Monday, August 16, 2010

किल्ले सुधागड ..

  सुधागडचा ट्रेक हा आतापर्यंतचा थ्रीलिंग ट्रेक होता.. भर पावसात किल्ला सर करताना, फिरताना आणि तो उतरताना भारी कसरती झाल्या.. मराठी ब्लॉगर्स चा विसापुरच्या ट्रेकमध्ये सुहास्,अनुजा यांच्याशी ओळख झाली होती..विसापुरच्या  ट्रेकबद्दल आपण रोहनच्या ब्लॉगवर वाचलेस असेल.. त्यानंतर बझवर रोहनने सुधागडला जातोय म्हणुन लिहिले, त्याला रिप्लाय म्हणुन मी बोललो की अरे मी सुद्धा पुढच्या रविवारी म्हणजे १-०८-२०१० ला प्लॅन करतोय असे लिहिले.. त्यानंतर अनुजा बोलली की ती सुद्धा येतेय, मग सुहासही तयार झाला.. झाले तर मग आम्ही ३० जुलैला रात्री निघायचे ठरले... हे सगळे दोन दिवस बझ्झ्वरच अपडेट होत होतं, म्हणजे कसं जायचे, कितिजण येणार वैगरे.. आता पर्यंत आम्ही चौघेचजण होतो.. मी, अनुजा,सुहास आणि माझा एक मित्र महेश ज्याच्या गाडीने आम्ही जाणार होतो...नंतर अनुजाने सांगितले की तिच्याकडुन अजुन ५ जण येणार आहेत पण जायच्या दोन दिवस आधी त्यातले ४ जण कॅन्सल झाले.. मग मी, अनुजा,तिचा मित्र आशु, सुहास आणि महेश एवढेचजण तयार झालो... जायच्या आधी अनुजाने गडावर जेवण बनवायच्या प्लॅन केला होता. दाल खिचडी किंवा कोंबडी रस्सा.आयडीया थ्रीलींग होती ,पण नंतर काहीजण कॅन्सल झाल्यामुळे गडभोजनाचा प्लॅन रद्द करण्यात आला...


 


सुधागड तसा फारसा लांब नाही मुंबईहुन पाली आणि पालीहुन जेमतेम १०-१२ किमी वर हा गड आहे.. शनीवारी रात्री निघायचे ठरले.. मला शनीवारी हाफ डे असतो, अनुजा, आशु आणि सुहास असे आम्ही संध्याकाळी अंधेरीला भेटायचे ठरवले...रात्री थोडं लेटच निघायचे होतं. अनुजा ५.३० ला ऑफिसवरुन सुटणार होती आणि मला हाफ डे असल्याने मी ऑफिसमध्येच बसलो होतो.. बाहेर हलकासा पाउस होता. काम नसल्याने मी अनुजासोबत चॅटवर अंताक्षरी खेळत बसलो होतो... आणि त्याचबरोबर किशोरी  ताईंचा तीन ताल मधील तराणा ऐकत होतो....सव्वा पाच ला अनुजाचा टेकस्ट आला की मी निघतेय तु ६.०० वाजता अंधेरी स्टेशनला पोच. ट्रॅफिकमुळे मला पोहचायला थोडा उशीरच झाला... तोवर आमची एस्.एम्.एस अंताक्षरी सुरुच होती...आशु आणि सुहास येइपर्यंत आम्ही स्टेशनवर गप्पा मारत बसलो...काही वेळाने आशु आला आणि सुहासपण आला.. महेश काही कामानिमित्त कांदिवलीला गेला होता..आणि त्याला यायला थोडा उशीर होणार होता तोवर आपण खादाडी करुन घ्यावी असं ठरवलं.. त्यासाठी अनुजा ने आरफाचं नाव सुचवलं ( आरफाच्या खादाडीबद्द्ल अनुजाने वेगळी पोस्ट टाकली आहे ती इथे वाचु शकता ). जेवण तुडुंब झाल्यावर आम्ही चालत स्टेशनच्या दिशेने आलो.. महेश अजुनही कांदिवलीलाच होता आणि त्याला यायला अजुन थोडा वेळ लागणार होता... काही वेळाने साल्याचा फोनच लागेना तेव्हा हा टांग देतोय की काय असं वाटायला लागलं कारण आम्ही त्याच्याच गाडीतुन जाणार होतो... मी ही शंका बोलुन दाखवल्यावर तर बाकीच्यांनी माझा हनुमान करायचा ठरवलं आधीच माझ्या हनुवटीला काय तरी छोटीसी पुळी आली होती आणि हनुवटी थोडीशी सुजली होती....काही वेळाने महेशचा फोन आला आणि त्याने आम्हाला अंधेरी ईस्टच्या विनायक मंदीराच्या इथे थांबायला सांगितले. तिथेही साला लेटच आला... पण शेवटी आला... आम्ही पालीच्या दिशेने कुच केले.. गप्पा मारत्.गाणी ऐकत्,गुणगुणत आम्ही निघालो होतो..

पनवेल नंतर तुफान पाउस कोसळु लागला.. भर पावसात ड्राईव्ह करत आम्ही पालीला पोचलो तेव्हा दोन - तीन वाजले असावेत... मग पालीच्या बल्लाळेश्वराच्या भक्त निवार्‍यात आसरा मागायला गेलो पण जागा नाही मिळाली. मग गाडी एका दुकानाच्यासमोर लावून आम्ही गाडीतच झोपी गेलो...पाउस कोसळतच होता... सकाळी साडे पाचच्या दरम्यान मला जाग आली. गाडीच्या खिडकिवर एक गावातला मुलगा टकटक करत होता.. मी वैतागुन खिडकीची काच खाली केली. बोललो, "काय आहे? "
" साहेब तुम्हाला माहीत आहे ना पुढचा टायर पंक्चर आही तो!"
तो असं बोलताच आमची झोपच उडाली...भर पावसात आम्ही तो टायर बदली केला त्यानंतर एका गॅरेजमध्ये जाउन तो पंक्चरही काढला.. या सगळ्यात तास - दोन तास् वाया गेले... मग सकाळचहा नास्ता आटपुन क्षणाचाही विलंब न लावता आम्ही पाछापुरच्या दिशेने कुच केले..बराच वेळ झाला तरी गड नजरेत येत नव्ह्ता त्यात धुकंही बरच होत... ठाकरवाडीला पोहचता पोहचता गड दिसु लागला... हिरवागार, वरुन धुक्याने आच्छादलेला, आणि उमाळे फुटावे तसे पांढरेशुभ्र धबधबे खाली कोसळत होते.. डोळ्याचं पारणं फेडणारे ते दृश्य आम्ही कॅमेर्‍यात बंदिस्त केले आणि ठाकरवाडीला पोचलो. शाळेजवळ गाडी पार्क केली.. आणि वाट विचारत विचारत गडाच्या दिशेने चालु लागलो...
चढण तशी कठीण नाही.. आम्ही गप्पा मारत वर चढत होतो.. सुधागड करायचा दुसरा हेतु म्हणजे मला तेलाबैलाचं दर्शन  घ्यायचं होतं पण शेवटपर्यंत दिसलाच नाही. कदाचित आम्ही दुसर्‍याबाजुला गेलोच नाही...रानातुन वाट काढत आणि दिशादर्शक बाणांचा मागोवा घेत आम्ही गडाच्या दरवाज्याशी पोचलो... वर चढताच अनुजा नावाच्या चोराला चोर दरवाजा दिसला मग त्या चोर दरवाज्यातुन शिरुन आम्ही दुसर्‍या वाटेला बाहेर आलो.. आणि पुन्हा त्याच दरवाज्यातुन वर चढलो. चोर दरवाज्याचा तो अनुभव थ्रीलींग होता...मला आणि सुहासला सोडुन ( आमच्या गुटगुटीतपणामुळे )बाकिच्यांना त्या चोर दरवाज्यातुन जायला यायला काही विशेष अडचण नाही जाणवली.


काही वेळाने पाउस सुरु झाला.. आणि चांगलाच कोसळु लागला.. गडाच्या त्या हिरव्यागार माथ्यावर आम्ही अक्षरशः ढगात विहार करत होतो... तिथुन हलावेसे वाटतच नव्हते.. काही वेळाने आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो.पाउस थांबायचें नाव घेत नव्ह्ता.. चालत चालत आम्ही गडावर असलेल्या पंत सचिव वाड्यावर आलो... तिथे आधी पासुनच काही भटक्यांचा बॅग्स होत्या.. एका शेगडीवर असलेल्या टोपात जेवण बनवले होते.. ते काय होते ते अनुजा ( माउच्या पावलांनी ) जाउन चेक करुन आलीच.. खिचडी होती कदाचित.. मग आम्ही सुद्दा आमचं जेवण उरकायचं ठरवलं त्यासाठी अनुजाने ठेपले आणले होते. लोणच्याबरोबर ठेपले आणि केळ्यांचे चिप्स असा बरगच्च जेवणाचा कार्यक्रम आट्पुन आम्ही निघलो...

पुढे महादरवाजा बघायचा होता...वाटेत भोराई देवीचे दर्शन घेतले आणि निघलो..मंदीरासमोरची दीपमाळ फारच सुंदर होती... बराच वेळ हुडकुनही महदरवाज्याचा रस्ता सापडत नव्हता.. पण महादरवाजा बघितल्याशिवाय जायचंच नाही असं ठरलं होतं नाही तर त्या ट्रेकचा उपयोगच काय??? शेवटी दगडांच्या पायर्‍या दिसायला लागल्या. वाटे अजुन काही भटके सापडले. काही वेळाने आम्ही महादरवाज्यापाशी पोचलो आणि ट्रेक सार्थकी लागला असं वाटलं. आमची गाडी ठाकरवाडीत होती आणि जर आम्ही महादरवाज्याने उतरलो तर धोंडसे गावात पोचणार होतो. पण पुन्हा उलटं जाण्याऐवजी आम्ही धोंडसे गावात उतरुन मग ठाकरवाडीला जाउ असे ठरले. आणि इथेच फसलो..पण प्रॅक्टिकली ट्रेकचा हाच पॅच थ्रीलिंग होता.. उतरताना गडाच्या पायर्‍यावरुन पाणी अगदी फोर्सफुली वाहत होते त्यामुळे ते दगड गुळगुळीत झाले होते त्यामुळे प्रत्येक पाउल सांभाळुन टाकावे लागत होते... तरीही दोन वेळा मी गोल केलाच... पहीला गोल एकदम सही होता.. मी एका दगडावरुन बसुन हळूच उतरत होतो आणि माझा पाय घसरला. धाड धुड माझ्या तंगड्या वर झाल्या आणि मी त्या खडकांमधे आदळलो. नशीब पाठीवर बॅग होती त्यामुळे जास्त लागलं नाही... मी कसाबसा उठलो आणि पुन्हा सांभाळून चालु लागलो... काही वेळाने अगदी सहज चालताना एका दगडावर पाय ठेवला आणि पुन्हा सटकलो यावेळी उजव्या हातावरच पडलो. हात मजबुत दुखावला. माझ्यामागे अनुजा होती,तीने मला पटकन सावरलं नाहीतर मी सरळ खाली असलेल्या दुसर्‍या कातळावर आदळलोच असतो. ( विशेष म्हणजे हा अनुजाचा पहिलाच ट्रेक होता जिथे तिने एकही गोल नाही केला ) आजचा दिवस काही खरं नव्हतं एका मागुन एक दोन गोल झाले होते... उतरता उतरता एक गोष्ट जाणवत होती की गेला एक - दिड तास आम्ही चालत होतो पण बेस काही सापडत नव्हता... इतर ट्रेकर्स ग्रुप सोबत होतेच.. पण एका ठिकाणी येउन आम्ही थबकलो कारण पुढे रस्ताच नव्ह्ता..आणि तो पाण्याचा प्रवाह पुढे धबधब्यात कन्व्हर्ट झाला होता.. जो ट्रेकर्सचा ग्रुप सोबत होता त्यांच्यातले काहीजण पुढे गेले होते. ते नक्की कोणत्या मार्गाने गेले तेच समजत नव्हते त्यामुळे चुकामुक झाली आम्ही रस्ता शोधत होतो शेवटी आरोळ्यांना प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो... काही वेळाने खाली उतरलो आणि बघतो तर बरेच जण होते आणि नदीतुन मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. मग आम्हीही त्यांच्याबरोबर नदी पार केली... चालता चालता मला राहुन राहुन वाटत होते की आपण रस्ता चुकलोय.. तरीही नदीच्या एका बाजुने आम्ही चालत होतो.. काही वेळाने लक्षात आलं की आपल्याला नदीच्या दुसर्‍या बाजुला जायचयं.मग काय चला रिव्हर क्रॉसिंग.. एकमेकांच्या हातात हात गुंफुन आम्ही नदी पार केली. प्रवाह बराच होता पण सावरत सावरत आम्ही नदी पार केली.. फार मजा आली..मग त्या बाजुने चालताना मला आम्ही जिथुन गड चढायला सुरु केला होता तो स्पॉट दिसला आणि मग सगळं लक्षात्त आलं.. ( खरं तर आम्ही पहिल्यांदा नदी पार केली त्या ऐवजी आम्हाला नदीच्या त्याच बाजुने किनार्यावरुन जायचे होते, पण वाट चुकल्याने आम्हाला दोन वेळा नदी पार करावी लागली ) त्याच परत पुढे गेल्यावर काही मुले पोहत होती... त्यांना ठाकरवाडीचा रस्ता विचारल्यावर त्यांनी रस्ता दाखवला.. म्हणजे आम्हाला पुन्हा नदी पार करायची होती.. चला परत कंबरभर पाण्याच्या प्रवाहात आम्ही पुन्हा नदी पार केली.ऑस्स्सम !! नथिंग लाईक इट! काय हवं आयुष्यात अजुन???

काही वेळाने नदीवर छोटा पुल दिसला... काही क्षण गडाला पुन्हा डोळ्यात भरुन घेतले आणि चालु लागलो..समोर एक गुराखी दिसला त्यांना ठकरवाडीचा रस्ता विचारला तर तो बोलला की समोरुन चालत गेलात तर १ तासात पोहचाल. आम्ही आता धोंडसे गावात पोहचलो होतो. म्हणजे आमची गाडी जिथे होती तिच्या अगदी विरुद्द दिशेस.. मग स्थानिकांकडुन माहीती घेउन आम्ही धोंडसे गावातुन एस्.टी. पकडुन एकवीस गणपतीच्या स्टॉपवर उतरुन मग पुन्हा ठाकरवाडीला एस्.टींए जायचे असे ठरले.. काही वेळाने आम्ही तिथे पोहचलो. इथुन पाली फक्त ४ किमी होते आणि ठाकरवाडी १० किमी. आम्ही महेशला एका बाईकवरुन पुढे जाउन गाडी आणण्यास पाठवले आणि आम्ही तिथेच टेकलो..महेशला जाउन बराच वेळ झाला होता... ठाकरवाडीची शेवटची बस जाउन परत पालीला गेली तरीही हा आला नाही.. आता बराच वेळ झाला होता तरीही महेशचा काही पत्ता नव्हता. आता हळूहळू काळोख पडु लागला आणि आमची काळजी अधिकच वाढु लागली.. याला इतका वेळ का लागावा??? आम्ही वैतागलो होतो.. मग ठरवलं की रिक्षा करुन आपण ठकरवाडीला जायचं पण रिक्षावाले २०० - ३०० च्याखाली ऐकेनात. त्यात महेशचे दोन्ही सेल बंद होते..आम्ही गेलो आणि हा झर्रकन निघुन गेला आणि त्याला आम्ही सापडलो नाही मग पुन्हा चुकामुक... वळणावरुन येणारी प्रत्येक गाडी आम्हाला आमचीच गाडी दिसत होती... आशु आणि मी वळणावर जाउन उभे होतो... आता ९ वाजायला आले होते. काहीच कळत नव्हत काय करायचे ते... शेवटी एक स्विफ्ट थांबली त्यात ५-६ जण तरुण बसले होते.. त्यांआ आम्ही झालेला प्रकार सांगितला.. ते सर्वजण नशेत होते, प्रोबॅबली डोपर्स.. त्यातला एकजण बोलला की तुमच्यापैकी कुणीतरी एकाला पाठवा आमच्याबरोबर आम्ही बघुन येतो.मी तयार झालो. मुलं ठिक दिसत नव्हती पण सोड ना यार!! आम्हाला महेशची काळजी वाटत होती. अनुजाने मला बाजुला घेउन शंका बोलुन दाखवली, पण अजुन काही उपाय नव्हता मी त्यांच्या गाडीत बसणार इतक्यात समोरच्या वळणावरुन एक गाडीचे प्रखर हेडलाईटस आमच्या डोळ्यावर पडले आणि ओळखिचा हॉर्न कानावर पडताच आमच्या जिवात जिव आला... हो आमचीच गाडी होती ती... आम्ही सारेजण गाडीत बसलो.. महेश फार टेन्सड वाटत होता.. (आम्ही त्याला काहीच विचारले नाही असे आधीच ठरले होते).आता नॉनस्टॉप मुंबई !!  पण काहीवेळाने अनुजाने त्याला विचारलं की काय झालं रे ? इतका उशीर का झाला.???  त्यावर महेशने त्याची कहाणी ( झालेला सगळा प्रकार) सांगितली... महेश ज्या बाईकवाल्यासोबत गेला होता तो बाईकवाला ठाकरवाडीला नाही तर नांदगावला जाणारा होता.. त्याने महेशला मुख्य रस्त्यावर न सोडता नांदगावला नेउन सोडले जो गाव ठाकरवाडीपसुन ६ - ७ किमी होता.. नांदगावातुन उलट चालत येउन परत मुख्य रस्त्यावरुन चालुन त्याला पाछापुरहुन ठाकरवाडीला जावे लागले.. बरे, काळोख पडत होता आणि हा त्या निर्जन रस्त्यावरुन एकटाच चालत होता. आजुबाजुला मानसांचा मगमुसही नव्ह्ता त्यामुळे तो घाबरला होता.. वाटेत एका गावात त्याने विचारल्यावर त्या लोकांनीही त्याला घाबरवले की अरे आता तु नाही पोचणार, पुढे जंगल आहे, स्मशान आहे वैगरे वैगरे.. तरीही चालत चालत बिचारा रडवेला होउन कसाबसा ठकरबाडीला पोचला आणि तिथुन गाडी घेउन १० मि. परत आला.. चालुन चालुन त्याचे पाय गळ्यात आले होते आणि त्याला गाडीही नीट चालवता येत नव्हती, मग आशुने गाडीचा ताबा घेतला... बराच वेळ झाला होता... अनुजा आणि आशुला पालघरला पोचायचे होते, सुहासला सकाळी ३.०० वाजता ऑफीसला पोचायचे होते, सगळा प्रॉब्लेम झाला होता... मग आशु,अनु, आणि महेशला मी माझ्या घरी राहायला सांगितले, सुहासला कसंही करुन ऑफिसला पोचायचे होते. साडे दहा - अकरा वाजता आम्ही हाय - वे वर एकवीरा मध्ये डीनर आटपला आणि पनवेलच्या दिशेने निघालो... सुहासला पनवेल स्टेशनवर सोडले, त्याच्या नशीबाने त्याला शेवटची लोकल मिळाली...मग रात्री मस्तपैकी झोपुन सकाळी आम्ही आपापल्या ऑफिसच्या दिशेने निघालो पुन्हा एकदा आठवडाभर कॉर्पोरेट विश्वाचा ट्रेक सर करण्यास........

नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते, महाराजानी त्यासाठी सुधागडची पाहणी केली पण महराजांनी रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली - सौजन्य अनुजा सावे....

5 comments:

 1. आहा दोन गोल मारुन गोल्डन बूट अवॉर्ड विजेता झालास :)
  मस्त पोस्ट, परत पोचलो बघ गडावर :)

  ReplyDelete
 2. मस्तच आहे ही पोस्ट.... मजा केलीत रे जाम!!!

  ReplyDelete
 3. हो रे ! खूप धम्माल केली, पण शेवटच्या फेजमध्ये सगळी मजा उतरली!!

  ReplyDelete
 4. amhi hi janar aahot sudhgadla pan exact location mahit nahi plz help

  ReplyDelete
 5. @ Pinacal Group please mail me your email id on deeheart@gmail.com so I can guide you...

  ReplyDelete