Sunday, September 26, 2010

रात्रीचा पाउस आणि अस्वस्थता !!

अस्वस्थता !!
.
.
. 
मनात पसरत जाते मुसळधार पावसासारखी...
हिवाळ्यातल्या बोचर्‍या गारठयासारखी..
हजारो मैलांचा प्रवास करुनही जमीन न सापडलेल्या गलबतासारखी...
निर्जन, रखरखत्या वाळवंटात फसवणार्‍या मृगजळासारखी.....


अस्वस्थ मनाची अस्वस्थ स्थिती!!


फार अस्वस्थ आहे मी.. आणि माझं मन तर माझ्यापेक्षा... 

माझ्या मनाला  माझी अस्वस्थता कळत नाही त्यामुळे असेल कदाचित.. 
खरं तर माझं मनही आजकाल माझं राहीलेलं नाही..कुठेतरी दुर निघुन गेलयं.. मला एकट्याला सोडुन.. माझ्या अस्वस्थतेला कंटाळून!! माणसं एकमेकांना सोडुन जातात ना त्याप्रमाणे...


रात्री अचानक माझे डोळे उघडतात.. बाहेर पाउस माजलाय नुसता...रात्रीचे ३ वाजलेत... 

वारा आणि पाउस माझ्या खोलीची खिडकी जोरात वाजवतायत्.कूणी पांथस्थ रात्रीच्या वेळी आसरा शोधत दार ठोठावतो अगदी तसेच... 
माझं कर्तव्य आहे अशावेळी एखाद्या निराधाराला मदत करणं, त्याला आसरा देणं.. पण आजकाल कुणाचा भरवसा करता येत नाही.. 
दार ठोठावणारा तो एखादा चोर किंवा डाकु तर नसेल??? 
माझ्या घरात आसरा मागण्याच्या कपटी हेतुने माझाच काटा काढण्याचा त्याचा बेत तर नसेल??? 
पण असु दे!! मारला तर मारु दे!!  मला त्याला मदत करायला हवी... 


मी हळूहळू खिडकीपाशी जातो..
कोण आहे ??? विचारायच्या आधीच मी खिडकी उघडतो.. 

प्रचंड वेगाने, डोळ्यांची पापणी लवण्याअगोदरही वार्‍याच्या साथीने पाउस माझ्यावर जोरदार हल्ला चढवतो...
माझ्या शरीरावर सपासप वार करतोय...
मी व्हिवळतोय.. सहन न होणार्‍या वेदनांनी...स्वतःला दोष द्यायलाही सुचत नाही... 
का उघडलं मी दार ????  


नाही!! नाही!! थांब!!!
काही तरी वेगळंच घडतयं...
मी चुकतोय....
नाही!! नाही!!  हा पाउस चोर किंवा डाकु नाही.. 
मी साफ चुकलोय !!
हा माझा मित्र, सखा, सोबती आहे..जन्मजन्मांतराचं त्याचं आणि माझं नातं आहे... 
तुला आठवत नाही का?? बर्‍याच वेळा हा आपल्याला भेटलाय.. आपल्या सुख दुखाच्या क्षणांचा भागीदार..
नाही मित्रा, मला माफ कर!! मी तुला ओळखायला चुकलो.

अरे, शेवटी माणुसच ना मी??? 
मला कळलं नाही की इतक्या दिवसांनी तू मला भेटायला आलास, मग कसलाही विचार न करता तू  मला बिलगणारचं !!! आमचं माणसांचं असचं आहे रे!! आजकाल इथे ह्रदयाचे मारेकरी फिरतात बगलेत सुरे घेउन. म्ह्णून थोडं सांभाळावं लागतं. त्यात माझ्याकडे असलेलं ह्रदय माझं नाहीए त्यामुळे फार सांभाळावं लागतं रे! अजुन काही नाही!! 

काय म्हणतो? ह्रदय तुझं नाही ! 

हो! अगदी खरं, हे ह्रदय माझं नाहीच्.

मी फक्त सांभाळतोय ते...माझ्या जीवापलिकडे..बाहेर फिरणार्‍या मारेकर्‍यांपासुन जपतोय...
पण माझ्या अस्वस्थतेपासुन नाही सांभाळू शकत त्याला.. 

काय?? माझं ह्रदय कुठे आहे??? 

माहीत नाही!! ते केव्हाच मला सोडुन गेलयं..

कुठे??? 


कुठे??ते मलाही नाही माहीत.बरंच शोधलं त्याला.डोंगर दर्‍यात, नदी नाल्यात, गर्द रानात, समुद्रकिनारी.जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे शोधलं.पण नाही सापडलं ते.असु दे जिथे आहे तिथे...

काय??? मी खोटं बोलतोय??? 

खरं सांगतोय...मी का खोटं बोलु तुझ्याशी???

ही छातीवरची जखम कसली म्हणुन विचारतोयस?? 

 
भळाभळा वाहणारं रक्त तुझ्याशी अंगाला लागलंय !! अरे रे!! सॉरी हं!!!   
काही नाही रे,असंच, कधीची जुनी जखम ओली झालीय..


घाव ताजे आहेत???.....
.
.
.
.
हो !! मला खोटं बोलताच येत नाही!!! नको नको!! त्यावर फुंकर घालु नकोस !!! 

आत्ताच आत्ताच काही तासांपूर्वी माझ्या ह्रदयाचा खून झालायं.अगदी अमानुषपणे ते माझ्यापासुन कूणीतरी हिरावून नेलय.माझी स्वखुषीने दयायची तयारी होती पण,माझ्या छातीवर वार करुन, ती फाडुन कुणीतरी ते घेउन गेलं.या दाट काळोखात मी चेहराही नाही पाहु शकलो.
बाहेर पडलेले ते तुकडे दिसले तुला?? माझ्याच ह्रदयाचे आहेत ते!! त्याचा खून होताना, त्याला हिरावून नेताना विखुरलेत ते!! गोळा करायला पण जावंस नाही वाटतं!!
असू  दे... तू व्यथित नको होउस, 
माझ्यासाठी तुझे अश्रु नको ढाळूस !!!! 
आधिच माझं घर रक्ताने भरलयं...


तू आलास, फार बरं वाटलं,कुणाच्या तरी आधाराची गरज होतीच मला.

पण पुन्हा त्या अस्वस्थतेमुळी नाही सांगु शकलो कुणाला...
तुझ्या येण्याने धीर आलाय.जखमा धुवून निघाल्यात.आता थोडा वेळ विसावतो.पहाटे जाईन ते तुकडे गोळा करायला..
उरलेले,कुरतडलेले,ओरबाडलेले,रक्ताळलेले....
परत आणुन जोडेन, शिवायचा प्रयत्न करेन.काही झालं तरी माझ्या ह्रदयाचे काही भाग आहेत ते !!  

बरं! आला आहेस तर माझं एक काम करशील?? जाताना हे माझ्याकडे असलेलं ह्रदय घेउन जा.

ज्याचे त्याला परत कर.तसं पण ते माझ्याकडे नाखुष होउन राहीलयं.
सांभाळून जा.बाहेर ह्रदयाचे मारेकरी बगलेत सुरे घेउन फिरत आहेत... 
 

पत्ता??? 
 
अरे हो विसरलोच!! एक काम कर.बाहेर जे रक्ताचे डाग पडलेत ना, रस्त्यावर त्यांच्या मागावर जा.ते जिथे संपतिल ना तिथेच तुला हे ह्र्दय परत कारायचयं आणि हो तिथेच तुला  माझं ह्रदय दिसेल.
एका कोपर्‍यात निपचित पडलेलं,दु:खात बुडालेलं, रक्तात माखलेलं.त्याला प्लीज परत घेउन ये!! 
त्याने बरीच साथ दिलीय मला आतापर्यंत.

माझ्या सुखात ते वेडं होउन,बेभान होउन नाचलयं तर माझ्या दु:खातही तितक्याच आवेगाने रडलयं.ह्रदयाचंही ह्रदय पिळवटुन निघेल इतक्या वेदना त्याने सहन केल्यात.
त्याला मी असं कसं वार्‍यावर सोडु???? घेउन येशील ना??? 
माझी हिम्मत नाही होत तिथे जायला आता....


माझ्या प्रिय ह्रदया, 
मला माफ कर!! 
मी पुन्हा असा गाफिल नाही राहणार, माझ्या अस्वस्थतेमुळे तुझी शिकार नाही होउ देणार यापुढे!! ये तू माझ्याकडे परत!! आपण राहु आपले म्ह्णुन, तुझ्या माझ्या जगात!! 


अस्वस्थता! मेंदुच्या ठिकर्‍या उडविणारी, 
अस्वस्थता! एकमेकांना एकमेकांपासुन तोडणारी..

तुला माझ्यापासुन हिरावून नेणारी....

चल आपण स्वार होवुया; भग्न स्वप्नांची विल्हेवाट लावून नव्या स्वप्नांच्या लाटेवर कधीतरी या अस्वस्थतेचा नायनाट करु या विश्वासावर !!!!!


6 comments:

 1. खरच खुप मस्त लिहल आहेस रे...अस्वस्थता पोहोचली मनाची लवकर बांधकाम कर...

  ReplyDelete
 2. नमस्कार,

  आपला ब्लॉग http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-3.html या लिंकवर जोडला गेलेला आहे.

  धन्यवाद.

  ReplyDelete
 3. मनात पसरत जाते मुसळधार पावसासारखी...
  हिवाळ्यातल्या बोचर्‍या गारठयासारखी..
  हजारो मैलांचा प्रवास करुनही जमीन न सापडलेल्या गलबतासारखी...
  निर्जन, रखरखत्या वाळवंटात फसवणार्‍या मृगजळासारखी.....


  अस्वस्थ मनाची अस्वस्थ स्थिती!!


  फार आवडला लेख ..

  ReplyDelete
 4. @ Binary Bandya
  धन्यवाद मित्रा !!

  ReplyDelete