Monday, June 28, 2010

राजमाची ट्रेक .....


२० जुनला राजमाची ट्रेक करुन आलो. ही माझी तीसरी ट्रेक. याआधी मागच्या वर्षी लोहगड आणि या वर्षी जानेवारीत सिंह्गड करुन आलो होतो. प्रत्येक ट्रेकमध्ये एक थ्रीलिंग असते. भटकण्याच छंद हा मला पहिल्यापासुनच आहे. पण किल्ल्यांची खरी ओळख मला रोहन, पंकज यासारख्या ट्रेकर्सच्या ब्लॉग्जमुळे झाली आणि कधी तरी आपणही हे सर्व वैभव याची डोळा पाहायचं,अनुभवायचं हे मनाशी पक्कं केलं. ट्रेक करायची तर एकट्याने शक्य नसतं. त्याची आवड असणारे, निसर्गाशी एकरुप होणारे, हिरव्या गवतावर लोळण घेणारे, तासंतास सुर्यास्तात हरवून जाणारे,नदीच्या पाण्यात डुंबणारे,  आणि हो या सार्‍या सह्यपर्वतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारे चार - पाच मित्र हवे होते. माझ्या दुर्दैवाने माझ्या तिन्ही ट्रेकमध्ये मला असे कोणी सापडले नाही. ते ट्रेक म्हणजे पिकनिक समजुन आले होते. आणि इतक चालुन त्यांचा दम निघाल्यामुळे त्या सगळ्यानी प्रत्येकवेळी माझा उद्धार केला. मला या लोकांची किव यायची. यांना कसं काहीच वाटत नाही. इतकी मेहनत करुन जेव्हा आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहचतो, तेव्हा ते सारं वैभव पाहुन छाती कशी अभिमानाने फुलुन आली पाहिजे. पण नंतर मला जाणवलं की मी चुकिच्या लोकांबरोबर फिरत होतो.असो. पण राजमाची ट्रेक महेश आणि मी फार एन्जॉय केला.

फ्रायडेला मी आणि महेश जी टॉकवर चॅट करत होतो. बोलता - बोलता ट्रेकचा विषय निघाला आणि आम्ही राजमाचीला जायचं प्लॅन केला. महेश त्याची सुमो व्हीक्टा घेउन येणार होता. मग एवढी मोठी गाडी काढणार तर त्याप्रमाणे पंटर पण हवेत. मग महेशने त्याच्या काही मित्रांना बोलावले. मागच्या ट्रेकचा अनुभव होता म्हणुन मी माझ्या जुन्या ग्रुपमधल्या कुणालाही बोलावले नाही. रात्री दीड वाजता महेश आणि बाकिच्यांनी मला पनवेलहुन पिक अप केले. महेश, अमोल, महेंद्र आणि मी दहावीपर्यंत एकाच शाळेत होतो. बाकीचे सारे महेंद्र आणि महेशचे मित्र होते. रात्री २/ २.३० वाजता आम्ही लोणावळ्याला पोहचलो. लोणावळ्याहुन राजमाचीला जाता येतं एवढं माहेत होतं पण नक्की कसं जायचे ते माहीत नव्हतं. एका दुकानावर थांबुन मस्तपैकी चहा मारला आणि त्या दुकानवाल्याला राजमाचीला कसं जायचे याची माहीत घेतली. त्याप्रमाणे आम्ही तुंगार्लीच्या दिशेने निघालो. रात्रीचे ३.०० वाजले होते. सारा परीसर शांत झोपला होता. काळोखात आजुबाजुचे काही दिसत नव्हते. जोवर रस्ता दिसत होता तोवर महेश गाडी हाकत होता. मी ही कन्फुज्ड झालो होतो. बराच वेळ कच्या रस्त्यातुन ड्राईव्ह केल्यावर पुढे काहीच कळेना म्हणुन एका बंगलोच्या इथे गाडी उभी केली. एक वॉचमन तिथे होता. पुढे बसलेल्या विशालने त्याला विचारले " दादा, राजामाचीला कसं जायचे?"
"कूठं ??"
" राजामाची.... राजामाचीला कसं जायचं? "
'' राजामाची???? राजामाची न्हायी... राजमाची... राजमाचीला जायचयं का?"
" हो ...हो .. राजमाची,.......! " 
" तुम्ही चुकिच्या रस्त्याने आलात.... तुम्ही परत मेन रोडला जा. तिथुन राईट्ला वळा आणि आर्.पी.टी.एस. कंपनीच्याइथुन खाली उतरा.. तो सरळ रोड राजमाचीला जातो. इथुनही जाता येईल पन  पोहचेपर्यंत तीन साडे तीन तास लागतील. "

त्याचे आभार मानुन आम्ही परत फिरलो... मेन रोडला आलो. आणि त्या आर्.पी.टी.एस. च्या इथुन खाली उतरलो. रस्ता अतिशय खराब होता. मध्येच एक ट्रक रस्त्यात असलेल्या एका झाडामध्ये फसला होता. आम्ही त्या कच्च्या रस्त्यातुन पुढे निघालो. रात्रीच्या काळोखात आजुबाजुला कहीच दिसत नव्ह्ते. आम्ही ड्राईव्ह करत करत कोणत्यातरी गावात पोहचलो.. आता परत कन्फुज्ड... !!! कुठे जायचे तेच कळत नव्हते.. परत मागे आलो. आणि परत एका हॉटेलच्या सि़क्युरिटी गार्डला झोपेतुन उठवलं.. रस्ता सापडत नाही म्हणुन मी आणि महेश टेन्समध्ये होतो. तर बाकीचे सारे आमच्या नावाने आरडा ओरड करत होते....मला साल्यांचा राग येत होता... त्या गार्डने सांगितले की, रस्ता बरोबर आहे, फक्त गावातुन पुढे गेल्यावर राईट मारुन जा, म्हणजे पोचाल.... काळोख असल्याने काहीच दिसत नव्हते... आणि बाकीचे सारे ( जे पिकनिक समजुन ट्रेकला आले होते) बीअर हवी म्हणुन ओरडत होते.... शेवटी परत फिरायचे ठरले.. पहाटेला परत या रोडने यायचे असं ठरले.. आम्ही परत मेन रोडला त्या चहाच्या दुकानापाशी आलो.. रात्रभर आम्ही रस्ता शोधत फिरत होतो.. आता सकाळचे ५.३० वाजले होते. दुकाने अद्याप उघडली नव्हती आणि रात्री रस्त्यावर असणार्‍या भुर्जी पाव, चहाच्या टपर्‍या आता बंद झाल्या होत्या... एका टपरीवर महेशने मॅगी ऑर्डर केली... मी काही खाल्लं नाही... बाकीचे लोक बीअरच्या शोधात होते... मला अजुनही या लोकांचा राग येत होता... एवढ्या सकाळी कुठे मिळणार यांना... मी त्यांना समजावले, की पहिल्यांदा आपण किल्ल्यावरुन जाउन येवुया मग निघताना जे काही करायचे ते करा.... पण माझं आणि महेशचे एकणारे कुणी नव्हते.... त्यातल्य एकाने गाडीचा ताबा घेतला आणि गाडी लोणावळा मारकेट्च्या रस्त्यावर एक जॉनी वाकर नावाचा वाईन शॉप आहे तिथे उभी केली.. का ? तर म्हणे ते दुकान सकाळी ७.०० वाजत ओपन होईल.... माज डोकं सणकलं होतं... काय हरामखोर आणि नीच लोक आहेत... महेशने मला थांबवलं.... शेवटी तिथल्या एका स्थानिक माणसांच्या मदतीने त्यांनी बीअरची सोय केली... आणि आम्ही परत तुंगार्लीच्या दिशेने निघालो...

रस्ता बराच खराब होता.. पाउस नव्हता.. नाहीतर पावसात रस्त्याची हालत अजुन खराब झाली असती.. आमच्याकदे सुमो विक्टा होती... महेशने छान ड्राईव्ह करत गाडी कशीबशी काढली.. परत चुकायलो नको म्हणुन आम्ही रस्त्यावर दिसणार्‍या प्रत्येकाला पुढची वाट विचारत होतो....काही वेळाने आम्ही तुंगार्ली धरणाच्याइथे आलो. समोर राज्माची दिसत होता.. एका बाजुला संपुर्ण कातळाची भिंत लांबच्या लांब पसरली होती... तिथेच काही फोटो घेतेले.... मला आता राहवत नव्हतं कधी एकदा किल्यावर पोहचतो असं झालं होतं... पुढे गाडी जाईल कि नाही याची शंका होती, तसचं डिजेलचा काही अंदाज नव्हता.. म्हणुन आम्ही गाडी एका घराजवळ पार्क केली आणि तिथुन चालत जायचे ठरले.... अजुन किती चालायचे हे मलाही माहित नव्हते.. आम्ही जिथुन चालायला सुरुवात केली तिथुन दोन- अडीच तास लागले आम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी पोह्चायला... मी आणि महेश सोडुन बाकिच्यांची पहिलीच ट्रेक होती.. आम्ही चालत होतो.... अमोल, महेंद्र आणि बाकेचे सारे जण माझा उद्दार करत चालत होते... काही जणांनी किल्ल्याला दुरुनच नमस्कार करायचे ठरवले.. मी ऐकणार नव्हतो.. मी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितले... कुणी येवो अगर न येवो मी जाणार.... महेशही माझ्याबरोबर तयार होता.... आम्ही पढे चालत होतो... बाकीचे दंगा मस्ती करत ..बीअर पीत.. ओरड मारत चालत होते...मी महेशला बोललो साल्या कूठुन आणलं यांना... सगळ्या ट्रेकची मजा घालवली....बाकिच्यांना मी ओळखतही नव्हतो.. पण महेंद्रला एकाच बीअरमध्ये चढली होती कारण तो माझ्याशी बराच वाद घालत होता... त्यात अमोल न पीता त्याला साथ देत होता.... दोघांनीही अक्षरशः मला पीड पीड पीडले.... कुठुन मला दुर्बुद्धी झाली आणि यांना ट्रेकवर घेउन आलो असं मला वाटत होतं..... रस्ता चांगला होता.. एका मो़कळ्या जागेवर आल्यावर राजमाची स्पष्ट दिसत होता.. पण तिथपर्यंत पोहचायचे म्हणजे समोर दिसणारी दरी क्रॉस् करुन अजुन चालावे लागणार हे दिसत होते.. पण आता मागे फिरणे शक्य नव्ह्ते किंवा मनाला पटतही नव्हते.. आम्ही चालु लागलो... वाट चांगली होती.. पावुस नसल्याची खंत सारखी लागत होती... रानातुन चालत चालत आता आम्ही किल्ल्याच्या जवळ आलो होतो... ज्या ठिकानी उभे होतो तिथुन तुंगार्ली धरण दिसत होते... म्हणजे परत जाताना आम्हाला किती चालत जावे लागणार याची जाणिव झाली होती... आता समोरची खोल दरी दिसत होती... समोर रिकामा धबधबा होता..... तिथे काही फोटो घेउन आम्ही निघालो.... पायथ्याशी आल्यावर एका दुकानात बिस्किटे आणि लिंबु सरबत घेतला.... पाहिलं तर काही बाईकस्वार किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाईक घेउन आले होते... ... एव्हाना जी मुले काहीवेळापुर्वी परत जाण्याच्या गोष्टी करत होते ते ऑलरेडी किल्यावर पोहचले होते... महेशने त्यातल्या एकाला फोन केला तर तो किल्ल्याच्या माथ्यावर पोहचुन झेंडा फडकवत होता... काय विचित्र पोरं होती ही.... मग मी, महेश, अमोल आणि महेंद्रने चढाई सुरु केली... पावसामुळे काही भाग स्लिपी झाला होता... अर्ध्यावर चढलो.. महेश आणि महेंद्र पुढे गेले.. चढताना प्रॉपर असं आधाराला काही नाही त्यात हवा विरुदध दिशेने ढकलत होती...
मध्येच अमोल बोलला, " साल्या, तु मला मरवणार आहेस.. तुला माहीत आहे मला चक्कर आणि फीट्स येतात..शाळेत मी दोन - तीनदा असाच पडलो. होतो.. "
मला पटकन आठवलं.. हा यार!!! आता जर हा इथे पडला तर सगली बोंब.. आणि याच्या फिटस मी शाळेत असतान अनुभवल्या होत्या... मी त्याला तिथेच बसायला सांगितले आणि बोललो तु अजुन वर येवु नकोस.. मी जाउन य्तो.. तोवर तु इथेच थांब किंवा खाली जाउन बस्.....अस.म म्हणुन मी पुढे जात होतो... पण पुढे चढण्यासाठी फार अवघड वाटत होतं.. दोन तीन दगडातल्या पायर्‍या पण तिथुन पाणी वाहत होतं आणि बरचं स्लिपी होतं.. खाली पाहिलं तर माझं डोकंही गरगरायला लागलं...कारण बाजुला धरायला कसलाच आधार नाही आणि जर सटकलो तर डायरेक्ट खाली.... तरी मी खाली न बघता चढलो आणि व्हयचे तेच झाले माझा पाय घसरला.. मी घाबरलो .. पण स्वतःला सावरलं... माझी छाती धडधडायला लागली... अमोल मला हसु लागला..," काय राजे??? फाटली???"
मी काहीच बोललो नाही... थोडावेळ बसलो.... समोरु एक वाट दिसत होती.. ती ही तशीच... कसलाही आधार नाही.... त्याच वाटेवरुन एक बाई ' मरा मरा मरा मरा मरा ...." करत चालली होती.... आता काय करायचं... किल्ल्यावर जाणे अटळ होते... नाहीतर सारे रात्रीचं जागरण, इतकं चालणं सारं काही व्यर्थ होतं. अमोल त्याच दगडातल्या पायर्‍यावरुन बूट काढुन चढला... मी ही प्रयत्न केला पण माझे पाय थरथरायला लागले.. अमोल पुढे गेला.... शेवटी मनाचा धीर केला.... समोरच्या वाटेवरुन जी बाई काही वेळापुर्वी गेली होती तिथुन जायचे... उठलो, नजर समोर ठेवली.. खाली बघायचच नाही.. आणि सरळ चालत गेलो... वारा खाली ढकलत होता पण न थांबता गेलो... आणि झापकन वर चढलो...जसा गडावर गेलो... मोठ्याने ओरडलो....  "हर हर महादेव ! "समोर दिसणारं दृश्य बघुन भान हरपून गेले.... दुरवर नजर जाईल तिथे लांबच्या लांब पसरलेले डोंगर, चारी बाजुनी धुक्याने बुडालेले.... एका बाजुला समोर एक काळा सुळका दिसत होता.. कदाचित ढाक बहीरी असावा...  समोर श्रीवर्धन आणि मनरंजन हे बालेकिल्ले दिसत होते...मी एकटाच्या तिथल्या एका खडकावर आडवा झालो... पावसाच्या बारीक सरी पडत होत्या पण मोठा पाउस पडण्याची चिन्ह दिसत नव्हती... मी ती सारी शांतता स्वतःमध्ये सामावुन घेत होतो.... काही वेळाने उठुन किल्ल्याच्या माथ्यावर जायला चालु लागलो... किल्ला पुर्ण बघायला मिळाला नाही.. माथ्यावर जाउन काही फोटो काढले आणि परत जायला निघालो.... ते सारं वैभव डोळ्यात साठवुन....


निघायच्यावेळी काही मुले परत पुढे गेली होती.. आता बरचं चालायचं आहे हे ठावूक होतं.. त्यात कुणीही काही खाल्लं नव्हतं.... वाटेत जाताना जिथे करवंद दिसतील तिथेच त्यांचा फडशा पाडला.... परतीच्या वाटेवर बरेच ट्रेकर्स येताना दिसत होते.. काही बाईकवरुन येत होते... काही वेळाने तर कळसच झाला. एक माणुस चक्क टाटा सुमो घेउन किल्ल्यापर्यंत आला.. त्याला बघुन बाकिच्यांनी मला आणि महेशला परत शिव्या घालाययला सुरुवात केली.. पण जर आपल्याला गाडीने किल्ल्यापर्यंत जायचे होते तर मग ट्रेकिंगला अर्थ काय होता??? पण यांना बोलुन काही फायदा नव्हता.. ते आपलीच पुंगी वाजवत होते.... आता दीड वाजला होता आणि आमच्या पोटात आग पडली होती. ती थोडीशी करवंदांनी भागवली होती...आम्ही लवकरात लवकर पोहचायच्या प्रयत्नात होतो.. पण रस्ता संपतच नव्हता..... काही वेळाने समोरुन एक फोक्स वॅगन टॉरेग येताना दिसली... मी विचार केला आयला हमव्ही असली असती तर डायरेक्ट गडावरच पार्क केली असती....  पाय अक्षरशः गळ्यात आले होते.. काही ठिकाणी बसत बसत, आम्ही कसेबसे परत तुंगार्लीला पोहचलो... गाडी बघितली आणि जिवात जीव आला. अगोदर पोहचलेले गाडी खोलुन आडवे तिडवे पडले होते... आता जेवून डायरेक्ट घरी..... निघताना मी आणि महेश पुढच्या ट्रेकची प्लॅनिंग करत होतो... आणि ठरवले.. साला कुणी नाही आला तरी चालेल आपण दोघंच जायचे... बाकीच आम्हाला हसत होते आणि आम्ही त्यांना...... दुर्दैवाने काही चांगले फोटोज माझ्याकडुन डिलिट झाले....