Tuesday, November 30, 2010

नक्षत्राच्या चारोळ्या!

रात्री आकाश ओसंडुन
गेलं होतं तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी! 


गेले कित्येक रात्री मी तुला शोधतोय. काल रात्री तर सारं आकाश असंख्य तार्‍यानी भरुन गेलं होतं. मी हर्षोल्हासाने तुला शोधत फिरत होतो तर सगळेजण मला वेडा म्हणु लागले.माझं हे आकाशाचं वेड नवं नाही पण या शब्दांनी मला आजकाल वेडं केलयं. आणि शब्दही कसे तर अगदी वेचुन आणावे तसे. तुला शोभुन दिसतिल असे. तुझ्यासारखं नक्षत्र अशा सामान्य आकाशगंगेत सापडत नाही. तरीही मी तुला माझ्या आकाशात बोलावतोय.
रात्री सारं जग जेव्हा झोपी जातं तेव्हा मी हळुच फिरत फिरत समुद्रावर येतो. आता इथे कुणी मला वेडा नाही म्हणणार! गरम उबदार वाळुत स्वतःला झोकुन देतो. आता सारं आकाश फक्त माझं आणि नक्षत्रही! मी रात्रभर आकाश धुंडाळत असतो. या क्षितिजापासुन त्या क्षितिजापर्यंत सारे आकाश मी पालथे घालतो. रात्रभर सगळ्या तार्‍यांना त्या नक्षत्राबद्दल विचारत फिरतो..   
समुद्र शांतपणे हेलकावे देत डुलक्या काढतोय. दुरवर एक गलबत मिणमिणत कुठेतरी पाणी कापत जातेय. टेकडीवरल्या दीपगृहाचे फेरे ठराविक वेळेनुसार चोहोबाजुनी घिरट्या घालत आहेत. अशात मी त्या निराकार आभाळाकडे टक लावुन तुला शोधतोय.! 
तु दुरकुठेतरी लपलेली! कूठच्या तरी तार्‍यांच्या पुंजक्याआडुन माझी मजा बघणारी. पण मी तुला शोधल्याशिवाय राहणार नाही! 
काहीवेळाने ते नक्षत्र मला दिसतं! तेजस्वी, मोहक्,सुंदर! अश्या अनेक छोट्या तार्‍यानी बनलेलं. त्याचा आकारही सुबक! मी आनंदाने वेडा होतो आणि नक्षत्र मला बघुन गोडं लाजतं.त्या नक्षत्राचं लाजणंही तितकंच मनमोहक! त्याला बघुन मी आता बुचकाळ्यात पडलोय. अचंबित होउन मी मनाशीच खेळतोय! त्या नक्षत्राला कोणतं नाव देउ? त्याची तोड इतर नक्षत्रांना नाही! 

नक्षत्र असं की
ओंजळीत भरुन घ्यावं,
सुचत नाही मला आता
त्याला कोणतं नाव द्यावं!

 

माझी स्थिती अशी झालीए! तुला हसु येतयं ना? 
हस तु ! तुझ्या हसण्याने सारं आभाळ उजळून जाईल. नाहितरी माझ्या या सुन्या आभाळात काहिच नव्हतं! मी केव्हापासुन तुझी वाट बघत होतो..माझ्या आभाळाला तुझ्यासारख्या नक्षत्राने सजवायला मी अधीर होतो. 

आकाश असे सुने सुने
भासे मज जुने जुने
उजळले क्षणात सारे
नक्षत्र ते तुझ्या रुपाने...


तु तिथे काय करतेस? माझी हाक ऐकु येत नाही का तुला? 
माझ्या ह्रदयाची साद तुझ्या ह्रदयाला हेलावत नाही का? 
आता किती लपशील? तुला कदाचित ठावुक नसेल पण तु इतकी तेजस्वी आहे की आता तु कुठेही लपलीस, कोणत्याही ढगाआड, एखाद्या ग्रहाच्या छायेत किंवा तार्‍यांच्या पुंजक्यात तरी माझ्यापसुन लपणे तुला शक्य नाही. 
अगं वेडे! तुझ्या या तेजस्वी रुपाने सारं आभाळ उजळुन निघालयं आणि सारे ग्रह तारे फक्त तुलच बघताहेत. मग अशावेळी तु का लपुन राहतेस माझ्यापासुन? 
कस्तुरीमृगाला माहित नसंत की ह्रदयाला धुंद् करणारा सुगंधाचा कोष त्याच्या बेंबीत आहे आणि त्या सुगंधाने वेडावुन त्याला धुंडाळत ते रानभर धावत असते. तशीच काहिशी स्थिती तुझी झालीय!


आता सोड ते आकाश आणि
ये माझ्या जगात
तारे हि असेच तुटतात
तुला पाहुन वेगात...


तु लाजत लाजत येतेस आणि मी तुझ्या तेजस्वी रुपाने न्हाउन निघतो. माझं सारं आभाळ तुझ्या येण्याने उजळून निघते. आता त्या समोरच्या आभाळात उरलेत फक्त काही तारे आणि काही निस्तेज नक्षत्रे! तरीही मला त्या आभाळाचा मोह आवरत नाही. 
आपल्याकडे अजुन बराच वेळ आहे. सकाळ झाली नाही अजुन! आता रात्रभर आपण असेच पडुन राहु! एकमेकांसोबत काही गप्पा मारु. किती तरी दिवसांपासुनची एक आस होती तुझ्यासोबत समुद्राच्या किनार्‍यावर रात्रीच्यावेळी वाळूत पडुन तारे मोजण्याची. आज ती पुर्ण होतेय! आता मला त्या समोरच्या आभाळाची किव येतेय आणि स्वःतच्या आभाळाची गुर्मी! आज माझ्यावर कधी नव्हे ते शब्दही मेहेरबान झालेत आणि त्या शब्दांनी मी तुझ्या रुपाला सजविण्याचा प्रयत्न करतोय. 

आज रोखु नकोस तु मला,
होउन जाउ दे चिंब मला.
शब्दांचं असं वेड
लागत नाहे नेहमी मला!


हो हे वेडच म्हणावं लागेल. तुझ्या सहवासाने मला वेड लावलयं! वेडं ही कसं तर न सुटणारं आणि ते ही तुझ्या अस्तित्त्वचं. अस्तित्त्वाची वेडं फार कठीण असतात सखे! सुटता सुटत नाहीत! मनाचे हे पाश तुटता तुटत नाहीत. तरीही आज सारे पश तोडुन तु माझ्या आभाळात आलीस आणि मी त्याने सुखावून गेलोय.तुला कुठे ठेवु आणि कुठे नको असं मला झालयं. आजवर राखुन ठेवलेले सार्‍या शब्दांचं औक्षण मी तुझ्या पदरात ओततोय. ठावूक आहे मला की तुझ्या तेजस्वीतेपुढे हे शब्द निस्तेज आहेत पण माझ्याकडे या शब्दांव्यतिरिक्त तुला देण्यासारखं अजुन काही नाही. माझं प्रेम, माझी माया, माझं अस्तित्त्व, माझी काया हे सारं काही या शब्दांचचं देणं आहे. असं हे माझं शब्दांचं वेड कधी सुटणार कोण जाणे?


काही वेडं सुटता सुटत नाहीत
आवडेल तुला माझं शहाण्यासारखं
वागणं?
काही शब्द सुचता सुचत नाहीत
आवडेल तुला माझं मुक्यासारखं
बोलणं??? 


माझ्या या शब्दांवर तु गालातल्या गालात हसतेस आणि हलकेच मला स्पर्श करतेस. तुझा प्रत्येक स्पर्श मी जपुन ठेवलाय माझ्या मनात. मला आज डोळेभरुन तुला पाहायचयं. तुला माझ्या मनात भरुन घ्यायचयं! 
आता रात्रीचा प्रहर संपेल आणि पहाट होईल. मग तु निघुन जाशील. पुन्हा कुठल्यातरी आकाशगंगेत हरवशील आणि पुन्हा लपुन मला शोधताना पाहुन ह्सशील. तुला आवडतं का गं असं छळणं?
पण नको, तु अशीच रात्रीच येत जा. मी नेहमी तुला शोधत राहिन. आणि पुन्हा तुला माझ्या आभाळात घेउन येईन.
  
एक तु मैत्रीण माझी
सखी माझी सोबतिण माझी
तुझ्या पदरात माझे आभाळ
त्या आभाळाची तु चांदणी माझी!


Sunday, November 28, 2010

निशिगंध..५

आज घरी पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता. घरी पोचलो तेव्हा मातोश्री स्वागत करायला दारातच उभ्या होत्या. सगळं आवरुन जेवण करुन मी लॅपटॉप ऑन केला आणि बझ्झवर मित्रांशी गप्पा मारायला सुरुवात केली. पण आज संध्याकाळचा प्रसंग काही केल्या मनातुन जात नव्हता. कित्येक दिवस अपुर्ण राहिलेली ब्लॉगवरची स्टोरी आज लिहायला घेतली होती पण शब्दच सुचत नव्हते. विषण्ण मनाने मी लॅपटॉपच्या स्क्रीनकढे बघत बसलो होतो. ममाच्या नजरेतुन ते सुटले नाही. पण ती काही बोलली नाही. काहीवेळाने वैशु माझा सेलफोन घेउन आली. कुणाचा तरी टेक्स्ट होता. इनबॉक्समध्ये पाहिलं तर, " नमस्कार, मी मीरा." एवढे शब्द दिसले. मिरा!! मी संध्याकाळच्या त्या सार्‍या प्रसंगात तिला विसरुनच गेलो होतो. 
मी रिप्लाय केला. " हे मीरा, इट्स सरप्राईझ, हाव आर यु?" 
" मी मजेत तुम्ही कसे आहात?" 
" अ‍ॅम फाईन रे, थँक्स! अ‍ॅन्ड नो फॉर्मॅलिटीज प्लिझ, तु मला अरे तुरे करु शकतेस्, किंवा सरळ नावानेच हाक मार." ( स्वगत: आयला काल परवा तर सरळ अरे तुरे हाक मारत होती आज काय झालं हिला) " 
" ठिक आहे, पण मला असं लगेच नाही येणार अरे तुरे करता." 
" ओके. होईल सवय हळूहळू, बाकी बोल काय करतेस? जेवण झालं का? "
" हो, आत्ताच! मी तुमचा आय मीन, तुझा नंबर घेतला पण माझा नंबर द्यायलाच विसरलो होते म्हणुन टेक्स्ट केला."
" ओके. ओके." 
" ठिक आहे. मग उद्या बोलुया, आता झोप येतेय. गुड नाईट!"
" ओके. गुड नाईट! टेक केअर!"
तिला टेक्स्ट करता करता मी बाहेर आलो होतो. गॅलरीतल्या झाडांशी उगाच खेळत होतो.  नोव्हेंबर महिन्याचे अखेरचे दिवस. बाहेर मस्त गारवा पडला होता. थंडी येत होती पण आजकाल अवेळी पाउसही पडत होता.  गॅलरीतल्या सोफ्यावर बसुन बाहेरचा तो गारवा अंगावर झेलत मी दुर आकाशाकडे बघत नक्षत्रं शोधतोय. थोड्यावेळाने ममा आली आणि बाजुला बसली. काही बोलली नाही. मी हळुच तिच्या मांडीवर  डोकं ठेवलं. " ममा, निशिगंध काय बहरलाय ना? छान सुगंध सुटलाय!" 
माझ्या केसांना कुरवळत ती बोलली," हो, खरंच खुप छान बहरलाय! आठवतं तुला तुच आणलं होतं हे रोप." 
" हो, पण त्याला तुच फुलवलंस ना?" 
" काय झालं रे? थोडा अपसेट वाटतोयस!" 
आज किती तरी दिवसांनी मी ममाच्या मांडीवर पहुडलो होतो. फार बरं वाटत होतं. ती माझ्या केसांवरुन हात फिरवत मला थोपटत होती. आज अचानक मी अगदी लहान झाल्याचं जाणवत होतं. आजुबाजुचे लोक आम्हाला बघुन आमची मस्करी करत होते.
" काय?? आज माय लेकांचं प्रेम फार उतु जातयं!" कदम काकी जाता जाता बोलल्या.
" काही नाही हो, थकलाय गो पोर माझो!! दिवसभर धावपळ  करत असतो ना! " ममा माझा मुका घेत त्यांना बोलली. काहि वेळाने वैशु आली आणि  मी पण ममाच्या मांडीवर झोपणार म्हणुन खोटं खोटं रडु लागली.मम्मीने तिलाही मांडीवर घेतलं.लहानपणी आम्ही दोघे असेच भांडायचो. आज ते सगळे दिवस भराभरा डोळ्यासमोरुन जात होते. 
रात्री काहिश्या स्वप्नाने मला जाग आली. घड्याळात पाहिले तर ३ वाजले होते.. मी घामाघुम! स्व्प्न आठवायचा प्रयत्न करतोय! काही तरी फ्लॅश होतेय.. 
लेबर रुममध्ये रिया आणि बाजुला मीरा!! मी त्या मेहताबरोबर मिटिंगमध्ये आहे!  
रियाचा कॉल! मी धावतपळत हॉस्पिटलमध्ये पोचतो!  
पोचता पोचता विचार येतो हिने समीरला का नाही कॉल केला. 
पपा बाहेर उभे, वैशु आईस्क्रीम खातेय! 
मी लेबररुममध्ये पोचतो! रिया व्हिवळतेय आणि मीरा तिच्या बाजुला उभी निश्चलपणे तिला बघतेय! 
काही वेळात रिया एका गोंडस बाळाला जन्म देते आणि मीरा त्या बाळाला घेउन माझ्यापाशी येते," हे बघ आपलं बाळं! किती छान आहे ना! अगदी माझ्यासारखं दिसतयं!" 

शीट!!! व्हॉट द हेल वॉज दॅट?? !! फ्रिजमधली एक अख्खी पाण्याची बॉटल मी रिकामी केली आणि पुन्हा झोपी गेलो! पण मघासच स्वप्न सारखं डोळ्यासमोर!! सकाळी थोडं लेटच उठलो आज ऑफिसला जायचा मुडपण नाहीए! तयारी करुन निघत होतो आणि मीराचा टेक्स्ट , " सुप्रभात, कसे आहात?" 
" सुप्रभात मीरा, मी मजेत तु कशी आहेस?" आयला किती शुद्ध मराठी बोलते ही! ऑफिसला पोहचेपर्यंत आमचं हा टेक्स्ट संवाद सुरुच होता..बोलता बोलता मी तिला विचारलं," बाय द वे तुला जेवण बनवता येतं ना?" टेक्सट केल्यावर वाटलं काय डफर आहे मी? आता तिला काय वाटेल? हा डायरेक्ट किचनमध्येच पाठवतोय. बर्‍याच वेळ तिचा रिप्लाय नाही आला, मग वाटलं रागावली कि काय? मी तिला टेक्स्ट करणार इतक्यात तिचा टेक्स्ट आला, तशी मला खायची आवड आहे त्यामुळे बनवते मी थोडं फार!" हुश्श! थोडं बरं वाटलं. नंतर आम्ही शनीवारी भेटण्याबाबत बोललो. काही वेळाने मी कामात व्यस्त झालो. रियाही आज थोडी लेटच आली होती. आल्या आल्या एक छानशी स्माईल!! आजचा दिवस पुर्णपणे बिझी होता.. मीराशी टेक्स्टवर बोलणं सुरुच होतं. रिया जेव्हाजेव्हा समोर यायची तेव्हा तेव्हा ते स्वप्न माझ्या डोळ्यासमोर येत असे. आज तिचं आणि माझं कामाव्यतिरिक्त कसलंही बोलणं झालं नाही. ती काही बोलत नव्हती आणि मी ही नाही. 

असेच दोन दिवस निघुन गेले. मीरा आणि मी दोन दिवस सारखे बोलत होतो. असं वाटत होतं की आत शनीवारी भेटुन फक्त एकमेकांकडे बघत बसावे लागणार कारण, त्या दोन दिवसात आम्ही फोनवर बरंच काही बोललो होतो. शेवटी शनीवारी भेटायचं ठरलं. सकाळची वाट बघत बघत मी ब्लँकेटमध्ये गुडुप झालो. शनीवारी सुट्टी असल्याने मी लवकर कधी उठत नाही आणि आज ७.०० वाजता उठुन बसलो. पटापट तयारी केली आता शर्ट कि टी शर्ट आणि जीन्स यावर माझं, वैशु आणि ममाचं डिस्कशन! त्यात अर्धा तास गेला! शेवटी जीन्स आणि टीशर्टचा विजय झाला. ममा मला सोडायला दारापर्यंत. कैच्य कै! नशीब दही साखर भरवली नाही! 
ठरल्यावेळेच्या मी १५ मी. आधीच दादरला स्वामीनारायण मंदिराच्या इथे पोचलो आणि ती २० मी. उशिरा आली. समोर टॅक्सीमधुन उतरताना मी तिला पाहिलं. स्काय ब्लु चुडीदारमध्ये! भिजलेले, मोकळे सोडलेले केस! ओढणी सावरत तिने माझ्याकडे बघुन एक एक्स्ट्रा लार्ज स्माईल फेकली.आणि हात उंचावला. आज वेगळीच दिसत होती. समोर आली, आणि हात पुढे केला. हसत " हाय्य्य्य!, सॉरी थोडा उशीर झाला!" मी तिचा हात हातात घेउन स्तब्ध! किती शीतल होता तो स्पर्श! मी भानावर येउन. " ओह, इट्स ओके. मी ही आत्ताच आलो." चाचरत मी उत्तरलो. " यु लूक्स स्टनिंग! मला बोलायचं होतं पण ते ओठातल्या ओठातच राहिलं.  
"ओके, पहिल्यांदा आपण काही तरी खाउया, जाम भुक लागलिय. मग काय ते ठरवूया!" 
" ओके." यापलिकडे मी कहि बोलुच शकत नव्हतो. काय सुंदर दिसत होती ती आज! तिला कसं कळलं की स्काय ब्ल्यु माझा आवडता कलर आहे तो! ब्रेकफास्ट करता करता ती बोलली, "बघ आपल्याकडे पुर्ण दिवस आहे! मी सगळं ठरवलयं, आपण आता मुव्ही बघु, दुपारी लंच घेउ, थोडं भटकु आणि मग संध्याकाळी कॉफी!! कसा काय वाटला प्लॅन? सही ना??"  
तिची " सही ना?" बोलण्याची लकब मला फारच आवडली. " हो हो, नो प्रॉब्लेम असंच करु! " 
" अरे पण कोणता मुव्ही बघायचा?"
"तु सांगशील तो!" " वेट्!असं बोलत तिने जस्ट डायलला कॉल करुन आजुबाजुच्या थिएटर्समध्ये कोणता मुव्ही सुरु आहे याची माहिती काढली. आयला बरिच फास्ट आहे पोरगी. ती मनात म्हणत असेल, काय हा सुंभ आहे सगळं काम मीच करतेय आणि हा ठोंब्यासारखा बसलाय! पण तिच्या चेहर्‍यावर असं काही जाणवत नव्हतं. एक गोष्ट मी नोट केली. तिच्या चेहर्‍यावर एक स्मित हास्य नेहमी पसरलेलं असतं. म्हणजे समोरच्याने तिच्याकडे पाहिलं की त्या एका हास्याने सारा शीण निघुन जावा!! हाय!! 
ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही चेंबुरला फन मल्टीप्लेक्समध्ये गेलो. मुव्ही सुरु व्हायल अजुन बराच वेळ होता. तिकिट्स घेउन आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. काही वेळाने रियाचा कॉल आला. आता घेउ की नको या विचारात असतानाच मीरा बोलली प्लीज कॅरी ऑन! एक्सस्क्युझ मी बोलत मी कॉल रिसीव्ह केला, 
" हां रिया!,"
" अरे नाही मी बाहेर आहे! तुला बोललो होतो ना, हो! "...." काही नाही जस्स वेटींग फॉर अ मुव्ही!" ....
" ऑके.. वॉव दॅट्स ग्रेट!! हो मी येईन ना!"..... 
"अम्म्म कॅन्ट से! विचारतो मी तिला! " .. 
" या, थँक्स! बाय अ‍ॅन्ड टेक केअर" बोलणं संपलं तेव्हा मी मीराकडे पाहिलं ती गालातल्या गालात हसत होती. मी विचारलं, ' काय झालं?? का हसतेस?"
" काही नाही रे, असंच!"
" मीरा एक विचारु?" 
" बोल ना?" उद्या तुला वेळ आहे संध्याकाळी?" 
" का रे? ' 
" अगं काही नाही माझ्या एका मैत्रीणीची वेडींग अ‍ॅनिवर्सरी आहे उद्या आणि तिने तुला आणि मला इन्व्हाईट केलयं. अ‍ॅम सॉरी म्हणजे मी तिला अगोदर सांगितलं होतं आपल्या भेटीबद्दल त्यामुळे... ती...  ने.. म्हणजे असं काही नाही..." आता ती जोर जोरात हसु लागली.. 
" क्क्क्का य झालं"  हसु आवरत ती बोलली,
"किती घाबरतोस रे.. कसं होणारं तुझं?? ठीक आहे जाउ आपण उद्या...!" माझ्या हातावर हात ठेवत ती बोलली... आणि माझ्या हाततल्या वॉचकडे बघत बोलली,"चल, मुव्ही सुरु होईल" माझ्या हाताला धरुन तिने ऊठवलं आणि तसाच हात हातात घेउन आम्ही हॉलमधे गेलो! वॉव!! इट वॉझ अ नाईस फिलिंग! मी अक्षरश; स्वर्गात होतो...आज पहिल्यांदाच मी एका मुलीसोबत मुव्ही बघत होतो. मुव्ही कसला होता काय माहीत. मी तसा मुव्ही फ्रीक आहे पण आज स्क्रीनवर फक्त डोळेच होते मन बाजुला घिरट्या घालत होते. मध्येच ती मला काहि तरी सांगायची, पण हॉलच्या साउंडमध्ये ऐकु यायच नाही मी बहिर्‍यासारखा काय? काय? करायचो आणि मग ती अगदी तिचे ओठ माझ्या कानापर्यंत आणायची, मग बोलताना तिचे श्वास माझ्या गालांवर विसावायचे!! हाय !! मला काही सुचत नव्हते!! मुव्ही संपल्यावर मला वाटले हे इंग्लिश मुव्हीज एक दिड तासांचेच का असतात!!  निघताना मी काही बोलत नव्हतो, तीने न राहवून विचारलं, " काय रे? बोलत का नाहीस?" 
आता काय सांगु हिला, गाउन दाखवु का? "Can't U see what u do to me baby, u make me crazy, U make me act like a maniac!"
नको! आयला घबरुन पळायची! 
" छान होता ना मुव्ही?" 
" हो! मस्तच!" स्वगत"  (बाय द वे कोणता मुव्ही होता तो?)
दुपारचा लंच करुन,थोडीशी शॉपिंग आणि संध्याकाळची कॉफी, दिवस कधी संपला ते कळलंच नाही. वेड्यासारखे भटकत आम्ही गेट वे ला पोचलो होतो. ६ वाजले होते. आणि कळोखही लवकर पडला होता. आम्ही चालत चालत रेडिओ क्लबपाशी पोचलो. समुद्राला भरती आली होती. आणि त्यावर अनेक यॉट्स, नौका,जहाजे तरंगत, डोलत उभी होती. आज दिवसभर भटकुन आम्ही दोघे तिथे कठड्यावर टेकलो होतो. कुणी काहीच बोलत नव्हते. ती समुद्राकडे पाहत उभी आणि मी तिच्याकडे पाहत उभा! तिच्या चेहर्‍यावर ते स्मित अजुनही कायम! खुप वेळाने ती बोलली, " आज खुप दिवसांनी अशी भटकले, मज्जा आली ना?" 
" हो! खुप मज्जा आली!" 
परत शांत! दोघानाही तिथुन निघावसं वाटत नव्हतं.ती अगदी माझ्याशेजारीच उभी! तिचा सुगंध वार्‍याबरोबर माझ्या अंगभर पसरत होता.
" मीरा!!!" माझ्या हाकेने ती शहारली!! 
"क्क्का य्य्य?" 
मी जरासा वळलो आणि तिच्याकडे बघु लागलो. थोडीशी लाजुन तिची नजर भिरभिरु लागली..मी तिचा हात अलगद हातात घेतला. ती स्तब्ध! स्पर्शाने मुर्ती व्हावी तशी!, " विल यु मॅरी मी?" 
तिचा हात अजुनच थंड पडला! इकडे तिकडे बघत! जराशी लाजत, लाजणं आनि हसण्याच्या निष्फळ प्रयत्नात, काही न कळल्यागत माझ्या या प्रश्नावर ती बावरलेल्या हरणासारखी आसरा शोधु लागली, मी तिचा हात अजुनही सोडला नव्हता!आणि तीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं! " एक सांगु?" 
" बोल ना!" 
" मी ज्या दिवशी तुला धडकले होते ना, अगदी त्याच क्षणी तुझ्य प्रेमात पडले होते. ३-४ सेकंड्स असतिल मी तुझ्या डोळ्यात पाहिलं असेल, पण मला तुझे डोळे फार आवडले होते. असं फक्त मुव्हीजमध्येच होतं ना रे? कि हिरो हिरॉईन एकमेकांना आपटतात मग कुठेतरी पार्टीत भेटतात्..आपल्या बाबतित असं झालं आणि मला आता राहुन राहुन हसायला येतंय! यालाच प्रेम म्हणतात का रे? द लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट, हेच असतं का रे? गेले दोन तीन दिवस आपण बोलतोय, पण असं वाटतयं की आपण खुप वर्षापासुन ओळखतोय एकमेकांना! नाही?" 
मी काहिच बोलत नाही हे बघुन ती बोलली." तुला असं नाही वाटत कि हे सारे तुझे डायलॉग्ज मी बोलतेय!" मी हसलो. 
" बोल ना रे काही तरी!" 
" काय बोलु मीरा, बोलण्यासाठी काहि सुचायला तर हवं ना?" माझी ही परिस्थिती काही वेगळी नाहीए, जेव्हापसुन तुला भेटलोय! मीरा!....... अ‍ॅम इन लव्ह विथ यु!!" 
तिने माझ्याकडे भरलेल्या नजरेने पाहिलं, " माहित नाही रे प्रेम इतक्या लवकर होतं की नाही ते, पण आय थिंक अ‍ॅम अ‍ॅल्सो इन लव्ह विथु यु!" तिने माझा हात अजुनच घट्ट धरला!! 
आज मला सारं काहे जिंकल्याचा भास होत होता! काळोख अजुनच दाट होत होता. ७ वाजले होते आम्ही तिथुन टॅक्सी करुन निघालो. तिला घरी सोडायला गेलो. तिच्या आई वडीलांनी स्वागत केलं. जेवायचा आग्रह टाळून मी जायला निघालो. मीरा मला निरोप द्यायला रस्त्यापर्यंत आली. 
" उद्या किती वाजता येवु?" 
" कुठे" मी विचारलं! 
"अरे असा रे काय? तुझ्या मैत्रीणीची वेडिंग अ‍ॅनिवर्सरी आहे ना!" 
" अरे हो, विसरलोच होतो मी! ४ / ५ वाजता ये दादरला तिथुन जाउ आपण" 
"ओके" 
" तु जा आता घरी मी जाईन." 
" ओके. सांभाळून जा. आणि पोचल्यावर फोन कर." 
" ओके" तिला गुडबाय करुन मी घरी पोचलो. 
घरी पोचलो तेव्हा मातोश्री पुन्हा दारावर उभ्या! तिच्या चेहर्‍यावर उत्सुकता मी काय बोलतो याची! आयला माझ्या एक्झामच्या रिझल्टचं कधी टेंशन नव्हतं हिला इतकं.
" काय साहेब? काय झालं रे सांग ना! "
" काहे नाही गं, काय होणार अजुन? " 
" म्हणजे?" 
" म्हणजे सकाळपासुन तिच्याबरोबर फिरतोय्,आणि संध्याकाळी....." 
" संध्याकाळी क्क्क्काय? बोल ना नालायका!!"
" काय नाय गं, संध्याकाळी तिने......... होहोहो म्हटलं!!" 
" क्क्काय?? अहो ऐकताय का?" 
पपा बाहेर आले," म्हणजे काय मुलगा कोणाचा?" 
" आले, माझाही आहे म्ह्टलं.मग कधी करतोयस लग्न!? "
" मी उद्याही तयार आहे!" 
" ठिक आहे! अहो ऐकलंत का? जाउ मग आपण! नंदाला सांगते मी, लवकरात लवकर उरकुन घेउ! अगं बाई हे कारायच्यं ते करायचयं!! ममाची अशी लगबग करायला लागली की जणु मी खरंच उद्या लग्न करणार आहे! पपानी तिला शांतपणे बसवलं आणि बोलता बोलता तिचे डोळे पाणावले..

क्रमशः

Monday, November 22, 2010

निशिगंध...४

काही वेळाने आम्ही बांद्र्याला एका रेस्टॉरंटमध्ये पोचलो. खूप वेळ दोघेही फक्त बसुन होतो.. मी दोन कॉफी ऑर्डर केल्या.. रिया काहीच बोलत नव्हती.आज ती नेहमीची रिया नव्हती. काही तरी झालं होतं आणि ते फार गंभीर असल्याचं मला जाणवत होतं.मी तिला कधी अश्या मुडमध्ये पाहिलंच नव्हतं त्यामुळे मला ती सहन होत नव्हती. "रिया?? ए, रिया"
दोनवेळा हाक मारुनही बाईसाहेबांचं लक्ष्य नव्हतं. शेवटी न राहवून एक टपली दिली.. 
"अं?? साल्या मारतो काय?" 
" अगं, काय झालं? काही बोलशील? भेटल्यापासुन नुसती मुर्तीसारखी आहेस." 
" नाहे रे, काही नाही!" 
" तुला माहित आहे रिया, हे जे काही नाही आहे ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, काही तरी आहे पण ते संगायचे नाही, मनातल्या मनात ठेवायचे आणि मनातल्या मनात मारामारी करायची, स्वतःशीच! स्वतःच्या भावनांना इतरांमुळे छळायचं! हे ठीक नाही ! मला तुझा असा हा उतरलेला चेहरा नाही बघवतं. बोल रिया, बोल मनात ठेवू नकोस ! सांग ना काय झालं ते " 
" अरे, खरंच काही नाही रे ! बस्स थोडंस एकाकी वाटत होतं, म्हणुन तुला बोलावलं तर तु पण लेक्चर द्यायला सुरुवात केली.!" 
" रिया, लेक्चर नाही गं, आणि मी तुला आज नाही  ओळखत. 
मी सकाळपासुन बघतोय तु नेहमीसारखी नाहीस. समथिंग इज राँग बट यु डोन्ट वान्ट टु टेल मी! भले ऑफीसमध्ये तु माझी बॉस असशील पण बाहेर आपण फ्रेंड्स म्हणुनच वावरतो ना!?" मी बडबड करत सुटलो होतो आणि ती शांत चित्ताने एकटक माझ्याकडे बघत होती. मध्येच थांबुन मी तिला परत हलवलं," काय?? मी काय इथे किर्तन सांगतोय??" ती हसली.. 
" नाही, पण तु छान बोलतोस.. तु बोलत राहिल्यावर फक्त तुला ऐकत राहावंस वाटतं!"
" मॅडम, आता आवरा! आणि ही कॉफी घ्या!" कॉफी घेता घेता तिने मला मिराबद्दल विचारलं,  मी जास्त काही बोललो नाही.
 "मग कसं चाललंय तुझ्या लग्नाचं?" 
" कसलं काय गं? फक्त ओळख झालीए, बघु शनीवारी भेटणार आहे ती.!"
" अरे व्वा , अ डेट काइंड ऑफ्फ? " 
" अम्म्म, यु कॅन से सो!"
"कशी आहे रे ती?" 
" सोड ना, मला कुणी तरी सांगितलंय की एका सुंदर मुलीसमोर दुसर्‍या मुलीची तारीफ करु नए म्हणुन ! " 
" अरे पण मे कुठे सुंदर आहे. तु माझ्यासमोर बोलु शकतोस !" 
" सोड ना रिया, बोल काय झालं? समीरशी काही झालं का? " माझ्या या प्रश्नावर तिचे हसरे गाल परत खाली उतरले. 
" रिया, बोल ना." 
" काही नाही रे, त्याच्याशी काय होणार? बोलायला, भांडायला तो घरी तर असायला हवा ना! गेले कित्येक दिवस मी त्याचाशी मनमोकळेपणाने बोलल्याचं आठवत नाही. गेले कित्येक दिवस मी त्याला डोळे भरुन पाहिल्याचंही मला आठवत नाही. त्याचाकडुन तर मी ही अपेक्षाही नाही करु शकत. रात्री अपरात्री कधी ही घरी येतो. कधी जातो. आजकाल मला असं वाटु लागलयं की मी समीर नावाच्या एका आकृतिबरोबर राहतेय. काय करु? त्याला कसं समजावू? काही बोलायला गेलं तर काहीच सांगत नाही. नुसतं काम आणि काम करत बसतो.. काय करायचाय इतका पैसा?? तिकडे त्याची आई लग्नाला दोन वर्षे झाली तरी मुलं नाही म्हणुन बोंबलतेय पण स्व;ताच्या मुलाला काही बोलत नाही. मला नाही वाटत का रे आई व्हावं असं! मी या सगळ्यासाठी माझं करीअरही सोडायला तयार होते. फक्त त्याच्यासाठी. पण आता तोच माझ्यापासुन दुर जातोय. किती थांबावायचा प्रयत्न करतेयं पण कधी कधी वाटतं की माझेच प्रयत्न तोकडे पडतात. काय करु मी? कुठे जाउ तेच समजत नाही. " बोलता बोलता तिच्या डोळ्यांला भरती आली. मला काय बोलु ते सुचत नव्हते. मी तिच्या हातावर हात ठेवला. " होईल, सगळं काही ठीक होईल. डोन्ट वरी" इतकाच काय तो सामान्य आधार मी तिला देवु शकत होतो. 
तिच्या हातावर ठेवलेला हात मला उचलावासा वाटत नव्ह्ता. असं वाटत होतं की तिलाही असं वाटत असेल. मी माझा हात उचलुन घेणार इतक्यात तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि काठोकाठ भरलेल्या पापण्यानी ती माझ्याकडे बघु लागली. तिची नजर मला थोडीशी अस्वस्थ करत होती. पण.. मी माझा हात हळूच सोडवून घेतला. " चल निघुया? इट्स ऑलमोस्ट सेवन नाव !" 
बिल पेड करुन आम्ही बाहेर पडलो आणि गाडीच्या इथे जातच होतो इतक्यात समोरुन समीर येताना दिसला. त्याला बघुन रिया थोडीशी बावरली. जवळ येतच त्याने विचारले," अरे इकडे काय करताय??," 
माझ्यकडे बघत मलाही विचारले," हे ड्यूड ! हाव आर यु? " 
" अ‍ॅम ग्रेट! थँक्स! व्हॉट अबाउट यु ?" माझ्याकडे न बघता तो उत्तरला, अ‍ॅम ऑके!"  
" अरे काही नाही, एक मिटींग होती इथेच, ती संपवून कॉफीसाठी आलो होतो."  
ममाला फोन करायच्या बहाण्याने मी जरा बाजुला गेलो, दोघांचं काही तरी बोलणं सुरु होतं. मी रियाकडे बघत होतो. तिच्या चेहर्‍यावर विनवणी, राग, वैताग स्पष्ट दिसत होता.. एक दोन मिनिटाच्या धुमश्चक्रीनंतर समीर तणतणत त्याची गाडी घेउन निघुन गेला. रिया तिथेच त्याला बघत तिच्या गाडीसमोर उभी! निच्छल ! काय करावे त मलाही सुचत नव्हते! मी तिच्याकडे गेलो. तिचा तो अश्रुनी भरलेला चेहरा! छे ! मला ते पुसवतपण नव्हते! तिचे तिनेच पुसावे! मी तिच्या हातातली चावी घेतली आणि गाडी स्टार्ट केली. तिला काय झालं हे विचारायची इच्छा होत नव्हती आणि विचारुनही ती सांगणार नव्हती. आम्ही दोघेही शांत होतो..काही बोलण्यासारखेही नव्हते! थोड्यावेळाने ती गाढ झोपी गेली! आठ एक वाजता आम्ही वाशीच्या ब्रीजपर्यंत पोचलो. मेन ब्रीजवर ट्रॅफीक मिळेल म्हणुन मी गाडी जुन्या ब्रीजवरुन घेतली.रिया अजुनही झोपलीच होती.  एका बाजुला मी गाडी उभी केली. रिया अजुनही गाढ झोपेत होती. तिला ऊठवावसं वाटत नव्हतं. रिया, ए रिया ! दडबडुन ती उठली. "अं? अमम्म?? काय झालं ? कूठे पोचलो! बापरे कसली झोप लागली होती!" 
" आपण वाशीला आहोत.!"
" वाशीला? तु मला उठवलं का नाही?? उगाच आता तुला माझ्यामुळे त्रास! " 
"इट्स ओके.तु झोपली होतीस, म्हणुन तुला नाही ऊठवलं! चल कूठे आहे तुझं घर? मला स्टेशन वर ड्रॉप कर! मी जाईन तिथुन!" 
" अरे तु माझं घर नाही बघितलं ना अजुन? चल माझ्या घरी! आपण आज सोबत डीनर घेउ!" 
" अरे रिया! नको, इट्स ओके. नेक्स्ट टाईम कधी तरी. आज तसं पण ऊशीर झालाय!" माझ्या नकाराबरोबर तिचा चेहरा परत उतरला! "ठीक आहे". उसनं हसत हसत ती बोलली आणि गाडीतुन उतरली आणि ब्रीजच्या रेलिंगच्या बाजुला उभी राहिली. मी  गाडीतुन उतरलो आणि तिच्या बाजुला जाउन उभा राहिलो. दोघेही समुद्राकडे बघत उभे आमच्याशिवाय त्या ब्रीजवर कुणीही नाही. एखाद दुसरी बाईक गाडी पास होत होती. 
" तु कधी कुणाचा खुन केलास? मर्डर??" 
" काय्य्य??" मी तिच्याकडे बघत जवळ जवळ ओरडलोच! तिची नजर समोर समुद्राकडे स्थिर! माझ्याकडे न बघताच बोलली,"हो! खुन! मर्डर! मी करणार आहे! माझ्या मनाविरुद्ध! आणि पहिल्यांदाच नाही! यापुर्वी ही केलाय मी खुन!" 
" रिया, आर यु ऑलराइट? काय बोलतेस वेड्यासारखं?" मला काहीच समजत नव्हतं ती काय बोलतेय ते! 
"वेड्यासारखं? कोण वेडं? हे सगळं शहाणपण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखासाठी खुन करायचा. कत्तल करायची. यापुर्वी सुद्धा हे पाप केलयं. त्यामुळे काही वाटत नाही.आताही करेन! वेडेपणा काय त्यात? सगळं शहाणपण आहे!" 
" रिया, मला कळेल असं काही बोलशील का? मला काही समजत नाहीए तु काय बोलतेस ते?"
ती वळली आणि माझ्याकडे बघत बोलली, " अ‍ॅबॉर्शन! " 
" व्हॉट?? यु आर प्रेग्नेंट?? वॉव दॅट्स नाई......स!" माझ्या वाक्यातली सुरु झालेली एक्साईटमेंट तिचा अ‍ॅबॉर्शन शब्द आठवून संपली! "अ‍ॅम सॉरी!" 
ती हसली." इट्स ओके, मला आता काही वाटतच नाही. यापुर्वीही समीरला करीअर,पैसा आराम, सुख हवं होतं म्हणुन केलं होतं! माझ्या इच्छेविरुध्द! मी माझं करिअर सोडायला तयार होते. मला माझं बाळं हवं होतं. सेटल झाल्यावर आपण बाळाला जन्म देउ असं तो म्हणाला होता. आता सारं काही आहे तरी त्याला मुल नकोय. का? ते त्यालाच माहित. मला विचारायची पण सोय नाही.माझी स्वप्ने, इच्छा, आकांक्षा,सुख हे सारं मला माझ्या बाळात दिसतं रे! मी तरसलिए त्याला बघायला,त्याच्या कोवळ्या कोवळ्या हातांना स्पर्श करायला, त्याला छातीशी कवटाळायला, दिवसरात्र त्याच्याबरोबर खेळायला! लग्नानंतर मी पहिल्यांदा जेव्हा समीरला ही न्युज दिली होती तेव्हा वाटलं होतं की तो आनंदाने वेडा होईल, मला उचलुन घेईल, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल! पण सारं काही मनासारखं नाही होतं! माला आजही त्याच्या तो हिरमुसलेला चेहरा आठवतोय! नाही सहन होतं! मला अजुनही नाही कळत कि त्याने माझ्याशी लग्नच का केलं ते? त्याच्यासाठी मी फक्त त्याची  शारिरिक गरज भागवणारी एक स्त्री आहे! नशीब तो माझी ओळख त्याची पत्नी म्हणुन करुन देतो!" बोलता बोलता तिचा स्वर कंपला! मी निशब्द होउन तिच्याकडे बघत उभा होतो. आज पहिल्यांदा मला तिच्याबद्दल खुप काहि कळत होतं. नेहमी हसणारी, बागडणारी, स्वःताच्या कामात व्यस्त असणारी, कमिटेड मुलगी! तिच्या नशिबाची परीक्षाच होतेय. भरलेल्या डोळ्यांनी ती समुद्राकडे बघत उभी! तिच्या डोळ्यात असलेले पाणी जास्त की समोरच्या समुद्रात असलेले! तसं पण समुद्र, नदी आणि स्त्री यांचं एकमेकांशी जन्मजन्मांतरीचं नातं असावं! न राहवून मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती शहारली आणि क्षणात वळून विजेच्या वेगाने मला बिलगली!तिचे हुंदके माझ्या काळजावर घाव घालत होते. मला काहिच कळत नव्हतं कि काय करु! त्या काळोखात वार्‍याचा एक प्रचंड झोत आमच्यावर आदळला आणि ती अजुनच बिलगली! " अ‍ॅम सॉरी! मला हे कुणाला सांगायचे नव्हते! ;पण तुझ्याशिवाय जवळचं असं कुणीच नाही! म्हणुन!! " 
तिचे हुंदके सुरुच होते. ती माझ्या मिठीतच होती मी घाबरत घाबरत माझे हात तिच्या पाठीवर फिरवले. मी शुन्य झालो होतो. तिच्या केसांवरुन हात फिरवत मी तिला धीर दिला," इट्स ओके रिया! एव्हीरिथिंग वील बी ऑलराईट! तुला तुझं बाळ हवयं ना? दे तु त्याला जन्म! तुझा हक्कच आहे तो. कुणा एकाच्या स्वार्थासाठी हे पाप तु परत नको करुस! मी आहे तुझ्यासोबत!" माझ्या या वाक्याने ती थोडीशी सावरली. 
बावरुन  माझ्यापासुन दुर होत ती बोलली," खरंच?? मला हे सुख मिळेल?? मी आई होईन?" तिच्या बोलण्यातली अधिरता, एक्साईटमेंट ती लपवू शकली नाही. 
" हो, का नाही? प्रत्येकवेळी तुच का तुझ्या सुखाचा गळा घोटायचा आणि तो कशासाठी?? मी आहे तुझ्यासोबत रिया! पण चल, आता निघुया. खूप उशीर झालाय. तु घरी जा आणि निवांत झोप. आपण उद्या बोलु." 
" थँक्स!  अ‍ॅन्ड अॅम रिअली सॉरी! आय स्पॉईल्ड युवर इव्हीनिंग! " 
"नो, यु डीन्ट स्पॉईल्ड माय एव्हीनिंग, अ‍ॅक्च्युअली यु जस्ट गेव्ह मी अ न्यु डे!" ती गोड हसली!आणि आम्ही तिथुन निघालो!तिने मला वाशी स्टेशनवर ड्रॉप केलं आणि ती प्रसन्न चेहर्‍याने निघुन गेली. 

मी ही घरी जायला ट्रेन पकडली. मी आयपॉड कानाला लटकवला आणि दरवाज्यावर उभा राहिलो. ट्रेन वाशी ब्रीजवर येताच खार वारा झोंबु लागला.आणि आजचा सगळा दिवस माझ्या डोळ्यासमोर नाचु लागला.. स्पेशली! काही वेळापुर्वीचं माझं आणि रियाचं कॉन्व्हरसेशन आणि रिया माझ्या डोळ्यासमोर नाचु लागले." मी आहे तुझ्यासोबत रिया!" मलाच कळत नव्हतं की कोणाच्या बलबुत्यावर मी तिला असा धीर दिला. आणि तिच्या आणि तिच्या समीरच्या या पर्सनल गोष्टीमध्ये मी का इंटरफेअर करतोय! ती फक्त माझी एक मैत्रीण आहे. तिला भरुन आलं, कुणी जव़ळचा असा नव्हता म्हणुन तिने सारं काही मला संगितलं आणि एक मित्र म्हणुन मी तिला धीर दिला. पण मी तिला खरंच मदत करु शकेन का??? जाउ दे!  जे होईल ते बघुया! असे म्हणत मी तो खारा वारा एन्जॉय करु लागलो.
डोन्ट टर्न ऑफ्फ द लाईट्स, आय डोन्ट वॉना बी इन द डार्क टुनाईट! 
एनरिकेचा ट्रॅक माझ्या कानात जोरात घुमु लागला !! 

क्रमशः

Tuesday, November 16, 2010

निशिगंध ..३

 
नंतर आम्ही बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.. खूप बोलकी आहे ती....
"So.....?" ती...
" So.....????? Nothing...!!!" मी.
" अरे. बोल काही तरी. इतका वेळ मीच बडबड करतेय."
" मी???? काय बोलु?? तुच बोल ना मी ऐकतो..."
" आतापासुनच???" तिची आई आमच्या मागे उभी होती. यावर आम्ही हसायला लागलो...
"झालं तुमचं बोलणं?? चल बेटा निघुया उशिर होईल...."
"ओके.चल."
"अगं असं काय निदान बाय तरी कर त्यांना.."
" मम्मी, तु हो पुढे मी येते.."
" बरं..अच्छा बेटा, मी येते.. येत जा घरी अधुन मधुन..."
" ठिक आहे काकु..बाय." 
 " So??? चला तर मग.भेटु परत."
" अ‍ॅक्चुअली.. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं..!!!"
"yaaa!! please go ahead!!"
" या वीकेंडला तु काय करतोयस??? "
 मी थोडासा चमकलो...पण स्वतःला सावरत बोललो.. " काही नाही...मे बी खेळायला जाईन किंवा घरीच असेन..."
"ओके. मी तुला फ्रायडेला फोन करते. आपण सॅटला भेटुया..ओके?"
" Ok. No problem"
" नंबर सांग तुझा." मी तिला माझा नंबर दिला...
" चल मी निघते, शनिवारी भेटु... ओके? Have a good night!!!.."  ती जायला वळली आणि चालु लागली..
"मी......रा!!!!"
माझ्या हाकेने ती जागीच थबकली. न वळताच बोलली " का.......य????"
" काही नाही..  Jusss wanaa say that..... You are so beautiful !!!!!" ती जराशी वळली, माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहीले.... ओठ हळूच गालांवर स्वार झाले....
" थँ...क्क्क्स!! " बोलुन ती गेली..
काही वेळाने आमच्या मातोश्री आल्या..." काय?? आवडली का? "
मी थोडासा लाजलो....
" अरे बोल ना??? " मी तिला कालचा किस्सा सांगितला.. त्यावर ती हसायला लागली..
" मग त्यांना होकार कळवू ??"
" अगं पण मीराचं आणि माझं काहीच बोलणं नाही झालं याबाबत!!! तीने या विकेंडला भेटायला बोलावलयं...बघु त्यानंतर..."
" अगं बाई!!!! म्हणजे तु डेट वर जाणार??? चल तुझी द्रुष्ट काढते..."
" काय गं ममा??? "

" पण खरं सांग तुला आवडली ना??? " मी मान हलवली.... समुद्राचा वारा आता अधिक जोराने वाहु लागला... ही गोष्ट कधी एकदा रियाला सांगतो असं मला झालं होतं... मी ताबडतोब रियाला फोन केला..
" हाय रिया, काय करतेस?"
" काही नाही रे, जस्ट जरा टी.व्ही. बघत पडलेय... पार्टी कशी चाललिय?"
" इट्स कूल... तु जेवलीस...?"
" नाही रे अजुन. बस जेवेन थोड्यावेळाने.. तु बोल..."
" काही नाही गं... बस्स... you won't belive me if I'm gonna tell you what just happned here!!!"
" is it??? काय झालं असं???"
मी तिला सर्व सांगितलं... मी आत्ताच झालेल्या प्रसंगाबद्दल एकदम बडबड करत सुटलो होतो.
अचानक रियाने मला थांबवलं...." अरे! ऐक ना, आपण उद्या बोलुया.. का? मी जरा माझी कामं आटपुन घेते..."
" ओके. ठीक आहे. चल बाय, "
" ओके बाय, आणि अभि......नं.....द...न!!!" तिचे पुढचे शब्द ऐकण्याआधिच मी फोन कट केला...... 
दुसर्‍या दिवशी ऑफिसला जातान मुड अगदी फ्रेश होता..सारं काही अगदी नवं नवं वाटत होतं... आज बसमध्ये मी आय पॉडमधली गाणी ऐकत नव्हतो तर स्वतः गुणगुणत होतो...मीराचा चेहरा काही माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हता...तिचं ते बोलणं, मध्येच हसणं, वार्‍याने उडणारे केस एका हाताने सावरणं....सारं सारं काही मिस्ड करत होतो.. कधी एकदा शनीवार येतो आणि मी तिला पुन्हा भेटतो असं झालं होतं.
तसंच; कधी एकदा रियाला भेटुन हे सारं सांगतोय असं झालं होतं. माझ्या डेस्कवर पोचता पोचता रियाच्या केबिनकडे वळलो..बाहेरुनच तिला हाय केलं तिने ही हात वर केला पण नेहमीसारखं स्माईल नव्हतं..मी ही माझ्या जागेवर गेलो.नेहमीची महत्त्वाची कामं आटपून ऑफीसच्या कामाला सुरुवात केली..पण लक्ष लागत नव्हतं..सारखा मीराचा चेहरा डोळ्यासमोर येत होता..शनीवारी तिच्यासोबत कूठे जायचं याचं विचारात मी गढुन गेलो होतो..फोन करु का तिला??? नको उगाच काय वाटेल तिला??? असं म्हणुन सेल काढला.. पण हाय रे कर्मा...मी तिचा नंबर कुठे घेतला होता?? फक्त माझाच नंबर तिला दिला होता..आता काय करु?? म्हणजे शुक्रवारपर्यंत तिच्याशी बोलण्यासाठी मला वाट बघावी लागणार तर.. शीट!!! हाव  डफर अ‍ॅ'म!! आता काय करु???  पण मी का इतका रिअ‍ॅक्ट होतोय... कूल बडी!! करेल ती फोन तुला.. मी स्वःतालाच समजावून परत लॅपटॉपमध्ये शिरलो..आज सारेजण बिझी दिसत होते..रिया तर ऑनलाईनपण नव्हती..  आता काम कसं करायचं.. मरु दे तिकडे..असं म्हणुन मी रियाच्या एक्स्टेंशनवर कॉल केला... "रिया, भूक लागलीए..चल ना काहीतरी खावून येवू.."
" अरे तु जावून ये, मी खावून आलेय.. आणि थोडं काम पण आहे.. !!!"
अशी काय ही?? पहिल्यांदा कधी नाही नव्हती म्हणाली कितीही काम असलं तरी..असु देत.. मी आता सिरीअस मूडमधे येवून काम करायला सुरुवात केलं...पण नाही यार तीच सारखी डोळ्यासमोर येतेयं.. काहीवेळाने एक मेलं आलं एका क्लायंटने ऑर्डर फायनल करण्यासाठी बोलावलं..सीसीमध्ये रियापण होती.. मी रियाला परत फोन केला " मेल पाहिलंस का?? किती वाजता निघुया?? "
" अरे, तु जा ना, मला खरंच वेळ नाहीए.. सिंगापुर कॉन्फरन्सचं प्रेझेंटेशन बनवतेय..तु जाउन ये, अँड गेट द ऑर्डर इन अवर किटी!! "
" सिंगापुर कॉन्फरन्स ?? "
" हो, यावेळी सिंगापुरला आहे.. मला जावं लागणार आठवड्यासाठी."
" ओके. "
" अरे, हवं तर गाडी घेउन जा..."
" नको, थँक्स. मी जाईन ट्रेनने !!" असं बोलुन मी फोन ठेवला..आज हिला झालंय तरी काय??  सकाळपासुन धड बोलत ही नाही.. असेल काही तरी.. नवर्‍याबरोबर भांडली वैगरे असेल.. मी अजुन तिला सतावत नाही.. कामात लक्ष लागत नव्हतं म्हणुन मी जरा इकडे तिकडे टवाळ्या करायला गेलो...काही वेळाने रियाचा टेक्स्ट आला " सी मी !" मी तिच्या केबिनमध्ये गेलो.. तिने समोर बसायला सांगितलं.
." सो?? हाव इज गोईन ऑन?? "
"कूल, ग्रेट, जस लाईक दॅट..! "  ती परत लॅपटॉपमध्ये शिरली.. बराच वेळ शांतता.. काही वेळाने मीच बोललो.." रिया...." "म्म्म,, काय?" " एनी प्रॉब्लेम??"
'' ना.. नाही.. का? "
" काही नाही, सो मी जाउ? आय हॅव टु गो ऑन कॉल.."
" कितीचा कॉल आहे तुझा?? "
" २.३०, नरीमन पॉईंट्ला.."
" जेवण झालं तुझं ? "
''नाही.. आय्'ल हॅव इट ऑन माय वे !!"
" ओके, आय थॉट तु माझ्याबरोबर थांबशील.. परत ऑफीसला येणार का?? "
" माहीत नाही, उशीर झाला तर कदाचित नाही.."
" ओके.."
" ओके देन.. सी यु !!"  असं बोलुन मी तिकडुन सटकलो..पण रियाचं वागणं मला थोडं विअर्ड वाटत होतं..ती नेहमी सारखी दिसत नव्हती..तिला कधी कामाच्या प्रेशरमध्ये मी पाहिलं नव्हतं.. तिला विचारावं का?? कदाचित काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतिल.. माझं ऑफीसमध्ये लक्ष्य लागत नव्हतं..मी बॅग पॅक केली आणि ऑफीसमधुन निघालो.. बाहेर कडक उन होतं.. आयला रियाची गाडी घेतली असती तर बरं झालं असतं.. स्टेशनवर पोहचेपर्यंत घामाने पुर्णपणे भिजुन गेलो होतो.. चर्चगेटला पोहचेपर्यंत १.३० वाजला.. काही तरी खाउन घेउ का?? पण भुकही लागत नव्हती.. मी सरळ क्लायंटच्या ऑफीसमध्ये पोहचलो.. मिटींग अपेक्षेपेक्षा जरा जास्तच लांबली.. ऑर्डरचा पीओ फक्त उचलायचा होता पण डील क्लोझींगच्या वेळी त्या एमडीने फार डोकं खाल्लं.... त्याच्या सार्‍या शंकांचं नीरसन करण्यासाठी मी माझं सारं सेल्स नैपुण्य पणाला लावलं.. आणि बरोब्बर ४.३० ला डील क्लोझ केली.. आणि आता मला भुक जाणवू लागली..आयला त्या मिटींगच्या नादात मी जेवणंच विसरुन गेलो होतो...मरु दे, घरी पळतो. जाता जाता काही तरी खाउ वाटेत्...असा विचार करुन मी सीएसटी स्टेशनच्या दिशेने चालु लागलो..स्टेशनला पोचतो न पोचतो तोच रियाचा कॉल आला.. " हां रिया बोल!"
काय, आहेस कूठे ?? एक फोन नाही तुझा तो??"
" अरे, मिटींगमध्येच होतो..जाम पकवलं यार त्या मेहताने.. "
" ऑर्डर???" " हो, हो ! काळजी करु नको आता ३ तास मिटींगमध्ये त्याने माझं डोकं खाल्यावर मी त्याला असा थोडीच सोडणार होतो!! पीओ अलाँग विथ वन ईयर अ‍ॅडव्हांस पेमेंट इज इन माय बॅग!! 
" गुड!! मग आता तु?? "
" मी?? चाललो घरी, प्लीझ आता परत ऑफीसला नाही येणार!!"
" ओके ! नाही मी तुला ऑफीसला यायला नाही सांगत.. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.. तुला जमत असेल तर भेटशील प्लीझ??? " तिचा स्वर थोडासा वेगळाच वाटत होता..
"ओके. रिया, आर यु ऑलराईट ??? "
" य्य्य्या, अ‍ॅम ऑलराईट!! जस्ट थोडंस एकटं एकटं  वाटत होतं म्हणुन तुला विचारलं...!"
"ओके ओके, आहेस कूठे तु ?? " मी निघतेय आता ऑफीसमधुन... "
" ठीक आहे, मला माहीमवरुन उचल मी पोचतो २० मिनीटात.."
" ओके!!"  काही वेळातच मी माहीमला पोचलो. रियाची गाडी बाहेरच उभी होती.. गाडीत बसता बसता मी विचारलं काय गं?? काय झालं? इज एव्हरीथिंग ऑलराईट??? " " या, ड्युड!! अ‍ॅम ओके!! चल, शॅल वी नाउ?" " ओके मॅम !! " कूठे चाललोय ते माहित नव्हतं.. रिया शांतपणे ड्राईव्ह करत होती आणि मी कधी तिच्याकडे तर कधी बाहेर बघत होतो.. 
काही वादळं अशीच शांतपणे पुढे सरकतात....

क्रमशः

Thursday, November 11, 2010

ऑरफन !



नेट फोर मध्ये असताना मी, समीर आणि तेजस संध्याकाळ झाली की आम्ही मुव्ही बघायला सुटलो.. त्यात समीर वाशीला राहतो आणि मी पनवेलला त्यामुळे संध्याकाळी ऑफीसमधुन सुटल्यावर कंठाळा आला की आम्ही वाटेत एखाद्या थिएटरमधे शिरायचो ! एकदा कंपनीकडुन सार्‍या स्टाफला मुव्हीसाठी पाठवणार होते !! कोणता मुव्ही बघायचा यावर आमचा वाद सुरु होता.. तेव्हा ऑरफन आणि व्हॉट्स युवर राशी रिलिझ झाले होते !! मुव्ही ठरवणारे मी, तेजस आणि समीर !! शेवटी, आयला हिंदी पिक्चर बघण्यापेक्षा हॉलीवूड मुव्ही बघायचे ठरले त्याप्रमाणे संध्याकाळच्या शो चे आय मॅक्स वडाळ्याला बुकिंग केले!! बाकीचे सारेजण तुम्ही न्याल तिथे आणि दाखवाल तो मुव्ही बघु अश्या स्थितीत होते !! त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता!!  

ऑरफन हा माझ्या आवडत्या मुव्हीपैकी एक !! अंगावर काटे आणणारा थ्रीलरपट ! आणि क्लायमॅक्स होतो तेव्हा कळतं की अरे असेही काही रोग असतात??  म्हणुन मी हॉलीवूडपटांचा निस्सीम चाहता आहे कारण त्यांचे कॉन्सेप्ट्स अतिशय वेगळे असतात मग तो एखादा फिक्शनल का असेना ?? बॉलीवूड फक्त नाव बदलून आणि पात्रे बदलुन तश्याचा तसा चित्रपट आपल्यासमोर ठेवतिल.. अ‍ॅम शुअर ! थोड्या दिवसानी हाच ऑरफन हिंदीमध्ये "अनाथ बच्चा"  किंवा मराठीत गोजीरी सारखा 'पोरकी' म्हणुन प्रदर्शित होईल !! :)



ऑरफन सुरु होतो, केट कॉलमन ( वेरा फार्मिगा ) च्या डिलिव्हरीच्या स्वप्नाने ! तिने आत्तच तिसर्‍या अपत्याच्या डिलीव्हरीच्या वेळी एका मेलेल्या मुलाला जन्म दिलाय!  ( हा सीन खूप भयंकर आहे! वीक हार्टेडसनी टाळावा ) आणि या धक्क्यातुन ती सावरली नाहीए. त्यात अतिमद्यपानाच्या तक्रारीतुन ती स्वतःला सावरतेय! या सगळ्याचा परिणाम तिच्या आणि जॉनच्या नात्यावरही होतोय !! त्यांच्या दोन मुलापैकी मॅक्स नावाची २-३ वर्षाची मुलगी तिला बोलता आणि ऐकता येत नाही आणि डॅनिअल  नावाचा ८-९ वर्षाचा एक एक मुलगा आहे. अश्यातच ते दोघे एक मुल दत्तक घ्यायचे ठरवतात. त्यानुसार एका स्थानिक अनाथालयातुन इस्टर नावाच्या ९ वर्षाच्या  रशियन मुलीला ते दत्तक घेतात! घरी येताच इस्टर ताबडतोब मॅक्सला आपलसं करुन घेते पण डॅनिअल तिला बहीण मानायला तयार नसतो !! शाळेत पहिल्या दिवशी तिच्या ओल्ड फॅशन्ड ड्रेसवर आणि गळ्याला असलेल्या कापडाच्या गळपट्टीला (कॉलर) एक मुलगी छेडते आणि तिच्या हातातल्या बायबलशी झोंबाझोंबी करताना ते बायबल फाटुन विखुरते  तेव्हा इस्टर कान फाटेस्तोअवर किंचाळते. तिचं ते रुप बघुन सारेजण घाबरतात! त्यानंतर एका सुट्टीच्या दिवशी खेळत असतान त्या मुलीला एकट पाहुन इस्थर तिला घसरगुंडीवरुन  खाली ढकलुन देते. 

तिच्या वयाच्या मुलीला असलेलं सेक्स नॉलेज आणि पियानो वाजवण्याची तिची असक्ती बघुन केटला तिच्या एकंदर वागणुकीबद्दल संशय यायला लागतो. त्यानंतर त्या अनाथालयाच्या प्रमुख सिस्टर अ‍ॅबिगेल केटच्या घरी येवुन जॉन आणि केटला इस्टरबद्दल सावध राहायला सांगतात आणि त्यांची ही चर्चा इस्टर चोरुन ऐकते आणि सिस्टर अ‍ॅबिगेलचा काटा काढायचा ठरवते. त्यासाठी ती छोट्या मॅक्सला विश्वासात घेते की सिस्टर तिला या घरातुन बाहेर काढायच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी तिला धडा शिकवणं गरजेचं आहे !!  सिस्टर आपल्या परतिच्या वाटेत आपल्या व्हॅनमध्ये असतानाच एका पुलाच्या इथे इस्टर मॅक्सला घेउन लपून राहते आणि जशी गाडी येते मॅक्सला गाडीसमोर ढकलते.. सिस्टर अ‍ॅबिगल कशीतरी गाडी सावरते आणि रडणार्‍या मॅक्सला बघायला धवत येते.. तेव्हाच इस्टर तिच्या डोक्यावर हातोड्याने वार करते आणि मॅक्ससमोर तिला मारुन टाकते ! ती मॅक्सला घेउन प्रेताला बर्फामध्ये धकलुन देते आणि सारे पुरावे डॅनिअलच्या ट्रीहाउस मध्ये लपवून ठेवते.. त्यादोघांना ट्रीहाउसमधुन उतरताना डॅनिअल लपुन पाहतो.. 

इथे केट जॉनला इस्टरच्या विअर्ड वागणुकिबद्दल सांगते पण तो इग्नोर करतो. केट तिच्याबद्दल अधिक जाणुन घेण्याच्या उद्देशाने तिच्या खोलीचा शोध घेते आणि तिला एक बायबलचे कॉपी सापडते जी इस्टोनिआ इथल्या एका मेंटल हॉस्पिटलमधली असते.  ती इस्टरचे फोटोग्रॅफ्स त्या इन्स्टिट्युटमध्ये पाठवते आणि अधिक माहिती सापडल्यास तिकडच्या डॉक्टरला कॉल बॅक करायला सांगते. 

इकडे इस्टर हळूहळू जॉन आणि केटच्या नात्यात फुट पाडायचे काम करत असते.. वेळोवेळी ती असं काही तरी करते की जॉनला वाटावं कि दोष केटचाच आहे. एका रात्री इस्टर डॅनिअलच्या खोलीत जाउन तो   त्याच्या गळ्यावर चाकु ठेवते आणि जर त्याने सिस्टर अ‍ॅबिगलच्या खुनाबद्दल कुणाला संगितले तर त्याला जीवे मारण्याची धमकी देते.. त्या धमकीने आणि तिच्या अवताराने बिचारा अंथरुण ओले करतो !! त्याला इस्टरची इतकी दहशत बसते की मॅक्सच्या खोलीतही तो लपुन छ्पुन जातो आणि त्यापुराव्यांबद्दल मॅक्सला हातवारे करुन ( तिच्या भाषेत ) विचारतो. मॅक्स सांगते की इस्टरने त्या सार्‍या वाईट गोष्टी ट्रीहाउसमध्ये लपवुन ठेवल्यात. 

दुसर्‍या दिवशी डॅनिअल ट्रीहाउसमध्ये शोध घेत असतानाच इस्टर तिथे येते आणि त्याला ट्रीहाउसमध्ये बंद करुन आग लावून देते.. हा सीन खतरनाक आहे ! बिचारा डॅनिअल ओरडत कसाबसा बाहेर पडतो पण झाडावरुन खाली पडतो.. तो जिवंत आहे हे पाहुन इस्टर एक दगड घेउन त्याच्या डोक्यात घालणार इतक्यात मॅक्स तिला आडवते आणि तो वाचतो.. एव्हाना आपल्या लक्षात येते की इस्टर एक सायको आहे पण ती असं का करते याचा तर्क आपणही असाच लावतो की ती एक सायको आहे आहे आणि त्यात ती सर्वांना मारुन टाकतेय ! 


डॅनिअल हॉस्पिटलमध्ये असताना इस्टर तिथेही त्याला उशीने त्याचे तोंड दाबुन मारायचा प्रयत्न करते तो ऑलमोस्ट मरत अस्ताना वेळेवर डॉक्टर त्याला वाचवतात ते की मॅक्सला काही तरी अघटीत घडतेय याची चाहुल लागते म्हणुन ! 
हे कूणी केलं ते केटच्या लक्षात यायला वेळ लागत नाही आणि ती इस्टरला तिथेच फटकावते पण जॉन तिचं ऐकत नाही आणि तो इस्टर आणि मॅक्सला घेउन घरी येतो. केटला डॉक्टर गुंगीचे इंजेक्शन देतात आणि तिलाही तिथेच अ‍ॅडमिट करतात.. 

त्या रात्री जॉन खुप वैतागलेला असतो आणि हॉलमध्ये बसुन ड्रींकस घेत असतो. त्यावे़ळी इस्टर ब्लॅक ड्रेसमध्ये हातात नाईफ घेउन त्याच्याशेजारी येते आणि त्याला सीड्युस करायचा प्रयत्न करते.. आता आपलंही डोकं ठणकु लागतं की इतकी छोटी मुलगी असं कसं करु शकते??? तेव्हा तिच्या अशा विचित्र वागण्याने जॉन वैतागतो आणि तिला परत ऑरफनेजमध्ये पाठवण्याची धमकी देतो.. आता त्यालाही कळु लागतं की केट जे सांगत होती ते खरे होते आणि आपण तिच्यावर अविश्वार दाखवला! 

इकडे केट शुद्धीवर येते असताना तिच्या सेलवर सार्ने इंस्टिट्युटमधुन एक कॉल येतो आणि त्या डॉक्टरकडुन तिला धक्कादायक बातमी मिळते. अ‍ॅक्चुअली इस्टर ही ३३ वर्षांची एक बाई असते आणि तिचं खरं नाव लीना क्लॅमर असते. तिला  HYPOPITUITARISM नावाचा रोग असतो जो माणसाची शारिरिक वाढ लहानपणातच खुंटतो आणि त्यामुळे लीना आतापर्यंत एका लहान मुलीसारखीच वागत असते. 
डॉक्टर केटला सांगतो की, लीना ही अत्यंत खतरनाक आहे. ती जरी शरीराने लहान असली तरी तिची मानसिक वाढ तिच्या मानसिक वयानुसारच झाली आहे; आणि या वयात असलेल्या शारीरीक सुप्त इच्छा ती पुर्ण करुन घ्यायला काही करु शकते.  आणि यापुर्वी तीने कित्येक खुन केलेत.. एका फॅमिलीत दत्तक म्हणुन असताना तिने तिच्या वडीलांनी तिच्याशी शारिरीक संबंध ठेवायला नकार दिल्यामुळे त्यांचा खुन करुन पुर्ण घराला आग लावली होती. 


इकडे जॉनच्या वागण्या आणि ओरडण्यामुळे हर्ट आणि रागवलेली लीना (इस्टर) परत आपल्या खोलीत येते आणि रागात आपला मेकअप उतरवते.. ( मेकअप उतरवतानाचा सीन डेंजर आहे ) त्यावेळी तिची सुरकुतलेली त्वचा, खोटे दात. मानेवर आणि हातावर असलेले स्कार दिसु लागतात ! रागाच्या भरात ती जॉनवर नाईफने वार करते आणि त्याला मारुन टाकते हे सगळं मॅक्स बघत असते. आता ती मॅक्सला मारायला धावते पण मॅक्स लपुन बसते आणि इतक्यात तिथे केट पोचते आणि मॅक्सला वाचवते. क्लायमॅक्समध्ये केट इस्टरला कशी मारते हे बघणंच योग्य आहे !



जेव्हा मुव्ही संपवून बाहेर पडलो तेव्हा बाकीचे सारेजण घाबरले होते.. बोलले, साल्यानों परत तुमच्याबरोबर आम्ही कधी येणार नाही ! कसले पिक्चर दाखवता आम्हाला !