझ्या तथाकथित सत्याचा यज्ञ पुर्णत्वास गेला असा जर तुझा समज असेल तर जरा आजच्या या युगात एक नजर फिरवं असे अनेक अभागी कर्ण तुला जागोजागी दिसुन येतिल.....    

- दीप्स

Sunday, August 5, 2012

If You Are Lonely When You Are Alone.....


If you are lonely when you are alone, you are in bad company...
 
एकाकीपणा, Loneliness  हा मनुष्याचा एक सर्वात मोठा शत्रु आहे. हा असा शत्रू आहे की तो कधी कधी स्वःताचाच घात करतो. प्रत्येक मनुष्य कधी ना कधी या एकाकीपणाचा शिकार होतोच. अशावेळी आपल्याल काहीच सुचत नाही. कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. म्युझिक, मुव्हीज आपली आवडती जागा किंबहुना आपली अतिशय आवडती व्यक्तीही ही अशावेळी आपल्याला नकोशी वाटते. मग अशावेळी तुम्ही काय करता? मी काय करायचो हे मला ठाउक नव्हतं पण त्यादिवशी एक चांगला उपाय सापडला..

दोन-चार महिन्यांपूर्वी भोपाळला कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो. भोपाळपासुन ८० कि.मी.वर असलेल्या सुजानपूर या एका गावात  एका  क्लायंटकडे जायचं होतं आणि तिकडलं काम झाल्यावर पुढे रतलामला अजुन एक क्लायंट होता. सुजानपूरमधलं काम त्याच दिवशी आटोपलं आणि रतलामला जाण्यासाठी सुजानपूर स्टेशनवर येवून ट्रेनची वाट बघत बसलो होतो. ट्रेनला यायला अजुन ३ तास होते. आता हे ३ तास कसे घालवायचे याच विचारात होतो. त्यात मी माझा लॅपटॉप पण सोबत आणला नव्हता त्यामुळे तर अजुनच कंठाळा येवू लागला. नशीब सोबत ब्लॅकबेरी फोन होता. त्यामुळे फेसबुक आणि ट्वीटरवर थोडा टीपी सुरुच होता. काही तरी लिहावं म्हणून नोटबुक काढलं पण काही केल्या एक शब्द ही सुचेना. उगाच मग एखादं नाव गिरवू लागलो; पण मनासारखं होतं नव्हतं. 

मे चा शेवटचा आठवडा होता. संध्याकाळच्या वेळी आभाळ विविध रंगांनी भरुन गेलं होतं. कुठून तरी काळे ढग पश्चिमेकडे जमा होत होते. आज कदाचित पाउस हजेरी लावेल असं मनोमन वाटत होतं. त्यात वारा ही अगदी सूसाट सुटला होता. पण नेहमीप्रमाणे ही संध्याकाळ मला खायला उठली होती. मी हे सगळं जाणून बुजुन टाळत होतो कारण ती संध्याकाळ पुन्हा एखादी अशीच आठवण उकरुन काढणार होती आणि त्या अनोळखी प्रदेशात तर मला ते नकोच होतं. कसाबसा मी मनाला सावरत होतो आणि इतक्यात ट्रेन आली. सुजानपूर ते रतलाम अजुन ४-५ तासांचा प्रवास होता. सुदैवाने एक विंडोसीट मिळाली आणि मी निर्धास्त झालो. ट्रेन सुटली तरी पश्चिमेकडलं ते आभाळ काही मला सोडत नव्हतं.सुर्य तर केव्हाचा मावळला होता पण ती संध्याकाळ अजुनही क्षितिजावर रेंगाळत होती. 
कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता आणि पुन्हा त्या संध्याकाळच्या क्षितिजावर आठवणींच एक-एक पान उलगडू लागलं. खूप एकाकी वाटू लागलं. मी डोळे मिटून घेतले आणि खिडकीवर डोकं टेकवलं. असं वाटू लागलं की आता या क्षणी कुणीतरी सोबत असावं आणि मी भराभर मनातलं बोलुन दाखवावं. त्यात माझ्या बाजुला एक गुज्जू फेमेली होती आणि त्यांचं अविरत चरणं आणि बोलण्याचा रवंथ सुरुच होता. एक अनामिक असा प्रचंड तणाव मनावर येवू लागला. रतलाम यायला अजुन बराच वेळ होता. मनातल्या आणि आजुबाजूच्या गोंधळामुळे तर झोप येण्याचा ही चान्स नव्हता. म्हणून मग शेवटी वैतागुन फोन घेतला आणि गाणी ऐकू लागलो. त्यात फोनचा मिडीया प्लेयर शफल मोडवर होता आणि तो ही नको ती दु:खी गाणी ऐकवू लागला. 
"कसे सरतिल सये" हे गाणं वाजवायची त्या फोनला काय गरज होती? :डःड असो. 

मी डोळे मिटून गाणी ऐकू लागलो. इंग्रजीत एक म्हण आहे ना कि,"Whenever you have any problem just sing a song, then you will realize that your voice is a lot more worse than your problem.." :D:D:D
 हे आठवून मग मी माझ्या आवाजात कधी काळी रेकॉर्ड केलेली दोन तीन गाणी ऐकली पण तरीही समधान होईना. अस्वस्थता गाण्याच्या रुपानेही सारखी घंघावत होती. आज मला कुणाशी तरी बोलायचं होतं. बरचं काही बोलायचं होतं.जे कधी कुणाला सांगितलं नव्हतं ते आज सांगायचं होतं. केव्हाचं मनात गाडुन ठेवलेलं एक-एक पान आज वाचायचं होतं. पण कुणाशी बोलणार? कुणाला सांगणार? काही व्यथा आपण नाही सांगू शकत कुणाला. काही दु:खं ही आपली आपल्यालाच पचवावी लागतात. अनघा नेहमी म्हणते की, "आपणच आपलं टीकाकार व्हायला हवं आणि त्याचप्रमाणे आपणच आपला स्व:ताचा एक चांगला मित्र ही व्हायला हवं." पण आज मला खरोखर कुणीतरी समोर हवं होतं. ज्याला मनातलं सारं काही सांगून टाकायचं होतं. काय करावं या विचारात असतानाच एक आयडीया सुचली. 

फोनचा म्युझिक प्लेयर बंद केला. 

ब्लॅकबेरीचं नेटवर्क रिमुव्ह केलं त्यामुळे आता कुणाचेही कॉल्स येणार नव्हते आणि मला डीस्टर्ब होणार नव्हता. 
हॅन्ड्स फ्री डीव्हाईस कानाला अडकवलं; ब्लॅकबेरीमधे हल्लीच इन्स्टॉल्ड केलेलं व्हॉईस रेकॉर्डर अ‍ॅप्लिकेशन ऑन केलं आणि बोलायला सुरुवात केली...... 

"हाय! आज मला तुला काही सांगायचं आहे.खूप दिवस तुझ्याशी बोलायचं होतं पण या ना त्या कारणाने राहुनच गेलं. खरं तर मी मुद्दामच तुला ते सांगितलं नाही आणि कदाचित तुला कधी सांगणारच नव्हतो पण आज राहवत नाहीय..." 


अशाप्रकारे बोलत राहिलो. किती तरी वेळ. जणु मी कुणाशी तरी फोनवर बोलतोय या अविर्भावात असल्याने आणि त्यात मी मराठीत तर कधी इंगिशमध्ये बोलत असल्याने आजुबाजूच्या लोकांचा काही त्रास होत नव्ह्ता. 

किती तरी वेळ मी बोलत होतो. बाहेरचा काळोख आता अधिकच गहिरा होत होता. आणि त्या काळोखाबरोबर एक एक आठवण ओठांवर येत होती. क्षणोक्षणी फार हलकं वाटत होतं. आज पहिल्यांदाच मी स्वःताशी इतका वेळ बोलत होतो. आज स्वःताला कुठून तरी शोधून आणलं होतं आणि माझ्यासमोर बसवून स्व:तालाच सगळं काही सांगत होतो. 

कधी त्या मजेशीर, खोडकर आठवणी सांगताना मोठ्याने हासत होतो तर कधी एखाद्या कटु आठ्वणी सांगताना आवाज खोलवर जात होता. 
कधी पाकळीवरल्या दवासारख्या जपलेल्या त्या आठवणी सांगताना शब्द संथ होत होते तर कधी उसळलेल्या लाटांसारखे माझे शब्द काही आठवणींचा मारा करत होते. 

भरभरुन मी स्व:ताशी बोलत होतो आणि नेहमीसारखं बोलताना माझे श्वास फुलत होते. एका विशिष्ट लयीत ट्रेन केव्हाची धावत होती आणि त्या ट्रेनचा आवाज नकळत माझ्या रेकॉर्डींगला बॅकग्राउंड स्कोर देण्याचा काम करत होता. आता बरंच काही मी बोललो होतो. खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूर कुठे तरी अधुन-मधुन विजा चमकत होत्या.. रतलाम यायला अजुन एक तास बाकी होता. मी बोलणं आवरतं घेत होतो आणि बाहेरुन मृद्गंध दरवळू लागला. माझं मन पावसासाठी अधिर झालं आणि त्या मृद्गंधासरशी अजुन काही आठवणी ओठांवर तरळू लागल्या. पण मी स्वःताला आवरत घेतलं कारण मला ठाउक होतं की आता पावसाच्या सरी येतिल आणि जर पाउस आलाच तर मग त्या पावसाच्या आठवणी मला रोखता आल्या नसत्या. 

"आज खूप बोललो तुझ्याशी. मला ठाउक आहे  की तुला जाम पकायला झालं असेल, नाही...? But really thanks to listen to me..   आज खूप बरं वाटतयं. खूप हलकं वाटतयं.. थँक्स अगेन" 


असं बोलून मी माझं रेकॉर्डींग थांबवलं. तब्बल १ तास ५१ मि. मी बोललो होतो. खूप बरं वाटत होतं. फोनची बॅटरीही ड्रेन व्ह्यायला आली होती. रात्री साडे नउला रतलामला पोहचलो. बराच शोधा-शोध केल्यावर एक चांगलं हॉटेल सापडलं.( मायला ते हॉटेल डीसेंट नाही सापडलं कुठे :डःडः) खूप थकलो होतो आणि भूक ही लागली होती. रुमवर बॅग टाकली आणि बाहेर जेवायला गेलो. जेउन आलो. शॉवर घेतला आणि बेडवर पहुडलो. मघाशी रेकॉर्ड केलेली माझी बडबड ऐकावी म्हणुन फोन ऑन केला आणि ते ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळलंच नाही.
रात्री कसलसं स्वप्न पडलं होतं. पहाटे ते मी आठवू लागलो पण काहीच आठवेना. 


आता मला हल्ली असंच कधी भरुन आलं की मी हा उपाय वापरतो. लिहिण्यापेक्षा हे सोप्पं वाटतं. लिहिताना खूप विचार करावा लागतो.
शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. त्यात काही पर्सनल लिहायला गेलो तर कुणाच्या भावना दु़खावणार तर नाहीत ना याचीही काळजी घ्यावी लागते.त्यापेक्षा हे बरं वाटतं. कधी असं भरुन आलं ना की स्व:ताशीच असं बोलावं. आणि जेव्हा  स्वःताशीही काहीच बोलायला नसेल तेव्हा त्या रेकॉर्डींग्ज पुन्हा पुन्हा ऐकाव्यात. फार बरं वाटतं. माहीतीय??गाण्यापेक्षा आपला आवाज इथे फार सुन्दर लागतो. प्रत्येक सूर भावनेच्या तालावर अगदी चपखल बसतो. आणि हो बोलताना नेहमी जे मनात आहे ते स्पष्ट बोलावं. कसलीही तमा, भीती न बाळगता. 

असं
म्हणतात की स्व:ताशी बडबड करणारे वेडे असतात. पण खरं सांगतो हा वेडेपणा करुन बघा मनावरलं एखादं अनामिक ओझं कमी होतं......

- दीप्स

Sunday, July 8, 2012

माझी "शाळा" ... (भाग ६)

आता या भागात माझ्या शाळेचा निरोप घ्यायची वेळ आलीय. खरं तर खूप आठवणी आहेत. तरी ही आठवून आठवून लिहिल्यात. शाळेतला प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी धम्माल असायचा. अरे हो! मागच्या एका भागात लिहीलं होतं की एकदा शिरोडकरला भेटायला जाताना बिचार्‍या समीरचे दात पडले होते. तो किस्सा असा... 

फक्त ती कधी थोडी तरी दिसावी म्हणून मी तिच्या घरासमोरुन सायकलवरुन फिरायचो किंवा नाईकच्या घरी अभ्यासाच्या निमित्ताने जायचो. एकदा रवीवारी संध्याकाळी घरी अभ्यास करत बसलो होतो. कंठाळा आला आणि तिची आठवण येवू लागली म्हणुन सायकल घेतली आणि फिरायला निघालो. जाता जाता वाटेत समीर भेटला. म्हटलं चला याला पण घेउन जाउया. त्याला सायकल दिली आणि मी मागे बसलो. म्हटलं जर ती दिसली तर तिला सोयीस्करपणे बघता  येईल. सायकल मारत मारत तिच्या घरासमोरुन जात होतो. मी लांबूनच तिला ओळखलं. मी सायकल चालवत नसल्याने मस्तपैकी अँगल सेट करुन तिला बघत जाणार होतो. ड्रायवर समीर होता. तिच्या घरासमोर एक शार्प वळणाचा उतार होता. त्या वळणावरुन आम्ही पास झालो. ती मला दिसली. मी तिला पाहत, शायनिंग मारत होतो, उतारावरुन पास झालो आणि काहि तरी गडबड झाली., सायकल अचानक दडबडु लागली. समीर ओरडला, "दिपक्या ब्रेक लागत नाहित.." मला काही समजले नाही समोर रस्त्यावर म्हशी दिसत होत्या. काय झालं किंवा काय होतयं हे कळायच्या आतच सायकल सकट समीर पडला. मी मागे बसल्याने आणि माझे पाय जमिनीपर्यंत पोचत असल्याने मला काहीच झालं  नाही.पण माझ्या समोरचं दृश्य भयानक होतं. समीर सायकल सकट जबरी पडला होता. सायकलमध्ये अक्षरशः अडकून पडला होता आणि ओरडत होता. मी कसाबसा त्याला बाहेर काढला. सायकलचे तीन तेरा वाजले होते. त्याचा हात दुखावला होता आणि जेव्हा मी त्याला ऊठवला आणि जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा मी घाबरुन गेलो. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं आणि त्याचे समोरचे दोन्ही दात पडले होते. त्याल तसा बघून मला धडकीच भरली. त्याचा हात दुखावला होता. बर्‍याच ठीकाणी त्याला लागलं होतं. त्याच्या तोंडाची तर वाटच लागली होती. बिचार्‍याचे समोरचे दोन्ही दात पडले होते. मी कसाबसा त्याला परब डॉक्टरच्या दवाखान्यात घेउन गेलो. आता माझी काही धडगत नव्हती. आई, मामा मला काय सोडणार नव्हते. अपघात जर फक्त खरचटणं वैगरे पर्यंत असता तर ठीक होतं पण त्याचा हात ही दुखावला होता आणि समोरचे दोन दातही पडले होते त्यामुळे हे कांड लपून राहणार नव्हते. डॉक्टरकडून निघुन आम्ही घरी आलो. त्याला त्याच्या घरी सोडला आणि मी माझ्या घरी माझ्या खोलीत येवून गुपचूप अभ्यास करत बसलो.. संध्याकाळी ते कांड आईला समजलंच म्हणा. मला घरात खूप ओरडा पडला पण समीर माझा खरा मित्र होता त्याने कुणाला खरं कारण नाही सांगितलं की आम्ही दोघे सायकलवरुन कुठे जात होतो. दुसर्‍या दिवशी आई त्याच्या आईसोबत त्याला वेंगुर्ल्याच्या सरकारी इस्पितळात घेउन गेली. त्याचा हाताल प्लॅस्टर लागले आणि बिचार्‍याचे दात गेलेच.. शाळेत सगळे त्याला हसायचे, एकदा शिरोडकरने त्याला विचारलं की हे सगळं कसं झालं तर तो तिच्यावर डाफरला, " सगळं तुझ्यामुळे झालं. तुला बघायला तो दिपक तडफडत असतो आणि भोगायला मला लागतं. "  :डःडःड माझ्या नादानपणामुळे बिचार्‍याला बराच त्रास झाला.. 

तर अशी सगळी मज्जा मज्जा...
सहल संपली आणि ह्ळुहळू बोर्डाची परीक्षा जवळ येउ लागली. कितीही अभ्यास केला तरी तो कमीच होता. तशातच शालेय स्पर्धा सुरुच होत्या. काय माहीत का, पण ते वय थोडं बंडखोरीचं होतं. ओठांवर मिसरुडं फुटू लागल्याने आपण आता मोठे होतोय ही भावना आणि त्यातच
अभ्यासाच्या प्रेशरमुळे येणारा राग,चिडचिड साहजिकच होती.शालेय स्पर्धांमध्ये मी हिरहिरीने भाग घेत असे पण दहावीला मी खेळाच्या वैगरे स्पर्धेत भाग घेणे सोडुन दिले. नाही म्हणायला निबंध स्पर्धेत नेहमी पहिला नंबर असायचाच.तशातच वक्तृत्व स्पर्धेची नोटीस सामंत मॅडमनी लावली. यावेळी भाग न घ्यायचा ठरवून मी माझं नाव नोंदवलं नाही.
तसंही काय फायदा होता? काही झालं तरी पहिला प्रशांतचाच नंबर येणार होता, मग मी स्पर्धेत कशाला भाग घेउ?
फक्त तो माझ्यापेक्षा सरस आहे हे सिद्ध करायला का?
मी चिडलो होतो. तसंही वर्गात माझ्याशिवाय आणि प्रशांतशिवाय दुसरं कुणी भाग घेत नसे.सलग दोन वर्षे माझं भाषण चांगलं होउन ही मला कधीच बक्षिस मिळालं नव्हतं. म्हणून यावर्षी भाग घ्यायचाच नाही असं मी मनाशी ठरवलं होतं.
सामंत मॅडमनी मला भाग न घेण्याचं कारण विचाअरलं तर मी सांगितलं की, मला जमणार नाही.अभ्यास करायचाय आणि स्पर्धेत भाग घ्यायची माझी इच्छाही नाही.पण मॅडम
कणार नव्हत्याच,त्यांनी माझं नाव टाकलंच.पण मी ही हट्टाला पेटलोच होतो. नाही करणार म्ह्णजे नाही.

स्पर्धेचा दिवस आला आणि इतर स्पर्धकांबरोबर माझं ही नाव पुकारलं गेलं.मी उठलो आणि त्या विषयावर जे माहित होतं ते बोललो. ते केवळ Extempore होतं. कसली ही तयारी केली नव्हती.मी त्या विषयावर जे
माहित होतं ते आठवून आठवून बोलत होतो आणि त्याला काहीच अर्थ नव्हता.स्पर्धेचा निकालः अ‍ॅज युज्वल प्रशांतचा नंबर पहिल्य तिघांत आला.स्पर्धा संपल्यावर मुख्याध्यापकांनी सगळ्या स्पर्धकांचं कौतुक केलं पण माझं नाव घेउन बोलले की," कोणती ही स्पर्धा ही स्पर्धा असते.त्याचा आदर करणं ही त्या स्पर्धाची जबाबदारी असते.परुळेकरसारख्या विद्यार्थ्याकडुन मी अशी अपेक्षा केली नव्हती."
मला ते खूप लागलं. सगळे शिक्षक आणि विद्यार्थी माझ्याअकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मी खूप नर्व्हस झालो होतो. माझी चूक मला समजली पण तोवर खूप उशीर झाला होता. 


या अशा सगळ्या मिश्रित भावनांच्या गुंतागुंतीचं ते वय होतं.अभ्यासाव्यतिरिक्त मी
काय करतोय हे कधी कधी माझं मलाच कळत नसे.पण या सगळ्यात महत्त्वाचा होता तो अभ्यास.काही करुन चांगले मार्क्स मिळवायचे होतेच.परीक्षा जवळ येत होती आणि अभ्यासाचा प्रेशर वाढत होता.अभ्यास करायला आम्ही सगळे वेगवेगळे बसायचो.तरीही दिवसातले एक - दोन तास मी बाकिच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचो.एका वाक्यातली उत्तरे, दोन-तीन मार्कांची उदाहरणे वैगरे वैगरे..मी वर्गात त्यांचे पाठांतर वैगरे घ्यायचो.एकदा मी, प्रशांत, शांताराम आणि अमोल असे प्रयोगशाळेला लागुन असलेल्या छोट्या बागेत अभ्यास करत बसलो होतो.शाळा सुटायची वेळ झाली होती आणि तेवढ्यात बाबाजी गावडे धावत आमच्या इथे आला.
"दिपक्या! मेल्या, कोळसुलकरानं तुजी वाट लावल्यानं! " आणि जोराजोरात हसू लागला.
मला कळलं नाही. " काय झाला रे? काय केल्यान कोळसुलकराने?" मी घाबरत घाबरत विचारलं.
"अरे मेल्या, काय सांगा!" तो हसणं आवरतच नव्हता. आता या बुटक्याला उचलुन आपटावे असं वाटु लागलं.
हसणं आवरुन तो बोलु लागला, " अरे
सातार्डेकर म्यॅडम वर्गावर होत्या आणि नववीच्या वर्गातली मुलं बाहेर व्हरांड्यात गोंधळ घालत होती.त्यात शिरोडकरनीचो आवाज खूप होतो.मग म्यॅडमनी तिला वर्गात बोलावलं आणि ओरडू लागल्या की शिरोडकर काय गडबड सुरु आहे?का एवढा आवाज करतेय? वैगरे वैगरे... "
"मगे? फुढे काय झाला?" माझी उत्कंठा शिगेला.
"अरे,म्यॅडम तिला हे विचारित असतानाच कोळसुलकर आराडलो,"म्यॅडम, ती तशी ऐकणार नाही.खूपच मस्ती करते आजकाल. तुम्हाला ऐकणार नाही ती, परुळेकरला नाव सांगा तिचं! हा हा हा हा!"
बाबजी बरोबर आम्ही सगळे हसायला लागलो. अर्थात माझं हसणं जर वेगळंच होतं. एक हळूवार कळ ह्रद्यातून जात होती. ते वय असंच असतं ना? आपल्याला कूणेतरी आवडतयं,कुणावर तरी आपलं प्रेम आहे हे आपल्याला आपले आजुबजुचे मित्रच जास्त जाणवून देतात. माझ्या नशिबाने मला पहिल्यापासुनच असे मित्र लाभले की मी बिंधास्त त्यांच्याबरोबर सगळं शेअर करतो अगदी आजही.अर्थात आता परिस्थिती थोडे वेगळी आहे पण चलता हैं...
"मग काय झाला रे?" मी बाबाजीला विचारलं.
"मगे काय नाय रे! सगळेजण हसायला लागले. शिरोडकर लाजुन पळून गेली आणि
म्यॅडमनी कोळसुलकराक दोन धपाटे घातले." बाबाजी जे काही सांगत होता ते सगळं मी डोळ्यासंमोर आणत होतो. कशी दिसली असेल ना ती ? कशी लाजुन पळून गेली असेल.... 
_______________________________________________________________


शेवटी बोर्डाच्या परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली. आणि तशातच तो दिवस जवळ येवू लागला जो मला कधीही नको हवा होता. "निरोप समारंभ किंवा सेंड ऑफ्फ." या दिवशी शाळेचा आणि आमचा संबंध कायमचा संपणार होता. शाळेचे ते वर्ग, त्या भिंती, बेंचेस, पटांगण, सर्व.. सर्व काही आम्हाला दुरावणार होते. आयुष्यात पुढे काय वाढुन ठेवलयं याचा विचार तेहा डोक्यात नव्हताच. फक्त शाळेपासुन दूर होण्याची कल्पानाही सहन होत नव्हती. शेवटी आमचा निरोप समारंभ पार पडला. सगळेचजण अपसेट होते. काही मुली रडत होत्या.शिक्षकांच्या भाषणाने आम्ही भारावून गेलो होतो. तीन वर्ष आम्हाल अगदी स्वःताच्या मुलांप्रमाणे त्यांनी आम्हाला जपलं होतं. खरं तर आमच्यापेक्षा या दिवशी शिक्षकांनाच खूप वाईट वाटायचं कारण दरवर्षी त्यांना या दिवसाला सामोरे जावे लागयाचे. आणि प्रत्येक बॅचमधल्या मुलांवर त्यांचा तसाच जीव होता. मी ही यावेळी भाषण केलं. खूप भारावून गेलो होतो. शब्द धड बाहेरही पडत नव्हते. पण हळूच डोळ्यांतुन पाणी मात्र झिरपू लागले. एक प्रसंग आठवला. दहावीच्या सुरुवातिला मुख्याध्यापकांनी "पालक - सभेसाठी" प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या एका तरी पालकांना आणायचे असे सांगितले होते. माझे वडील मुंबईला असायचे आणि आई अशिक्षित! माझी ही शंका मी त्यांना बोलावून दाखवली.
"परुळेकर आम्ही पाचजण ( शिक्षक )  तुझे पालक आहोत, त्यामुळे तुझ्या आई किंवा बाबांना बोलवायची गरज नाही!" त्यांच्या त्या उद्गारांनी मी त्यावेळी खूप भारावलो होतो.निरोप समारंभ संपत आला होता आणि आम्ही शाळेला कायमचे पोरके झालो होतो. त्यानंतर आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी म्हणुन उरलो होतो. परीक्षा सुरु होईपर्यंत आम्ही नेहमी शाळेला जायचो, अभ्यास करायचो, सराव परिक्षा व्हायच्या पण का कुणास ठाउक उगाच एक परकेपणा जाणवायचा. निरोप समारंभ जरी झाला तरी शाळेने आम्हाला कधी पोरकं केलं नाही कदाचित आमच्या मनातच तो पोरकेपण दाटुन आला. 
________________________________________________________________

स्वारी मित्रांनो! काल पासुन गुगल्याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित? ब्लॉगवर धड पोस्टच होत नाहीय. आता हा भाग शेवटचा होता पण यापेक्षा जास्त पोस्ट होत नाहीय. त्यामुळे पुढचा आणि अंतिम भाग लवकरच टाकतो..

- दीप्स

Thursday, April 26, 2012

वहाँ कौन हैं तेरा....

काही वेळा हे शब्द असे काही खेळतात ना की बस्स्स ! उगाच मनात इकडे तिकडे उड्या मारत फिरत असतात पण त्यांना पकडुन एक योग्य वाक्य करायचं म्हणजे नाकी नउ येतात.. 
हे असंच कित्येक दिवस चाललयं.. माझ्या डायरीमध्ये कित्ती तरी खाडाखोडी झाल्यात. जीमेलच्या ड्राफ्टमध्ये असे कित्येक परिच्छेद तसेच्या तसे पडून आहेत. पण नाही जमत... 
खरं तर माझं सगळं लिखाण हे असंच तिच्या डोळयांपासून सुरू होउन तिच्या ह्रद्यापर्यंत पोहचू पाहणारं... 
प्रत्येक शब्दात तिला ह्रद्यातुन मारलेली हाक.. 
प्रत्येक वाक्य जणू तिच्यासाठी गुंफलेला बकुळीच्या फुलांचा गजरा..( स्वारी, गजरा नाही ! तिला गजरा नाही आवडत. बरं मग गाजराचा हलवा :) ) 

आज कित्ती दिवसांनी तिला पाहिलं आणि इकडे तिकडे उड्यामारणारे शब्द आज अचानक कागदावर अलगद उतरु लागले.  बॅकग्राउंडला  " मर जायियां, तेरे बिन मर जायियां रे..." हे गाणं  आणि या जीवघेण्या संध्याकाळच्या वेळी तिच्या त्या पारिजातकी  आठवणी....
ती आजही तशीच पारिजातकाच्या अल्लड फुलासारखी. पहाटेच्या प्रसन्न वेळी रोमांरोमातुन भिनलेल्या सुगंधी जहरासारखी. पण सगळ्यात जहरी तिचे डोळे..  
ती माझ्या समोर होती, किती तरी वेळ, पण तिच्या त्या डोळ्यांत मला पाहता आलंच नाही... 
तिच्यापेक्षा मला तिच्या डोळ्यांनिच जास्त वेड लावलं होतं आणि ते या जन्मी तरी सुटणार नाही हे नक्की...
हे! तिच्या त्या टपोर्‍या डोळ्यांवर मी काही कविता पण केल्या होत्या... त्यातली एक..

तुझ्या डोळ्यांना सांगून ठेव
ते नेहमी मला वेड लावतात
तसा मी आहेच थोडा वेडा पण ,
ते चारचौघातही मला वेड्यात काढतात... 

आणि जेव्हा ती डोळ्यांत काजळ घालायची तेव्हा तर उफ्फ्फ्फ!  
मोकळे सोडलेले तिचे ते उसळलेल्या लाटांसारखे लहरी केस आणि अमावास्येच्या काळोखासारखे तिचे ते का़जळी डोळे. 
मी कितिदा तिला सांगायचो डोळ्यांतलं थोडं काजळ घे आणि गालावर एक ठिपका लाव, कुणाची नजर लागली तर,.... आणि मग त्यावर ही चार ओळी सुचल्या होत्या...

वारा उसळे असा भरारा,
तुझ्या केसांतुन वादळ लहरे.
नभि दाटति अवचित घन जसे,
तुझ्या डोळ्यांतले काजळ गहिरे... 

आता तिचे ते डोळे आठवत नाहीत, आठवते फक्त तिची ती संदिगध नजर.. थेट ह्रद्याला भिडणारी...
मला माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, तू नेहमी ग्लेअर्स लावून का फिरतोस? "  
त्यावर माझं उत्तर असायचं "माझ्या डोळ्यांतली "ती" कुणाला दिसू नये म्हणून!"
********************************************************************************

त्यादिवशी बर्‍याच दिवसांनी आईच्या मांडीवर पहुडलो होतो.. ती माझ्या केसांतुन हात फिरवत होती... आणि समोर टीव्हीवर एक गाणं सुरु होतं;
वहाँ कौन हैं तेरा मुसाफिर जायेगा कहाँ....

ऑफिस, टार्गेट, रिपोर्ट्स, रिव्ह्युझ, मंथ एन्ड, ....... आणि मनातल्या त्या व्यथा..... सांगाव्या तरी कुणाला???   ह्रद्य भरुन जातं. कुठूनशी एक कळ ह्रद्यात येतें आणि बराच काळ ती कळ त्रास देत राहते. ह्रद्याच्या जवळचं असं कुणीच नसतं..

कळा ज्या लागल्या जीवा, मला का ईशवरा ठाव्या
कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या...

माझं वर्क प्रोफाईल सेल्स/मार्केटींगमधलं असल्यानं मला वाटु लागतं की मी माझ्या फिलिंग्ज्सचं पण मार्केटींग करु पाहतोय, बदल्यात मी काय अचिव्ह करणार ????  आणि त्याचा रिपोर्ट कुणाला करणार?? आणि मला काय अ‍ॅवार्ड मिळणार ?? " द फिलिंग ऑफ द मंथ"   :D:D:D

काही दिवसांनी लक्ष्यात येतं की आता या यातनेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवाच... म्हणुन डॉक्टरकडे जातो.. सगळ्या तपासण्या झाल्यावर भुवया उंचावून आणि चेहर्‍यावर उसनं हसू  आणुन  ते माझ्या हातात माझ्या ह्रद्यांच्या स्पंदनांचा आलेख देतात... मी वाचतो

ECG = Emotionally Confused Graph... :D:D:D


ते गाणं, ऐकता ऐकता बरंच काही सांगुन गेलं...

बीत गये दिन, प्यार के पलछिन
सपना बनी वो रातें.
भूल गये वो, तू भी भुला दे
प्यार की वो मुलाकाते....
सब दूर अंधेरा, मुसाफिर जायेगा कहाँ....

मला खरंच ठाउक नव्हतं की मी कुठे चाललोय ते.. पण चालायच तर होतंच ना... माझ्यासाठी कूणी थांबलं नव्हतं... वाट मलाही शोधायची होतीच पण तिच्याशिवाय एकटं चालणं मनाला पटत नव्हतं...

एकदा तिने मला विचारलं होतं, " जर मी सगळ्यानां सोडुन तुझ्याकडे कायमची आले तर??"
मी उत्तरलो. " हजारवेळा विचार कर. एकदा माझ्याकडे आलिस तर मला सोडुन जाण्याचा विचारही तुझ्या मनात येणार नाही!"  ( मायला मी उत्तर जरा जास्तच भारी मारलं का राव? ती कधी आलीच नाही, ;)

पण मग मी एकटं चालायचं ठरवलं. वाट वेगळी केली.. फक्त, माझी वाट एकट्याची होती...  नेहमीसारखीच.

जो मिल गया गया उसिको मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया....

छे ! ही गाणी फक्त फेसबुकवर स्टेटस म्हणून छान वाटतात.. कारण कित्येकदा विसरायचं ठरवून ही तिला विसरणं जमत नाही...
मला तिला विसरायचं होतं पण ते शक्य नव्हतं.. एव्हाना ती माझ्या अस्तित्वाचा एक भाग झालीय आणि स्वःताच्या अस्तित्वापासुन दूर राहता येतं का कधी? 
फक्त तिला मनातुन काढायचं होतं.माझ्यासाठी हे नविन नव्हतं. असं कित्येकदा मी तिच्यापासुन दूर गेलो होतो आणि असं प्रत्येकवेळी तिने मला.......

वाट वेगळी केल्यावर मी चालु लागलो, अनेकदा मागे वळून पाहिलं... त्या नादात बर्‍याचवेळा धडपडून पडलो.. पण मागे वळून बघण्यात अर्थ नव्हता... मनात ठरवलं होतं " This time I'll honor my commitmeint "  
मग त्या गाण्यातल्या पुढच्या ओळी ह्रद्यावर घाला घालू लागल्या...

कोई भी तेरी राह न देखे
नैं बिछाये ना कोई.
दर्द से तेरे कोई ना तडपा
आँख किसी की ना रोई
कहे किसको तू मेरा.... मुसाफिर जायेगा कहाँ....

- दीप

Sunday, March 11, 2012

किनारा....

एक अंधारलेली, काळी, कभिन्न रात्र!
आकाशात एका तार्‍याचाही प्रकाश नव्हता. डोळ्यांना आंधळा करणारा काळोख. 
अशा त्या काळोख्या रात्री एक नाव अथांग महासागरातुन पाणी कापित पुढे जात होती.
दिशाहीन, भरकटलेली, तुटलेली, अस्मितेला तडे गेलेली पण तरीही स्वःताचे अस्तित्व न हरवलेली.
स्व:ताच्या अस्तित्वावर ठाम राहुन ती नाव तशीच पुढे पुढे जात होती.

आत्ताच काही वेळापूर्वी एका प्रचंड वादळाच्या तडाख्यातुन ती बाहेर पडली होती. हे वादळ तसं तिला नवखं नव्हतं. अशा कित्येक वादळांना ती मोठ्या धैर्याने सामोरी गेली होती. त्या सार्‍या वादळांनी त्या नावेचं सारं विश्वच हिरावून घेतलं होतं. त्या वादळाने तिच्या अस्मितेला तडाखा दिला होता. तिच्या अस्तित्वावर आघात करुन तिला त्या महासागरात भरकटवून दिलं होतं. पण कोणतंही वादळ तिचं अस्तित्व हिरावून घेउ शकलं नव्हतं. तसाही तिचा आता कुणावरही विश्वास उरला नव्हता. ज्या वार्‍याचा रुपावर भाळून आणि त्याच्या वेगावर लुब्ध होउन ती नाव आपलं घर सोडून त्याच्यासोबत वाहत गेली होती, त्याच वार्‍याने अचानक वादळाचं रुप घेउन तिच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. सोडुन दिलं होतं तिला त्या महासागरात दिशाहीन!
बिचारीला ठाउक नव्हतं तो वारा कसा बहीरुपी होता ते!

ती तिच्या घरी, नदीच्या किनारी जेव्हा पाण्यावर तरंगत असे तेव्हा हा वारा एक झुळूक होउन तिच्या भोवती फिरायचा. तिच्या सर्वांगावरुन वाहायचा. तिला महासागराच्या विशाल रुपाची स्वप्ने दाखवायचा....
तिलाही त्या नदीच्या छोट्याश्या पात्रातून बाहेर पडायचं होतं. समुद्रात मुक्त विहार करायचा होता. मोठीमोठी जहाजं, गलबतं पाहायची होती. पण काही केल्या तिचं मन धजत नव्हतं. आईला सोडुन जाण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती.
पण शेवटी, एके रात्री हळूच आईच्या कुशीतुन, तिचा वेढलेला हात बाजुला करुन त्या वार्‍याबरोबर ती महासागराच्या दिशेने निघाली....

डोक्यावरलं निराकार आभाळ आणि तो अथांग महासागर या व्यतिरिक्त तिला आपलं असं कुणीच नव्हतं. कित्येक दिवस-रात्र ती अशीच पाण्यावर तरंगत जात होती.कुठल्याही दिशेचा तिला अंदाज नव्हता.आपण कुठे जातोय? आपला काय शेवट होईल याची तिला बिलकुल कल्पनाही नव्हती. किंबहुना ती या सगळ्या गोष्टींचा विचारही करत नव्हती. फक्त अथकपणे पुढे पुढे जात होती. इथे ही त्या वार्‍याने तिची पाठ सोडली नव्हती. तो प्रत्येकवेळी तिला भरकटवत होता.पण आता तिचा त्याच्यावर बिलकुल विशवास उरला नव्हता. 

असे कित्येक महिने तिचा प्रवास सुरुच होता. प्रत्येकवेळी तिला तिच्या आईची म्हणजेच नदीची आठवण येई. दिवसा ती निमुटपणे आपला प्रवास करत असे पण अंधार पडला की तिच्या डोळ्यांना पूर येई. आईच्या आठवणीने ती व्याकुळ होई, एकही हुंदका न देता मुक्यानेच रडत राही. तिचे अश्रु त्या महासागरात विरघळून जात आणि तिला तसं रडताना बघुन, तिच्या प्रत्येक अश्रुने त्या विशाल महासागरालाही भरती येत असे. आकाशही तिच्या मुक्या आसवांनी बरसणं विसरुन जाई.

अश्याच एका रात्री प्रवास करुन थकलेली, आसवे गाळून कोरडी झालेली ती नाव आकाशातल्या तार्‍यांची चादर घेउन निद्रीस्त झाली. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिचा स्व:ताच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
एका सुंदर किनार्‍यावर ती विसावली होती.
किनार्‍यावरला शुभ्र वाळूत ती पहुडली होती. किनारा फारच सुन्दर होता. हिरवळीने नटला होता. स्वच्छ सुर्यप्रकाशात ती वाळू चमकत होती. वाळुच्या पुढेच काही अंतरावर खूप प्रकारची झाडे आणि फुलझाडे होती. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या झाडांवर तालासुरात गात होते. रंगीबेरंगी फुलपाखरे वेलींवरुन आणि फुलझाडांवरुन बागडत होती. आणि या सर्वांत तो शांत किनारा फराच उठुन दिसत होता. एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखा तो किनारा तिला भासत होता. निश्चलपणे तो किनारा कधी त्या नावेकडे तर कधी त्या महासागराकडे बघत होता. किनारा आपल्याकडेच बघतोय. हे जाणुन ती नाव थोडीशी बावरली पण त्वरीत सावरली. अनेक दिवसांच्या प्रवासाने ती मनाने पार थकुन गेली होती. तिला ग्लानी आली आणि तश्यातच ती नाव पुन्हा त्या किनार्‍यावर विसावून गेली. किनार्‍यावर अंग टेकताच ती निद्रेत विलीन झाली......


क्रमशः

Thursday, January 12, 2012

सायंकाळी एके वेळी...

गजबजलेला दिवस सरताना आणि निद्रेची रात्र पांघरताना, या दोन्ही वेळेंना जोडणारी एक प्रसन्न संध्याकाळ मला नेहमीच हवी हवीशी वाटते. आज बर्‍याच दिवसांनी अशी एक संध्याकाळ आली. बरं, आली तर ती एकटी थोडीच येणार होती. मागल्या सार्‍या संध्याकाळच्या आठवणी सोबत घेउन आली. घराच्या बाजुला असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन मोठ्याने हॉर्न देत धडधडत निघून गेली. वेगळं काही नाही. या ट्रॅकवरुन अशा अनेक ट्रेन्स दिवस रात्र धडधडत ये-जा करत असतात. पण आजच्या या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेनही माझ्या आठवणी धडधडत घेउन आल्यागत वाटतेयं. समोरच्याच झाडावर दाटीवाटीने जमलेले पक्षी. स्थलांतर करुन आलेले. दिवसभरच्या प्रवासाने थकलेले, दमलेले. त्यांच्या त्या किलबिल आवाजातही माझ्या अशाच दडलेल्या आठवणी. आणि पश्चिमेकडे मावळणारे ते सोनेरी आकाश. अक्षरशः सोनेरी! जाताना सूर्याने दिवसभर गोळा केलेले सोने सायंकाळी क्षितिजावर फेकून गेलाय.. लूटा! ज्यांच्या नशिबात आहे त्यांनी ते लूटा! पण मला फक्त लूटायच्या आहेत त्या सोनेरी आठवणी.

आयुष्यातली महत्त्वाची स्थित्यंतरे या अशा संध्यासमयीच माझ्या मनाच्या क्षितिजावर दाटीवाटीने जमा होतात. मग सुरु होतो आठवणीचा पाठ्शिवणीचा खेळ. त्या सोनेरी क्षितिजाच्या रेषेवर उलगडत जातं एक एक पान. शक्य नसतं, सगळ्या आठवणी एका संध्येला वाहून देणं आणि अशी संध्याकाळ पुन्हा पुन्हा येणं हे ही आजच्या गजबजत्या आयुष्यात कठीण होउन राहयलयं. मग जश्या आठवणी त्या संधीप्रकाशात उजळत जातिल तश्या त्या चेहर्‍यावर खुलत जातिल. कधी किंचीत स्मित, कधी गालांवर स्वार झालेले ओठ, कधी खोल गेलेले डोळे, तर कधी हसणारे डोळे तर कधी ओलावलेल्या पापण्या.... 
आठवणी चेहर्‍याच्या तर्‍हाच बदलून टाकतात नै! आणि संध्याकाळ ही ती केवढी? अगदीच लहान.. जेमतेम डोळ्यांत भरुन वाहुन जाईल इतकीच... 

संध्याकाळ जीवघेणी असते. उजेड आणि काळोख यांचा मध्य साधणारी ही संध्याकाळ ह्रद्यात खोलवर रुतत जाते. मग कधी अश्याच जेवाघेण्या संध्यासमयी फराझच्या डोळ्यातुन हे शब्द पाझरले असतिल...

हुई है शाम तो आँखों में बस गया फिर तू
कहाँ गया है मेरे शहर के मुसाफ़िर तू .....
  

शब्दांची माळ गुंफत, असेच शायर, कवी या उद्विग्न संध्याकाळी निरंतर फिरत असतात...
मी सुद्धा असाच मग या संध्येच्या प्रवासाचा एक यात्रिक होउ पाहतो. माझ्या जोडीला असते माझी उध्वस्त कविता आणि संध्येला वाहीलेले डोळे. मी ही शोध घेत राह्तो त्या हरवलेल्या नजरेचा. माझ्या उध्वस्त कवितेला कधी तुझ्या अस्तित्वाची छाया जरी मिळाली तरी मग ती कविता फूलु लागेल. विखुरलेल्या शब्दांना एक लिरीकल आयाम मिळू लागेल. तुझ्या डोळ्यातून पाझरणारे संध्येचे शब्द माझ्या ओठांनी टीपून घेईन, तुझा एखादा असाच कधीचा चोरटा स्पर्श माझ्या अंगावरुन शहारुन जाईल आणि मग माझी ही एक कविता अशीच तयार होईल...  

अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात साचलेली.
तुझ्या स्पर्शाची आठवण
पापणीआड दाटलेली...

तुझ्या या अशा चोरट्या स्पर्शाच्या आठवणीत मला लोटुन माहीत नाही ही संध्याकाळ आता मला कुठे घेउन जाईल. माझ्या क्षितिजावरली संध्याकाळ तुझ्या क्षितिजावर ही उमटेल का? कधी पुन्हा जर अशीच एखादी संध्याकाळ जर मिळाली ना तर मग मी तुला साद देईन, मनात सारे आकाश भरुन माझ्या क्षितिजाच्या रेषेवर निघून ये. उरात असलेले सारे कोंडलेले, गुदमरलेले श्वास माझ्या मिठीत रिते कर...निघून ये डोळ्यांत भरुन सार्‍या दु:खांचा पाउस आणि करुन टाक चिंब मला... ये घेउन तुझं ते घायाळ ह्रद्य !!

खायला उठलेल्या जगापासून, सर्वकाही सोडून एक कोकरु हळूच, धडधडते, कोवळे ह्रद्य एका सिंहाच्या हवाली करते,ते ही अशाच संधीप्रकाशात! आणि तो सिंह ही त्या कोकराच्या किलकिलत्या डोळ्यांत पाहुन अस्पष्टपणे उच्चारतो,
"And, so the Lion fell in love with Lamb..!"
आणि या त्याच्या वक्तव्यावर ते कोकरु स्वःताच्या वेडेपणावर हासत बोलते, 
"What a stupid Lamb!"
आणि मग त्या संधीप्रकाशात दोघेही विलिन होउन जातात. प्रेमाचा हा वेडेपणाही अशाच एका संध्येला भरात येतो.  त्याच्या आठवणीत उद्विग्न, झालेलं कोकरु मग त्या सांजगारव्यात गाउ लागतं...
   

I'hv died everyday waiting for you,
Darling don't be afraid I've loved you,
For a thousand years,
I'll love you for a thousand more years...