Monday, November 22, 2010

निशिगंध...४

काही वेळाने आम्ही बांद्र्याला एका रेस्टॉरंटमध्ये पोचलो. खूप वेळ दोघेही फक्त बसुन होतो.. मी दोन कॉफी ऑर्डर केल्या.. रिया काहीच बोलत नव्हती.आज ती नेहमीची रिया नव्हती. काही तरी झालं होतं आणि ते फार गंभीर असल्याचं मला जाणवत होतं.मी तिला कधी अश्या मुडमध्ये पाहिलंच नव्हतं त्यामुळे मला ती सहन होत नव्हती. "रिया?? ए, रिया"
दोनवेळा हाक मारुनही बाईसाहेबांचं लक्ष्य नव्हतं. शेवटी न राहवून एक टपली दिली.. 
"अं?? साल्या मारतो काय?" 
" अगं, काय झालं? काही बोलशील? भेटल्यापासुन नुसती मुर्तीसारखी आहेस." 
" नाहे रे, काही नाही!" 
" तुला माहित आहे रिया, हे जे काही नाही आहे ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, काही तरी आहे पण ते संगायचे नाही, मनातल्या मनात ठेवायचे आणि मनातल्या मनात मारामारी करायची, स्वतःशीच! स्वतःच्या भावनांना इतरांमुळे छळायचं! हे ठीक नाही ! मला तुझा असा हा उतरलेला चेहरा नाही बघवतं. बोल रिया, बोल मनात ठेवू नकोस ! सांग ना काय झालं ते " 
" अरे, खरंच काही नाही रे ! बस्स थोडंस एकाकी वाटत होतं, म्हणुन तुला बोलावलं तर तु पण लेक्चर द्यायला सुरुवात केली.!" 
" रिया, लेक्चर नाही गं, आणि मी तुला आज नाही  ओळखत. 
मी सकाळपासुन बघतोय तु नेहमीसारखी नाहीस. समथिंग इज राँग बट यु डोन्ट वान्ट टु टेल मी! भले ऑफीसमध्ये तु माझी बॉस असशील पण बाहेर आपण फ्रेंड्स म्हणुनच वावरतो ना!?" मी बडबड करत सुटलो होतो आणि ती शांत चित्ताने एकटक माझ्याकडे बघत होती. मध्येच थांबुन मी तिला परत हलवलं," काय?? मी काय इथे किर्तन सांगतोय??" ती हसली.. 
" नाही, पण तु छान बोलतोस.. तु बोलत राहिल्यावर फक्त तुला ऐकत राहावंस वाटतं!"
" मॅडम, आता आवरा! आणि ही कॉफी घ्या!" कॉफी घेता घेता तिने मला मिराबद्दल विचारलं,  मी जास्त काही बोललो नाही.
 "मग कसं चाललंय तुझ्या लग्नाचं?" 
" कसलं काय गं? फक्त ओळख झालीए, बघु शनीवारी भेटणार आहे ती.!"
" अरे व्वा , अ डेट काइंड ऑफ्फ? " 
" अम्म्म, यु कॅन से सो!"
"कशी आहे रे ती?" 
" सोड ना, मला कुणी तरी सांगितलंय की एका सुंदर मुलीसमोर दुसर्‍या मुलीची तारीफ करु नए म्हणुन ! " 
" अरे पण मे कुठे सुंदर आहे. तु माझ्यासमोर बोलु शकतोस !" 
" सोड ना रिया, बोल काय झालं? समीरशी काही झालं का? " माझ्या या प्रश्नावर तिचे हसरे गाल परत खाली उतरले. 
" रिया, बोल ना." 
" काही नाही रे, त्याच्याशी काय होणार? बोलायला, भांडायला तो घरी तर असायला हवा ना! गेले कित्येक दिवस मी त्याचाशी मनमोकळेपणाने बोलल्याचं आठवत नाही. गेले कित्येक दिवस मी त्याला डोळे भरुन पाहिल्याचंही मला आठवत नाही. त्याचाकडुन तर मी ही अपेक्षाही नाही करु शकत. रात्री अपरात्री कधी ही घरी येतो. कधी जातो. आजकाल मला असं वाटु लागलयं की मी समीर नावाच्या एका आकृतिबरोबर राहतेय. काय करु? त्याला कसं समजावू? काही बोलायला गेलं तर काहीच सांगत नाही. नुसतं काम आणि काम करत बसतो.. काय करायचाय इतका पैसा?? तिकडे त्याची आई लग्नाला दोन वर्षे झाली तरी मुलं नाही म्हणुन बोंबलतेय पण स्व;ताच्या मुलाला काही बोलत नाही. मला नाही वाटत का रे आई व्हावं असं! मी या सगळ्यासाठी माझं करीअरही सोडायला तयार होते. फक्त त्याच्यासाठी. पण आता तोच माझ्यापासुन दुर जातोय. किती थांबावायचा प्रयत्न करतेयं पण कधी कधी वाटतं की माझेच प्रयत्न तोकडे पडतात. काय करु मी? कुठे जाउ तेच समजत नाही. " बोलता बोलता तिच्या डोळ्यांला भरती आली. मला काय बोलु ते सुचत नव्हते. मी तिच्या हातावर हात ठेवला. " होईल, सगळं काही ठीक होईल. डोन्ट वरी" इतकाच काय तो सामान्य आधार मी तिला देवु शकत होतो. 
तिच्या हातावर ठेवलेला हात मला उचलावासा वाटत नव्ह्ता. असं वाटत होतं की तिलाही असं वाटत असेल. मी माझा हात उचलुन घेणार इतक्यात तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि काठोकाठ भरलेल्या पापण्यानी ती माझ्याकडे बघु लागली. तिची नजर मला थोडीशी अस्वस्थ करत होती. पण.. मी माझा हात हळूच सोडवून घेतला. " चल निघुया? इट्स ऑलमोस्ट सेवन नाव !" 
बिल पेड करुन आम्ही बाहेर पडलो आणि गाडीच्या इथे जातच होतो इतक्यात समोरुन समीर येताना दिसला. त्याला बघुन रिया थोडीशी बावरली. जवळ येतच त्याने विचारले," अरे इकडे काय करताय??," 
माझ्यकडे बघत मलाही विचारले," हे ड्यूड ! हाव आर यु? " 
" अ‍ॅम ग्रेट! थँक्स! व्हॉट अबाउट यु ?" माझ्याकडे न बघता तो उत्तरला, अ‍ॅम ऑके!"  
" अरे काही नाही, एक मिटींग होती इथेच, ती संपवून कॉफीसाठी आलो होतो."  
ममाला फोन करायच्या बहाण्याने मी जरा बाजुला गेलो, दोघांचं काही तरी बोलणं सुरु होतं. मी रियाकडे बघत होतो. तिच्या चेहर्‍यावर विनवणी, राग, वैताग स्पष्ट दिसत होता.. एक दोन मिनिटाच्या धुमश्चक्रीनंतर समीर तणतणत त्याची गाडी घेउन निघुन गेला. रिया तिथेच त्याला बघत तिच्या गाडीसमोर उभी! निच्छल ! काय करावे त मलाही सुचत नव्हते! मी तिच्याकडे गेलो. तिचा तो अश्रुनी भरलेला चेहरा! छे ! मला ते पुसवतपण नव्हते! तिचे तिनेच पुसावे! मी तिच्या हातातली चावी घेतली आणि गाडी स्टार्ट केली. तिला काय झालं हे विचारायची इच्छा होत नव्हती आणि विचारुनही ती सांगणार नव्हती. आम्ही दोघेही शांत होतो..काही बोलण्यासारखेही नव्हते! थोड्यावेळाने ती गाढ झोपी गेली! आठ एक वाजता आम्ही वाशीच्या ब्रीजपर्यंत पोचलो. मेन ब्रीजवर ट्रॅफीक मिळेल म्हणुन मी गाडी जुन्या ब्रीजवरुन घेतली.रिया अजुनही झोपलीच होती.  एका बाजुला मी गाडी उभी केली. रिया अजुनही गाढ झोपेत होती. तिला ऊठवावसं वाटत नव्हतं. रिया, ए रिया ! दडबडुन ती उठली. "अं? अमम्म?? काय झालं ? कूठे पोचलो! बापरे कसली झोप लागली होती!" 
" आपण वाशीला आहोत.!"
" वाशीला? तु मला उठवलं का नाही?? उगाच आता तुला माझ्यामुळे त्रास! " 
"इट्स ओके.तु झोपली होतीस, म्हणुन तुला नाही ऊठवलं! चल कूठे आहे तुझं घर? मला स्टेशन वर ड्रॉप कर! मी जाईन तिथुन!" 
" अरे तु माझं घर नाही बघितलं ना अजुन? चल माझ्या घरी! आपण आज सोबत डीनर घेउ!" 
" अरे रिया! नको, इट्स ओके. नेक्स्ट टाईम कधी तरी. आज तसं पण ऊशीर झालाय!" माझ्या नकाराबरोबर तिचा चेहरा परत उतरला! "ठीक आहे". उसनं हसत हसत ती बोलली आणि गाडीतुन उतरली आणि ब्रीजच्या रेलिंगच्या बाजुला उभी राहिली. मी  गाडीतुन उतरलो आणि तिच्या बाजुला जाउन उभा राहिलो. दोघेही समुद्राकडे बघत उभे आमच्याशिवाय त्या ब्रीजवर कुणीही नाही. एखाद दुसरी बाईक गाडी पास होत होती. 
" तु कधी कुणाचा खुन केलास? मर्डर??" 
" काय्य्य??" मी तिच्याकडे बघत जवळ जवळ ओरडलोच! तिची नजर समोर समुद्राकडे स्थिर! माझ्याकडे न बघताच बोलली,"हो! खुन! मर्डर! मी करणार आहे! माझ्या मनाविरुद्ध! आणि पहिल्यांदाच नाही! यापुर्वी ही केलाय मी खुन!" 
" रिया, आर यु ऑलराइट? काय बोलतेस वेड्यासारखं?" मला काहीच समजत नव्हतं ती काय बोलतेय ते! 
"वेड्यासारखं? कोण वेडं? हे सगळं शहाणपण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखासाठी खुन करायचा. कत्तल करायची. यापुर्वी सुद्धा हे पाप केलयं. त्यामुळे काही वाटत नाही.आताही करेन! वेडेपणा काय त्यात? सगळं शहाणपण आहे!" 
" रिया, मला कळेल असं काही बोलशील का? मला काही समजत नाहीए तु काय बोलतेस ते?"
ती वळली आणि माझ्याकडे बघत बोलली, " अ‍ॅबॉर्शन! " 
" व्हॉट?? यु आर प्रेग्नेंट?? वॉव दॅट्स नाई......स!" माझ्या वाक्यातली सुरु झालेली एक्साईटमेंट तिचा अ‍ॅबॉर्शन शब्द आठवून संपली! "अ‍ॅम सॉरी!" 
ती हसली." इट्स ओके, मला आता काही वाटतच नाही. यापुर्वीही समीरला करीअर,पैसा आराम, सुख हवं होतं म्हणुन केलं होतं! माझ्या इच्छेविरुध्द! मी माझं करिअर सोडायला तयार होते. मला माझं बाळं हवं होतं. सेटल झाल्यावर आपण बाळाला जन्म देउ असं तो म्हणाला होता. आता सारं काही आहे तरी त्याला मुल नकोय. का? ते त्यालाच माहित. मला विचारायची पण सोय नाही.माझी स्वप्ने, इच्छा, आकांक्षा,सुख हे सारं मला माझ्या बाळात दिसतं रे! मी तरसलिए त्याला बघायला,त्याच्या कोवळ्या कोवळ्या हातांना स्पर्श करायला, त्याला छातीशी कवटाळायला, दिवसरात्र त्याच्याबरोबर खेळायला! लग्नानंतर मी पहिल्यांदा जेव्हा समीरला ही न्युज दिली होती तेव्हा वाटलं होतं की तो आनंदाने वेडा होईल, मला उचलुन घेईल, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल! पण सारं काही मनासारखं नाही होतं! माला आजही त्याच्या तो हिरमुसलेला चेहरा आठवतोय! नाही सहन होतं! मला अजुनही नाही कळत कि त्याने माझ्याशी लग्नच का केलं ते? त्याच्यासाठी मी फक्त त्याची  शारिरिक गरज भागवणारी एक स्त्री आहे! नशीब तो माझी ओळख त्याची पत्नी म्हणुन करुन देतो!" बोलता बोलता तिचा स्वर कंपला! मी निशब्द होउन तिच्याकडे बघत उभा होतो. आज पहिल्यांदा मला तिच्याबद्दल खुप काहि कळत होतं. नेहमी हसणारी, बागडणारी, स्वःताच्या कामात व्यस्त असणारी, कमिटेड मुलगी! तिच्या नशिबाची परीक्षाच होतेय. भरलेल्या डोळ्यांनी ती समुद्राकडे बघत उभी! तिच्या डोळ्यात असलेले पाणी जास्त की समोरच्या समुद्रात असलेले! तसं पण समुद्र, नदी आणि स्त्री यांचं एकमेकांशी जन्मजन्मांतरीचं नातं असावं! न राहवून मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती शहारली आणि क्षणात वळून विजेच्या वेगाने मला बिलगली!तिचे हुंदके माझ्या काळजावर घाव घालत होते. मला काहिच कळत नव्हतं कि काय करु! त्या काळोखात वार्‍याचा एक प्रचंड झोत आमच्यावर आदळला आणि ती अजुनच बिलगली! " अ‍ॅम सॉरी! मला हे कुणाला सांगायचे नव्हते! ;पण तुझ्याशिवाय जवळचं असं कुणीच नाही! म्हणुन!! " 
तिचे हुंदके सुरुच होते. ती माझ्या मिठीतच होती मी घाबरत घाबरत माझे हात तिच्या पाठीवर फिरवले. मी शुन्य झालो होतो. तिच्या केसांवरुन हात फिरवत मी तिला धीर दिला," इट्स ओके रिया! एव्हीरिथिंग वील बी ऑलराईट! तुला तुझं बाळ हवयं ना? दे तु त्याला जन्म! तुझा हक्कच आहे तो. कुणा एकाच्या स्वार्थासाठी हे पाप तु परत नको करुस! मी आहे तुझ्यासोबत!" माझ्या या वाक्याने ती थोडीशी सावरली. 
बावरुन  माझ्यापासुन दुर होत ती बोलली," खरंच?? मला हे सुख मिळेल?? मी आई होईन?" तिच्या बोलण्यातली अधिरता, एक्साईटमेंट ती लपवू शकली नाही. 
" हो, का नाही? प्रत्येकवेळी तुच का तुझ्या सुखाचा गळा घोटायचा आणि तो कशासाठी?? मी आहे तुझ्यासोबत रिया! पण चल, आता निघुया. खूप उशीर झालाय. तु घरी जा आणि निवांत झोप. आपण उद्या बोलु." 
" थँक्स!  अ‍ॅन्ड अॅम रिअली सॉरी! आय स्पॉईल्ड युवर इव्हीनिंग! " 
"नो, यु डीन्ट स्पॉईल्ड माय एव्हीनिंग, अ‍ॅक्च्युअली यु जस्ट गेव्ह मी अ न्यु डे!" ती गोड हसली!आणि आम्ही तिथुन निघालो!तिने मला वाशी स्टेशनवर ड्रॉप केलं आणि ती प्रसन्न चेहर्‍याने निघुन गेली. 

मी ही घरी जायला ट्रेन पकडली. मी आयपॉड कानाला लटकवला आणि दरवाज्यावर उभा राहिलो. ट्रेन वाशी ब्रीजवर येताच खार वारा झोंबु लागला.आणि आजचा सगळा दिवस माझ्या डोळ्यासमोर नाचु लागला.. स्पेशली! काही वेळापुर्वीचं माझं आणि रियाचं कॉन्व्हरसेशन आणि रिया माझ्या डोळ्यासमोर नाचु लागले." मी आहे तुझ्यासोबत रिया!" मलाच कळत नव्हतं की कोणाच्या बलबुत्यावर मी तिला असा धीर दिला. आणि तिच्या आणि तिच्या समीरच्या या पर्सनल गोष्टीमध्ये मी का इंटरफेअर करतोय! ती फक्त माझी एक मैत्रीण आहे. तिला भरुन आलं, कुणी जव़ळचा असा नव्हता म्हणुन तिने सारं काही मला संगितलं आणि एक मित्र म्हणुन मी तिला धीर दिला. पण मी तिला खरंच मदत करु शकेन का??? जाउ दे!  जे होईल ते बघुया! असे म्हणत मी तो खारा वारा एन्जॉय करु लागलो.
डोन्ट टर्न ऑफ्फ द लाईट्स, आय डोन्ट वॉना बी इन द डार्क टुनाईट! 
एनरिकेचा ट्रॅक माझ्या कानात जोरात घुमु लागला !! 

क्रमशः

10 comments:

 1. कहाणी में ट्विस्ट......

  मस्त रे. वाचतोय आम्ही.

  ReplyDelete
 2. धन्यवाद पाटील साहेब!!

  ReplyDelete
 3. Thanx SuZe !

  Coming Soon.. !!
  ती सुन नाही हं! :)

  ReplyDelete
 4. grt..yaar..now u r the real twister..waiting for next..

  ReplyDelete
 5. Twister ???
  he he he :)
  It reminds me Arnold's Movie called TWISTER!
  Let's see! Have to stop this twister somewhere !!
  Thanx for the comment !!

  ReplyDelete
 6. कहानी में ट्विस्ट है! पण मला ही रिया जरा गडबडच का वाटतेय?? टाका पुढचा भाग लवकर! :)

  ReplyDelete
 7. आभार अनघा !!
  रिया बरीच कन्फ्युझ्ड आहे !! आणि तिच्यासोबत मीसुद्दा की आता तिला न्याय कसा द्यावा किंवा तिला मदत कशी करावी !!!
  Anyways, Some more twists are there!!

  ReplyDelete